सुधागड ट्रेक जवळ जवळ ठरलेला होता. सगळं सेट होतं, पावसाने अप'सेट' करेपर्यंत. जुलै च्या अखेरीस जाग्या झालेल्या पावसाने सुधागड ट्रेक धुक्यात ढकलला. पण दोन महिन्यांचा ट्रेकुपवास सोडायचा मुहूर्त आम्हाला सोडायचा नव्हता. केवढा पाऊस पडतोय, दरडी कोसळतायत, अशात सुधागड.... नको ना!... मग?.... मग तिकोना ! अशा प्रकारे तिकोना ट्रेक ठरला. त्यानुसार क्रिपया ध्यान दे; पाली जानेवाली गाडी आज पवना जाएगी. अशी सूचना घुमली.
शिवभक्त अनिकेत, स्वानंद (कुरकुरे), नवा गडी अनुप आणि मी असा आमचा चमू होता. सकाळी साडेपाच वाजता आमची एक्सप्रेस कळवा नाक्यावरून सुटली ती थेट आठ वाजता तिकोनापेठेत पोचेपर्यंत नॉनस्टॉप. सुजीत मोहोळ यांचा संपर्क आम्हाला एका ब्लॉगवरून मिळाला होता. त्यांच्या घरी आम्ही पोचलो. लवकर निघाल्यामुळे सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडत होतेच. त्यांना शांत करण्याचं काम सुजीतने दिलेल्या चविष्ट पोह्यांनी आणि चहाने चोख केलं.
तिकोना पेठ गाव सुमारे सातशे आठशे वस्तीचं आहे. गावापासून गडापर्यंत जायला गाडीरस्ता आहे. पायवाट जिथून सुरू होते तिथे आम्ही आमची गाडी पार्क करून, बॅगा घेऊन सज्ज झालो. चाकांची लाल माती चाखून झाली होती आता आमच्या बुटांचं काम सुरू झालं होतं. ट्रेक छोटा, सोप्पा असल्याची कल्पना होतीच, त्यामुळे यावेळी आम्ही एरवीपेक्षा जास्त निवांत होतो.
पावसाच्या झालेल्या भरपूर कृपेमुळे जिकडे बघावं तिकडे हिरव्या रंगाच्या छटेछटेची पखरण झालेली होती. झाडं डवरलेली होती, दवबिंदूच्या मोतीमाळांनी सजलेली होती. सावकाश गतीने, फोटो काढत आमची वाटचाल सुरू होती.
थोडंसं अंतर चढल्यावर आम्ही एका डोंगरसोंडेवर येऊन पोचलो. ही सोंड डावीकडे एका डोंगरास जाऊन मिळते. इथे थोडे फोटो काढून मग उजवीकडे वळून पुन्हा गडाच्या पायवाटेला लागलो. पुढे गेल्यावर हनुमानाचं दगडात कोरलेलं एक विशाल शिल्प लागतं. पनवतीला आपल्या पायाखाली घेतलेलं हे शिल्प विलक्षण सुंदर आहे. इथून पुढे एक गुहा लागते. ही अतिशय सुरेख जागा आहे. इथे एक गुहा, गुहेच्या बाजूला देवीचं देऊळ, त्याला लागून एक ध्यानमंदिर आहे. देवळाचे पुजारी तिथेच राहतात. या गुहेच्या समोर एक मोठं पाण्याचं कुंड आहे. ती जागा इतकी अवर्णनीय होती की ध्यानमंदिरात न जाताही काही क्षण आम्ही ध्यानस्थ झालो.
पुढे वाटेत एक चुन्याचा घाणा लागतो. किल्ल्याच्या बांधकामासाठी त्याचा उपयोग नक्कीच झाला असावा. काही वेळातच बालेकिल्ल्यापर्यंत येऊन ठेपलो. बालेकिल्ल्याला जायला सुमारे ३०-३५ खड्या चढणीच्या पाय-या पार करायच्या होत्या. ट्रेकमधला त्यातल्या त्यात आव्हानात्मक भाग म्हणजे या पाय-या. इथे दगडावर आधाराला एक वायर लावून ठेवलेली आहे जिचा पावसाळ्यात निसरडं झाल्यामुळे नक्कीच उपयोग होतो. त्या पाय-या पार करून आम्ही बालेकिल्ल्यावर पोचलो. इथे एक महादेवाचं देऊळ आहे. देऊळ अतिशय सुरेख आहे, समोर नंदीची प्रतिमा आहे. देवळाजवळच आम्हाला सुजीत मोहोळ भेटले.
