प्रत्येक घराची, नात्याची एक वेगळी अशी भाषाशैली असते. एखाद्या सदस्याचा अगदी पेट शब्द असतो, जोक्सची जातकुळी असते आणि कोणावर कशाप्रकारचे जोक्स 'मारले' जातात हेही त्या कुटुंबाच्या कालौघात नक्की झालेले असते. पुढे आपापल्या आयुष्याच्या दिशा बदलल्या, वर्षानुवर्षे सहवास नसला तरी यातले काही शब्द, म्हणी किंवा एखाद्या घटनेच्या संदर्भात निर्माण झालेली वाक्य त्या कुटुंबासाठी अगदी सौ टक्का हसायला लावणारी, त्या त्या व्यक्तीचे स्वभावविशेष दर्शवणारी अशी असतात. मूळ भाषेतला शब्द, वाक्प्रचार या प्रक्रियेत अगदी बदलून जातो, ज्याने वापरला त्याच्या मालकीचा असल्यासारखा होतो किंवा नवीनच शब्द किंवा म्हण त्यातून तयार होते. ही खरंतर त्या त्या व्यक्तीची अभिजात कलाकृती म्हणून पेटेंटेड असायला हवी. पण हा लांबचा मुद्दा आणि त्यात काय काय करावे लागेल याची कल्पना नसल्यामुळे सध्या तरी असल्या अभिजात शब्द, वाक्यकुळींची देवाण घेवाण इथे करूयात.
माझी आमच्या अख्या खानदानात असलेली ओळख म्हणजे,' गन्ना खडा था' - संदर्भासहित स्पष्टीकरणासाठी मायबोलीवर प्रसिध्द झालेली मामू ही पोस्ट वाचावी.
http://www.maayboli.com/node/47803
आमच्या घरात लहानपणापासून ऐकलेली बाबांची त्यांच्या पापभीरू स्वभावाला साजेल अशी फटकारतानाची म्हण - तुला खाल्ले म्हशीने - मला कधीही कळले नाही कि याची उत्पत्ती कुठून झाली - आम्हा बहिणींचे यावरचे अनुमान की आपले बाबा फारच सौम्य, सोज्वळ - शिवी कधी देणार नाहीत - पण सातत्याने डोईजड होणाऱ्या कार्ट्याना ओरडायला तर पाहिजे - मग कमीत कमी नुकसानदायक ( least damaging ) असा वाक्प्रचार त्यांनी शोधला असावा - एकतर म्हस काय आपल्या पोरींना खाणार नाही याची त्यांना खात्री असावी - म्हस ही safe आणि मुलीही असे असावे - असो - लहानपणी खूप हसायचो पण गम्मत म्हणजे माझी मुलगी तीन चार वर्षाची असताना मला खूप संताप आला होता. आम्ही बालहक्कवाले म्हणून हात काय उचलता येत नाही म्हणून अगदी जोरात तिच्यावर खेकसले - तुला खाल्ले म्हशीने ! माझ्या कुटुंबात आता ही सर्वमान्य शिवी आहे- म्हणजे मी मुलीला, ती छोट्या भावाला, छोटा आमच्यापैकी कुणालाही सर्वांसमोर हा अपशब्द वापरू शकतो. माही म्हणताना म्हशीनं ऐवजी तुला खाल्लं मशीनं, असंच म्हणतो.
बाबा अगदी लहानपणापासून राजकीय कार्यकर्ते आणि पेशाने शिक्षक. कुठलीही गोष्ट सहज आहे तशी न सांगता त्याचे सर्वांगाने विश्लेषण करायची सवय ( खोड), त्यात वारंवार येणारे वाक्य - 'पण गम्मत अशी झाली की' -- आम्ही लहानपणी अगदी मन देऊन ऐकायचो, काय गम्मत असणार आहे पुढे बरं ?- कधी कळलेच नाही. बऱ्याच वर्षानी जेव्हा प्रशासकीय स्वरूपाचे रिपोर्ट लिहायला, वाचायला लागले तेव्हा कळले की - however, nevertheless-- अशा अनेक शब्दांचा सार म्हणजे बाबांचे 'गम्मत अशी की', होते. मधल्या काळात आणि आताही त्यांच्या व्रात्य मुली आणि बायको यावरून असंख्य 'गमती' करून हसत असतातच.
