विषय क्र, २ - जनाकाका

Submitted by आशूडी on 29 June, 2014 - 09:15

लहानपणी आम्ही आमच्या कसबा पेठेतल्या वाड्यात राहयचो. घर आणि शेजारी यांच्यातला फरक आम्हाला कधी जाणवला नाही असा आमचा वाडा. आजूबाजूलाही तेव्हा बरेच वाडे होते. या सगळ्या वाड्यांना एक विचित्र शाप होता. प्रत्येक वाड्यात एकतरी अर्धवट डोक्याची म्हणजे वेडसर व्यक्ती होती. म्हणजे त्या व्यक्तीच्या कुटुंबातल्या सर्व आयुष्यांना मिळून जोडलेलं आणखी एक सामायिक आयुष्य. अस्तित्व? नव्हे. तो माणूस काय करतो , काय खातो याकडे अभावानेच लक्ष दिलं जायचं पण तो काय करत नाही याचा पाढा मात्र सर्वांना तोंडपाठ असायचा.

तो पाणी भरत नाही.
तो पूजा करत नाही.
तो फुलं आणून देत नाही.
तो स्वच्छ राहत नाही.
तो बाहेर गेला की कधी वेळेवर परत येत नाही.
त्याला पैशाचे व्यवहार कळत नाहीत.
त्याला कमावता येत नाही.

म्हणजे खरंतर तो काही कामाचा नाही. (पण त्याला दोन वेळेला जेवायचं कसं समजतं?) म्हणजे तो वेडाही नाही आणि शहाणाही नाही. तो अर्धवट आहे. जनाकाका. शेजारच्या वाड्यात बाळू, समोरच्या वाड्यात जयू, पलीकडे वाकड्या पायाची वंदना. आमच्या वाड्यात जनाकाका.

**
आमच्या वाड्यातला जनाकाका काही आम्हा मुलांचा लाडका बिडका नव्हता. तो कधी खाऊबिऊ पण देत नसे. पण घरी कुणालाच आमच्याबरोबर खेळायला, बोलायला वेळ नसेल की आम्ही त्याच्याकडे जायचो. .मग तो विचारायचा, "आज काय भाजी केली तुमच्याकडे?" भेंडी किंवा बटाटा सांगितल्यावर त्याला पुढे काहीतरी बोलायचं असायचं पण जाणूनबुजून तोंड घट्ट मिटल्यासारखे करायचा. त्यावर काय बोलायचे हे आम्हाला कधीच कळायचे नाही. पण त्यांच्याकडे पातळ पिठलं केलं की तो खुशीत येऊन डोळा मारुन, गुपचूप म्हणायचा, "आमच्याकडे बरनॉल!" आणि जीभ काढून हसायचा. आम्ही ईईई करुन हसत सुटायचो. कायम चौकड्यांचे आणि मळखाऊ शर्ट आणि कितीही धुतला तरी मळलेलाच दिसणारा पांढरा लेंगा. त्याचे बनियनसुद्धा नेहमी चॉकलेटी आणि गडद निळ्या रंगाचे! हे सारे वर्षाला दोन जोड. तीस पस्तिसच्या घरातला तो दिसायला तसा सावळाच होता. केस कधीच तेल लावलेले नसत. दाढी महिन्यामहिन्याने करत असल्याने जमिनीवर कशाही उगवलेल्या तणासारखी लहानमोठी असायची.त्याचे डोळे मात्र सागरगोट्यांसारखे गोल गोल आणि गंमती सांगणारे होते. काहीतरी खास सांगताना त्याच्या भुवया वर जात आणि ते छोटे डोळे किंचित मोठे होत. हट्टी मुलासारख्या डोक्यावर बसलेल्या भुवया कितीतरी वेळ खाली उतरायचे नावच घेत नसत. जनाकाका हा शांताबाईंचा तीन नंबरचा मुलगा. मोठी मुलगी, मुलगा आणि जनाकाका नंतर आणखी एक मुलगा. बाकीची सर्व मुलं हुशार, कष्टाळू निघाली. याच्या बाबतीत मात्र लहानपणापासूनच गणितं चुकत गेली.

