प्रत्येक घराची, नात्याची एक वेगळी अशी भाषाशैली असते. एखाद्या सदस्याचा अगदी पेट शब्द असतो, जोक्सची जातकुळी असते आणि कोणावर कशाप्रकारचे जोक्स 'मारले' जातात हेही त्या कुटुंबाच्या कालौघात नक्की झालेले असते. पुढे आपापल्या आयुष्याच्या दिशा बदलल्या, वर्षानुवर्षे सहवास नसला तरी यातले काही शब्द, म्हणी किंवा एखाद्या घटनेच्या संदर्भात निर्माण झालेली वाक्य त्या कुटुंबासाठी अगदी सौ टक्का हसायला लावणारी, त्या त्या व्यक्तीचे स्वभावविशेष दर्शवणारी अशी असतात. मूळ भाषेतला शब्द, वाक्प्रचार या प्रक्रियेत अगदी बदलून जातो, ज्याने वापरला त्याच्या मालकीचा असल्यासारखा होतो किंवा नवीनच शब्द किंवा म्हण त्यातून तयार होते. ही खरंतर त्या त्या व्यक्तीची अभिजात कलाकृती म्हणून पेटेंटेड असायला हवी. पण हा लांबचा मुद्दा आणि त्यात काय काय करावे लागेल याची कल्पना नसल्यामुळे सध्या तरी असल्या अभिजात शब्द, वाक्यकुळींची देवाण घेवाण इथे करूयात.
माझी आमच्या अख्या खानदानात असलेली ओळख म्हणजे,' गन्ना खडा था' - संदर्भासहित स्पष्टीकरणासाठी मायबोलीवर प्रसिध्द झालेली मामू ही पोस्ट वाचावी.
http://www.maayboli.com/node/47803
आमच्या घरात लहानपणापासून ऐकलेली बाबांची त्यांच्या पापभीरू स्वभावाला साजेल अशी फटकारतानाची म्हण - तुला खाल्ले म्हशीने - मला कधीही कळले नाही कि याची उत्पत्ती कुठून झाली - आम्हा बहिणींचे यावरचे अनुमान की आपले बाबा फारच सौम्य, सोज्वळ - शिवी कधी देणार नाहीत - पण सातत्याने डोईजड होणाऱ्या कार्ट्याना ओरडायला तर पाहिजे - मग कमीत कमी नुकसानदायक ( least damaging ) असा वाक्प्रचार त्यांनी शोधला असावा - एकतर म्हस काय आपल्या पोरींना खाणार नाही याची त्यांना खात्री असावी - म्हस ही safe आणि मुलीही असे असावे - असो - लहानपणी खूप हसायचो पण गम्मत म्हणजे माझी मुलगी तीन चार वर्षाची असताना मला खूप संताप आला होता. आम्ही बालहक्कवाले म्हणून हात काय उचलता येत नाही म्हणून अगदी जोरात तिच्यावर खेकसले - तुला खाल्ले म्हशीने ! माझ्या कुटुंबात आता ही सर्वमान्य शिवी आहे- म्हणजे मी मुलीला, ती छोट्या भावाला, छोटा आमच्यापैकी कुणालाही सर्वांसमोर हा अपशब्द वापरू शकतो. माही म्हणताना म्हशीनं ऐवजी तुला खाल्लं मशीनं, असंच म्हणतो.
बाबा अगदी लहानपणापासून राजकीय कार्यकर्ते आणि पेशाने शिक्षक. कुठलीही गोष्ट सहज आहे तशी न सांगता त्याचे सर्वांगाने विश्लेषण करायची सवय ( खोड), त्यात वारंवार येणारे वाक्य - 'पण गम्मत अशी झाली की' -- आम्ही लहानपणी अगदी मन देऊन ऐकायचो, काय गम्मत असणार आहे पुढे बरं ?- कधी कळलेच नाही. बऱ्याच वर्षानी जेव्हा प्रशासकीय स्वरूपाचे रिपोर्ट लिहायला, वाचायला लागले तेव्हा कळले की - however, nevertheless-- अशा अनेक शब्दांचा सार म्हणजे बाबांचे 'गम्मत अशी की', होते. मधल्या काळात आणि आताही त्यांच्या व्रात्य मुली आणि बायको यावरून असंख्य 'गमती' करून हसत असतातच.