मोठ्या दिदीचा आवडीचा शब्द - भंपक आणि भंपकपणा करू नको. या भंपक आणि भंपकपणा शब्दाच्या पिल्लावली माझ्या आणि दोन्ही दिद्यांच्या घरी जल्मल्या आहेत की त्याची गिनती आता आम्ही थांबवली आहे . सगळ्या रागलोभांना व्यक्त करायला ही शब्दावळ पुरेशी आहे या निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. उदा. भम्पू , भम्पूगिरी ( हा शब्द इग्लिश मध्ये पण आहे -कधीही ऑफिसमधून फोन करून विचारले की मनु आणि माहिपैकी कोणीतरी she is doing भम्पुगिरि अशी तक्रार असते) मग भम्पूचे लाडात आल्यावर ढम्पू, टम्पू , ढम्पुकलं, चिडून ढम्प्या असे अनेक versions तयार होताहेतच. भंपक- ढम्पक - ढम्पूकली - असे होता होता अगदी नव्या पिढीच्या माझ्या ताज्या ३ वर्षाच्या भाच्याने यात 'पुकली ढमढम' अशी भर घातली आहे.
सांगलीहून अकलूजला साधारण १२ वर्षाआधी जात होते. अशीच एक टूर, मध्येच एक रात्र बहिणीला भेटून पुढे प्रवास असा बेत. सकाळी सात वाजता एस टीत कंडक्टरच्या शेजारची सीट, दोघा बहिणींच्या प्रेमाला आणि पर्यायाने टपल्या मारून खिदळण्याला बहर आलेला. कंडक्टर आपल्या पॅडवर आकडेमोड करता करता खुदकन हसत होता आमचे बहरलेले बोलणे ऐकून. शेवटी गाडी निघण्याची वेळ, बेल वाजवताना बहिणीला म्हणाला,' नका काळजी करू फार'.
बहिणाई,' काय सांगू, अवखळ आहे फार, सांभाळून न्या लहानीला'. हसून कंडक्टरने आणि मी निरोप दिला. पुढे गप्पा, एके ठिकाणी चहा करत, अकलूज आले. उतरताना कंडक्टर मला म्हणे, ' सांगा बहिणीला, तिच्या "अवजड" बहिणीला सांभाळून पोहचवले.
आधी समोरच्या STD च्या पिवळ्या खोक्यात घुसून बहिणीला, 'अवखळ ते अवजड' प्रवास सांगितला !
तेव्हापासून प्रवासाला निघाले की मी , " अवजड" होते .
सासरी आमच्या कोणाच्याही वाढदिवसाला पूर्ण happy birthday to you म्हणतच नाहीत. कारण मोठ्या दिराच्या मुलीने २ वर्षाची असताना पूर्ण म्हणता येत नाही म्हणून happy टू यू असे म्हणलेले इतके फ़ेमस झाले आहे हि त्यानंतर येणाऱ्या सगळ्यांच्या सगळ्या वाढदिवसांना फक्त हैप्पी टू यू असंच म्हणायचा संकेत आहे.
खरे तर सासरचे खूप किस्से आहेत कारण त्यांच्याच भाषेत सांगायचे तर सगळेच equally 'पाजळत' असतात. पण वारसाहक्काने त्याचे पेटंट दुसऱ्या एका माबोकरीण बाईंकडे जाते, तरीही पुढील किस्सा सांगितलाच पाहिजे. तुमच्या घरी काय काय म्हणतात असे अगदी विस्मयचकित होऊन उद्गार काढले असता प्रिय नवऱ्याने ही गोष्ट सांगितली. यात कोण कोणास म्हणले हे बाजूला सारून मूळ कथाभाग सांगते. ' शी किती घाण पादण्याचा वास', असे म्हणले असताना प्रतिप्रश्न, 'तुम्ही फार सुगंधी पादता वाटतं !' . हे ऐकल्यावर जेव्हा घरातल्या सार्वजनिक ठिकाणी बसले असता असे नाक बंद करायची वेळ आली तर गुमान तिथून पलायन करणे, हा एकच मार्ग. उगाच काही बोलले आणि असला प्रतिप्रश्न आला तर खरे किंवा खोटे उत्तर द्यायच्या फंदात कोण पडणार?
