ऊन म्हणजे सावलीची सावली

Submitted by बेफ़िकीर on 13 June, 2014 - 14:26

मी नवी व्याख्या मला समजावली
ऊन म्हणजे सावलीची सावली

वेगळे काहीतरी तो बोलला
माणसे त्याच्यादिशेने धावली

एक माझे सोडुनी बाकी मने
वाचुनी माझी कथा हेलावली

वाहिली काही पुन्हा हृदयाकडे
आसवे डोळ्यांत काही मावली

लाजली सांगायला ती हे मला
पावसाला आग कोणी लावली

मी कसा हे सांगणारी माणसे
राख होताना किती भांबावली

एकटे सोडून गेली शेवटी
आपली आई किती रागावली

कीव आली पाठलागाची तुझ्या
मृगजळेसुद्धा जरा पाणावली

टाकली वाळत मनाची ओल मी
वाळवंटाची व्यथा ओलावली

तीच का हे मी कसे सांगू बरे
भावली जी माणसे ती भावली

आपले अस्तित्व अन्नासारखे
ही युगांची चालली शतपावली

बोलताना रोज माझ्याशी खरे
बघ खर्‍याची पातळी खालावली

घेतला मी जन्म या दुनियेमधे
की मला गांधीलमाशी चावली

धूर होतो माणसाचा......समजले
'बेफिकिर' झालो, बिडी शिलगावली

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लांबलचक पण कंटाळा नाही आला..... नेहमीसारखीच ओघवती.

हेलावली भांबावली ओलावली भावली खालावली.... मस्त.

टाकली वाळत मनाची ओल मी
वाळवंटाची व्यथा ओलावली >>>>>>> खास आणि वेगळा वाटला.

बाकी गांधीलमाशी..... एक पे एक फ्री मधे माफ करून टाकूया Proud

ऊन म्हणजे सावलीची सावली

खूप दिवसांनी आकर्षक शीर्षकाची गझल पाहिली. वरच्या ओळीत लढवलेल्या कल्पनेला दाद द्याविशी वाटली. पण सावलीची सावली पेक्षा सावलीचा प्रकाश ही कल्पना असती तर अशी कल्पना मनात आली. अर्थात लगावली सांभाळून.

पहिल्या शेरातला मूड पुढे सांभाळला गेला आहे. छान.

( TAyaping sudharअत आहे )

लाजली सांगायला ती हे मला
पावसाला आग कोणी लावली
मी कसा हे सांगणारी माणसे
राख होताना किती भांबावली
एकटे सोडून गेली शेवटी
आपली आई किती रागावली
कीव आली पाठलागाची तुझ्या
मृगजळेसुद्धा जरा पाणावली..''
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम !

खूप सुंदर गझल....

हेलावली,ओलावली ...मस्त

मी नवी व्याख्या मला समजावली
ऊन म्हणजे सावलीची सावली
.
मी कसा हे सांगणारी माणसे
राख होताना किती भांबावली
.
आपले अस्तित्व अन्नासारखे
ही युगांची चालली शतपावली

क्या बात! जबरी शेर !!

मी नवी व्याख्या मला समजावली
ऊन म्हणजे सावलीची सावली

अप्रतिम अश्या दुसऱ्या ओळीशी न्याय झाला असं वाटलं नाही.

वेगळे काहीतरी तो बोलला
माणसे त्याच्यादिशेने धावली

'त्याच्यादिशेने' हा टायपो आहे का ?
शेर छान.

एक माझे सोडुनी बाकी मने
वाचुनी माझी कथा हेलावली

पहिली ओळ पहिल्यांदा वाचताना समजली नाही, अपूर्ण वाटली. मग लक्षात आलं की पुढच्या ओळीतील 'वाचुनी' ह्या ओळीसाठी आहे. शेर आवडला, पण हा पडलेला तुकडा जरा विचित्र वाटला. अनेकदा असं असतं, मान्य. पण खटकलं.

वाहिली काही पुन्हा हृदयाकडे
आसवे डोळ्यांत काही मावली

लाजली सांगायला ती हे मला
पावसाला आग कोणी लावली

क्या बात है !
दोन्ही शेर निव्वळ अप्रतिम.. व्वाह !

मी कसा हे सांगणारी माणसे
राख होताना किती भांबावली

छान आहे शेर. विचार नेहमीचा वाटला. नसेलही, पण वाटला.

एकटे सोडून गेली शेवटी
आपली आई किती रागावली

'आपली' का म्हटलं असावं, हे कळलं नाही.

कीव आली पाठलागाची तुझ्या
मृगजळेसुद्धा जरा पाणावली

छानच !

टाकली वाळत मनाची ओल मी
वाळवंटाची व्यथा ओलावली

वेगळाच खयाल !
आवडला.

तीच का हे मी कसे सांगू बरे
भावली जी माणसे ती भावली

दुसरी ओळ अस्सल 'बेफी'ओळ आहे. ट्रेडमार्क.
सुंदर शेर !

