'चक दे इंडिया' मध्ये एक दृश्य आहे. मिझोरमहून दिल्लीला भारतीय महिला हॉकी संघाच्या निवड चाचणीसाठी दोन हॉकीपटू येतात. आधी रस्त्यावरची मुलं, त्यांना चीनी समजून छेड काढतात आणि नंतर असोसिएशनचा अधिकारी त्यांना 'पाहुण्या' म्हणतो. ईशान्येकडील राज्यांतल्या भारतीयांची मूळ व्यथा हीच आहे. भारताच्या इतर प्रांतातील लोक त्यांना स्वत:सारखे मानत नाहीत आणि नकाश्यानुसार तर ते भारतात आहेतच ! एक प्रकारचा आयडेन्टीटी क्रायसिस. ह्याच्या जोडीला भौगोलिक मर्यादा आणि सततचे राजकीय व सामाजिक अस्थैर्य, असुरक्षितता. नुकतीच सुटका होऊन पुन्हा अटक झालेल्या इरोम शर्मिलांना पहा. गेल्या एका तपाहून अधिक काळ शर्मिला उपोषण करत आहेत. 'मणिपूर'मध्ये लष्कराकडून होणाऱ्या जाचाविरुद्ध, तिथे शांती नांदावी म्हणून.
असुरक्षित वातावरणात रोजगार, दळणवळण सुविधा सगळ्याचीच उणीव. त्यामुळे नजीकचे भविष्यच काय, हातावरचा आजसुद्धा अनिश्चित ! म्हणूनच राजकीय व सामाजिक अस्थैर्य असलेल्या प्रांतात सगळ्यात आधी भरडला व भरकटत जातो तो तिथला तरुण वर्ग.
अश्या एका अस्थिर वातावरणातून वर आली एम. सी. मेरी कोम. 'मेरी कोम' मधून तिच्या ह्या संघर्षावर व एकूणच बऱ्याच लोकांना बऱ्याच अंशी अनभिज्ञ असलेल्या ईशान्येकडील राज्यांतल्या विचित्र परिस्थितीवर भाष्य होईल, अशी एक माफक अपेक्षा घेऊन मी चित्रपट पाहायला गेलो आणि लक्षात आलं की कदाचित ही अपेक्षा माफक नव्हती, खूपच जास्त होती.
धावपटू मिल्खा सिंगवरील 'भाग मिल्ख भाग'मध्ये भारत-पाकिस्तान फाळणीच्या रक्तपातात, संहारात बालपण उद्ध्वस्त झाल्यावरही अथक मेहनतीच्या जोरावर परिस्थितीवर मात करून देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या एका खेळाडूची कहाणी होती. 'मेरी कोम'ची सुरुवातही एक प्रखर संघर्षमय वाटचाल दाखविली जाणार आहे, असा एक आभास निर्माण करते. दुर्दैवाने, शेवटपर्यंत तो आभास, आभासच राहतो आणि ही कहाणी एका महिला क्रीडापटूच्या कौटुंबिक संघर्ष व फेडरेशनच्या अधिकाऱ्यांशी होणाऱ्या संघर्षापुढे जातच नाही. मध्यंतरापर्यंत चित्रपट सतत अशी आशा दाखवत राहतो की १०० वर्षांत ज्या विषयाला, ज्या संघर्षाला हिंदी चित्रपटात कुणी स्पर्शही केला नाही, तो इथे दाखवला जाईल, पण तसं होत नाही आणि चित्रपटाचा पूर्वार्ध केवळ एक डॉक्युमेंटरी वाटतो.
उत्तरार्धात कहाणीत जरा 'कहाणी' येते. पण कथानकाची सगळी वळणं नेहमीचीच असतात आणि अपेक्षाभंगाची पूर्तता होते.