वासावरून थोडे विषयांतर ( भाषांतर ) होईल पण आणखी एक किस्सा. माझी पहिली वाहिली नोकरी बारावीनंतर पाचगणीच्या म्यप्रोमध्ये. तिथले प्रॉडक्शन म्यानेजर हे उत्तर प्रदेशचे शुध्द हिंदी भाषिक मिश्रा'जी', अशा 'जी' लोकांसमोर आमचे हिंदी म्हणजे टाईमपास मधल्या शाकालसमोर दगडूचे म्हराटी. मिश्राजी मात्र अतिशय सौम्य, सालस माणूस. फ्याक्टरीत ** कुठल्याही फळाचं प्रोसेसिंग होत असले की घमघमाट सुटायचा. एक दिवस पायनाप्पल जॅम बनवत होते. मी त्या घमघमाटाने अगदी हुंगून ( मुग्ध, भारावून असे काही म्हणता येत नाही आणि नेमके विशेषण सुचत नाहीये ) जाउन त्यांना म्हणले, ' मिश्राजी क्या बास आ रही है !' मिश्राजींचा चेहरा अगदी कावराबावरा . क्या बास आ रही है, शबाना ? दोन तीन वेळा सांगितल्यावर त्यांना मला काय म्हणायचे होते ते कळले. त्यानंतर अर्धा तास त्यांनी बास म्हणजे काय आणि मला जे म्हणायचे होते त्यासाठी खुशबू, सुगंध तत्सम शब्द समर्पक आहेत, हे समजावून सांगितले. पण अजूनही अननस आणला की मला त्या 'बास' चीच आठवण येते.
(*** factory, mapro यातला ya उच्चार लिहायला जमत नाहीये )
लग्न झाल्यावर थोडी एकमेकांच्या स्वभावाची वास्तववादी ओळख झाल्यावर मी नवऱ्याला म्हणले अरे कधी तरी Romantically बोलत जा -- तेव्हा त्याने 'रोमन टिकली' कसं बोलतात हे माहित नसल्याची कबुली दिली होती. पण त्यानंतर प्रेमाचे दोन शब्द नवऱ्याकडून म्हणजे 'रोमन टिकली' !
लोकहो, तुमच्याकडचे असे भंपक शब्द , वेगवेगळ्या टिकल्या ऐकायला आवडतील. मराठी भाषा अस्तास चालली आहेची ओरड आपण नेहमी ऐकतो, आपापल्या परीने शब्दभांडार वाढवूयात का इथे. माय, बाप, बहिण आणि इतर नातीबोली वाचायला आवडेल.
१७-१८वयात माझ्या तोंडात
१७-१८वयात माझ्या तोंडात 'भयंकर सुंदर 'हे शब्द होते.हे कसं झालं,ते कसं झालं तर भयंकर सुंदर! ३-४ वर्षांनी
नेमाडेंची 'कोसला' वाचली,त्यात नायकपण भयंकर सुंदर म्हणतो हे वाचून मस्त वाटलेले.
