प्रत्येक घराची, नात्याची एक वेगळी अशी भाषाशैली असते. एखाद्या सदस्याचा अगदी पेट शब्द असतो, जोक्सची जातकुळी असते आणि कोणावर कशाप्रकारचे जोक्स 'मारले' जातात हेही त्या कुटुंबाच्या कालौघात नक्की झालेले असते. पुढे आपापल्या आयुष्याच्या दिशा बदलल्या, वर्षानुवर्षे सहवास नसला तरी यातले काही शब्द, म्हणी किंवा एखाद्या घटनेच्या संदर्भात निर्माण झालेली वाक्य त्या कुटुंबासाठी अगदी सौ टक्का हसायला लावणारी, त्या त्या व्यक्तीचे स्वभावविशेष दर्शवणारी अशी असतात. मूळ भाषेतला शब्द, वाक्प्रचार या प्रक्रियेत अगदी बदलून जातो, ज्याने वापरला त्याच्या मालकीचा असल्यासारखा होतो किंवा नवीनच शब्द किंवा म्हण त्यातून तयार होते. ही खरंतर त्या त्या व्यक्तीची अभिजात कलाकृती म्हणून पेटेंटेड असायला हवी. पण हा लांबचा मुद्दा आणि त्यात काय काय करावे लागेल याची कल्पना नसल्यामुळे सध्या तरी असल्या अभिजात शब्द, वाक्यकुळींची देवाण घेवाण इथे करूयात.
माझी आमच्या अख्या खानदानात असलेली ओळख म्हणजे,' गन्ना खडा था' - संदर्भासहित स्पष्टीकरणासाठी मायबोलीवर प्रसिध्द झालेली मामू ही पोस्ट वाचावी.
http://www.maayboli.com/node/47803
आमच्या घरात लहानपणापासून ऐकलेली बाबांची त्यांच्या पापभीरू स्वभावाला साजेल अशी फटकारतानाची म्हण - तुला खाल्ले म्हशीने - मला कधीही कळले नाही कि याची उत्पत्ती कुठून झाली - आम्हा बहिणींचे यावरचे अनुमान की आपले बाबा फारच सौम्य, सोज्वळ - शिवी कधी देणार नाहीत - पण सातत्याने डोईजड होणाऱ्या कार्ट्याना ओरडायला तर पाहिजे - मग कमीत कमी नुकसानदायक ( least damaging ) असा वाक्प्रचार त्यांनी शोधला असावा - एकतर म्हस काय आपल्या पोरींना खाणार नाही याची त्यांना खात्री असावी - म्हस ही safe आणि मुलीही असे असावे - असो - लहानपणी खूप हसायचो पण गम्मत म्हणजे माझी मुलगी तीन चार वर्षाची असताना मला खूप संताप आला होता. आम्ही बालहक्कवाले म्हणून हात काय उचलता येत नाही म्हणून अगदी जोरात तिच्यावर खेकसले - तुला खाल्ले म्हशीने ! माझ्या कुटुंबात आता ही सर्वमान्य शिवी आहे- म्हणजे मी मुलीला, ती छोट्या भावाला, छोटा आमच्यापैकी कुणालाही सर्वांसमोर हा अपशब्द वापरू शकतो. माही म्हणताना म्हशीनं ऐवजी तुला खाल्लं मशीनं, असंच म्हणतो.
बाबा अगदी लहानपणापासून राजकीय कार्यकर्ते आणि पेशाने शिक्षक. कुठलीही गोष्ट सहज आहे तशी न सांगता त्याचे सर्वांगाने विश्लेषण करायची सवय ( खोड), त्यात वारंवार येणारे वाक्य - 'पण गम्मत अशी झाली की' -- आम्ही लहानपणी अगदी मन देऊन ऐकायचो, काय गम्मत असणार आहे पुढे बरं ?- कधी कळलेच नाही. बऱ्याच वर्षानी जेव्हा प्रशासकीय स्वरूपाचे रिपोर्ट लिहायला, वाचायला लागले तेव्हा कळले की - however, nevertheless-- अशा अनेक शब्दांचा सार म्हणजे बाबांचे 'गम्मत अशी की', होते. मधल्या काळात आणि आताही त्यांच्या व्रात्य मुली आणि बायको यावरून असंख्य 'गमती' करून हसत असतातच.
