"डॉक्टर साहेब, मी रमेश पटेल बोलतो आहे "
" नमस्कार, बोला पटेलसाहेब !" मी म्हणालो.
रमेश पटेल म्हणजे एक लाघवी व्यक्तिमत्व! चाळीशीच्या आसपासचे रमेशभाई माझे 'पेशंट कमी आणि शुभचिंतक जास्त' असे स्नेही होते. या पटेलांच्या पेशंट-शृंखलेचे पहिले पुरुष होते तंबाकूवाले 'मनुभाई पटेल'! काही माणसे आपल्यावर एवढे प्रेम कां करतात हे मला अजूनही कळलेले नाही. मनुभाई त्यांपैकीच एक ! माझे सर्जन मित्र डॉ.राम काळे यांनी मनुभाईनां प्रथम माझा रेफरन्स दिला होता पण त्यानंतर मनुभाई मला जे चिकटले ते कायमचेच! इतकेच नाही तर त्यांच्यामागे त्यांनी 'पटेल' आडनावाच्या पेशंटांची रांगच निर्माण केली. त्यांनी माझ्या व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळामध्ये खूप नवनवीन पेशंट माझ्याकडे पाठविले. त्यामुळे मनुभाई आणि त्यांचे सर्व कुटुंबच माझे स्नेही झाले होते. कागदांचा व्यवसाय करणारे 'रोटेरियन रमेशभाई' सोमवार पेठेत राहत असत. सदा हसतमुख आणि सर्वांशी मिळून मिसळून 'मित्र जमवण्याचा छंद' असलेले रमेशभाई साहजिकच खूपच लोकप्रिय होते. आज अचानक सकाळीसच रमेशभाईंचा फोन आल्यामुळे मी थोडा गडबडलोच!
"डॉक्टर, माझ्या घरी जरा प्रॉब्लेम झाला आहे. माझ्या सुनबाईंच्या पोटात फारच दुखत आहे. आपण इकडे व्हिजीट करून तिला तपासले असते तर बरे झाले असते."
'पेशंटला दवाखान्यामध्ये नेण्यापेक्षा डॉक्टरलाच घरी बोलाविणे सोपे' असा एक लोकप्रिय व सोयीस्कर समज(!) असतो. खरोखर जर इमर्जन्सी असेल तर अश्या वेळी डॉक्टर घरी येवून काहीच ट्रीटमेंट करू शकत नाहीत आणि शिवाय महत्वाचा वेळी वाया जाण्याची शक्यता असते. पण हे सर्व पेशंटला समजेपर्यंत बऱ्याच वेळा खूपच उशीर झालेला असतो.
"हे पहा रमेशभाई, जर पोटात दुखत असेल तर जवळच्या एखाद्या 'जनरल प्रक्टिशनर' डॉक्टरांना कां नाही बोलावत? शिवाय ते इंजेक्शन देखील देवू शकतील. आपणाला माहिती असेलच की मी इंजेक्शन देत नाही." ही व्हिजीट शक्यतो टाळण्याच्या उद्देशाने मी म्हणालो.
" डॉक्टर, आमच्या जीपींनी तपासून इंजेक्शन दिले होते पण त्याचा काहीच उपयोग झालेला नाही. तिला खूपच त्रास होतो आहे. आपण येवून तपासल्यानंतर वाटल्यास हॉस्पिटलमध्येही ठेवता येईल. मात्र आपण लगेच या. ती रात्रभर तळमळते आहे." रमेशभाई कळवळून बोलत होते.
आता ही व्हिजीट टाळता येणार नव्हती.
" रमेशभाई, मी आता नायडू हॉस्पिटलमध्ये राऊंडसाठी निघालोच आहे. तुमचे घर तसे माझ्या वाटेवरच आहे. मी पंधरावीस मिनिटांत तेथे पोहोंचतो. आपण काळजी करू नका."
"डॉक्टर, लवकर या, वाट पाहतो आहे."
खडकमाळआळी ते 'पंधरा ऑगस्ट लॉज' या पाच नंबर बसच्या मार्गाने माझ्या 'लॅम्ब्रेटा' स्कूटरने मी रमेशभाईंच्या घरी पोहोंचलो. एका बैठ्या घराच्या आवारामध्ये सर्व नातेवाईक उभे राहून माझी वाट पाहत होते. त्यातील एकाने चटकन पुढे येवून माझ्या स्कूटरचा ताबा घेतला तर स्वतः रमेशभाईंनी लगबगीने पुढे येवून माझ्या हातातील ब्रिफकेसचा! आम्ही दोघे पटकन घरात शिरलो.
एका मोठ्याशा खोलीमध्ये भिंतीला लागून एका सतरंजीवर सुमारे वीस वर्षांची स्त्री पांढरीशुभ्र साडी नेसून डोक्या तोंडावर पदर घेवून भिंतीला टेकून स्वतःला सावरत बसली होती.
"दक्षाबेन, डॉक्टर आये है!" रमेशभाईंनी मी आल्याची सूचना दिली. पांढऱ्या साडीच्या आत कोठेतरी थोडी हालचाल झाली.
मी ब्यागेतुन बीपी मशीन व स्टेथोस्कोप बाहेर काढले आणि तिच्या शेजारी बसलो.
"क्या तकलीफ है?" संभाषण सुरु करण्याच्या उद्देशाने मी पहिला प्रश्न केला.
थोडा वेळ काहीच उत्तर न आल्याने मी पुन्हा तोच प्रश्न विचारला.
" चक्कर आ रहा है" अस्पष्ट आवाजात तिचे प्रत्तुत्तर.
" आपका हात दिखाईए" तपासणीला सुरुवात करण्यासाठी मी म्हणालो.
उत्तरादाखल साडीमधून एक नाजूक गोरा हात बाहेर आला. मी रमेशभाईंकडे पाहून तिचा हात हातात घेतला. तिच्या हाताचा स्पर्श होताच मी हादरलो. तिचा हात बर्फासारखा थंड, आमच्या वैद्यकीय परिभाषेमध्ये 'कोल्ड एन्ड क्लामी' होता. तपासणीची पुढची पायरी म्हणून मी यंत्रवतरित्या तिच्या मनगटातील नाडी,'पल्स', शोधू लागलो. पुढचा धक्का आता होता. चांगला प्रयत्न करूनही दक्षाबेनची पल्स सापडत नव्हती. आता मात्र मी हादरलो होतो. आवाजामध्ये उसने अवसान आणून मी रमेशभाईंना म्हणालो,"जरा इनको नीचे लेटनेको कहो. मै बीपी देखना चाहता हुं"
इतकावेळ माझी ब्याग हातात घेवून शेजारी उभ्या असलेल्या एका तरुणाकडे पाहून ते म्हणाले,"अरे विनोदभाई, देखो डॉक्टर क्या कह रहे है"
विनोदभाईंनी लगबगीने पुढे येवून दक्षाबेनला सतरंजीवर आडवे झोपविले. खोलीतील इतर सर्व पुरुष मंडळी खोलीबाहेर गेली. मी चटकन बीपी मशीनचा पट्टा पेशंटच्या दंडाला गुंडाळला. बीपीचे रीडिंग होते फक्त 'सत्तर'! बीपी असायला हवे होते कमीतकमी शंभर! दक्षाबेनाचे बीपी खूपच कमी होते. वैद्यकीय परिभाषेमध्ये याला 'शॉक' असे म्हणतात. दक्षाबेन 'शॉक'मध्ये कां होती याचे कारण आता पुढील शारीरिक तपासणीमध्ये शोधावयाचे होते. तपासणी करतानाच मी तिचे पती,विनोदभाई, यांच्याकडून तिच्या तक्रारींची माहिती घेत होतो.
माझे विचारचक्र मात्र जोरात फिरत होते.
विनोद आणि दक्षा यांचा एक महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. तिची मासिक पाळी सुमारे तीन आठवड्यांपूर्वीच येवून गेली होती. पूर्वी कधीही असे पोटात दुखले नव्हते. तशी 'हेल्दी' असणारी दक्षा तिच्या आयुष्यात प्रथमच आजारी पडली होती.
"आपकी जुबान दिखाईये"
दक्षाची जीभ आणि ओंठ पांढरेफटक दिसत होते. हृदयाचे ठोकेही खूपच जलद पडत होते. ही सर्व पोटामध्ये रक्तस्त्राव झाल्याची लक्षणे होती.
"मुझे आपका पेट दिखाईए. कंहा दुखता है वह जगह अपनी उंगलीसे दिखाईए." मी.
"वैसे तो पूरा पेटही दुख रहा है. लेकीन सबसे ज्यादा नीचेवाले पेटमे दुखता है" आपल्या बोटाने ओटीपोटाच्या डावीकडील एक जागा दाखवीत दक्षा म्हणाली.
"देखो, पेट ढिला छोडो. मै आपका पेट दुखावूंगा नही. आप सिर्फ सबसे ज्यादा जहां दुखता वो मुझे बतायीये"
मी पोटाला स्पर्श करून हळुवारपणे तपासू लागलो. मऊ अपेक्षित असणारे तिचे पोट आज एखाद्या थंड फरशीला स्पर्श केल्याप्रमाणे घट्ट वाटत होते. तिच्या ओटीपोटामध्ये डाव्या बाजूला दुखत होते. त्या ठिकाणी स्पर्श करताच तिचा जीव असह्य वेदनांमुळे कळवळत होता.
