कबूतराचे अंडे आणि ऋन्मेऽऽषचे फंडे

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2014 - 03:52

परवाच्या दिवशी सकाळी सकाळी शेजारच्या जोशी वैनी चा पौडर मागायला आल्या होत्या. जोशी काका अगोदरच आमच्या घरातल्या सोफ्यावर पेपरसोबत पसरले होते. त्यांचा चहा नुकताच उरकला होता. अर्थात, आमच्याच घरचा. जोशी वैनी मात्र उसुलाच्या पक्क्या असल्याने त्या दुसर्‍याच्या घरची तयार चहा पित नाही. काका-वैनींची नजरानजर झाली तसा त्यांना त्यांचा घरगुती प्रॉब्लेम आठवला. त्यांचे आणि आमचे फैमिली रिलेशन आहेत, असेच ते समजत असल्याने त्यांनी लागलीच तो आम्हाला सांगायला घेतला..

प्रॉब्लेम तसा आमच्या द्रुष्टीने साधारणच होता. त्यांनी हौसेने पाळलेल्या फूलझाडांच्या कुंडीमध्ये एक कबूतरांची जोडी अंडी घालायला बघत होती. त्या नादात ते रोजच तिथे येऊन फूलझाडांची बरेपैकी नासधूस तर करत होतेच, पण त्या उपर स्वताच्या मलमूत्राचा आणि पिसांचा कचराही सोडून जात होते. कबूतराची जात म्हटले की, "जिस थाली मे खाते है, उसी मे छेद करते है" टाईप आचरण असल्याने आणि या आधीही जोशी दांपत्यांनी या कुंडी-प्रजोत्पादनाचा वाईऽऽट्ट अनुभव घेऊन झाला असल्याने आता पुन्हा त्यांना ते नको होते. ते स्वत: शुद्ध शाकाहारी आचरणाचे असल्याने मागच्या वेळीही कबूतरांनी अंडी घातल्यानंतर ती फोडून भ्रूणहत्या करायचे पातक त्यांनी आपल्या मस्तकी घ्यायचे टाळले होते. याची शिक्षा म्हणून संध्याकाळी मावळल्यापासून रात्रभर कबूतरांचा गुटर्रगू आवाज सहन करायचा, तसेच सकाळी उठल्या उठल्या आंघोळीच्या आधी त्यांनी व्हरांड्यात केलेली घाण साफ करायची हे भोगले होते. म्हणूनच यंदा वेळीच काळजी घेत त्यांना कबूतरांना अंडी घालण्यापासून परावृत्त करायचे होते. अर्थात, निसर्गाच्या नियमांत ढवळाढवळ करणे तर शक्य नव्हते, पण निदान त्यांनी ती अंडी आपल्या कुंडीत तरी घालू नये एवढीच त्यांची ईच्छा होती.

असो, तर हे ऐकताच पहिलाच विचार माझ्या मनात आला तो हा, की आमच्याकडे असले काही घडता, त्या अंड्याचे मस्त फुल्ल फ्राय नाहीतर ऑमलेटच करून खाल्ले असते. बरेच दिवसांपासून कबूतरांच्या अंड्याची चव चाखायचे मनात होतेच. पण दरवेळी तशी संधी येता, ते अंडे फोडताच त्यातून अर्धवट तयार पिल्लू तर बाहेर येणार नाही ना, या भितीपोटी कधी हात लावला नव्हता. ईथे तर आपल्या डोळ्यासमोरच अंडे घातले गेले असल्याने तशी काही भिती नव्हती. घातल्या घातल्याच गट्टम केले असते. तसा मी हा विचार जोशीकाकांना सुनावला. सोबत बाजारभावानुसार त्या अंड्यांची किंमत चुकती करण्याचाही प्रस्ताव ठेवला. मात्र त्यातही त्यांना पातकच दिसत असल्याने त्यांनी तो धुडकाऊन लावला.

पण माझी विचारचक्रे आता चालू झाली होती. जर मी कसेही करून त्या कबूतरांना तिथे अंडी घालण्यापासून रोखले तर ते जवळची खिडकी या नात्याने आमच्याच कुंडीत आसरा शोधण्याची शक्यता जास्त होती, जेणेकरून मला आयतीच अंडी मिळाली असती. तसेही आमच्या पनवती कुंडीत आजवर दुसरे कुठलेही पीक तग धरू शकले नव्हते, तर किमान अंड्याचीच पैदास झाली असती. आणि असाच विचार करता करता मला अचानक एक विलक्षण Light 1 आयडीया सुचली.

फार पूर्वी कोण्या एके काळी आमच्या आत्येच्या घरात एका पालीने धुमाकूळ घालत दहशत निर्माण केली होती. तेव्हा त्यांच्याकडे मी भिंतीवरच चिपकवलेली एक नकली पाल पाहिली होती. आकाराने भली मोठी, पण प्रचंड लोभसवाणी! हेतू हाच की तिला बघून खर्‍याखुर्‍या पालीने घाबरावे आणि "एका ट्यूबलाईटमागे, एकच पाल लपू शकते" या तत्वाने आल्या पावली परत जावे. जर असेच काही इथेही करता आले तर काम बनू शकते. थोडक्यात, नकली अंडी जर त्या कुंडीमध्ये ठेवली, तर हा वॉर्ड बूक झाला म्हणत कबूतरांची जोडी डिलीवरीसाठी दुसरी खाट शोधायला निघून जाईल. अशी नकली अंडी बाजारात सापडणे कठीण नव्हते, वा गेला बाजार किंडरजॉयचे अंड्याच्या आकारातले कव्हरच ठेवता आले असते. पण कबूतरांच्या हुशारी किंबहुना मुर्खपणाबद्दल मी साशंक होतो. जर त्यांना त्या नकली अंड्यातील फोलपणा समजला असता, तर पुन्हा खरीखुरी अंडी ठेऊनही मग त्यांनी दाद दिली नसती. आणि मग म्हणूनच येस्स, खरीच अंडी ठेवायची, पण कोंबडीची, असे म्हणत मी माझी हि कल्पना जोशीकाकांना सांगितली.

