पेटेंटेड मराठी

Submitted by शबाना on 13 June, 2014 - 09:43

प्रत्येक घराची, नात्याची एक वेगळी अशी भाषाशैली असते. एखाद्या सदस्याचा अगदी पेट शब्द असतो, जोक्सची जातकुळी असते आणि कोणावर कशाप्रकारचे जोक्स 'मारले' जातात हेही त्या कुटुंबाच्या कालौघात नक्की झालेले असते. पुढे आपापल्या आयुष्याच्या दिशा बदलल्या, वर्षानुवर्षे सहवास नसला तरी यातले काही शब्द, म्हणी किंवा एखाद्या घटनेच्या संदर्भात निर्माण झालेली वाक्य त्या कुटुंबासाठी अगदी सौ टक्का हसायला लावणारी, त्या त्या व्यक्तीचे स्वभावविशेष दर्शवणारी अशी असतात. मूळ भाषेतला शब्द, वाक्प्रचार या प्रक्रियेत अगदी बदलून जातो, ज्याने वापरला त्याच्या मालकीचा असल्यासारखा होतो किंवा नवीनच शब्द किंवा म्हण त्यातून तयार होते. ही खरंतर त्या त्या व्यक्तीची अभिजात कलाकृती म्हणून पेटेंटेड असायला हवी. पण हा लांबचा मुद्दा आणि त्यात काय काय करावे लागेल याची कल्पना नसल्यामुळे सध्या तरी असल्या अभिजात शब्द, वाक्यकुळींची देवाण घेवाण इथे करूयात.

माझी आमच्या अख्या खानदानात असलेली ओळख म्हणजे,' गन्ना खडा था' - संदर्भासहित स्पष्टीकरणासाठी मायबोलीवर प्रसिध्द झालेली मामू ही पोस्ट वाचावी.

http://www.maayboli.com/node/47803

आमच्या घरात लहानपणापासून ऐकलेली बाबांची त्यांच्या पापभीरू स्वभावाला साजेल अशी फटकारतानाची म्हण - तुला खाल्ले म्हशीने - मला कधीही कळले नाही कि याची उत्पत्ती कुठून झाली - आम्हा बहिणींचे यावरचे अनुमान की आपले बाबा फारच सौम्य, सोज्वळ - शिवी कधी देणार नाहीत - पण सातत्याने डोईजड होणाऱ्या कार्ट्याना ओरडायला तर पाहिजे - मग कमीत कमी नुकसानदायक ( least damaging ) असा वाक्प्रचार त्यांनी शोधला असावा - एकतर म्हस काय आपल्या पोरींना खाणार नाही याची त्यांना खात्री असावी - म्हस ही safe आणि मुलीही असे असावे - असो - लहानपणी खूप हसायचो पण गम्मत म्हणजे माझी मुलगी तीन चार वर्षाची असताना मला खूप संताप आला होता. आम्ही बालहक्कवाले म्हणून हात काय उचलता येत नाही म्हणून अगदी जोरात तिच्यावर खेकसले - तुला खाल्ले म्हशीने ! माझ्या कुटुंबात आता ही सर्वमान्य शिवी आहे- म्हणजे मी मुलीला, ती छोट्या भावाला, छोटा आमच्यापैकी कुणालाही सर्वांसमोर हा अपशब्द वापरू शकतो. माही म्हणताना म्हशीनं ऐवजी तुला खाल्लं मशीनं, असंच म्हणतो.

बाबा अगदी लहानपणापासून राजकीय कार्यकर्ते आणि पेशाने शिक्षक. कुठलीही गोष्ट सहज आहे तशी न सांगता त्याचे सर्वांगाने विश्लेषण करायची सवय ( खोड), त्यात वारंवार येणारे वाक्य - 'पण गम्मत अशी झाली की' -- आम्ही लहानपणी अगदी मन देऊन ऐकायचो, काय गम्मत असणार आहे पुढे बरं ?- कधी कळलेच नाही. बऱ्याच वर्षानी जेव्हा प्रशासकीय स्वरूपाचे रिपोर्ट लिहायला, वाचायला लागले तेव्हा कळले की - however, nevertheless-- अशा अनेक शब्दांचा सार म्हणजे बाबांचे 'गम्मत अशी की', होते. मधल्या काळात आणि आताही त्यांच्या व्रात्य मुली आणि बायको यावरून असंख्य 'गमती' करून हसत असतातच.

