"डॉक्टर साहेब, मी रमेश पटेल बोलतो आहे "
" नमस्कार, बोला पटेलसाहेब !" मी म्हणालो.
रमेश पटेल म्हणजे एक लाघवी व्यक्तिमत्व! चाळीशीच्या आसपासचे रमेशभाई माझे 'पेशंट कमी आणि शुभचिंतक जास्त' असे स्नेही होते. या पटेलांच्या पेशंट-शृंखलेचे पहिले पुरुष होते तंबाकूवाले 'मनुभाई पटेल'! काही माणसे आपल्यावर एवढे प्रेम कां करतात हे मला अजूनही कळलेले नाही. मनुभाई त्यांपैकीच एक ! माझे सर्जन मित्र डॉ.राम काळे यांनी मनुभाईनां प्रथम माझा रेफरन्स दिला होता पण त्यानंतर मनुभाई मला जे चिकटले ते कायमचेच! इतकेच नाही तर त्यांच्यामागे त्यांनी 'पटेल' आडनावाच्या पेशंटांची रांगच निर्माण केली. त्यांनी माझ्या व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळामध्ये खूप नवनवीन पेशंट माझ्याकडे पाठविले. त्यामुळे मनुभाई आणि त्यांचे सर्व कुटुंबच माझे स्नेही झाले होते. कागदांचा व्यवसाय करणारे 'रोटेरियन रमेशभाई' सोमवार पेठेत राहत असत. सदा हसतमुख आणि सर्वांशी मिळून मिसळून 'मित्र जमवण्याचा छंद' असलेले रमेशभाई साहजिकच खूपच लोकप्रिय होते. आज अचानक सकाळीसच रमेशभाईंचा फोन आल्यामुळे मी थोडा गडबडलोच!
"डॉक्टर, माझ्या घरी जरा प्रॉब्लेम झाला आहे. माझ्या सुनबाईंच्या पोटात फारच दुखत आहे. आपण इकडे व्हिजीट करून तिला तपासले असते तर बरे झाले असते."
'पेशंटला दवाखान्यामध्ये नेण्यापेक्षा डॉक्टरलाच घरी बोलाविणे सोपे' असा एक लोकप्रिय व सोयीस्कर समज(!) असतो. खरोखर जर इमर्जन्सी असेल तर अश्या वेळी डॉक्टर घरी येवून काहीच ट्रीटमेंट करू शकत नाहीत आणि शिवाय महत्वाचा वेळी वाया जाण्याची शक्यता असते. पण हे सर्व पेशंटला समजेपर्यंत बऱ्याच वेळा खूपच उशीर झालेला असतो.
"हे पहा रमेशभाई, जर पोटात दुखत असेल तर जवळच्या एखाद्या 'जनरल प्रक्टिशनर' डॉक्टरांना कां नाही बोलावत? शिवाय ते इंजेक्शन देखील देवू शकतील. आपणाला माहिती असेलच की मी इंजेक्शन देत नाही." ही व्हिजीट शक्यतो टाळण्याच्या उद्देशाने मी म्हणालो.
" डॉक्टर, आमच्या जीपींनी तपासून इंजेक्शन दिले होते पण त्याचा काहीच उपयोग झालेला नाही. तिला खूपच त्रास होतो आहे. आपण येवून तपासल्यानंतर वाटल्यास हॉस्पिटलमध्येही ठेवता येईल. मात्र आपण लगेच या. ती रात्रभर तळमळते आहे." रमेशभाई कळवळून बोलत होते.
आता ही व्हिजीट टाळता येणार नव्हती.
" रमेशभाई, मी आता नायडू हॉस्पिटलमध्ये राऊंडसाठी निघालोच आहे. तुमचे घर तसे माझ्या वाटेवरच आहे. मी पंधरावीस मिनिटांत तेथे पोहोंचतो. आपण काळजी करू नका."
"डॉक्टर, लवकर या, वाट पाहतो आहे."
खडकमाळआळी ते 'पंधरा ऑगस्ट लॉज' या पाच नंबर बसच्या मार्गाने माझ्या 'लॅम्ब्रेटा' स्कूटरने मी रमेशभाईंच्या घरी पोहोंचलो. एका बैठ्या घराच्या आवारामध्ये सर्व नातेवाईक उभे राहून माझी वाट पाहत होते. त्यातील एकाने चटकन पुढे येवून माझ्या स्कूटरचा ताबा घेतला तर स्वतः रमेशभाईंनी लगबगीने पुढे येवून माझ्या हातातील ब्रिफकेसचा! आम्ही दोघे पटकन घरात शिरलो.
एका मोठ्याशा खोलीमध्ये भिंतीला लागून एका सतरंजीवर सुमारे वीस वर्षांची स्त्री पांढरीशुभ्र साडी नेसून डोक्या तोंडावर पदर घेवून भिंतीला टेकून स्वतःला सावरत बसली होती.
"दक्षाबेन, डॉक्टर आये है!" रमेशभाईंनी मी आल्याची सूचना दिली. पांढऱ्या साडीच्या आत कोठेतरी थोडी हालचाल झाली.
मी ब्यागेतुन बीपी मशीन व स्टेथोस्कोप बाहेर काढले आणि तिच्या शेजारी बसलो.
"क्या तकलीफ है?" संभाषण सुरु करण्याच्या उद्देशाने मी पहिला प्रश्न केला.
थोडा वेळ काहीच उत्तर न आल्याने मी पुन्हा तोच प्रश्न विचारला.
" चक्कर आ रहा है" अस्पष्ट आवाजात तिचे प्रत्तुत्तर.
" आपका हात दिखाईए" तपासणीला सुरुवात करण्यासाठी मी म्हणालो.
उत्तरादाखल साडीमधून एक नाजूक गोरा हात बाहेर आला. मी रमेशभाईंकडे पाहून तिचा हात हातात घेतला. तिच्या हाताचा स्पर्श होताच मी हादरलो. तिचा हात बर्फासारखा थंड, आमच्या वैद्यकीय परिभाषेमध्ये 'कोल्ड एन्ड क्लामी' होता. तपासणीची पुढची पायरी म्हणून मी यंत्रवतरित्या तिच्या मनगटातील नाडी,'पल्स', शोधू लागलो. पुढचा धक्का आता होता. चांगला प्रयत्न करूनही दक्षाबेनची पल्स सापडत नव्हती. आता मात्र मी हादरलो होतो. आवाजामध्ये उसने अवसान आणून मी रमेशभाईंना म्हणालो,"जरा इनको नीचे लेटनेको कहो. मै बीपी देखना चाहता हुं"
इतकावेळ माझी ब्याग हातात घेवून शेजारी उभ्या असलेल्या एका तरुणाकडे पाहून ते म्हणाले,"अरे विनोदभाई, देखो डॉक्टर क्या कह रहे है"
विनोदभाईंनी लगबगीने पुढे येवून दक्षाबेनला सतरंजीवर आडवे झोपविले. खोलीतील इतर सर्व पुरुष मंडळी खोलीबाहेर गेली. मी चटकन बीपी मशीनचा पट्टा पेशंटच्या दंडाला गुंडाळला. बीपीचे रीडिंग होते फक्त 'सत्तर'! बीपी असायला हवे होते कमीतकमी शंभर! दक्षाबेनाचे बीपी खूपच कमी होते. वैद्यकीय परिभाषेमध्ये याला 'शॉक' असे म्हणतात. दक्षाबेन 'शॉक'मध्ये कां होती याचे कारण आता पुढील शारीरिक तपासणीमध्ये शोधावयाचे होते. तपासणी करतानाच मी तिचे पती,विनोदभाई, यांच्याकडून तिच्या तक्रारींची माहिती घेत होतो.
माझे विचारचक्र मात्र जोरात फिरत होते.
विनोद आणि दक्षा यांचा एक महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. तिची मासिक पाळी सुमारे तीन आठवड्यांपूर्वीच येवून गेली होती. पूर्वी कधीही असे पोटात दुखले नव्हते. तशी 'हेल्दी' असणारी दक्षा तिच्या आयुष्यात प्रथमच आजारी पडली होती.
"आपकी जुबान दिखाईये"
दक्षाची जीभ आणि ओंठ पांढरेफटक दिसत होते. हृदयाचे ठोकेही खूपच जलद पडत होते. ही सर्व पोटामध्ये रक्तस्त्राव झाल्याची लक्षणे होती.
"मुझे आपका पेट दिखाईए. कंहा दुखता है वह जगह अपनी उंगलीसे दिखाईए." मी.
"वैसे तो पूरा पेटही दुख रहा है. लेकीन सबसे ज्यादा नीचेवाले पेटमे दुखता है" आपल्या बोटाने ओटीपोटाच्या डावीकडील एक जागा दाखवीत दक्षा म्हणाली.
"देखो, पेट ढिला छोडो. मै आपका पेट दुखावूंगा नही. आप सिर्फ सबसे ज्यादा जहां दुखता वो मुझे बतायीये"
मी पोटाला स्पर्श करून हळुवारपणे तपासू लागलो. मऊ अपेक्षित असणारे तिचे पोट आज एखाद्या थंड फरशीला स्पर्श केल्याप्रमाणे घट्ट वाटत होते. तिच्या ओटीपोटामध्ये डाव्या बाजूला दुखत होते. त्या ठिकाणी स्पर्श करताच तिचा जीव असह्य वेदनांमुळे कळवळत होता.
मी विचार करीत होतो. हिच्या पोटदुखीचा आणि शॉकचा काय संबंध असावा? अपेंडीसायटीसची शक्यता कमी होती कारण हे दुखणे उजव्या नव्हे तर डाव्या बाजूला होते. शिवाय पोटाच्या तपासणीमध्ये 'लिव्हर डलनेस' शाबूत असल्यामुळे जठरातील अल्सर फुटला असण्याची अथवा आतड्यांस छिद्र पडले असण्याची शक्यताही नव्हती. दुखण्याच्या जागेवरून काहीतरी स्त्रीरोग म्हणजेच 'गायनिक' आजार असण्याची दाट शक्यता होती. नुकतेच लग्न झालेले व त्यातच इतके अचानक पोट दुखणे आणि बीपी कमी होणे या सर्व लक्षणांवरून दक्ष्याच्या पोटात 'गर्भ फुटला' असण्याची शक्यता जास्त होती.
स्त्रियांच्या गर्भ-पिशवीच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी एक अशा दोन बीजनालिका असतात. नेहेमीच गर्भ धारणा या दोन पैकी एका बीजनलीकेमध्ये होते व हा गर्भ हळूहळू नलीकेमधून मुख्य गर्भ पिशवीमध्ये सरकतो व तेथे रुजतो. काही अत्यंत कमी प्रसंगी हा गर्भ नलीकेमधून पुढे सरकत नाही व तेथेच म्हणजे बीजनलीकेतच वाढू लागतो. यालाच 'ट्यूबल प्रेग्नन्सी' किंवा 'एक्टोपिक जस्टेशन' असे म्हणतात. या नलीकागर्भाला वाढीसाठी जागा पुरेशी आणि योग्य नसल्याने एका ठराविक काळाने तो भरभर वाढणारा गर्भ ती नलिका फोडून टाकतो आणि मग पोटात रक्तस्त्राव होवू लागतो,आणि निर्माण होते एक खतरनाक वैद्यकीय इमर्जन्सी!
हा रक्तस्त्राव शुद्ध रक्त वाहिनीतून होत असल्यामुळे आपोआप थांबू शकत नाही. ताबडतोब शस्त्रक्रिया करून रक्तस्त्राव थांबविला नाही व वाहून गेलेल्या रक्ताची भरपाई केली नाही तर असा रुग्ण यातून वाचत नाही. हृदयाच्या प्रत्येक ठोक्याबरोबर रुग्णाच्या जीवनाचा 'कौंट-डाऊन' चालू झालेला दिसत असतो. झटपट आणि वेगाने योग्य उपचार झाले तरच उपयोग होतो.
माझ्या मनातील विचारमन्थनानंतर एकाच निदान स्पष्ट दिसत होते,'रप्चर्रड एक्टोपिक प्रेग्नन्सी'!
दक्षाला धीर देवून मी विनोदभाईंना घेवून मी खोलीबाहेर आलो. बाहेर बरीच मंडळी उभी होती. मी रमेशभाईंना म्हणालो,
"रमेशभाई, दक्षाबेनके पेटमे बहोत ज्यादा ब्लीडींग हो रहा है. उनकी तबियत एकदम ज्यादा गंभीर है .
उनके जान को खतरा है. उनको किसी बडे हॉस्पिटलमें भरती करना चाहिये. खून चढाना जजूरी है. ऐसे हॉस्पिटल जहां ब्लड बँक की सुविधा हो वहां जल्दी ले जानेसे दक्षाबेन बच सकती है."
"अरे मग आपले केईएम हॉस्पिटल आहे की जवळच! माझ्या मोटारीतून लगेच हलवू."
