शुभ वर्तमान - चांगल्या बातम्या

Submitted by हर्पेन on 23 January, 2013 - 07:40

माझ्या चेपू वरच्या एका मित्राने टाकलेले स्टेटस अपडेट " समाजातल्या सर्व थरांमधून एक मागणी होत आहे की सर्व प्रमुख वर्तमानपत्रांनी दररोज त्यांच्या पेपर सोबत अँटी-डिप्रेसंट गोळयांचा पुरवठा करावा"

खरोखरच आजकाल चांगल्या बातम्या ऐका-वाचायला मिळतात कुठे? टीव्हीवर जाऊद्यात पण वर्तमानपत्रात देखिल चांगल्या बातम्या शोधाव्या लागतात.

मनावर मळभ आणणार्‍या बातम्यांचे प्रमाण इतके जास्त असते की समज व्हावा या जगात चांगले काही घडतच नाहीये. खरेतर आपल्या अवती भवती अशा अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात, ज्या कधी वर्तमानपत्रात छापून पण येतात, पण बहुदा इतर बातम्यांच्या तुलनेत खमंगपणात कमी पडल्याने त्यांची जास्त चर्चा होत नाही. अशाच काही चांगल्या बातम्यांना आपण एकाच ठिकाणी धाग्यात ओवून ठेवल्या तर त्या घटनांचा घेतलेला मागोवा / धांडोळा हा येणार्‍या काळात अँटी-डिप्रेसंट म्हणून काम करेल असे वाटते. कवी सुधांशु कुलकर्णी यांच्या कवितेतल्या ओळींप्रमाणे "अंधार खूप झाला पणती जपायला हवी"

http://vishesh.maayboli.com/node/1120

चला तर मग अशा काही आनंददायी / सुखद घटनांबद्द्ल समस्त मायबोलीकरांना अवगत करवूयात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारताचे मंगलयान मंगळाच्या कक्षेत स्थापित. मंगळ-मोहीम यशस्वी.
आतापर्यंत जगभरातील ५१ मंगळमोहिमांपैकी २१ यशस्वी झाल्या होत्या. भारताच्या पहिल्याच मोहिमेला यश मिळाले. पहिल्याच प्रयत्नात मंगळमोहीम यशस्वी करणारा भारत हा पहिलाच देश.

इस्रोचे अभिनंदन.

इस्त्रोचे अभिनंदन
अधिक माहीती इस्त्रोच्या संकेतस्थळावर उपलब्ध.
मंगळाच्या कषेत स्थापित >> हा वाक्प्रचार योग्य आहे. इंटरेक्शन पॉईण्टला यानाने भेट दिली आणि मंगळाच्या कक्षेत स्थापित झाले.

इस्त्रो व सर्व टीमचे अभिनंदन. तत्कालिन पीएम डॉ. मनमोहन सिंग यांचं व त्यांच्या यावर काम केलेल्या टीमचंही अभिनंदन.

साऊथ कोरीया इथे सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत मेरी कोमला बॉक्सिंग मध्ये सुवर्णपदक मिळाले.

मेरी कोम हिचे अभिनंदन!!!!

हॉकीत सुवर्णपदक

पेनल्टी शुटआउट मधे पाकिस्तानला ४-२ हे हरवुन भारताने सुवर्णपदक पटकावले

त्याचबरोबर महिलांच्या ४*४०० रिले स्पर्धेत देखील भारताला सुवर्णपदक मिळाले

भौतिकशास्त्राचे यावर्षीचे नोबेल दोन जपानी आणि एक जपानला जन्मलेल्या अमेरिकन शास्त्रज्ञांना निळ्या रंगाचा LED शोधण्यासाठी दिलंय. (१९९०)
लाल आणि हिरव्या रंगाचे डायोड अनेक वर्ष वापरात आहेत, जे calculator, घड्याळे इ. ठिकाणी वापरातो, पण प्रकाशास्त्रोत म्हणून निळा आणि पर्यायाने पांढरा लेड शोधून कमी ऊर्जेमध्ये प्रकाश (फ्लोरोसंटच्या १० पट आणि इन क्यांडेसंटच्या १०० पट) देणे शक्य झालं या शोधामुळे. आज उपलब्ध स्वस्त (अजून नगाला तितके स्वस्त नाही Happy ), कमी इंधन वापरणारे आणि टिकाऊ (खूप दिवस चालणारे) हे दिवे आपण घरात सुद्धा हल्ली सर्रास वापरतो.
http://www.cbc.ca/news/technology/nobel-physics-prize-goes-to-3-scientis...

सॉफ्टवेअर इंजिनीअरिंगचे कोणतेही अधिकृत शिक्षण न घेताही केवळ प्रचंड आत्मविश्वास, जिद्द आणि प्रयत्नांचे सातत्य या भांडवलावर नागपुरातील एका फळविक्रेत्याच्या मुलाने चक्क कम्प्युटर आणि स्मार्टफोनची स्पीड वाढविणारे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. एवढेच नाही तर त्याच्या या संशोधनाबद्दल या युवकाने पहिल्या सुपर कम्प्युटरचे जनक डॉ. विजय भटकर यांच्या 'अतिवा' कंपनीत ६० टक्क्यांची भागीदारी मिळाली आहे.

