संवाद - श्रीमती सुमित्रा भावे व श्री. सुनील सुकथनकर

Submitted by चिनूक्स on 23 July, 2009 - 18:06

sbst_pic1.jpg

दादासाहेब फाळक्यांची हलती चित्रं पडद्यावर झळकली, त्याला आता शंभर वर्षं पूर्ण होतील. या शतकभराच्या काळात मराठी चित्रपटसृष्टीनं अनेक स्थित्यंतरं अनुभवली. फाळक्यांनी लावलेलं रोपटं 'प्रभात'च्या काळात तरारलं. 'प्रभात'नं मराठी चित्रपटांना साता समुद्रापार नेलं. भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम, मा. विनायक, राजा परांजपे, राजदत्त यांनी सातत्यानं उत्तम चित्रपटांची निर्मिती करून मराठी चित्रपटांचा दर्जा उंचावत नेला. ऐंशीच्या दशकात मात्र परिस्थिती बदलली. निकृष्ट निर्मितीमूल्यं, त्याच त्या पटकथा अशा अनेक कारणांमुळे मराठी चित्रपटसृष्टी डबघाईला आली. मराठी चित्रपटांना प्रेक्षक मिळेनासा झाला. अगोदर तमाशापटांची व नंतर विनोदी चित्रपटांची लाट यास कारणीभूत ठरली.

अशा परिस्थितीत उत्तम चित्रपटांची निर्मिती करून मराठी चित्रपटांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर नवीन ओळख मिळवून देण्याचं काम केलं ते श्री. अमोल पालेकर व श्रीमती सुमित्रा भावे-श्री. सुनील सुकथनकर यांनी. मराठी चित्रपटांना संजीवनी देण्याचं संपूर्ण श्रेय या दिग्दर्शकांना जातं.

श्रीमती सुमित्रा भावे आणि श्री. सुनील सुकथनकर या दिग्दर्शकद्वयीनं मराठी चित्रपटांना वेगळं वळण दिलं. सातत्याने आणि जाणीवपूर्वक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करून त्यांनी भारतीय चित्रपटक्षेत्रात खूप मोलाची कामगिरी केली आहे. सुमारे चाळीस लघुपट, पाच लघुचित्रपट, दूरदर्शन मालिका आणि 'दोघी', 'जिंदगी जिंदाबाद', 'वास्तुपुरुष', 'दहावी फ', 'देवराई', 'बाधा', 'नितळ', 'घो मला असला हवा' या आठ चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे.

हे सर्व चित्रपट अतिशय वास्तववादी आहेत. सामाजिक विषय गांभीर्याने हाताळणारे आहेत. ते पूर्णतः व्यावसायिक नसले तरी कलात्मकही नाहीत. सामाजिकता व मनोरंजनाचा अतिशय सुंदर समन्वय या चित्रपटांत दिसून येतो. हे चित्रपट प्रेक्षकांना विचारप्रवृत्त करतात. मराठी माणसाच्या संवेदना व भावना या चित्रपटांत डोळसपणे मांडलेल्या दिसून येतात. नाट्यमयता, वातावरणनिर्मिती, छायाप्रकाशाचा सुंदर खेळ, उत्तम संगीत, सकस व्यक्तिचित्रण या सर्वांचा सुंदर मेळ या चित्रपटांत घडून येतो. अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवांत हे लघुपट व चित्रपट नावाजले गेले आहेत. या सर्व चित्रपटांना असंख्य राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

या चित्रपटांतील व्यक्तिरेखा वास्तववादी व सशक्त आहेत. त्या ठोकळेबाज नाहीत. 'देवराई'मधील शेष, 'दोघी'मधील गौरी आणि कृष्णा, 'नितळ'मधील नीरजा, 'बाधा'मधील अनशी या व्यक्तिरेखा खरोखर अविस्मरणीय आहेत.

या दिग्दर्शकद्वयीनं उत्तम, सकस चित्रपटांची निर्मिती तर केलीच, पण अनेक गुणी तंत्रज्ञ, दिग्दर्शकही मराठी चित्रपटसृष्टीला दिले. उमेश कुलकर्णी, सचिन कुंडलकर हे सुमित्राताई व सुनील सुकथनकरांचे सहाय्यक दिग्दर्शक असलेले तरूण आज स्वतंत्रपणे चित्रपटांचं दिग्दर्शन करत आहेत, नावाजले जात आहेत.

श्रीमती सुमित्रा भावे व श्री. सुनील सुकथनकर यांच्याशी केलेली ही बातचीत...

sbst_1.jpg

चिन्मय : चित्रपटांची कोणतीही पार्श्वभूमी नसताना आपण चित्रपटक्षेत्राकडे कसे वळलात?

सुमित्राताई : सुरुवातीला मी कर्वे शिक्षण संस्थेत शिकवत होते. तिथे काही शोधप्रकल्पांवरसुद्धा मी काम केलं होतं. त्यानंतर मी 'स्त्रीवाणी'त काम करत होते. तिथल्या काही प्रकल्पांची मी प्रमुख होते. शिवाय participatory researchचे काही प्रकल्प होते, त्यावर मी काम करत होते. Participatory researchचं मूळ तत्त्व हे की, त्यात respondentला सहभागी करून घ्यायचं असतं, आणि प्रकल्पातून निघालेले निष्कर्ष त्या respondentला सांगायचे असतात. या संशोधनातून निघालेल्या निष्कर्षांमुळे respondent असलेल्या व्यक्तीच्या आयुष्यात थोडा का होईना, पण बदल व्हावा, हा त्यामागील हेतू असतो. हा हेतू ध्यानी ठेवून जेव्हा आम्ही आमच्या प्रकल्पाचा विचार केला, तेव्हा आमच्या लक्षात आलं की आमच्या प्रकल्पात respondent म्हणून सहभागी झालेल्या बहुतेक दलित स्त्रिया अशिक्षित होत्या. आम्ही प्रकल्पाचे निष्कर्ष म्हणून लिहिलेली पुस्तकं त्या कशा वाचणार? मग ठरवलं की दुसर्‍या कुठल्यातरी माध्यमातून आपण हे सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचवायला हवं. चित्रं, पथनाट्यं, स्लाइड शो अशा वेगवेगळ्या माध्यमांचा विचार करत असताना असं वाटलं की लघुपटाद्वारे त्यांच्यापर्यंत आपल्याला सहज पोहोचता येईल. दृक्-श्राव्य माध्यमाचा परिणाम हा नेहमीच दीर्घकाळ टिकणारा असतो. कारण त्यातून संवादाच्या सर्व पोतांची अनुभूती मिळते. आणि मग मी लघुपट तयार करायचं ठरवलं.

माझं सुदैव असं की, सुरुवातीला मी त्या प्रकल्पाची Assistant Director होते. माझी Director जी होती, ती अमेरिकन होती. डॉ. फ़्रान्सिस मारिया यासुस तिचं नाव. तीही माझ्यासारखीच वेडी, आणि माझ्यावर तिचा खूप विश्वास होता. मी लघुपट करायचा म्हटल्यावर तिनं लगेच परवानगी दिली. मग सुनील वगैरे मुलांना हाताशी घेऊन मी तो लघुपट केला, आणि अक्षरश: हजारो बायकांना दाखवला. झोपडपट्ट्यांमध्ये, खेड्यांमध्ये, महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर, भारताबाहेर असं सगळीकडे आम्ही तो लघुपट दाखवला. हा लघुपट पाहून बायकांनी स्वत:चे अनुभव सांगावे, आपलं मन मोकळं करावं, अशी आमची इच्छा होती. आणि बर्‍याच अंशी आमची ही इच्छा पूर्ण होते आहे, असं आमच्या लक्षात आलं. मग मला या माध्यमाची ताकद लक्षात आली. लघुपटांद्वारे बरंच काही करता येतं, हे माझ्या लक्षात आलं. आणि मग मी या क्षेत्रात काम करतच राहिले.

सुनील : मला नाटकाची भयंकर आवड होती. त्यातही अभिनेता होणे ही माझी लहानपणापासून प्रामाणिक महत्त्वाकांक्षाच होती. शाळेत सातवी-आठवीत तर मी अभिनयासाठीची अनेक बक्षिसंही मिळवली होती. चार्ली चॅप्लिन हा माझा आदर्श होता. तो एक संपूर्ण कलाकार होता, आणि आपल्या कामाद्वारे त्याने अक्षरश: संपूर्ण मानवतेवर आपला ठसा उमटवला होता. पण पुढे कॉलेजात गेल्यावर फक्त नाटकांमध्ये काम करण्यापुरतीच ही महत्त्वाकांक्षा मर्यादित राहिली. पुढे काय करायचं, हे काही स्पष्ट नव्हतं. त्याच वेळी मी आणि माझा वर्गमित्र, सुधीर पलसाने, ज्याने आता 'वळू' आणि 'गाभ्रीचा पाऊस' या चित्रपटांचं छायाचित्रण केलं आहे, आम्ही ट्रेकिंगला गेलो होतो, आणि तिथे आम्हांला सुमित्राताईंचं पत्र आलं की आपल्याला एक लघुपट बनवायचा आहे. लघुपटाचं नाव 'बाई'. आम्ही आलो परत मग, आणि सुमित्राताईंबरोबर काम करायला लागलो. तेव्हा खरं म्हणजे आम्हांला या माध्यमाबद्दल शून्य माहिती होती. अडाणीपणातूनच आमच्या कामाला सुरुवात झाली. सुमित्राताईंनासुद्धा काहीच अनुभव नव्हता. पण 'बाई' हा लघुपट तयार करण्याची जी प्रक्रिया होती, ती आम्हांला खूप आनंद देऊन गेली. मी, सुधीर आणि सती, सुमित्राताईंची मुलगी, असे तेव्हा होतो, आणि आम्ही त्या प्रक्रियेतले सगळे तपशील बघितले. म्हणजे अगदी negative cuttingपासून ते जावेद सय्यद यांचं संकलन, देबू देवधरांचं छायाचित्रण असं सगळं आम्हांला बघायला मिळालं. Shot division म्हणजे काय, ते शिकलो. यातूनच चित्रपट या माध्यमाबद्दल प्रेम निर्माण झालं. आणि याच क्षेत्रात काहीतरी करावं, असं वाटायला लागलं. सतरा-अठरा वर्षांचा होतो मी तेव्हा. कॉलेजात पहिल्या वर्षाला होतो. FTIIला जाण्याची इच्छा होती. पण तिथे पदवीधर असल्याशिवाय प्रवेश मिळत नाही, म्हणून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं.

FTIIला गेल्यावर लक्षात आलं की, लघुपट तयार करताना आपण जी प्रक्रिया बघितली, तीच इथे शिकवली जाते आहे. आपण निवडलेली दिशा योग्य आहे, हे तिथे जाणवलं. चित्रपटांबद्दलचं प्रेमही वाढीस लागलं. तंत्रशुद्ध शिक्षण तिथे मिळालं. रोज संध्याकाळी एक चित्रपट बघायला मिळायचा, त्यामुळे जगभरातल्या उत्तम चित्रपटांशी ओळख झाली. पण तिथून बाहेर पडल्यानंतर नक्की कशाप्रकारचे चित्रपट बनवायचे, हे मला कळत नव्हतं, आणि या बाबतीत FTIIने मनात खूप गोंधळ तयार केला होता. सुरुवातीचा काही काळ मला वाटत होतं की, लघुपट, किंवा संस्थांसाठीचे लघुचित्रपट तयार करणं, हे काहीतरी मर्यादित कर्तृत्व आहे. आपल्याला हवी असलेली कलात्मक उंची असे लघुपट तयार करून आपण गाठू शकत नाही, असं मला तेव्हा वाटत होतं. पण मग नंतर माझे विचार स्पष्ट होत गेले. सुंदर लघुपट तयार करण्यातूनही कलात्मक उंची गाठता येते, हे लक्षात आलं. दुसरं म्हणजे, सामाजिकदृष्ट्या उपयुक्त असणे म्हणजे कलात्मकदृष्ट्या कमी, असं नाही, हे लक्षात आल्यावर ती कोंडी कमी झाली.

त्या दृष्टीनं 'चाकोरी' हा लघुपट मला खूप महत्त्वाचा वाटतो. कारण चित्रपटाच्या परिभाषेतलं काहीतरी खास सापडल्यासारखं आम्हांला वाटलं, आणि आम्हांला जे सापडलं, ते चित्रपटाच्या परिभाषेत आम्हांला मांडता आलं. या लघुपटानं आम्हांला फार समाधान दिलं, आणि या लघुपटामुळेच NFDCनं आम्हांला 'दोघी' बनवण्यासाठी आमंत्रित केलं. पण अजूनही आम्ही लघुपटांना कमी लेखत नाही. कितीही लहान फिल्म असली तरी तेवढाच उत्साह असतो. तेवढीच मजा येते. कारण लघुपट तयार करण्याची संपूर्ण प्रक्रियाही चित्रपटासारखीच असते, आणि तीही एक स्वतंत्र कलाकृतीच असते.

चिन्मय : 'बाई'नंतर आजपर्यंत आपण असंख्य लघुपट तयार केले आहेत. त्याबद्दल थोडं विस्तारानं सांगाल?

सुनील : 'बाई'नंतर आम्ही 'पाणी' हा लघुपट केला. तो बराच गाजला. अनेक ठिकाणी दाखवला गेला. 'यानंतर पुढे काय?', असं अनेकांनी तेव्हा आम्हांला विचारलं होतं, पण आम्ही तसा काही विचारच केला नव्हता. त्यानंतर मी FTIIला गेलो. तिथून बाहेर पडल्यानंतर 'मुक्तांगण मित्र' या संस्थेनं आम्हांला त्यांच्यासाठी एक लघुपट तयार करायला सांगितलं. 'मुक्ती' या नावाची एक featurette आम्ही त्यांच्यासाठी तयार केली. खरं म्हणजे हा पावणे दोन तासांचा एक चित्रपटच होता. त्या दृष्टीनं, आम्ही केलेला हा पहिला चित्रपट होता, असं म्हणता येईल. व्हिडिओवर ही फिल्म आम्ही केली, आणि हिंदीत केली कारण सर्वांपर्यंत ही फिल्म पोहोचावी, अशी इच्छा होती. यात काम करणारे काही व्यसनाधीन होते आणि काही अभिनेते होते. मीही यात काम केलं होतं. अभिराम भडकमकर, अभय कुलकर्णी होते. ज्योती सुभाष यांनी डॉ. सुनंदा अवचट यांची प्रमुख भूमिका केली होती.

त्यानंतर आम्ही 'संवाद' या नावाचा एक लघुपट केला. स्त्रीवादी चळवळीच्या दृष्टीने हा लघुपट आम्हांला फार महत्त्वाचा वाटतो. 'स्त्रीवाणी'साठी सुमित्राताईंनी संशोधन केलं होतं. त्यांनी गांधीवादी विचारसरणीच्या अनेक स्त्रियांचा अभ्यास केला होता आणि त्यातून ही पटकथा तयार झाली होती.

sanvaad.jpg

'संवाद' - ज्योती सुभाष व उत्तरा बावकर

सुमित्राताई : माझा Ph.Dचा विषय होता तो. 'Professional social work and Gandhian social work' या विषयाचा मी तौलनिक अभ्यास करत होते. मी संशोधन केलं पण प्रबंध लिहिला नाही. गांधीवादी चळवळीचा आणि स्त्रीवादी चळवळीचा फार जवळचा संबंध आहे. आणि आपल्याकडच्या स्त्रीवादी चळवळीला याचं भान नाही. गांधीवादी विचारसरणीला आपलंसं करून ज्या स्त्रिया स्वतंत्रपणे जगत आहेत, त्यांचा अभ्यास करून 'गांधीवादी स्त्रीवाद' असं आपल्याला मानता आलं पाहिजे, असं मला तेव्हा वाटत होतं, आणि म्हणून 'स्त्रीवाणी'साठी मी हा अभ्यास केला. 'स्त्रीशक्ती' या नावानं नंतर हा अभ्यास पुस्तकरुपात प्रकाशितही झाला. तर यातल्या दोन स्त्रियांच्या आयुष्यावर लघुपट करायचा, असं आम्ही ठरवलं. गुजरात-महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या भागात त्या काम करायच्या.

या स्त्रियांच्या तरुणपणापासूनचे अनुभव आम्हांला दाखवायचे होते, आणि म्हणून आम्ही व्यावसायिक कलावंत या लघुपटात घेण्याचं ठरवलं. 'संवाद'मध्ये ज्योती सुभाष आणि उत्तरा बावकर यांनी त्या दोन स्त्रियांचं काम केलं होतं. उत्तरा बावकरांनी तेव्हा पहिल्यांदा आमच्याबरोबर काम केलं, आणि तेव्हापासून त्या आमच्या बरोबर आहेत. स्त्रीवादी विचारसरणी असणारी मी त्या दोघींची मुलाखत घ्यायला जाते, आणि त्यांचं आयुष्य, त्यांचे विचार, त्यांचे अनुभव बघून ती कशी बदलते, हे त्या कथानकात होतं.

