ऑस्ट्रेलियात, इथल्यांसारखं बोलायचं झालं तर भारी तोंड वेंगाडावं लागतं.
हॅय म्यॅयट... म्हणजे हाय मेट... (mate).
सॅन्ड्येय... मॅन्डॅय.. सॅट्टॅड्यॅय...
पॅरामाटा... स्पेलिंग आहे - parramatta.. अगदी डब्बल र आणि डब्बल ट जड जाईल पण म्हणून .. पॅय्मॅटॅ? असं बोबड्यात काय म्हणून शिरायचं? मी म्हटलेलं त्यांना पॅरमिटर पासून परमात्मा पर्यंत काहीही ऐकू येतं.
नको तिकडे शब्दं तोडतात ते एक... चांगलं घसघशीत 'सेन्ट लिओनार्डस' म्हणावं तर्खडकरीत तर नाही... सॅन्टलिनर्डस... मला बाजूचा नकाशा घेऊन ’इथे इथे नाच रे मोरा’ करीत ते स्टेशन दाखवावं लागलं होतं तिकिट खिडकीतल्या म्यॅयटला.
आपल्या भारतीय नावांची तर छान विल्हेवाट असते.
लवान्न्या... मला हिला भेटण्यापूर्वी कुणी स्पॅनिश वगैरे असल्यासारखं वाटलं... निघाली लावण्या. तेच मग हिरान्न्याचं.... ज्याला राम्या म्हणत होते ती निघाली रम्म्या.
मग्डा... म्हणजे मुग्धा... शीटॉल, म्हणजे शीतल.. मकेश म्हणजे मुकेश... निटिंग म्हणजे नितिन...
एक आहे 'देव देव'... ते खरा आहे 'देव दवे'. नेवाळकर स्वत:च स्वत:ची ओळख 'नेवॉकर' म्हणून करून देतात. टकलेबाईंना टॅकल म्हणतात, आणि थिटेंची मुलगी स्वत:चं आडनाव 'थाईट' सांगते. आपटे महद्प्रयत्नांती 'ऍप्ट' पर्यंत तरी येतात. फ़ाटक... 'फ़टॅक' झालेत.
आमच्या प्रोजेक्टवर चेन्नईमधून माणसं घेण्याची थोर परंपरा आहे. खूपसे कुमार, श्रीनी, शंकर आहेत... झालच तर नील (नीलेन्द्रस्वामी), थंबी (ह्याचं नाव खरतर मोहम्मद मरिका थंबी आहे... पण मोहम्मद आहेत अजून तीनेकतरी... मरिका त्याला नकोय.... मग उरेल ते), मो( मोहम्मदच... अती तिथे माती झालीये ह्या नावाची इथे)... पुढल्या मोहम्मदला काय म्हणणारेत कुणास ठाऊक.
शॅम (वसुधैवम शामसुंदरम).. वॅसू (वासुदेवम संबंधंम), सम (अजून एक वासुदेवम संबंधंम).
एकदा गोविन्दप्रसादम शण्मुगवेलयुदम नावाचा कुणी टीमवर येणार म्हणताना मॅनेजरची पाचावर धारण.. हे कसं म्हणायचं? ह्यातलं काय म्हणायचं? किती म्हटलं तर चालेल?
त्याचा कोटी जप करूनही त्याला वाचासिद्धी सोडाच... ते नावही सरळ घेता आलं नसतं.
’.. आपण ह्याला कुमार म्हणूया?’ ह्या त्याच्या प्रश्नावर माझ्या नकळत मी कपाळावर हात मारून घेतल होता... ’व्हॉट? व्हॉट? डज इट मीन समथिंग रॉन्ग?’ ह्यावर काय बोलणार?
मी ह्या टीममधे आल्यावर सगळ्यांची ओळखपरेड झाली. आणि दुसर्याच दिवशी मॅनेजरने मला टीम मिटिंग भरवायला सांगितली. मी मिटिंग इन्व्हाईट ड्राफ़्ट करून त्याला दाखवलं.