मोठ्या दिदीचा आवडीचा शब्द - भंपक आणि भंपकपणा करू नको. या भंपक आणि भंपकपणा शब्दाच्या पिल्लावली माझ्या आणि दोन्ही दिद्यांच्या घरी जल्मल्या आहेत की त्याची गिनती आता आम्ही थांबवली आहे . सगळ्या रागलोभांना व्यक्त करायला ही शब्दावळ पुरेशी आहे या निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. उदा. भम्पू , भम्पूगिरी ( हा शब्द इग्लिश मध्ये पण आहे -कधीही ऑफिसमधून फोन करून विचारले की मनु आणि माहिपैकी कोणीतरी she is doing भम्पुगिरि अशी तक्रार असते) मग भम्पूचे लाडात आल्यावर ढम्पू, टम्पू , ढम्पुकलं, चिडून ढम्प्या असे अनेक versions तयार होताहेतच. भंपक- ढम्पक - ढम्पूकली - असे होता होता अगदी नव्या पिढीच्या माझ्या ताज्या ३ वर्षाच्या भाच्याने यात 'पुकली ढमढम' अशी भर घातली आहे.

सांगलीहून अकलूजला साधारण १२ वर्षाआधी जात होते. अशीच एक टूर, मध्येच एक रात्र बहिणीला भेटून पुढे प्रवास असा बेत. सकाळी सात वाजता एस टीत कंडक्टरच्या शेजारची सीट, दोघा बहिणींच्या प्रेमाला आणि पर्यायाने टपल्या मारून खिदळण्याला बहर आलेला. कंडक्टर आपल्या पॅडवर आकडेमोड करता करता खुदकन हसत होता आमचे बहरलेले बोलणे ऐकून. शेवटी गाडी निघण्याची वेळ, बेल वाजवताना बहिणीला म्हणाला,' नका काळजी करू फार'.

बहिणाई,' काय सांगू, अवखळ आहे फार, सांभाळून न्या लहानीला'. हसून कंडक्टरने आणि मी निरोप दिला. पुढे गप्पा, एके ठिकाणी चहा करत, अकलूज आले. उतरताना कंडक्टर मला म्हणे, ' सांगा बहिणीला, तिच्या "अवजड" बहिणीला सांभाळून पोहचवले.

आधी समोरच्या STD च्या पिवळ्या खोक्यात घुसून बहिणीला, 'अवखळ ते अवजड' प्रवास सांगितला !

तेव्हापासून प्रवासाला निघाले की मी , " अवजड" होते .

सासरी आमच्या कोणाच्याही वाढदिवसाला पूर्ण happy birthday to you म्हणतच नाहीत. कारण मोठ्या दिराच्या मुलीने २ वर्षाची असताना पूर्ण म्हणता येत नाही म्हणून happy टू यू असे म्हणलेले इतके फ़ेमस झाले आहे हि त्यानंतर येणाऱ्या सगळ्यांच्या सगळ्या वाढदिवसांना फक्त हैप्पी टू यू असंच म्हणायचा संकेत आहे.

खरे तर सासरचे खूप किस्से आहेत कारण त्यांच्याच भाषेत सांगायचे तर सगळेच equally 'पाजळत' असतात. पण वारसाहक्काने त्याचे पेटंट दुसऱ्या एका माबोकरीण बाईंकडे जाते, तरीही पुढील किस्सा सांगितलाच पाहिजे. तुमच्या घरी काय काय म्हणतात असे अगदी विस्मयचकित होऊन उद्गार काढले असता प्रिय नवऱ्याने ही गोष्ट सांगितली. यात कोण कोणास म्हणले हे बाजूला सारून मूळ कथाभाग सांगते. ' शी किती घाण पादण्याचा वास', असे म्हणले असताना प्रतिप्रश्न, 'तुम्ही फार सुगंधी पादता वाटतं !' . हे ऐकल्यावर जेव्हा घरातल्या सार्वजनिक ठिकाणी बसले असता असे नाक बंद करायची वेळ आली तर गुमान तिथून पलायन करणे, हा एकच मार्ग. उगाच काही बोलले आणि असला प्रतिप्रश्न आला तर खरे किंवा खोटे उत्तर द्यायच्या फंदात कोण पडणार?

