'चक दे इंडिया' मध्ये एक दृश्य आहे. मिझोरमहून दिल्लीला भारतीय महिला हॉकी संघाच्या निवड चाचणीसाठी दोन हॉकीपटू येतात. आधी रस्त्यावरची मुलं, त्यांना चीनी समजून छेड काढतात आणि नंतर असोसिएशनचा अधिकारी त्यांना 'पाहुण्या' म्हणतो. ईशान्येकडील राज्यांतल्या भारतीयांची मूळ व्यथा हीच आहे. भारताच्या इतर प्रांतातील लोक त्यांना स्वत:सारखे मानत नाहीत आणि नकाश्यानुसार तर ते भारतात आहेतच ! एक प्रकारचा आयडेन्टीटी क्रायसिस. ह्याच्या जोडीला भौगोलिक मर्यादा आणि सततचे राजकीय व सामाजिक अस्थैर्य, असुरक्षितता. नुकतीच सुटका होऊन पुन्हा अटक झालेल्या इरोम शर्मिलांना पहा. गेल्या एका तपाहून अधिक काळ शर्मिला उपोषण करत आहेत. 'मणिपूर'मध्ये लष्कराकडून होणाऱ्या जाचाविरुद्ध, तिथे शांती नांदावी म्हणून.
असुरक्षित वातावरणात रोजगार, दळणवळण सुविधा सगळ्याचीच उणीव. त्यामुळे नजीकचे भविष्यच काय, हातावरचा आजसुद्धा अनिश्चित ! म्हणूनच राजकीय व सामाजिक अस्थैर्य असलेल्या प्रांतात सगळ्यात आधी भरडला व भरकटत जातो तो तिथला तरुण वर्ग.
अश्या एका अस्थिर वातावरणातून वर आली एम. सी. मेरी कोम. 'मेरी कोम' मधून तिच्या ह्या संघर्षावर व एकूणच बऱ्याच लोकांना बऱ्याच अंशी अनभिज्ञ असलेल्या ईशान्येकडील राज्यांतल्या विचित्र परिस्थितीवर भाष्य होईल, अशी एक माफक अपेक्षा घेऊन मी चित्रपट पाहायला गेलो आणि लक्षात आलं की कदाचित ही अपेक्षा माफक नव्हती, खूपच जास्त होती.
धावपटू मिल्खा सिंगवरील 'भाग मिल्ख भाग'मध्ये भारत-पाकिस्तान फाळणीच्या रक्तपातात, संहारात बालपण उद्ध्वस्त झाल्यावरही अथक मेहनतीच्या जोरावर परिस्थितीवर मात करून देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या एका खेळाडूची कहाणी होती. 'मेरी कोम'ची सुरुवातही एक प्रखर संघर्षमय वाटचाल दाखविली जाणार आहे, असा एक आभास निर्माण करते. दुर्दैवाने, शेवटपर्यंत तो आभास, आभासच राहतो आणि ही कहाणी एका महिला क्रीडापटूच्या कौटुंबिक संघर्ष व फेडरेशनच्या अधिकाऱ्यांशी होणाऱ्या संघर्षापुढे जातच नाही. मध्यंतरापर्यंत चित्रपट सतत अशी आशा दाखवत राहतो की १०० वर्षांत ज्या विषयाला, ज्या संघर्षाला हिंदी चित्रपटात कुणी स्पर्शही केला नाही, तो इथे दाखवला जाईल, पण तसं होत नाही आणि चित्रपटाचा पूर्वार्ध केवळ एक डॉक्युमेंटरी वाटतो.
उत्तरार्धात कहाणीत जरा 'कहाणी' येते. पण कथानकाची सगळी वळणं नेहमीचीच असतात आणि अपेक्षाभंगाची पूर्तता होते.