मोठ्या दिदीचा आवडीचा शब्द - भंपक आणि भंपकपणा करू नको. या भंपक आणि भंपकपणा शब्दाच्या पिल्लावली माझ्या आणि दोन्ही दिद्यांच्या घरी जल्मल्या आहेत की त्याची गिनती आता आम्ही थांबवली आहे . सगळ्या रागलोभांना व्यक्त करायला ही शब्दावळ पुरेशी आहे या निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. उदा. भम्पू , भम्पूगिरी ( हा शब्द इग्लिश मध्ये पण आहे -कधीही ऑफिसमधून फोन करून विचारले की मनु आणि माहिपैकी कोणीतरी she is doing भम्पुगिरि अशी तक्रार असते) मग भम्पूचे लाडात आल्यावर ढम्पू, टम्पू , ढम्पुकलं, चिडून ढम्प्या असे अनेक versions तयार होताहेतच. भंपक- ढम्पक - ढम्पूकली - असे होता होता अगदी नव्या पिढीच्या माझ्या ताज्या ३ वर्षाच्या भाच्याने यात 'पुकली ढमढम' अशी भर घातली आहे.
सांगलीहून अकलूजला साधारण १२ वर्षाआधी जात होते. अशीच एक टूर, मध्येच एक रात्र बहिणीला भेटून पुढे प्रवास असा बेत. सकाळी सात वाजता एस टीत कंडक्टरच्या शेजारची सीट, दोघा बहिणींच्या प्रेमाला आणि पर्यायाने टपल्या मारून खिदळण्याला बहर आलेला. कंडक्टर आपल्या पॅडवर आकडेमोड करता करता खुदकन हसत होता आमचे बहरलेले बोलणे ऐकून. शेवटी गाडी निघण्याची वेळ, बेल वाजवताना बहिणीला म्हणाला,' नका काळजी करू फार'.
बहिणाई,' काय सांगू, अवखळ आहे फार, सांभाळून न्या लहानीला'. हसून कंडक्टरने आणि मी निरोप दिला. पुढे गप्पा, एके ठिकाणी चहा करत, अकलूज आले. उतरताना कंडक्टर मला म्हणे, ' सांगा बहिणीला, तिच्या "अवजड" बहिणीला सांभाळून पोहचवले.
आधी समोरच्या STD च्या पिवळ्या खोक्यात घुसून बहिणीला, 'अवखळ ते अवजड' प्रवास सांगितला !
तेव्हापासून प्रवासाला निघाले की मी , " अवजड" होते .
सासरी आमच्या कोणाच्याही वाढदिवसाला पूर्ण happy birthday to you म्हणतच नाहीत. कारण मोठ्या दिराच्या मुलीने २ वर्षाची असताना पूर्ण म्हणता येत नाही म्हणून happy टू यू असे म्हणलेले इतके फ़ेमस झाले आहे हि त्यानंतर येणाऱ्या सगळ्यांच्या सगळ्या वाढदिवसांना फक्त हैप्पी टू यू असंच म्हणायचा संकेत आहे.
खरे तर सासरचे खूप किस्से आहेत कारण त्यांच्याच भाषेत सांगायचे तर सगळेच equally 'पाजळत' असतात. पण वारसाहक्काने त्याचे पेटंट दुसऱ्या एका माबोकरीण बाईंकडे जाते, तरीही पुढील किस्सा सांगितलाच पाहिजे. तुमच्या घरी काय काय म्हणतात असे अगदी विस्मयचकित होऊन उद्गार काढले असता प्रिय नवऱ्याने ही गोष्ट सांगितली. यात कोण कोणास म्हणले हे बाजूला सारून मूळ कथाभाग सांगते. ' शी किती घाण पादण्याचा वास', असे म्हणले असताना प्रतिप्रश्न, 'तुम्ही फार सुगंधी पादता वाटतं !' . हे ऐकल्यावर जेव्हा घरातल्या सार्वजनिक ठिकाणी बसले असता असे नाक बंद करायची वेळ आली तर गुमान तिथून पलायन करणे, हा एकच मार्ग. उगाच काही बोलले आणि असला प्रतिप्रश्न आला तर खरे किंवा खोटे उत्तर द्यायच्या फंदात कोण पडणार?