पाssssप.... आमच्याकडेही
पाssssप.... आमच्याकडेही ह्याचा सुकाळ असतो (हुबळी-धारवाड कडच्या साबा असल्यामुळे).... कामवालीने दांडी मारली की ती 'द्यामव्वा'....एकदा माळ्याने चुकीचे झाड छाटून ठेवले (पुण्यात हां) तर साबा ( त्यांचा डिफॉल्ट मोड कानडी आहे, त्यामुळे बर्याच वेळेला विचारात असल्या/ टेन्शन मध्ये असल्या की समोरचा मराठी बोलत असला तरी कानडी बोलतात) " अय्यो सुडली....हेळिद्द मात गोत्तागलिल्लेनु निमगे....मुञ्चे केळबेको ब्यॅडो....हिंग ह्यँग माडिद्री...." अशा सुरु झाल्या....माळीबुवा 'आज्जी अवोss ' एव्हढेच म्ह्णू शकले..मी खाली गेल्यावर माळी 'ओ वयनी, ह्येस्नी सांगा कवाधरनं अंडगुंड काहीबाही वरडत्यात बघा '
तेव्हापासून माझा मुलगा त्या कामवाल्या बाईंशी कानडीत बोलल्या तर " आज्जी, यू आर गोईन्ग ऑल अंडुगुंडु ऑन हर" असं सांगतो.
सांगलीहून अकलूजला साधारण १२
सांगलीहून अकलूजला साधारण १२ वर्षाआधी जात होते. अशीच एक टूर, मध्येच एक रात्र बहिणीला भेटून पुढे प्रवास असा बेत. सकाळी सात वाजता एस टीत कंडक्टरच्या शेजारची सीट, दोघा बहिणींच्या प्रेमाला आणि पर्यायाने टपल्या मारून खिदळण्याला बहर आलेला. कंडक्टर आपल्या पॅडवर आकडेमोड करता करता खुदकन हसत होता आमचे बहरलेले बोलणे ऐकून. शेवटी गाडी निघण्याची वेळ, बेल वाजवताना बहिणीला म्हणाला,' नका काळजी करू फार'.
बहिणाई,' काय सांगू, अवखळ आहे फार, सांभाळून न्या लहानीला'. हसून कंडक्टरने आणि मी निरोप दिला. पुढे गप्पा, एके ठिकाणी चहा करत, अकलूज आले. उतरताना कंडक्टर मला म्हणे, ' सांगा बहिणीला, तिच्या "अवजड" बहिणीला सांभाळून पोहचवले.
आधी समोरच्या STD च्या पिवळ्या खोक्यात घुसून बहिणीला, 'अवखळ ते अवजड' प्रवास सांगितला !
तेव्हापासून प्रवासाला निघाले की मी , " अवजड" होते .
अवजड.. आई ग्गं.........
अवजड.. आई ग्गं.........
मस्त किस्से चाल्लेत...
माझ्या नॉन मराठी नवर्याला अजूनही आमच्याकडचे ,' सुंदर दही ' आणी ,'गोड दृष्य' असली विशेषणे
भारीच बुचकळ्यात टाकत असतात..
निसर्गाच्या हाकेला ओ देणे =
निसर्गाच्या हाकेला ओ देणे = शु-क्रिया करणे = थँक्यू म्हणणे.
भाषांतराचं एडिट तपासताना
भाषांतराचं एडिट तपासताना करताना वाक्य आलं "The news came from Ali" ड्राफ्टमध्ये कोणपण अली नव्हता. परत मूळ डोक्युमेंट तपासल्यावर "अलिकडच्या बातमीनुसार" असं रत्न मिळालं. तेव्हापासून मी आणि क्लायंट एकदातरी "मग अलि काय म्हणतोय? असं विचारतोच!!!
माझा आणि बहिणीचा वाक्प्रचार
माझा आणि बहिणीचा वाक्प्रचार जो फॅमिलीत वापरला जातो " ए.के. हंगल होणे" म्हणजे काहीतरी ट्रॅजेडी होणे , त्या ट्रॅजेडीचं स्वरुप अशी:
आंब्याच्या पेटीतले आंबे खराब निघणे , आवडता सिनेमा लागणार म्हणून खास जेवायचा बेत करून टी व्ही समोर बसावं आणि लाइट जाणे , केबलवाल्याने ब्रँड न्यु रिलिज दाखवायला सुरवत केली असताना अचानक पोलिसांची धाड पडल्याने तो बदलून 'संपूर्ण रामायण ' वगैरे टाइप लागणे , ऐन बर्थडे ला रेस्टॉरन्ट मधे काहीतरी आवडतं ऑर्डर करणे पण ते नेमकं त्याच दिवशी त्या पदार्थाची टेस्ट बिघडणे , केसांना तेल थापलं असताना नेमकं त्याचवेळी ज्याच्यावर क्रश आहे तो घरी येउन दार वाजवणे , कुठल्या स्पेशल फंक्शन ला जाण्यासाठी खूप दिवसां पासून प्लॅन केलेल्या लाडका ड्रेस ला नेमकं इस्त्री करताना जाळणे इ.
