पेटेंटेड मराठी

Submitted by शबाना on 13 June, 2014 - 09:43

प्रत्येक घराची, नात्याची एक वेगळी अशी भाषाशैली असते. एखाद्या सदस्याचा अगदी पेट शब्द असतो, जोक्सची जातकुळी असते आणि कोणावर कशाप्रकारचे जोक्स 'मारले' जातात हेही त्या कुटुंबाच्या कालौघात नक्की झालेले असते. पुढे आपापल्या आयुष्याच्या दिशा बदलल्या, वर्षानुवर्षे सहवास नसला तरी यातले काही शब्द, म्हणी किंवा एखाद्या घटनेच्या संदर्भात निर्माण झालेली वाक्य त्या कुटुंबासाठी अगदी सौ टक्का हसायला लावणारी, त्या त्या व्यक्तीचे स्वभावविशेष दर्शवणारी अशी असतात. मूळ भाषेतला शब्द, वाक्प्रचार या प्रक्रियेत अगदी बदलून जातो, ज्याने वापरला त्याच्या मालकीचा असल्यासारखा होतो किंवा नवीनच शब्द किंवा म्हण त्यातून तयार होते. ही खरंतर त्या त्या व्यक्तीची अभिजात कलाकृती म्हणून पेटेंटेड असायला हवी. पण हा लांबचा मुद्दा आणि त्यात काय काय करावे लागेल याची कल्पना नसल्यामुळे सध्या तरी असल्या अभिजात शब्द, वाक्यकुळींची देवाण घेवाण इथे करूयात.

माझी आमच्या अख्या खानदानात असलेली ओळख म्हणजे,' गन्ना खडा था' - संदर्भासहित स्पष्टीकरणासाठी मायबोलीवर प्रसिध्द झालेली मामू ही पोस्ट वाचावी.

http://www.maayboli.com/node/47803

आमच्या घरात लहानपणापासून ऐकलेली बाबांची त्यांच्या पापभीरू स्वभावाला साजेल अशी फटकारतानाची म्हण - तुला खाल्ले म्हशीने - मला कधीही कळले नाही कि याची उत्पत्ती कुठून झाली - आम्हा बहिणींचे यावरचे अनुमान की आपले बाबा फारच सौम्य, सोज्वळ - शिवी कधी देणार नाहीत - पण सातत्याने डोईजड होणाऱ्या कार्ट्याना ओरडायला तर पाहिजे - मग कमीत कमी नुकसानदायक ( least damaging ) असा वाक्प्रचार त्यांनी शोधला असावा - एकतर म्हस काय आपल्या पोरींना खाणार नाही याची त्यांना खात्री असावी - म्हस ही safe आणि मुलीही असे असावे - असो - लहानपणी खूप हसायचो पण गम्मत म्हणजे माझी मुलगी तीन चार वर्षाची असताना मला खूप संताप आला होता. आम्ही बालहक्कवाले म्हणून हात काय उचलता येत नाही म्हणून अगदी जोरात तिच्यावर खेकसले - तुला खाल्ले म्हशीने ! माझ्या कुटुंबात आता ही सर्वमान्य शिवी आहे- म्हणजे मी मुलीला, ती छोट्या भावाला, छोटा आमच्यापैकी कुणालाही सर्वांसमोर हा अपशब्द वापरू शकतो. माही म्हणताना म्हशीनं ऐवजी तुला खाल्लं मशीनं, असंच म्हणतो.

बाबा अगदी लहानपणापासून राजकीय कार्यकर्ते आणि पेशाने शिक्षक. कुठलीही गोष्ट सहज आहे तशी न सांगता त्याचे सर्वांगाने विश्लेषण करायची सवय ( खोड), त्यात वारंवार येणारे वाक्य - 'पण गम्मत अशी झाली की' -- आम्ही लहानपणी अगदी मन देऊन ऐकायचो, काय गम्मत असणार आहे पुढे बरं ?- कधी कळलेच नाही. बऱ्याच वर्षानी जेव्हा प्रशासकीय स्वरूपाचे रिपोर्ट लिहायला, वाचायला लागले तेव्हा कळले की - however, nevertheless-- अशा अनेक शब्दांचा सार म्हणजे बाबांचे 'गम्मत अशी की', होते. मधल्या काळात आणि आताही त्यांच्या व्रात्य मुली आणि बायको यावरून असंख्य 'गमती' करून हसत असतातच.