’गंजा? गंजालापण घाल ह्यात’
मला काही केल्या टीममधे टकलू कोण ते आठवेना... खूप विचार करून शेवटी मलाच गंजत्वं प्राप्तं होणार असं ध्यानी आल्यावर एका देसीची मदत मागितली...’अरे, टकलू कौन है अपने टीम मे?’
’... अरे क्या बात... आपुनका बॉस हैना.. रॉड’. आता तो स्वत:ला टकलू म्हणवून घेईल इतका सहृदयी, उदार वगैरे मुळीच नव्हता.
’नही रे... वही बोल रहा था.. किसी गंजा को ऍड करनेको’...
(इथे फ़क्तं देसीच मारू शकेल असला सणसणित हात कपाळावर मारून घेत)’.. अरे टकलू टकलू क्या फ़िर? गंजा बोलो ना’ मला हा गांजा पिऊन आल्यासारखा दिसायला लागला होता.
’गंजा याने टकलू नही?’ हा आपल्याला मदत करणारय हे विसरून मी त्याला जितकं वेड्यात काढत येईल तितकं वेड्यात काढत म्हटलं.
’नही... बोले तो है... लेकिन वो... गंगा सुब्रमण्यम है ना.. उसको सब गंजा बोल्तेय’...इथे मी त्याच्याहीपेक्षा मोठ्ठा जबरी फ़टाका कपाळावर फ़ोडला. ती गंगा पोटरीपर्यंत शेपटा मिरवून होती... तिला गंजा म्हणतायत येडे.
’... ये आउझी लोग गंगा नै बोल सकते ना.. तो गंजा हो गया... अरे... गॅन्जेस नै बोल्ते क्या आपुनके गंगामैया को? तुम भी एकदम अन्नड की तर्हा क्या...’
तरी मी उगीच गोंधळ नको म्हणून तिला फोन लावला. तर तिचा व्हॊइस मेल वर गेला ,... हॅलो धिस इज गंजाज व्हॊइस मेल...’
माझ्या कपाळावर लवंगी फ़ोडली मी.
शलाका हे नाव तोंड वेंगाडत वेंगाडत श्यॅल्यॅक्यॅ असं घ्यायला... घेऊन होईपर्यंत लकवा भरेल इतकं वेंगाडावं लागेल... म्हणून कदाचित बरं घेतात. पण ते मी तंबी दिलेले किंवा मला ओळखून असणारे... बाकिच्यांचं काय?
शकाला.. शलाला, शाकाल, शाकालाका.. इथे मला बुम असं ओरडावसं वाटतं... इथवर ठीकय.
श्रीलंका? "that indian lady.. name shrilanka". काय लॉजिकै का?
गिहान्था कनगहपिटया... हे एक श्रीलंकन पात्रं आहे टीममधे. मधे एक दिवस अख्ख्या टीमने धाड घातली खाली कॅफ़ेवर. ह्याच्या नावाचा गोंधळ माझ्या नावापेक्षा भारी घालतात. ऑर्डरवर घालायला त्याचं नाव विचारणार्या रजिस्टरमागच्या चवळीच्या शेंगेला त्याने सांगितलं.. जस्ट पुट ’जी’.
थोड्यावेळाने त्याची ऑर्डर घेऊन जी ओरडत आली ती... ’पुट्जी... पुट्जी... पुट्जी....’. आम्ही हसून हसून मेलो.
मी शहाणी झाले होते. म्हणून पुढल्यावेळी ऑर्डरवर नाव विचारल्यावर मी नीट म्हटलं... ’एस’... तिनं चमकुन बघितलंही माझ्याकडे. मी परत मान हलवत सांगितलं ’एस्स’... हवेत दोन वेळा इंग्रजी एस काढून दाखवला.
पुटजीने अंगठा वर करून दाखवलाही.