वासावरून थोडे विषयांतर ( भाषांतर ) होईल पण आणखी एक किस्सा. माझी पहिली वाहिली नोकरी बारावीनंतर पाचगणीच्या म्यप्रोमध्ये. तिथले प्रॉडक्शन म्यानेजर हे उत्तर प्रदेशचे शुध्द हिंदी भाषिक मिश्रा'जी', अशा 'जी' लोकांसमोर आमचे हिंदी म्हणजे टाईमपास मधल्या शाकालसमोर दगडूचे म्हराटी. मिश्राजी मात्र अतिशय सौम्य, सालस माणूस. फ्याक्टरीत ** कुठल्याही फळाचं प्रोसेसिंग होत असले की घमघमाट सुटायचा. एक दिवस पायनाप्पल जॅम बनवत होते. मी त्या घमघमाटाने अगदी हुंगून ( मुग्ध, भारावून असे काही म्हणता येत नाही आणि नेमके विशेषण सुचत नाहीये ) जाउन त्यांना म्हणले, ' मिश्राजी क्या बास आ रही है !' मिश्राजींचा चेहरा अगदी कावराबावरा . क्या बास आ रही है, शबाना ? दोन तीन वेळा सांगितल्यावर त्यांना मला काय म्हणायचे होते ते कळले. त्यानंतर अर्धा तास त्यांनी बास म्हणजे काय आणि मला जे म्हणायचे होते त्यासाठी खुशबू, सुगंध तत्सम शब्द समर्पक आहेत, हे समजावून सांगितले. पण अजूनही अननस आणला की मला त्या 'बास' चीच आठवण येते.
(*** factory, mapro यातला ya उच्चार लिहायला जमत नाहीये )
लग्न झाल्यावर थोडी एकमेकांच्या स्वभावाची वास्तववादी ओळख झाल्यावर मी नवऱ्याला म्हणले अरे कधी तरी Romantically बोलत जा -- तेव्हा त्याने 'रोमन टिकली' कसं बोलतात हे माहित नसल्याची कबुली दिली होती. पण त्यानंतर प्रेमाचे दोन शब्द नवऱ्याकडून म्हणजे 'रोमन टिकली' !
लोकहो, तुमच्याकडचे असे भंपक शब्द , वेगवेगळ्या टिकल्या ऐकायला आवडतील. मराठी भाषा अस्तास चालली आहेची ओरड आपण नेहमी ऐकतो, आपापल्या परीने शब्दभांडार वाढवूयात का इथे. माय, बाप, बहिण आणि इतर नातीबोली वाचायला आवडेल.
वारने लेकाचा"-- माझे वारणेचे
वारने लेकाचा"-- माझे वारणेचे इथे येउन ' वॉर्न' झाले आहे. बऱ्याच जणांची समजूत कोन गोऱ्याशी संसार मांडला आहें >> आमचा नवरा हल्ली मि. केन म्हणून हाक मारल्यावर सुधारत बसत नाही... आधी कितीतरी वेळा प्रयत्न केला.
आमच्याकडचे काही शब्द १.
आमच्याकडचे काही शब्द
१. याच्या'पुढे' सांगितलं, त्याच्या 'पुढे किंवा समोर' सांगितलं (त्याला सांगितलं असं नाही म्हणत)
भाऊ बहिणी एकमेकांना याच नावाने हाक मारतात.
आम्ही पण आता बासुंदीला लाखंडीच म्हणतो. 