**
जनाकाकाकडे गेल्यावर आम्ही मुद्दाम त्याच्या लहानपणीचं काय काय विचारायचो. तेव्हा त्यानंच सांगितलं होतं एकदा - पायावरचा लेंगा गुडघ्यापर्यंत वर खेचला तेव्हा पोटरीवर वीतभर लांबीची खूण होती. टाके पडल्याची. लहानपणी खेळता खे़ळता पत्रा घुसला होता. धनुर्वाताची इंजेक्शनंही घेतली पण ताप डोक्यात गेला. आणि मग "आमचं हे असं झालं!" म्हणायचा. तो नेहमी स्वतःबद्दल काही सांगताना आमचं, आपलं असंच बोलायचा. घरातल्या पूजा, पाणी असल्या छोट्या कामांबाबत घरातले बोंब मारत असताना हा अंगणापलीकडच्या बोळात हसत हसत भुवया वर करुन, नाकाला काही लागलंय ते पुसतोय अशा पद्धतीने हाताने आपलंच नाक ओढत सांगायचा, "आपलं आसंय, मनात आलं तर करणार नाहीतर नाही". तेव्हा त्याला सगळं कळतंय आणि तो कळत नसल्याचं नाटक करतोय असा संशयही यायचा.

पण त्याच्या अर्धवटपणाचे किस्से म्हणजे चंची सोडलेल्या गप्पांमध्ये भरले जाणारे रंग होते. एकदा म्हणे हा फुलं आणायला जो गेला तो तीन दिवस आलाच नाही! शांताबाईंच्या डोळ्याला पाण्याची धार. अर्धवट 'लेकरु' कुठे हरवलं तर कुणाला हौस आहे शोधत बसायची? त्यांनी अन्नपाणी सोडलं. सतिशकाकाने जंग जंग पछाडलं आणि शेवटी पोलीसात तक्रार केली. तेव्हा कळालं की रस्त्यावरुन कसलातरी मोर्चा चालला होता त्यात लाठीमार झाली आणि पोलीसांनी केलेल्या धरपकडीत हा ही तुरुंगात गेला! काहीही केलेलं नसताना हा माणूस तीन दिवस कोठडीत राहून आला. माझे घर अमुक ठिकाणी आहे, मी या कशातही सामील नव्हतो एवढं पोलीसांना सांगायचं त्याला सुचलंच नाही! या सगळ्या धांदलीत फुलाचा पुडा कुठे पडला काय माहित असं वहिनींना - सुलेखाकाकूला सांगितलं तेव्हा डोक्यावर हात मारण्याशिवाय दुसरं काय करणार?

आणखी एकदा, घरातल्यांच्या कामं करण्याच्या बडबडीला वैतागून हा बाहेर पडला. निघताना घरच्यांना त्रास द्यायचा म्हणून सतिशकाकाचं मनगटी घड्याळ घालून गेला. भूक लागली म्हणून कोपर्‍यावर वडा सांबार खाल्ले आणि बिलाचे पैसे नाहीत म्हणून चक्क घड्याळ ठेवून निघून गेला! तो हॉटेलवाला सतिशकाकाच्या ओळखीचा होता म्हणून त्याने पोर्‍यामार्फत ते घड्याळ घरी पाठवले. संध्याकाळी त्याला अद्द्ल घडवायची म्हणून सतिशकाकाने खडसावून घड्याळाबद्दल विचाराले तर रडत रडत सारे काही सांगून टाकले. त्याच्या बेरकी हुशारीचे कौतुक करावे का त्याच्या बालिशपणाची कीव करावी हे खरंच कधीच समजले नाही!

घरामध्ये सण, कार्यक्रम असला, पाहुणे येणार असले की सगळे हात धुवून जनाकाकाच्या मागे लागत. हे आण ते आण. सुट्टे पैसे नीट मोजून घे. ही शंभरची नोट तेल घेताना मोड. आधी सामान घरी आणून ठेव आणि मग कुठे जायचं तिकडे जा. सूचनांचा भडिमार केल्यावर तो नेमकं काहीतरी विसरायचा. की पुन्हा धाड्धाडधाड!! तो वैतागून वाड्याबाहेरच्या ओट्यावर येऊन बसायचा. मग वाड्यातल्या कुणीतरी त्याला ट्ण्ट्ण आवाज करत आलेली कुल्फी द्यायचा किंवा चहाला बोलवायचा. घरचे तरी काय करणार? प्रत्येकानं थोडी थोडी कामं केलीच पाहिजेत. त्यातून हा तरुण असून न कमावणारा! चूक कुणीच नव्हतं. फक्त खायला काळ आणि धरणीला भार म्हणण्याइतकी वाईट परिस्थिती नव्हती. त्याच्या पोटात दोन घास गेल्याशिवाय शांताबाईच काय, काका काकूही जेवत नसत.

घरच्या मोठ्या माणसांवर तो कितीही चिडला तरी घरातल्या, वाड्यातल्या मुलांवर त्याचं खूप प्रेम होतं. पण ते प्रेम कधी सामान्य रुपानं व्यक्त व्हायचं नाही. ते समजून, ओळखावं लागायचं. वैतागून बडबड करत का होईना आढ्याला दोरखंड बांधून तो आमच्यासाठी झोके बनवायचा. ते काचू नयेत म्हणून बसायला गुबगुबीत गाद्या करायचा. दिवाळीत बांबू फुगवून चांदणी करायला आणि किल्ले करायला त्यानंच तर आम्हाला शिकवलं. त्याने स्वतःच्या पायावर उभं राहावं म्हणून काका काकूंनी खूप प्रयत्न केले. इतर वाड्यातली वेडसर अर्धवट मुलं जे जे करत म्हणजे घरोघरी जाऊन उदबत्त्या विकणं, प्रिंटींग प्रेसमध्ये खळ बनवणं असल्या अनेक उद्योगांना त्याला लावलं. कामायनीत पाठवायचं का? असं काकूनंही हळूच सुचवून पाहिलं. पण प्रत्येक वेळेला शांताबाईंची माया आडवी आली. खळ बनवताना त्याच्या बोटांची सालं निघतात, सिमेंटच्या कारखान्यात गेला तर नाकातोंडात सिमेंट जातं, पुस्तकांच्या दुकानात सारखं लांब लांब डिलीव्हरीला पिटाळतात आणि फार ओझं उचलायला लावतात, दवाखान्यात नको बाई!! उदबत्या घेऊन विकायला हरकत नाही पण त्याला हिशेब कुठे येतोय? सगळं नुकसान करुन बसेल. करता करता त्याला झेपणारं एकही कार्यक्षेत्र त्या माऊलीनं शिल्लक ठेवलं नाही. तीची अनावश्यक काळजी, वेडी ममता त्याला खरोखरी 'बिनकामाचा' बनवत होती. एक आयुष्य हळूहळू शेवाळं धरत होतं. शांताबाईंच्या वात्सल्याच्या अटींपुढे काका काकूंनी हात टेकले. रागाच्या भरात शापासारखे उद्गारलेले शब्द खरे ठरले! "तू आई असून त्याच्या आयुष्याचं वाटोळं करणार आहेस!"

