एकदा का सह्याद्री ट्रेकिंगची चटक लागली, की भलेभले गंडतात. मग दरवेळी मोठ्ठा ट्रेक अगदीच शक्य नसला, तरी 'दुधाची तहान दुधानेच भागवण्या'साठी (म्हणजे ट्रेकिंगचा निखळ आनंद देणारी) जवळची अल्पपरिचित ठिकाणं शोधायची. कुठल्याश्या त्रोटक १-२ ओळींच्या संदर्भावर आडवाटा पकडायच्या. तिथे गेल्यावर या अनवट जागा खरंच सापडतील का, असं चक्र डोक्यात चालू असतं. सुदैवानं सह्याद्रीत अश्या ठिकाणांचं रत्नभांडार आहे.
'उकसण आणि पाल लेणी' धुंडाळताना...
गेल्या वर्षी अश्याच एका भटकंतीत अल्पपरिचित अश्या आंदरमावळातल्या 'काम्ब्रे लेण्यां'चा रसास्वाद घेतला, तेंव्हाच कामशेत जवळपासच्या 'उकसण आणि पाल लेण्यां'बद्दल ऐकलं होतं. पुणे - मुंबई महामार्गाजवळ असूनही, थोडक्या अभ्यासकांपलीकडे परिचित नसलेल्या या लेण्यांना भेट देण्याचा योग आज जुळून आला.
कामशेतपासून उत्तरेला नाणेमावळात शिरलो, तेंव्हा काळे ढग दाटून आलेले. धाड-धाड-धाड-धाड करत जाणा-या ट्रेनचे हादरे रेल्वे क्रॉसिंगपल्याड कारमध्ये सुद्धा जाणवले. पुढं पुलाखालून जाणारं 'इंदायणी'चं पाणी वारीसोबत पंढरपूरच्या प्रवासासाठी निघालेलं. काम्ब्रे आणि गोवित्रीगावच्या शेताडीत थोडकी भाताची रोपं उगवली होती. समोर वडिवळे धरणाची भिंत दिसू लागल्यावर डावीकडचा कोंडेश्वर-जांभिवली रस्ता न घेता, उजवीकडचा चढावरचा उकसण गावचा रस्ता घेतला.
वडिवळे धरणावर पावसाची खट्याळ भूरभूर सुरू होत होती. वारा फोफावला, अन ढग लगबगीने न बरसताच विखुरत गेले.
समोर डोंगराच्या पायथ्याशी उकसण गाव सुंदर जागी वसलेलं दिसलं. या निसर्गदृश्यात 'आजच्या काळची लेणी' - खाजगी बंगले रिसोर्ट खुपत होते. याच डोंगरात लपलेल्या 'प्राचीन लेणी' शोधायला आम्ही आलो होतो.
धरणाच्या भिंतीजवळून पुढे आल्यावर उजवीकडे 'उकसण'कडे न जाता स्वागत-खांबांपासून उजवीकडे 'पाल' गावचा कच्चा रस्ता पकडला. आता गाडीचा वेग मंदावला - चढामुळे, अन त्याहीपेक्षा समोर खास 'पोझ' देणा-या खंड्याच्या जोडीमुळे.
नि:संशय प्राचीन - पाल लेणी
समोर होता डोंगराचा डावीकडे उतरलेला सौम्य दांड, एक घळ आणि उजवीकडे मोठ्ठा कातळटप्पा. गाडी लावून, घळीतून चढणा-या वाटेकडे निघालो. वरच्या वडेश्वरच्या वाडीकडून येणा-या गावक-यांकडून "गुहा इथेच जवळ आहेत", हे ऐकून उत्साहाने निघालो. रानफुलांच्या साथीने नाणे-मावळातली शेतं आता मॉन्सूनची आतुरतेने वाट पाहत होती.
डावीकडे उंचावर झुडुपांच्या आड दडलेली, कातळाच्या पोटातली अंधारी जागा डोकावली, अन आम्ही अक्षरश: पळतच जवळ पोहोचलो. कधी एकदा ही लेणी सापडताहेत, असं आम्ही अधीर झालो होतो.
अन, समोर जे काही आलं, ते पाहून आम्ही अवाकंच!!
मुळातली डोंगराच्या पोटातली नैसर्गिक पोकळी, खोलवर खोदत नेल्याचं स्पष्ट दिसत होतं. अंकाई (मनमाड) जवळची गोरखनाथ गुहा अशीच असल्याचं आठवलं.