सुनील : त्यानंतर आम्ही 'चाकोरी' हा लघुपट केला. कोणत्याही संस्थेसाठी हा तयार केला नसल्याने आम्ही पहिल्यांदाच चित्रनिर्मितीतलं स्वातंत्र्य अनुभवलं. 'संवाद' हा लघुपट आवडलेल्या सामाजिक क्षेत्रातल्या एक ज्येष्ठ कार्यकर्त्या होत्या. त्यांनी आम्हांला काही पैसे दिले, आणि म्हणाल्या, 'तुम्हांला हवा तसा लघुपट करा'. त्या पैशातून आम्ही हा लघुपट केला. नवर्‍याने टाकलेली एक मुलगी खेडेगावात राहते, कष्ट उपसते. आणि अचानक ती चोरून सायकल शिकते आणि सगळ्या गावासमोर चालवून दाखवते, एवढीच ती गोष्ट होती. तिला नव्यानं सापडलेलं स्वातंत्र्य, तंत्रज्ञानाच्या मदतीने तिने मिळवलेलं स्वावलंबन अशा अनेक गोष्टी त्यात अभिप्रेत होत्या. आमचा हा लघुपट खूप गाजला. अंगणवाडी सेविकांपासून ते चित्रपट महोत्सवांपर्यंत सर्वदूर हा लघुपट दाखवला गेला. मला आठवतं, दिल्लीला विधु विनोद चोप्रा, केतन मेहता वगैरे मंडळींनी हा लघुपट बघितल्यावर आमचं खूप कौतुक केलं होतं.

'चाकोरी'नंतर चित्रपट हे माध्यम आपल्याला सापडलं आहे, असं आम्हांला वाटलं. त्यानंतर आम्ही अनेक लघुपट केले. त्यांपैकी बहुतेक सगळे हे वेगवेगळ्या संस्थांसाठीच केले होते. 'लाहा' हा लघुपट मात्र आम्ही स्वतंत्रपणे तयार केला. नर्मदा आंदोलनातल्या आदिवासींशी संबंधित असा हा लघुपट होता. एका आदिवासी जोडप्याची ही गोष्ट होती. हे जोडपं विस्थापन स्वीकारतं आणि त्या दोघांची कशी ससेहोलपट होते, हा लघुपटाचा विषय होता. आंदोलन त्यात थेट कुठे येत नाही. ही दोघं आधी आंदोलनात असतात, नंतर त्यातून बाहेर पडतात, आणि तरी त्यांना व्हायचा तो त्रास होतोच.

या आदिवासींमध्ये नवीन लग्न झालेल्या जोडप्याला संपूर्ण समाज नवीन घर बांधून देतो. आणि त्यानंतर बोकड कापून सगळ्यांसाठी जेवण करतात. ही जी पद्धत आहे, तिला 'लाहा' असं म्हणतात. विस्थापन झाल्यानंतर पत्र्याची घरं त्यांना मजुरी देऊन उभी करावी लागतात. समाजाचं एकसंधत्व नष्ट होतं. मजुरी देण्यासाठी पैसे कुठून आणायचे, इथपासून प्रश्न निर्माण होतात. त्यांच्या आयुष्यातून 'लाहा' हद्दपार होतो, अशी ती कथा होती.

नंतर मग आम्ही लघुपट, पूर्ण लांबीच्या चित्रपटांबरोबरच दूरदर्शनसाठी मालिकाही केल्या. विद्याधर पुंडलिक, मिलिंद बोकील, सुधा मुर्ती, यु. आर. अनंतमूर्ती यांच्या कथांवर आधारीत ते भाग होते.

bhains.jpg

'भैंस बराबर' - देविका दफ्तरदार, रेणुका दफ्तरदार व नीना कुलकर्णी

सुमित्राताई : 'भैंस बराबर' ही मालिका करताना आम्हांला खूप मजा आली. 'राष्ट्रीय साक्षरता मिशन'ने आम्हांला NFDCच्या मार्फत ही मालिका करायला सांगितली होती. स्त्रियांची साक्षरता हा मालिकेचा विषय होता. मालिकेचा प्रत्येक भाग ही स्वतंत्र गोष्ट होती.

चिन्मय : 'देवराई', 'नितळ' हे चित्रपट निर्मात्यांनी दिलेल्या विषयांवर तयार केले गेले होते. 'वास्तुपुरुष' आणि 'दहावी फ' या चित्रपटांमागची प्रेरणा काय होती?

सुनील : सुमित्राताईंच्या आई त्यांना एक दिवस म्हणाल्या की, तू इतके सिनेमे काढतेस, तर तू तुझ्या आजोळची चित्तरकथा का नाही मांडत? 'आजोळची चित्तरकथा' म्हटल्यावर सुमित्राताईंच्या मनात विचार सुरू झाले. 'वास्तुपुरुष'मधले अण्णा आणि काका हे एकप्रकारे सुमित्राताईंचे दोन मामा आहेत, असं म्हणायला हरकत नाही. खानदानी, स्वतःला जमीनदार समजणारे, गाणं बजावण्याची आवड असणारे, कलेचं अंग असलेले असे एक मामा होते आणि दुसरे जे मामा होते ते खादी वापरणारे, गांधीवादी पण आता या नव्या, बदललेल्या समाजात काय करायचं हे न कळलेले. आणि त्या चित्रपटातली आई, ही सुमित्राताईंची आई आणि त्या मागल्या पिढीतल्या स्त्रिया यांच्या मेळातून तयार झाली असावी.

सांगली-इचलकरंजी भागात वाळवं म्हणून त्यांचं गाव आहे आणि चित्रपटात त्या भागातले संदर्भ येतात, म्हणजे त्या भागात नंतर वाढत गेलेली साखर कारखानदारी, त्या भागातल्या दलित-ब्राह्मण-मराठ्यांचे एकमेकांशी असलेले संबंध वगैरे. कोकणातली जमीनदारी, खोती, यांबद्दल श्री. ना. पेंडसे, खानोलकर, दळवी अशा अनेक लेखकांनी बरंच लिहिलं आहे. पण पश्चिम महाराष्ट्रात जे देशस्थ ब्राह्मण जमीनदार आहेत, त्यांचं चित्रण आपल्या साहित्यकृतींत फार कमी झालं आहे. तर या पश्चिम महाराष्ट्रातल्या जमीनदारीचं, तिथे त्याकाळी तयार होत असणाया वेगळ्या जातिव्यवस्थेचं, मूल्यव्यवस्थेचं चित्रण व्हावं, अशी आमची इच्छा होती. शिवाय गांधीवादी विचारसरणी असणार्‍या, जमीनदारीतून बाहेर पडू इच्छिणार्‍या, जमीनदारी आळशीपणा तर सोडवत नाहीये पण तत्त्व म्हणून आपण लोकांना अधिकार द्यायला हवेत, हे पटलेलं आहे, अशा पुरुषाचा नाकर्तेपणा कसा असेल, हे त्या पटकथेत येत गेलं. आणि त्यातून मग आजच्या काळातला भास्कर, आज साखर कारखान्याच्या नियामक मंडळावर असलेला तेव्हाचा दलित मित्र, आणि पूर्वी खूप मदत केलेल्या मराठा कृष्णाताईची नात असे तिघं मिळून हॉस्पिटल काढणार असतात, हा शेवट तयार झाला.

df_sbst.jpg

'दहावी फ' - राजेश मोरे व अतुल कुलकर्णी

'दहावी फ'ची गोष्ट खूपच मजेशीरपणे सुचली. 'सकाळ'मध्ये बातमी आली होती. काही मुलांनी शाळेत मोडतोड केली होती. शाळेने त्यांना काढून टाकायचं ठरवलं, पण कलाशिक्षक आणि PTचे सर म्हणाले की, ही मुलं खूप चांगली आहेत, आमच्या विषयांत हुषार आहेत. मग पालकांना बोलावलं तर ते म्हणाले की, या मुलांना पोलिसांच्या ताब्यात द्या, आम्हांला काही देणंघेणं नाही. मग शाळेने झालेल्या नुकसानाबद्दल पालकांकडूनच दंड वसूल केला आणि या मुलांना पश्चात्ताप झाला म्हणून शाळेने निरोप समारंभाला या मुलांना बोलवायचं ठरवलं, अशी ती बातमी होती. त्याच्याच खाली दुसरी एक बातमी होती. 'वैशाली' आणि 'रुपाली' या हॉटेलांमध्ये काही तरुणांनी खूप मोडतोड केली होती. फक्त गंमत म्हणून तोडफोड करून, दंगा करून ती मुलं निघून गेली होती. या दोन्ही घटनांची सांगड मनात घातली गेली. पहिल्या घटनेचं रुपांतर दुसर्‍या घटनेत होणं अगदी सहज शक्य होतं. 'इ', 'फ' तुकडीतली ही मुलं होती. या दोन बातम्यांतून हे कथानक सुचलं.

पण सुमित्राताईंना एक महत्त्वाचा बदल करावासा वाटला. 'न्याय' नावाची गोष्ट मागताना कायदा हातात घेऊन जर कोणी मोडतोड केली असेल, तर त्याची भरपाई करणं हाही 'न्याय' आहे. झालेला अन्याय कितीही मोठा असला तरी न्याय मागणार्‍याने स्वतःच्या हातून अन्याय होऊ देता कामा नये. आणि समाजाच्या प्रत्येक घटकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे. न्याय मागणार्‍याच्या वतीने भांडणार्‍यानेही हे लक्षात ठेवायला हवं. चित्रपटात तो शिक्षक मुलांच्या वतीने भांडतो. ती संपूर्ण व्यवस्था बदलायला हवी, अशी त्याची मागणी असते. एकीकडे तो मुलांना त्यांनी केलेलं नुकसान भरून द्यायला सांगतो. त्यासाठी लागणारं कौशल्य तुम्ही शिका, म्हणजे ते कौशल्य आत्मसात करताना तुम्हांला कळेल की जे मोडलं आहे, ते तयार करायला किती कष्ट पडतात.. दुसरीकडे त्या शिक्षणसंस्थेपर्यंत त्याला पोहोचवायचं असतं की, त्या मुलांवर झालेला अन्याय या घटनेला कारणीभूत आहे, आणि ती व्यवस्था आपण बदलायला हवी, म्हणजे अशा घटना पुन्हा घडणार नाहीत.

बरेच दिवस ही कथा आमच्याकडे होती. चित्रपटासाठी आम्ही निर्माता शोधत होतो. बालचित्र समितीकडे आम्ही पटकथा पाठवली होती, आणि त्यांनी ती चक्क नाकारली. 'ही कथा आम्हांला लहान मुलांसाठी उपयुक्त वाटत नाही', असं म्हणाले ते. मग आम्ही स्वबळावर हा चित्रपट केला. पुढे बालचित्र समितीने त्यांच्या चित्रपट महोत्सवात 'दहावी फ'चा विशेष उल्लेख करून आम्हांला बक्षीसही दिलं.

चिन्मय : 'दहावी फ' तयार करताना आपल्याला खूप त्रास झाला..

सुनील : फार त्रास झाला. चित्रपटाला होकार मिळेल, असं त्यांनी आम्हांला unofficially सांगितलं होतं. त्यामुळे आम्ही चित्रीकरणाला सुरुवातही केली होती. त्यात काम करणार्‍या मुलांची बांधिलकी इतकी जबरदस्त होती की, आम्ही त्यांना आर्थिक अडचणींबाबत काहीच बोललो नाही. मग पुढे बालचित्र समितीकडून नकार आल्यावर आम्ही मुलांची, पालकांची सभा घेऊन त्यांना सांगितलं की बालचित्र समितीकडून नकार आला आहे, तरी आपण हा चित्रपट करायचा का? सर्व मुलं आणि पालक म्हणाले की, आपण हा चित्रपट करायचाच.

सुमित्राताई : माझ्या मित्रमंडळींपैकी अनेकांनी थोडे थोडे पैसे आम्हांला दिले, आणि त्या पैशातून आम्ही हा चित्रपट केला.

चिन्मय : 'जिंदगी जिंदाबाद' हा आपला एक अतिशय महत्त्वाचा चित्रपट. 'एड्स' या विषयावरचा हा पहिला भारतीय चित्रपट होता. एड्स, समलिंगी संबंध हे विषय त्यात अतिशय संयतपणे हाताळले होते. हा चित्रपट हिंदीत करण्यामागे काय कारण होतं?

ZZ_sbst.jpg

'जिंदगी जिंदाबाद' - सिद्धार्थ दफ्तरदार, ओम पुरी, नीना कुलकर्णी

सुमित्राताई : हा चित्रपट हिंदीत केला कारण 'एड्स' हा या चित्रपटाचा विषय होता. तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, अशी इच्छा होती. डॉ. फ्रान्सिस यासुस यांनी हा चित्रपट तयार करण्यासाठी आम्हांला पैसे दिले होते. हा चित्रपट जास्तीत जास्त तरुण मुलांनी पाहावा, असं त्यांना वाटत होतं. हिंदीत केला तर हे शक्य होतं.

सुनील : शिवाय हा चित्रपट एखाद्या विशिष्ट संस्कृतीशी संबंधित नव्हता. त्यामुळे यातली पात्रं हिंदीत बोलली तरी चालण्यासारखं होतं.

चिन्मय : आपली चित्रपट तयार करण्याची प्रक्रिया कशी असते?

सुनील : ही एक फार integrated अशी प्रक्रिया आहे. एक तर आम्ही सगळे इथे एकत्र राहतो. म्हणजे आमचे संगीत दिग्दर्शक जे आहेत, श्रीरंग उमराणी, ते इथे वर राहतात. राधा दफ्तरदार, म्हणजे रेणुका आणि देविकाच्या आई, इथेच राहतात. रेणुका आणि देविकाचं लग्न होईपर्यंत त्याही इथेच राहायच्या. त्यामुळे होतं काय की, सुमित्राताईंना कथा सुचून त्या आम्हांला dictate करायला लागल्या, की आमची त्यावर चर्चा सुरू होते. सकाळी चहाच्या वेळी होणार्‍या चर्चांतून ही गोष्ट मग मोठी होत जाते. नवनवे मुद्दे लक्षात येतात. पटकथालेखन हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि संहिता ही पटकथेच्या स्वरुपातच लिहिली जाते. आधी कथा, मग पटकथा असं होत नाही. कथेच्या सारांशावरून कथेचा शेवट काय असेल, असं कोणी विचारलं तर ते तसं सांगता येणार नाही. त्या पटकथेच्या शेवटापर्यंत जाऊनच ते पाहायला हवं.

'नितळ'च्या बाबतीत असंच झालं. डॉ. माया तुळपुळे 'देवराई' पाहून प्रभात चित्रपटगृहाच्या बाहेर आल्या आणि तिथूनच त्यांनी आम्हांला फोन केला, मला 'कोड' या विषयावर एक चित्रपट बनवून हवा, म्हणून. त्यांना 'देवराई' खूप आवडला होता. आणि त्यानंतर अक्षरशः दोन दिवसांत आम्ही त्यांना बोलावून घेतलं. सुमित्राताईंच्या मनात एका कुटुंबाची गोष्ट तयार झाली होती. 'सौंदर्य आणि त्या कुटुंबातील वैवाहिक नाती' याभोवती ती कथा फिरत होती. हा विषय त्यांना आवडला हे कळताच सरळ ते कथानक लिहायलाच सुरुवात झाली. ही पटकथा लिहितानाच आमच्या चर्चाही सुरू होत्या. त्यातूनच मग शेवटाला तो दलित मुलगा येणं, नायिकेने त्याच्याशी लग्न करणं/न करणं, यांविषयी भरपूर चर्चा झाल्या, आणि मग ती पटकथा तर्कशुद्ध शेवटापर्यंत पोहोचली.

पटकथा लिहून पूर्ण झाली की आमचे इतर सहकारी आम्हांला सामील होतात. आमचा छायाचित्रकार, संजय मेमाणे, मुंबईला असतो. त्याला आम्ही बोलावून घेतो. आमचे बहुतेक सहाय्यक दिग्दर्शक हे पुण्याचेच आहेत. आम्ही सगळे एकत्र बसून मग पटकथेची अनेक वाचनं करतो, आणि नंतर सहाय्यक दिग्दर्शकांना त्या पटकथेचं विश्लेशण करायला लावतो. हे करण्यासाठी आमचे formats ठरलेले आहेत, आणि उमेश (कुलकर्णी), सचिन (कुंडलकर) हे जे आमचे पूर्वीचे सहाय्यक होते, ते आता दिग्दर्शक झाल्यावर आमचीच पद्धत वापरतात, हे पाहून आम्हांला बरं वाटतं. तर आमचे सहाय्यक दिग्दर्शक त्या पटकथेचं विश्लेशण करतात. त्यातली पात्रं, घटना, दिवस किती, रात्री किती, दृश्यं किती, या सगळ्याचा नीट अभ्यास केला जातो. त्यानंतर मग पटकथेनुसार वेशभूषा, कलादिग्दर्शन यांसाठी नोंदी घेतल्या जातात.

त्याच वेळी आमचा चित्रीकरण स्थळं आणि कलावंतांचा शोध सुरू होतो. सुमित्राताईच हा भाग सांभाळतात, आणि अंतिम निर्णय घेतात. काही कलाकार हे पटकथा लिहितानाच डोळ्यासमोर असतात. हे फार बरं पडतं. तो कलाकार अगदीच व्यस्त असेल, किंवा काही अडचणींमुळे त्याला शक्य नसेल, तर गोष्ट वेगळी. पण आत्तपर्यंत बहुतेक वेळा असं झालं आहे की, त्याच कलावंतानं ती भूमिका केली आहे. काही भूमिकांसाठी कलावंत डोळ्यासमोर नसतील तर मग आम्ही विचार करून, शोध घेऊन त्या भूमिकेसाठी कलावंत निश्चित करतो. उदाहरणार्थ, 'नितळ'मधले आजोबा, किंवा 'वास्तुपुरुष'मधले अण्णा किंवा मोठा भास्कर.