मोठ्या दिदीचा आवडीचा शब्द - भंपक आणि भंपकपणा करू नको. या भंपक आणि भंपकपणा शब्दाच्या पिल्लावली माझ्या आणि दोन्ही दिद्यांच्या घरी जल्मल्या आहेत की त्याची गिनती आता आम्ही थांबवली आहे . सगळ्या रागलोभांना व्यक्त करायला ही शब्दावळ पुरेशी आहे या निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. उदा. भम्पू , भम्पूगिरी ( हा शब्द इग्लिश मध्ये पण आहे -कधीही ऑफिसमधून फोन करून विचारले की मनु आणि माहिपैकी कोणीतरी she is doing भम्पुगिरि अशी तक्रार असते) मग भम्पूचे लाडात आल्यावर ढम्पू, टम्पू , ढम्पुकलं, चिडून ढम्प्या असे अनेक versions तयार होताहेतच. भंपक- ढम्पक - ढम्पूकली - असे होता होता अगदी नव्या पिढीच्या माझ्या ताज्या ३ वर्षाच्या भाच्याने यात 'पुकली ढमढम' अशी भर घातली आहे.
सांगलीहून अकलूजला साधारण १२ वर्षाआधी जात होते. अशीच एक टूर, मध्येच एक रात्र बहिणीला भेटून पुढे प्रवास असा बेत. सकाळी सात वाजता एस टीत कंडक्टरच्या शेजारची सीट, दोघा बहिणींच्या प्रेमाला आणि पर्यायाने टपल्या मारून खिदळण्याला बहर आलेला. कंडक्टर आपल्या पॅडवर आकडेमोड करता करता खुदकन हसत होता आमचे बहरलेले बोलणे ऐकून. शेवटी गाडी निघण्याची वेळ, बेल वाजवताना बहिणीला म्हणाला,' नका काळजी करू फार'.
बहिणाई,' काय सांगू, अवखळ आहे फार, सांभाळून न्या लहानीला'. हसून कंडक्टरने आणि मी निरोप दिला. पुढे गप्पा, एके ठिकाणी चहा करत, अकलूज आले. उतरताना कंडक्टर मला म्हणे, ' सांगा बहिणीला, तिच्या "अवजड" बहिणीला सांभाळून पोहचवले.
आधी समोरच्या STD च्या पिवळ्या खोक्यात घुसून बहिणीला, 'अवखळ ते अवजड' प्रवास सांगितला !
तेव्हापासून प्रवासाला निघाले की मी , " अवजड" होते .
सासरी आमच्या कोणाच्याही वाढदिवसाला पूर्ण happy birthday to you म्हणतच नाहीत. कारण मोठ्या दिराच्या मुलीने २ वर्षाची असताना पूर्ण म्हणता येत नाही म्हणून happy टू यू असे म्हणलेले इतके फ़ेमस झाले आहे हि त्यानंतर येणाऱ्या सगळ्यांच्या सगळ्या वाढदिवसांना फक्त हैप्पी टू यू असंच म्हणायचा संकेत आहे.