गुहेत ध्यानस्थ होते, इसवी सन पूर्व दुस-या शतकातले एक साधक - साकेत गुडी!!!
गंमतीचा भाग सोडला,
तर ही लेणी खरंच प्राचीन आहेत. लेण्यांमधल्या खोदाई निरखून पाहू लागलो.खोदीव पाय-या, पल्याडचा ताशिव चौथरा, पाण्याचे ६ फूट खोल कोरडं टाकं, त्यावरची कोरीव चौकट आणि हे काय..... त्याच्यावरती होता
चक्क एक शिलालेख!!!!!
या शिलालेखाबाबत अभ्यासकांमध्ये एकमत नाही.
- ह. धी. संकालिया आणि शोभना गोखले यांच्या मते, पाण्याच्या टाक्याच्या खोदाईसाठी केल्या गेलेल्या दानाचा उल्लेख या शिलालेखात आहे. लेखाची सुरुवात होते "नमो अरिहंतान"च्या नमोकाराने होते. त्यामुळे, इसवी सन पूर्व पहिल्या किंवा दुस-या शतकाइतका पुरातन हा ब्राम्ही शिलालेख महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन जैन लेख आहे. हा लेख या परिसरात बौद्धांच्या सोबत जैन साधक-व्यापारी यांचं वास्तव्य होतं, हे सिद्ध होतं. (संदर्भ: डॉ. श्रीकांत प्रधान. दैनिक सामना. २४-०८-२००३)
- साईली पलांडे-दातार यांच्या मते मात्र हा जैन साधक-व्यापारी यांच्या संदर्भातला नसून, बौद्ध लेख आहे.
काहीही असो...
शिलालेखाच्या ब्राम्ही अक्षरांना अलगद स्पर्श केला. कोरीव अक्षरांची जाणीव झाली. आपण एका प्राचीन जागी आहोत, आणि पूर्वजांच्या पाऊलखुणा धुंडाळतोय, याचं कवतिक मनात दाटून आलं.
उर्वरित भागातली लेण्याची खोदाई साधी आहे. पावसाळ्यात इथे पाणी साठत असेल. उजवीकडे अग्गदी छोटासा विहार आहे.
प्राचीन व्यापारी वाटा - त्यासोबतचा धर्मप्रचार आणि एकांतजागी साधना यासाठी अश्या लेण्या खोदवल्या असाव्यात.
पहा पाल लेण्यांचं दृकश्राव्य:: https://www.youtube.com/watch?v=purfhbWQAD4
उकसण लेणी आहेत तरी नक्की कुठे
पाल लेणी गवसल्यामुळे धम्माल मजा आली होतीच. आता वेध लागलेले याच डोंगरात असलेल्या, पण पलीकडे उकसण लेणी शोधण्याचा. माथ्यावरून ईशान्येला हलक्या चढावरून गेल्यावर डोंगरमाथा उजवीकडे ५० मी वर ठेवून आडवं गेलं, की उकसण लेणी सापडतात.
आम्ही कुठल्याच माहितीअभावी लेणी शोधात असल्याने लेणी शोधायला चांगली तासभर वणवण झाली. अर्थात, त्यामुळेच मिळाली काही भन्नाट दृश्ये:
दिशाशोधनाचे बर्रेच फंडे मारून झाले होते. 'लेणी कुठे खोदावीत', याबद्दल लेणी-खोदाई करणा-याने विचार केला नसेल, इतका विचार करून झाला. आणि, आता लेणी नाहीच सापडली तर...?
उकसण गावात जाऊन परत यावे का..
अरे इथे रानात कोणीच का नाही भेटत वाट विचारायला..
या लेण्यासाठी परत यावे लागणार का...
वगैरे.. वगैरे...
'सब्र का मिठा फल' - उकसण लेणी गवसली.
सहज गोष्टी मिळाल्या तर त्याची किंमत काय... म्हणून प्रयत्नानंतर अखेर डोंगरमाथ्याखाली ५० मी कातळात कोरलेलं एक चौकोनी लेणं डोकावलं. अक्षरश: वाकडं-तिकडं किंचाळून आनंद व्यक्त करण्यात आला.
सूसाटलोच. अजून ३ गुहा उलगडू लागल्या.
आणि आम्ही पोहोचलो उकसण लेण्यापाशी. सणसणीत लेणी.
डावीकडे वर चढायला जरा अडचणीचं चौकोनी लेणं. त्याच्या उजवीकडे एकदम चिंचोळं लेणं.