पांढरे शुभ्र कपडे घातलेले एक पैलवान वाटणारे गृहस्थ पुढे सरसावले. ते त्या भागातील प्रसिद्ध नगरसेवक श्री. मधुकर बिडकर होते हे मला नंतर कळाले. त्यांनी पटकन आत जाऊन एखाद्या लहान मुलाला उचलावे तसे त्यांनी दक्षाला उचलले आणि बाहेरच उभ्या असलेल्या मोटारीत अलगद ठेवले. ते आणि विनोदभाई तातडीने हॉस्पिटलकडे निघाले. केईएम हॉस्पिटल तेथून जवळच होते. मी आणि रमेशभाई देखील स्कूटरने त्यांच्या पाठोपाठ केईएम हॉस्पिटलकडे निघालो.
केईएम हॉस्पिटल पुण्यातील एक मोठे आणि चांगले हॉस्पिटल! गेली अनेक वर्षे पुण्याच्या पूर्व भागातील गोरगरिबांची खऱ्या अर्थाने सेवा करण्याबद्दल प्रसिद्ध आहे. हॉस्पिटलच्या प्रमुख पद्मश्री डॉ सौ बानू कोयाजी यांनी हॉस्पिटल व त्यातील रुग्णांसाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेतले होते. श्री मधुकर बिडकर त्याच भागातील असून त्यांचे डॉ बानूबाईंशी खूपच जवळचे सामाजिक संबंध होते. त्यांचा केईएममध्ये चांगलाच दबदबा होता.
याचे प्रत्यंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोंचाताक्षणीच आम्हाला दिसले. केईएमच्या आपद्कालीन विभागामध्ये बिडकरांना पाहून भराभर हालचाल सुरु झाली. डॉक्टर आणि नर्सेस यांनी मिळून ताबडतोब रक्ताचे नमुने घेवून सलाईन सुरु केले. एक्सरे,ईसीजी झाला. तेंव्हा आज सारखी सोनोग्राफिची सोय नव्हती. सर्व निदान व निर्णय शारीरिक तपासणी वरच ठरत असे. पाचच मिनिटामध्ये स्वतः डॉ.बानू कोयाजी पेशंट तपासण्यासाठी आल्या. त्यांनी दक्षाची आतून तपासणी केली व दक्षाबेनला 'रप्चर्रड एक्टोपिक प्रेग्नन्सी' असल्याचे कन्फर्म केले.
"लिसन,डॉक्टर्स, धिस इज ए व्हेरी सिरीयस केस! गेट हर बीपी अप, फास्ट, रिअल फास्ट!! अरेंज फॉर ब्लड,अनेस्थेटिस्ट,ओटी!" डॉ. कोयाजी कडालल्या.
सर्व चक्रे भरभर फिरू लागली. नशिबानेच माझ्या वर्गमित्र डॉ सौ आशा काळे ह्याही त्याच दिवशी ड्युटीवर होत्या.मीही माझे पुढील काम सहकारी मित्रांना सोपवून डॉ काळेंच्या बरोबर थांबलो. पुढच्या दहाव्ह्याच मिनिटाला दक्षाबेन ऑपरेशन थिएटरमध्ये होती. स्वतः डॉ. बानूबाई सर्जरीसाठी आल्या होत्या.
"म्याडम, पेशंटचे बीपी ११० बाय ७० आहे. पल्स उत्तम आहे. दोन युनिट ब्लड ऑलरेडी गेले आहे. गेल्याच आठवड्यामध्ये '१५ ऑगस्ट' झाल्यामुळे भरपूर ब्लड उपलब्ध आहे. मी आता भूल देवू कां?" भूलतज्ञांनी डॉ कोयाजींना सांगितले.
"आणखी पाच बाटल्या ब्लड मागवून घ्या. ओपन केल्यावर गडबड नको." सर्जिकल गाऊन आणि ग्लोव्ह्स चढवताना बाई पुढच्या सूचना देत होत्या.
डॉ आशा काळे बाईंना मदत करत होत्या. मी त्यांच्या मागे मॉनिटरवर सतत रेखाटल्या जाणाऱ्या दक्षाबेनच्या ईसीजी ट्रेसिंगवर नजर ठेऊन होतो. सारे काही ठीक दिसत होते. दक्षाच्या नशिबाने आत्तापर्यंत तरी चांगलीच साथ दिली होती.