मोठ्या दिदीचा आवडीचा शब्द - भंपक आणि भंपकपणा करू नको. या भंपक आणि भंपकपणा शब्दाच्या पिल्लावली माझ्या आणि दोन्ही दिद्यांच्या घरी जल्मल्या आहेत की त्याची गिनती आता आम्ही थांबवली आहे . सगळ्या रागलोभांना व्यक्त करायला ही शब्दावळ पुरेशी आहे या निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. उदा. भम्पू , भम्पूगिरी ( हा शब्द इग्लिश मध्ये पण आहे -कधीही ऑफिसमधून फोन करून विचारले की मनु आणि माहिपैकी कोणीतरी she is doing भम्पुगिरि अशी तक्रार असते) मग भम्पूचे लाडात आल्यावर ढम्पू, टम्पू , ढम्पुकलं, चिडून ढम्प्या असे अनेक versions तयार होताहेतच. भंपक- ढम्पक - ढम्पूकली - असे होता होता अगदी नव्या पिढीच्या माझ्या ताज्या ३ वर्षाच्या भाच्याने यात 'पुकली ढमढम' अशी भर घातली आहे.

सांगलीहून अकलूजला साधारण १२ वर्षाआधी जात होते. अशीच एक टूर, मध्येच एक रात्र बहिणीला भेटून पुढे प्रवास असा बेत. सकाळी सात वाजता एस टीत कंडक्टरच्या शेजारची सीट, दोघा बहिणींच्या प्रेमाला आणि पर्यायाने टपल्या मारून खिदळण्याला बहर आलेला. कंडक्टर आपल्या पॅडवर आकडेमोड करता करता खुदकन हसत होता आमचे बहरलेले बोलणे ऐकून. शेवटी गाडी निघण्याची वेळ, बेल वाजवताना बहिणीला म्हणाला,' नका काळजी करू फार'.

बहिणाई,' काय सांगू, अवखळ आहे फार, सांभाळून न्या लहानीला'. हसून कंडक्टरने आणि मी निरोप दिला. पुढे गप्पा, एके ठिकाणी चहा करत, अकलूज आले. उतरताना कंडक्टर मला म्हणे, ' सांगा बहिणीला, तिच्या "अवजड" बहिणीला सांभाळून पोहचवले.

आधी समोरच्या STD च्या पिवळ्या खोक्यात घुसून बहिणीला, 'अवखळ ते अवजड' प्रवास सांगितला !

तेव्हापासून प्रवासाला निघाले की मी , " अवजड" होते .

सासरी आमच्या कोणाच्याही वाढदिवसाला पूर्ण happy birthday to you म्हणतच नाहीत. कारण मोठ्या दिराच्या मुलीने २ वर्षाची असताना पूर्ण म्हणता येत नाही म्हणून happy टू यू असे म्हणलेले इतके फ़ेमस झाले आहे हि त्यानंतर येणाऱ्या सगळ्यांच्या सगळ्या वाढदिवसांना फक्त हैप्पी टू यू असंच म्हणायचा संकेत आहे.

खरे तर सासरचे खूप किस्से आहेत कारण त्यांच्याच भाषेत सांगायचे तर सगळेच equally 'पाजळत' असतात. पण वारसाहक्काने त्याचे पेटंट दुसऱ्या एका माबोकरीण बाईंकडे जाते, तरीही पुढील किस्सा सांगितलाच पाहिजे. तुमच्या घरी काय काय म्हणतात असे अगदी विस्मयचकित होऊन उद्गार काढले असता प्रिय नवऱ्याने ही गोष्ट सांगितली. यात कोण कोणास म्हणले हे बाजूला सारून मूळ कथाभाग सांगते. ' शी किती घाण पादण्याचा वास', असे म्हणले असताना प्रतिप्रश्न, 'तुम्ही फार सुगंधी पादता वाटतं !' . हे ऐकल्यावर जेव्हा घरातल्या सार्वजनिक ठिकाणी बसले असता असे नाक बंद करायची वेळ आली तर गुमान तिथून पलायन करणे, हा एकच मार्ग. उगाच काही बोलले आणि असला प्रतिप्रश्न आला तर खरे किंवा खोटे उत्तर द्यायच्या फंदात कोण पडणार?

वासावरून थोडे विषयांतर ( भाषांतर ) होईल पण आणखी एक किस्सा. माझी पहिली वाहिली नोकरी बारावीनंतर पाचगणीच्या म्यप्रोमध्ये. तिथले प्रॉडक्शन म्यानेजर हे उत्तर प्रदेशचे शुध्द हिंदी भाषिक मिश्रा'जी', अशा 'जी' लोकांसमोर आमचे हिंदी म्हणजे टाईमपास मधल्या शाकालसमोर दगडूचे म्हराटी. मिश्राजी मात्र अतिशय सौम्य, सालस माणूस. फ्याक्टरीत ** कुठल्याही फळाचं प्रोसेसिंग होत असले की घमघमाट सुटायचा. एक दिवस पायनाप्पल जॅम बनवत होते. मी त्या घमघमाटाने अगदी हुंगून ( मुग्ध, भारावून असे काही म्हणता येत नाही आणि नेमके विशेषण सुचत नाहीये ) जाउन त्यांना म्हणले, ' मिश्राजी क्या बास आ रही है !' मिश्राजींचा चेहरा अगदी कावराबावरा . क्या बास आ रही है, शबाना ? दोन तीन वेळा सांगितल्यावर त्यांना मला काय म्हणायचे होते ते कळले. त्यानंतर अर्धा तास त्यांनी बास म्हणजे काय आणि मला जे म्हणायचे होते त्यासाठी खुशबू, सुगंध तत्सम शब्द समर्पक आहेत, हे समजावून सांगितले. पण अजूनही अननस आणला की मला त्या 'बास' चीच आठवण येते.
(*** factory, mapro यातला ya उच्चार लिहायला जमत नाहीये )

लग्न झाल्यावर थोडी एकमेकांच्या स्वभावाची वास्तववादी ओळख झाल्यावर मी नवऱ्याला म्हणले अरे कधी तरी Romantically बोलत जा -- तेव्हा त्याने 'रोमन टिकली' कसं बोलतात हे माहित नसल्याची कबुली दिली होती. पण त्यानंतर प्रेमाचे दोन शब्द नवऱ्याकडून म्हणजे 'रोमन टिकली' !

लोकहो, तुमच्याकडचे असे भंपक शब्द , वेगवेगळ्या टिकल्या ऐकायला आवडतील. मराठी भाषा अस्तास चालली आहेची ओरड आपण नेहमी ऐकतो, आपापल्या परीने शब्दभांडार वाढवूयात का इथे. माय, बाप, बहिण आणि इतर नातीबोली वाचायला आवडेल. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शरद तळवलकर आणी राजा गोसावी यान्चा एक तुफान विनोदी पिक्चर होता. नाव होते वाट चुकलेले नवरे. या मध्ये एक साईड हिरॉईन पिक्चर भर एकच वाक्य सारखे बोलते. या बया! कन्च? हे कन्च आमच्या गाव च्या भाजीवाल्यान्मध्ये तुफान लोकप्रीय झाल. भाजी वाल्याकडे गेल की तो/ ती म्हणायचे. कन्च देऊ?:फिदी:

माझ्या लेकीला शाळेत नेणारा काका बरेचदा म्हणतो, 'काय चेंजिंग झाल तर तुम्हाला कॉलिंग करतो' तेव्हापासुन आमच्या कडे 'वेळेत बदल झाला तर' याच्या ऐवजी चेंजिंग झाल तर असच म्हणतात.