वासावरून थोडे विषयांतर ( भाषांतर ) होईल पण आणखी एक किस्सा. माझी पहिली वाहिली नोकरी बारावीनंतर पाचगणीच्या म्यप्रोमध्ये. तिथले प्रॉडक्शन म्यानेजर हे उत्तर प्रदेशचे शुध्द हिंदी भाषिक मिश्रा'जी', अशा 'जी' लोकांसमोर आमचे हिंदी म्हणजे टाईमपास मधल्या शाकालसमोर दगडूचे म्हराटी. मिश्राजी मात्र अतिशय सौम्य, सालस माणूस. फ्याक्टरीत ** कुठल्याही फळाचं प्रोसेसिंग होत असले की घमघमाट सुटायचा. एक दिवस पायनाप्पल जॅम बनवत होते. मी त्या घमघमाटाने अगदी हुंगून ( मुग्ध, भारावून असे काही म्हणता येत नाही आणि नेमके विशेषण सुचत नाहीये ) जाउन त्यांना म्हणले, ' मिश्राजी क्या बास आ रही है !' मिश्राजींचा चेहरा अगदी कावराबावरा . क्या बास आ रही है, शबाना ? दोन तीन वेळा सांगितल्यावर त्यांना मला काय म्हणायचे होते ते कळले. त्यानंतर अर्धा तास त्यांनी बास म्हणजे काय आणि मला जे म्हणायचे होते त्यासाठी खुशबू, सुगंध तत्सम शब्द समर्पक आहेत, हे समजावून सांगितले. पण अजूनही अननस आणला की मला त्या 'बास' चीच आठवण येते.
(*** factory, mapro यातला ya उच्चार लिहायला जमत नाहीये )

लग्न झाल्यावर थोडी एकमेकांच्या स्वभावाची वास्तववादी ओळख झाल्यावर मी नवऱ्याला म्हणले अरे कधी तरी Romantically बोलत जा -- तेव्हा त्याने 'रोमन टिकली' कसं बोलतात हे माहित नसल्याची कबुली दिली होती. पण त्यानंतर प्रेमाचे दोन शब्द नवऱ्याकडून म्हणजे 'रोमन टिकली' !

लोकहो, तुमच्याकडचे असे भंपक शब्द , वेगवेगळ्या टिकल्या ऐकायला आवडतील. मराठी भाषा अस्तास चालली आहेची ओरड आपण नेहमी ऐकतो, आपापल्या परीने शब्दभांडार वाढवूयात का इथे. माय, बाप, बहिण आणि इतर नातीबोली वाचायला आवडेल. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्यात अमुक चालत नाही आणि आमच्यात कधी येणार यात फरक आहे रिया.
सातारा, वाई मधे नातेवाइक वा मित्र नाहीत कुणी त्यामुळे माहित नाही.

केअंजली, आमच्याकडे (माहेरी) कपडे आंबटओले असणे, उमखा नसणे, कणिक तेवली हे सगळे शब्द वापरले जातात, स्पेशली आईकडून. आणि आम्हाला रात्री उशीरा पर्यंत अभ्यास करायची सवय होती, सकाळी लवकर उठून अभ्यासाला बसणं फार जीवा वर यायच तेव्हा बाबा म्हणायचे 'दिवस गेला उटारेटी, चांदण्या रात्री कापुस वेची.'

तस आईची एक मैत्रिण''नेमकं''ला 'मेचक' म्हणायची जसं, मेचके आजच दिवे गेले...

चुळचुळ मुंगळा आणि वसवस कांडी>>>>>> Lol

आमच्या कडे याला चुळबुळ पांडे नाव पाडलं आहे>>>>>

आमच्या कडे याला धांदरपळे म्हणत्यात.