सुजीत मोहोळांबद्दल लिहिणं जरूरीचं आहे. सुजीत हे या गडाचे गडपाल आहेत. त्यांची ही ओळख त्यांनी आम्हाला चहा पोहे दिले तेंव्हाच झाली होती. त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारायला आम्ही उत्सुक होतो. खरं तर आम्ही गडावर कचरा दिसल्यास तो उचलायचा, थोडासा का होईना, गड स्वच्छ राखण्यात आपला हातभार लावायचा असा बेत करून आम्ही आलो होतो. परंतु गडावर येईपर्यंत एकही प्लॅस्टिकची पिशवी, बाटली, इत्यादी कचरा आम्हाला दिसला नाही. देवळाजवळ सुजीत मोहोळांशी गप्पा मारताना त्यांच्या कामाचा अंदाज आला. दररोज गडावर जाणे, साफसफाई करणे, गैरप्रकार घडताना दिसल्यास त्यास रोखणे, असं काम ते गडपाल या नात्याने करतात. त्यांना येणा-या अडचणी अनेक आहेत. घरगुती ते कॉर्पोरेट अशा सर्व प्रकारच्या पर्यटकांच्या गर्दीत शिवरायांचा, गडकिल्ल्यांचा, आपल्या संस्कृतीचा मान राखणारे, पावित्र्य जपणारे लोक कमीच असतात. त्यामुळे अविरत साफसफाई अनिवार्य ठरते. असं असतानाही अतिशय सुस्थितीत, आणि स्वच्छ ठेवलेला हा गड बघून मन सुखावतं. त्याबद्दल सुजीत मोहोळांचे अनेक आभार आणि फेसबुकावर म्हणतात तसं, #आदर. (तुम्हाला किल्ले तिकोना ला जायचं असल्यास सुजीत मोहोळ यांच्याशी जरूर संपर्क साधा. मो. 9545863824)
देवळाच्या मागे एक ध्वजस्तंभ आहे. तिथला जीर्ण झालेला भगवा आम्हाला बदलता येईल का, अशी आम्ही सुजीतना विचारणा केली असता, त्यांनी संमती दर्शविली. आम्ही नवीन भगवा झेंडा घेऊन गेलो होतो. मग त्यांच्या मदतीने तिथे तो नवीन भगवा चढविला. सोसाट्याच्या वा-यावर जेंव्हा ती केशरी पताका फडकली, त्या क्षणीचे मनात दाटलेले भाव अविस्मरणीय होते. अंगावर एकच काटा आला, आणि मुखात घोषणा, जय भवानी... जय शिवाजी...
हा किल्ल्याचा सर्वोच्च भाग होता. इथे पावसाच्या शिडकाव्यासोबत भन्नाट वेगाने गार वारा वाहत होता. दहा एसींचा एकत्र झोतही जितकं सुख देणार नाही तितकं सुख इथे मला मिळत होतं. शुद्ध हवा, स्वच्छ हवा, अँड द साउंड ऑफ विंड... That awesome moment when you find what you are alive for, and what you can die for.
परतीच्या वाटेवर सुजीतशी पुन्हा जरा गप्पा मारून गड उतरायला सुरुवात केली. थंडगार हवेने कुडकुडलेलं असताना चुलीवरची गरमागरम पिठलं भाकरी समोर असेल तर नाही म्हणेल तो केवळ मूर्ख. वरती म्हटलेल्या चुन्याच्या घाण्याजवळ एका छोट्याश्या झोपडीत चहा, पिठलंभाकरी, भजी अशी लज्जतदार मेजवानी मिळते. सुजीतच्या आईंचाच हा स्टॉल आहे. इतकं चविष्ट पिठलं, आणि इतकी सुरेख आमच्या समोर भाजलेली भाकरी खाऊन जी तृप्तता मिळालीय राव !... स्वर्गसुख म्हणतात ते हेच. तिथे पोटं भरून उरलेला गड उतरलो. एव्हाना आमच्या गाडीसोबत सात आठ अधिक गाड्या, अनेक दुचाकी उभ्या होत्या. एक मिनिबसही होती. सुजीत मोहोळांचं काम वाढणार होतं.
आम्ही परतीच्या वाटेला लागलो. वाटेत लोणावळ्याजवळ सन्नीज ढाबा ('तो' सन्नी बरं का) मधे व्हेज हंडी आणि रोटी खाल्ली हे सांगायला खरं तर आवडत नाहीये, कारण पिठलं भाकरी समोर खरंच ते झक मारेल असं होतं. पण इलाज नव्हता, सॉलिड भूक लागली होती. सहाच्या ठोक्याला बॅक टू पॅव्हिलियन पोचलो होतो. एक छोटा, सोपा पण सुंदर, डोळ्यांचं पारणं फिटवणारा, गार वा-याने आम्हाला शहारवणारा ट्रेक झाल्याचा आनंद होता. पण एसीला लाजवेल असा तो थंडगार वारा सोबत घेता न आल्याची एक बालिश नाराजीही होती.