हाइट ऑफ एकेहंगल झाली तर आम्ही आमची नेमप्लेट तात्पुरत्या टिकणार्या रंगाने ' ए के हंगल ' अशी ओव्हरराइट करायचो , काही दिवस ठेवायचोही
एकदा बाबांचे मित्रं आले , नेमकी नेमप्लेट पाहून कनफ्युज झाले , सांगितलं त्यांना मग कि लागोपाठ अनेक आंब्याच्या पेटीतले आंबे सध्या खराब निघतायेत , poor kaka didn't know how to react on this !
हाइट ऑफ एकेहंगल झाली तर आम्ही
हाइट ऑफ एकेहंगल झाली तर आम्ही आमची नेमप्लेट तात्पुरत्या टिकणार्या रंगाने ' ए के हंगल ' अशी ओव्हरराइट करायचो , काही दिवस ठेवायचोही .......
बाप रे
मस्त आहे लेख ..
मस्त आहे लेख ..
तसा फार जुना किस्सा नहीये.
तसा फार जुना किस्सा नहीये. मोबाइल क्रान्ती च्या नन्तरचा. माझे काका-काकी पेश्याने शिक्षक त्यामुळ व्यक्तीमत्वावर एक्दम शिक्षकी छाप त्यातून रहणर चाळीसगाव सार्ख्या लहान शहरात त्यामेळे आजुबाजुच्या शेतकरी -पालक लोकन्शी नेह्मी सम्बन्ध येइ.
एक्दा इन्स्पेक्शन सठी काकीला जवळच्या खेड्यात जावे लागले उशीर झाल आणि मोबाइल न्हवत तर कॉलेजच्या शिपायाला काकीने विचरले "कै रे इकदे कुठे पीसीओ आहे का?"
शिपयी"पीसीओ हाय ना. पण तुमच्याकडे मोम्बील न्हई?"
"मोम्बील म्हणजे?" इति काकी
शिपायी: "इत्का सळत शिकवता आनी मोम्बील म्हैत न्है?, त्यो फोने लवयल असतय ते"
काही वेळने काकीला उलगडा झाला त्याल मोबाइल म्हणायचा होते
तेव्हा पासून आम्ही समस्त कुटुम्बिय मोबाइल ला मोम्बिल म्हणतो.
>>मोम्बिल "आलं का डोम्बिल"ची
>>मोम्बिल
"आलं का डोम्बिल"ची आठवण झाली. घरून डोंबिवलीला निघाल्यावर भाच्यानं पहिल्या ५ मिनिटांत, "आलं का डोम्बिल" विचारलं. इष्ट स्थळी पोचेपर्यंत तोच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारून आईला वेडं केलं. तेव्हापासून घरी 'डोंबिवली' कुणी म्हणत नाही.
'काल कामाला का आली नाहीस'चं उत्तर, "बालिकाबंधू पावाले गेल्तो" ऐकल्यापासून त्या सिनेमाचं बरोबर नाव आता म्हणावसं वाटत नाही.
(No subject)
डोंबिवलीवरून आठवलं. आम्ही
डोंबिवलीवरून आठवलं. आम्ही डोंबिवलीकर आणि आमची डोंबिवली खूप लाडकी पण माझी आई बडोद्याला वाढलेली आणि लग्न होऊन मुंबईत आली, नंतर बाबा डोंबिवलीत सेटल झाले, तेव्हा डोंबिवली शहर नव्हतं आणि आईला अजिबात आवडलं नाही अजूनही तितकी आवडत नाही डोंबिवली तिला, तेव्हा ती नेहेमी म्हणते आम्हाला 'तुझ्या बाबांनी मला डोंबलात आणून टाकलं' काय आहे इथे. आम्ही आईवर वैतागतो डोंबिवलीला नावं ठेवली की.