नी, आमच्यात अमुक चालत नाही टाईप्सच Happy

इथे कोणी दुसरं आहे का वाई सातार्‍याकडंचं?
तुमच्यात म्हणतात का अस? की आमच्या घरची देण आहे ही मला? Wink

माझ्या आजोळी रविवार ला रैवार पण म्हणतात. मी शाळेत असताना खुप दिवस शनिवार रैवार असंच म्हणायचे

सातारा, वाई मधे नातेवाइक वा मित्र नाहीत कुणी त्यामुळे माहित नाही.>>
सातारकडं असं (आमच्यात कधी येणार वगैरे) म्हणत नाहीत.
सातारकर कधीही 'सातार्‍याला जातो' असे म्हणत नाहीत. 'सातारला जातो' असं म्हणतात.
आणि 'सातारा आलं' (प्रवास करत असताना) असं कधीही म्हणत नाहीत.
'सातारा आला' असा पुल्लिंगी उल्लेख केला जातो सातारचा.

- (सातारकर) चैतन्य.

चैतन्य, आत्ता मी तुलाच साद घालणार होते Wink

काय माहीत माझ्या आजोळी आणि बाबांच्या घरी ही आमच्यात तुमच्यात खुपं वापरलं जातं Happy

सातारला अगदी अगदी!
कोणी नॉन मराठी मला गाव विचारतं तेंव्हा आपसुकच तोंडातून सातार बाहेर पडतं. मग नंतर करेक्शन केलं जात सातारा असं Happy

आमच्यात अमुक चालत नाही<< ती सर्वमान्य भाषारचना आहे. सर्वत्र वापरतात.

नीरजा म्हणतेय ते "आमच्याकडे कधी येणार?" ऐवजी "आमच्यात कधी येणार?"

कोकणात रविवाराला "आईतवार" हा कानडी शब्द कित्येकदा ऐकलाय.

रत्नागिरीमध्ये "अड्डस" हा एक टपोरी शब्द फार फेमस होता. कशासाठी पण वापरला जायचा "मस्त छान" या अर्थाने, पण तो टपोरी शब्द असल्याने बर्यचदा ओरडा बसायचा, "असले घाण शब्द वापरायचे नाहीत म्हणून्न" नंतर कधीतरी काही कामासाठी चित्पावनी बोली (जि कोकणातले चित्पावन बोलत.) वाचत होते तिथे चक्क हा अड्डस शब्द दिसला. कोकणस्थाच्या घरातून बाहेर पडून हा शब्द मवाली कसा झाला कुणास ठाऊक?

nee mhanatey tech mala mhanayachay
aamachyat asach mhanatat.

to amachyat ala nahi
tyani te amachyat magital navhat etc etc

चैतन्य, वाटलंच मला हे आमच्यात तुमच्यात नॉर्मलपेक्षा वेगळं हे खास सांगली-मिरजेचं असणार. कारण सांगली-मिरज वाले सोडून कुणाला हे म्हणताना किंवा माहित असलेलंही ऐकलं नव्हतं.

रिया, तुझा गोंधळ होतोय.
आमच्यात अमुक पद्धत आहे आणि आमच्यात येणे यात खूप फरक आहे. दोन वेगळे अर्थ आहेत. तुला नक्की कशाबद्दल म्हणायचंय ते तू आधी नक्की कर.

आमच्यात अमुक चालत नाही<< ती सर्वमान्य भाषारचना आहे. सर्वत्र वापरतात. <<< बरोब्बर नंदे.

कोकणातल्या कोकणस्थ म्हातार्‍यांची शब्दसंपदा ऐकली नाहीस का नंदे? Wink

नी, ती ऐकतच मोठे झालोय. कोकणात एकंदरच भाषेचे श्लीलाश्लील नियम फार शिथिल आहेत. त्यांचे पेटंट शब्द इथे लिहायचे तर बीबीला टाळं लागायचं.

नंदिनी, आईतवार महाबळेश्वर मध्येही इथले स्थानिक धावड वापरतात. माझी आजी, आई, बाबा सगळे एकमेकांशी बोलताना आईतवारच म्हणायचे. पूर्वज कोल्हापूर, पन्हाळा इथून येउन वसलेले त्यामुळे इथे तो कानडी- कोकणी प्रभाव भाषा, काही खाद्यपदार्थ यावर आहेच.

साती, इथे कोणी आजारी पडत नाही, शीक होतात, शिरेस पण होतात! शीक - sick वरून आलेला. ब्रिटीशांच्या या उन्हाळी सुट्टीच्या ठिकाणी त्यांच्या वावरामुळे असे अनेक स्थानिक साहेबी शब्द आहेत.