व्यावसायिक जीवन व कौटुंबिक जीवन ह्यातला संघर्ष कमी अधिक प्रमाणात आपण सगळेच करत असतो. व्यावसायिक आयुष्य जितकं विशाल होतं, तितकाच हा संघर्षही प्रखर होतो आणि तो प्रत्येकालाच करावा लागतो. एक उदाहरण अगदी लगेच आठवलं. १९९९ च्या क्रिकेट विश्वचषकादरम्यान सचिन तेंडूलकरच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी सचिन इंग्लंडहून मुंबईला आला आणि अंत्यविधी पूर्ण झाल्यावर लगेच परतलासुद्धा ! तो परत आल्यावर दुसऱ्या दिवशी भारताचा झिम्बाब्वेशी सामना होता. त्या सामन्यात त्याने शतक झळकावले. सतत फिरतीवर असणाऱ्या खेळाडूंना 'वर्क-लाईफ' बॅंलन्स जुळवणं नेहमीच कठीण असतं. मेरी कोम ह्यांच्या लग्नामुळे त्यांच्या बॉक्सिंग कारकीर्दीत आलेला एक स्वल्पविराम, नंतर त्यांच्या जुळ्या मुलांच्या संगोपानामुळे होणारी ओढाताण, त्यावेळी पतीने दिलेला आधार, मुलाच्या आजारपणामुळे जीवाला लागलेला घोर ह्या बाबींवर चित्रपट केंद्रित केल्याने, चित्रपटाच्या विषयामुळे एका अत्यंत संवेदनशील समस्येला वाचा फोडण्याची संधी माझ्या मते वाया गेली आहे.
प्रियांका चोप्राने एक सुजाण अभिनेत्री म्हणून गेल्या काही वर्षांत स्वत:ला वारंवार सिद्ध केले आहे. ह्या भूमिकेतही ती जीव ओतते. तिची मेहनत खांदे, दंड व हाताच्या टरटरलेल्या स्नायूंतून रसरसून दिसते. भाषेचा लहेजाही तिने चांगलाच आत्मसात केला आहे (असावा). एका आव्हानात्मक भूमिकेला तिने पूर्णपणे न्याय दिला आहे आणि पटकथेत, संवादांत असलेल्या काही उणीवांना एक प्रकारे भरून काढलं आहे.
मेरी कोमच्या पतीच्या भूमिकेत 'दर्शन कुमार' आणि प्रशिक्षकाच्या भूमिकेत 'सुनील थापा' लक्षात राहतात.
भाजणीचं थालीपीठ तव्यावर असताना त्याचा एक मस्त खमंग सुवास घरभर पसरतो, पण पहिला घास घेतल्याबरोबर ती चव वासाच्या खमंगपणासमोर कमी पडते आणि माझा तरी अपेक्षाभंग होतो. आवडत नाही, असं नाही. पण अजून खूप काही तरी हवं असतं. 'मेरी कोम' हा विषय व चित्रपटाचे ट्रेलर ह्यांमुळे एक वेगळी अपेक्षा मनात घेऊन गेलो होतो आणि असाच एक अपेक्षाभंग वाट्यास आला. ईशान्येकडील भागाचं सुंदर दर्शन (तिथेच चित्रीकरण झाले असावे, असे गृहीत धरून) घडतं, पण त्या सौंदर्याच्याआड असलेलं एक अप्रिय वास्तव समोर येत नाही. आपण चित्रपटगृहातून एम. सी. मेरी कोम ह्या स्त्रीच्या 'स्त्री' म्हणून वैयक्तिक संघर्षाला बघून हळहळत बाहेर येतो आणि पुन्हा एकदा सेव्हन सिस्टर्सबद्दल औदासिन्यच मनात रुजवतो.
एक वेगळा विषय, त्याला पूर्णपणे न्याय दिला गेला नसला तरी, हाताळल्याबद्दल बहुतेकांना हा चित्रपट आवडेल. त्याला समीक्षकांकडून चांगले शेरेही मिळतील, पण माझ्या डोळ्यांसमोर मात्र असह्य प्रसववेदना सुरु झालेल्या असताना, बाहेरील अशांत वातावरणात लपतछपत हॉस्पिटलला जाण्याचा प्रयत्न करणारे सुरुवातीच्या दृश्यातील नवरा-बायकोच आत्तासुद्धा येत आहेत. त्यांना न्याय मिळाला नाही.