व्यावसायिक जीवन व कौटुंबिक जीवन ह्यातला संघर्ष कमी अधिक प्रमाणात आपण सगळेच करत असतो. व्यावसायिक आयुष्य जितकं विशाल होतं, तितकाच हा संघर्षही प्रखर होतो आणि तो प्रत्येकालाच करावा लागतो. एक उदाहरण अगदी लगेच आठवलं. १९९९ च्या क्रिकेट विश्वचषकादरम्यान सचिन तेंडूलकरच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी सचिन इंग्लंडहून मुंबईला आला आणि अंत्यविधी पूर्ण झाल्यावर लगेच परतलासुद्धा ! तो परत आल्यावर दुसऱ्या दिवशी भारताचा झिम्बाब्वेशी सामना होता. त्या सामन्यात त्याने शतक झळकावले. सतत फिरतीवर असणाऱ्या खेळाडूंना 'वर्क-लाईफ' बॅंलन्स जुळवणं नेहमीच कठीण असतं. मेरी कोम ह्यांच्या लग्नामुळे त्यांच्या बॉक्सिंग कारकीर्दीत आलेला एक स्वल्पविराम, नंतर त्यांच्या जुळ्या मुलांच्या संगोपानामुळे होणारी ओढाताण, त्यावेळी पतीने दिलेला आधार, मुलाच्या आजारपणामुळे जीवाला लागलेला घोर ह्या बाबींवर चित्रपट केंद्रित केल्याने, चित्रपटाच्या विषयामुळे एका अत्यंत संवेदनशील समस्येला वाचा फोडण्याची संधी माझ्या मते वाया गेली आहे.
प्रियांका चोप्राने एक सुजाण अभिनेत्री म्हणून गेल्या काही वर्षांत स्वत:ला वारंवार सिद्ध केले आहे. ह्या भूमिकेतही ती जीव ओतते. तिची मेहनत खांदे, दंड व हाताच्या टरटरलेल्या स्नायूंतून रसरसून दिसते. भाषेचा लहेजाही तिने चांगलाच आत्मसात केला आहे (असावा). एका आव्हानात्मक भूमिकेला तिने पूर्णपणे न्याय दिला आहे आणि पटकथेत, संवादांत असलेल्या काही उणीवांना एक प्रकारे भरून काढलं आहे.
मेरी कोमच्या पतीच्या भूमिकेत 'दर्शन कुमार' आणि प्रशिक्षकाच्या भूमिकेत 'सुनील थापा' लक्षात राहतात.
भाजणीचं थालीपीठ तव्यावर असताना त्याचा एक मस्त खमंग सुवास घरभर पसरतो, पण पहिला घास घेतल्याबरोबर ती चव वासाच्या खमंगपणासमोर कमी पडते आणि माझा तरी अपेक्षाभंग होतो. आवडत नाही, असं नाही. पण अजून खूप काही तरी हवं असतं. 'मेरी कोम' हा विषय व चित्रपटाचे ट्रेलर ह्यांमुळे एक वेगळी अपेक्षा मनात घेऊन गेलो होतो आणि असाच एक अपेक्षाभंग वाट्यास आला. ईशान्येकडील भागाचं सुंदर दर्शन (तिथेच चित्रीकरण झाले असावे, असे गृहीत धरून) घडतं, पण त्या सौंदर्याच्याआड असलेलं एक अप्रिय वास्तव समोर येत नाही. आपण चित्रपटगृहातून एम. सी. मेरी कोम ह्या स्त्रीच्या 'स्त्री' म्हणून वैयक्तिक संघर्षाला बघून हळहळत बाहेर येतो आणि पुन्हा एकदा सेव्हन सिस्टर्सबद्दल औदासिन्यच मनात रुजवतो.
एक वेगळा विषय, त्याला पूर्णपणे न्याय दिला गेला नसला तरी, हाताळल्याबद्दल बहुतेकांना हा चित्रपट आवडेल. त्याला समीक्षकांकडून चांगले शेरेही मिळतील, पण माझ्या डोळ्यांसमोर मात्र असह्य प्रसववेदना सुरु झालेल्या असताना, बाहेरील अशांत वातावरणात लपतछपत हॉस्पिटलला जाण्याचा प्रयत्न करणारे सुरुवातीच्या दृश्यातील नवरा-बायकोच आत्तासुद्धा येत आहेत. त्यांना न्याय मिळाला नाही.
रेटिंग - * * *
http://www.ranjeetparadkar.com/2014/09/mary-kom-movie-review.html
नेहमीप्रमाणेच प्रांजळ
नेहमीप्रमाणेच प्रांजळ लिहिलंय.. प्रियांकासाठी बघावाच लागेल.
