(हा लेख श्री समर्थ वाग्देवता मंदिर, धुळे यांच्या "समर्थ वाग्देवता मंदिर अमृत महोत्सवी स्मृतिग्रंथा"त प्रसिद्ध झाला.)
आपला सह्याद्री आणि सह्याद्रीतील निसर्ग हे महाराष्ट्राला लाभलेले मोठे वरदान आहे. सह्याद्रीमधे वनस्पतींच्या जवळजवळ ५००० जाती आढळतात. त्यापैकी जवळपास २००० जाती या प्रादेशिक, म्हणजेच फक्त याच भागात आढळणाऱ्या अशा आहेत. वृक्षसंपत्तीच्या जपणुकीसाठी आणि संवर्धनासाठी पुरातन काळापासून आपल्याकडे प्रयत्न केले गेलेले आहेत. वेदांमधूनही याचे दाखले आढळतात. आपल्याकडचे, म्हणजे महाराष्ट्रातील अलिकडचे उदाहरण द्यायचे तर शिवाजीमहाराजांनीही वृक्ष आणि वनांच्या जतनाकडे विशेष लक्ष पुरवले होते. महाराष्ट्राची लोकगीते, लोककला, परंपरा, भाषा समृद्ध करण्यात इथल्या वृक्षसंपदेचा महत्वाचा वाटा आहे.
समर्थ रामदासांनी त्यांच्या आयुष्यातला मोठा कालखंड कृष्णा-कोयनेच्या परिसरात, कराड -सातारा-सज्जनगड-शिवथरघळ या भागात व्यतीत केला. आत्ताही हा भूप्रदेश वनसंपदेने समृद्ध आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी तर इथला निसर्ग मानवी हस्तक्षेपापासून अगदी लांब, अनाघ्रात असणार. समर्थांनी अतिशय चिकित्सक आणि अभ्यासू वृत्तीने इथल्या झाडझुडुपांची, वेलींची, फळाफुलांची ओळख करून घेतलेली होती. त्यांचा हा वनस्पतींच्या अभ्यासाचा व्यासंग पुढे त्यांनी लिहिलेल्या ’बाग’ प्रकरणात दिसून येतो. परळी म्हणजेच सज्जनगडावरील मठाचे बांधकाम जेव्हा सुरू होते त्यावेळी समर्थांनी हे ’बाग’ प्रकरण लिहिले. हे काव्य १९१६ साली श्री भट यांनी आणि १९२७ साली ह. भ. प. ल. रा पांगारकरांनी संपादित केलेल्या ’श्री समर्थ रामदास समग्र ग्रंथ’ मधे वाचायला मिळते.
प्रसंग निघाला स्वभावे बागेमध्ये काय लावावे। म्हणोनि घेतली नावे काहीएक।
अशी सुरुवात करून ते या काव्यात जवळपास २७७ वनस्पतींची नावे सांगतात. बाग म्हणल्यावर आपल्या डोळ्यासमोर येते तशी ही शोभिवंत झाडांची, शहराच्या सुशोभीकरणासाठी तयार केलेली बाग नाही. यात सह्याद्रीत ज्या वनस्पती सापडतात, वाढू शकतात, ज्या आपल्याला वेगवेगळ्या प्रकारांनी उपयोगी पडतात, अशा वनस्पतींची नावे दिलेली आहेत. यामधे काटेरी वनस्पती, फळझाडे, औषधी वृक्ष, लाकडासाठी उपयोगी असणारी झाडे, पालेभाज्या, फळभाज्या, कंदभाज्या, सुगंधी वनस्पती, फुलझाडे असे वनस्पतींचे नाना प्रकार आलेले आहेत. या एकेक वनस्पतीचे वैशिष्ट्य पाहिले तर अतिशय वैविध्यपूर्ण आणि रंजक माहिती समोर
येते.