जस्ट चील चील हे सलमान चं गाणं चुकीचं ऐकु आल्याने.. (जस्ट चॅव चॅव.. जस्ट चॅव)
chill ला आमच्याकडे आजकाल "चॅव" म्हणतात

बावळट मुलींना झंपट असे पण म्हणतात.

आपण गणपती विसर्जन असं म्हणतो, काहीजण डायरेक्ट बुडवला म्हणतात.

माझ्या माहेरी " सुताराची फळी होणे" असा एक वाक्प्रचार प्रचलित आहे.
म्हणजे एखद्या व्यक्तिला एकच गोष्ट चार वेग-वेगळ्या लोकांनी वेग-वेगळ्या वेळी सांगणे/ विचारणे.
हा वाक्प्रचार रूढ होण्यामागे पण एक लंबी कहानी आहे.

लंबी कहानी अशी कि,
आमची सगळी (एकत्र कु. प. प्रमाणे सगळी) फॅमिली गिरगावात रहायची. माझे आजोबा धरुन १० भावंडे होती.
एक दिवस घरी काही काम करुन घ्यायचे होते म्हणून सुताराला बोलवले होते. तर पणजोबा स्वत: कामावर जाताना घरातल्या सगळ्यांना सांगून गेले कि, " सुतार आल्यावर त्याला हि फळी इकडे लावायला सांगा. "
झालं. सुतार आल्यावर त्याला, घरातल्या प्रत्येकाने आपापल्या सवडीनुसार सांगितले, " बाबांनी हि फळी इकडे लावायला सांगितली आहे", " बाबांनी हि फळी इकडे लावायला सांगितली आहे". . . .
Biggrin
जेव्हा दहाव्यांदा ऐकलं त्याने तेव्हा काम न करताच सामान टाकून पळून गेला तो. . .
Rofl

मोम्बील
<<
आमच्या मित्राच्या ४ वर्षीय कन्येने त्याला बोंबाईल असे नाव ठेवले होते. नको तेव्हा बोंबलून उठणे हा स्थायीभाव असलेल्या वस्तूचे हे अत्यंत अ‍ॅप्ट नाव आम्ही रूटीनली वापरतो.

त्याचप्रमाणे,

बोंडुक = फ्लॅश/पेन ड्राईव्ह.
यालाच पेण्ड्रॅव असे देखिल म्हणतात. हा पेण्ड्रॅव आमच्या एका कंपावंडरसायबांचा शब्द.

इतर स्पेशल शब्द रचनांत खालील शब्दसमूह येतात :

ऑटोरुब्रिफिकेशन = स्वतःची लाल करणे.

म्युच्वल रुब्रिफिकेशन = एकेमेकांची --"--

ऑटोपॅरोटिझम = ऑटो + पॅरट + इझम = स्वतःचा पोपट करणे. (हा पूर्वी सांगून झालाय माबोवर)

वेगवेगळ्या आजारांच्या वा ऑपरेशनच्या इन्स्ट्रूमेंट्सच्या नावांची जी काय वाट स्टाफ मेंबर्स लावतात त्याला तोड नसते. उदा. टॅकिष्टामि सेट इ. पण एकदा ससूनच्या ट्रेण्ड स्टाफ नर्सबाईंनी कॅटरॅक्ट (मोतिबिंदू) ला कॅट-रॅट असे लिहिलेले पाहून डोळ्याचे पारणे फिटलेले आठवते.
पेशंटही मागे नसतात. उदा. त्या पुलाजवळच्या कातड्याची टेस्-मेंट चालू आहे, या वाक्याचा अर्थ पुलाजवळच्या स्किन स्पेशालिस्टची ट्रीटमेंट सुरू आहे असा होतो.
'नॉर्मल' अन 'शिरेस' या शब्दांची तर पूर्ण वाट लावलेली आहे लोकांनी. थोडा नॉर्मल ताप येतो. अशी कॉमन तक्रार असते.
अन 'पेशंटला व्हेंटिलेटरवर ठेवलंय, कोमातून बाहेर आले, तर ४८ तासांनंतर काय ते सांगता येईल' इ. बडबड करून झाली, की ऐकणारा नातेवाईक गंभीर चेहर्‍याने विचारतो,

"डाक्टर, पण तसं काही शिरेस तर न्हाय ना?"