इनमिन तीन खोल्यात जनाकाकाची झोपायची जागा शिडी चढून असलेल्या माळ्याच्या खोलीत होती. म्हणायचं माळा पण खोली एकदम आमच्या मुलांची आवडती होती. दोन अखंड दरवाजे मधोमध अर्धे कापून तयार झालेल्या वर आणि खाली अशा दोन,अशा दोन म्हणजे चार खिडक्या. वरच्या खिडक्या मोकळ्या म्हणून कायम बंद आणि खालच्या खिडक्यांना गज लावलेले म्हणून कायम उघड्या. "हे असं उलटं का रे जनाकाका?" विचारलं की उत्तर ठरलेलं, " आपलं हे आसंच्चे! " खोली नेहमी स्वच्छ असायची. एका बाजूला मोठ्यामोठ्या ट्रंका, बॅगा रचलेल्या. एका बाजूला गाद्यांच्या वळकट्या आणि अंथरुणं. तिथंच खाली चांदोबा, चंपक आणि जी मासिकांचे गठ्ठे. धाकट्या काकाला जी भारी आवडायचं. त्यात नटनट्यांचे फोटो असायचे. पुढे नवी काकू आली तेव्हा गृहशोभिकाही यायला लागलं. पण जनाकाका चांदोबाच वाचायचा. एकदा उचकापाचक करताना आम्हाला त्याच्या खोलीत 'घबाड' सापडलं! रेखा आणि अमिताभचे क्लासिक फोटो?!! आम्हाला एकदम गुदगुल्याच झाल्या. "ए, काका, हे तुझंय??" खिडकीतून आत वळत त्याने आमच्या हातातला माल पाहिला आणि झडपच घातली त्यावर. "एऽ, आणा ते इकडं" मग जरा लाडीगोडी लावल्यावर त्याची गाडीच सुटली. "मऽऽग , आपल्याला आवडते रेखा. अमिताभची फायटिंग पण. " मग त्याने आम्हाला शोले, दीवार, जंजीरच्या स्टोर्‍या सांगायचा सिलसिलाच सुरु केला. त्याला गब्बरचा "कितने आदमी थे?" सीन फार आवडायचा. पत्ते खेळायला कोण कोण येणार हे विचारायला, कितने आदमी है? च सुरु झालं मग आमचं. आम्ही मोठे झालो होतो की जनाकाका?

पुढे हळूहळू अभ्यास वाढत गेला आणि जनाकाकासाठी वेळच मिळेनासा झाला. येताजाता दिसला की हसल्यासारखं करुन पटकन पुढे जायचो. मग तो जास्त जास्त वेळ घराबाहेरच दिसायचा. कधी शनिवारवाड्यावर, कधी गणपतीच्या देवळात, कधी मंडईत. आश्चर्य म्हणजे, तो कुठेही दिसला तरी "इकडे कुठे? " विचारावंसं वाटायचं नाही. एकदा तो चालता चालता सैन्य इंजिनियरींग कॉलेजपाशीही गेल्याचं ऐकलं होतं. खिशात एक पैसा नसताना रस्तोरस्ती फिरणं अवघड होतं. पण काका काकू मुद्दाम त्याला जास्त पैसे देत नसत. हा अर्धवट आहे हे जगाला माहित होतं. गोड बोलून कुणी नसत्या नादाला लावलं असतं तर भलतीच आफत ओढवली असती. आहे हे बरंय म्हणत शेवटपर्यंत त्याला निर्व्यसनी ठेवण्याचा कटाक्ष होता. शांताबाईही थकल्या होत्या. कारभार सारा सुनांच्या हातात दिला होता. पण सुना आपल्या या वेड्या बाळाला नीट जेवू खाऊ घालत नाहीत अशीच तक्रार सदैव आल्यागेल्याच्या कानावर घालत. त्यापेक्षा त्याचं लग्न लावून दिलं असतं तर मी तरी मरायला मोकळी झाले असते, या त्यांच्या निष्कर्षावर दंडवतच घालायचं बाकी होतं. एकाला सांभाळताना मारामार तर दुसरं कोण गळ्यात घेणार? आणि दिली कुणी असती याला मुलगी? खरंतर या महागाईच्या काळात अशा एका "एक्स्ट्रॉ" माणसाला सांभाळणं किती मुष्किल आहे हे सर्वांना ठाऊक होतं. मोठ्या भावाची आणि भावजयीची त्याच्यावर खरंच माया होती. निदान त्याला कुणी ऊठ म्हणणार नाही आणि दोन वेळच्या घासाची भ्रांत पडणार नाही अशी त्याची सोय लावली होती. त्याच्या नावावर एक छोटी खोलीही घेतली होती. पण दैवाचे फासे नेहमी उलटेच पडतात. शांताबाई गेल्या, सतिशकाकाही अचानक गेला. या धक्क्यातून सावरण्यासाठी सुलेखाकाकू मुलाकडे परदेशी निघून गेल्या. काही आर्थिक अडचणीत धाकट्या भावाने जनाकाकाची खोली विकून टाकली. खरंतर त्याला एकदा भेटायला जायचं आहे. पण गेल्यावर त्याच्याशी काय बोलणार? मधले कितीतरी संदर्भ गळून गेलेत, तपशील हरवलेत. सगळी जुनी लोकं नाहीशी झालीत. जागा बदलल्यात. ओळखीच्या खुणा संपुष्टात आल्यात. भीतीच वाटते - गेल्या गेल्या कानावर "जनाचा पाढा" ऐकू येईल,