सुमित्राताई : अतुलला आम्ही पहिल्यांदा 'वास्तुपुरुष'ची पटकथा वाचून दाखवली, तेव्हा त्याला ती खूप आवडली. त्यानं आम्हांला विचारलं, 'मी कोणती भूमिका करायची?' मी म्हटलं, 'निशीची'. तो म्हणाला, 'निशीची? मी तर स्वतःला काकात बघत होतो'. मी म्हटलं, 'नाही, तू नाहीयेस काका. तू निशी आहेस, आणि तू निशीचीच भूमिका करायची'. अतुलनं निशीची भूमिका नंतर फारच सुंदर केली. त्याच्या सगळ्या भूमिकांमध्ये मला त्याची निशीची भूमिका जास्त आवडते. सदाशिव अमरापूरकरांना जेव्हा मी अण्णांच्या भूमिकेसाठी विचारायचं ठरवलं, तेव्हा काहीजणांना आश्चर्य वाटलं होतं. त्यांची पडद्यावर प्रतिमा खलनायकाचीच होती. देशस्थी, गांधीवादी जमीनदार ते अगदी व्यवस्थित साकारतील, याची मला खात्रीच होती.

me_sbst.jpg

'वास्तुपुरुष' - महेश एलकुंचवार व सिद्धार्थ दफ्तरदार

महेश एलकुंचवारने पूर्वी कधी चित्रपटात काम केलं नव्हतं. तो फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अतिथी व्याख्याता होता, त्यामुळे त्याच्याशी जुनी दोस्ती होती. त्यालाही आम्ही 'वास्तुपुरुष'ची पटकथा वाचून दाखवली होती, आणि त्याला ती आवडली होती. मग त्याला म्हटलं की, तूच काम कर. सिद्धार्थच्या (तरुण भास्करची भूमिका केलेला सिद्धार्थ दफ्तरदार) आणि त्याच्या नाकात साम्य होतं. आणि मग त्याने ती भूमिका केली.

सुनील : पात्रयोजना हा खूप महत्त्वाचा भाग असतोच. 'वास्तुपुरुष'मध्ये लहान भास्करचं काम केलेल्या सिद्धार्थ दफ्तरदारनं 'जिंदगी जिंदाबाद'मध्ये काम केलं आहे. एवढी महत्त्वाची भूमिका, तेही ओम पुरींबरोबर तुम्ही त्याला कशी देताय, असं अनेकांनी तेव्हा आम्हांला विचारलं होतं. नियमितपणे नाटक करणारी, बक्षिसं मिळवलेली अशी अनेक मुलं असताना पूर्णपणे अननुभवी मुलगा आम्ही का घेतला, याचं त्यांना आश्चर्य वाटलं होतं. पण सुमित्राताईंनी पात्रयोजनेचा हा निर्णय घेतला होता. डोक्यातून निघालेल्या व्यक्तिरेखेशी जुळणारी ती व्यक्ती असेल, तर पात्रयोजना चपखल होतेच. मग अभिनेता असो अथवा नसो. 'नितळ'मध्ये नायकाचं काम केलेला शेखर कुलकर्णी हा non-actor आहे. सुमित्राताईंनी त्याची निवड केली तेव्हा या निवडीबद्दल मीही साशंक होतो. इतक्या महत्त्वाच्या भूमिकेसाठी पूर्णपणे अननुभवी व्यक्तीची निवड कशी करायची? पण तो पस्तिशीचा डॉक्टर वाटतो, आणि तसा तो आहेच, त्यामुळे तो त्या व्यक्तिरेखेत एकदम चपखल बसला.

योग्य चित्रीकरण स्थळं शोधण्यासही आम्ही फार महत्त्व देतो. 'दहावी फ'मध्ये तीस-चाळीस चित्रीकरण स्थळं आहेत. तिथे जाऊन, तिथे घडणार्‍या प्रसंगाचा विचार करून, फोटो काढून मग मी चित्रं काढतो. हल्ली व्हिडिओ चित्रीकरण करून मग चित्रं करतो, आणि त्याआधारे एक कच्ची shot division करतो.

सुमित्राताई : चित्रीकरण स्थळाचा अभ्यास करून सुनील कॅमेरा अँगलची वगैरे चित्रं काढतो. आमच्या अपेक्षा काय आहेत, म्हणजे कॅमेरा कुठे असावा, magnification काय असावं, हे छायाचित्रकाराला सांगायला त्यामुळे सोपं जातं.

सुनील : प्रकाशयोजना हा सुमित्राताईंचा विभाग आणि lensing हे माझं क्षेत्र. त्यादृष्टीने छायाचित्रकाराशी आम्ही दोघंही संवाद साधतो. छायाचित्रकाराचं श्रेय मोठं आहेच, पण अनेकदा लोक म्हणतात की, 'काय सुंदर अँगल घेतलाय छायाचित्रकाराने!', तेव्हा ते नेहमीच बरोबर नसतं. अनेकदा ही दिग्दर्शकाची दृष्टी असते. दिग्दर्शकानं तसं सांगितलं असतं. लेन्स कुठली वापरायची, शॉटची लांबी किती, तो शॉट कसा घ्यायचा, हे सगळे तपशील आम्ही छायाचित्रकाराला पुरवतो. तो परिणाम तसा मिळवणं, हे छायाचित्रकाराचं काम. छायाचित्रकारही आम्हांला त्यांच्या कल्पना ऐकवतात. ही देवाणघेवाण चालतेच. 'पण हा सीन आहे, आणि आता तू कॅमेरा लाव', असं आमच्या सेटवर कधीही घडत नाही.

सुमित्राताई : प्रकाशयोजनेकडेही मी खूप लक्ष देते. 'ही भिंत अंधारी असली पाहिजे, या दृश्यात प्रकाश डावीकडून यायला हवा', अशा सूचना मी देत असते. त्यातलं तांत्रिक कौशल्य माझ्याकडे नाही, छायाचित्रकारच ते करत असतो. आणि संजय मेमाणेसारखा छायाचित्रकार असेल, तर तो स्वतःचं असं त्यात बरंच घालत असतो.

सुनील : संकलन हाही या प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग आहे. पूर्वी आम्ही हाताने संकलन करायचो. 'चाकोरी'पासून 'दोघी'पर्यंत आम्ही ती फिल्म कापणं, जोडणं हे सर्व हाताने केलं. 'जिंदगी जिंदाबाद'च्या वेळी नीरज बोरालिया आम्हांला येऊन मिळाला, आणि 'दहावी फ', 'वास्तुपुरुष'च्या वेळी तो आमच्याबरोबर होता. पण तो संकलन करताना आम्ही त्याच्याबरोबर बसायचोच. नंतर आता मोहीत टाकळकर चित्रपटांचं संकलन करतो. सुमित्राताई त्याच्याबरोबरही बसतात. पटकथेपेक्षा काही वेगळ्या गोष्टी चित्रीत झालेल्या असतात, आणि पटकथेत असलेल्या काही गोष्टींचं महत्त्व त्यांना कमीअधिक करावंसं वाटत असतं. काही दृश्यं मागेपुढे केली की वेगळा परिणाम जाणवतो. काही संवाद मागेपुढे केले की वेगळा परिणाम होतो. काही गोष्टी निष्ठुरपणे उडवून टाकाव्या लागतात. पण असं फार कमी वेळा होतं. कारण पटकथेवर आणि दृश्य चित्रीत होण्याअगोदर भरपूर मेहनत घेतलेली असते.

चिन्मय : मध्यंतरी चित्रपट आणि नाटक या माध्यमांतील फरकांबद्दल मी सुलभाताईंशी (श्रीमती सुलभा देशपांडे) बोलत होतो, आणि तेव्हा त्या म्हणाल्या की, 'नाटकात अभिनेत्याचं खरं कौशल्य पणास लगतं, चित्रपटांत दिग्दर्शक हा खरा नायक असतो, अभिनेता हा केवळ एक prop असतो.' आपल्यालाही असंच वाटतं का?

सुमित्राताई : नाही. चित्रपटांत दिग्दर्शकाचं स्थान महत्त्वाचं असतं, असं वाटतं. पण कलाकार prop असतो, असं नाही वाटत. कलाकारांचा चित्रपटात केवढा मोठा सहभाग असतो. खरं सांगायचं तर, आपल्याला जो पडद्यावर दिसतो, त्याला कलाकार म्हणायची सवय आहे. पण छायाचित्रकार म्हणून संजय मेमाणे, संकलक म्हणून मोहीत, संगीतकार म्हणून श्रीरंग, हे सगळेच कलाकार असतात. ध्वनिमुद्रकही अतिशय उत्तम कलाकार असतो. दिग्दर्शक हा या कलावंतांचं नेतृत्व करतो. या कलावंतांच्या कलेचा आपल्या चित्रपतासाठी कसा उपयोग होईल, हे समजवून घेणं दिग्दर्शकाचं काम असतं.

सुनील : चित्रपटात कुठली दृश्यं कशाप्रकारे असतील, याच्या निवडीचं स्वातंत्र्य अभिनेत्यांना नसतं, आणि ते त्यांच्या असमाधानाचं एक कारण असतं. त्यांचं अभिनयकौशल्य पडद्यावर कसं उमटणार आहे, हे त्यांच्या हातात नसतं. ते दिग्दर्शकाच्या हाती असतं. पण अनेक प्रकारे अभिनेते चित्रपटासाठी contribute करतच असतात.

'दोघी’'च्या वेळी आम्ही चित्रपटाचा जो शेवट ठरवलेला होता, तो सदाशिव अमरापूरकरांना पटत नव्हता. त्यांना तो शेवट वेगळ्या पद्धतीनं व्हावा, असं वाटत होतं. ते म्हणाले की, 'मला असा अभिनय करताच येणार नाही, कारण मला हे पटतच नाहीये'. त्यावेळी सूर्यकांतजी सेटवर होते. भालजी पेंढारकरांच्या तालमीत तयार झालेले ते नट होते. दिग्दर्शकाबद्दलचा त्यांचा आदर इतका पराकोटीचा होता की मी त्यांच्याशी बोलायला गेलो तरी ते उभे राहायचे. मी त्यांच्या नातवाएवढा होतो, खूप संकोचायचो. किंवा एखादेवेळी थोडा वेळ वाया गेला आणि आम्ही त्यांना 'सॉरी' म्हटलं, तर म्हणायचे, 'दिग्दर्शक हा दिग्दर्शक. त्याने सॉरी म्हणायचं नाही'. तर ते आम्हांला म्हणाले, 'तुम्ही नटाशी चर्चा का करत बसला आहात? तुम्ही ठणकावून सांगायला हवं की, हे तुझं काम आहे, ते तू कर'. पण सुमित्राताई म्हणाल्या की, 'नाही, तसं ठीक नाही. नटाला जोपर्यंत पटत नाही, तोपर्यंत त्या भावना त्याच्या आतून येणार नाहीत'.

त्या चर्चेत आम्ही चार-पाच तास घालवले. अमरापूरकर म्हणत होते त्याप्रमाणे ते दृश्य चित्रीत केलं. त्याच्या रशेस बघितल्या. त्यांनाही पटलं की, आम्ही जे म्हणतो होतो ते योग्य होतं, आमच्या पद्धतीनेच दृश्य चित्रीत व्हायला हवं. त्यानंतर दोन महिन्यांनी आम्हांला अमरापूरकरांच्या तारखा मिळाल्या. खरं तर 'दोघी' हा आमचा पहिला चित्रपट होता. एवढा वेळ आणि पैसा घालवणं आम्हांला परवडणारं नव्हतं. अनेक अडचणीनंतर मग आम्ही दोन महिन्यांनी ते दृश्य चित्रीत केलं.

sa_sbst.jpg

'वास्तुपुरुष'- सदाशिव अमरापूरकर

'वास्तुपुरुष'मध्ये अण्णा आणि भास्करचा जो सूतकताईचा जो प्रसंग आहे, तो चित्रीत व्हायच्या तीन दिवस आधी अमरापूरकर घाबरलेले होते, बरेच दिवसांत अशी भीती मी अनुभवली नव्हती, असं ते म्हणाले होते. कारण ते म्हणाले, 'मोठ्ठे, पल्लेदार संवाद मी पटापट पाठ करून म्हणतो, साधे सोपे संवाद म्हणायचीच माझी सवय गेली आहे'. आणि त्या दृश्यासाठी त्यांनी खरोखरच खूप मेहनत घेतली. त्यांनी मुंबईत तो चरखा मिळवला, त्यावर सूत कातण्याचा सराव केला. आणि चित्रीकरणाच्या वेळी खरोखर सूत कातत ते संवाद बोलले.

'देवराई'मध्ये अतुलच्या आवाजात कविता आहे. अतुलला ती कविता स्फुरली, पटकथा ऐकून, त्या व्यक्तिरेखेत प्रवेश करून, ही गोष्ट आमच्या लेखी फार महत्त्वाची होती.

चिन्मय : फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतल्यानं एकत्र काम कारताना काही फरक पडतो का? कारण सुमित्राताईंनी असं कुठलंच प्रशिक्षण घेतलेलं नाही. या प्रशिक्षणामुळे काम करण्याच्या पद्धतीत काही फरक पडतो का?

सुनील : हो, पडतो ना.. आणि आमच्या सेटवर तर बरेचदा हा विनोदाचा विषय असतो. कारण सुमित्राताईंनी आणि आमच्याबरोबर काम करणारे जे छायालेखक आहेत, म्हणजे संजय मेमाणे, चारुदत्त दुखंडे, मिलिंद जोग, धनंजय कुलकर्णी, यांपैकी कोणीही फ़िल्म इन्स्टिट्यूटमधून प्रशिक्षण घेतलेलं नाही. सेटवर नेहमीच आम्हां इन्स्टिट्यूटमधल्या लोकांचा एक गट असतो, आणि इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण न घेतलेले सर्वजण आम्हांला चिडवत असतात की, 'तुम्ही कायम पुस्तकात लिहिलं आहे त्याप्रमाणे करता', 'तुम्ही डोळे उघडे ठेवून काम करत नाही', वगैरे. आणि काही प्रमाणात हे खरंही आहे. कित्येक गोष्टी मला अवघड वाटतात, आणि माझं मन मला निरनिराळ्या पर्यायांनी बांधल्यासारखं वाटतं. प्रशिक्षणाचा हा तोटा आहे, असं मला वाटतं. याउलट प्रशिक्षण न घेतलेली ही मंडळी असंख्य पर्यायांचा विचार करू शकतात, अधिक उत्स्फुर्तपणे काम करू शकतात. एखादं दृश्य चित्रीत करताना, त्या घटनेचं वास्तव लक्षात घेऊन मग ते चित्रीत कसं करायचं, हे ठरवलं जातं. मी बरेचदा पाहिलं आहे की, एखादा सुंदर शॉट डोळ्यासमोर असतो, आणि त्यात तो प्रसंग कोंबायचा प्रयत्न होतो. प्रशिक्षण घेऊन आलेल्यांकडून असं बरेचदा केलं जातं. त्यामुळे होतं काय की, ते दृश्य सुंदर दिसतं, पण त्यात भावना अजिबातच नसतात. तर हे उलटं असायला हवं. तुम्हाला जे सांगायचं आहे, त्यातून तुम्हांला जे सुचतं, त्याने ते दृश्य सुंदर होतं. मग हे दृश्य aesthetically सुंदर कसं करायचं, किंवा त्यात काही वेगळेपण आणता येईल का, असा विचार होऊ शकतो. अनेकदा चित्रपट दिसायला खूप देखणे असतात, पण त्यांचा भावनिक परिणाम शून्य होतो. हे जे घडतं, ते प्रशिक्षणामुळे असं मला वाटतं.

पण चित्रपट तयार होत असताना कल्पनांची देवाणघेवाण ही सुरूच असते. त्यामुळे प्रशिक्षण घेतलेल्यांना व न घेतलेल्यांना एकमेकांबरोबर काम केल्याने अनेक गोष्टी शिकता येतात.

सुमित्राताई : मी खूप शिकले आहे सुनीलकडून. त्याच्याबरोबर मी इन्स्टिट्यूटमध्ये जात असे. तिथे मला अनेक उत्तमोत्तम चित्रपट पाहायला मिळाले. जागतिक चित्रपटाशी तिथेच ओळख झाली. चित्रपटाच्या तांत्रिक अंगाबद्दल शिकता आलं. आता हा त्याच्या प्रशिक्षणामुळे jargonमध्ये बोलत असतो. मला तसं बोलता येत नाही. मी मला योग्य वाटेल त्याप्रमाणे काम करत असते. मग याच्याकडून कळतं की मी जे काही करते आहे, त्याचीसुद्धा थियरी आहे. असे सिद्धांत शिकून घेतल्याने काम चांगल्या प्रकारे करता येतं, हे मला कळलं. हे सगळं शिकून घ्यायला मला फ़ार आवडतं. मजा येते हे सगळं समजून घ्यायला.