मस्त लिहिलंय Happy

अंताजीची बखर मध्ये अंताजी नल्ली चोखून मटण खातो आणि पापक्षालनासाठी माहिती असून अज्ञानाची ढाल पुढे करायला 'काहेकी सब्जी' असं साळसूदपणे विचारतो. तेव्हापासून आमच्या घरात असल्या गोष्टींसाठी 'काहेकी सब्जी' फेमस झालंय.

पेन ड्राईव्हला आम्ही खंडू खुपश्या म्हणतो.

ग्रामीण भागात एका देशी खेळात बहुधा लगोरी , एक दांडू सारखा लाकडी दांडा स्टम्प सारखा उभा मातीत किंवा चिखलात उभा खुपसून ठेवतात त्याला आमच्याकडे तरी 'खंडू खुपश्या 'असा शब्द आहे. पेन ड्राईव्ह देखील खुपसावाच लागतो म्हणून खंडू खुपश्या ! ::फिदी:

>>"डाक्टर, पण तसं काही शिरेस तर न्हाय ना?" Lol

कॉलनीच्या गणपती की शारदोत्सवात एका हौशी बाईंनी नाटक लिहिलं, बसवलं होतं. त्यात कामही केलं होतं. नाटकात एक पात्रं 'काकासाहेब' 'हे असं का, तसं का' असे प्रश्न विचारतं (म्हणूनही काकासाहेब असावेत. माहिती नाही). त्यांचे प्रश्न इतके गूढ आणि खोल असतात की समोरचं पात्र दर प्रश्नानंतर, "तुमच्या या 'का'ला उत्तर नाही काकासाहेब" असं म्हणतं. तेव्हापासून घरात कुणीही 'का' विचारल्यावर "तुमच्या या 'का'ला उत्तर नाही काकासाहेब" म्हंटलं जातं.

नंदिनी
मी लिहितच होतो तेवढ्यात तुमची पोस्ट वाचली
याचच आण्खी एक व्हर्शन

लहानग्या सुनेला माहेरी पाठवण्यात येणार्या अडचणीचा बेळगावचा संवाद
हळ्ळामाराच ( पावसाचे) दिवस
सण्ण ( लहान)_ हुडुगीच ( मुलीच) काम
कळस कळस ( पाठव पाठव ) म्हणल तर कस कळस्स्सायच रे धोंडिबा

आमच्या मुलाचं, 'आई, मला कै काल मुखा नाही धुवायचं'
हे दररोज खेळून आल्यावर.
आणि 'आई मला स्नाना नाही माडायचं' हे सकाळी शाळेत जाताना नेहमीचंच.

आता माझे माहेरचे लोकही एकमेकांना 'लवकर लवकर कै काल मुखा धू, चहा नाश्ता कर' असेच म्हणतात.

या कानडीने तर आमच्या भाषेला भारी वरदान दिलंय.
Wink

'पेशंट सीरीयस, स्टार्ट इमेजियेटली' या जुन्या सु(कु)प्रसिद्ध तारवाक्यावरून शिरेस म्हणजे मरायला टेकलेला पेशंट असावा. असा तर्क आहे.
-गा.पै.

मस्त लेख!!

असे कितीतरी शब्द नव्याने कळतात आणि मग नेहेमीचे होऊन जातात.