चांगलं लिहिलय पण एक गोष्ट
चांगलं लिहिलय पण एक गोष्ट मनात आली की एखाद्या सिनेमाच्या कथानकाबद्दल, त्यातील पात्रांबद्दल थोडी प्राथमिक माहिती असताना आपण त्यावरुन थेट आपल्याला काय बघायला मिळालं पाहिजे हे कसं ठरवणार?
माझ्या मते तरी सिनेमा बघताना नेमकं दिग्दर्शकाला प्रेक्षकांना काय दाखवायचं आहे आणि ते त्यानी किती इफेक्टीवली दाखवलय हे महत्वाचं असतं आणि त्यावरुनच खरंतर सिनेमा चांगला आहे की नाही ठरतो.
तुमच्या उदाहरणात, इर्शान्येकडील राज्यांमधल्या तरुण वर्ग कसा भरडला जातोय ह्या मुद्द्याला जर दिग्दर्शकाला हात घालायचाच नसेल तर तो मुद्दा सिनेमा कसा आहे हे ठरवताना एक निकष म्हणून वापरणे योग्य नाही.
हे म्हणजे गांधी सिनेमा मध्ये भारताचे स्वातंत्र्य ह्या एतिहासिकदृष्ट्या खुप महत्वाच्या आणि संवेदनाशिल विषयाला हाथ घालायची एक चांगली संधी वाया गेली असं म्हण्ण्यासारखं ़ झालं.
मेरी कोम ह्या व्यक्तीच्या
मेरी कोम ह्या व्यक्तीच्या संघर्षमय जीवनावर (आत्तापर्यंतच्या) हा चित्रपट आहे. तिचा महत्वाचा संघर्षच चित्रपटात 'मिसिंग' आहे, असं म्हणायचंय.
मी चित्रपट अजुन बघितला नाही
मी चित्रपट अजुन बघितला नाही परंतु मेरी कोम यांची माहीती ठेवुन आहे..
बघितल्यानंतर ... कशाचे तुकडे करावे हे ठरवु
मला हा चित्रपट आवडला. अगदि
मला हा चित्रपट आवडला. अगदि 'भाग मिल्खा भाग..' पेक्षाही. तो फारच लांबला होता आणि त्यातही फाळणि ई. पेक्षाही त्याची प्रेमकहाणी, आणि त्याच्या बहिणीचा छळवणूकी संसारच मसाल्यासारखा घातला होता, असं वाटलं.
या चित्रपटातला खरा व्हीलन मला हॉकी फेडरेशन्च वाटल. थोड्याफार फरकाने बाकि स्पोर्ट्स असोसिअशन्स्ची अवस्था पण हिच असावी असं जाणवलं.
Boxing वर आहे ना मधेच hocky
Boxing वर आहे ना मधेच hocky पण दाखवली का?
उदयन .. नाही.. तिचा नवरा
उदयन .. नाही.. तिचा नवरा फुटबॉल क्ल्बमधे तेव्हा फक्त एकदा ती मॅच तेही एका सीनपुरता होती..
मला आवडला हा चित्रपट .. मेरी कोम बद्द्ल फक्त पेपरमधे वाचलंय ,पुस्तक असेल तर माहित नाही..
जरी व्यक्तिगत आयुष्यावर असला तरी कुठेही अती केलं नाहीय ना त्यांची प्रेमकहाणी ना नुस्ताच रडारड.. गाणी पण चांगली आहेत नि फक्त बॅकग्राऊंड स्कोअर सारखी वापरलीत..
रसप मला नाही वाटत की
रसप मला नाही वाटत की प्रमोशन्स मधे सुद्धा जाहिरात करताना तू जे म्हणतोयेस त्या अनुषंघाने काही दाखवलं नाहीये तेंव्हा तुला तशी अपेक्षाका होती चित्रपटा कडुन ते कळालं नाही
आधीपासुन जाहिरातींमधेही तेच मार्क करतायेत जे दाखवलंय असं तू लिहिलयेस. कोणताही पुर्वग्रह मनात न ठेवता चित्रपट पाहिला जा सगळ्यांनी
मी उद्याच जाणार
प्रियांका कायमच आवडलीये
चांगलं लिहिलय पण एक गोष्ट
चांगलं लिहिलय पण एक गोष्ट मनात आली की एखाद्या सिनेमाच्या कथानकाबद्दल, त्यातील पात्रांबद्दल थोडी प्राथमिक माहिती असताना आपण त्यावरुन थेट आपल्याला काय बघायला मिळालं पाहिजे हे कसं ठरवणार?
