कन्फेशन अर्थात मला काही कबूल करायचे आहे

Submitted by हर्पेन on 27 September, 2014 - 01:34

नमस्कार!

अनेकदा आपल्या हातून काही छोट्यामोठ्या चुका होतात, काही चुकुन घडतात, काही आपण मुद्दाम / जाणतेपणी करतो. कळतंय पण वळत नाही असेही त्याचे स्वरूप असू शकते. अशा चुका, भले मग त्या किरकोळ असल्या, तरी त्या घडून गेल्यावर आपले मन आपल्याला खात रहाते. काही वेळा अशा गोष्टी आपण चटकन विसरतो तर काही वेळा त्यांना आपल्या मनात दीर्घ काळ ठेवून घेतो. अशा अपराधी भावनेचा निचरा चटकन व्हावा म्हणून हा धागा...इथे सांगा आणि मोकळे व्हा!

मला अर्थातच कल्पना आहे की 'छोट्या', 'मोठ्या', 'किरकोळ' 'चूक' हे खूप(च) सापेक्ष आहे त्यामुळे ज्याच्या त्याच्या जडणघडणीनुसार, पिंडानुसार, संस्कारांनुसार, पार्श्वभुमीनुसार विविधप्रकारच्या पोस्ट आणि त्यावरचे प्रतिसादही संभवतात / येऊ शकतात. त्यामुळे केवळ आपल्याला मन मोकळे करायला काही माध्यम हवे असल्यास व अनेकदा असे मन मोकळे करायसाठी हक्काचे माणूस जवळ आणि लगेच उपलब्ध नसते अशा वेळी या व्यासपीठाचा मुक्त वापर कबुलीजबाबाकरता करू शकता. (मुद्दामच वाहते पान ठेवले आहे जेणेकरून इथेही ह्या नकारात्मक भाव-भावना जास्त वेळ जागा अडवणार नाहीत) अनेकदा अशा भावना इथल्या गप्पांच्या पानांवर आपण करतही असाल पण कधी आपल्या चिड्चिडीची लागण आपल्या मित्रमंडळींना होवू नये / प्रस्थापित गप्पांमधे असे करणे आपल्याला प्रशस्त वाटत नसेल / आपण नवीन असल्याने आपल्याला त्या गप्पांमधे सामील करून / समजावून घेतले जाईल की नाही अशी शंका येत असेल तर ह्या पानाचा नक्की वापर करू शकता.

अर्थात, आपण खूप भाग्यवान असल्याने (तुकारामांसारखी प्रार्थना न करताच), अनेकानेक शेजारी इथे 'निंदक' म्हणून मिळू शकतात याची जाणीव ठेवावी Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे कन्फेअषन
:मला माफ कर टिया [ माझे पिल्लु :: ४]
तु नको म्हणताना मी ओफीस ला जते तुला सोडुन ,एक्दम ८ तासानंतर येते
मला तुझ्या शी खुप खेलायचे असते ग
आता अजुन ५ महिने मग मी तुझ्याच सोबत असेन
तो पर्यंत माफ करशील ना ग मला

प्रिती आई

पाच सप्टेंबरला माझे वडील गेले. त्याच्या दोन दिवस आधी ते म्हणाले होते मला भेटून जा. पण ते नेहमीच असे म्हणायचे, त्यामुळे मी म्हणालो, पुढच्या आठवड्यात येईन. ते म्हणाले, तोपर्यंत मी जगलो नाही तर...

आणि तसेच झाले. सॉरी दादा... मी तुमचं ऐकायला हवं होतं. पण माणसांपेक्षा आपल्याला नेहमीच काम महत्त्वाचं वाटतं. आता तुमची, तुमच्या फोनची उणीव भासतेय.. वाट पाहतो, पण फोन येतच नाही.

...