मी विचार करीत होतो. हिच्या पोटदुखीचा आणि शॉकचा काय संबंध असावा? अपेंडीसायटीसची शक्यता कमी होती कारण हे दुखणे उजव्या नव्हे तर डाव्या बाजूला होते. शिवाय पोटाच्या तपासणीमध्ये 'लिव्हर डलनेस' शाबूत असल्यामुळे जठरातील अल्सर फुटला असण्याची अथवा आतड्यांस छिद्र पडले असण्याची शक्यताही नव्हती. दुखण्याच्या जागेवरून काहीतरी स्त्रीरोग म्हणजेच 'गायनिक' आजार असण्याची दाट शक्यता होती. नुकतेच लग्न झालेले व त्यातच इतके अचानक पोट दुखणे आणि बीपी कमी होणे या सर्व लक्षणांवरून दक्ष्याच्या पोटात 'गर्भ फुटला' असण्याची शक्यता जास्त होती.
स्त्रियांच्या गर्भ-पिशवीच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी एक अशा दोन बीजनालिका असतात. नेहेमीच गर्भ धारणा या दोन पैकी एका बीजनलीकेमध्ये होते व हा गर्भ हळूहळू नलीकेमधून मुख्य गर्भ पिशवीमध्ये सरकतो व तेथे रुजतो. काही अत्यंत कमी प्रसंगी हा गर्भ नलीकेमधून पुढे सरकत नाही व तेथेच म्हणजे बीजनलीकेतच वाढू लागतो. यालाच 'ट्यूबल प्रेग्नन्सी' किंवा 'एक्टोपिक जस्टेशन' असे म्हणतात. या नलीकागर्भाला वाढीसाठी जागा पुरेशी आणि योग्य नसल्याने एका ठराविक काळाने तो भरभर वाढणारा गर्भ ती नलिका फोडून टाकतो आणि मग पोटात रक्तस्त्राव होवू लागतो,आणि निर्माण होते एक खतरनाक वैद्यकीय इमर्जन्सी!
हा रक्तस्त्राव शुद्ध रक्त वाहिनीतून होत असल्यामुळे आपोआप थांबू शकत नाही. ताबडतोब शस्त्रक्रिया करून रक्तस्त्राव थांबविला नाही व वाहून गेलेल्या रक्ताची भरपाई केली नाही तर असा रुग्ण यातून वाचत नाही. हृदयाच्या प्रत्येक ठोक्याबरोबर रुग्णाच्या जीवनाचा 'कौंट-डाऊन' चालू झालेला दिसत असतो. झटपट आणि वेगाने योग्य उपचार झाले तरच उपयोग होतो.
माझ्या मनातील विचारमन्थनानंतर एकाच निदान स्पष्ट दिसत होते,'रप्चर्रड एक्टोपिक प्रेग्नन्सी'!
दक्षाला धीर देवून मी विनोदभाईंना घेवून मी खोलीबाहेर आलो. बाहेर बरीच मंडळी उभी होती. मी रमेशभाईंना म्हणालो,
"रमेशभाई, दक्षाबेनके पेटमे बहोत ज्यादा ब्लीडींग हो रहा है. उनकी तबियत एकदम ज्यादा गंभीर है .
उनके जान को खतरा है. उनको किसी बडे हॉस्पिटलमें भरती करना चाहिये. खून चढाना जजूरी है. ऐसे हॉस्पिटल जहां ब्लड बँक की सुविधा हो वहां जल्दी ले जानेसे दक्षाबेन बच सकती है."
"अरे मग आपले केईएम हॉस्पिटल आहे की जवळच! माझ्या मोटारीतून लगेच हलवू."
पांढरे शुभ्र कपडे घातलेले एक पैलवान वाटणारे गृहस्थ पुढे सरसावले. ते त्या भागातील प्रसिद्ध नगरसेवक श्री. मधुकर बिडकर होते हे मला नंतर कळाले. त्यांनी पटकन आत जाऊन एखाद्या लहान मुलाला उचलावे तसे त्यांनी दक्षाला उचलले आणि बाहेरच उभ्या असलेल्या मोटारीत अलगद ठेवले. ते आणि विनोदभाई तातडीने हॉस्पिटलकडे निघाले. केईएम हॉस्पिटल तेथून जवळच होते. मी आणि रमेशभाई देखील स्कूटरने त्यांच्या पाठोपाठ केईएम हॉस्पिटलकडे निघालो.
केईएम हॉस्पिटल पुण्यातील एक मोठे आणि चांगले हॉस्पिटल! गेली अनेक वर्षे पुण्याच्या पूर्व भागातील गोरगरिबांची खऱ्या अर्थाने सेवा करण्याबद्दल प्रसिद्ध आहे. हॉस्पिटलच्या प्रमुख पद्मश्री डॉ सौ बानू कोयाजी यांनी हॉस्पिटल व त्यातील रुग्णांसाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेतले होते. श्री मधुकर बिडकर त्याच भागातील असून त्यांचे डॉ बानूबाईंशी खूपच जवळचे सामाजिक संबंध होते. त्यांचा केईएममध्ये चांगलाच दबदबा होता.