२. कलाकार (विशेषतः लहान मुलांना म्हणतात पण कोणी मोठे उपद्व्यापी नकोसे पाहुणे असतील तर त्यांनाही पदवी बहाल
३. अगदी पेटंट शब्द.. 'बावळट'. तोही असा तसा नाही म्हणायचा. 'बा' थोडा लांबवुन म्हणायचा
४. माझ्या मैत्रीणीचा मुलगा बासुंदीला का कोण जाणे नेहमी 'लाखंडी" म्हणायचा. बहुतेक श्रीखंड आणि बासुंदीचं मिक्स झालं होतं डोक्यात.
५. माझा २ वर्षाच्या मुलाचे पेटंट शब्द तित्तू (थँक्यू), नमनम (वेलकम), बाबू (लाडू)
माझा शेजारी आरव. वय वर्ष अडिच
माझा शेजारी आरव. वय वर्ष अडिच त्याचे पेटंटेड शब्द
कबू - कबुतर
अबि - अभ्यास
मिकी - मिल्खा (भाग मिल्खा भाग त्याचा अत्यंत आवडता सिनेमा आहे. लॅपटॉप वर अखंड लावून दिला तर पापणी न लवता पाहतो) म्हणून त्याची आई लॅपटॉप (कॉम्प्युटर टाकला म्हणून सांगते)
त्याच्या मते
लॅपटॉप्/कॉम्प्युटर = कमडी
टाका - टाकला
मिकी टाका - मिल्खा टाकला.
माझं आजोळ सांगलीचं आनी
माझं आजोळ सांगलीचं आनी बाबांचं आजोळ वाई आणि गाव सातारा.
नी म्हणते तसं आमच्यात तुमच्यात हे सांगली स्पेशल. शिवाय खिळ्याला मोळा हा शब्द पण मी तिथेच ऐकला.
सातारच्या आजीकडून आदितवार आईतवारी असे शब्द नएकवेळा ऐकलेत. माझी आई नेहेमीच रैवार/रैवारी म्हणते, शिवाय फेब्रुवारी ला फेबुरवारी पण
बाबा -काका नेहेमी टोमॅटो ला टामाटू म्हणतात. साबुदाण्याला शाबुदाणा...
"अरे वसंता बरेच दिवसांनी आलास
"अरे वसंता बरेच दिवसांनी आलास इकडं ?"
"हो ,सुट्टी काढली .म्हटलं उभ्या उभ्या भेटावं सगळ्याना ."
"कुणाच्यात उतरला आहेस ? आज वस्तीला ये इकडेच ."
"तिकडे मामाच्यात आहे ."
"मग मधल्या वेळच्या चहाला तरी येऊन जा ."
"येतो .आता पाण्याचं कसं काय ?"
"वाड्यातला आड आटलाय ,आणि बिऱ्हाडंपण वाढलिहेत .पण नळ आलेत ना नगरपालिकेचे .मिळतंय थोडं ."
"निघू का ?"
"निघतोस ? पण ये नक्की .आणि हे बघ वाटेत तुला तात्या भेटले तर घराकडे लावून दे त्यांना .सुरेश दिसला तर बघ असेल आता कुसवावर बसलेला ."
७०-७५ चा संवाद वाटतोय.
७०-७५ चा संवाद वाटतोय.
भारी , लेख आणि धागा , बरेच
भारी , लेख आणि धागा , बरेच नवीन शब्द कळले.
धाग्याचा दोरखंड व्हायला
धाग्याचा दोरखंड व्हायला लाखलाय .
"ऐतवार" आमच्याकडे पण वापरला
"ऐतवार" आमच्याकडे पण वापरला जातो... आधी मला वाटायचे.. कि ऐतं बसुन खायचा वार म्हणुन ऐतवार...
"की" हे पण सातारला भरपुर वापरले जाते... जसे...जाशील की.... अरे तो आला की... मी करतोय की.....
आम्हा भावंडांचा पेटंट वाक्य.
आम्हा भावंडांचा पेटंट वाक्य. तिकडे जायचं असेल तर "पाकीस्तान वर हल्ला करुन येतो".
नागपुरचं आहे का
नागपुरचं आहे का कुणी?