पण काहीवेळा आमचे दृष्टिकोन वेगळे असतात. मला एका विशिष्ट प्रकारे एखादं दृश्य चित्रीत करायचं असतं, आणि हा मला सांगतो की, नाही, हे दृश्य अशाप्रकारे करता येणार नाही. माझं म्हणणं असतं की ज्या अर्थी माझ्या डोळ्यासमोर ते दृश्य येतं आहे, त्या अर्थी ते चित्रीत करता यायला हवं. आणि असं झालं आहे एकदोनदा. आणि मजा म्हणजे, मी म्हणते त्याप्रमाणे कॅमेरा लावून, आम्ही ते दृश्य चित्रीत केलं आहे.

चिन्मय : आपल्या चित्रपटांच्या पटकथांचं स्वरूप हे बरेचदा कथा, कादंबर्‍यांसारखं असतं. 'वास्तुपुरुष' व 'दोघी' हे दोन चित्रपट कादंबरीसदृश कथानक असलेले आहेत, तर 'दहावी फ', देवराई', 'नितळ', 'बाधा' यांची पटकथा ही कथा या प्रकाराला जवळ जाणारी आहे. म्हणजे ती पटकथा हीच एक स्वतंत्र कलाकृती म्हणून गणली जाऊ शकते. हे कसं शक्य होतं?

सुमित्राताई : लेखनाची मला लहानपणापासूनच आवड होती. शाळा-कॉलेजातसुद्धा लिहीत होते. नंतर समाजकार्य हे माझं क्षेत्र होतं. चित्रपटक्षेत्रात येण्यापूर्वी मी एक researcher म्हणूनच काम केलं होतं. त्यामुळे समाजाच्या अनेक बाजू मला पाहायला मिळाल्या. स्त्रियांच्या प्रश्नांचा अभ्यास केला होता. गुन्हेगार स्त्रिया, कुमारी माता यांचे प्रश्न अभ्यासले होते. भारतात एकूणच लहान मुलांना कसं वाढवलं जातं, त्यातून माणसाचा विकास कसा होतो, हा काशी विद्यापीठाचा एक प्रोजेक्ट होता, त्यावर मी काम केलं होतं. समाजातल्या विविध स्तरातल्या लोकांशी त्यामुळे माझा थेट संबंध आला होता. त्यातूनच माझ्याकडे अनुभवांचं मोठ्ठं गाठोडं तयार झालं होतं. चित्रपटक्षेत्रात मी फार उशीरा आले. आणि सामाजिक क्षेत्रातले माझे अनुभव मला इथे वापरता आले.

प्रत्येकाच्या बुद्धीची एक जात असते, असं मला वाटतं. माझ्या बुद्धीची जातच visual आहे. त्यामुळे मला त्या चित्रपटातील माणसं, त्यांचं वागणं, दिसणं, बोलणं, त्यांच्या हालचाली, हे सगळं दिसायलाच लागतं. आणि त्यामुळे सगळ्या संहिता मीच लिहिते. मला वाङ्मयाचीही आवड आहे. मी वाचते भरपूर. चांगल्या वाङ्मयाचा ज्याला स्पर्श झाला असेल, त्याला लिहिणंही सोपं जातंच.

सुनील : सुमित्राताई जेव्हा पटकथा लिहीत असतात, तेव्हा तो चित्रपट जणू त्यांना दिसत असतो, आणि तसाच तो त्या आम्हांला सांगतात. त्यांची लेखनाची पद्धत म्हणजे त्या पटकथा सांगतात, आणि आम्ही लिहून घेतो. हे लिहून घेत असताना त्यात shot division, कथा, संवाद असं वेगळं काही उरतच नाही. म्हणजे, अण्णा चालत येत आहेत, त्यांना भास्कर दिसतो, तो डावीकडे बघतो, त्याला निशी दिसतो, निशी त्याच्याकडे रोखून बघतोय, असा संपूर्ण चित्रपटच तिथे तयार होतो.

सुमित्राताई : चित्रपटाच्या ढाच्यात अगोदर कथा असते, मग संवाद लेखक संवाद लिहितो, मग कोणीतरी त्यावरून चित्रपटाच्या उपयोगाची अशी संहिता तयार करतो. माझी चित्रपट लिहिण्याची प्रक्रिया अशी तुकड्यातुकड्याची नसते. मी 'संहिता' सांगताना चित्रपटात दिसणार्‍या बहुतेक सगळ्याच गोष्टी तीत येतात. म्हणजे पात्रांचे पोशाख, त्या कपड्यांचा रंग, वगैरे. तिथे अण्णांचं टेबल ठेवलेलं आहे, त्यांची आरामखुर्ची आहे, तिथे डेस्क आहे, असं सगळं मला दिसत असतं, आणि तसंच मी सांगत असते. त्यामुळे संवाद, shot division, वेशभूषा, नेपथ्य असं सगळं एकसंध पद्धतीने लिहिलं जातं.

सुनील : ’वास्तुपुरुष’च्या वेळी तर अनेकांनी आम्हांला सांगितलं की, ही मूळ कादंबरी आहे आणि तिचं तुम्ही रुपांतर केलं आहे, असं वाटतं. मला खरंच आश्चर्य वाटतं याचं. आपण ’वास्तुपुरुष’ला चित्रपटाच्या परिभाषेत लिहिलेली कादंबरी म्हणू. श्री. विद्यार्थी चटर्जी म्हणून एका बंगाली टीकाकारानं फ़ार छान लिहिलं आहे 'वास्तुपुरुष'बद्दल. 'A neglected gem' या नावानं त्यांनी लेख लिहिला होता, आणि त्यात या चित्रपटाचं खूप कौतुक केलं होतं. त्यांनी लिहिलं आहे की, 'चित्रपटातून कादंबरीचा आशय मांडण्याची ताकद अनेक दिग्दर्शक गमावून बसले आहेत, याचं मला फ़ार वाईट वाटतं. आता केवळ चटपटीत लघुकथा सांगणं एवढंच चित्रपटांचं काम उरलं आहे. कारण चित्रपट गतिमान हवा, एवढ्याच वेळात गोष्ट सांगायची आहे, गोष्टीचा एवढाच भाग सांगायचा आहे, अशी अनेक कारणं आणि बंधनं असतात. कादंबरी जशी चवीचवीने वाचता येते, ती मोठी असते, तीत अनेक तपशील असतात, अनेक पात्रं असतात, अनेक घटना असतात, खूप मोठा काळ त्या कादंबरीत अंतर्भूत असतो, त्या समाजाचं ते चित्रण असतं, हे चित्रपटातून बघणं खूप आनंददायक असतं. या समाजातील विसंगती, होणारे बदल यांचा वेध केवळ कादंबरीतून घेता येऊ शकतो, आणि ते तुम्ही चित्रपटाद्वारे दाखवण्याचं धार्ष्ट्य दाखवलं, म्हणून मला तुमचं अभिनंदन करावंसं वाटतं'. अरुण खोपकर मागे म्हणाले होते की, महाराष्ट्राचा वैचारिक इतिहास आपण विसरलोच आहोत. आज आम्ही मघाशी याचविषयी बोलतो होतो. आज महाराष्ट्राच्या इतिहासाबाबत बोलताना आपण शिवाजी महाराजांच्यापलीकडे विचारच करत नाही. आगरकर, फुले ही सगळी माणसं आपल्या विस्मृतीत गेली आहेत.ज्यांच्या नावाने तलवारी घेऊन आपल्याला नाचता येतं तेवढाच आपला इतिहास, असं हल्ली झालं आहे. पण महाराष्ट्राला एक फार मोठा वैचारिक इतिहास आहे. आणि या इतिहासाचे तपशील, त्याद्वारे घडून आलेलं परिवर्तन हे सगळं पडद्यावर मांडायचं असेल, तर त्यासाठी कादंबरीच हवी. पण हे सगळं कथानक सुचलं ते चित्रपटाच्याच भाषेत, फक्त त्याला स्वरूप कादंबरीचं मिळालं.


चिन्मय : पटकथेचं लिखाण करताना चित्रपट हे माध्यम ध्यानी ठेवूनच केलं जातं का?

सुमित्राताई : लिखाण हे चित्रपटाच्या दृष्टीनंच केलेलं असतं. लिहितानाच माझ्या डोळ्यासमोर सगळे बारकावे स्पष्ट उभे राहिलेले असतात. म्हणजे, लाईट्स कुठून येणार, कॅमेरा कुठे असेल, किंवा एखाद्या दृश्यात त्या पात्राच्या चेहर्‍यावर कॅमेरा फ़ोकस करायचा असेल, हे सर्व तपशील लिहितानाच माझ्या लक्षात येतात. कादंबरी लिहिताना असं कधी घडत नाही. चित्रपट हे माध्यम ध्यानात घेऊनच मी लिखाण करते.

चिन्मय : आणि मग चित्रीकरण करताना यात काही बदल होतो का?

सुमित्राताई : हो, होतो ना! थोडाफार बदल तर होतोच. संहिता तयार झाल्यानंतर आम्ही त्याची बरीच वाचनं करतो. आमचे चित्रपटक्षेत्रातले सहकारी या वाचनात सामील असतात. चित्रपटसृष्टीबाहेरचे आमचे अनेक मित्र आहेत, साहित्याची खूप चांगली जाण असलेले, त्यांना आम्ही संहिता वाचून दाखवतो. उमा कुलकर्णी, अनिल अवचट आमचे खूप जवळचे मित्र आहेत, त्यांना संहिता वाचून दाखवतो. या वाचनाच्या वेळी त्यांच्या काही सूचना असतात, प्रतिक्रिया असतात. त्या लक्षात घेऊन मी संहितेवरून एक हात फिरवते. पण बदल फार मोठे नसतात. चित्रीकरणाच्या वेळी कागदावर लिहिलेलंच बहुतेक चित्रित केलं जातं.

सुनील : पटकथा लिहिताना जे visualize केलेलं असतं, त्यानुसार मग आम्ही चित्रीकरण स्थळ शकतो, कलावंतांची निवड करतो. आणि बरेचदा आम्हांला आश्चर्य वाटतं की आमच्या डोळ्यासमोर जे असतं, ते प्रत्यक्षात आम्हांला सापडतं. आता 'बाधा' हा चित्रपट म्हणजे धनगर समाजाची गोष्ट आहे. धनगरांच्या त्या गावात एकच दलित कुटुंब आहे, गावाबाहेर त्या कुटुंबाचा एक जमिनीचा छोटा तुकडा आहे. त्या घरातला पुरुष सैन्यात आहे. धनगर कुटुंबातला पुरुष हा बांधकामावर मुकादम आहे. जवळच एक खाण आहे, तिथे तो मोटरसायकलीवरून कामाला जातो. हे सगळं आम्ही पटकथेत लिहिलं होतं. नंतर जेव्हा आम्ही फ़लटणजवळ चित्रीकरणासाठी स्थळ शोधायला गेलो, तेव्हा आम्हांला धनगरांची वस्ती मिळाली. ही वस्ती डोंगरावर होती. धनगर मंडळी शेती फार कमी करतात. तर तसंच ते गाव होतं, आणि जवळच फक्त एक छोटासा शेताचा हिरवा तुकडा होता. आम्ही चौकशी केल्यावर आम्हांला कळलं की, गावातल्या एकमेव दलित कुटुंबाचा तो तुकडा आहे. आणि ५-६ किलोमीटरवर खरोखर एक दगडाची खाण होती. म्हणजे आमच्या पटकथेत असणार्‍या गोष्टी अशा वास्तवातही सापडतात. मग अशा गोष्टी सापडल्या की पटकथेला उलट वास्तवाचं रूप प्राप्त होतं, आणि काही बदल करण्याची गरजच उरत नाही.

'वास्तुपुरुष'चा काळ हा वेगळा आहे. त्या चित्रपटातलं वास्तव शोधणं हे एक मोठं काम होतं. सुमित्राताईंच्या डोळ्यांसमोर जो वाडा होता, तो शोधण्यासाठी आम्ही अख्खा महाराष्ट्र पालथा घातला. अहमदनगरजवळ जामगाव नावाचं गाव आहे, तिथे आम्हांला तो वाडा सापडला. तो वाडा सापडल्यावर मग सगळ्याच गोष्टी तिथे सापडत गेल्या. 'दोघी' चित्रपटाच्या वेळी असं झालं की, आम्हांला पैशांअभावी काही तडजोडी कराव्या लागल्या. अर्थात, या तडजोडी केवळ चित्रीकरणासंबंधी. Content-wise तडजोडी आम्ही कधीही केलेल्या नाहीत. 'दहावी फ'नंतर मात्र आम्ही ठरवलं की अशा तडजोडीही करायच्या नाहीत. पैसे नसले तरी पटकथेतील वर्णनाच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा आम्ही प्रयत्न केला. 'वास्तुपुरुष'च्या वेळी मात्र आम्हांला मनाजोगती चित्रीकरण स्थळं मिळाली. मनात होतं त्याच्या ९९% तरी आम्ही पडद्यावर उतरवू शकलो.

सुमित्राताई : 'वास्तुपुरुष'ची एक गंमत सांगते. चित्रपटात भुयाराचं एक दृश्य आहे. काका आणि निशी त्या भुयारात जाऊन खणतात. तर त्या वाड्याचे जे मालक होते, त्यांना मी सांगितलं की, उद्या आम्हांला ते दृश्य चित्रीत करायचं आहे, तुमच्या घराला कुठे धक्का लागायला नको म्हणून आम्ही अगदी घराशी खणत नाही, जरा बाहेर खणतो. घराच्या बाजूला एक भिंतीचा पडका तुकडा होता, तो आम्ही बघून ठेवला होता. त्या भिंतीपाशी आम्ही खणायचं ठरवलं होतं, म्हणजे ते भुयार वाटलं असतं. तर ते मालक आम्हांला म्हणाले, 'छे, छे! तसं काही करण्याचं कारण नाही. खरंच आपल्याकडे भुयार आहे. आणि आमच्या वाडवडिलांनी तुम्ही म्हणता तसं खजिन्यासाठी तिथे खणलं आहे. तुम्हीही तिथेच खणा'. आम्ही बघितलं तर तिथे खरंच खणलेलं होतं, मातीचा ढिगाराही होता तिथे. मी जे लिहिलं होतं, ते सगळं होतं त्या घरामध्ये.

चिन्मय : चित्रीकरणाच्या आधी संहिता लिहिलेली असते. चित्रीकरण करताना ती पटकथा अगोदरच लिहून झालेली असल्याने, परत तेच प्रसंग चित्रीत करताना intensity कमी झाली, असं कधी होतं का?

सुमित्राताई : नाही, तसं होत नाही. कारण इतके दिवस कागदावर असलेली माणसं तुमच्यासमोर आता जिवंत झालेली असतात. त्यामुळे खूप मजा वाटते त्याची उलट. आता आम्ही जो नवीन चित्रपट करतो आहोत, 'एक कप च्या', त्यासंदर्भात बोलायचं झालं तर रुक्मिणी आणि काशिनाथ हे नवरा-बायको माझ्या डोळ्यासमोर असतात. त्या व्यक्तिरेखा लिहिताना मी काही कल्पना केलेल्या असतात. प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या वेळी माझ्या समोर कलावंत असतात. ते त्या भूमिका करतात तेव्हा माझ्या कल्पनेत आणि ते ज्या भूमिका वठवतात, त्यात थोडा फ़रक पडतो. हे फ़ार इंटरेस्टिंग असतं. मला वाटत असतं की या प्रसंगात काशिनाथ अमुक एका पद्धतीनं बोलेल. पण किशोर काही वेगळाच आवाज काढतो अचानक तेच वाक्य बोलायला. आणि मग असं वाटतं की, 'अरे, खरंच.. हे छान आहे'. कारण आता हा जिवंत काशिनाथ आहे. आता नाही मी याला थांबवू शकत. पटकथेतली माणसं अशी जिवंत होऊन आलेली पाहायला खूप छान वाटतं.

चिन्मय : आपल्या चित्रपटांतील व्यक्तिरेखा या मनावर लगेच ठसतात. त्या व्यक्तिरेखांचे स्वभाव, त्यांची वैशिष्ट्यं, हे सगळं बरेचदा त्यांच्या कृतीतून, संवादांतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं. फार कमी चित्रपटांत असं पाहायला मिळतं..