पाल लेण्यासारखं इथेही नैसर्गिक गुहेला खोदून आतवर नेलेलंय.
२ मी उंच - ३ मी रुंद - ८ मी लांब अश्या तासून काढलेल्या प्रवेशमार्गावरून गेल्यावर आत साधी गुहा आहे.
लेण्याजवळची शांतता अन निसर्ग बघता, साधनेसाठी काय सुंदर एकांतस्थळ निवडलंय, असं वाटून गेलं.
पहा उकसण लेण्यांचं दृकश्राव्य:: https://www.youtube.com/watch?v=25N6FThp9ps
कितीही आवडलं, तरीही परत येणं भाग होतं.
मनात नानाविध विचार दाटून आलेले...
कलाकृतीच्या बाबतीत सरस अश्या कित्येक इतर लेण्यांपेक्षा उकसण - पालची लेणी आपल्याला का जास्त भावली...
इथल्या लेण्यांमध्ये राहून कसली साधना हे साधक करत असतील... काय गवसत असेल त्यांना...
दुर्गम भागातल्या डोंगर-कातळात लेणी खोदण्याचा हा उपक्रम कित्येक शतकं कसा काय चालू राहिला...
बौद्ध आणि जैन विचारप्रवाहाचा पुढे मर्यादित प्रचार का झाला असेल, आणि हिंदू संस्कृती या भागात कशी फुलत गेली असेल...
साध्या छोट्या अनुभवांनी जगणं समृद्ध करणा-या सह्याद्रीबद्दल विलक्षण कृतज्ञता वाटली. सह्याद्रीनं लगेचच पावती दिली.
खरंच, सह्याद्रीतलं ट्रेकिंग म्हणजे एक विलक्षण 'ध्यास' आहे.
कधी येतो शिवचरित्रामुळे अंगावर शहारा..
एखाद्या धारातीर्थांवर ऐकू येतात त्यागाची अन पराक्रमाची गीते...
कधी गावक-यांच्या साध्या निर्व्याज प्रेमानं गहिवरतो...
दोस्त-मंडळींबरोबर थट्टा-विनोदात वाटांवर हरवतो...
कधी विलक्षण भूरचनेनं थक्क होऊन जातो...
वैशाखवणव्यात चिकाटीने केलेल्या ट्रेकबद्दल मिळतो रानमेव्याचा बोनस...
कधी बहरलेल्या लोभस जैव-वैविध्याची असते साथ...
जुन्या राउळातून कधी ऐकू येतात कोण्या भोळ्या भाविकांची आर्जवं...
कधी धुंडाळतो उभ्या कातळामध्ये कोरून काढलेल्या लेण्या...
विस्मृतीत दडलेल्या इतिहासाच्या या पाऊलखुणांचं कोडं काही सुटत नाही...
अन, सह्याद्रीचा ध्यास ट्रेकर्सना वीकांताला (Weekend) घरी बसू देत नाही.
© www.DiscoverSahyadri.in, 2014
ऋणनिर्देश:
- फोटोज - साकेत गुडी, DiscoverSahyadri
- लेणी माहिती संदर्भ: डॉ. श्रीकांत प्रधान (दैनिक सामना. २४-०८-२००३), साईली पलांडे-दातार
-पूर्वप्रकशित: http://www.discoversahyadri.in/2014/06/UksanPalCaves.html
- © Discoverसह्याद्री, २०१४
मस्तच!
मस्तच!
छानच आहेत जागा, वेड
छानच आहेत जागा, वेड लागण्यासारख्या
नि:शब्द झाले हे पाहुन!!
नि:शब्द झाले हे पाहुन!! अप्रतिम सुंदर!!
लेण्यांमधली शांतता इथे बसुन अनुभवायला मिळाली.
ऑसम ब्लॉसम... फारच आवडल....
ऑसम ब्लॉसम...
फारच आवडल.... मस्तच
सहीच
सहीच
केवळ भन्नाट - लिखाणशैली तर
केवळ भन्नाट - लिखाणशैली तर अवर्णनीय ....
कसले भारी फोटो आहेत एकेक ....
तो तिरक्या झाडाच्या पार्श्वभूमीवर ढग जमा झालेत तो केवळ जमलेला - त्यासाठी
___________/\_____________
अतिशय उत्तम फोटो. सुन्दर
अतिशय उत्तम फोटो.
सुन्दर निसर्ग
मस्त फोटो आहेत आणि लेणीदेखील
मस्त फोटो आहेत आणि लेणीदेखील खास. कदाचित ती अर्धवट बांधून सोडून दिली असतील का ? राजाश्रय ( म्हणजेच पैसे ) कमी पडले हेही कारण असेल का ?