यात सुरुवातीलाच दिलेल्या कांटी आणि रामकांटी या वनस्पती म्हणजेच बाभळीच्या वेगवेगळ्या जाती आहेत. त्याच्यापुढेच येणारी फुलेकांटी हाही कदाचित बाभळीचाच प्रकार असावा. यातील रामकाठी बाभुळ सरळ वाढते आणि तिच्या या गुणामुळेच खुरप्याच्या मुठीपासून बैलगाडीच्या जूपर्यंत सगळी सणगं बनवायला ती उपयोगी पडते. बाभळीच्या डिंकाचे औषधी उपयोग तर आहेतच. यातच पुढे येणाऱ्या चिलारी, सागरगोटी, हिंवर, खैर याही बाभळीच्याच कुळातल्या (Family) वनस्पती होत.
शेर, निवडुंग, सराटी (गोखरु), काचकुहिरी (खाजकुयली) ही नावे ’बाग’ प्रकरणात वाचून प्रश्नचिन्ह उभे रहाते. पण या प्रत्येकाचा काहीनाकाही औषधी उपयोग आहे. खाजकुयलीच्या शेंगा प्रचंड खाजऱ्या असतात. पण या शेंगा भाजल्या की त्यावरची खाजरी लव जळून जाते. मग त्याच्या आतल्या बिया काढून त्याची उसळ करतात. ती फार पौष्टिक असते! आयुर्वेदातही याचे उपयोग सांगितलेले आहेत. रक्तातील कोलेस्टेरॉल आणि शर्करेची पातळी राखण्यासाठी आणि पार्किनसन्स आजारावरतीही याच्या शेंगा गुणकारी आहेत! यातला निवडुंग म्हणजे फड्या निवडुंग किंवा तीनधारी निवडुंग आहे. निवडुंगाच्या या दोनच जाती प्रादेशिक आहेत. यांचेही औषधी उपयोग आहेतच. सराटा किंवा गोखरू ही वनस्पती मूत्रविकारांवर गुणकारी आहे.
आधुनिक वनस्पतीशास्त्रात, वनस्पतींचा अभ्यास करणे सोयीचे जावे म्हणून त्यांच्या फुलांच्या व इतर वैशिष्ट्यांनुसार प्रत्येक वनस्पतीचे वेगवेगळ्या कुळात म्हणजेच family त वर्गीकरण केले जाते. ’बाग’ प्रकरणात अशा एकाच कुळातल्या वनस्पती एकत्र दिलेल्या सापडतात. भोंस, बरू, वाळा, मोळा, ऊस, कास या सगळ्या पोएसी कुळातल्या म्हणजेच गवतवर्गीय वनस्पती आहेत. याच कुळातल्या वेत, कळकी, चिवारी, बरु या बांबूच्या निरनिराळ्या जाती आहेत. भोपळा किंवा काकडीच्या कुळातल्या वेलीही एकत्र दिलेल्या आहेत. भोपळ्याच्या आकारावरून आणि उपयोगावरून पडणारे वक्र (गोल), गोल (लंबगोल), लंबायमान (लांबुळके), सांगडीचे (एकत्र जोडलेले) तसेच गंगाफळ, काशीफळ, क्षीरसागर, देवडांगर, दुधी, गंगारुढे, रुद्रविण्याचे असे वेगवेगळे प्रकार पाहणे मजेदार आहे. काकड्यांच्या स्थानिक प्रकारात चिबूड, वाळके, सेंदण्या, शेंदाडे, कुहिऱ्या यात आहेत. यात एक ’पारोस पिंपळा’ असे झाड आहे. हा पारोस पिंपळा म्हणजेच पारोसा पिंपळ किंवा परस पिंपळ. यालाच भेंडाचे झाडही म्हणतात. कोकणात बरेच ठिकाणी हा वृक्ष परसात लावलेला आढळतो. पिंपळाच्या पानांसारखीच पाने असणारा आणि घंटेच्या आकाराची केशरी, पिवळी, गुलाबी फुले येणारा हा वृक्ष अतिशय देखणा दिसतो. आयुर्वेदात हिंवताप, दमा, आंव, अतिसारावरील उपचारात याचे महत्त्व सांगितलेले आहे. याशिवाय अडूळसा, हिरडा, विहाळ (बेहडा), गिळी (गेळा), आवळा, मोहा , धावडा, शिसू, शिरीष, कुंभा अशा कितीतरी वनस्पती यात दिलेल्या आहेत.