माझी ऑर्डर बाहेर घेऊन आली ती ओरडत आली... ’ऍssssस.. ऍssssस.... ऍssssस’. पुटजीच्या तोंडातून कॉफ़ीचा फ़वारा.
माझी काही हिम्मत झाली नाही ऑर्डर घ्यायची. कोण तो ’ऍssssस..’ पुढे न आल्याने पुढल्या खेपेला ती आतल्या पदार्थाच्या नावे ओरडत आली. तेव्हा कुठे धीर आला मला हात वर करण्याचा.
आता मी निर्ढावलेय... काय वाट्टेल ती नावं सांगते. जेनी, फ़ेनी... हे माझे कॉफ़ी डूआयडी आहेत.. प्रत्येकवेळी रजिस्टरमागची डोळे वटारुन बघते. प्रत्येकवेळी मी तिला हसून ’ आय होप दे प्रोनाउन्स इट बेटर टुडे’ असं म्हणते.
समाप्त
पुर्वी आमच्या
पुर्वी आमच्या डिपार्टमेंटमध्ये 'पांडलोसकर' आडनावाचे एकजण होते. एका फॉरेन सप्लायरचे इंग्रज आणि फ्रेंच रिप्रेझेंटेटिव्ह्स कामासाठी आले असता त्यांची पहिली गाठ ह्या पांडलोसकरांशी पडली. एकमेकांची नावं विचारुन झाल्यावर त्यांनी ह्या आडनावाचं काय केलं असेल?
पांडु?
पांडु?
खुप दिवसानी दाद ला विनोदी
खुप दिवसानी दाद ला विनोदी लेखन मध्ये पाहुन लग्गेच लेख वाचायलाच घेतला.
लेखणी थोडी जास्त चालवा की.
नाही धनुकली. पुर्ण आडनाव
नाही धनुकली. पुर्ण आडनाव उच्चारलं, पण त्यांच्या पद्धतीने.
माझ्या मित्राच नाव कपिल मोरे
माझ्या मित्राच नाव कपिल मोरे (Kapil More). सुरुवातीला मोरे सोप वाटत म्हनुन तो तेव्हडच सांगायचा तर त्याचा सगळे मोर किंवा मोअर करायचे. वैतागुन मग कपिल सांगायला लागला तर त्याच की पील करुन टाकल......
आता तो की पील मोर / मोअर आहे .....
अश्विनी के
अश्विनी के
लै भारी... माझं तर आडनाव
लै भारी...
माझं तर आडनाव आजवर कोणी उच्चारलं नाही... नावाचे खुप वर्जन्स केले, आडनावाबद्दल त्या़ंचा नेहमीचा प्रश्न.... 'हाऊ टु प्रोनाउन्स इट?' मग मीच मदतीचा हात म्हणुन सांगायचो. 'यु कॅन कॉल मी मल्ली.' आणि आपली इज्जत वाचवुन घ्यायचो.
दादचा लेख म्हणुन पहीला वाचायला घेतला...
एक्दम झक्कास...
दाद. लै भारी. परदेशात वाट
दाद. लै भारी.
परदेशात वाट लावतातच, त्यांना उच्चार माहित नसतील म्हणून पण भारतातदेखील मद्रासात लोकं नावांची लईच वाट लावतात. श्रीयुत सतिश "माय सरनेम इज काणे" असं दुरूस्त करून करून इतके वैतागले की आता त्यांनी सरळ मिस्टर केन नावाला ओ देणे चालू केले आहे. इकडे अशी सुरेश जॉन वगैरे तत्सम बरीच नावं असल्यानं सतिश केन चालून जातंय.
सुनिधीला धडपणे सुनिधी म्हणणारा एकही मद्रासी मला आज्वर भेटलेला नाही. सुनिती, सुनिली, सुनीदा असलीच रूपं ऐकली आहेत.
मस्त लेख! उसगावात शिकत असताना
मस्त लेख!