सुरेख लिहिलंय. फोटोही खासच!
सुरेख लिहिलंय. फोटोही खासच! अपरिचित लेण्यांची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!
दिनेशदा, मला वाटते, सगळीच लेणी शिल्पं कोरलेली नसावीत. काही साधीसुधी, नैसर्गिक गुहांचा वापर करून प्रवाशांना, धर्म प्रचारक भिख्खू, श्रमण इ. ना तात्पुरता निवारा किंवा साधना करण्यासाठी जागा म्हणून तयार केलेली अशीही असावीत.
फार नशीबवान आहात, आणी तुमच्या
फार नशीबवान आहात, आणी तुमच्या बरोबर आम्ही पण. की एवढे गोड आणी नयनरम्य फोटो पहायला मिळालेत. गुहा अतीशय आवडल्या, आणी भोवतालचे तुम्ही निसर्गाचे टिपलेले सगळे फोटो खूप आवडले. पावसाळी हवेत काय मजा येत असेल ना.:स्मित:
मस्त
मस्त
वाचतोय .आवडले .
वाचतोय .आवडले .
आधी सगळे फोटो पाहून घेतले आणि
आधी सगळे फोटो पाहून घेतले आणि मग लेख वाचला.
दोन्हीही अप्रतिम!!!!
हो ज्योति, तेही कारण असेलच !
हो ज्योति, तेही कारण असेलच ! किंवा कदाचित दगड योग्य त्या प्रतीचा लागला नसेल.
सुंदरच... या लेण्या बघून मला
सुंदरच...
या लेण्या बघून मला पन्हाळ्याच्या लेण्यांची आठवण होतेय...अशाच दुर्लक्षित आहेत.
प्रचि टाकतोच नंअतर..
या लेण्यांची प्रचि इथे यासाठी टाकतो आहे कारण यांबद्दलची अनभिज्ञता .. कोणी जर आता पावनखिंड ट्रेकला जाणार असेल तर नक्की भेट द्या इथे... त्याची तयार.. काहीना माहीत असतील.
(वि.सू:-ही पोस्ट आवांतर आहे परंतु Disc.सह्याद्री च्या पायपीटीवरुन प्रोत्साहित होउन टाकाविशी वाटली २-३ दिवसांनी हटवेन..आभार..)
अनेकानेक धन्यवाद, ठिकाण लिखाण
अनेकानेक धन्यवाद, ठिकाण लिखाण आणि फोटोंसाठीही
डिस्कव्हर सह्याद्री या नावाला
डिस्कव्हर सह्याद्री या नावाला जागणारी भटकंती. केवळ अप्रतिम !!!
बोबडे
बोबडे बोल
वेल
मी_आर्या
अंकु
सुहास झेले
महेशकुलकर्णी-पुणे
दिनेशदा
ज्योति_कामत
रश्मी..
वरदा
Srd
जिप्सी
मी_आर्या
शशांकजी
विज्ञानदास
हर्पेन
ओंकार
खूप छान वाटलं तुमची प्रतिक्रिया वाचून... स्वतंत्र रिप्लाय देत नाही म्हणून क्षमस्व!
लेणी साध्या दर्जाची का आहेत, याची कारणं म्हणजे: आडवाटेची जागा, मुख्य व्यापारी मार्गांपासून दूर, sponsor नसणे.. नक्की काय सांगता येत नाही. कातळ मात्र चांगल्या दर्जाचा आहे. असो...
आडवाटेला अनवट गोष्टी सापडल्या, ही सह्याद्रीची कृपा
अनवट जागेचं वर्णन ट्रेकर दोस्तांना सांगावं आणि त्यांना या ठिकाणी पोहोचणं सोप्पं जावं, असं साधं-सोप्पं वर्णन लिहिलंय. तुम्हाला ते आवडलं, हे वाचून विशेष आनंद झाला..
मन:पूर्वक धन्यवाद!!!
सुरेख!
सुरेख!
अप्रतिम ! अप्रतिम !
अप्रतिम ! अप्रतिम ! अप्रतिम.......
सुंदर ---सुंदर
सुंदर ---सुंदर
शैलजा Sayali Paturkar vijaya
शैलजा
Sayali Paturkar
vijaya kelkar
प्रतिकिया वाचून छान वाटलं.. मन:पूर्वक धन्यवाद!!!