सारखं मधे मधे करणार्याला
सारखं मधे मधे करणार्याला 'मध्या'
एकाजागी स्वस्थं बसु न शकणार्या सतत हलणार्या व्यक्तीला 'हल्या' !
मला भेटण्यापूर्वी मराठीची फारशी सवय नसलेल्या माझ्या नवर्याला हे सगळे खरच मराठी डिक्शनरीतले शब्द वाटतात आणि मी वाटु देते
सारखं मधे मधे करणार्याला
सारखं मधे मधे करणार्याला 'मध्या'
>> आमच्याकडे मध्ये मध्ये बोलणार्या माणसाला बाबा म्हणायचे "हा माणूस म्हणजे.. दोन पैसे घ्या.. पण मला मध्ये बोलू द्या" असा आहे.
दरम्यानच्या काळात आम्ही आता नवीन व्यक्तीसमोर फक्त "दोन पैसे घ्या.." एवढंच म्हणतो. कोणाला काही कळत नाही.
डोंबिवलीला आमच्याकडे 'डंबोली' म्हणतात. गरुडाला 'गडूर', बोगद्याला 'बोदगा'.
एका ओळखीच्या काकुंनी "कुठे गेले आहेत?" हे विचारायला? "कुंकडं?" (कुणीकडं) असं विचारलं होतं. तेव्हापासुन आमच्याकडे कुंकडं फेमस आहे.
माझी पुतणी- ताले ताले पोत्ति
माझी पुतणी-
ताले ताले पोत्ति ताले (साले साले पोट्टे साले) कुठुन ऐकलं कुणस ठाउक?
बुधवार- बावळट
जागतीक मंदी- फारच मंद मुलगा/मुलगी
८ नंबर- वेस्ट, वाया गेलेलं
L. T. D. आहे- पदार्थ संपत
L. T. D. आहे- पदार्थ संपत आला की
झिलपट- बावळट
काय रे ए.. अंडी उबवतोय्स का?-
काय रे ए.. अंडी उबवतोय्स का?- बर्याच दा काम संगुन न उठलेल्या/ लक्श नसलेल्या ला
ना दिर दिर तोम त देरे ना .. तदेरेना होणे- रागात थयथयाट करणे.
फारच मंद मुलगा/मुलगीं <<
फारच मंद मुलगा/मुलगीं << आमच्याकडे याला मंदाकिनी आणि मंदार असे नाव होते
कुणी जास्तच बहकल्यासारखे बोलत असेल तर त्याला "विमानातून खाली उतरवा" मग पुढे पुढे तेच "एअरपोर्टवरून परत आणा"
हेच वाक्य एका जीटीजीमध्ये ऐकल्यावर एका मित्राच्या पुणेरी बायकोने "अय्या, पण तुमच्या गावात एअरपोर्ट कुठाय?" असं विचारून हसा पिकवला होता. रत्नांग्रीस विमानतळ नाही असे होइलच कसे????
ढोली/ढोल्या-
ढोली/ढोल्या- जाडी/जाड्या
मरतुकड्या- अत्यंत बारीक व्यक्ती
फुळुक पाणी- खूप पातळ वरण, कमी दुध अन जास्त पाणी टाकलेला चहा
फुळुक पाणी- खूप पातळ वरण, कमी
फुळुक पाणी- खूप पातळ वरण, कमी दुध अन जास्त पाणी टाकलेला चहा >>> आमच्याकडे याला फुळकोणी म्हणतात.
पोट बिघड्ले असेल तर माझ्या
पोट बिघड्ले असेल तर माझ्या आजोबांचा 'सोर्या बिघडलाय' असा शब्दप्रयोग असे!