रेटिंग - * * *
http://www.ranjeetparadkar.com/2014/09/mary-kom-movie-review.html
कास्टिंगचे काहीतरी निकष असतील
कास्टिंगचे काहीतरी निकष असतील ना. (कुठे गेले सगळे तज्ञ लोक?) नाहीतर उद्या बाजीराव म्हणून अर्जुन कपूर आणि मस्तानी म्हणून श्रद्धा कपूर घेऊन सिनेमा करायचा संजय लीला भन्साळी.
उद्या बाजीराव म्हणून अर्जुन
उद्या बाजीराव म्हणून अर्जुन कपूर आणि मस्तानी म्हणून श्रद्धा कपूर घेऊन सिनेमा करायचा संजय लीला भन्साळी.>>> बाजीराव म्हणून अजय देवगणचं नाव देखील एकदा येऊन गेलं होतं. (सिंघमांचा नव्हे, पेशव्यांचा बाजीराव म्हणूनच!!! )
शहाणे करुनी सोडा नंदिनी ताई.
शहाणे करुनी सोडा नंदिनी ताई. काय तरी कास्टिंग बद्दल लिहा. प्रियांका मला तरी वयस्कर (!) वाटली कारण ही सिनेमातील मेरी आई झाली तरी विशीतील आहे. प्रियांका कुठेच इतकी लहान वाटली नाही. रॉंग चोप्रा सिलेक्टेड अस वाटल. परिणीती (किंवा आलिया हव्या होत्या). सिनेमा त्यांच्या नावावर चालला असता नसता ते व्यावहारिक गणित वेगळ पण रोलसाठी शोभल्या असत्या.
सीमंतिनी सिनेमा पाहिला नाही,
सीमंतिनी सिनेमा पाहिला नाही, त्यामुळे बोलू शकत नाही. पण प्रोमोजमध्ये तरी प्रियंका "बॉक्सर" अफलातून वाटली आहे. नॉर्थ ईस्टर्न चेहरेपट्टीसाठी अति प्रोस्थेटिक मेकप न वापरल्यानं उलट तिचा चेहरा फ्रेश दिसलाय.
परिणीती किंवा आलिय दोघीही "बॉक्सर" शरीरय्ष्टीच्या वाटल्या नसत्या. परिणीती तर "वैजयंतीमाला फिगर" आहे आणि आलिया "सायरा बानो".
मी पाहिला. मला सिनेमा फार
मी पाहिला.
मला सिनेमा फार भावला नाही.
मेरी कोमचं आयुष्य फार संघर्षमय असणार. तो संघर्ष नाही दिसला मला चित्रपटातुन.
मेरी कोम इज बेस्ट आणि प्रियांका टू.
जेवढं प्रियांकाला दिलं गेलंय तेवढं तिने पुर्ण जी और जान लगाके उत्कृष्ट केलंय.
मेरी कोमने दिलेला लढा मला सिनेमा मधुन दिसला नाही. तिच्या नवर्याने तिच्यासाठी जे काही जेवढ्या प्रमाणात केलंय त्याच्या २५% च सिनेमामधे दिसलंय.
स्पष्ट बोलायचं झालं तर मला थिएटर मधुन बाहेर पडल्यावर विसरावासा वाटला सिनेमा किंवा असं म्हणता येईल की लक्षात ठेवावासा नाही वाटला.. खुप प्रेरणादायी वगैरे नाही वाटलं (मेरी कोमचं आयुष्य याही पेक्षा जास्त काही तरी असणार आहे.)
पैसे वाया गेल्याची फिलिंग मुळीच येत नाहीये पण वसुन झाल्याचीही नाही.
'भाग मिल्खा' सोबत कुठे तरी तुलना होतेच. आणि मेरी कोम त्याठिकाणी कमी पडतय.