मस्त! एकदम भन्नाट
मस्त! एकदम भन्नाट वार्यासारखा ट्रेक अनूभवलात. फोटु अप्रतीम!
मस्त
मस्त
मस्तंच लिहिलंय रे - चुलीवरची
मस्तंच लिहिलंय रे - चुलीवरची भाकरी आणि पिठलं यापुढे मला तर अमृतही फिके वाटेल पार .....
असेच मस्त फिरत रहा - गड-किल्ल्यांवर भगवा फडकावित रहा - अनेकानेक शुभेच्छा ....
सुंदर वर्णन आणि
सुंदर वर्णन आणि प्रकाशचित्र
पावसाळा आणि हिवाळा या दोन्ही ऋतूत तिकोना ट्रेक केलेला आहे. दोन्ही ऋतुतील त्याचे वेगळेपण वेड लावणारे आहे.
सुरेख पदभ्रमणाचे सुंदर वर्णन!
सुरेख पदभ्रमणाचे सुंदर वर्णन! आवडले.
तुम्ही केवळ सुदैवीच नाही तर तुम्हाला त्याची जाणही आहे.
पुच्छ ते मुरडिले माथा, पनवती पायतळी धरी ।
निर्विघ्न पदभ्रमण होवो, आश्वस्त मारुती करी ॥
चुन्याची घाण ये पुढती, सांधते चिरे जी जुने ।
चढाच्या पायर्या चढत्या, पत्थरी खोदले जिने ॥
स्वैर ते वाहती ओहोळ, गडकरी मोहोळ ते भले ।
हवेवर विहरतो भगवा, राखती त्या, शूर मावळे ॥
इथे पावसाच्या शिडकाव्यासोबत भन्नाट वेगाने गार वारा वाहत होता. >>>>>>
माऊंट अबूच्या पहाडावर अरवली पर्वताचे सर्वोच्च शिखर आहे. गुरूशिखर.
त्याच्या टोकावर दत्तात्रेयांच्या पादुका आहेत. तिथेही असाच वारा सदैव वाहत असतो.
त्याबाबत गोरक्षनाथांनी असे लिहून ठेवले आहे कीः
पवनही भोग, पवनही योग ।
पवनही हरे, छत्तीसो रोग ॥
छान हिरवी-हिरवी प्रकाशचित्रे
छान हिरवी-हिरवी प्रकाशचित्रे आणि वर्णन.
अरे मस्त फोटो! पूर्वी त्या
अरे मस्त फोटो!
पूर्वी त्या गुहेत काही नव्हतं. आम्ही तिथे मुक्काम केला आहे. पावसाळ्यात बाहेर पाऊस आणि छताखाली कोरडं... बहुतेक तिथे कुणी मुक्काम करू नये म्हणूनच मंदिर झालं असावं आता...
मस्त टिपलंय वातावरण, फोटोत.
मस्त टिपलंय वातावरण, फोटोत.
सुंदर वर्णन आणि
सुंदर वर्णन आणि प्रकाशचित्र>>++११
सुंदर फोटो आणि वर्णन.......
सुंदर फोटो आणि वर्णन.......
लेख आणि वृत्तांत
लेख आणि वृत्तांत मस्तच....
फक्त शिर्षकात थोडा घोळ झाला आहे....
तिकोनाचे दुसरे नाव वितंडगड आणि तुंगचे कठीणगड...
तेवढा बदल करावा
शेवटचा फोटो क्लास! खरतरं
शेवटचा फोटो क्लास!
खरतरं तिकोना ट्रेक हा उंचीवरुन पवना जलाशय आणि त्याच्या पार्श्वभूमीतुन उसळी मारुन वर आलेल्या उत्तूंग तुंग बघण्यासाठी करावा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेख वर्णन आणि प्रकाशचित्रे
सुरेख वर्णन आणि प्रकाशचित्रे तर लाजवाब.................
मस्त.
मस्त.
फोटो दिसत नाहियेत बाकी वर्णन
फोटो दिसत नाहियेत![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाकी वर्णन मस्तच.
सुन्दर
सुन्दर
photo nay disat aahe
photo nay disat aahe
तिकोणा चं दुसरं नाव कठीणगड
तिकोणा चं दुसरं नाव कठीणगड नाही वितंडगड आहे. गडावर असलेल्या वितंडेश्वराच्या मंदिरा वरून हे नाव पडले आहे.
कठीणगड हे नाव तिकोण्यावरून पवनेच्या पलीकडे दिसणाऱ्या तुंग चे आहे.
हो... तिकोणा - वितंडगड तुंग -
हो...
तिकोणा - वितंडगड
तुंग - कठीणगड - खरंच कठीण आहे हा