आणि बाबांचा फेवरेट 'यथेच्छसी तथा कुरु, कुरकूर मत करु'!
अरे वा, जवळ्चा शब्द आहे..
अरे वा, जवळ्चा शब्द आहे.. फुळुक पाणी अन फुळकोणी!
लहान मुलींना ठमाकाकु! बवळट
लहान मुलींना ठमाकाकु!
बवळट मुलांना - गुळाचा गणपती
अशी नावे का होती काहीच पत्ता नाही!
कतरता भवरा-सतत तिरक्या
कतरता भवरा-सतत तिरक्या चालणार्या मुलीला/ घबरणार्या/ तिरपे कटाक्ष टाकणार्याला
छतरती हवा लागणे-उगाच जास्त उडण्या/भाव खाणार्याला
फारच मंद मुलगा/मुलगीं <<
फारच मंद मुलगा/मुलगीं << आमच्याकडे याला मंदाकिनी आणि मंदार असे नाव होते ---- आमच्याकडे पण
त्यात भर म्हणजे एका भावच खरे नाव मंदार आहे & एक मावशचे खरे नाव मंदा मावशी आहे .
कॉलेज मधल्या बावळट मुलांना -
कॉलेज मधल्या बावळट मुलांना - भेंडीची भाजी
लहान आगाऊ मुलींना ठमाकाकूच
लहान आगाऊ मुलींना ठमाकाकूच म्हणतात अजूनही.
श्रीरामपूरमध्ये आमच्या मालकीण बाईना खूप fast बोलायची सवय होती त्यात ग्रामीण भाषा, मी मुंबईच्या आसपास वाढलेली त्यामुळे मला आधी काहीच कळायचं नाही. आला होता, गेला होता ह्याला त्या अल्ता, गेल्ता असं म्हणायच्या आणि तिथे आजारी असेल तर दुखतं असं म्हणतात. आपण जनरली हात दुखतो, पाय दुखतो, अंग दुखते असं म्हणतोना पण तिथे एकदा मला ताप आला तर तिथल्या आजी आल्या विचारायला. तुम्हाला दुखतं म्हणून बघायला आले, मी म्हटलं काही दुखत नाहीये, ताप आलाय.
आम्हाला मंदार जोशी नावाचे एक
आम्हाला मंदार जोशी नावाचे एक सर होते. सर म्हणजे तेव्हा नुकतेच एम ई वगैरे झाले होते म्हणून नाहीतर तसे वयाने काही फार जास्त नव्हेच. दिसायला अगदीच अगदीच अगदीच छान. आम्हाला मंद मुलीला "काय तरी मंदार आहेस गं" असं म्हणायची सवय होती, एकदा भर लॅबमध्ये प्रॅक्टिकल चालू असताना एका मैत्रीणीने जोरात "काय तरी चमी आहेस, तुझ्यापेक्षा मंदार परवडला" असं म्हटलं होतं. शिक्षकांनी पोरांना वर्गाबाहेर काढण्याची अनेक उदाहरणे असतील, शिक्षकच पोरींच्या हसण्याला लाजून बाहेर पडण्याचं उदाहरण तसं कमीच!!!!
तेव्हापासून मंदार वर्ड बॅन झाला!!!
(समस्त मंदारांची माफी इथेच मागते, कुणाच्या भावना दुखावल्या तर सॉरी)
शबाना खुप सुंदर धागा सुरू
शबाना खुप सुंदर धागा सुरू केल्याबद्दल आभार.
मी लहान असताना माझे वडील, काका नेहमी कोणतीही गोष्ट सापडली नाही तर म्हणायचे अमुक नाही गावले/तमुक नाही गावली. एकदा मी शाळेत उशिरा गेलो तर बाईंनी कारण विचारले असता उत्तर दिले "बाई बस नाही गावली?" नंतर बाईंचे शुद्धभाषेवरील एक लांबलचक लेक्चर झाले, पण आज ही शाळेतील जुने मित्र भेटतात तेव्हा विचारतात "काय माने बस गावली का?"
Pages