आपले अस्तित्व अन्नासारखे
ही युगांची चालली शतपावली

हा शेर हळूहळू मनात उतरतो आहे. उत्कृष्ट व्हिस्कीचा ऑन द रॉक्स घोट जसा जिभेपासून आतड्यापर्यंत जाणीव करून देत उतरत जातो, तसा हा हळूहळू कळतो आहे. तूर्तास इतके कळले की.. अस्तित्वाला गिळून झालंय, आता ते पचवणं चालू आहे.
सहीच !

बोलताना रोज माझ्याशी खरे
बघ खर्‍याची पातळी खालावली

सुंदर !

घेतला मी जन्म या दुनियेमधे
की मला गांधीलमाशी चावली

धूर होतो माणसाचा......समजले
'बेफिकिर' झालो, बिडी शिलगावली

हे दोन्ही शेर अत्यंत अनावश्यक वाटले. एक तर मला समजलेच नाहीत किंवा ते विशेष नसतीलच, पण रसभंग झाला.

एकुणात गझल आवडलीच. खूप मोठी झाली आहे, असं मात्र वाटलं.
धन्यवाद आणि क्षमस्व.

....रसप....

आपले अस्तित्व अन्नासारखे
ही युगांची चालली शतपावली
सानी मिसरा सुंदर, पण उल्यावर विचार व्हावा!

येरझारा घालते अस्तित्व हे.....
ही युगांची चालली शतपावली!
असा करून वाचला हा शेर!

..............प्रा.सतीश देवपूरकर

प्रा.साहेबाचे पर्यायी शेर सुरू झाले का पुन्हा ? बसा आता , बोंबला !

असो

रणजीत तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरे मिळालीच तर स्वतःला नशीबवान समज Happy

ह्या वृत्तात बिनरदीफ गझल जरा काफियानुसारी वाटते किंवा कसे असा प्रश्न पडला
काही दिवसापूर्वी मी ह्या वृत्तात एक गझल केलेली ती कुणाला फारशी आवडली नव्हती उलट लोकाना ती हजलिश वाटली होती .मग मी विचार केला की हे काफियानुसारीपण एखाद्या किमान चार मात्रांच्या रदीफेने झाकले गेले (वॄत्तात बदल होईल ...अर्थातच !) तर कसे ? मग मी 'आहे' ही रदीफ जोडली मनातल्या मनात . .अनेक शेरांना ती फिट बसली ओळीत एक दोन शब्दात फेरबदल वगैरे करावे लागत होते इतकेच बाकी अर्थाअर्र्थी काही बिघडत नव्हते.

उदा :

का सुरू केली मनाची फटफटी
केवढा आवाज करते कारटी

मी तिला मोठेपणा का द्यायचा
वेदना आहेच माझी धाकटी

ह्या पटावरती खरी सत्ता तुझी
मी वजीराच्या बळाची सोंगटी

काठ काळा डोहही काळा तुझा
मी बरा हा गोरटा माझ्या तटी

बदल :

का सुरू केली मनाची फटफटी आहे
केवढा आवाज करते कारटी आहे

मी तिला मोठेपणा का द्यायचा सांगा
वेदना माझ्याहुनी जर धाकटी आहे

ह्या पटावरती खरी सत्ता तुझी आहे
मी वजीराच्या बळाची सोंगटी आहे

काठ काळा डोहही काळा तुझा काळ्या
मी बरा हा गोरटा माझ्या तटी आहे

असो
ह्या धाग्यवर असलेल्या रचनेतही "होती" ही रदीफ फिट बसते आहे मी मनातल्यामनात बदलून पाहिले .
मला अपेक्षित इफेक्ट होतो आहे असे दिसले

असो

(माझी निरीक्षणे नोंदवली आहेत केवळ . माझा अभ्यास कागदावर मांडून पाहिला आहे बस बाकी गैरसमज नसावा Happy )
धन्यवाद

ह्या धाग्यवर असलेल्या रचनेतही "होती" ही रदीफ फिट बसते आहे मी मनातल्यामनात बदलून पाहिले .
मला अपेक्षित इफेक्ट होतो आहे असे दिसले

>>>
प्रत्येक शेराच्या पहिल्या ओळीत काय बसवायचं?

रसिकहो,

मला गझलेतलं फारसं कळंत नाही. ही गझल वाचण्यापूर्वी 'ऊन्ह थकलेले पहाते लाभते का सावली...' ही गझल वाचली होती.

बेफिकीर प्राध्यापकमहाशयांसारखी रचना करू शकतात हे पाहून मौज वाटली. कृपया माझं म्हणणं बोबडे बोल आहेत असं समजावं.

आ.न.,
-गा.पै.

व्वा!!!
वेगळे काहीतरी तो बोलला
माणसे त्याच्यादिशेने धावली

एक माझे सोडुनी बाकी मने
वाचुनी माझी कथा हेलावली

वाहिली काही पुन्हा हृदयाकडे
आसवे डोळ्यांत काही मावली

लाजली सांगायला ती हे मला
पावसाला आग कोणी लावली

सुप्रियाताई,

बेफिकीरांची गझल म्हणजे एखादा प्रवास केल्याचा प्रत्यय (फील) येतो. या गझलेत एखाद्या उद्वाहानात (लिफ्टमध्ये) बसून वरखाली केल्याचा अनुभव येतोय.