रामरायाच्या आणि हनुमंताच्या पूजेसाठी सुगंधी, विविधरंगी फुले तर हवीतच. जाईचे वेगवेगळे प्रकार, मोगरे, नेवाळी, चमेली, जास्वंद, कमळ, वेगवेगळे चाफे, पारीजातक अशी नाना प्रकारची फुले या काव्यात येतात. यापैकी बरीचशी फुलझाडे सज्जनगडावर आजही पहायला मिळतात. कवठ, नारिंगे, सीताफळ, अंजीर, आंबे, डाळिंब अशी फळे; विविध फळभाज्या; चुका, चाकवत, माठ, शेपू, घोळ, यासारख्या फळभाज्या, कांदा, मोळकांदा (एक प्रकारचे ऑर्किड), लसूण, माईनमूळ, आले, रताळे यासारखे कंद अशी अशी वनस्पतींच्या नावांची भलीमोठी जंत्री देऊन समर्थ या काव्याच्या शेवटी,
अठराभार वनस्पती नामे सांगावी किती । अल्प बोलिलो श्रोतीं क्षमा केली पाहिजे।
असे विनम्रपणे म्हणतात !
एथनोबॉटनी ही वनस्पतीशास्त्राची एक शाखा आहे. त्यात लोकपरंपरा, लोककला, लोकसाहित्य इत्यादीतून जोपासले गेलेले मानव आणि वृक्षवल्लींमधील साहचर्य अभ्यासले जाते. या शाखेअंतर्गत आपल्याकडे काही विख्यात वनस्पतीतज्ञांनी या ’बाग’ प्रकरणाचा अभ्यास केलेला आहे. लोकभाषेमधे एकच झाड वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्थानिक नावांनी ओळखले जाते तर काही पूर्णपणे वेगळी असणारी झाडे एकच नावानेही ओळखली जातात. तसेच कालवशात काही स्थानिक नावे मागेही पडत जातात. अशा काही कारणांमुळे यातील काही वनस्पतींची अद्याप नेमकी ओळख पटलेली नाही. (उदा: एणके, अविट, अव्हाटी, बसळा, खोळ, इत्यादी). केशर आणि देवदार या वनस्पती आपल्या माहितीप्रमाणे हिमालयाच्या परिसरातल्या आहेत. त्या इथल्या वातावरणात वाढू शकणार नाहीत. मग ही इतर कोणत्या स्थानिक वनस्पतींची नावे असावीत, तसेच सावा आणि सावी, मोहो आणि मोही, जास्वंद आणि हनुमंती जास्वंद अशी नावात थोडाफार फरक असणारी झाडे एकाच वनस्पतीच्या त्याकाळी माहिती असलेल्या वेगवेगळ्या जातींची आहेत का, असे प्रश्नही आहेत.
