ऊन म्हणजे सावलीची सावली
Submitted by बेफ़िकीर on 13 June, 2014 - 14:26
मी नवी व्याख्या मला समजावली
ऊन म्हणजे सावलीची सावली
वेगळे काहीतरी तो बोलला
माणसे त्याच्यादिशेने धावली
एक माझे सोडुनी बाकी मने
वाचुनी माझी कथा हेलावली
वाहिली काही पुन्हा हृदयाकडे
आसवे डोळ्यांत काही मावली
लाजली सांगायला ती हे मला
पावसाला आग कोणी लावली
मी कसा हे सांगणारी माणसे
राख होताना किती भांबावली
एकटे सोडून गेली शेवटी
आपली आई किती रागावली
कीव आली पाठलागाची तुझ्या
मृगजळेसुद्धा जरा पाणावली
टाकली वाळत मनाची ओल मी
वाळवंटाची व्यथा ओलावली
तीच का हे मी कसे सांगू बरे
भावली जी माणसे ती भावली
आपले अस्तित्व अन्नासारखे
ही युगांची चालली शतपावली
विषय:
शब्दखुणा: