अवतार.....

Submitted by Mandar Jog on 9 July, 2014 - 01:22

ते जाणार हे सहा महिन्यांपूर्वीच माहित झालं होतं सर्वांना. शेवटच्या स्टेजला असलेल्या आतड्याच्या कर्करोगाचं निदान करायला निष्णात डॉक्टरची देखिल गरज नव्हती. अण्णा आता काही महिन्यांचे सोबती होते. त्याने मुलगा म्हणून जे शक्य उपचार होते ते केले. शेवटचा महिनाभर तर हा स्वतः सबंध वेळ शेजारी बसून होता. बिनपगारी रजा काढून. आम्हा सर्वांनाच आश्चर्य वाटत होतं. तसं करायची काहीच गरज नव्हती. केस लास्ट स्टेजची होती. त्यांच्या जायची वाट पाहायची होती आणि कमीत कमी त्रास होऊन ते जावेत एवढी प्रार्थना करण्यापलीकडे कोणाच्याच हातात काही नव्हते. पण हा ऐकायला तयार नव्हता. शेवटी तो दिवस आला. अण्णा गेले. आम्ही जवळचे मित्र हेच त्याचे नातेवाईक. अण्णांच्या विचित्र स्वभावामुळे मुळातच कमी असलेले नातेवाईक केव्हाच दुरावले होते. इतके की त्यांना दोन वर्षांपूर्वी नानी गेल्या हे देखिल माहित नव्हते. तेव्हापासून अण्णा आणि हा दोघेच घरात. नानी गेल्यावर अण्णांच घरातून बाहेर पडणं कमी झालं. वाचन, टीव्ही कशाचीच विशेष आवड नव्हती त्यांना. BPT मधून निवृत्ती घेतल्यावर घरीच असायचे. मिळालेल्या फंडाची पैनपै फिक्स्ड डीपोझीटला टाकून त्याच्या व्याजावर आणि पेन्शनवर चालले होते त्यांचे. फालतू खर्च करायचा नाही हा अण्णांचा शिरस्ता. “गरज” ह्या पलीकडे केलेला कोणताही खर्च वायफळ वाटे त्यांना. आयुष्यभर १८० फुटाच्या डबल रुममध्ये राहिले. खरं तर ब्लॉक घेणे सहज शक्य होते त्यांना. पण नाही. हा म्हणायचाच “माझा बाप कवडीचुंबक आहे म्हणून साला मी मित्रांची थोटक ओढून आणि बियर शेयर करून मी आनंद घ्यायचा. माझ्या वाढदिवसाला मित्रच पार्टी देणार. माझा बाप पैसे गां#खाली दाबूनच गचकणार!!!”

बर ह्याला लहानपणापासून पोलियो. उजवा पाय पूर्ण लुळा. डाव्या हाताच्या हालचाली देखिल restricted आणि बुद्धी सामान्यच्या खालची. शाळेत आमच्याबरोबर रमला. जेमतेम पास होऊन कॉलेजला आर्टसला गेला. ते काही झेपलं नाही. मग कॉलेज सुटल मधेच केव्हातरी. मग बारीक सारीक नोकऱ्या, उद्योग. वडापावची गाडी, लॉटरीचा स्टोल सगळं करून झालं. आमची शिक्षणं होऊन संसार सुरु झाले. ह्याचं लग्नकार्य काहीच नाही. तो म्हणायचा देखिल “साला आम्ही रोकडा प्यारवाले. आम्हाला तुमच्यासारखं आयतं घरात नाही मिळत. आम्ही कॉंग्रेस हाउस आणि सुखलाजी स्ट्रीटला जाऊन जेवतो” ते बरोबर की चूक ह्यात आम्ही कधीच पडलो नाही किंवा त्याला सांगायला गेलो नाही. कारण तो करतो ते चूक मग बरोबर काय ह्याचे उत्तर निदान त्याच्यापुरते तरी आमच्याकडे नव्हते. त्याने त्याच्यासाठी सोय शोधून ठेवली होती. अण्णांच्या ओळखीतून एका दुकानात मालाची बुकात एंट्री करायची नोकरी लागली. गेली अनेक वर्ष टिकली देखिल.

अण्णांच्या आजाराच कळल्यावर आम्ही सगळे मित्र वेळ मिळेल तसे भेटून येत होतो. सर्वांना जाणवलेला एक फरक म्हणजे त्याचं अण्णांशी बदललेल वागणं. अचानक तो अण्णांच्या खूप जवळ गेल्यासारखा वाटला. इतकी वर्ष आपला बाप कद्रूस आणि सणकी आहे म्हणून एक दुरावा ठेवून असलेला तो अण्णांच्या बाबतीत खूप भावूक झालेला जाणवला. मग ते बिनपगारी रजा घेऊन त्यांच्या शेजारी दिवसरात्र बसणं असो, ते गेले तेव्हा “अण्णा गेले रे” असा आम्हाला आलेला फोन असो किंवा त्यांना अम्ब्युलंस मधून नेताना “भटजीला कळवल आहेस ना रे” अस मला विचारणं असो ...हे सगळं आम्हाला नवीन होतं. अम्ब्युलंसमध्ये त्याच्या डोळ्यात एक टिपूस नव्हतं. तो फक्त अण्णांकडे टक लाऊन पहात होता. त्यांचा हात हातात घट्ट धरून स्मशान येई पर्यंत तो बसला होता.