आज आपल्या अविचारी वृत्तीमुळे, आपल्याला लाभलेला वनसंपदेचा हा समृद्ध वारसा नष्ट होत चालला आहे. जंगलांचा ऱ्हास होतो आहे. सह्याद्रीतील जैवविविधता कमी होते आहे. पण अजूनही या प्रश्नाकडे पुरेशा गांभीर्याने पाहिले जात नाही. दुसरं असं की सहज उपलब्ध असणारी, लवकर वाढणारी, शोभिवंत परदेशी झाडे हल्ली सर्रास लावली जातात पण देशी झाडे मात्र आवर्जून लावली जात नाहीत. परिणामी, आधीच दुर्मिळ होत चाललेल्या देशी वनस्पती आता नामशेष होण्याचाही धोका आहे. आपण प्रत्येकाने वृक्षांच्या जतन आणि संवर्धनात खारीचा वाटा उचलणे अतिशय निकडीचे झालेले आहे. समर्थांनी लिहिलेल्या या काव्यातील या सर्व वनस्पती मिळवून, सज्जनगड, चाफळ, शिवथरघळ अशा समर्थांच्या वास्तव्याच्या ठिकाणी त्यांचे संवर्धन केले, त्या प्रत्येक वनस्पतीची वनस्पतीशास्त्रीय माहिती, औषधी व इतर उपयोग वगैरे लोकांपर्यंत पोचवले तर हा वारसा मूर्त स्वरूपात, सुंदररीत्या जतन केला जाईल.
-------------------------------------------------------------------------------------------------------
या लेखनासाठी डॉ. प्र.के घाणेकर, डॉ. विनया घाटे, डॉ. मंदार दातार या वनस्पतीतज्ञांचे तसेच डॉ. कापरेकर या समर्थ वाङ्मयाच्या अभ्यासकांचे मार्गदर्शन लाभले.
------------------------------------------------------------------------------------------
"श्री समर्थ रामदास लिखित 'बाग' प्रकरण"
प्रसंग निघाला स्वभावें । बागेमध्ये काय लावावे ।
म्हणूनि घेतली नावे । काही एक ॥
कांटी रामकांटी फुलेकांटी । नेपती सहमुळी कारमाटी ।
सावी चीलारी सागरगोटी । हिंवर खैर खरमाटी ॥
पांढरफळी करवंदी तरटी । आळवी तोरणी चिंचोरटी ।
सिकेकाई वाकेरी घोंटी । करंज विळस समुद्रशोक ॥
अव्हाटी बोराटी हिंगणबेटी । विकळी टांकळी वाघांटी ।
शेर निवडुंग कारवेटी । कांटेशेवरी पांगेरे ॥
निरगुडी येरंड शेवरी । कासवेद कासळी पेरारी ।
तरवड उन्हाळ्या कुसरी । शिबी तिव्हा अंबोटी ॥
कांतुती काचकुहिरी सराटी । उतरणी गुळवेल चित्रकुटी
कडोची काटली गोमाटी । घोळ घुगरी विरभोटी ॥
भोंस बरु वाळा मोळा । ऊंस कास देवनळा ।
लव्हे पानि पारोस पिंपळा । गुंज कोळसरे देवपाळा ॥
वेत कळकी चिवारी । ताड माड पायरी पिंपरी ।
उंबरी अंबरी गंभिरी । अडुळसा मोही भोपळी ॥
साव सिसवे सिरस कुड । कोळ कुंभा धावडा मोड ।
काळकुडा भुता बोकडा । कुरंडी हिरंडी लोखंडी ॥
विहाळ गिळी टेंभुरणी । अवीट एणके सोरकिन्ही ।
घोळी दालचिनी । कबाबचीनी जे ॥
निंबारे गोडे निंब । नाना महावृक्ष तळंब ।
गोरक्षचिंच लातंब । परोपरीची ॥
गोधनी शेलवंटी भोंकरी । मोहो बिब्बा रायबोरी ।
बेल फणस जांब भरी । चिंच अंबसोल अंबाडे ॥
चांफे चंदन रातांजन । पतंग मैलागर कांचन ।
पोपये खलेले खपान । वट पिंपळ उंबर ॥