डॉ. काळेंनी दक्षाच्या पोटाला आयोडीनने पेंट करून शरीराचा पोटाखेरीज इतर सर्व भाग 'स्टेरायील' जंतुरहित कपड्यांनी झाकून टाकला होता.
"म्याडम, पेशंट इज रेडी!" डॉ. काळेंनी म्याडमला रिपोर्ट केले.
डॉ. कोयाजींनी ऑपरेशनला सुरुवात केली.
"लूक अप एव्हरी बडी, पे अटेन्शन हिअर, मी आता इन्सीजन घेत आहे. सिस्टर, सक्शन रेडी प्लीज!" एवढे म्हणून बानूबाईंनी हातातील तीक्ष्ण स्कालपेलने दक्षाच्या पोटावर छेद घेतला. पुढच्याच क्षणी दक्षाच्या रक्ताच्या चिळकांड्या सर्वांच्या गाऊनवर उडाल्या. सिस्टर व सहकारी डॉक्टर्स सक्शन मशीन आणि जंतुरहित कपड्यांचे स्वाब घेऊन रक्त टिपू लागले. दक्षाचे पोट एखाद्या रक्ताने भरलेल्या भांड्यासारखे दिसत होते. जितके रक्त टिपावे तितके आणखीनच पुन्हा भरत होते. बीपी पुन्हा कमी होत चालले होते. भूलतज्ञ व इतर डॉक्टर्स सिरींजने दक्षाच्या शिरेमध्ये रक्त 'पुश' करीत होते.
"करेक्ट डायग्नोसिस! पुअर गर्ल! शी विल नीड मोर ब्लड! कीप ऑन पुशिंग ब्लड, फास्ट! नाऊ, आय विल क्याच द ब्लीडर!" असे म्हणून एखाद्या पाण्याच्या तळ्यात हात घालून आत फुटलेला नळ शोधल्याप्रमाणे त्यांच्या अनुभवी हातांनी दक्षाच्या रक्तबंबाळ पोटात ब्लीडरचा अंदाज घेतला आणि त्याला पटकन चिमटा लाऊन टाकला. आणि काय आश्चर्य ! दक्षाबेनची परिस्थिती झपाट्याने सुधारू लागली. आता नवीन रक्ताने पोटाची पोकळी भरत नव्हती. आतले अवयव स्पष्ट दिसू लागले होते. बीपी स्टेबल होऊ लागले होते. सर्वांच्या चेहेरयावरील तणावाची जागा आता आशेने आणि उत्साहाने घेतली होती. पुढील काही मिनिटांतच बानूबाईंनी दक्षाचे ऑपरेशन संपवले. तिची डावी बिजनलिका काढून टाकावी लागली होती पण उजवी नलिका हेल्दी असल्याचे त्यांनी पहिले होते आणि त्यामुळे भविष्यकाळामध्ये दक्षा पुन्हा गरोदर राहू शकणार होती. ऑपरेशन संपताना दक्षाला दिलेल्या रक्ताच्या बाटल्यांचा हिशेब झाला. रक्ताच्या एकूण बाटल्या भरून झाल्या होत्या - 'सतरा'!
पंधरा ऑगस्टच्या शुभदिवशी ज्या सतरा नागरिकांनी रक्तदान केले होते त्यांनी खरोखरच दक्षाबेनला जीवनदान दिले होते.
नंतरचे दोन दिवस अति दक्षता विभाग व नंतर आणखी एक आठवडा साध्या वार्डमध्ये काढून दक्षा घरी परतली. तिच्या आई वडिलांना हिचे 'दक्षा' हे नाव ठेवतांना भविष्यकाळात 'दक्षकन्या पार्वती' प्रमाणे हिलाही असेच 'अग्नीदिव्य' करावे लागणार याची पुसटशीही कल्पना आली नसेल.
या प्रसंगानंतर मी तिला घरी भेटायला गेल्यानंतर तशाही अवस्थेमध्ये ती व विनोदभाई खाली वाकायला विसरले नाहीत. दक्षाचा कृतज्ञतेने ओथंबलेला चेहेरा पाहून मला माझ्या कष्टांचे चीज झाल्याचा आनंद झाला.