सर्व विधी पार पडले. बॉडी उचलून भट्टीजवळ नेली. भट्टीच्या ट्रोलीवर अण्णांचा कॅन्सरने पोखरून कृश झालेला मृतदेह ठेऊन सगळे मागे होऊन उभे राहिले. भट्टीचे लोखंडी दार उघडले. एकदम गरम हवेचा लोळ सर्वांच्या अंगावर आला. ती धग जाणवून सर्वच आणखी दोन पावलं मागे सरकले. तो तसाच उभा होता. शून्यात नजर लाऊन. ट्रोलीकडे पहात. ट्रोली आपोआप पुढे सरकली, लोखंडी दरवाजा ओलांडून आज गेली, आगीच्या अक्राळ विक्राळ ज्वाळांनी पांढऱ्या कपड्यात लपेटलेल्या त्या देहाला विळखा घातला आणि स्वतःमध्ये लपेटून घेतले. लोखंडी दार बंद झाले आणि इतका वेळ त्याने दाबून ठेवेलेला अश्रूंचा बांध सुटला......

आम्हाला मिठी मारून तो लहान मुलासारखा ओक्साबोक्शी रडला. बराच वेळ. आवेग ओसरल्यावर बाहेर पडलो. पाऊस नुकताच पडून गेला होता. स्मशानासामोरच्या टपरीवर चहा घ्यायला आम्ही सगळे थांबलो. फुक्यानी बिड्या पेटवल्या. ह्याने देखिल दोन दम मारले. चहाचे दोन घोट घशाखाली गेल्यावर एक मोठ्ठा दम मारून तो बोलू लागला. “अण्णांचा कॅन्सर डीतेक्त झाला तो डायरेक्ट लास्ट स्टेजला. डॉक्टरनी सहा महिन्याचा टाईम दिला होता. अण्णा खंबीर होते. He was a strong man yaar. अण्णांनी मला एक दिवस लवकर घरी बोलावलं. मी समोर बसलो. आपण शाळेत असताना ते अभ्यास घ्यायचे तेव्हा बसायचो तसा. साला मार्क्स कमी पडायचे, डोक्यात काही शिरायचं नाही तेव्हा पण त्यांनी कधी हात उचलला नाही की रागावले नाही यार. त्या दिवशी त्यांनी एक फाईल माझ्या हातात दिली. त्यात त्यांच्या सगळ्या गुंतवणुकीची माहिती, रिसीट, certificates सगळं होतं. पुण्याच्या फ्ल्याटचं माझ्या नावाचं अग्रीमेंट आणि ११ महिन्याचं अडवान्स भाडे घेतल्याची पावती पण होती. मला म्हणाले “माझ्या नंतर तुला काम करायची गरज नाही. मजेत जग. स्वतःची काळजी घे. जग फिरून ये. खर्च केलेस तर संपणार नाहीत एवढे पैसे मी तुझ्यासाठी ठेवले आहेत. फक्त उडवलेस तर कुबेरपण पुरा पडणार नाही.” मी ती फाईल घेऊन उठलो. अण्णा कॉटवर झोपले. मी रात्री ती फाईल वाचून परत त्यांच्या कपाटात ठेवायला गेलो तेव्हा त्यांची एक डायरी हाताला लागली. सहज उघडली. त्यात एक खूप जुनं पत्र होतं. अण्णांनी कोकणातून नानीला लिहिलेलं. अण्णांनी लिहिल होतं की “आज पाहटे आपल्या घराबाहेर कापडात गुंडाळलेला एक मुलगा मला सापडला. धडका असता तर पोलिसात कळवून अनाथश्रामात पाठवला असता. पण हे खास पिल्लू दिसतं आहे. आपल्याला महाशिवरात्रीला भल्या पहाटे वेळणेश्वराने दिलेला प्रसाद. म्हणून ह्याचं नाव प्रसाद! त्याला मी आपला मानला आहे. तो जसा आहे तसा मला मान्य आहे. आता आणखी अपत्य नको. हाच आपला आहे. जसा आहे तसा. आपल्यानंतर त्याची सोय करणे महत्वाचे आहे. सबब आजपासून स्वतःवरील सर्व खर्च बंद. मी त्याला घेऊन उदया कोकणातून निघत आहे!”

आम्ही सगळे सुन्न होऊन ऐकत होतो. प्रसाद बोलत होता. “तो भट्टीचा दरवाजा बंद झाला ना तेव्हा जाणीव झाली की मेल्यानंतर का होईना आपल्याला समोर दिसत असलेला माणूस तो दरवाजा बंद झाला की परत कधीच न दिसण्यासाठी निघून जातो. अण्णा परत कधीच “दिसणार” नाहीत हे जाणवले आणि मला राहवले नाही. जाम रडायला आलं. साला आयुष्यभर कद्रूसपणा करणारा माझा बाप माझा बाप नव्हताच रे. तो माझ्या उद्यासाठी स्वतःच्या आजचं बलिदान देत असलेला एक देव होता ज्याचं देवत्व मला त्याचा अवतार संपायच्या जरा आधी लक्षात आलं. मला सत्य समजू नये म्हणून त्याने नातेवाईक तोडले. आणि मी? श्या!!! साला माझी लायकीच नाही यार त्यांचा मुलगा म्हणवून घ्यायची!!” डोळ्यातून ओघळणारे अश्रू पुसण्याचा प्रयत्न न करता प्रसाद त्यांना वाहून देत होता....मोकळा होत होता. थोडा थांबून तो म्हणाला “मी अण्णांना कळू दिलं नाही की मला सत्य माहिती झालं आहे. पण जमेल तेवढी त्यांची सेवा करून आयुष्यात त्यांना त्यांच्यामागे दिलेल्या शिव्यांच प्रायश्चित्त करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला यार!!!”
आम्ही ऐकत होतो. प्रसाद फुटून रडत होता. पाऊस जोरात सुरु झाला होता. अण्णांचा प्राण पंचत्वात विलीन झाला होता. प्रसादच्या झोळीत आनंदाचे दान टाकून एक अवतार संपला होता! पाऊस कोसळू लागला होता!!!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users