धन्यवाद दक्षिणा, देवकी, पीयू..
वाघ म्हातारा झाला तरी तो वाघच असतो. तसा बापही म्हातारा झाला तरी त्याचा घरात आ‌दर आणि दरारा कायम असतो. अर्थात् हे आपल्या या पिढीला कितपत लागू होईल माहिती नाही. पण, आमचे दादा अगदी असेच मनाजोगते बापासारखेच जगले. आयुष्यभरात कुठलीही टूथपेस्ट न वापरताही वयाच्या अठ्ठ्याहत्तराव्या वर्षीही सर्वच्या सर्व दात मजबूत होते, इतकंच काय आदल्या दिवशी त्यांनी ऊस खाल्ला. चहाचे जबरदस्त व्यसन असूनही आयुष्यात ना त्यांना डायबिटिज झाला ना ब्लड प्रेशर वाढले ना कुठले ऑपरेशन झाले. जायच्या दिवशीही स्वतःच्या हाताने जेवण केलं आणि सर्वांना त्याच फर्ड्या आवाजात सूचना दिल्या. त्यानंतर नेहमीच्या गोळ्या घेतल्या आणि अर्धांगवायूचा झटका आला. दोन तासातच सगळे आटोपले.
ते म्हणालेच होते, मी कधीच अंथरूणात पडणार नाही, कुणाला त्रास देणार नाही. तसेच झाले. ते मनासारखे जगले, आणि मनाप्रमाणेच गेले. मी ऑफिसच्या कामात असताना त्यांचा दिवसातून दोन-तीन वेळा फोन यायचा, जेवला का, तब्येत बरी आहे का, अमूक, तमूक. मला वाटायचे, हे काय किरकोळ गोष्टींसाठी रोज रोज फोन करत बसतात. पण या फोनची इतकी सवय झाली होती, की आता अगदी चुकल्याचुकल्यासारखं होतंय...

टोच्या... आयूष्य असं असावं आणि मरणही असंच असावं.. कुणावरही ओझे न होता जगता आणि मरताही यावे.>> खरंय दिनेशदा. असं आयुष्य फार थोड्यांच्या वाट्याला येतं.

टोच्या, माझेही वडील असेच गेले.. ना कुणाचा पैसा घेतला ना कुणाची सेवा. गेल्यावर एका पैचे कर्ज नव्हते. इतकेच नव्हे तर क्रियाकर्मासाठी लागणारे पैसेही त्यांच्या खिश्यातच होते.
त्यांच्या बाराव्याला न बोलावता शेकडो माणसे जेवायला आली होती. प्रसाद म्हणून सर्वजण जेवून गेले.

प्रीतीभूषण, स्नेहमील सद्भावनांबद्दल धन्यवाद.

माझेही वडील असेच गेले.. ना कुणाचा पैसा घेतला ना कुणाची सेवा. गेल्यावर एका पैचे कर्ज नव्हते. इतकेच नव्हे तर क्रियाकर्मासाठी लागणारे पैसेही त्यांच्या खिश्यातच होते.>>
दिनेशदा, तुमच्या वडिलांच्या बाण्याला हॅट्स ऑफ...

टोच्या यांच्या वेदनेला जी धार आहे ती त्यांचे वडिलांप्रती असलेली प्रेमाची आदराची भावना दाखविते....असे फ़ार कमी लोक असतात समाजात जे मनासारखे जगले, आणि मनाप्रमाणेच गेले....

मी आजवरच्या आयुष्यात अशी कित्येक उदाहरणे पाहिली आहेत की उतारवयातील त्यांचे जगणे म्हणजे एक प्रकारचे मरणच होय...पण ते येत नाही.....तीन तीन मुले आहेत, नोकरदार आहेत, कमावती आहेत....तरीही बाप घरातील कटकटीमुळे मरण मागत आहे....मिळत नाही. तेव्हा तुमच्या वडिलांना अगदी फ़ार नशीबवान माणूस असेच मी मानेन की ज्यांच्या मृत्युमुळे तुम्हाला इथे लिहावे आणि मन हलके करावेसे वाटले. हीच आयुष्यातील सर्वात महत्वाची कमाई.

दिनेश....

"...इतकेच नव्हे तर क्रियाकर्मासाठी लागणारे पैसेही त्यांच्या खिश्यातच होते..."

~ हे फ़ार मोलाचे वर्तन होय.....अगदी संतासारखेच त्यांचे चारित्र्य म्हणावे लागेल. शांतचित्ताने, पूर्ण समाधानाने जगाचा निरोप घेणे यासारखे दुसरी पुण्याईची बाब नसेल.