नागपुरात मी जातो मी करतो असे न म्हणता मी जाऊन राहिलो, मी करुन राहिलो असं म्हणतात.
काही जण (नागपुरचे नाही) साबुदाण्याल शाबुचे तांदुळ म्हणतात.

मस्त धागा आणि
मस्त धागा आणि प्रतिक्रिया!
कोणी बाजारातून सामान आणताना काही गोंधळ घातला की आईचं पेटंट वाक्य: "देई वाण्या घेई प्राण्या!"
शाळेत तर अश्या पेटंटेड शब्दांच्या साथी यायच्या. सुट्टीच्या आदल्या दिवशी holiday kick cross असा प्रकार असायचा. म्हणजे दुसर्याला हाताची बोटे क्रॉस करून लाथ मारायची आणि त्याने ती ज्याची हाताची बोटे क्रॉस नाहीत अशा कोणाला तरी पास ऑन करायची!
एका तम्बुतल्या शिबिरात आम्ही toilet ला जाण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात असा कोडवर्ड ठरवला होता. त्या शिबिरात आलेले एक सर त्यांच्या भाषणात तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात आहात ते सौंदर्य टिपायला शिका वै. वै. सतत हे दोन शब्द वापरून बोलत होते आणि इथे आमची हहपुवा!
त्याच शिबिरात भंजाळणे हे क्रियापद जाम फेमस झालं होतं! सजीव/निर्जीव दोन्ही गोष्टी भंजाळू शकत होत्या! पण ७ दिवस कंदील आणि battery च्या प्रकाशात घालवल्यावर आठव्या दिवशी लक्ष्मी रोड वरचा संध्याकाळचा दिव्यांचा लखलखाट पाहताना आमच्या डोळ्याचं जे झालं त्याला भंजाळणे हे एकमेव क्रियापद लागू पडलं!
तिकडे जायचं असेल तर
तिकडे जायचं असेल तर पाकिस्तानवर हल्ला करून येतो>>>>
माझे आजोबा म्हणायचे, "लंडनला जाउन येतो, आलोच...."
आशिका, माझा कलिग अमरावतीचा
आशिका, माझा कलिग अमरावतीचा आहे तोही असेच बोलतो
माझा कलिग अमरावतीचा आहे तोही
माझा कलिग अमरावतीचा आहे तोही असेच बोलतो >>> हो ना? अगदी विचित्र वाटतं असं ऐकायला
हडबडणे : काहि न सुचणे /
हडबडणे : काहि न सुचणे / समजणे
मुलगि *लागू* असणे
नन्दिनि, आधी कितीतरी वेळा
नन्दिनि,
आधी कितीतरी वेळा प्रयत्न केला. मी पण
धाग्याचा दोरखंड
भंजाळणे हा शब्द पुण्याकडे
भंजाळणे हा शब्द पुण्याकडे लैच कॉमन आहे
माझा नवरा विदर्भातला
माझा नवरा विदर्भातला आहे…नुकतच लग्न झालेलं आमचं…तो मला स्टेशन वर घ्यायला आलेला…
तेव्हा एकदा झालेला संवाद….फोन वर :
तो - "स्टेशन च्या थोडसं 'समोर' येऊन थांब"
मी - "अरे समोरच आहे … तू दिसत नाहीयेस"
तो - "अगं बघ इकडे एक वडापाव ची गाडी आहे"
मी - "अरे कुठे आहे वडापाव ची गाडी ? मला नाही दिसत"
तो - "वेन्धळि आहेस का ? जरा नीट बघ"
हे असं चालू होतं … थोड्या वेळाने साक्षात्कार झाला कि त्याला मी थोडं "पुढे" येणं अपेक्षित होतं ज्याला तो "समोर" म्हणत होता :)))
तेव्हापासून कुणी "समोर" म्हटलं की नेमकं "पुढे" की "समोर" ह्याची खात्री करून घेते :))))
कोल्हापूरात सूनबाईबद्दल
कोल्हापूरात सूनबाईबद्दल शेजारची बाई कौतुकाने बोलू लागली आणि जर सासूबाईला सुनेबद्दल तक्रारच करायची असेल तर असा संवाद होतोच..