आंबे निंबे साखरनिंबे । रेकण्या खरजूरी तूंते दाळिंबे ।
तुरडे विडे नारिंगे । शेवे कविट अंजीर सीताफळे ॥
जांब अननस देवदार । सुरमे खासे मंदार ।
पांढरे जंगली लाल ।पुरे उद्वे चित्रकी ॥
केळी नारळी पोफळी । आवळी रायआवळी जांभळी ।
कुणकी गुगुळी सालफळी । वेलफळी माहाळुंगी ॥
भुईचांफे नागचांफे मोगरे । पारिजातक बटमोगरे ।
शंखासुर काळे मोगरे । सोनतरवड सोनफुले ॥
जाई सखजाई पीतजाई । त्रिविध शेवंती मालती जुई ।
पाडळी बकुळी अबई । नेवाळी केतकी चमेली ॥
सुर्यकमळिणी चंद्रकमळिणी । जास्वनी हनुमंतजास्वनी ।
केशर कुसुंबी कमळिणी । बहुरंग निळायाति ॥
तुळसी काळी त्रिसेंदरी । त्रिसिंगी रायचचु रायपेटारी ।
गुलखत निगुलचिन कनेरी । नानाविध मखमाली ॥
काळा वाळा मरुवा नाना । कचोरे गवले दवणा ।
पाच राजगिरे नाना । हळदी करडी गुलटोप ॥
वांगी चाकवत मेथी पोकळा । माठ शेपु खोळ बसळा ।
चवळी चुका वेल सबळा । अंबुजिरे मोहरी ॥
कांदे मोळकांदे माईणमुळे । लसूण आलें रताळें ।
कांचन कारिजे माठमुळे । सुरण गाजरें ॥
भोंपळे नाना प्रकारचे । लहानथोर पत्रवेलीचे ।
गळ्याचे पेढ्या सांगडीचे । वक्र वर्तुळ लंबायमान ॥
गंगाफळ काशीफळे क्षीरसागर । सुगरवे सिंगाडे देवडांगर ।
दुधे गंगारूढे प्रकार । किनऱ्या रुद्रविण्याचे ॥
वाळक्या कांकड्या चिवड्या । कोहाळे सेंदण्या सेंदाड्या ।
खरबूजा तरबुजा कलंगड्या । द्राक्षी मिरवेली पानवेली ॥
दोडक्या पारोशा पडवळ्या । चवळ्या कारल्या तोंडल्या ।
घेवड्या कुही-या खरमुळ्या । वेली अळूचमकोरे ॥
अठराभार वनस्पती । नामे सांगावी किती ।
अल्प बोलिलो श्रोतीं । क्षमा केली पाहिजे ॥
अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण
अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण लेख. खूप आवडला.
वा छान अभ्यासपूर्ण लेख. आज
वा छान अभ्यासपूर्ण लेख.
आज आपल्या अविचारी वृत्तीमुळे, आपल्याला लाभलेला वनसंपदेचा हा समृद्ध वारसा नष्ट होत चालला आहे. जंगलांचा ऱ्हास होतो आहे. सह्याद्रीतील जैवविविधता कमी होते आहे. पण अजूनही या प्रश्नाकडे पुरेशा गांभीर्याने पाहिले जात नाही. दुसरं असं की सहज उपलब्ध असणारी, लवकर वाढणारी, शोभिवंत परदेशी झाडे हल्ली सर्रास लावली जातात पण देशी झाडे मात्र आवर्जून लावली जात नाहीत. परिणामी, आधीच दुर्मिळ होत चाललेल्या देशी वनस्पती आता नामशेष होण्याचाही धोका आहे. आपण प्रत्येकाने वृक्षांच्या जतन आणि संवर्धनात खारीचा वाटा उचलणे अतिशय निकडीचे झालेले आहे. समर्थांनी लिहिलेल्या या काव्यातील या सर्व वनस्पती मिळवून, सज्जनगड, चाफळ, शिवथरघळ अशा समर्थांच्या वास्तव्याच्या ठिकाणी त्यांचे संवर्धन केले, त्या प्रत्येक वनस्पतीची वनस्पतीशास्त्रीय माहिती, औषधी व इतर उपयोग वगैरे लोकांपर्यंत पोचवले तर हा वारसा मूर्त स्वरूपात, सुंदररीत्या जतन केला जाईल.
अगदी पटले.