संपूर्ण बातमी :- मटा
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/fruit...

“The Earth Heroes” Award 2014 करता दार्जिलिंग झू ची निवड झाली आहे. जगभरातील ३०० पेक्षाही जास्त झू मधून ही निवड झाली असून हे पारितोषिक पटकवणारा हा भारतातील पहिलाच झू आहे.

या प्राणीसंग्रहालयाची काही प्रचि इथे पाहता येतील.

लडाख आपणा पर्यटकांच्या दृष्टीने नंदनवन आहे पण तिथल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासारख्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावे लागतात. एका स्थानिक स्थापत्य अभियंत्याने ह्यावर उपाय म्हणून कृत्रिम हिमनद्या कशा बनवल्या हे बघणे रोचक ठरेल.

हे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि कार्य कसे केले हे जाणून घेण्यासाठी बघा

http://www.thebetterindia.com/14672/man-creates-artificial-glaciers-chew...

आणि याच बरोबर ह्या वेबसाईट मुळे चांगल्या बातम्यांचा एक खजिनाच हाती आला आहे

http://www.thebetterindia.com/?ref=home_menu

हा "शुभ समाचार" पेक्षा काहीतरी सकारात्मक चिन्ह म्हणून बघता येईल.

आज http://www.lokmat.com/storypage.php?catid=12&newsid=3781786 बातमी वाचली. बारामतीचं लिहिलं असलं तरी ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमधल्या छोट्याश्या अनुभवांवरुन हल्लीच माझ्याही हे लक्षात आलं होतं. गेल्या ३-४ महिन्यांत ३ पॉझिटिव्ह नवमातांशी डायरेक्ट बोलणं झालं होतं (सोबत त्यांचे नवरे आले नव्हते :-(, मोहल्ला/वस्तीतल्या एखाद्या विश्वासू व ज्येष्ठ व्यक्तींना सोबत घेऊन आल्या होत्या). तिघींचीही बाळं निगेटिव्ह जन्मली होती. तिघींनाही गर्भारपणातल्या तपासण्यांमध्ये ह्या संसर्गाचा शोध लागला होता व योग्य ते उपचार घेऊन सिझेरियन करुन निरोगी बाळं जन्माला आली होती. ठाणे सिव्हिल मधल्या ART सेंटरमध्ये कायम पेशंट्स दिसतात. त्यासंबंधीच्या काउन्सेलिंग OPD मध्येही कधी कधी लाईन असते. लोक न घाबरता, हिम्मत ठेवून ह्या सर्व सुविधांचा लाभ घेत आहेत हेच खूप.

कीर्ती शिलेदार यांना अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार

दोन वेळा जागतिक कांस्यपदकावर मोहोर उमटवणाऱ्या भारताच्या पी. व्ही. सिंधूने मकाऊ ग्रां. प्रि. सुवर्ण बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद कायम राखण्याची करामत केली. महिला एकेरीच्या अंतिम फेरीत कोरियाच्या किम ह्य़ो मिनला पराभवाचा धक्का देत सिंधूने या मोसमातील पहिल्या जेतेपदाला गवसणी घातली.

जागतिक क्रमवारीत ११व्या क्रमांकावर घसरलेल्या सिंधूने ४५ मिनिटे रंगलेल्या अंतिम फेरीत ९१व्या क्रमांकाच्या किमला २१-१२, २१-१७ असे सहज पराभूत करून जेतेपद पटकावले.

http://maharashtratimes.indiatimes.com/sports/cricket/India-beat-Pakista...

क्रिकेटमधील आणखी एक वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम टीम इंडियानं रविवारी केला आहे. द. आफ्रिकेत झालेल्या अंधांच्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघानं कट्टर प्रतिस्पर्धी आणि गतविजेत्या पाकिस्तानचा पराभव करून जगज्जेतेपदाला गवसणी घातली.
१९९८मध्ये अंधांच्या पहिल्या वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकनं जेतेपद पटकावलं होतं. पुढच्या दोन वर्ल्ड कपवर पाकिस्ताननं अधिराज्य गाजवलं होतं. त्यांचं साम्राज्य खालसा करण्याचा पराक्रम टीम इंडियानं करून दाखवला आणि क्रिकेटविश्वात पुन्हा तिरंगा डौलानं फडकला.

चार नगरातील माझे विश्व ह्या पुस्तकासाठी डॉ. जयंत नारळीकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार! हे पुस्तक अजून वाचले नाही पण डॉ. नारळीकर यांच्या सर्वच विज्ञान कथा आणि कांदबऱ्या यांची मोठी चाहती म्हणून आज खूप आनंद झाला आहे!

Pages