शेजारीण : "आक्का, तुमच्या सूनेने केलेली आमटी मस्तच झालीया..."
सासू (फणकारा दाखवत) : "कसली मस्त ? पातळफिस्स केलीया नव्हका !"
शेजारीण : "ताक देखील झकास झालंय...."
सासू (त्याच स्वरात) : "काय तरी तुमचं....आंबटढ्याण झाल्यं की !"
~ यातील "पातळ" आणि "आबंट" हे वस्तुवैशिष्ठ वर्णन समजून येते. पण त्याला लावलेली "फिस्स" व "ढ्याण" विशेषणे काय दर्शवितात ते समजून येत नाही...पण इकडच्या शेरेबाजीत कायम असतात.
बुडाचे रुद्राक्ष करणे = खुप
बुडाचे रुद्राक्ष करणे = खुप मेहनत करणे / खुप अभ्यास करणे असा.
आय. ए.एस साठी खुप अभ्यास करावा लागतो, म्हणजे खुप वेळ बसुन अभ्यास कराव लागतो व बुड कडक होते रुद्राक्षासारखे
साबूदाणा खिचडीला , साबूदाणा उसळ ; पित्रु पक्षाला हाडपाक म्हणतात नागपूर चे लोक.
एक खवट नागपुरी अमेरिकत बसला
एक खवट नागपुरी अमेरिकत बसला अहे माहीत आहे का?
तेव्हापासून कुणी "समोर"
तेव्हापासून कुणी "समोर" म्हटलं की नेमकं "पुढे" की "समोर" ह्याची खात्री करून घेते<<< हे एका वैदर्भीय मैत्रीणीने केलं होतं>
ऑफिसमध्ये फोन्वर म्हणाली. "अगं मी खाली कॅन्टीनला येऊन राह्यली" कितीवेळ सापडेचना, परत फोन केल्यावर मी लिफ्टमध्ये आहे.
मग मघाशी राह्यली होती म्हणून आता काय बाडबिस्तारा आणण्यासाठी परत गेलीस का?
एक खवट नागपुरी अमेरिकत बसला
एक खवट नागपुरी अमेरिकत बसला अहे माहीत आहे का?>>>>> बापरे सॉरी हं नागपुरकर
भंजाळणे हा शब्द मूळ
भंजाळणे हा शब्द मूळ कोल्हापूरचा आहे असं कोल्हापुरच्या धाग्यावर मला समजले.
त्या हल्ली टिकल्या टिकल्या
त्या हल्ली टिकल्या टिकल्या लावलेल्या डिझायनर साड्या येतात त्यांना काहीजण 'झगरी-मगरी' म्हणतात.
अन्जू, ताशा प्रकारच्या
अन्जू, ताशा प्रकारच्या कपड्यांना आम्ही झागरमागर म्हणायचो!
पंधराएक वर्षांपूर्वी हा शब्द पहिल्यांदा ऐकला.
आ.न.,
-गा.पै.
आमच्यात-तुमच्यात हे शब्द इतके
आमच्यात-तुमच्यात हे शब्द इतके वेगळे असतील असं मला आजच कळलं. माझ्यासाठी ते अत्यंत सर्वसामान्य शब्द आहेत
खिळा कुठला आणि मोळा कुठला ह्याचे नियम आहेत. म्हणजे मला सांगता नाही येणार पण बघून मी सांगू शकेन की हा खिळा की मोळा
आमच्यात, तुमच्यात, त्यांच्यात
आमच्यात, तुमच्यात, त्यांच्यात हे बेळगाव साईडला पण वापरतात, आमचे शेजारी वापरायचे. 'तुमच्यात पाहुणे आले का?' जिथे आम्ही 'तुमच्याकडे पाहुणे आले का?' असं म्हणतो
ओके गामा, म्हणजे तो इतका जुना
ओके गामा, म्हणजे तो इतका जुना शब्द आहे फक्त आता थोडा बदलला.
Pages