अशोक, अगदी मनातलं. मरण्याची वाट बघत जगण्यासारखे काही अवघड नाही या जगात.

जीवनाचा प्रत्येक दिवस आनंदात घालवावा. दुसर्‍याला आनंद देता आला नाही तर निदान दू:ख तरी देऊ नये. जमल्यास ते कमी करावे.. असे अक्षरशः जगले ते.

या बीबीचा तो विषय नाही.. पण मालवणहून मॅट्रीकची परीक्षा द्यायला ते मुंबईला आले ते परत मालवणला गेलेच नाहीत. स्वतःच्या हुषारीवर व्होल्टास ( त्या काळातली व्होल्कर्ट ब्रदर्स ) मधे जॉब मिळवला. तब्बल ३८ वर्षे तो केला. त्या पूर्ण कालावधीत केवळ १० दिवस सिक लीव्ह घेतली.. ती पण एका छोट्या ऑपरेशनसाठी.
निवुत्त झाल्यावर १६ वर्षे माझ्या बहीणीच्या व्यवसायात सल्लागार म्हणून काम केले.. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत.

बहीण, भावंडे, पुतणे, भाचे सर्वांना मदत केली. मालवणला एक घर चुलत्यासाठी बांधले. अनेक माणसे जोड्ली.
दूरावलेले नातेवाईक शोधून काढले. त्यांच्याशी संबंध जोपासले.

अगदी कृतार्थ जीवन जगले ते.

आणि हो त्यांच्या बाबतीत मी एक आगळीक केली.. मला खंत नाही त्याबद्दल.

त्यांना सिगारेट लागत असे. दिवसाकाठी ५/६ होत असाव्यात. मी आर्टिकलशिप करताना माझे काही सुटे पैसे टेबलावर होते. ते त्यांनी सिगारेटसाठी उचलले. मला लहानपणापासून सिगारेटचा तिटकारा आहे. आमच्याघरात कुणीही असे इतरांचे पैसे वगैरे उचलत नाही. माझ्या हे लक्षात आल्यावर मी चिडलो.. " माझ्या पैश्यांनी सिगारेट ओढायची नाही.. " अगदी या शब्दात सांगितले. ते मला सॉरी म्हणाले.

पण त्यानंतर शेवटपर्यंत कधीही माझ्यासमोर सिगारेट ओढली नाही. ( माझ्या अपरोक्ष ओढत असत. ) पैसे तर कधीच मागितले नाहीत. पण माझा रागही केला नाही. माझ्या मताला एवढा मान देणारा कुणी भेटलाच नाही नंतर मला.

व्वा दिनेश....

अशा आठवणीने उलटपक्षी गेलेल्यांचे आयुष्य सर्वार्थान समृद्ध होते हेच समजते. मुलाला सिगारेटबद्दल तिटकारा आहे हे ओळखल्यावर एका अर्थी त्याना निश्चित्त समाधान लाभले असेल असा मला विश्वास आहे....एकप्रकारे तुमचा सन्मानच केला आहे.

या आठवणीने मला "मेहरबान" चित्रपटाची आठवण झाली. अशोककुमार मोठा यशस्वी बिझिनेसमन....लाखोंची कमाई, घरी डझनावरी माणसे आरामात खातपित जगत असतात....पण एक वेळ उतराईला लागते गाडी....आणि सारे काही शून्यावर येते....घर तर भरलेले माणसांनी....पैसा मिळत होता तो पर्यंत सासर्‍याला डोक्यावर घेऊन नाचणार्‍या सुना आहेत...पण आता त्याची अडचण या बायकांना वाटू लागली आहे. खिशात एक रुपया नाही...पण भरभराटीच्या काळातील अशोककुमारला सिगारेटची सवय लागली आहे....तीदेखील उच्चदर्जाच्या....(पूर्वी गोल डब्यात पन्नास सिगारेट्स मिळत....थेट कंपनीकडून)....त्याचा जुना नोकर कसेबसे पैसे गोळा करून आता हताश झालेल्या कंगाल मालकाला डबा आणून देतो....अशोककुमार अगदी हावरटपणे त्यातील एक सिगारेट काढतो, पेटवितो आणि समाधानाने आपल्या मोडक्या खोलीत झुरके घेऊ लागते.....तिथे एक सून येते....ते दृश्य पाहते....संतापते पण थेट सासर्‍याला न बोलता...स्वयंपाकघरात नवर्‍यावर व पोरांवर खेकसते...."तेलाला घरात पैसे नाहीत असे म्हणता आणि महागड्या सिग्रेटी फुंकायला पैसे निघतात खिशातून...." नवरा हतबल, काही बोलत नाही. पण अशोककुमारच्या कानी हा ओरडा जातो....उठतो त्या कॉटवरून कसाबसा...तडफडत बाहेर येतो, रस्त्यावरील उकीरड्याकडे जातो आणि तो सिग्रेटचा आख्खा डबा कोंडाळ्यात फेकून देतो....मागे वळतो, तेव्हा लक्षात येते की बोटात जळती सिगारेट आहे...तीही टाकायला जातो, पण पुन्हा न राहवून फेकण्याअगोदर हावरेपणे त्याचे दोन तीन झुरके घेतो पटापटा.