सुमित्राताई : मी जेव्हा स्त्रियांच्या प्रश्नांसंबंधी अभ्यासाला सुरुवात केली, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की, ती बाई माझ्याशी जे बोलते आहे, ते केवळ तिच्या शब्दांपुरतं मर्यादित नाही, ती माझ्याकडे ज्या प्रकारे बघते, ती कधी नजर फ़िरवते, ती कधी गप्प होते, तिच्या हालचाली कशा आहेत, ती कशी बसते, बोलताना तिचा आवाज कसा असतो, ती कोणत्या गोष्टी लपवू पाहते, या गोष्टी लपवताना तिची नजर कशी असते, या सगळ्यांमध्ये त्या बाईला जे सांगायचं आहे, ते आहे. ते फक्त तिच्या शब्दांत नाही. हे माझ्या लक्षात आल्यावर मला खूप चांगलं निरीक्षण करण्याची सवय लागली. जे घडतं आहे, ते अधिक बारकाईनं बघता यायला लागलं. आणि मी Research Methodology हा विषय शिकवायचे. तो शिकवत असताना content analysis हा भाग मी शिकवत असे. पत्रकारितेच्या अभ्यासक्रमातही मी हे शिकवायचे. तर content analysisमध्ये एक वाक्य तुम्ही घेतलंत, तर त्याच्याभोवती अर्थ आणि संदर्भांची एवढी मोठी आभा असते की, ते वाक्य analyse करायला तुम्हांला प्रचंड मोठं अवकाश लागतं. या सगळ्याचं भान बाळगलं तर तुम्ही नेमकेपणानं प्रत्येक गोष्टीच्या गाभ्याशी जाऊ शकता. म्हणजे त्या अवकाशात, त्या काळात, त्या प्रसंगात, त्या विशिष्ट वेळी, त्या माणसाच्या मनात नक्की काय सुरू आहे, हे तुम्हांला कळू शकतं. तर मला वाटतं मला या विचारपद्धतीची सवय झाली आहे. आणि त्यामुळे तू म्हणतोस तसं ती व्यक्तिरेखा सूक्ष्म तपशिलांसकट लगेच प्रेक्षकांच्या मनात तयार होत असावी.

चिन्मय : 'दोघी' या चित्रपटानंतर भाषा, संवाद यांपेक्षा दृश्यात्मकतेवर आपण अधिक भर दिला आहे, असं आपल्याला वाटतं का? 'देवराई', 'वास्तुपुरुष' या चित्रपटांत तर हे विशेषकरून जाणवतं...

सुनील : मी असं म्हणेन की हा भर कायमच आहे. म्हणजे 'चाकोरी'पासून सतत तो शोध सतत चालू आहे. फक्त काही वेळा असं होतं की, ती पात्रं ज्या संस्कृतीतली असतील, त्यावर संवादांवर भर असेल की नाही, हे ठरत जातं. नाहीतर दृश्यात्मकतेवर भर तर आहेच आहे. पण त्यासाठी संवादांना कमी लेखावं, असं कधीच आम्हांला वाटत नाही. उदाहरणार्थ, 'नितळ'च्या वेळी सुमित्राताईंनी पटकथा लिहून पूर्ण केली, तेव्हा आम्हांला असं वाटलं की, ही मंडळी खूप बोलतायत, आणि संवादांमधूनच खूप गोष्टी व्यक्त होतायत. पण हे संवाद व्यक्तिरेखा establish करण्यासाठी नाहीत. या चित्रपटात एक उच्चमध्यमवर्गीय, कोकणस्थ कुटुंब आहे. या घरातले आजोबा विचारवंत म्हणूनच गणले जातात. एखादी समस्या समोर ठाकल्यावर हे लोक चर्वितचर्वणच करणार. आणि त्यातही त्या घरात ती मुलगी फक्त दीड दिवस राहायला आलेली असते. असं अचानक काही घडल्यावर चर्चा घडणारच. आपल्याही घरात असं घडतंच. वादाचे काही प्रसंग निर्माण झाले तर आपण आपलं म्हणणं मांडतो, आपण असं का वागलो याचं स्पष्टीकरण देतो, घरातले सदस्य त्यांची भूमिका मांडतात. या पद्धतीची चर्चा आपल्या मध्यमवर्गीय घरात होते. या उलट 'बाधा'मध्ये अनेक व्यक्तिरेखा दोन शब्दांमध्ये संवाद संपवतात. बोलत नाहीत एकमेकांशी फ़ार. कारण धनगरांमध्ये अशी तात्त्विक चर्चा होतच नाही. चित्रपटात बायको नवर्‍याला सांगते की, 'माझं पोट फ़ार दुखतं आहे, तुम्ही जाऊ नका बाहेर'. नवरा म्हणतो, 'काही मरत न्हाईस तू'. संपला विषय. दोन वाक्यांत संवाद संपतो. त्यामुळे संवाद कधी कमी, कधी जास्त होतातच.

अनेकदा आम्हांला वाटतं की, मुख्य व्यक्तिरेखा कमीत कमी बोलतात. म्हणजे 'चाकोरी' किंवा 'दोघी'चं उदाहरण बघितलं तर रेणुकाची जी व्यक्तिरेखा आहे, ती गप्प असते. ती संवादांद्वारे तिचं दु:ख व्यक्त करत बसत नाही. ती शांतपणे तिचं आयुष्य़ जगत असते. आपल्यालाच पडद्यावर तिचं दु:ख पाहून त्रास होतो. 'वास्तुपुरुष'मधला भास्करसुद्धा फार कमी बोलतो. तो आपलं मन कधी मोकळं करतच नाही. तर हा एक धागा मला अनेक चित्रपटांत जाणवतो.

सुमित्राताई : चित्रपट हे एक दृक्-श्राव्य माध्यम आहे. त्यातली श्राव्यता काढून टाकायचं काहीच कारण नाही. 'नितळ'मधला नीना कुलकर्णीचा जो एक प्रसंग आहे, त्यात ती केवढं सलग बोलते. 'दहावी फ'मध्ये आई, म्हणजे ज्योती सुभाषच्या प्रसंगातसुद्धा संवादांवर भर आहेच. हे दोन्ही प्रसंग लिहिले तेव्हा काहींना शंका होती की, एवढं सलग संवादात्मक दृश्य लोकांना आवडेल की नाही. प्रेक्षकांना कंटाळा येऊ शकेल, असं तेव्हा वाटलं होतं. पण तसं काही झालं नाही. आवडले हे दोन्ही प्रसंग प्रेक्षकांना.

सुनील : आणि अशा प्रसंगांमध्ये दृश्यात्मकता म्हणजे केवळ त्या पात्राचा चेहरा असतो. विनाकारण त्या पात्राला आम्ही हिंडवतफ़िरवत बसत नाही. बोलणार्‍याचा आणि ऐकणार्‍याचा क्लोजअप एवढंच पुरेसं असतं. त्यामुळे ते नाटकासारखंही वाटत नाही. दृश्यात्मकतेचा दुसरा एक भाग म्हणजे 'घो मला असला हवा' किंवा 'एक कप च्या' यांसारख्या चित्रपटांत ती संस्कृती दाखवण्यासाठी दृश्यात्मकतेचा वापर करावा लागतो. म्हणजे तिथला समुद्र, शेतं, घरं हे सगळं त्यात यायला हवं. 'बाधा' या चित्रपटातसुद्धा आम्ही हा प्रयत्न केला होता.

'वास्तुपुरुष'मधली ती ओसरी, मोठ्ठाल्या त्या माड्या, त्यातले खांब, त्यातला अंधार, ते जिने, हे सर्व आम्हांला दाखवायचं होतं. किंवा 'देवराई'च्या वेळी एक ओला हिरवेपणा जो आहे देवराईचा आणि कोकणातल्या घरांचा तो मांडायचा होता. किंवा 'घो मला असला'मध्ये त्याचाच एक रसरशीत हिरवेपणा मांडायचा होता. म्हणजे ती शेतं, त्यांतून पळत जाणारी सावित्री, तो मासा, समुद्र, होड्या, शेणाने सारवलेली सुंदर आखीवरेखीव घरं हे सर्व त्या चित्रपटाचा एक भागच आहेत.

men_sbst.jpg

'बाधा' - मुकादम मोटरसायकलीवरून जात असता मेंढरं आडवी येतात...

किंवा 'बाधा'मध्ये एक कोरडेपणा आहे. कोरड्या जमिनीचे long shots आम्ही वापरले आहेत. किंवा मेंढरांची काही दृश्यं आहेत. तर त्यात त्या बाईवर जो मानसिक अत्याचार सुरू आहे, आणि तो ती सहन करत आहे, हे त्या मेंढरांच्या दृश्यांमधून पोहोचत राहतं. एका दृश्यात तो मुकादम मोटरसायकलवरून जात असताना शेजारी मेंढरांचा कळप असतो. ती दृश्यात्मकता मिळवण्यासाठी आम्ही ती मेंढरं तिथे हाकत नेली होती. आता तिथे ती मेंढरं नसती तर फ़ार काही बिघडलं नसतं. पण मेंढरांचा एक मोठा लोंढा त्या मोटरसायकलीला अडवत निघून जातो, या दृश्यामुळे प्रेक्षकांच्या मनावर कुठेतरी परिणाम होतोच.

सुमित्राताई : तू जी दृश्यात्मकता म्हणतो आहेस, त्या दृश्यात्मकतेमुळे चित्रपटातले अगदी बारीकसारीक तपशील प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. अनेक प्रेक्षकांच्या ते लक्षातही येत नाहीत, पण आपल्याला ती दृश्यं त्या पद्धतीने चित्रीत करायला मजा येते. 'घो मला असला हवा'मध्ये मुंबईहून आलेल्या मुलाला आई तांदळाची घावनं करून घालते. यातली मजा कोकणातल्या माणसाला बरोबर कळेल. किंवा 'नितळ'मध्ये ती मुलं जिन्यामधून येत असताना जिन्यावर बालगंधर्वांची एक मोठी तसबीर लावलेली आहे. आता तो जेमतेम दोन सेकंदांचा शॉट आहे. एवढ्या वेळात ती तसबीर कोणाच्या लक्षातही येणार नाही, असं सगळे म्हणत होते. पण मला त्या जिन्यात ती तसबीर हवीच होती.

चिन्मय : 'नितळ'मध्ये ती नायिका, नीरजा, आजोबांच्या वाढदिवसाला मार्कीझचं 'Living to tell the tale' हे आत्मचरित्र भेट म्हणून देते. आजोबाही 'मला हे पुस्तक कधीचं वाचायचं होतं', असं म्हणतात. त्या एका पुस्तकावरून आजोबांची आणि नायिकेची अभिरुची, त्यांचे स्वभाव लगेच स्पष्ट होतात. हे पुस्तक मग पुढे अनेक दृश्यांत दिसतं...

tenrad_0.jpg

'नितळ' - देविका दफ्तरदार व श्री. विजय तेंडुलकर

सुमित्राताई : बरोब्बर.. तेव्हाही मला सगळे म्हणाले होते की, तिने कोणतंही पुस्तक दिलं तरी कोणाला कळणार आहे? पण त्या आजोबांना त्या नायिकेनं तेच पुस्तक द्यायला हवं. कारण त्यांचे स्वभावच तसे आहेत. आणि हे अगदी मोजक्या प्रेक्षकांना कळलं तरी मजा येते.

चिन्मय : आपल्या चित्रपटांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे संगीताचा वापर. 'दहावी फ', 'घो मला असला हवा' या चित्रपटांत तर गाण्यांतून कथा पुढे सरकत राहते..

सुमित्राताई : संगीताच्या बाबतीत बोलायचं तर सुनील आणि श्रीरंग (उमराणी) यांचा त्यात अधिक सहभाग असतो. सुनील अनेकदा चालीही सुचवतो. तो गाणी लिहितो, त्यामुळे त्याचा थेट सहभाग असतो. श्रीरंगबरोबर तो बरीच चर्चा करतो. चाली, वाद्यमेळ यांवर दोघांच्या चर्चा सतत सुरू असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे सुनीलला जशी संगीताची जाण आहे, तसं श्रीरंगला वाङ्मयात रस आहे. त्याचा खूप फायदा होतो. त्याच्या दॄष्टीने शब्द खूप महत्त्वाचे असतात. आधी चाल तयार करून मग त्यात गाण्याचे शब्द बसवले, असं कधीच झालेलं नाही. आधी मी गाणी लिहितो आणि मग त्या शब्दांना अनुरूप अशी चाल बांधली जाते.

सुनील : वाद्यांचा वापर, किती वाद्यं वापरायची, बेस गिटार वापरायचे की नाही, पखवाज वापरायचे की मृदुंग, अमुक ठिकाणी बासरीचा वापर कसा वाटेल, अशा चर्चा आमच्यात होतात.

'दहावी फ' आणि 'घो मला असला हवा'ला साधारण संगीतिकेचं स्वरूप असावं, अशीच आमची इच्छा होती. अनेक प्रसंग त्यात गाण्याचा रुपात येतात. खूप विचार आम्ही त्यावर केला होता. 'दहावी फ'मध्ये जो दोन मित्रांचा प्रसंग आहे, त्यात 'पहिला उरला नाहीस तू' ही कविता आम्ही वापरली आहे. त्यावेळी यावर आम्ही बराच विचार केला होता. आम्हांला तिथे गाणं नको होतं, पण फक्त संवादही नको होते. चित्रपटातल्या बाकी सर्व पात्रांना त्यांच्या भावना मांडायला गाणी होती, मग या दोघांनाच का नको, या विचारातून मग एका रात्री मी ती कविता लिहून काढली.

सुमित्राताई : पण आमच्या चित्रपटांमध्ये आवश्यक तिथेच आम्ही संगीताचा वापर केला आहे. 'देवराई' आणि 'बाधा'त गाणी नाहीत. 'बाधा'साठी आम्ही दोन गाणी ध्वनिमुद्रित केली होती, पण ती नाही वापरली आम्ही. त्या चित्रपटाशी गाणी सुसंगत वाटत नव्हती. खरं म्हणजे आम्हांला ती दोन्ही गाणी खूप आवडली होती, पण आमच्या शहरी sensibilities आम्हांला तिथे लादायच्या नव्हत्या. 'बाधा'त पार्श्वसंगीतही वापरलेलं नाही. 'वास्तुपुरुष'मध्ये पार्श्वसंगीत फक्त एकदोन ठिकाणी वापरलं आहे. शेवटी जेव्हा भास्कर तरातरा चालायला लागतो तेव्हा मृदुंगाचा ध्वनी वापरला आहे. एरवी निशी वाजवतो त्या बासरीचे स्वरच आहेत चित्रपटात. गाणीही दोनच आहेत. आमच्या नव्या चित्रपटातही वाद्यांसकट गाणी नाहीत. एका गाण्यात फक्त एकतारी वापरली आहे.

चिन्मय : आपल्या बहुतेक सर्व चित्रपटांतील स्त्री-व्यक्तिरेखा या स्वतंत्र विचारशक्ती अस्णार्‍या व सशक्त असतात. आपल्या सामाजिक कार्याच्या पार्श्वभूमीमुळे असं होतं का?

सुमित्राताई : हो, पार्श्वभूमीमुळेच. कारण मला बायका तशा दिसतातच. आणि तशा असतात बायका.

सुनील : स्वतंत्र विचारशक्ती असलेल्या स्त्रिया आपल्या भोवताली असतातच. त्यांना चित्रपटात घेण्याचा कंटाळा आपले लेखक करतात. आणि लेखकच असं नाही, पण लेखिकाही हा भाग त्यांच्या लेखनात आणत नाहीत, याचं वाईट वाटतं. समाजात होणारा बदल तुम्ही पडद्यावर दाखवणार आहात की नाही, असं कधीकधी विचारावंसं वाटतं. वास्तव तर बदलत राहतंच. पण आता होतंय काय की, माध्यमांमधून या वास्तवालाच उलटं फिरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हल्लीच्या दूरचित्रवाणी मालिका हे करतायत, असं माझं मत आहे. म्हणजे काही पिढ्यांपूर्वी बायकांनी नवर्‍यांना 'अरे' म्हणायला सुरुवात केली. भास्करराव आणि दिनकरराव कर्व्यांच्या पत्नी त्यांना 'अरे' म्हणायच्या. त्यांची पतवंड शोभतील अशा मुलांच्या बायका आता नवर्‍याला 'अहो' म्हणतात. यात लेखकाची हुशारी असते. प्रेक्षकांना या स्मरणरंजनात अडकवलं की मालिका चालतील, आपल्याला लोकप्रियता मिळेल असा हिशोब असतो, आणि याच पद्धतीने हल्ली मालिका तयार केल्या जातात. त्यामुळे या बदलत्या संस्कृतीत स्त्रियांचं जे स्वातंत्र्य आहे, तेच कुठे दृष्टीस पडत नाही. हे उलटंच चक्र सुरू झालं आहे.

सुमित्राताई : घरोघरी आपल्या आया, आज्या, पणज्या या माणूस म्हणून बुद्धिमान होत्याच. स्त्री-पुरुषांच्या बुद्धीत मुळात फरक नसतो. जगण्याच्या प्रक्रियेत 'संस्कारांमुळे' जो फरक पडतो, त्यामुळे बायकांना आपली बुद्धी छुप्या पद्धतीने वापरून घेऊन आपल्या मनासारखं करवून घ्यावं लागतं. आपल्याला जे हवं आहे, ते करवून घेण्यात बाई बर्‍यापैकी हुशार असते. आणि त्यामुळे बहुतेक घरांत बायका स्वतःचं राज्य चालवत असतात. वरवर तसं दिसत नाही. ती बिच्चारी आहे, असं आपल्याला वाटतं. पण तसं काही नसतं. फार थोड्या बायका खरोखरंच बिचार्‍या असतात.

nit_sbst.jpg

'नितळ' - उत्तरा बावकर, नीना कुलकर्णी व ज्योती सुभाष

सुनील : स्त्रीवादी दृष्टिकोन जर नीट कळला असेल, तर सर्वच स्त्रियांना उदात्त दाखवण्याचा मोह उरत नाही. जसं 'नितळ'मधल्या आईला उदात्त दाखवण्याची गरज नाही, आणि खलनायिका म्हणूनही दाखवण्याची गरज नाही. तिला उदात्त दाखवणंही फार सोपं आहे, आणि खलनायिका दाखवणंही फर सोपं आहे. ती इतकी काही मजेशीर आहे की, ती कुचकटही बोलते, आपल्या मुलाचं भलं फक्त आपल्याला कळतं या भावनेतून त्याला कडाडून विरोधही करते. पण टोकाचं वाईट वागण्याइतकी ती दुष्टही नाही. त्या घराण्यातल्या बायकांच्या एकंदर dominanceमुळे आजोबा किंवा वडिलांमध्ये जो गुळमुळीतपणा आला आहे, हाही अनेक घरांत आपल्याला सापडतो. बाहेरच्या जगात वावरताना त्यांचे विचार ठाम असतात, मात्र घरी बोटचेपेपणा करतात. तिसर्‍या पिढीतल्या अनन्यमध्येसुद्धा हा बोटचेपेपणा आलेला आहे. दुसरीकडे मात्र बाहेरून आलेली काकू ही भयंकर submissive आहे. नवर्‍याच्या राजबिंडेपणामुळे, आत्मविश्वासामुळे ती दबली आहे. या सगळ्या प्रकारच्या बायका चित्रपटात असण्यातच खरी गंमत आहे.