याचे प्रत्यंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोंचाताक्षणीच आम्हाला दिसले. केईएमच्या आपद्कालीन विभागामध्ये बिडकरांना पाहून भराभर हालचाल सुरु झाली. डॉक्टर आणि नर्सेस यांनी मिळून ताबडतोब रक्ताचे नमुने घेवून सलाईन सुरु केले. एक्सरे,ईसीजी झाला. तेंव्हा आज सारखी सोनोग्राफिची सोय नव्हती. सर्व निदान व निर्णय शारीरिक तपासणी वरच ठरत असे. पाचच मिनिटामध्ये स्वतः डॉ.बानू कोयाजी पेशंट तपासण्यासाठी आल्या. त्यांनी दक्षाची आतून तपासणी केली व दक्षाबेनला 'रप्चर्रड एक्टोपिक प्रेग्नन्सी' असल्याचे कन्फर्म केले.
"लिसन,डॉक्टर्स, धिस इज ए व्हेरी सिरीयस केस! गेट हर बीपी अप, फास्ट, रिअल फास्ट!! अरेंज फॉर ब्लड,अनेस्थेटिस्ट,ओटी!" डॉ. कोयाजी कडालल्या.
सर्व चक्रे भरभर फिरू लागली. नशिबानेच माझ्या वर्गमित्र डॉ सौ आशा काळे ह्याही त्याच दिवशी ड्युटीवर होत्या.मीही माझे पुढील काम सहकारी मित्रांना सोपवून डॉ काळेंच्या बरोबर थांबलो. पुढच्या दहाव्ह्याच मिनिटाला दक्षाबेन ऑपरेशन थिएटरमध्ये होती. स्वतः डॉ. बानूबाई सर्जरीसाठी आल्या होत्या.
"म्याडम, पेशंटचे बीपी ११० बाय ७० आहे. पल्स उत्तम आहे. दोन युनिट ब्लड ऑलरेडी गेले आहे. गेल्याच आठवड्यामध्ये '१५ ऑगस्ट' झाल्यामुळे भरपूर ब्लड उपलब्ध आहे. मी आता भूल देवू कां?" भूलतज्ञांनी डॉ कोयाजींना सांगितले.
"आणखी पाच बाटल्या ब्लड मागवून घ्या. ओपन केल्यावर गडबड नको." सर्जिकल गाऊन आणि ग्लोव्ह्स चढवताना बाई पुढच्या सूचना देत होत्या.
डॉ आशा काळे बाईंना मदत करत होत्या. मी त्यांच्या मागे मॉनिटरवर सतत रेखाटल्या जाणाऱ्या दक्षाबेनच्या ईसीजी ट्रेसिंगवर नजर ठेऊन होतो. सारे काही ठीक दिसत होते. दक्षाच्या नशिबाने आत्तापर्यंत तरी चांगलीच साथ दिली होती.
डॉ. काळेंनी दक्षाच्या पोटाला आयोडीनने पेंट करून शरीराचा पोटाखेरीज इतर सर्व भाग 'स्टेरायील' जंतुरहित कपड्यांनी झाकून टाकला होता.
"म्याडम, पेशंट इज रेडी!" डॉ. काळेंनी म्याडमला रिपोर्ट केले.
डॉ. कोयाजींनी ऑपरेशनला सुरुवात केली.
"लूक अप एव्हरी बडी, पे अटेन्शन हिअर, मी आता इन्सीजन घेत आहे. सिस्टर, सक्शन रेडी प्लीज!" एवढे म्हणून बानूबाईंनी हातातील तीक्ष्ण स्कालपेलने दक्षाच्या पोटावर छेद घेतला. पुढच्याच क्षणी दक्षाच्या रक्ताच्या चिळकांड्या सर्वांच्या गाऊनवर उडाल्या. सिस्टर व सहकारी डॉक्टर्स सक्शन मशीन आणि जंतुरहित कपड्यांचे स्वाब घेऊन रक्त टिपू लागले. दक्षाचे पोट एखाद्या रक्ताने भरलेल्या भांड्यासारखे दिसत होते. जितके रक्त टिपावे तितके आणखीनच पुन्हा भरत होते. बीपी पुन्हा कमी होत चालले होते. भूलतज्ञ व इतर डॉक्टर्स सिरींजने दक्षाच्या शिरेमध्ये रक्त 'पुश' करीत होते.
"करेक्ट डायग्नोसिस! पुअर गर्ल! शी विल नीड मोर ब्लड! कीप ऑन पुशिंग ब्लड, फास्ट! नाऊ, आय विल क्याच द ब्लीडर!" असे म्हणून एखाद्या पाण्याच्या तळ्यात हात घालून आत फुटलेला नळ शोधल्याप्रमाणे त्यांच्या अनुभवी हातांनी दक्षाच्या रक्तबंबाळ पोटात ब्लीडरचा अंदाज घेतला आणि त्याला पटकन चिमटा लाऊन टाकला. आणि काय आश्चर्य ! दक्षाबेनची परिस्थिती झपाट्याने सुधारू लागली. आता नवीन रक्ताने पोटाची पोकळी भरत नव्हती. आतले अवयव स्पष्ट दिसू लागले होते. बीपी स्टेबल होऊ लागले होते. सर्वांच्या चेहेरयावरील तणावाची जागा आता आशेने आणि उत्साहाने घेतली होती. पुढील काही मिनिटांतच बानूबाईंनी दक्षाचे ऑपरेशन संपवले. तिची डावी बिजनलिका काढून टाकावी लागली होती पण उजवी नलिका हेल्दी असल्याचे त्यांनी पहिले होते आणि त्यामुळे भविष्यकाळामध्ये दक्षा पुन्हा गरोदर राहू शकणार होती. ऑपरेशन संपताना दक्षाला दिलेल्या रक्ताच्या बाटल्यांचा हिशेब झाला. रक्ताच्या एकूण बाटल्या भरून झाल्या होत्या - 'सतरा'!