खरे म्हटले तर दक्षाच्या पुनर्जन्माची ही गोष्ट येथेच संपली,पण दक्षाबेन आणि विनोदभाईं बरोबरचा प्रवास पुढे अनेक वर्षे चालू राहिला. डॉक्टर-पेशंट हे नाते तेंव्हाच विरघळले होते आणि स्नेह-बंध निर्माण झाले होते. दोन-तीन वर्षानंतर दक्षाबेन पुन्हा गरोदर झाली-अर्थातच उजव्या बीजनलिकेमधून! खरोखर स्त्रियांच्या सोशिकपणाची प्रशंसा करावी तेवढी थोडीच! इतिहासाची पुनरावृत्ती न होता दक्षाबेन सुखरूप पुत्ररत्न प्रसवली. केतन आज वीस वर्षांचा असून अमेरिकेत शिकत आहे. विनोदभाईंचा व्यवसाय देखील उत्तम चालू आहे.
या प्रसंगानंतर दोनतीन अश्याच 'एक्टोपिक' प्रेग्नन्सीजचे मी निदान केलेले. पण आता सोनोग्राफी यंत्रे पटकन उपलब्ध होत असल्यामुळे निदान शहरामध्ये तरी एक्टोपिकचे निदान तो गर्भ फुटण्याच्या आधीच होऊ शकते व वेळीच शस्त्रक्रिया करता येते. पण खेड्यांमध्ये आरोग्यसंस्थेची अवस्था अजूनही पूर्वीसारखीच असल्याने तेथील डॉक्टरांना कदाचित आजही अशाच दक्षाबेन पुन्हा भेटण्याची शक्यता जरूर आहे.
वेल्कम बॅक. आता वाचते.
वेल्कम बॅक.
आता वाचते.
हॉरिबल! माझ्याही एका
हॉरिबल! माझ्याही एका मैत्रिणीला अशीच बीजनलिकेतली प्रेग्नन्सी डिटेक्ट झाली होती असह्य पोटदुखीनंतर. मरता मरता वाचली, असंच डॉ. म्हणाल्या.
खूप दिवसांनी तुमचा नवा लेख वाचायला मिळाला डॉक्टर. नेहमीप्रमाणेच उत्कंठावर्धक आणि माहितीपूर्ण!
केईएमच्या दिशेने जाणारी
केईएमच्या दिशेने जाणारी बिडकरांची कार, त्यामागे डॉ.सुरेश शिंदे यांची लॅम्ब्रेटा....हा प्रवास इतका जिवंत उभा राहिला नजरेसमोर की "आता पुढे काय होईल ?" अशीच उत्सुकता दाटून राहिली मनी. डॉ.बानू कोयाजी यांच्यावर डॉक्टरांचा असलेला विश्वास किती सार्थ होता हे वर्णनावरून चटदिशी समजून येते. या सार्या प्रकरणात दक्षाबेनला घरी तपासल्यावर लागलीच झालेले निदान महत्त्वाचे ठरते आणि तातडीने ऑपरेशन हाच एकमेव मार्ग हे पटेल फॅमिलीला कोणत्या रोखठोक शब्दात पटवून दिले असेल याचाही अंदाज येतो.
तांत्रिक व शास्त्रीय घडामोडीमध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्यांना जास्त काही समजत नसले तरी अशा एका डॉक्टराच्या हाती आपला पेशंट दिला आहे की ज्याच्या कर्तृत्वामुळे पेशंट धडधाकट होऊनच घरी परतेल याचा विश्वास वाटतो...पटेल यानी जेव्हा डॉ.शिंदे याना बोलाविले त्यावेळीही त्या कुटुंबाच्या मनी हाच विश्वास असेल याची खात्री आहे.
"...तशाही अवस्थेमध्ये ती व विनोदभाई खाली वाकायला विसरले नाहीत...." ~ हे फार महत्त्वाचे आहे. फीज पेक्षाही याचे मोल तुम्हाला जास्त वाटले असेल यात शंका नाही.
नेहमीप्रमाणेच सुंदर फारच
नेहमीप्रमाणेच सुंदर फारच आवडले.
डॉक्टर, नेहमीप्रमाणेच सुंदर
डॉक्टर, नेहमीप्रमाणेच सुंदर आणि माहितीपुर्ण लेख.
खुप दिवस तुमच्या नविन लेखाची वाट पाहत होतो. तुम्ही तुमचे जे अनुभव इथे शेअर करता त्यामुळे आमच्या ज्ञानात अमुल्य भर पडत असते.