ह्या दृश्याने अशोककुमारने प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणले होते....तेव्हाही वाटले होते दिनेश की....जोपर्यंत शान आहे तोपर्यंतच निघून जावे माणसाने. शरमेने जगण्यात काय अर्थ ?

अशोक,
हीच आयुष्यातील सर्वात महत्वाची कमाई.>> अगदी खरं. सगळे हेच म्हणतात.
विशेष म्हणजे वडील ज्या दिवशी गेले त्या दिवशी एकादशी होती आणि दशक्रिया विधीही पितृपक्षात झाला. दशक्रिया विधी करणारा पुरोहित म्हणाला की या काळात स्वर्गाची दारे उघडी असतात. अगदी पिंड ठेवण्याआधीच कावळे हजर होते. क्षणाचाही विलंब न लागता पिंडावर अक्षरशः तुटून पडले. यातील श्रध्दा, अंधश्रध्दा हा भाग वेगळा. पण हे घडले हे खरे. असे खूप क्वचित घडते.

अशोक, प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभा राहिला..
खरं तर मनातली खंत बोलून दाखवली. ज्याचा अपराध केलाय त्याची थेट क्षमा मागितली... तर खुप हलकं वाटतं.
आपण अशी कितीतरी ओझी वहात असतो. एक्सेस बॅगेज.. !
००००
मला खात्री आहे, आपल्या प्रिती विराज नक्कीच त्यांच्या माहेरी दसर्‍याला गेल्या असतील.

हा सुरेख धागा आहे. -
माझ्या नणदेच्या खूप सुस्वभावी, गोड, कॉलेजवयीन मैत्रिणीला तिची जात विचारण्याचा मूर्खपणा आणि अविचार केलेला. तिचा चेहरा पडला होता. प्रमिता तिचे नाव. मी ते विसरु शकत नाही. मला ही सल आयुष्यभर बोचणार. नंतर प्रमिता शब्दाचा अर्थ वगैरे शोधून, मी बुद्ध धर्मातील 'परिमिता' या संकल्पनेबद्दल खूप वाचले.
मला माफ कर असे सांगण्याकरता तिचे कॉन्टॅक्ट डिटेल्सही नाहीत.
आय वॉज राँग.

मी एका व्यक्तीला कधीच अ‍ॅप्रिशिएट केलं नाही.
सुस्वभावी, रूप, मदत करण्याची वृत्ती, बुद्धीमत्ता, व्यासंग, विनोदबुद्धी याबद्दल कधीही मी त्या व्यक्तीचं कौतुक केलं नाही हा सल मनात राहील.

उद्या जर त्या व्यक्तीला पोलिसांनी पकडून नेऊन त्यांच्या पद्धतीने त्यांच्या आवडत्या गुणांसाठी अ‍ॅप्रिशिएट केलं तर मला कधीच संधी मिळणार नाही.
त्यामुळे आता या क्षणी मी ही चूक सुधारत आहे. ती व्यक्ती भेटण्याचे ठिकाण जवळच आहे.

घरातला आरसा.

घरातला आरसा Lol

मला वाटलं..म्हणाल- माझी सुविद्य पत्नी!