प्रियांका आणि मेरी कोम या दोघांचाही यात दोष नाही त्यांच्या त्यांच्या जागी दोघीही द बेस्ट आहेत.
कदाचित दिग्दर्शक कमी पडला असावा.
मेरी कोमचं आत्मचरित्र विकत घेऊन वाचणार
हाहाहा विशीतील ऑप्शनच नाहीसे
हाहाहा विशीतील ऑप्शनच नाहीसे झाले की! बॉक्सरचा आवेश तुफान आहे तिचा. जरूर बघा सिनेमा.
सिमंतीनी, प्रियांक परफेक्टली
सिमंतीनी, प्रियांक परफेक्टली फिट्ट झालीये या रोलसाठी
तीने बेस्ट साकारलीये मेरी
बोलण्याची ढब पण जमवून आणलीये तिने
खुप मेहनत घेतलीये हे दिसत्य
ऋन्मेष, तुम्ही 'इरोम शर्मिला'
ऋन्मेष,
तुम्ही 'इरोम शर्मिला' बद्दल वाचू शकता.
त्याव्यतिरिक्त एक लेख मला प्रकर्षाने आठवतो आहे. नक्षलवाद्यांनी अपहरण करून नेलेल्या व सुटका झाल्यावर एका व्यक्तीने बहुतेक लोकसत्तात लिहिला होता. '७० दिवस' असं काहीसं नाव होतं त्याचं बहुतेक. माझ्याकडे मी तो उतरवून ठेवला असल्याची शक्यता आहे. शोध घेऊन सांगतो.
७० दिवस हे उरुग्वेचे विमान
७० दिवस हे उरुग्वेचे विमान कोसळ्या वर डोंगरात हरवलेल्या व वाचलेल्या १६ लोकांची स्टोरी आहे . रविन्द्र गुर्जर यानी केलेला अनुवाद . इशान्य भारतातल्या अपहरणाबद्दल म्हणत असाल तर बर्डीकर नावाच्या फ्महाराष्ट्रीय फॉरेस्ट ऑफिस रचे अपहरण झाले होते ते नक्शलवाद्यांकडोन नव्हे तर उल्फा बंडखोरांकडून. पूर्वांचलात अजून तरी नक्षल नाहीत. नक्षलवाद्यांकडून एखादे अपहरण होऊन त्याने पुस्तक लिहिले असेल तर पहाण्यात नाही....
मी बघितला आता कशाची चिरफाड
मी बघितला
आता कशाची चिरफाड करू सांगा
मी बघितला ! एका सर्व साधारण
मी बघितला !
एका सर्व साधारण मुलगी ते स्टेट लेव्हल बॉक्सर हा प्रवास कुठेही दिसला नाही.
मेरी कोम ने केलेला स्ट्रगल प्रेक्षका पर्यंत पोचवण्यात दिग्दर्शक कमी पडला आहे.
पण आपल्याकडे स्पोर्ट्स हीरोंचा आयुष्य लोकांपर्यंत पोचविणारे चित्रपट तयार होउ लगले आहेत ही समाधानाची बाब
शाहिर +
शाहिर + ११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११
सिनेमा मेरी कोमचा आहे म्हणून
सिनेमा मेरी कोमचा आहे म्हणून आवडला जर तो एखाद्या "अबक" चा असता तर अजिबात आवडला नसता.
चित्रपटातले अती फिल्मी योगयोग टाळले असते तर बरे झाले असते. ते फारच पकाऊ वाटले.
बाकी प्रियांकाने खूप मेहनत घेतली आहे. ओनलर खूपच गोड कोचही मस्त. तिचे आई-बाबाही आवडले.
बघितला नाहीच आवडला. न तिचा एक
बघितला
नाहीच आवडला.
न तिचा एक खेळाडू म्हणून संघर्ष दिसत,ना एक स्त्री म्हणून संघर्ष दिसत , ना एक मणिपुरी व्यक्ती म्हणून संघर्ष दिसत. सगळेच विषय तोंडीलावण असल्यासारखे आलेत.