सहमत.
ज्यांनी पाहिलाय त्यानी खूप छान रिव्यू दिलाय.
पहायची इच्छा आहे.
छान परिक्षण. मला वाटतं अशा
छान परिक्षण.
मला वाटतं अशा संवेदनशील विषयात हात घालायचा म्हणजे एक तर अभ्यास खूप लागतो आणि चित्रपटांना कोटीच्या कोटी उड्डाणे करता येत नाहीत. असले चित्रपट सलमान-अक्षयच्या गल्लाभरू चित्रपटांना गर्दी करणार्या लोकांना लोकांना थोडसं वेगळं बघितल्याच समाधान देण्यासाठी ठिक.
कालचा ऑफिसमधला संवाद.
"कोनसा मुवी था?"
"वाइफ बोली इसलिये 'मेरी कोम' देख के आया. ठिक है"
"अबे, ये कौन हे मेरी कोम?"
"साले, बहोत बडी बॉक्सर थी, चिंकी थी"
"साले, बहोत बडी बॉक्सर थी,
"साले, बहोत बडी बॉक्सर थी, चिंकी थी"
>>.
"साले, बहोत बडी बॉक्सर थी,
"साले, बहोत बडी बॉक्सर थी, चिंकी थी" >> चित्रपट बघुन पण कसं कळत नाही या लोकांना!
अवांतर - अश्या लोकांना भुगोल परत एकदा शिकवावा किंवा भारताचा नकाशा भेट द्यावा! दिल्लीत गेलं की महाराष्ट्रीयन साऊथ इंडिअन होतात नि चेन्नईला गेलं की नॉर्थ इंडिअन!
अय्यो...हॉकी नाही हो
अय्यो...हॉकी नाही हो उदयन...Boxing फेडरेशनच ते. पण काय विशेष फरक असेल असं वाटत नाहि.
चनस अगदी अगदी +११११११११११११
चनस अगदी अगदी +११११११११११११
चिंकी थी" >>>> हा शब्द
चिंकी थी" >>>> हा शब्द दिल्लीत राहत असताना बर्याच जणांकडून ऐकला आहे. डोक्यात जातो अगदी. इशान्येकडील लोकांना खूप वाईट वागणूक मिळते तिथे. कायम ह्याच शब्दांने हिणवल जातं.
ती अमिताभ बच्चनची अॅड आहे केबीसीच्या लेटेस्ट सीझनची "जानते तो है लेकिन मानते कितने है" अगदी यथार्थ वर्णन केलं आहे त्या अॅडमध्ये.
वैद्यबुवा +१ . चित्रपटाचे रिव्हुज चांगले आलेत ज्यांनी पाहिला त्यांच्याकडून. पाहणार आहेच.
मीही बुवांशी सहमत झालो हा
मीही बुवांशी सहमत झालो हा रिव्यू व प्रतिक्रिया वाचून. रसप तू मेरी कोम वरचा चित्रपट बघताना बहुधा मिल्खा वरच्या चित्रपटाची टेम्प्लेट डोक्यात धरून गेलेला दिसतोस. आता ते दाखवले नाही हे कळाले, पण जे दाखवले आहे- मेरी कोम व तिचा त्याच्या खेळासंदर्भातील संघर्ष- ते ही चांगले असावे असे रिव्यू वाचू वाटले
(आणि एक - सचिन ने शतक मारलेली केनियाविरूद्धची. झिम्बाब्वे विरूद्धची त्याशिवाय झाली. आणि त्याचा निकाल कोणाला सांगायची गरज नाही )
चिंकी थी >>> तुर्रमखान, कोण होते हे महान लोक?
मला आवडला मेरी कॉम
मला आवडला मेरी कॉम !
प्रियांकाने ,'मॅग्नीफ़िसेन्ट मेरी 'उत्कृष्ट पणे सादर केली आहे, त्यासाठी तिने घेतलेली अथक मेहेनत दिसते.तिच्या आयुष्यातले गुरु चे स्थान ,नवर्याने केलेली मदत परिणाम कारक रीतीने दाखवले .