कालचीच गोष्ट..मैत्रीणीला फोन केला तर तिच्या साबांनी उचलला. माझा आवाज ऐकून काय गं बरं वाटत नाही का? असे विचारल्यावर " काही नाही काकू घसा जरासा ठीक नाहीये.. तर मला म्हणाल्या घसा रिवरिवतोय काय? Happy
आत्तापर्यंत खवखवतोय हाच शब्द माहिती होता. मला त्या रिवरिव शब्दाची मजा वाटली

काही काम करायचा उत्साह नसणे याला एक मैत्रीण उमकाच नाहीये गं अग्दी!! असा शब्दप्रयोग करते!
खूप वेळ कणिक भिजवून ठेवलीये तर सैल पडते ती..त्याला कणिक तेवली हा शब्दप्रयोगही नव्याने कळला.

असंच भाजी गिच्च शिजलीये..
कपडे आंबटओले आहेत..
आमटीचा ढ्क्कू झालाय (घट्ट नाहीये)

असे अनेक शब्दांची नव्याने भर पडते आहे आणि भाषा समृद्ध होते आहे ! Happy

"लेडीजबायका" धमाल शब्द आहे, आणी माझ्या बाबतीत प्रत्यक्षात घडलाय.:फिदी:

मी शाळेत असताना मी आणी आई बाजारात चाललो होतो. एका मधल्या वाटेने जात होतो. बोळ अरुन्द होता. समोरुन दोन वैमानीक आले. एक दुसर्‍याला मोठ्याने म्हणाला, अरे थाम्ब हितच, समोरुन दोन लेडीज बाया येऊ र्हायल्या."

दुसरा डोळे ताणुन हात वर धरुन वाकुन बघत होता, तो मोठ्याने म्हणाला," न्हाय र, बाया न्हाय दोन मुली येऊ र्हायला. आपन वाट सोडतो, जा पोरीनो.

आम्ही आपले कसे बसे हसू दाबत तिथुन निघालो.:फिदी:

आजच लक्षात आलं, मायबोलीकर स्वप्ना ने (स्वप्ना_राज) फेमस केलेला एक शब्द - हलवा- आमच्या ग्रूपात मी फेमस केलाय Happy

आमच्या ग्रूपमधुन छान हा शब्द हद्दपार झाला असुन आजकाल आम्ही प्रत्येक छान गोष्टिला हालवाच म्हणतो Proud

आत्ता टिममधली एक जण येऊन विचारून गेली कोड हलवा चालतोय ना? Lol

सतत अस्वस्थ असलेली, सारखं काहीतरी करायचं असलेली, वातप्रकृती टाइपची लहान मुलं असतात ना त्यांच्यासाठी आमच्याकडे चुळचुळ मुंगळा आणि वसवस कांडी(हा शब्द खास धाकट्या काकूचा) असे शब्द वापरले जातात.
त्यातले चुळचुळ मुंगळा प्रकरण माझ्या पण तोंडात पक्के बसले आहे.
अजून एक बहुतेक खास चित्पावनी शब्द म्हणजे 'उजमेखून/उदमेखून'. साधारण अर्थ मुद्दामून, ठरवून असा पण अजून पक्क्या छटेचा.

सांगलीत आमच्या घरी, तुमच्याकडे अश्यासाठी आमच्यात तुमच्यात असे म्हणतात. म्हणजे आमच्यात कधी येणार वगैरे. ते ऐकून जाम फुटायचे मी.

सतत अस्वस्थ असलेली, सारखं काहीतरी करायचं असलेली, वातप्रकृती टाइपची लहान मुलं असतात ना त्यांच्यासाठी आमच्याकडे चुळचुळ मुंगळा आणि वसवस कांडी(हा शब्द खास धाकट्या काकूचा) असे शब्द वापरले जातात.
त्यातले चुळचुळ मुंगळा प्रकरण माझ्या पण तोंडात पक्के बसले आहे.>>>>>>>>>>>

आमच्या कडे याला चुळबुळ पांडे नाव पाडलं आहे

Pages