चिन्मय : आपले चित्रपट हे बहुतेक सुखांत असतात...

सुमित्राताई : कुठल्याही चित्रपटाचा शेवट अमुक एका पद्धतीनं व्हावा, असं ठरवून मी कधीही लिहिलेलं नाही. आणि मी काही पारंपारिक विचारसरणीची नाही. त्यामुळे ग्रीक शोकांतिकांना समोर ठेवून केलेले शेवट म्हणजे महान, असं काही मला वाटत नाही. आपण भारतीय माणसं कायम आयुष्यातली सार्थकता शोधत असतो. आणि सार्थकता म्हणजे सकारात्मकता. ही सार्थकता मला शोधायची असते. पण सर्वच चित्रपटांचे शेवट काही गोड नाहीत. 'देवराई'मध्ये शेवटी ते दोघं एकत्र राहायला लागले, हा एका टप्प्यावरचा गोड शेवट आहे. शेषला मनोविकार आहे, आणि उद्या तो कल्याणीला छळू शकणार आहे. त्यामुळे त्या कथेचा शेवट झालेला नाही. त्या एका टप्प्यावरचा तो सुखद शेवट आहे. पण त्या दोघांनाही आपापल्या जीवनाची सार्थकता सापडली आहे. एखाद्या टप्प्यावर जेव्हा मला सार्थकतेचा शोध लागतो, तिथे तो चित्रपट संपतो.

सुनील : ही सकारात्मकता मूल्य आणि कष्ट यांच्यातून आलेली सकारात्मकता असते. ती दैवाने पदरात टाकलेली नसते. दैव येऊन तुमचे प्रश्न सोडवत नाही. म्हणजे कोणीतरी मेलं आणि ते दोघं लग्न करायला मोकळे झाले, असं काही होत नाही. याला दुखावून, त्याचा रोष पत्करून जेव्हा ती दोघं एकत्र येतात, तेव्हाची सकारात्मकता ही खरी असते. गंमत सांगतो, अमेरिकेतल्या एका प्रेक्षकानं आम्हांला विचारलं होतं, 'ती दोघं कुठल्या नात्यानं एकत्र राहायला गेली?' म्हटलं, 'आम्हांला नाही माहिती. त्यांनीच तो निर्णय घेतला'. तर त्या प्रेक्षकांना हे आवडलं नाही. म्हणाले, तुमचा महाराष्ट्र फ़ारच पुढे गेलेला दिसतोय. इतकं त्यांना लागलं ते. पण हा प्रश्न कल्याणीलाही अनेकजण विचारणार आहेत. कोकणातले त्यांचे शेजारीही विचारणार आहेत. हे सारं ठाऊक असूनही ती जेव्हा शेषची जबाबदारी घेते, तेव्हा तो शेवट गोड नसतो. 'बाधा'मध्ये तुका त्याच्या बायकोकडे परत जातो, म्हणून शेवट गोड झाला, असं नाही. तर तो ज्या turmoilमधून जात असतो, त्यातून त्याला बायकोकडे परत जावंसं वाटतं, आणि ती प्रक्रिया त्या शेवटापेक्षा अधिक महत्त्वाची आहे. 'दोघी'मध्ये जेव्हा शेवटी तो तरुण ताईची पिशवी हाती घेतो, तेव्हा त्याने अतिशय कठीण निर्णय घेतलेला असतो. त्याचे परिणामही त्याला भोगावे लागणार असतात. त्यामुळे या शेवटापेक्षाही त्यातील सकारात्मकता ही महत्त्वाची. आमचा हा पहिला चित्रपट होता, आणि त्यावेळी वादही झाला होता या शेवटावरून. NFDCचे एम.डी म्हणाले होते की, तुम्ही तिला मुंबईला परत पाठवा, तिला त्या वेश्यावस्तीपर्यंत गेलेली दाखवा. तिथे जाऊन ती खितपत पडली असं दाखवलं तरच ती अत्युच्च कलाकृती होईल. आमचं म्हणणं होतं की, जिचं 'पतन' झालं आहे, तिचं तिथेच खितपत पडणं, किंवा मरणं, हे व्यावसायिक किंवा कलात्मक चित्रपट नेहमीच दाखवतात. तिचं भलं झालं हे दाखवण्यातच खरं वेगळेपण आहे. तिथेच खरी कोंडी फ़ोडली जाईल. ती परत गेलेली दाखवणं हे प्रवाहपतित होणं आहे. त्यामुळे बंडखोरी ही सकारात्मक असू शकते, आणि शोकांतिका ही प्रवाहपतित असू शकते. होतं काय की, शोकांतिका ही सकारात्मक वाटते आणि सकारात्मक शेवट प्रवाहपतित वाटतो. प्रेक्षकांचा व खास करून समिक्षकांचा हा गोंधळ आहे.

सुमित्राताई : चित्रपट लिहिताना मी तो भोळसटपणे लिहिलेला नाही, आणि प्रेक्षकांनीही तो चित्रपट भोळसटपणे पाहू नये.

चिन्मय : आपल्या सर्व चित्रपटांनी सामाजिकता जपली आहे. तर प्रत्येक चित्रपटात काही सामाजिक संदेश असावाच का?

सुमित्राताई : काय आहे अरे, खरं म्हणजे संदेश या शब्दालाच काही अर्थ नाही. कोणी कोणाला संदेश देऊ नये. पण प्रत्येक चित्रपट ठोसपणे जगण्याबद्दल, मूल्यांबद्दल काहीतरी म्हणतच असतो. अगदी आपण ज्या चित्रपटांना टुकार म्हणतो, ते चित्रपटही काहीतरी म्हणत असतात. स्त्रीविषयीच्या प्रतिक्रियांमधून, समाजाविषयीच्या प्रतिक्रियांमधून काहीतरी सांगतच असतात. हे सांगणं तुम्हांला टाळताच येत नाही. चित्रपटातील प्रत्येक संवादामध्ये, प्रत्येक तपशीलामध्ये, तुमचा जगण्याविषयीचा दृष्टिकोन, तुम्ही कोणती मूल्ये मानता, हे सर्व सामावलेलं असतं. आमच्याही चित्रपटांत हे असतंच. कुठलाही चांगला, सकस अनुभव, कुठल्याही माध्यमातून मांडता आला, तर तो 'जीवनाविषयीचा उत्तम संदेश' ठरतोच. शिवाय सामाजिकता ही गोष्टही टाळता येत नाहीच. प्रत्येक चित्रपतात ती डोकावतेच. आमच्या चित्रपटांत ती इसापनीतिच्या कथांप्रमाणे येत नाही, इतकंच.

चिन्मय : एखादी कलाकृती सामाजिक बदल घडवून आणू शकते का? समाजात मूलगामी बदल घडवून आणण्याची ताकद चित्रपटांत असते का?

सुमित्राताई : हो, नक्कीच. पण खरं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तितकंसं सोपं नाही. म्हणजे वाङ्मय, एखादा चित्रपट, किंवा 'गर्जा जयजयकार'सारखं एखादं गीत, किंवा पिकासोच्या 'गेर्निका'सारखं एखादं चित्र असेल, हे साकारताना त्या कलावंतानं त्या परिस्थितीचा एक तीव्र अनुभव घेतलेला असतो. समाजातल्या अनेकजणांना, ज्यांना साधारण हाच अनुभव आलेला असतो, पण तो व्यक्त करण्याचा नेमकेपणा त्यांच्याकडे नसतो, कलावंतानं आपल्या कलाकृतीतून मांडलेला अनुभव आपलासा वाटतो. प्रेक्षकाच्या, श्रोत्याच्या मनात जे येत असतं, त्याला अधिक मूर्त, ठोस स्वरूप देण्याचं काम या कलाकृती करतात. त्याच्या मनात काही प्रश्न निर्माण झालेले असतात, आणि या कलाकृती कुठेतरी त्याला या प्रश्नांची उत्तरं शोधण्यास मदत करतात, असं मला मानसिकतेच्या पातळीवर वाटतं. आणि त्यातून जे काही बदल होतात, ते काही ठोसपणे दाखवता येत नाहीत.

पण बरेचदा असंही घडलं आहे की, वाङ्मय वाचून तरुणांची मनं अस्वस्थ झाली आहेत. हेच काम चित्रपट का नाही करू शकत? करू शकतातच, असं मला वाटतं. खरं म्हणजे अशा कलाकृतींचं काम बी टाकण्याचं असतं. माणसाच्या मनात मग ते विचार हळूहळू रुजतात. ही प्रक्रिया संथ असते, नेमकेपणाने दाखवता येत नाही, पण फरक पडतोच. 'नितळ' बघून एखाद्या तरुणाला असणारा कोडाबद्दलचा गंड जाऊ शकतो. 'दहावी फ'चा तर तसा अनुभवही आहे. 'दहावी फ' प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाचा उल्लेख करून शासनाने आपलं शैक्षणिक धोरण बदललं. शाळांनी मार्कांनुसार 'अ' ते 'फ' अशी उतरंड लावू नये, असा अध्यादेश शासनाने काढला, आणि त्यात 'दहावी फ'चा ठळक उल्लेख केला होता.

सुनील : काही चित्रपट दिग्दर्शकांवरच सामाजिकता सांभाळण्याची जबाबदारी आहे, आणि इतरांवर नाही, असं अलीकडे मानलं जातं. आम्ही कायमच असं म्हणत आलोय की, सामाजिकता ही कुठल्याच कलाकृतीला चुकलेली नाही. 'सामाजिक बांधिलकी' असा जेव्हा आपण शब्दप्रयोग करतो तेव्हा त्या दिग्दर्शकाचा, कलाकाराचा प्रामाणिकपणा आणि आपल्या कलाकृतीमुळे समाजात काय भलंबुरं होणार आहे, याचा विचार करणं, हे आपण गृहीत धरतो. आता हे भलंबुरं कसं ठरवणार? 'फायर' हा चित्रपट तयार करणार्‍यांनी समाजाचं बुरं केलं, असं काहींना वाटू शकतं. आता दिग्दर्शकानं समाजाचं वाईट चिंतिलं का, हा वेगळा मुद्दा, आणि प्रेक्षकांना काय वाटतं, हे अजूनच वेगळं.

आता 'अभिमान' हा चित्रपट खूप पूर्वी येऊन गेला. पण आजही समाजात एखाद्या कलाकार दांपत्यामध्ये जर ती पत्नी अधिक कर्तृत्ववान असेल, तर नक्कीच त्या जोडप्याच्या मनात कुठेतरी 'अभिमान' डोकावून जाईल. आता 'अभिमान' हा सामाजिक जाणिवेतून तयार झाला आहे का? पण ती एक चांगली आणि प्रामाणिक कलाकृती आहे, आणि त्यामुळे त्या नवराबायकोच्या मनात या चित्रपटातील पात्रांशी तुलना सुरू होते. 'चिनी कम' पाहून काही मध्यमवयीन लोकांनी नाकं मुरडली असतील. पण 'अच्छा, अशीही जोडपी असतात का.. असू देत..!' असं हा चित्रपट पाहून ती संकल्पना मानवलेले प्रेक्षक म्हणतील. तोपर्यंत त्यांना कदाचित तसं वाटत नसेल, पण तो चित्रपट पाहून त्यांना असं वाटू शकतं. तर चित्रपट सतत अशी काही role models पुरवत असतात. आणि त्यातून समाज बदलत जातो.

समाज डेव्हीड धवनच्या चित्रपटांनीही बदलतो. डेव्हीड धवनच्या चित्रपटांना सामाजिकता आहे का? तर, खूप मोठी सामाजिकता आहे. बायकोला मूल होत नाही म्हणून नवरा दुसर्‍या बाईशी, साध्या भाषेत सांगायचं तर, भानगड करतो, आणि जन्माला येणारं मूल कुटुंबाकडून स्वीकारलं जातं, अशा स्टोर्‍या जेव्हा गंमत म्हणून सांगितल्या जातात, तेव्हा समाज त्यातून काहीतरी उचलतच असतो. ही सामाजिकता कोणालाच चुकलेली नाही. 'सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर सामाजिक संदर्भ असलेले चित्रपट बनवतात', असं म्हटलं जातं, पण केदार शिंदेही सामाजिक संदर्भ असलेले चित्रपट बनवतो, आणि सचिन पिळगावकरही सामाजिक संदर्भ असलेले चित्रपट बनवतात.

सुमित्राताई : समाजात असलेला हिंसाचार चित्रपटांतून आला आहे, असंही म्हटलं जातं. चित्रपटातल्या हिंसाचाराचा समाजावर परिणाम होतोच. त्यामुळे दिग्दर्शकाची जबाबदारी मोठी आहे, असं मला वाटतं.

सुनील : 'अंडरवर्ल्ड' नावाच्या गोष्टीचं आकर्षणही त्यातूनच आलं आहे. अमिताभ बच्चनच्या 'अँग्री यंग मॅन'पासून ती सुरुवात झाली आणि आज 'सत्या' किंवा विशाल भारद्वाजच्या चित्रपटांपर्यंत आपण येतो, तेव्हा लक्षात येतं की 'अंडरवर्ल्ड'चं इतकं उदत्तीकरण झालं आहे की जगातली सगळी सच्ची माणसं अंडरवर्ल्डमध्येच आहेत, असं आपल्याला वाटायला लागतं. एक शाळा मास्तर प्रामाणिकपणे जगतो आहे, ही गोष्ट कोणी मांडतच नाही. पण पंचवीस खून पचवलेला एक भाई मनाने कसा चांगला होता, हे आपण सांगत बसतो. आणि याचा परिणाम निश्चितपणे समाजावर होतोच. ती टपोरी भाषा आणि 'भाई' हा शब्द मध्यमवर्गीय गृहिणीच्या मनापर्यंत पोहोचला आहे की नाही? आपल्या बोलण्यात ते शब्द येतात, आपण त्यांचा स्वीकार करतो. ही भाषा आपण कुठून घेतली? पंचवीस-तीस वर्षांपूर्वी नव्हती ती. तर हे माध्यम असं समाजाला व्यापून राहतं, असं मला वाटतं.

चिन्मय : आपल्या इतर चित्रपटांप्रमाणेच 'एक कप च्या' हा जो नवीन चित्रपट येतो आहे, त्यालाही सामाजिक संदर्भ आहे. या चित्रपटाबद्दल काही सांगाल?

सुमित्राताई : माहितीचा अधिकार म्हणजे काय, हे समजवून घेऊन जर सामान्य माणसांनी या अधिकाराचा वापर केला, तर आपली लोकशाही सकस होईल, हे सांगण्यासाठी आम्ही हा चित्रपट तयार केला आहे. एका साध्या, सामान्य माणसाने माहितीच्या अधिकाराचा वापर करून हवी ती माहिती कशी मिळवली, आणि आपला प्रश्न कसा सोडवला, हे या चित्रपटात सांगितलं आहे. एका बस कंडक्टरची ही गोष्ट आहे. 'आपण कोण? तर एक कंडक्टर. विजेचं एवढं मोठं बिल कसं आलं, हे आपण शासनाला, वीज महामंडळाला कसं विचारायचं?', असं त्याला वाटत असतं. पण मग त्याला वाटतं की, येईल की कदाचित विचारता.. आणि मग तो साधी पत्रं पाठवत हवी ती माहिती मिळवतो. तो हातात शस्त्र घेत नाही. तो कोणाशी भांडायला जात नाही. वेडंवाकडं बोलत नाही. पत्रांच्या देवाणघेवाणीतून ही अशी कामं होऊ शकतात, आणि ही कामं करून घ्यायला आपण शासनालासुद्धा जागं केलं पाहिजे, हे सांगण्यासाठी हा चित्रपट आहे. यात अजिबात हिंसा नाही, आपलं काम करून घेण्यासाठी कोणीही हातात बंदुका, काठ्या, तलवारी घेतलेल्या नाहीत.