आ.न.,
-गा.पै.

टीप : हे मी बरोबर बोललो का? Uhoh

<<< अवांतर - गा पै चोर सोडून सन्याशाचा बळी देताय राव ! >>>

खूप स्ट्राँग प्रतिसाद आहे.

जो कवी ४०० - ५०० द्वीपदी एका प्रतिकावर लिहू शकतो त्याची प्रतिभा वादातीतच असली पाहिजे.

बे.फि. ची प्रतिभा अफाट आहे हे मान्य आहेच! पण इतरांवर अन्याय का म्हणून?

इथे कुणी साहित्य (वांगमय हा शब्द मला टंकता येत नाही) चोरी करत असेल असे मला तरी वाटत नाही ! Happy

>>> ही गझल वाचण्यापूर्वी 'ऊन्ह थकलेले पहाते लाभते का सावली...' ही गझल वाचली होती.

बेफिकीर प्राध्यापकमहाशयांसारखी रचना करू शकतात हे पाहून मौज वाटली. <<<<<

हेच ते कधी जमिन, कधी अनुक्रमे तेच घेतलेले काफिये तर कधी खयालसुध्दा थोड्याफार फरकाने तेच घेतल्यामुळे मुळ गझल नक्की कोणाची ? हा प्रश्न वाचणा-याला संभ्रमात टाकू शकतो हेच म्हणायचे आहे मला. मायबोलीवर बेफिजींची गझल आधी पोस्टली असूनही आपल्या वाचनात प्रोफेसरांची आधी आली नि नकळत तुलनात्मक शेरा दिलाय आपण तर विचार करा इतरत्र पोस्टल्या गेल्यावर त्याचे परिणाम कसे विपरीत होवू शकतील वाचणा-यांवर ?

इतकेच.

आ. न .

-सुप्रिया.

<<<< जो कवी ४०० - ५०० द्वीपदी एका प्रतिकावर लिहू शकतो त्याची प्रतिभा वादातीतच असली पाहिजे.>>>>

नक्कीच ! म्हणूनच तळतळीने वाटते की त्यांनी स्वतःचीच जमिन कसावी, स्वतःचेच खयाल पेरावेत Happy

<<<<बे.फि. ची प्रतिभा अफाट आहे हे मान्य आहेच! पण इतरांवर अन्याय का म्हणून?

इथे कुणी साहित्य (वांगमय हा शब्द मला टंकता येत नाही) चोरी करत असेल असे मला तरी वाटत नाही ! >>>>

शरदराव इथे अर्थाचा अनर्थ होतोय अन विषयाला वेगळेच वळण दिले जातेय अस मला तरी वाटतय Happy

असो !

-सुप्रिया.

काय आहे. काही मंडळी काड्या टाकायलाच बसली आहेत. त्यांच्या कडे दुर्लक्ष केले पाहिजे. काही लोक (उदा. प्रोफ) स्वतःची वेगळी ओळख असूऩ 'कॉपीकॅट' बनतात. त्यांचे फक्त चांगले मुद्दे घेतले पाहिजेत. बाकी सोडून द्या ना. Happy

कुणी कुणाकडून काय घ्यायच नि काय सोडायच हे ज्याच्या त्याच्यावरच सोडलेल बर !!

Happy Happy

या धाग्यावरील अवांतर प्रतिसादाबद्दल क्षमस्व बेफिजी !

-सुप्रिया.

सुप्रियाताई,

>> मायबोलीवर बेफिजींची गझल आधी पोस्टली असूनही आपल्या वाचनात प्रोफेसरांची आधी आली नि नकळत
>> तुलनात्मक शेरा दिलाय आपण तर विचार करा इतरत्र पोस्टल्या गेल्यावर त्याचे परिणाम कसे विपरीत होवू
>> शकतील वाचणा-यांवर ?

हेही खरेच. बेफिकीरांची गझल आधी निर्माण झालीये हे लक्षात आलंच नाही! Sad

पण नेमकी त्यांनी आधी गझल लिहिल्यामुळे ते कधीकधी प्राध्यापकमहाशायांसारखेही लिहू शकतात हा समज अधिकच दृढ होतो, नाहीका? इथे उचलेगिरीचा संबंध नाही. मात्र हे सर्वसामान्य लोकांना कसं समजावून सांगायचं! Uhoh

आ.न.,
-गा.पै.

'सोडून द्या ना'
ह्या विचारामुळे जितकं नुकसान झालं आहे, ते मोजणंही अशक्य असावं.

<<कुणी कुणाकडून काय घ्यायच नि काय सोडायच हे ज्याच्या त्याच्यावरच सोडलेल बर !!>>

ओ.के.! Happy

माझा व्यवसाय 'सल्लागाराचा' असल्याने सवयीप्रमाणे लिहिले. यापुढे कुणाला मोफत सल्ला देताना काळजी घेईन!

धन्यवाद!

<<ह्या विचारामुळे जितकं नुकसान झालं आहे, ते मोजणंही अशक्य असावं.>>

अगदी... अगदी! Happy

Back to top