राधे... - १. सृजन

Submitted by अवल on 31 October, 2014 - 20:45

मला अजून आठवतो तो दिवस. नुकतेच कालिया मर्दन झाले होते. त्यामुळे मी खूष होतो. आम्ही सगळेच बालगोपाल; इतकेच नव्हे तर मैय्या, नंदबाबा आणि सगळेच गोकुळ आनंदात अन काळजीमुक्त होते.
त्या दिवशी सकाळीच सुदामा आणि ५-६ जण आले. आणि मैय्याला विचारू लागले, " आम्ही जाऊ का यमुनातीरी, कान्हाला घेऊन ? " अन मैय्यानेही हसत हसत आम्हाला जाऊ दिले होते.

एकमेकांना ढुशा देत अन सुदाम्याची चेष्टा करत आम्ही सगळे यमुनातीरी आलो. आणि कदंबाच्या अंगाखांद्यावर विसावलो. सूर्य आता वर आलेला; पण कदंबाच्या पानांनी आमच्यावर छान सावली धरलेली. मी माझ्या लाडक्या फांदीवर बसलो.अन सुदाम्याने पाव्याला हात लावत प्रेमळ हट्ट केला, " वाजव की रे ..."

मी पावा काढला आणि ओठावर ठेऊन वाजवणार; इतक्यात दूरवर तू दिसलीस. तू अन अनय येत होतात. तू काहीतरी तावातावाने सांगत होतीस अन तो हात मागे बांधून, ताठ मानेने पुढे पुढे चालत होता. तू मागून त्याला एकदा थांबवण्याचा प्रयत्नही केलास...पण तो न थांबता तुलाच थोडी खेच बसली. तू पुन्हा त्याच्या मागे धावलीस... वा-यावर तुझी ओढणी फडफडली. जणुकाही अनय तुला पुढे ओढत होता अन वाहणारे वारे तुला मागे ढकलत होते. तुझी होणारी घालमेल, ओढाताण स्पष्ट दिसत होती अगदी !

आता तू अगदी समोर आलीस. ऐकू येत नव्हतं काही, पण स्पष्ट दिसत मात्र होतं. अनय तट्टकन उलटा फिरला. मागे बांधलेले हात आता सुटले. एका हाताने तुझा दंड धरत तुला त्याने ठामपणे थांबवले. आणि दुस-या हाताने काहीतरी समज दिल्यासारखी मुद्रा करत काहीबाही बोलला. अन दुस-या क्षणी तुला सोडून देत तो पुन्हा तट्ट्कन उलटा होऊन बाजाराच्या दिशेने ताड ताड निघून गेला.

तू तशीच उभी... काष्ठवत ! कोरड्या डोळ्यांनी पाठमो-या जाणा-या अनय कडे बघत.
अन मग कोणीतरी ढकलल्यासारखी तू तीरावर आलीस. अगदी माझ्यासमोर येऊन मटकन बसलीस. हातातली घागर कधी खाली ठेवलीस तुलाही कळलं नाही. अन गुढग्यांना पोटाशी धरत, भकास नजरेने वर बघितलस... माझ्या आरपार... !
अन कोमल ऋषभ लावत साद घातलीस... अनया....

तू आरपार बघत होतीस माझ्यात. अन मलाही जाणवलं, माझ्या आत आत एका कोप-यात अनय ताडताड चालत दूर जातच होता की !

तू अनयला साद घातलीस तोच कोमल ऋषभ माझ्या पाव्यातून वाहू लागला. अन माझ्याही न कळत मी पाव्यात फुंकर मारली. सारा आसमंत त्या कोमल ऋषभाने हेलावून गेला. अन कितीतरी वेळ तुझी वेदना माझ्या पाव्यातून ठणकत राहिली. सारे, सारे त्या वेदनेने हेलावले. हळुहळु एक एक जण पांगले.
आता तीरावर केवळ तू, मी अन कोमल ऋषभ नुरले. एक क्षणी माझी बोटं थरथरली अन अलगत षडजावर स्थिरावली.

अन मग तुझ्या काळ्याभोर डोहात कुठुन कुठुन जलद भरून आले. भरभरून ओथंबू लागले. ते पाहून माझी बोटं थरथरली अन पुन्हा ऋषभ निनादला. तशी त्या थेंबांनी किनारा सोडला. गंधार कसाबसा गाठला मी, पण तुझ्या धारांनी मात्र सगळाच ठावठिकाणा सोडला होता...
अन तुझ्या ओठी आलेच...." श्रीरंगा..." अगदी सा रै ग...

आता तुझ्या डोळ्यात ओळख आली. माझ्यातल्या अनयला विसरून माझ्यातल्या श्रीरंगाची ओळख तुला पटली. तशीच उठून माझ्यासमोर उभी राहिलीस.

" का रे, का छळतोस ?
किती उरापोटी आवरते मी.
अन तू असे वाहून घालवतोस?
आवरायला शीक रे, आवरायला शीक.
ठेवावे थोडे ओठात, पोटात अन उरातही ! "

... मला तू शिकवलेला, तो पहिला धडा होता.
पावा असा वाजवावा की सूर तर निघावा हवा तसा, पण वेदना आत - आत आवरून, सावरून रुजू द्यावी.
तरच ते सृजन !

राधे...

------

राधे...2 http://www.maayboli.com/node/51440
राधे...3 http://www.maayboli.com/node/51543
राधे...४. http://www.maayboli.com/node/51594
राधे ५ . http://www.maayboli.com/node/51968
राधे ६. http://www.maayboli.com/node/52356
राधे... ७. http://www.maayboli.com/node/54215

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< पावा असा वाजवावा की सूर तर निघावा हवा तसा, पण वेदना आत - आत आवरून, सावरून रुजू द्यावी.
तरच ते सृजन ! >>
अफाट.

" का रे, का छळतोस ?
किती उरापोटी आवरते मी.
अन तू असे वाहून घालवतोस?
आवरायला शीक रे, आवरायला शीक.
ठेवावे थोडे ओठात, पोटात अन उरातही ! "

... मला तू शिकवलेला, तो पहिला धडा होता.
पावा असा वाजवावा की सूर तर निघावा हवा तसा, पण वेदना आत - आत आवरून, सावरून रुजू द्यावी.
तरच ते सृजन !>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> .......___/\___अप्रतिमच ग!

अफाट लिहीलं आहेस.... कुंचल्यातून साकारल्या जाणार्‍या अप्रतिम चित्रासारखं... सलग, सहज...

Pages