सुनील: 'देवराई'चे निर्माते जे आहेत, त्यांच्यासाठीच आम्ही हा चित्रपट तयार केला आहे. 'देवराई'च्या वेळी 'स्किझोफ्रेनियावर चित्रपट करायचा आहे', असं एवढंच त्यांनी आम्हांला सांगितलं होतं, तसंच आताही 'माहितीच्या अधिकारावर चित्रपट करायचा आहे', एवढंच आम्हांला सांगण्यात आलं. आणि त्यातून सुमित्राताईंनी ही गोष्ट लिहिली. त्यातही माहितीचा अधिकार, कायदा आणि त्याचा वापर या गोष्टी चित्रपटात खूप नंतर येतात. तोपर्यंत ती एका साध्या माणसाचीच गोष्ट असते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा की, शासन यंत्रणा जी असते, ती माणसाला माणूस म्हणून ओळखत नाही. शासनाच्या लेखी ती फक्त एक केस असते. या माणसाला चेहरा नसल्याने शासनाला त्याच्याशी फारसं सोयरसुतक नसतं. आपणही कुणीतरी अधिकाराच्या जागेवर असलेली माणसं असतो. इथे तुम्हाला काही त्रास होत असला, तरी दुसरीकडे तुम्ही अधिकाराच्या जागेवर असू शकता. आणि हा अधिकार खूप छोटा असतो. अगदी एखादा चपराशी जरी असेल तरी त्याला काहीएक अधिकार असतो. कोणाला उर्मटपणाने वागवायचं, कोणाशी अदबीने बोलायचं, हे या अधिकारातून तो ठरवत असतो. तर आपण कोणालाही बिनचेहर्‍याचं समजूया नकोत. एखाद्या छोट्याशा वाटणार्‍या गोष्टीतून त्या माणसाच्या आयुष्यात केवढं काहीतरी होऊ शकतं. एका चुकीच्या निर्णयातून जे जे काही घडत जातं, ते आम्ही या चित्रपटात दाखवायचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपट बघताना प्रेक्षकाला वाटू शकतं की, एका बिनचेहर्‍याच्या माणसाच्या आयुष्यात बरंच काही घडलेलं असू शकतं. त्या माणसाला जेव्हा रेशन कार्ड मिळायला उशीर होतो, तेव्हा त्याच्या संपूर्ण कुटुंबाला त्याचा त्रास होतो. शिधापत्रिकांचं वाटप करणारा एखादा अधिकारी जर हा चित्रपट बघत असेल, तर त्याला वाटू शकतं की, आपण वेळेवर शिधापत्रिका द्यायला हव्यात, नाहीतर पूर्ण कुटुंबाला त्रास होतो; उद्या हीच वेळ माझ्यावरही येऊ शकते.

ekcupchaha.jpg

'एक कप च्या' - अश्विनी गिरी, पर्ण पेठे, ओम भुतकर, किशोर कदम. मागे उभ्या कमल देसाई

सुमित्राताई : निर्मात्यांनी जेव्हा आम्हांला 'माहितीच्या अधिकारावर चित्रपट तयार करायचा आहे', असं सांगितलं, तेव्हा आमच्यासमोर दोन पर्याय होते. एक म्हणजे, माहितीचा अधिकार मिळवण्यासाठी एक मोठं देशव्यापी आंदोलन उभं करायचं, मग त्यासाठी मोर्चे काढायचे, मग पोलीस येतील, लाठीमार होईल, राजकारण्यांपर्यंत प्रकरण पोहोचेल, मग राजकारणातला भ्रष्टाचार, शासनातला भ्रष्टाचार, असं सगळं दाखवता आलं असतं. पण असं काही दाखवून नाही चालणार, असं माझ्या मनात आलं. कारण ज्यावेळी असे मोठाले मोर्चे निघतात, लाठीमार होतो, तेव्हा अनेक सामान्य माणसांना वाटतं की हा आपला प्रांत नाही, हे आंदोलन वगैरे जे काही आहे, ते राजकारणी बघून घेतील, आपला काही संबंध नाही त्याच्याशी. असं होता कामा नये. पण अशामुळे लोकशाही तगणार नाही. जेव्हा एखादा सामान्य माणूस हिंमतीनं त्याच्या छोट्याशा हक्कासाठीही उभा राहील, तेव्हाच लोकशाही खरी यशस्वी झाली, असं मानावं लागेल. माझ्या पहिल्या लघुपटाच्या वेळीही माझी हीच भूमिका होती. जेव्हा झोपडपट्टीतली एक स्त्री उठून उभी राहते, आणि म्हणते की, 'मी मुलं न होऊ देण्याचं ऑपरेशन करून घेणार, नवर्‍यानं नाही म्हटलं तरी', तेव्हा ती खरी स्वतंत्र होते. कारण तिला कळतं की, तिचा देह आहे आणि त्यावर फक्त तिचाच अधिकार आहे, नवर्‍याचा हा अधिकार मानण्याचं कारण नाही. तेव्हा हे स्वातंत्र्य मोठमोठ्या घोषणांनी, स्त्रीवादी आंदोलनांनी दाखवायचं की एका बाईच्या या निर्णयाने दाखवायचं? या स्त्रीच्या जागी मीही असू शकते, असं अनेक बायकांना आमचा लघुपट बघून वाटलं होतं. म्हणूनच या चित्रपटाच्या वेळीही मी ठरवलं की आंदोलनाभोवती उभा राहिलेला चित्रपट करायचा नाही.

मी डॉ. अरुणा रॉय यांच्या प्रयत्नांबद्दल वाचलं. इतरही काही आंदोलनांचा अभ्यास केला. आणि त्यामुळे असं वाटलं की, रोजगार हमी योजनांसारख्या सरकारी योजनांतील भ्रष्टाचार माहितीचा अधिकार वापरून उघडकीस आणणं हे आपलं काम नाही. एका माणसाच्या आयुष्यात घडलेली एक चुकीची गोष्ट आणि त्यामुळे झालेला त्रास त्याने माहितीचा अधिकार वापरून दूर केला, हे जर लोकांपर्यंत पोहोचलं तर इतर अनेक सामान्य माणसांना वाटेल की, आपणही आपल्याला होणारा त्रास दूर करू शकतो. म्हणूनच 'एक कप च्या' या चित्रपटात आम्ही एका माणसाची गोष्ट सांगितली आहे.

चिन्मय : 'एक कप च्या'मध्ये ज्येष्ठ लेखिका श्रीमती कमल देसाई यांनी आजीची भूमिका केली आहे..

सुमित्राताई : हो.. त्यांचं हसणं मला फार आवडतं. छान खळखळून हसतात त्या. आणि 'एक कप च्या'मध्ये जे कुटुंब आहे, ते असंच आहे. कोणतीही अडचण आली तरी तिला हसत सामोरं जाणारं. कमलताई मला म्हणाल्या की, 'मला काही अभिनय जमणार नाही'. पण मी त्यांना सांगितलं की, त्यांचं जे छान हसू आहे, त्यासाठी मला आजीच्या भूमिकेसाठी त्याच हव्या आहेत. इतकं सुरेख काम केलं आहे त्यांनी आजीचं.

चिन्मय : डॉ. महेश एलकुंचवार, श्रीमती कमल देसाई यांच्याप्रमाणेच श्री. विजय तेंडुलकरांनी आपल्या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका केली होती. 'नितळ'मध्ये त्यांनी आजोबांची भूमिका अतिशय छान रंगवली होती.

nit_ten_sbst.jpg

'नितळ' - अमृता सुभाष व विजय तेंडुलकर

सुनील : तेंडुलकरांची आणि आमची दोस्ती फ़ार वेगळ्या प्रकारे सुरू झाली. मोहीत, अमृता, सचिन वगैरे मुलांचा जसा त्यांच्याशी संपर्क होता, तसा आमचा नव्हता. या नाटकवाल्या मुलांशी त्यांचं एक वेगळं प्रेमाचं नातं होतं. आम्ही तसे दूर होतो त्यांच्यापासून. त्यांना 'वास्तुपुरुष' फार आवडला होता. NFDCनं मुंबईत चित्रपटाचा एक खास शो आयोजित केला होता, त्याला ते आले होते. तेंडुलकर आमचा चित्रपट पाहायला आल्यामुळे आम्हांलाही खूप आनंद झाला होता तेव्हा. त्यांना चित्रपट तर आवडलाच, पण नंतरही त्यांनी आमचं खूप कौतुक केलं होतं. 'मला आता फक्त तुमच्याकडूनच आशा आहेत', असं ते म्हणाल्यामुळे आम्हाला भरून आलं होतं. तर ही तेंडुलकरांशी पहिली भेट. 'देवराई'सुद्धा त्यांना खूप आवडला होता. त्यांनी आम्हांला बोलावून घेतलं होतं, आणि आमच्या चित्रपटांबद्दल बरंच बोलणं झालं होतं तेव्हा. म्हणजे आत्ता आपण जे बोललो - सकारात्मकता, सामाजिकता, सांगीतिक प्रयोग वगैरे, याबद्दलच आमच्या मस्त गप्पा झाल्या होत्या. नंतर 'नितळ'च्या थोडं आधी ते एकदा अनपेक्षितपणे पुण्याला आले, आणि आम्हांला भेटायचं असल्याचं त्यांनी फोन करून सांगितलं. मग ते आमच्या घरी आले, भरपूर गप्पा मारल्या. त्यावेळी 'नितळ'मध्ये आजोबांच्या भूमिकेबद्दल आमच्या चर्चा सुरू होत्या. या भूमिकेसाठी आमच्या डोळ्यासमोर डॉ. लागू होते. आत्याबाईंची भूमिका दीपाताई करणार होत्या. ही दोघं भावाबहिणीच्या भूमिकेत शोभून दिसतील, असं आम्हांला वाटत होतं. पण प्रकृती अस्वास्थ्य, आणि पटकथेचा काही भाग पटला नाही, अशा दोन कारणांसाठी डॉक्टरांनी त्यावेळी नकार दिला. त्यांना ती पटकथा अधिक थेट, आणि अधिक सामाजिक टीका करणारी अशी हवी होती. आम्हांला मात्र अशी थेट टीका करायची नव्हती. कारण चित्रपटाचा विषय होता अंगावर आलेले कोड आणि याबद्दल तुम्ही कोणाला धरून फटके मारणार? आम्हांला पटकथेत फार बदल करता येण्यासारखे नव्हते, आणि डॉक्टर आमच्या चित्रपटात काम करणार नाहीत, असं ठरलं. मग त्या वयाचा कोणी नटच आमच्या ध्यानात येईना. शिवाय इतर चित्रपटांमध्ये ठरावीक प्रतिमा असलेले नटही आम्हांला नको होते. आणि अचानक आमच्या डोळ्यांसमोर तेंडुलकर आले.

आम्ही लगेच त्यांना फोन केला, आणि ते अगदी सहज म्हणाले, 'हो, मला जी माणसं आवडतात त्यांच्यासाठी मी काहीही करतो. तुम्ही मला आवडता. मी करीन काम'. तीन वाक्यांत त्यांनी विषय संपवला. आम्ही त्यांना सांगितलं की, डॉ. लागूंनी हे काम करायला नकार दिला आहे. तेंडुलकर म्हणाले, 'त्याचा काय संबंध? मी हे काम करणार'. त्यांना चित्रपटाचं कथानक आवडलं होतं. म्हणजे ते या चित्रपटात काम करणार, हे ठरण्यापूर्वी त्यांना आम्ही कथानक ऐकवलं होतं, आणि तेव्हा ते म्हणाले होते की, 'मला या चित्रपटातली सगळी माणसं खूप खरी वाटतायत. त्यामुळे हा छान होईल चित्रपट'. त्यांनी आजोबांची भूमिका स्वीकारण्याआधी पटकथा वाचावी, असं आम्हांला वाटत होतं. आम्ही म्हणालो त्यांना की, 'तुम्ही एकदा पटकथा वाचून मग काय तो निर्णय घ्या. ती व्यक्तिरेखा तुम्हाला पूर्णपणे आपलीशी वाटल्याशिवाय तुमच्या statureच्या व्यक्तीनं ती भूमिका करण्यात अर्थ नाही. एखाद्या अभिनेत्यानं ती व्यक्तिरेखा साकारणं वेगळं. पण आम्ही तुम्हांला तसं गृहीत धरणं योग्य नाही. तुमच्या statureच्या व्यक्तीनं या चित्रपटात भूमिका करायची आहे म्हणजे तुम्हांला ती भूमिका आवडायला हवी, या चित्रपटात काय म्हटलं आहे ते तुम्हांला पटायला हवं'. पण त्यांनी पटकथा अगोदर वाचायला वगैरे नकार दिला. 'माझा तुमच्यावर विश्वास आहे, मी दिग्दर्शकाला होकार देतो आहे', असं म्हणाले.

आणि मग ते एकदम तालमीलाच लागले. त्यांनी अगोदरच सांगितलं होतं, 'मी बिगरी यत्तेतला अभिनेता आहे. उमेदवार कलाकाराला जसं वागवता, तसं मला वागवा. माझ्याकडून तालीम करून घ्या. माझं पाठांतर करून घ्या. वयानुसार माझं पाठांतर होत नाही'. त्यांनी सुमित्राताईंना विचारलं की, 'लेखकाच्या शब्दाला मी मान देतो. पण समजा वयोमानामुळे मी एखादा शब्द विसरलो, तर त्याऐवजी दुसरा शब्द मी वापरला तर चालेल का?' सुमित्राताई म्हणाल्या, 'तुम्ही तेंडुलकर आहात. त्यामुळे चालेल'. पण पुन्हा दुसर्‍या दिवशी सुमित्राताईंना म्हणाले, 'मी काल शब्दांबद्दल बोललो खरं काल, पण तसं नाही मी होऊ देणार. प्रत्येक शब्द तुमचाच असेल'. आणि खरंच त्यांनी चोख पाठांतर केलं. एकही शब्द इकडचा तिकडे झाला नाही.

सेटवरही ते प्रत्येक गोष्ट आम्हांला विचारून करायचे. विरामांमधले बदल, किंवा एखादा संवाद वेगळ्या प्रकारे म्हणायचा असेल, तर ते आधी आम्हांला करून दाखवायचे, आणि 'असं केलं तर चालेल का?', असं विचारून मगच करायचे. दीपाताईंनी आणि त्यांनी एकमेकांबरोबर फार छान तालमी केल्या. त्यांची प्रकृतीही तेव्हा बरी होती. ते सेटवर असले की सगळ्यांनाच मजा यायची. तरुण मंडळी तर त्यांच्याभोवती घोळका करूनच असत. एका गाण्यात त्यांना सारंग साठ्येबरोबर थोड्या नाचासारख्या हालचाली करायच्या होत्या. 'अ‍ॅक्शन' म्हटल्यावर ते इतक्या जोरात नाचायला लागले की सारंग चक्क भेलकांडला. त्याला कल्पनाच नव्हती की तेंडुलकर इतक्या जोरात नाचतील. खूप उत्साहाने तेंडुलकर त्या चित्रीकरणात सामील झाले होते. त्यांचं संजय मेमाणेवरसुद्धा फ़ार प्रेम होतं. त्याचं कॅमेरावर्क बघायलाही त्यांना फ़ार आवडायचं. त्यांच्यात एक दिग्दर्शक लपलेला होताच. त्यामुळे ते कॅमेरा, लाइट्स, अँगल्स या गोष्टींचं बारकाईनं निरीक्षण करत. या चित्रपटातलं संजयचं काम त्यांना अतिशय आवडलं होतं. संजयनं सुरेख छायाचित्रण केलं आहेच. खास चमकदार अशा काही फ़्रेम्स त्यात नाहीत. त्या घरात जो नैसर्गिक प्रकाश होता, तो निर्माण करणं हे फ़ार कौशल्याचं काम होतं. एक असा 'सरंजामी' अंधार आम्हांला तिथे हवा होता, आणि म्हणून प्रकाशयोजनेला खूप वेळ लागायचा. तेंडुलकर शांतपणे आमचं काम बघत बसून राहायचे. चित्रपट तयार झाल्यानंतर त्यांना तो आवडला, याचंही आम्हांला खूप समाधान होतं.

चिन्मय : सुमित्राताई, तेंडुलकरांनी आपल्या वडिलांवर 'पिता' या नावानं एक लेख लिहिला होता. हा लेख आपल्याला खूप भावला होता, आणि त्यावर आपल्याला चित्रपट काढायचा होता, असं सुषमा तेंडुलकर मागे म्हणाल्या होत्या. आपल्या आजवरच्या सर्व पटकथा आपणच लिहिल्या आहेत. आपल्याला आवडलेल्या इतर काही साहित्यकृतींवर चित्रपट करावासा वाटलं आहे का?

सुमित्राताई : दि. बा. मोकाशींची 'आमोद सुनासी आले' म्हणून एक छोटी कथा आहे. जर एखादा निर्माता मिळाला, तर या कथेवर मला चित्रपट तयार करायचा आहे. या कथेचे हक्कही मी घेतले आहेत. हमीद दलवाईंच्या 'इंधन' या कादंबरीवर चित्रपट तयार करायची खूप इच्छा होती. सदानंद देशमुखांची 'बारोमास' ही अलीकडच्या काळात मला आवडलेली कादंबरी. सदानंद देशमुखांचं मला फ़ार कौतुक वाटतं. त्यांची संवेदनशीलता फार sophisticated आहे.

चिन्मय : 'दोघी' १९९४ साली प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आजवर आपल्याला समाधान देऊन गेलेल्या चित्रपटांबद्दल काही सांगाल?