सपोर्ट सिस्टीम चांगली असेल तर, खेळाडूंना मिळणारे प्रोत्साहन किती महत्वाचे असते, यावरचा फोकस आवडला .
मेरी कॉम व प्रियांकाला सलाम !
रसप मुवि खरंच खुप छान वाटला
रसप मुवि खरंच खुप छान वाटला मला
चनस अगदी अगदी +१000000000
'मिल्खा' खूप लांबला होता आणि
'मिल्खा' खूप लांबला होता आणि भरकटलाही होता, ह्याविषयी काही वादच नाही. मी 'मेरी कोम' बघताना 'भाग मिल्खा भाग' डोक्यात ठेवून गेलोच नाही. माझ्या डोक्यात 'मेरी कोम'च होती. साधारण ५ वर्षांपूर्वी एका सत्कारासाठी ती आणि तिचा नवरा, दोन मुलांसह आले होते. त्यातलं एक मूल वडिलांशी 'बॉक्सिंग' खेळत होतं !
मेरी कोम काय, मणिपूर काय, ईशान्येकडील राज्यं व तिथले लोक ह्यांचा संघर्ष कौटुंबिक संघर्षाइतका साधा नाही आहे, हे मेरी कोमला पाहून व नंतर 'इरोम शर्मिला'बाबत वाचूनच मला समजलं.
नंतर एका सामाजिक संस्थेतर्फे माझ्या (त्या काळी होणार्या) पत्नीला ईशान्येला जावं लागलं होतं. तेव्हा तिथलं सामाजिक, राजकीय असुरक्षित वातावरण, बिकट भौगोलिक स्थिती, बाकीच्या भारताविषयीचे त्यांचे विचार हे सगळं अधिक जवळून कळलं.
ह्या सगळ्या जाणिवांतून मी माझे विचार मांडले. ते इथे सर्वांसमोर ठेवले, म्हणजेच प्रतिक्रियेसाठी खुले झाले. माझे विचार पटले नाहीत, तर ते मला मान्य आहे. पण त्यामुळे मी ते बदलणार नाहीच ! माझे हेच मत आहे की, १०० वर्षांत जो विषय हाताळला गेला नाही, तो ह्या निमित्ताने हाताळणे योग्य व आवश्यकही होतं.
(ही माझी माफक अपेक्षा आहे, अशी माझी समजूतच कदाचित अवास्तव होती !)
रसप दुर्दैवाने तुमची
रसप दुर्दैवाने तुमची 'परिक्षणे ' फारशी सिरिअसली घावीशी वाटत नाहीत . त्यावरून चित्रपटाबद्दल मत बनवणे तर अजिबातच वाटत नाही. फारच अॅरोगन्स असतो तुमच्या लिखाणात.
रॉबीनहूड, खरंय !
रॉबीनहूड,
खरंय !
बरे झाले, इशान्य संघर्ष
बरे झाले, इशान्य संघर्ष दाखवला नाही ते, नाही तर चित्रपट डॉक्युमेंटरीकडे झुकला असता. आधीच जनता टीव्ही चॅनेल्स वर आजूबाजूची अस्थिरता, अंदोलने, हिंसा व विविध संघर्ष पाहून कंटाळली आहे, पैसे देवून परत ती विकतची डोकेदुखी कोण घेणार ? चरीत्रपट सर्वांना आवडेल असा मनोरंजनात्मक बनवणे खुप मोठे आव्हान असते. मेरी कोम लोकांच्या पसंतीला येतोय हे सिनेमाचे मोठे यश मानायला हवे (नाहीतर त्याचा "खेलेंगे हम जी जानसे " व्हायचा) आणि प्रियांका चोप्राचे विशेष कौतुक करायला हवे! तिचा "स्टार कडून "अभिनेत्रीकडे" च्या प्रवासाला सुरूवात झाली आहे. मला "फॅशन्" मध्ये ती फारशी भावली नव्हती.
१९९९ च्या क्रिकेट
१९९९ च्या क्रिकेट विश्वचषकादरम्यान सचिन तेंडूलकरच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी सचिन इंग्लंडहून मुंबईला आला आणि अंत्यविधी पूर्ण झाल्यावर लगेच परतलासुद्धा ! तो परत आल्यावर दुसऱ्या दिवशी भारताचा झिम्बाब्वेशी सामना होता. त्या सामन्यात त्याने शतक झळकावले.