खूप दिवसांनी तुमचा लेख
खूप दिवसांनी तुमचा लेख वाचायला मिळतो आहे डॉ. साहेब.
तुमचे अचूक रोग-निदान, डॉ. कोयाजींची शस्त्रक्रियेतील निपुणता आणि दानशूर रक्तदाते या सगळ्यांबद्दल एक आदरच मनात दाटला. त्याचबरोबर <<< स्त्रियांच्या सोशिकपणाची प्रशंसा करावी तेवढी थोडीच! >>> हे तुमचे वाक्यही अतिशय मोलाचे ...
विनोदभाईं आणि त्यांच्या कुटुंबियांबरोबर तुमचे जे स्नेह-बंध निर्माण झाले हेही अगदी सहाजिक व भावनिकही.
खूपच आवडला हा लेख. तुमच्याबद्दलचा आदर उत्तरोत्तर वाढतच आहे.
डॉक...पुन्हा एकदा
डॉक...पुन्हा एकदा नतमस्तक!!
तुमच्या लेखनशैलीलाही दाद!!.. सगळं वाचून झाल्यावर जीव अगदी भांड्यात पडला..!
नेहेमी प्रमाणेच रंजक,
नेहेमी प्रमाणेच रंजक, उत्कंठावर्धक आणि ज्ञानवर्धक लेख. किती सहजसुंदर लिहिता आपण..
मस्त ...नेहमीप्रमाणेच
मस्त ...नेहमीप्रमाणेच
काळ आला होता .. पण त्या आधी
काळ आला होता .. पण त्या आधी सर तुम्ही आलात.
सोशिकता म्हणाल तर हा शब्द खास स्त्रियांसाठीच बनवला आहे. या प्रसंगानंतरही दोन तीन वर्षांतच त्यांना मात्रुसुख लाभले हे विशेष चांगले वाटले. एकंदरीत आई होण्याचे भाग्य राखणार्या स्त्रियांबद्दलचा आदरही दुणावला !
डॉक्टर... पोटात खड्डा पडला
डॉक्टर... पोटात खड्डा पडला वाचताना....
हॅट्स ऑफ टु यु अॅण्ड ऑल द टीम हु डिड धिस ऑपरेशन
खरच खूप छान माहिती मिळते
खरच खूप छान माहिती मिळते तुमच्या लेखातून
खूप छान मनापासून आवडली
खूप छान मनापासून आवडली
नेहमीप्रमाणे, खूपच छान आणि
नेहमीप्रमाणे, खूपच छान आणि माहितीपूर्ण लेख.
तुमचे अचूक रोग-निदान, डॉ. कोयाजींची शस्त्रक्रियेतील निपुणता आणि दानशूर रक्तदाते या सगळ्यांबद्दल एक आदरच मनात दाटला. तुमच्याबद्दलचा आदर उत्तरोत्तर वाढतच आहे.>>>>>>>>+ १
नेहेमी प्रमाणेच
नेहेमी प्रमाणेच रंजक,
उत्कंठावर्धक
आणि ज्ञानवर्धक लेख.
किती सहजसुंदर
लिहिता आपण..>>>> +1111
नजरे समोर प्रसंग साक्शात उभ
नजरे समोर प्रसंग साक्शात उभ करण्याच्या तुमच्या कसोटीला सलाम! वेलकम बॅक! पुढच्या कथेच्या प्रतिक्शेत....
नेहेमी प्रमाणेच
नेहेमी प्रमाणेच रंजक,
उत्कंठावर्धक
आणि ज्ञानवर्धक लेख.
किती सहजसुंदर लिहिता आपण..>>>> सर्वस्वी अनुमोदन
अशीच एक घटना झाल्या वर मी
अशीच एक घटना झाल्या वर मी एकीला भेटलेली आहे. त्यावेळी तिनी भोगलेल्या यातनांची जाणीव आज मनाला भिडली.
खूप सुंदर लेखन
शेवटपर्यंत श्वास रोखायला
शेवटपर्यंत श्वास रोखायला लावता डॉ. तुम्ही!
एखाद्या पाण्याच्या तळ्यात हात घालून आत फुटलेला नळ शोधल्याप्रमाणे त्यांच्या अनुभवी हातांनी दक्षाच्या रक्तबंबाळ पोटात ब्लीडरचा अंदाज घेतला आणि त्याला पटकन चिमटा लाऊन टाकला.<<< अगदी नजरेसमोर आलं. आताची सोनोग्राफी वगैरे साधनं नसताना अशा शस्त्रक्रिया म्हणजे रोगनिदान करताना डॉक्टरांची/शल्यचिकित्सकांची केवढी मोठी कसोटी आणि केवढी जबाबदारी! रुग्णाच्या प्राणाचीच.