पंधरा ऑगस्टच्या शुभदिवशी ज्या सतरा नागरिकांनी रक्तदान केले होते त्यांनी खरोखरच दक्षाबेनला जीवनदान दिले होते.
नंतरचे दोन दिवस अति दक्षता विभाग व नंतर आणखी एक आठवडा साध्या वार्डमध्ये काढून दक्षा घरी परतली. तिच्या आई वडिलांना हिचे 'दक्षा' हे नाव ठेवतांना भविष्यकाळात 'दक्षकन्या पार्वती' प्रमाणे हिलाही असेच 'अग्नीदिव्य' करावे लागणार याची पुसटशीही कल्पना आली नसेल.
या प्रसंगानंतर मी तिला घरी भेटायला गेल्यानंतर तशाही अवस्थेमध्ये ती व विनोदभाई खाली वाकायला विसरले नाहीत. दक्षाचा कृतज्ञतेने ओथंबलेला चेहेरा पाहून मला माझ्या कष्टांचे चीज झाल्याचा आनंद झाला.
खरे म्हटले तर दक्षाच्या पुनर्जन्माची ही गोष्ट येथेच संपली,पण दक्षाबेन आणि विनोदभाईं बरोबरचा प्रवास पुढे अनेक वर्षे चालू राहिला. डॉक्टर-पेशंट हे नाते तेंव्हाच विरघळले होते आणि स्नेह-बंध निर्माण झाले होते. दोन-तीन वर्षानंतर दक्षाबेन पुन्हा गरोदर झाली-अर्थातच उजव्या बीजनलिकेमधून! खरोखर स्त्रियांच्या सोशिकपणाची प्रशंसा करावी तेवढी थोडीच! इतिहासाची पुनरावृत्ती न होता दक्षाबेन सुखरूप पुत्ररत्न प्रसवली. केतन आज वीस वर्षांचा असून अमेरिकेत शिकत आहे. विनोदभाईंचा व्यवसाय देखील उत्तम चालू आहे.
या प्रसंगानंतर दोनतीन अश्याच 'एक्टोपिक' प्रेग्नन्सीजचे मी निदान केलेले. पण आता सोनोग्राफी यंत्रे पटकन उपलब्ध होत असल्यामुळे निदान शहरामध्ये तरी एक्टोपिकचे निदान तो गर्भ फुटण्याच्या आधीच होऊ शकते व वेळीच शस्त्रक्रिया करता येते. पण खेड्यांमध्ये आरोग्यसंस्थेची अवस्था अजूनही पूर्वीसारखीच असल्याने तेथील डॉक्टरांना कदाचित आजही अशाच दक्षाबेन पुन्हा भेटण्याची शक्यता जरूर आहे.
नेहमीप्रमाणे सुरेख लेख डॉ.
नेहमीप्रमाणे सुरेख लेख
डॉ. बानु कोयाजी, खरोखर एक आदरणीय व्यक्तिमत्व ___/\___
नेहमीप्रमाणेच मस्त
नेहमीप्रमाणेच मस्त लेख!
शेवटपर्यंत श्वास रोखायला लावता डॉ. तुम्ही! >> +१
नेहमीप्रमाणेच मस्त लेख! तुमची
नेहमीप्रमाणेच मस्त लेख!
तुमची शैली खरचं मस्त आहे.
अक्षरशः श्वास रोखून वाचली.
अक्षरशः श्वास रोखून वाचली. तुमची शैली नेहमीप्रमाणेच मस्त.
नेहमीप्रमाणेच जबरदस्त ! वेलकम
नेहमीप्रमाणेच जबरदस्त ! वेलकम बॅक !
शिंदे काका छान
शिंदे काका छान लिहिता......
तुमच्या लेखांची खरेच एक लेखमालिका बनवायला हवी.
ज्ञानवर्धक लेख + किती
ज्ञानवर्धक लेख +
किती सहजसुंदर लिहिता आपण>>>>>+१००%
खरच खूप दिवसांनी. गेल्या
खरच खूप दिवसांनी. गेल्या आठवड्यातच तुमच्या मागच्या लेखांची आठवण झाली होती आणि बरेच दिवसात काही नवीन केस वाचायला मिळाली नाही हे लक्षात येउन चुकल्याचुकल्यासारखे वाटत होतेच.