१) कोंबडीची अंडी ठेवायचे काम तू स्वत: करणार, २) काम झाल्यावर ती तूच तिथून घेऊन जाणार, ३) ती "अन्न हे परब्रह्म" म्हणत फुकट न घालवता त्यांचे ऑमलेट करून खाणार, त्यानंतर ४) आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कुंडीतल्या मातीचा वरचा चार सेंटीमीटरचा थर बदलून देणार.... इत्यादी अटींची पुर्तता केल्यास मला हा प्रयोग करण्यास जोशीकाकांकडून परवानगी देण्यात आली.

........ आणि अहो आश्चर्यम, आज सकाळीच आमच्या कुंडीत कबूतरांच्या पंखांची फडफड वाजू लागली. लगोलग समोरच्या जोशी वैनींकडून "ए रुनम्याऽऽ..." करत कुंडीतली अंडी परत नेण्याबद्दल बोलावणे आले. माझी दोन अंड्यांची गुंतवणूक काम करून गेली असे स्वत:शीच पुटपुटत मी मनोमन सुखावलो. पण तिथे जाऊन पाहतो तर एक वेगळेच द्रुष्य नजरेस पडले. मी ठेवलेली अंडी कोणीतरी चोच मारून, नव्हे चोची मारून मारून त्यांचे कुंडीतल्या मातीतच पार डबल ऑमलेट करून टाकले होते. आता जोशी वैनी मातीचा वरचा चार सेंटीमीटरचा थरच नाही, तर संपुर्ण मातीसह कुंडीही बदलून दे अशी मागणी करत होत्या. कबूतराच्या अंड्यांच्या नादात कोंबडीचीही अंडी गेली होती आणि वर कुंडीचीही भरपाई करून द्यावी लागणार होती. पण या सर्वात वाईऽऽट्ट एकाच गोष्टीचे वाटत होते, ते म्हणजे जोशीकाका "शाकाहाराने मांसाहारी वृत्तीवर मिळवलेला विजय" या नजरेने माझ्याकडे बघत होते.

- ऋन्मेऽऽष

.

अवांतर तळटीप - मिस्टर जोशींना मी ‘जोशी काका’ म्हणतो पण मिसेस जोशींना ‘जोशी वैनी’ असे संबोधतो याचे कारण म्हणजे त्या ‘काकू मत कहो ना’ टाईप आहेत.

क्रमांक २ - नावे बदललेली आहेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दैनंदिन जीवनातील लहानसहान गोष्टी संवेदनशील मनावर किती प्रभाव पाडून जातात ह्याचे एक गुणी उदाहरण म्हणजे हे ललित म्हणावे लागेल. इसापनीतीच्या प्रत्येक कथेखाली एक तात्पर्य असे. ह्या ललिताखाली अनेक तात्पर्ये लिहिता येतील.

१. ज्याची कुंडी त्यांची अंडी
२. कोंबडीच्या अंड्याचे आमीष दाखवून कबूतराचे अंडे मिळत नाही.
३. अंडी गेली, कुंडी गेली, हाती राहिली फडफड!
४. फडफड कुठे अन् अंडी कुठे!
५. खोट्या पालीला खरी पाल घाबरली म्हणून कबूतर हवे तिथे अंडी घालेल असे नाही.
६. काकाच्या बायकोला वहिनी म्हंटल्यामुळे कुंडी भरून द्यावी लागत नाही असे नाही.
७. प्रत्येक फडफडीचा अंजाम अंडे नसतो.
८. कुंडी राखेल तो अंडी चाखेल
९. जोश्यांच्या कुंडीत कोंबडीचे अंडे , कबूतरांच्या मनात विबासंचे फंडे
१०. मोदी सरकार आले की कबूतरेही शिस्त पाळतात.

कळावे

गं सं

हे अमा,
हे पवित्र भावना आणि उदात्त विचारांशी प्रामाणिक राहत केलेले साधेसुधे आणि हलकेफुलके लिखाण आहे, यात आपल्याला त्रिशतकी मटेरीयल दिसून माझ्या हेतूवर शंका येत असेल तर यात आपला नाही माझ्याच गंडलेल्या इमेजचा दोष आहे. Wink

गंभीर Proud

नितीनचंद्र, चिकन तंदूरी आणि चिकन कढाई सारखे चिकन कुंडी का Proud

हे नवतरुणा, तुझ्या सर्व धाग्यांना उत्तम टीआरपी मिळो अशी माझी सदिच्छा आहे. तुझ्या हेतु वर शंका आजिबात नाही. जोशी वैनींचे नाव सविता तर नव्हे?

ऋन्मेऽऽष मस्तच........गंभीर समीक्षक ....... तुमची तात्पर्य वाचून पोट दुखेपर्यन्त हसू आले पण ऑफिसमधे असल्याचे बरेच कन्ट्रोल करावे लागले