उसगावात शिकत असताना कॉलेज मध्ये मला "मायनल केल" (Minal kale) नावाची सवय करुन घ्यावी लागली होती.
मी ऑफिसमध्ये वाचत आहे. हसू
मी ऑफिसमध्ये वाचत आहे. हसू कसे आवरु ते कळत नाही.
एकदम भारी दाद तुम्हाला दाद.
मस्तच लिहिलेय.. गेली अनेक
मस्तच लिहिलेय..
गेली अनेक वर्षे मला डेनिश म्हणताहेत.. खर्या नावाने हाक मारल्यावर लक्ष देऊ शकेन का, अशी शंका येतेय.
माझ्या ऑफिसच्या ओळखपत्रावरही तसेच नाव आहे
लै भारी लिवलस गो श्रीलंके
लै भारी लिवलस गो श्रीलंके ....

आमच्याकडे एक दोदवाडकर म्हणून साहेब होते - एका युरोपीय माणसाने त्यांच्या नावाचा उच्चार करताना फक्त "दोदो दोदो दोदो दोदो...." एवढंच चालू ठेवलं - तिथेच पिन अडकली त्या बिचार्या गोर्याची ...
एकदम मस्त लेख..
एकदम मस्त लेख..
भारी आहे सगळाच लेख
भारी आहे सगळाच लेख
प्रतीक्रीया पण भारी. मी पण विचार करत होते शलाका कोण गाण्याच्या धाग्यावर
.
जस्ट पुट ’जी’....पुट्जी... पुट्जी... पुट्जी....’. आम्ही हसून हसून मेलो. >>>>.मीपण.
दाद सांगत जा. म्हणजे डॅड नावाची बाई बघून ते लोक झीट येऊन पडतील.>>>> अगदि सातीजी .
दिनेशदा , डेनिश इथे पेस्ट्री शॉप आहे. त्यामुळे ते गोड नावही माझ्यामते तुम्हाला सूट होतय.
.
आईशप्पथ!! मेले हसून हसून
लोल.. भारी आहे दाद, आम्हा
लोल.. भारी आहे
दाद, आम्हा सर्वांचे आयडी ऑस्सी अॅक्सेंटमध्ये करून द्या ना ..
(No subject)
ऋन्मेऽऽष तुझ नाव घेता घेता
ऋन्मेऽऽष तुझ नाव घेता घेता जीभेला गाठी पडलेले ऑस्सी समोर आले
ते प्रांदरे म्हणजे पुरंदरे
ते प्रांदरे म्हणजे पुरंदरे का??
दाद मस्त आहे लिखाण. मनोरंजक
दाद मस्त आहे लिखाण. मनोरंजक एकदम
शहाण्या माणसाने ऑफिसात वाचू
शहाण्या माणसाने ऑफिसात वाचू नये हा लेख! लेख तर लेख वर प्रतिसाद वाचून सुरु असलेलं खुसूखुसू हसणे थांबतच नाहीये

उसगावात एका इंडोनेशीयन डॉकची अपॉ. घेतली होती. नाव पिचया. मी आणि अर्धांगाने 'तो' असल्याचं समजून पिच्चय्या नावाच्या डॉक.ला नजरेनं हेरायला सुरुवात केली. एक सुंदरश्या बाईने, हॅलो इयाम पिचया, अशी ओळख सांगितल्यावर आमचे चेहरे पाहण्यालायक होते. नंतर परतीच्या वाटेवर नवरा मधेच कुठेतरी कार थांबवून ओरडला -अगं तिचं नाव विजया!
दाद एकदम मस्त लेख. आमचे
दाद एकदम मस्त लेख.