सचिनने तेव्हा 'केनया'विरुद्ध शतक झळकावले. त्याचे वडील वारल्यामुळे तो भारतात आला आणि त्याला झिम्बाब्वेविरुद्ध खेळता आले नाही. झिम्बाब्वेने तेव्हा भारताला हरवलं होत.
मस्त लिहिलंय.
मस्त लिहिलंय.
छान
छान लिहिलेय,
सचिन-झिम्बाब्वेची चूक सुधारा रसप
तुम्ही ज्या अपेक्षा घेऊन चित्रपट बघायला गेल्यात त्या अपेक्षा घेऊन कदाचित इतर जण येणार नाहीत असा व्यावसायिक विचार केला गेला असणार.
आणि तसेही तो फार संवेदनशील विषय आहे. .
प्रियांकासाठी हा चित्रपट
प्रियांकासाठी हा चित्रपट पहायला हवा. २ शॉट्स खटकले.
१. शुगरफ्रीची जाहिरात असलेला सीन.
२. फायनल सामना असतांनाही नवरा फोन करुन ऑपरेशनबद्दल सांगतोय ते सगळं फाईटसीन रोमांचक करण्यासाठी.. तिथे पकड सुटलेय. प्रियांकाने ताकदीने त्यांत जान आणण्याचा प्रयत्न केलाय..
सलाम इंडिया या गाण्यासाठि तरि
सलाम इंडिया या गाण्यासाठि तरि हा चित्रपट पहावा . आपल्यातही जोश येतो प्रियांकाने जिव ओतलाय या भुमिकेसाठी तो दिसतो. तुमच्या अपेक्षा फारच असल्यातरी चित्रपट चांगला आहे. मला खुप आवडला .
प्रियांका मेरी कोम सारखी दिसत
प्रियांका मेरी कोम सारखी दिसत नाही. लहान चणीची, अनग्लामरस (मेरी कोम ग्लामरस आहेत पण त्यातही एक साधेपणा आहे. ब्युटी क्वीन छाप नाही.) वाटत नाही. प्रत्येक फ्रेममध्ये ती आजूबाजूच्या लोकांपेक्षा उंच दिसते पण तिने भूमिका मस्त केली आहे. सिनेमा आवडला. फिल्मफेयर नामांकन नक्की मिळवेल! २०१४ मधील आतापर्यंतच्या रीलीजेस बघता ही भारताची ऑस्कर एन्ट्री पण ठरू शकेल.
संजय लीला भन्साळी म्हणल्यावर जी एक लार्जर देन लाईफचा हव्यासची मनात इमेज होती तसा काही प्रकार इथे झाला नाही. मणिपूरचे खेडे इ इ चांगले वाटले.
सीमंतिनी, प्रियांका मेरी कोम
सीमंतिनी,
प्रियांका मेरी कोम सारखी दिसत नाही.
>>>>>>>
मेरी कोम सारखीच दिसणे हा निकष लाऊन तर हि भुमिका कोणालाही देऊ शकत नाही ना.
उलट हॅट्स ऑफ टू प्रियांका जशी ती पोस्टर आणि ट्रेलरमध्ये दिसली आहे.. तिच्या गेटअप आणि लूकवर मेहनत घेणार्या सर्वांचेच कौतुक .. ती निर्विवादपणे सध्याच्या इतर हिरोईनींपेक्षा चार घरे पुढे आहे.
रसप, नेहमीचप्रमाणेच छान उत्तम
रसप, नेहमीचप्रमाणेच छान उत्तम मांडणी.
इशान्येकडील परिस्थितीवर भाष्य हवे या आपल्या वैयक्तिक मताचा प्रभाव पुर्ण परीक्षणावर जाणवतो, त्यामुळे ते परीक्षण नसून एक लेख वाटतो.
पण या मताशी मात्र सहमत.
अवांतर - यावर प्रकाश पाडणारे एखादे चांगले आणि अर्थातच प्रामाणिक (सत्याच्या जवळ जाणारे) पुस्तक निघाले आहे का? कोणाला माहीत आहे का? गेला बाजार एखादा लेख ?
Pages