एक नाईव्ह प्रश्न: ओनलर ने
एक नाईव्ह प्रश्न: ओनलर ने मेरीला किती सपोर्ट केल ह्याबद्दल लिहिले जात आहे. पण ईशान्येकडे (केरळ प्रमाणेच) मातृसत्ताक पद्धती असते ना? अर्थात मेरीच्या कम्युनिटी मध्ये होती नव्हती इ. डीटेल्स माहित नाही मला. थोडक्यात परम्परेपेक्षा ओनलर वेगळ वागला का परंपरेचे पालन केले??
रसप, चांगलं परीक्षण! फार
रसप, चांगलं परीक्षण!
फार क्रिटीकली लिहिता हा मुद्दा मला पटत नाही. प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या असतात आणि तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही लिहिणार. प्रत्येकाची आपली स्टाईल असते. मला तरी मांडणी, प्लसेस, मायनसेस बद्दल जसं लिहिता ते आवडतं.
चित्रपट अजून पाहिला नाही. जरा जुना झाला की बघेन. काल बहिणीशी बोलत होते तेंव्हा तुम्ही मांडलेले मुद्देच (किंबहुना रियाने सुरुवातीला लिहिलंय तेच) तिने सांगितले. प्रियांका उत्तम पण मेरी कोमचा प्रवास अजून जास्त व्यवस्थित पद्धतीने दाखवला असतात तर चित्रपट खूप इफेक्टिव्ह होऊ शकला असता. अर्थात, माझं मत मी चित्रपट पाहूनच बनवेन, पण अपेक्षाभंग झालेले लोकही आहेत हे सांगायचं होतं.
छत्तीसगड राज्यातल्या सुक्मा
छत्तीसगड राज्यातल्या सुक्मा जिल्हाय्चे कलेक्तर अॅलेक्स पॉल मेनन यांचं किडनॅपिंग झाल्यावर बारा दिवसांनी सोडलं होतं. असे बरेच आहेत.
रॉबीनहूड | 7 September, 2014
रॉबीनहूड | 7 September, 2014 - 10:22
रसप दुर्दैवाने तुमची 'परिक्षणे ' फारशी सिरिअसली घावीशी वाटत नाहीत . त्यावरून चित्रपटाबद्दल मत बनवणे तर अजिबातच वाटत नाही. फारच अॅरोगन्स असतो तुमच्या लिखाणात.
सहमत +++++++++++++
उदाहरण -- काय पोचे ला ५ आनि मेरी कोम ला ३ *, बात कुछ जमी नही.
अवांतर - ईतके सगल्यानी दाखवून देखिल अजुनहि सचीन बाबतची चूक सुधाराविशी वाटत नाही??
धन्यवाद रसप .. इरोम शर्मिला
धन्यवाद रसप ..
इरोम शर्मिला बद्दल वर्ष-दोन वर्षापूर्वी तसेच नुकतेच वृत्तपत्रांतून वाचण्यात आले आहेच, तरी त्यात ताज्या घडामोडींवर आणि बातमीवर भर असतो, पार्श्वभूमी जिथे वाचली तिथेही काही हातचे राखून लिहिल्यासारखे वाटले.
तरीही तुम्ही म्हणता तो लेख तुम्हाला सापडल्यास वाचायला आवडेल, त्याबद्दल थँक्स इन अॅडवान्स.
७० दिवस हे उरुग्वेचे विमान कोसळ्या वर डोंगरात हरवलेल्या व वाचलेल्या १६ लोकांची स्टोरी आहे .
>>>>>
रॉबिनहूड, येस्स,
फार पूर्वी लहानपणी वाचलेय हे, बरेचसे विसरलोय, पण त्यांच्यावर शेवटाला आपल्याच पैकी मेलेल्यांचे मांस खायची वेळ आलेली हे पक्के आठवतेय..
Pages