हलवा -- क्या हलवा है क्या? हेच हलवा समजलाय का ? आणि वैतागून एका मीटिंगमध्ये thats not a halwa ! असे ओरडले होते मी Happy हलवा म्हणजे चांगले ही न्यूजच आहे मला

चैतन्य, रिया -- सातारा असं नुसतं थोडीच म्हणतात -- सातारा म्हातारा असतो तो एकत्र !

हलवा -- क्या हलवा है क्या? हेच हलवा समजलाय का >>> हा वेगळा अन तो वेगळा. आमच्याकडे पण हलवा म्हणजे तू म्हणतेस त्याच अर्थाने.

इथे फार गोंधळ घालतेय खरं तर मी Proud

नी, उदाहरण :

१) आमच्यात ही अशीच पद्धत आहे
२) तो आमच्यात आलेला नाही. त्याने आमच्यात खुर्ची मागितली नव्हती.
३)तू जे मागितलंस ते आमच्यात नाहीये

आमच्यात वरील तिनही पद्धती ने बोललं जातं Happy

यापेक्षा वेगलं काही असेल तर हां मग मे बी आमच्यातलं कॉमन असेल Happy

शबाना, माबोचा संदर्भ असा की मागे एकदा एका सिरिअल मधल्या पात्राबद्दल बोलताना स्वप्ना म्हणाली होती की तो एकदम हलवा दिसतो Wink
(संदर्भ - चिकनी चमेली गाणं- जानलेवा जलवा है दिखनेमे हलवा है Wink )

तेंव्हापासून या अर्थी हलवा शब्द वापरला जातो Happy तू म्हणतेयेस तो हलवा घरादारात वापरला जातो. Wink Proud

- चिकनी चमेली गाणं- जानलेवा जलवा है दिखनेमे हलवा है<< इथला संदर्भ म्हणजे हलवा माश्यासारखा!! असे ज्ञानमौक्तिक नुकतेच प्राप्त झाले आहे.

बाकी, इथल्या कुणाकुणाला आर्‍या आणी हब्बेस हे शब्द माहित आहेत?

मस्त धागा आहे शबाना,

हे काही आमच्या कुटुंबातील पेटेंटेड मराठी शब्दः-

पूर्वी एकदा सेल्समॅन घरी येवून काहीबाही वस्तू दाखवत होता व आग्रह करत होता"एक तरी घ्या ना" त्या दिवसापासून सेल्समॅन हा वर्ग मग तो अगदी बँकेचा, इंशुरंस कंपनीचा किंवा टेलीमार्केटिंगवाला असू दे तो म्हणजे "एक तरी घ्या ना" असतो.

माझा मुलगा दोनेक वर्षांचा असेल, नं. २ आली असल्याचे "इमर्जंसी" असे म्हणून सांगायचा, आता घरातील सर्व सदस्य हाच शब्द या बाबतीत वापरतात.

वर सातारकरांबद्दल चर्चा वाचली. असाच एक सातारकर घरी आला असताना क्रिकेटची मॅच चालू होती, ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी होती. शेन वॉर्नला पहाताच सातारकरबुवा म्हणाले "वारने लेकाचा लयी झकास बॉलिंग टाकतो", त्या दिवशी शेन वॉर्नचे नामकरण झाले "वारने लेकाचा"

बरेच आहेत अजुन, टाकते सावकाश

"वारने लेकाचा"-- माझे वारणेचे इथे येउन ' वॉर्न' झाले आहे. बऱ्याच जणांची समजूत कोन गोऱ्याशी संसार मांडला आहे.

मेनगुन्या = चलाख, आप्पलपोटा माणूस.
झिन्ग चाटणे / झिंगाभोरी करणे = बोर करणे, कंटाळा आणणे.
बेंडा = मूर्ख अथवा पागल, बावळट.

कोकणात रविवाराला "आईतवार" हा कानडी शब्द कित्येकदा ऐकलाय.
>>
केवळ कोकनातच नव्हे तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अशिक्षित लोकात सर्रास वापरला जाणारा शब्द आहे. आणि तो 'आदित्यवार' शब्दाचा अपभ्रंश आहे. हिन्दीत इतवार

Pages