आमचे स्पॅनिश ग्राहक
यजूर = याहू
जयन्त = हयान, खजान, ज्जज्जंत अस वाट्टेल ते म्हणायचे
माझ नाव वीSSक्रान , फीSSक्राम
पण आपण सुद्धा स्पॅनिश आणि पोर्तुगीज नाव खूप वेळा चुकिची उच्चारतो. तिकडे पण कोणीतरी "डॅड" त्यांच्या लिंग्वुआ दा माय (माय बोली) मध्ये लिहितच असेल. :).
नंतर परतीच्या वाटेवर नवरा
नंतर परतीच्या वाटेवर नवरा मधेच कुठेतरी कार थांबवून ओरडला -अगं तिचं नाव विजया!
>>
लेख आणि प्रतिसाद सगळेच
लेख आणि प्रतिसाद सगळेच
आपणही त्यांच्या नावाची वाट
आपणही त्यांच्या नावाची वाट लावतोच ना.. >>> सहमत
गेली १-२ वर्षं एका श्रीलंकन बँकर चं आडनाव कसं उच्चारावं या विवंचनेत आहे मी. त्याचं नाव सोपं असल्याने अजून तसं काही अडलं नाही. त्याच्या आडनावाचे स्पेलिंग आहे.. Mallawaarachchi !!!!
हे असं डिस्कशन आधीही कुठेतरी
हे असं डिस्कशन आधीही कुठेतरी झालंय असं का वाटतंय??????
प्रत्येक देशातील भाषा आणि
प्रत्येक देशातील भाषा आणि उच्चारण अगदी वेगवेगळे असतात. आपली नावे ते प्रामाणिकपणे उच्चारायचा प्रयत्न करतात. पण आपल्याला ज्या नावाचे उच्चार सहज जमतात, ते त्यांना जमतच नाहीत.
नायजेरियात एक कारखानीस नावाचे गृहस्थ होते, त्यांना त्यांचा स्टाफ खाखानी म्हणत असे. शेवटचे अक्षर उगाचच वगळायची त्यांना ( फ्रेंचामूळे ? ) खोड असते. मला ते "बाबा" म्हणत किंवा ओगा पातापाताओ ( बघा तूम्हाला अडला कि नाही हा उच्चार ? )
आफ्रिकन आडनावे जिभेचा कस लावणारी असतात. मुहिरवा, तवाहिरवा, बाईगांबा, बॉन्टेम्स.. हि माझ्या सध्याच्या काही सहकार्यांची आडनावे,
फार्सी लिपीत असली अरेबिक भाषेत प, ग, च अशी अक्षरे नाहीत. उर्दू भाषेतही भ असे अक्षर नसून ब + ह असे जोडून लिहितात. त्यामूळे अशी अक्षरे असणारी नावे उच्चारणे त्यांना अवघड जाते. आपल्याला असतील असे वाटणारे शब्दही अरेबिक भाषेत नाहीत. उदा. इजिप्त, पॅलेस्टाईन ( मिस्र, फिलिस्तीनी हे खरे शब्द )
त्यामूळे प्रभू चे बरबू, पेप्सी चे बेब्सी, सँडविच चे संदावितश असे सहज होते. माझा ड्रायव्हर प्रभाकर होता त्याला सगळे अबू बाकर म्हणत.
ओ आणि उ साठी त्या लिपित एकच अक्षर असल्याने तोही घोळ असतो. संतोष चा संतुश व्हायला वेळ लागत नाही.
काही काळाने त्याची सवय होऊन जाते.
माझ्या सरळ नावाचं ही
माझ्या सरळ नावाचं ही वेडंवाकडं होतंच... युजेश, जोजेश, योगुश का ही ही...
सोप्या अरेबिक लिपित योगेश
सोप्या अरेबिक लिपित योगेश लिहिताना, योजेश असेच लिहितात आणि यो आणि यू चे अक्षर सारखेच असल्याने..
मी वाचल्याप्रमाणे तामिळ लिपीतही गोपालन आणि कोबालन एकाच पद्धतीने लिहितात !
दाद, भारी डॅड
दाद, भारी

डॅड
Pages