व्वा! सुंदर माहितीपूर्ण लेख.
व्वा! सुंदर माहितीपूर्ण लेख.
__/|\__ नतमस्तक समर्थांच्या
__/|\__ नतमस्तक समर्थांच्या चौफेर प्रतिभेला आणी कार्याला!!
आणि हे सगळं सुरेख शब्दांत मांडुन आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्द्ल आपले धन्यवाद!
खुप छान लेख. हे काव्य आणि हा
खुप छान लेख. हे काव्य आणि हा लेख संग्रही ठेवीनच. खाजखुजलीच्या बियांनाच कौचा म्हणतात असे चित्रलेखा मधे वाचल्याचे आठवतेय. त्यापासून केलेला कौचापाक हे थंडीत घ्यायचे बलवर्धक औषध आहे.
फार सुंदर अभ्यासपुर्ण लेख
फार सुंदर अभ्यासपुर्ण लेख
सुरेख लेख! हाताच्या बोटावर
सुरेख लेख! हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच वनस्पतीं बघितल्या आहेत, बाकी किती सारी नावेही नविन ऐकली!!
धन्यवाद!
व्वा! सुंदर माहितीपूर्ण लेख.
व्वा! सुंदर माहितीपूर्ण लेख. + १
देवदारु? ठाणे आणि रायगड भागात
देवदारु?
ठाणे आणि रायगड भागात एका वृक्षाला देवदार म्हणतात. ह्याला लाल फुले येतात. एका वृक्षतज्ज्ञांना विचारल्यावर याचे बोटनिकल नाव स्टर्क्युलिया फीटिडा असल्याचे त्यांनी सांगितले. याचे पर्यायी नाव रानटी किंवा जंगली बदाम असल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्याकडचा मोठ्या पानांचा गावठी बदाम तो वेगळा.
मस्तच लेख आहे हा, अनेकानेक
मस्तच लेख आहे हा, अनेकानेक धन्यवाद इथे पोस्ट केल्याबद्दल
सर्वांच्या प्रतिसादांबद्दल
सर्वांच्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद!
@ दिनेश
आपण दिलेली कौचापाक ची माहिती मला नवीन आहे. त्याच्या उत्पादनासाठी खाजखुयलीची मुद्दाम लागवड करतात की जंगलातून गोळा करतात कोणास ठाऊक.
@हीरा
जंगली बदामाचे नाव देवदार ? असू शकते. संस्कृत नावे पुतिदारु, वित्खदिर अशी मिळताहेत नेटवर.
-अश्विनी
फारच सुंदर लेख.
फारच सुंदर लेख.
अतिशय सुरेख लेख. मनापासुन
अतिशय सुरेख लेख.
मनापासुन धन्यवाद!!!!
वा, फारच सुर्रेख लेख - किती
वा, फारच सुर्रेख लेख - किती दिवस असे वाटत होते की समर्थांचे सुप्रसिद्ध वाङ्मय (दासबोध, आत्माराम, मनोबोध) तर खूपजणांना माहित आहे पण हे इतर वाङ्मय कसे काय उपलब्ध होणार ?
तुमच्या या अभ्यासपूर्ण लेखाने मनाला खूप समाधान लाभले. मनापासून धन्यवाद .....
समर्थांसारखे चतुरस्त्र, लोकोत्तर व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही - एकमेवाद्वितीयम ...
जय जय रघुवीर समर्थ ....
अतिशय सुंदर माहिती..
अतिशय सुंदर माहिती.. खाजकुयीलीचा असाही उपयोग होतो, ही नविनच माहिती मिळाली.
बाकी खाजकुयिलीपासून काही उत्तेजक रसायने काढली जातात, ही माहिती मला एका संशोधक मित्राने दिली होती..
लेख उत्तम. खाजकुहिली च्या
लेख उत्तम.
खाजकुहिली च्या बियांना आयुर्वेदात कवच बीज म्हणतात.