मस्तच, माहीतीपुर्ण लेख,
मस्तच, माहीतीपुर्ण लेख, तुमचे प्रत्येक लेख वाचायला आवडतात.
नेहमीप्रमाणे, खूपच छान आणि
नेहमीप्रमाणे, खूपच छान आणि माहितीपूर्ण लेख.=+१
शेवटपर्यंत श्वास रोखायला लावता डॉ. तुम्ही!= +१
ऐका स्त्रीजन्मा तुमची
ऐका स्त्रीजन्मा तुमची कहाणी....... (अन हे वाचून समजुन माहित असुनही स्त्रीला कमसर-भोगदासी लेखणारे पुरुष बघितले की खेटराने हाणावे वाटते त्यान्ना, असो)
वाचताना अन्गावर काटा आला.
डॉ. बानू कोयाजी.... वन्दनीय व्यक्तिमत्व. (१९६८/६९ चे सुमारास त्यान्नी केलेल्या उपचारान्नीच आई वाचली होती)
>>>>> पंधरा ऑगस्टच्या शुभदिवशी ज्या सतरा नागरिकांनी रक्तदान केले होते त्यांनी खरोखरच दक्षाबेनला जीवनदान दिले होते <<<<< अगदी अगदी
नेहेमीप्रमाणेच छान लेख..
नेहेमीप्रमाणेच छान लेख.. श्वास रोखला गेला वाचता वाचता..
नेहमीप्रमाणे माहीतीपूर्ण आणि
नेहमीप्रमाणे माहीतीपूर्ण आणि उत्कंठावर्धक!
बर्याच दिवसानी
बर्याच दिवसानी दिसताय.नेहमीप्रमाणे, उत्कंठावर्धक्,माहितिपुर्ण,खूपच छान कथा.
ऐका स्त्रीजन्मा तुमची
ऐका स्त्रीजन्मा तुमची कहाणी....... (अन हे वाचून समजुन माहित असुनही स्त्रीला कमसर-भोगदासी लेखणारे पुरुष बघितले की खेटराने हाणावे वाटते त्यान्ना, असो)>>>>>>>>>>> अनुमोदन
नेहमीप्रमाणेच छान लेख! माझ्या
नेहमीप्रमाणेच छान लेख!
माझ्या मित्राच्या आईच्या एक्टोपिक प्रेग्नंसीच्या जून्या आठवणी जाग्या झाल्या. अंब्युलन्सची सोय नव्हती. गावात नविनच आलेल्या सरकारी डॉक्टरांनी ओळखीच्या लोकांंच्या गाडीतून दीड तास प्रवास करुन तालूक्याच्या गावाहून सायनला नेले होते. रक्त द्यायला लगेल म्हणून गावातील माणसे बरोबर गेली होती. मी तेव्हा ६वी-७वी त होते. नक्की काय झाले कळायचे वय नव्हते. रात्री माझी बहीण आणि मित्र घाबरुन आईचा हात पकडून झोपले होते आणि मी बाबांचा. दुसर्या दिवशी आईने मला आणि मित्राला नक्की काय झाले ते सोप्या भाषेत समजावून सांगितले होते.
नेहमीप्रमाणेच छान लेख! फार
नेहमीप्रमाणेच छान लेख!
फार सोप्या भाषेत असतात तुमचे लेख, अगदी कुणालाही कळतील असे. भरपूर नवी माहीती, आजार, रोग कळतात.
डॉ. साहेब, एक शंका आहे.
डॉ. साहेब, एक शंका आहे. पुर्वीच्या काळी जेव्हा स्त्रीया घरी प्रसुत होत किंवा सहजा सहजी हे निदान होत नसे तेव्हा नवविवाहीता तडका- फडकी म्रुत्यु पावत की काय ?
अतिशय अल्प प्रमाणात घडणार्या या परिस्थीतीत पुर्वीच्या काळी काय होत असे हे जाणण्याची इच्छा आहे.
नेहमीप्रमाणेच सुरेख लेख.
नेहमीप्रमाणेच सुरेख लेख.
Pages