सुमित्राताई : 'वास्तुपुरुष' आणि 'देवराई' हे दोन चित्रपट मला आवडतात. 'वास्तुपुरुष' हा मला संपूर्ण चित्रपटाचा उत्तम अनुभव देणारा, म्हणून खूप महत्त्वाचा वाटतो, तर 'देवराई'ची पटकथा आवडते. त्यावेळी मला स्किझोफ्रेनिया या विषयावर पटकथा लिहिणं फ़ार अवघड वाटलं होतं. फक्त या आजारावरचा चित्रपट मला करायचा नव्हता. त्यापलीकडे जाऊन हा विस्कटलेला मानवी अनुभव काय आहे, याचं सगळ्या वैश्विक रचनेत काय महत्त्व आहे, हे समजवून घ्यायचं होतं. पर्यावरण, मानवी मन आणि हा विस्कटलेला अनुभव, या सगळ्यांचं नातं जे जोडता आलं, ते मला फार समाधान देऊन गेलं.

gho_radhika.jpg

'घो मला असला हवा!' - राधिका आपटे

सुनील : मलाही 'वास्तुपुरुष' हा खूप महत्त्वाचा वाटतो. याचं एक कारण म्हणजे 'दहावी फ' हा आमच्या चित्रपटविषयक जाणिवा अधिक प्रगल्भ करणारा चित्रपट वाटतो आम्हांला. आणि 'वास्तुपुरुष'मध्ये आम्हांला या जाणिवांचा वापर करता आला. आर्थिक समस्या, चित्रपट ठरावीक वेळेत पूर्ण करण्यासाठी NFDCचा दबाव, पावसापाण्यासारख्या अडचणी, या कशालाही न जुमानता आम्ही हा चित्रपट पूर्ण केला. जे हवं तेच पडद्यावर आणण्यासाठी आम्ही अक्षरशः निकरास पेटलो होतो. हा हट्ट धरल्याचं समाधान 'वास्तुपुरुष'ने आम्हांला दिलं.

एकसंध अनुभव म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय म्हणून मला 'नितळ'ही खूप आवडतो. वैचारिक, भावनिक असा कुठलाही अडथळा न येता तो प्रेक्षकांपर्यंत सहजगत्या पोहोचतो. 'घो मला असला हवा' हा चित्रपटही खूप जवळचा वाटतो, आणि तो अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला हवा होता, असं वाटतं. एक musical comedy म्हणून मला या चित्रपटाबद्दल आत्मीयता आहे. त्यातली गाणी, त्यांचं चित्रीकरण, त्यातल्या व्यक्तिरेखा आणि त्यात असलेली गंमत ही खूप वेगळी आहे.

pic3_sbst.jpg
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुपर्ब!!
या जोडगोळीचे पिक्चर्स मला प्रचंड आवडतात!
देवराईची तर किती पारायणं केली.. आता जमेल तसं बाकीचंही पाहीन..

www.bhagyashree.co.cc/

चिन्मय सलाम!

सुमित्राताई आणि सुनिल या दोघांची मुलाखत मागे देवराईच्यावेळी प्रत्यक्ष ऐकायला मिळाली होती. त्याच्वेळी त्यांचा पटकथा, चित्रीकरण आणि कलाकार, सेट याविषयीचा अभ्यास जाणवला होता. तेव्हा त्यांचे ३ सिनेमे पाहिले होते देवराई, दोघी आणि वास्तुपुरुष. पुढे दहावी फ पण पाहिला. त्यांच्याशी प्रत्यक्ष गप्पा मारणे किती आनंददायी असेल याची पूर्णपणे कल्पना आहे. अप्रतीम मुलाखत!

अजुन २ वेळा तरी वाचेनच Happy
~~~~~~~~~~~~~
मराठी रेसिपीज साठी आजच अवश्य भेट द्या: http://vadanikavalgheta.blogspot.com/
~~~~~~~~~~~~~

खूप छान आणी सविस्तर संवाद!!
या दिग्दर्शक द्वयीचा 'वास्तुपुरुष' खूप खूप भिडलेला, प्रचंड आवडलेला.
'१० वी फ', 'दोघी' पण आवडलेले चित्रपट.
चिन्मय, नेहेमीप्रमाणे सुंदर मुलाखत, आभार Happy

सुंदर.
देवराई खूपच आवडला होता. दहावी फ सुद्धा. बाकी 'दोघी', 'बाई', 'नितळ' पहावेसे वाटत आहेत
पुन्हा धन्यवाद.

( ते अमरापूरकर हवं ना? बर्‍याच ठिकाणी 'अमडापूरकर' झालं आहे.).

चिनूक्स सही रे.
मला सुमित्रा भावेंचा दहावी फ खूप खूप आवडतो, त्यांचे दोघी, वास्तुपुरुष, नितळ, देवराई सगळेच आवडले होते पण दहावी फ हा विशेष आवडता आहे.

मस्त रे. 'ओळख' ही मस्त आणि मुलाखत ही.

पुन्हा वाचायलाच पाहिजे.

मस्त मुलाखत. प्रश्न पण अगदी नेमके विचारले आहेत. विशेषतः सुखांत / सकारात्मक शेवटाबद्दल प्रश्न विचारलास याचं कौतुकही वाटलं आणि 'सकारात्मक' शेवटावरचं त्यांचं भाष्यही आवडलं.

देवराई, दहावी फ, वास्तुपुरुष, दोघी - हे पाहिले आहेत चित्रपट आणि आवडले होते.
बाकी मिळवेन आता.
-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism! Happy

लेख फारच छान आहे Happy

यांचे सर्व चित्रपट पाहिलेत.. नितळ आणि वास्तुपुरुष मला प्रचंड आवडले.

नितळ हा एक प्रचंड आवडलेला सिनेमा! मुलाखतीसाठी धन्यवाद.

खुप छान आहे ही मुलाखत... वाचताना आपणच ह्या लोकांशी बोलतो आहोत असा भास होतो. प्रश्णही अगदि नेमके आहेत. आणि अधुन-मधुन येणार्र्या छायाचित्रांनी हे लिखाण संपूर्ण वाटते..! सकस लेखनाबद्दल धन्यवाद!

आशिष दामले
कार्यक्रम प्रबंधक, दक्षिण आणि मध्य एशिया
सेव्ह द चिल्ड्रन, स्वीडन

छान आहे मुलाखत!!

मला वास्तुपुरूष दोघी आणी दहावी फ प्रचंड आवडले होते.
--------------
नंदिनी
--------------

फार सुरेख मुलाखत चिनूक्स ! एक कप च्या, आला की बघायला आवडेलच, पण " आमोद सुनासी आले" वर त्यांनी चित्रपट काढला तर तो ही अगदी लक्षवेधी होईल असे वाटते.
असल्या सगळ्या निवडक, वेधक मुलाखती आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल धन्यवाद ! Happy

सुरेख !
उत्तरार्धात त्या दोघांनी 'चित्रपटातील सामाजिकता, सामाजिक संदेश, प्रत्येक चित्रपटाने काही सांगणे हे अनिवार्य असणे' यासंबंधी फार मार्मिक विवेचन केले आहे.
<< आपल्या चित्रपटांच्या पटकथांचं स्वरूप हे बरेचदा कथा, कादंबर्‍यांसारखं असतं. >> या प्रश्नाबद्दल तुला सलाम.
<<चित्रपट लिहिताना मी तो भोळसटपणे लिहिलेला नाही, आणि प्रेक्षकांनीही तो चित्रपट भोळसटपणे पाहू नय>> बस्स ! आख्खी मुलाखत एकीकडे आणि हे विधान एकीकडे.
<< स्त्रीवादी दृष्टिकोन जर नीट कळला असेल, तर सर्वच स्त्रियांना उदात्त दाखवण्याचा मोह उरत नाही. >> हे तर उशाशी घेऊन झोपावे असे विधान आहे.

त्यांचे सामाजिक लढ्याबद्दलचे विवेचनही पटले. सामान्य माणसाची लढाई छोट्याशाच युद्धभूमीवर होत असते. त्यात समाज, शासन, व्यवस्था/यंत्रणा वगैरे विचार नसतात. अगदी शेवटपर्यंत तिचा आवाका मर्यादित असतो आणि हे दाखवणे अत्यंत अत्यंत प्रभावी आहे. कंडक्टरने त्याच्यावर झालेल्या अन्यायाविषयी समाजात एकच रान उठवणे याने प्रेक्षक भारावून जाईल. असा चित्रपट पाहून प्रेक्षकाच्या मनात निर्माण होणारी अन्यायविरोधी भावना किंवा जे काय आहे ते बहुतांशी धूसर असते. पण कंडक्टरने त्याची लढाई व्यक्तिगत स्तरावर लढणे हे रुतून बसते. हे अस्वस्थ करणारे असते. स्वतःच्या सबलीकरणाची अधिक नेमकी भावना, अधिक मूर्त कल्पना अशा चित्रपटातून येते.
तुला धन्यवाद.

    ***
    प्रश्न पडला, उत्तर मिळाले
    उत्तर मिळता ढळला तोल,
    प्रश्नाच्या अस्तित्वाचे हेच मोल

    अप्रतिम रे चिन्मय!
    तुझ्या प्रश्नांना दोघांनीही खूपच समर्पक उत्तरं दिली आहेत .. खूप बरं वाटलं वाचून!
    उमेश आणि सचिनच्या बोलण्यातून सुमित्रामावशींबद्दलचा त्यांचा आदर इतका जाणवायचा की त्यांच्या कामाबद्दल खूप उत्सुकता वाटायची.. या मुलाखतींतून छान उलगडून दाखवलंयस तेच..
    मस्तच काम केलंयस..

    वरच्या ह्या सगळ्या चांगल्या चित्रपटांची डिवीडी कुठे मिळेल?

    लालू,
    धन्यवाद Happy दुरुस्त केलं आहे.

    मनुस्विनी,

    'बाधा'वगळता सर्व चित्रपटांच्या dvd पुण्यात-मुंबईत तरी सहज मिळतील. 'नितळ'ची dvd moserbaerने नुकतीच बाजारात आणली आहे.

    मायबोलीच्या खरेदी विभागातही मिळतील.

    सुंदर मुलाखत!! मला त्यांचे सगळेच चित्रपट आवड्ले आहेत.. धन्यवाद

    मस्त मुलाखत. माझी आवडती दिग्दर्शक द्वयी आहे. आठवड्यापूर्वीच वास्तुपुरुष पाहिला म्हणून मनात ताजा आहे.

    वास्तुपुरुष मला सर्वाधिक आवडला. दोघी, दहावी फ ठिक वाटलेत. देवराई कळलाच नाही.

    त्यांचे चित्रपट पाहताना मन तल्लीन होते. त्यांची कलाकारांची निवड, चित्रपटातील भाषा, वातावरण निर्मिती, गाणी सर्वच खूप छान असतं.

    सुरेख मुलाखत! दोघेही मोकळेपणाने बोलले आहेत. आत्तापर्यंत केवळ एक दिग्दर्शक द्वयी म्हणून ठाऊक होते, आता त्यांच्यामागचे विचारही कळायला मदत झाली.. सामाजिक जाणीव, सुखांत, प्रवाहपतीत वि. प्रवाहाविरुद्ध, तंत्रशुद्ध शिक्षण असणं अन् नसणंही.. विचार स्पष्ट आहेत. आवडले.

    पटकथा, छायाचित्रण, प्रकाशयोजना.. किती विचार असतो प्रत्येक गोष्टीमागे.. हे असे लेख वाचून यापुढच्या कलाकृतींचा आस्वाद जास्त डोळसपणे घेऊ शकायला मदते होते चिनूक्स. नकळतपणे तू चांगले रसिकही घडवत आहेस Happy मनापासून धन्यवाद.

    अफाट झाली मुलाखत, अन त्याचं बरचसं श्रेय चिन्मयने विचारलेल्या नेमक्या प्रश्नांचं आहे. अशा लोकांच्या मुलाखती घेणं, त्यांना बोलतं करणं सोपं नाहीच. चित्रपटांचा प्रवास, त्यामागची विचारधारा, प्रेक्षकांना दाखविण्याआधी स्वतःशीच पक्क्या करून घेतलेल्या कल्पना, विचारांतली स्पष्टता अन धोरणे.. सुंदर अन ओघवते बोलले आहेत दोघे.

    वास्तुपुरूष अन देवराई हे यांचे अक्षरश: प्रचंड चित्रपट आहेत. त्यांच्याबद्दल, ते चित्रित करतानाच्या घटना-किस्से.. वाचायला खुप छान वाटले.

    वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे आणखी एकदा वाचायला लागणार आहे, हा संवाद.. Happy

    ---
    हस्सरा नाचरा, जरास्सा लाजरा, सुंदर साजिरा, श्रावण आला..!

    फारच अर्थपुर्ण मुलाखत. दहावी फ, वास्तुपुरुष, देवराई ह्यासारख्या नावाजलेल्या चित्रपटांच्या निर्मिती प्रक्रियेबद्दल वाचून छान वाटले. पण चित्रपटांच्या व्यावसायिक बाजूबद्दल ह्या दोघांची मत जाणून घ्यायला आवडतील. त्यांचे अनेक चित्रपट चित्रपटग्रुहात झळकू शकले नाहीत. त्यामुळे सर्व लोकांपर्यंत नीट पोचले नाहीत असं वाटतं. ह्यामागची कारणं समजून घेता आली तर आवडेल.

    लेख फार आवडला. एका निश्चित विचाराने, अभ्यास करून केलेल्या चित्रपटांमागची विचारप्रक्रिया वाचायला मिळणे, हे मराठीत तरी तसं दुर्मीळच. या लेखामुळे तो योग आला, त्याबद्दल मनःपूर्वक आभार.

    चिन्मय, अजून पूर्ण मुलाखत वाचायची आहे. पण चाळता चाळता अडखळलो ! बाई फिल्मच्या वेळी मीच जर १७ वर्षान्चा होतो तर सचिन कुन्डलकर ७ वर्षान्चा असणार! तो कसा आमच्याबरोबर तेव्हा काम करेल? सचिन, उमेश आम्हाला भेटले ते त्यान्च्या १७ व्या वर्षी ! दोघी च्या वेळी ! असो.... हा माझा केवळ मराठी टाईप करण्याच्या उत्साहाचा भाग!!! बाकी नीट वाचून कळवेन. पण, अनेक प्रतिक्रिया वाचायला मजा वाटली.

    सुरेख मुलाखत, चिन्मय. प्रश्न चांगले विचारलेस आणि उत्तरंही त्यांनी व्यवस्थित सविस्तर दिली आहेत.

    मलासुध्दा 'दहावी फ' हा चित्रपट आवडतो. त्या चित्रपटाचं टायटल सॉन्ग पण फार आवडतं मला.
    आता बाकीचे सगळे चित्रपट पहायची फार उत्सुकता आहे.

    मुलाखत आवडली. त्यांचे स्वच्छ विचार आवडले.
    पूनमला दुजोरा- तू खरच रसिक घडवायला मोठ्ठा हातभार लावतोयस.

    वास्तुपुरुष, दोघी, देवराई पाहिलेत. बाकीचे पहायला हवेत.

    वर कोणीतरी विचारलय म्हणून- मुंबईत मी क्रॉसवर्ड मध्येही पाहिल्यात यातल्या ब-याच चित्रपटांच्या सीडी.

    सुरेख मुलाखत,दोनदा वाचली.अलीकडच्या काळात इतकी चांगली मुलाखत,तिही सिनेमाक्षेत्राबद्द्ल वाचायला मिळणे दुरापास्त झाले आहे.मनापासून धन्यवाद!
    सिनेमा हा एक गंभीर,अवघड आणि अनेक पैलू असलेला कलाप्रकार आहे,हे अशा संवादातूनच कळते.
    दोघेही भरभरुन बोलले आहेत आणि हे श्रेय नक्कीच तुमचे.कारण बर्‍याचवेळा असे मनस्वी कलाकार आपल्या कलानिर्मितीबद्दल बोलायला उत्सुक नसतात आणि अने़कांना असं मुद्देसूद सांगता येतही नाही,त्यामुळे तुमचे अभिनंदन.
    डेव्हीड धवनच्या चित्रपटांना सामाजिकता आहे का? तर, खूप मोठी सामाजिकता आहे. >> हॅट्स ऑफ टू धिस थॉट.कारण हे अगदी खरे आहे.केवळ सवंग,बाजारु म्हणुन मेजॉरिटी हिंदी सिनेमाला हिणवण्यात काहीच मोठेपणा नाही.असल्या एलिटीस्ट,आर्ट फिल्मी विचारपेक्षा ह्या दोघांची मते अगदी फ्रेश आणि नवी वाटली.
    वास्तुपुरुष,दोघी,देवराई,नितळ आता पुन्हा बघणार,ह्या मुलाखतीच्या संदर्भाने,त्या प्रकाशात!

    उत्तम
    हे सर्व चित्रपट मी पाहिले आहेत
    सर्व सीडीज मिळतात आणि माझ्यामते ह्या जतन करण्यासाठी सर्वोत्तम आहेत

    सुमित्राताई आणि सुनीलसर शतशः धन्यवाद
    आपणास भेटण्याची खूप जबरदस्त इच्छा आहे

    सागर घळसासी

    Pages