तो पाणी भरत नाही.
तो पूजा करत नाही.
तो फुलं आणून देत नाही.
तो स्वच्छ राहत नाही.
मग तो लेंगा वर सरकवून पायावर दिसणारी पण आयुष्यावरच पडलेली जखम दाखवेल. अर्धवटपणाचा इतिहास. त्याला भविष्य कधी नव्हतंच. अजून त्याच्याकडे कुठेतरी अमिताभ रेखाचे ते फोटो दडवलेले असतील आणि पोटात खड्डा पडेल असं "कितने आदमी थे?" विचारेल. भीती वाटली तरी त्यावर तोच हसून म्हणेल, "आसंय आपलं!" साठीच्या घरात असेल आता जनाकाका. आता त्याला "ऊठ" काय कुणी "बस" ही म्हणत नाही अशी अवस्था झाली आहे असं ऐकलंय.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशा व्यक्तिवर लिहिण खरं तर किती अवघड आहे, पण सुंदर लिहिलय. >> +७८६

उतारवयात अश्यांचे आयुष्य आणखी खडतर होत जाते..

आशू,!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
काय बोलू ग?
माझ्यापुर्ती तरी हीच एंट्री विजेती आहे...

लिहित रहा!
स्पर्धेसाठी शुभेच्छा!

छान लिहिले आहे .

अशीच एक आत्या डोळ्यासमोर आली . लग्न होऊनही माहेरी रहायची . तेंव्हा फारस कळायचं नाही . तिची आई होती तोपर्यंत बर चालू होत . पुढे घर बदलल . आताच माहिती नाही . Sad

प्रतिक्रियांबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.
खरं आहे, अशा माणसांबद्दल लिहीण फार सोपं आहे, त्यांच्यासोबत जगण्यापेक्शा. आणि त्यांचं स्वत:चं जगणं? फारच भिन्न, या पैशाच्या दुनियेपार.

आशूडी.....

"जनाकाका" लेखाला मिळालेल्या पारितोषिकाबाबत तुमचे मनःपूर्वक अभिनंदन. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एखादी, थेट नात्याची असो वा नसो, व्यक्ती डोकावत असतेच....

लेखातील "...किस्से म्हणजे चंची सोडलेल्या गप्पांमध्ये भरले जाणारे रंग होते..." ही उपमा मला त्यावेळी वाचताना फार भावली होती....बेळगाव धारवाड हुबळी या परिसरात असलेल्या मराठी कुटुंबांतील जनाकाका आणि त्यांचे समवयस्क मित्र सायंकाळी तलावाकाठी जमले की मग अशा चंच्या सोडत असत....त्यावेळी बाजूला बसून त्यांचे ते हेलाचे मराठी ऐकणे म्हणजे त्रयस्थाची चैनच असायची.

आपली लेखणी अशीच बहरत राहो ही सदिच्छा.

Pages