बलवर्धन,वाजीकरण याबरोबरच कृमिनाशक म्हणूनही वापरतात व विशेष म्हणजे कृमींत त्यावरील खाजरी लव/कुसे युक्तीने वापरतात.
पार्कींसन्स मधेही उपयुक्त.
खूप छान माहीतीपूर्ण लेख..
खूप छान माहीतीपूर्ण लेख.. कीती नविन वनस्पतींची नावे कळली..
वर पुन्हा: अल्प बोलिलो श्रोतीं । क्षमा केली पाहिजे ॥
समर्थांच्या प्रतिभेला दंडवत..
मस्तच माहितीपूर्ण लेख.
मस्तच माहितीपूर्ण लेख.
समर्थांच्या प्रतिभेला
समर्थांच्या प्रतिभेला प्रणाम.
छान अभ्यासपूर्ण लेख!
सरिवा, ती कुसे मधात पाडून
सरिवा, ती कुसे मधात पाडून घोळून घेतात असे वाचले होते मी. खाजखुजल्या विचित्र दिसत असल्या तरी तिची जांभळट गुलाबी फुले मात्र सुंदर दिसतात.
छान माहितीपूर्ण लेख! इथे
छान माहितीपूर्ण लेख! इथे दिल्याबद्दल धन्यवाद!
अविस्मरणीय लेख..... धन्यवाद..
अविस्मरणीय लेख..... धन्यवाद..
सुंदर लेख.
सुंदर लेख.
मस्त लेख, काल प्रतिसाद लिहला
मस्त लेख,
काल प्रतिसाद लिहला होता पण बहुतेक साईट हँग झाली.
कृमिनाशक म्हणूनही वापरतात>>> हेच लिहल होतं. माझे आजोबा सांगायचे कि याचा उपयोग कृमी मारण्यासाठी होतो पण त्याने विषबाधा पण होते.
कोकणात एक मोठे झाड असते. त्याला टेनिसबॉलच्या साईझची फळे येतात. त्याच्या बियादिखिल कृमीसाठी वापरत्तात पण त्याने दिखिल विषबाधा होते. ( थोडे प्रमाण वाढले कि.)
बाकि या खाज कुयलीचे खुप मोठे झुडुप आमच्या गावी होते. पण मुलांना तिकडे जाउ देत नव्हते (त्यामुळे प्रचंड कुटुहल). अंगाला लागल्यावर काळ्या मातीचा चिखल लावुन किंवा शेण लावुन ट्रीटमेंट व्हायची. (एकमेकांची कळ काढणे / शाळेत कुणाचा तरी बदला घेणे यासाठी यचा झालेला उपयोग पाहिला आहे)
खूप छान आहे लेख....
खूप छान आहे लेख....
धन्यवाद अदीजो..... अतिशय
धन्यवाद अदीजो..... अतिशय सुंदर लेख.....
देवदार म्हणजे बाओबाब ना ?
देवदार म्हणजे बाओबाब ना ?
खूप चांगली माहिती मिळाली.
खूप चांगली माहिती मिळाली. आपल्या वनखात्यानं सुद्धा देशी झाडं उपलब्ध करून द्यायला पाहिजेत. ती कोणतीतरी पाच पानी आणि रेन ट्री देतात त्या ऐवजी चिंच,निव, कदंब, शिरीष अशी द्यायला हवीत.
देवदार म्हणजे बाओबाब ना >>
देवदार म्हणजे बाओबाब ना >>
देवदार चे सायंटिफिक नाव cedrus deodara. हिमालयात आढळणारा सूचीपर्णी, सदाहरित वृक्ष .
भारतात आढळणारी बाओबाब (गोरख चिंच ) ही Adansonia ची एक जात आहे. दोन्हीत उंच मोठे वृक्ष हे वगळता इतर साम्य नाही .
अतिशय सुरेख लेख....
अतिशय सुरेख लेख....
हा तर माहितीचा खजीना आहे ....
Pages