सखे तुझ्या केसांमधले

Submitted by मिल्या on 14 April, 2014 - 07:02

सखे तुझ्या केसांमधले गजरे दरवळतात किती
जीभ, कान, डोळे माझे नाकावर जळतात किती

पर्वत बघुनी कळते का, उन्हे त्यास छळतात किती
असंख्य डोळ्यांतुन त्याच्या अश्रू ओघळतात किती

घातलेस तू माझ्यावर जगावेगळे घाव असे
खपल्या धरल्यावर सुद्धा जखमा भळभळतात किती

प्रवासात आयुष्याच्या, पदोपदी हे जाणवते
मी सरळच चालत असतो पण रस्ते वळतात किती

तुझ्यासारखा गाव तुझा, आहे पवित्र अन् निर्मळ
झरे सोड डबकीसुद्धा, इथली खळखळतात किती

एक असा क्षण येतो की, स्तब्ध किनारा होते मन
शब्दांच्या उत्कट लाटा, येउन आदळतात किती

दारावर येते जेव्हा, मोहमयी ही झुळुक तुझी
भले भले निश्चय माझे, तेव्हा डळमळतात किती?

कधी ओळ सुचतेच अशी की देजावू वाटावे
एका ओळीमध्येही कविता आढळतात किती?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिंचकर ..कधीकधी आपल्याला भास होतात (अनेकांना होतात) की आपण डोळ्यासमोर जे दृश्य जी घटना पाहात आहोत ती आपण पोर्वीही जशीच्या तशी अनुभवलेली आहे म्हणजे ही घटना अशीच्या अशी घडून गेली आहे आणि त्याही वेळी अपण तिथे आतासारखेच उपस्थित होतो ...इत्यादी

ह्या अनुभूतीला देजा-वू म्हणतात (Deja Vu ) हा माझ्या माहीतीप्रमाणे फ्रेंच शब्द आहे

एक असा क्षण येतो की, स्तब्ध किनारा होते मन
शब्दांच्या उत्कट लाटा, येउन आदळतात किती

कधी ओळ सुचतेच अशी की देजावू वाटावे
एका ओळीमध्येही कविता आढळतात किती?

हे दोन शेर आवडले.

परत एकद सर्वांनाच धन्यवाद... सॉरी खूप दिवसांनी इकडे आल्याने आभार मानयचे राहून गेले Sad

नचिकेत : तुला विशेष धन्यवाद... माझ्यासाठी अगदी खास प्रतिक्रिया..

वैवकु : एकदम सही विवेचन

Pages