तुमच्या लेखनशैलीला दाद द्यावी तितकी कमीच
सुंदर. तुमच्या लेखणीत मेडीकल
सुंदर. तुमच्या लेखणीत मेडीकल इमरजंसीतले डुज/डोंट्स समाजात पसरवण्याचं सामर्थ्य आहे. तेवढं पुस्तकाचं मनावर घ्या, डाॅक्टरसाहेब...
नेहमी प्रमाणे उत्तम
नेहमी प्रमाणे उत्तम लेख...शब्दच नाहित
खूप दिवसांनि तुम्हाला इथे मबोवर आल्याचे पाहून बरे वाटले
अजून एक सुरेख लेख.
अजून एक सुरेख लेख.
नेहमीप्रमाणेच सुंदर
नेहमीप्रमाणेच सुंदर माहितीपूर्ण लेख. आवडला
नेहमीप्रमाणेच अतिशय सुरेख लेख
नेहमीप्रमाणेच अतिशय सुरेख लेख !!!
सहज साध पण मनाला भिडणार!
सहज साध पण मनाला भिडणार!
जबरदस्त !
जबरदस्त !
वेलकम बॅक. उत्तम लेख.
वेलकम बॅक. उत्तम लेख.
सुंदर. तुमच्या लेखणीत मेडीकल
सुंदर. तुमच्या लेखणीत मेडीकल इमरजंसीतले डुज/डोंट्स समाजात पसरवण्याचं सामर्थ्य आहे. तेवढं पुस्तकाचं मनावर घ्या>>>> +१
छान... आवडले.
छान... आवडले.
"अरे माझी डेट चुकलीये,
"अरे माझी डेट चुकलीये, आतापर्यंत यायला हवी होती." थोड्याश्या सांशकतेनेच स्वातीने मला सांगितले.
"मग प्रेगन्सी टेस्ट करून बघ ना?!" मनात काही विचार करता करता मी स्वातीला सल्ला दिला अन् तो विषय तिथेच संपला.
दुसर्या दिवशी मी ऑफिसवरून घरी जायच्या आधीच माझ्या अगोदर घरी पोचलेल्या स्वातीने टेस्ट करून घरात पोचल्या पोचल्या मला 'गूड न्युज' दिली. 'आपण आता बाबा होणार' या जाणिवेने मानसिक वय वाढल्यासारखं वाटलं. एक प्रचंड मोठी जबाबदारी खांद्यावर पडल्याची जाणिव झाली. वर्षा-दिड वर्षाने भराने माझ्या घरात इवलेसे हात पाय रांगतील या कल्पनेने मनातून आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. त्या उत्साहाच्या भरात जवळच्या एक दोन मित्रांना ही बातमी कळवूनही झाली. खरं तर ती अशी सांगायची नसतेच मुळी पण उत्साहच फार 'बाबा होणारे' हे सांगण्याचा. आम्ही उभयतांनी येणार्या दिवसांची प्लॅनिंग बनवायला सुरूवात केली. अगदी कपड्यापासून ते नाव ठेवण्यापर्यंत सगळं.!
आठवड्याभराने शनिवारच्या सकाळी साधारण आठ वाजता स्वातीच्या पोटात दुखायला सुरूवात झाली. नेमका त्याच वेळी मी रायगडला जाण्यासाठी महाडच्या गाडीत स्थानापन्न झालो. नेहमीचं असेल थोडं फार म्हणून सुरूवातीला तिने दुखण्याकडे दुर्लक्ष केले. पण जसजसं पोटात भयंकर दुखायला लागलं तसं तिने घाईत मोबाईलवर मला फोन लावला आणि दुखण्याबद्दल सांगितले. थोडंस समजावत डॉक्टरने दिलेल्या पेन किलर खाऊन तिला पुन्हा शांत झोपायला सांगितले. शेवटी त्यानेही काही होईना म्हणून मोठ्या भावाच्या घरी आईला फोन करून स्वातीकडे जायला सांगितले. 'या' दिवसात असं थोडं फार दुखत असेलही कदाचित या गैर-समजूतीतून मी स्वातीच्या पोटात दुखण्याकडे जरासे दुर्लक्षच केलं. आई पोचतेय तर ती घेऊन जाईल स्वातीला दवाखान्यात आणि राहील दुपारपर्यंत दुखायचं अशी मीच माझ्या मनाशी समजूत करून घेतली.
एव्हाना गाडीने महाडला पोचलो होतो. पण त्याच वेळी तिकडे परिस्थिती हळूहळू आपल्या हाताबाहेर जातेय हे कळताच आईने स्वातीच्या आई-बाबानांच पाचारण केले. दवाखान्यात घेऊन जायला तिचे आई-बाबाच पोचले तोपर्यंत स्वातीला असंख्य वेदना होतच होत्या. हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आलं. होणार्या वेदना कधी वाढत होत्या तर कधी कमी होत होत्या. दुपारी तिच्या पोटाची सोनोग्राफी करण्यात आली, त्यात कळालं तिच्या पोटात वाढत असलेला गर्भ हा उजव्या बाजूच्या बीजनलिकेमध्येच वाढतोय. क्षणाचाही विलंब न करता डॉक्टरांनी गर्भ काढून टाकावा लागेल नाहीतर तिच्या जीवाला धोका आहे असं सांगितले. बाबांनी तत्काळ ऑपरेशन सुरू करायला सांगितले. इथे मला फोन करून विचारण्याचा प्रश्नच नव्हता, हा स्वातीचा, त्यांच्या लेकीच्या जीवन-मरणाचा प्रश्न होता. त्यांच्यातल्या पित्याने तो निर्णय घेताना कुठलीच दिरंगाई केली नाही.
या सगळ्या गोष्टींपासून अनभिज्ञ असलेला मी संध्याकाळी सहा-साडे सहाला रायगडी दरबारात महाराजांच्या सिंहासनासमोर उभा राहून रोमांचित झालो होतो अन् नेमकं त्याच वेळी लॅप्रोस्कोपी झालेल्या बेशुध्दावस्थेत स्वातीला ऑपरेशन थियेटरमधून आयसीयूत हलवण्यात येत होतं. मानवी सुख-दु:खाच्या हिंदोळ्यातले दोन वेगवेगळे प्रसंग!! 'एक छोटंस ऑपरेशन झालंय, संध्याकाळी परत सोडण्यात आलं' रात्री केव्हातरी उशीरा मला एवढंच सांगण्यात आलं.
पहिल्या रायगड भेटीमुळे झालेल्या आनंदातच दुसर्या दिवशी संध्याकाळी घरी पोचलो तेव्हा स्वाती अजूनही हॉस्पीटलमध्ये असल्याचं कळालं. कोणीतरी डोक्यावर असंख्य घणाचे घाव घालतंय असं वाटायला लागलं. ह्रदयाचे ठोके जलद गतीने पडू लागले. हॉस्पीटलला पोचलो तेव्हाही स्वाती बेशुद्धावस्थेतच होती. पोचल्या पोचल्या बाबांनी सगळ्या प्रसंगाची एकुण कल्पना दिली. वाढत असलेला गर्भ हा पिशवीऐवजी ट्युबमध्ये वाढू लागला होता. अन् तो जसाजसा मोठा होऊ लागला तसतसा स्वातीला जास्त त्रास होऊ लागला होता. तो गर्भ तसाच वाढला असता तर ती ट्यूब फुटली असती आणि अंतर्गत रक्तस्त्राव होऊन स्वातीच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. वेळीच निदान होऊन त्यावर योग्य उपचार झाल्यामुळे तिच्या जीवाचा धोका पुर्णपणे टळला होता.
पाहीलेली सगळी स्वप्नं मिळाली या दु:खापेक्षा माझी सहचारीणी मरणाच्या दारात जाऊन सुखरूप परत आली याचा आनंद जास्त होता.!
किसन शिंदे, तुम्हाला हा लेख
किसन शिंदे,
तुम्हाला हा लेख काय रिलेट झाला असेल याची कल्पना करू शकतो.
आपलाही अनुभव इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद
डॉक्टर खूप दिवसांनी तुमचे
डॉक्टर खूप दिवसांनी तुमचे लिखाण पुन्हा वाचायला मिळाले.
तुमचे निदान किती अचूक असते याचा प्रत्यय दर वेळेला लेख वाचताना येतोच
सुरवातीपासुन शेवटपर्यंत माझी
सुरवातीपासुन शेवटपर्यंत माझी गोष्ट वाचत असल्यासारखे वाटले ़ दिवसभर पोटात दुखत होते नेहमीसारखे गॅसेसमुळे वाटले . संध्याकाळी चक्कर यायला लागली ़ एक शिकाऊ डाॅक्टर घरी आले व तपासुन मानसोपचार तद्न्याकडे न्यायाला सांगितले , एवढेच आठवतेय त्यानंतर बेशुद्ध झाले ़ ़ नवर्याने हातावर उचलुन रिक्शात घातले ़ पहाटे ओपरेशन थेटर मध्येच शुद्ध आली ़ व नंतर दुसर्या दिवशी रुम मध्ये ़ डाॅक्टर राउंडच्यावेळी ़ छान स्माईल देऊन म्हणल्या काय ग आम्हाला घाबरवलस सगळ्या़ना हिमग्लोबीन ३ झाले होते माझे वर देवाला भेटुन आले होते ़
डाॅक्टर काका काहिंचे नशिबाचे भोग ह्याच्यानंतर पण संपत नाहित ़ ़ पुढच्याच वर्षी मला परत दिवस रहायले ़ परंतु कार्डिअॅक अॅक्टिव्हिटी न दिसल्याने ती प्रेग्न्न्सी तिथेच संपली ़ ़ आणी त्यानंतर सुरु झाल्या हाॅस्पिटलच्या वार्या IUI IVF साठी आठ वर्षें हे चालु राहिले । मला PCOD असल्याने नॅचरल कन्सिव्ह होयचे चान्सेस शून्य सांगीतले होते ़ ़ एरव्हि प्रत्येक गोष्टित निगेटिव्ह विचार करणारी मी का माहित नाहि पण ह्याबाबतीत मात्र मनातुन क़ायम पाॅझिटिव्ह रहायले ़ ़ कदाचित आई होयची आस हे त्यामागचे कारण असावे ़ आठ वर्षांनी मात्र मी कंटाळले ़ व परत नोकरी सुरु केली व ठरवले कि आता बास आपण अॅडाॅप्श्नला जायचे ़ सर्व ट्रिटमेंट थांबवल्या व आठ महिन्यांनी माझी प्रेगन्नसी टेस्ट पाॅझिटिव्ह आली ़ मी मात्र घाबरुन रडायला लागले ़ मला परत मागच्या सगळ्या गोष्टितुन जायचे नव्हते ़ परंतु सगळे नाॅर्मल होते ़ह्या सगळ्यात माझे वय ३४ झाले होते पण पुर्ण नऊ महिन्यात एकादाहि माझे बीपी हालले नाहि का शुगर वाढली नाहि आणि कुठलिहि काॅम्प्लिकेशन न होता ७ पौंडांच्या मुलीला जन्म दिला माझी मुलगी परवाच ३ वर्षांची झाली तीने जे सुख मला दिलेय त्यासाठि मी परत एकदा सगळ्या दिव्व्यातुन जायला तयार आहे
खूप भावला लेख आणि काही
खूप भावला लेख आणि काही प्रतिसाद सुद्धा.
मित्रहो, नमस्कार, सर्वांचा
मित्रहो,
नमस्कार,
सर्वांचा प्रतिसाद वाचून मन भरुन आले. सर्वांचे मनःपूर्वक आभार !
आपल्या अशा प्रतिसादांमुळे वेळ कमी असताना देखील लिहिण्यासाठी हुरूप येतो. बर्याच सदस्यांनी या सर्व कथांचे पुस्तक करावे असे सुचवले होते. त्या दिशेने काही प्रयत्न चालू आहेच, नक्की होताच पुन्हा लिहीनच !
<<काळ आला होता .. पण त्या आधी सर तुम्ही आलात.>> वरील घटनेच्य सुमारे पंचवीस वर्षांनतर दक्षाबेन पुन्हा माझ्या क्लिनिकमध्ये आल्या. पण यावेळेला डाव्या स्तनामध्ये क्रिकेटच्या चेंडू आकाराची गाठ घेवूनच ! दक्षाबेनने या वेळी मात्र खूपच उशीर केला होता ! सर्जरी, रेडियेशन व केमोथेरपी असा क्लेशकारक प्रवास करूनही त्यांना फक्त तीन वर्षेच मिळाली !
<<डॉ. साहेब, एक शंका आहे. पुर्वीच्या काळी जेव्हा स्त्रीया घरी प्रसुत होत किंवा सहजा सहजी हे निदान होत नसे तेव्हा नवविवाहीता तडका- फडकी म्रुत्यु पावत की काय ?>>नक्कीच. पण आत्ता सोनोग्राफी सर्वत्र उपलब्द झाल्यामुळे अशी शक्यता खूपच कमी असावी.
<<स्वाती२, किसनराव शिंदे आणि इनोची >>आपण आपला अनुभव येथे शेयर केल्याबद्दल आभार.
कथा वाचून दाद दिलेल्या सर्व रसिक मायबोलीकरांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार !
शुभ रात्री !
खिळवून ठेवणारा प्रसंग आणि
खिळवून ठेवणारा प्रसंग आणि त्याला न्याय देणारे वर्णन. तुमची भाषा किती सहजसोपी असते साऱ्या लेखांत! आवडलं.
नेहमीप्रमाणेच सुंदर फारच
नेहमीप्रमाणेच सुंदर फारच आवडले.
माझ्या महितीत पण एक आहेत ज्याना 'ट्यूबल प्रेग्नन्सी' चा त्रास होतो म्हणुन आज पर्यंत त्या आई होउ शकल्या नाही.खुप उपचार करुन पण यश नाही आल.
__/\__
__/\__
खूपच आवडला हा लेख.
खूपच आवडला हा लेख. तुमच्याबद्दलचा आदर उत्तरोत्तर वाढतच आहे. +१
पुनरागमनाबद्दल शुभेच्छा डॉ.
पुनरागमनाबद्दल शुभेच्छा डॉ. साहेब.
सहजसुंदर लेखनशैली. एक केस माहित आहे एक्टोपिक प्रेग्नंसीची, म्हणून रिलेट करता आले.
किसन शिंदे, इनोची आपले अनुभवही जबरदस्त
अरे वा, खूप दिवसांनी तुमचा
अरे वा, खूप दिवसांनी तुमचा लेख वाचायला मिळतो आहे डॉ. साहेब.
बाकी तुम्ही आणि इतर सहकारी डॉक्टर ह्यांना नमस्कार!
Pages