खरे तर सासरचे खूप किस्से आहेत कारण त्यांच्याच भाषेत सांगायचे तर सगळेच equally 'पाजळत' असतात. पण वारसाहक्काने त्याचे पेटंट दुसऱ्या एका माबोकरीण बाईंकडे जाते, तरीही पुढील किस्सा सांगितलाच पाहिजे. तुमच्या घरी काय काय म्हणतात असे अगदी विस्मयचकित होऊन उद्गार काढले असता प्रिय नवऱ्याने ही गोष्ट सांगितली. यात कोण कोणास म्हणले हे बाजूला सारून मूळ कथाभाग सांगते. ' शी किती घाण पादण्याचा वास', असे म्हणले असताना प्रतिप्रश्न, 'तुम्ही फार सुगंधी पादता वाटतं !' . हे ऐकल्यावर जेव्हा घरातल्या सार्वजनिक ठिकाणी बसले असता असे नाक बंद करायची वेळ आली तर गुमान तिथून पलायन करणे, हा एकच मार्ग. उगाच काही बोलले आणि असला प्रतिप्रश्न आला तर खरे किंवा खोटे उत्तर द्यायच्या फंदात कोण पडणार?
वासावरून थोडे विषयांतर ( भाषांतर ) होईल पण आणखी एक किस्सा. माझी पहिली वाहिली नोकरी बारावीनंतर पाचगणीच्या म्यप्रोमध्ये. तिथले प्रॉडक्शन म्यानेजर हे उत्तर प्रदेशचे शुध्द हिंदी भाषिक मिश्रा'जी', अशा 'जी' लोकांसमोर आमचे हिंदी म्हणजे टाईमपास मधल्या शाकालसमोर दगडूचे म्हराटी. मिश्राजी मात्र अतिशय सौम्य, सालस माणूस. फ्याक्टरीत ** कुठल्याही फळाचं प्रोसेसिंग होत असले की घमघमाट सुटायचा. एक दिवस पायनाप्पल जॅम बनवत होते. मी त्या घमघमाटाने अगदी हुंगून ( मुग्ध, भारावून असे काही म्हणता येत नाही आणि नेमके विशेषण सुचत नाहीये ) जाउन त्यांना म्हणले, ' मिश्राजी क्या बास आ रही है !' मिश्राजींचा चेहरा अगदी कावराबावरा . क्या बास आ रही है, शबाना ? दोन तीन वेळा सांगितल्यावर त्यांना मला काय म्हणायचे होते ते कळले. त्यानंतर अर्धा तास त्यांनी बास म्हणजे काय आणि मला जे म्हणायचे होते त्यासाठी खुशबू, सुगंध तत्सम शब्द समर्पक आहेत, हे समजावून सांगितले. पण अजूनही अननस आणला की मला त्या 'बास' चीच आठवण येते.
(*** factory, mapro यातला ya उच्चार लिहायला जमत नाहीये )
लग्न झाल्यावर थोडी एकमेकांच्या स्वभावाची वास्तववादी ओळख झाल्यावर मी नवऱ्याला म्हणले अरे कधी तरी Romantically बोलत जा -- तेव्हा त्याने 'रोमन टिकली' कसं बोलतात हे माहित नसल्याची कबुली दिली होती. पण त्यानंतर प्रेमाचे दोन शब्द नवऱ्याकडून म्हणजे 'रोमन टिकली' !
लोकहो, तुमच्याकडचे असे भंपक शब्द , वेगवेगळ्या टिकल्या ऐकायला आवडतील. मराठी भाषा अस्तास चालली आहेची ओरड आपण नेहमी ऐकतो, आपापल्या परीने शब्दभांडार वाढवूयात का इथे. माय, बाप, बहिण आणि इतर नातीबोली वाचायला आवडेल.
तोबरा - घोड्याच्या तोंडाला
तोबरा -
घोड्याच्या तोंडाला लावायची पिशवी. पिशवीत हरभरे किंवा चारा घालतात
शबाना तुझा लेख फार सुंदर आहे.
शबाना तुझा लेख फार सुंदर आहे. अनुभव काही असा पण आहे कि, काही व्यक्ती दिसल्या की ते आपल्याला काय बोलतील याचा पूर्व अंदाज येतो पण कोणत्या विषयावर काय बोलतील हे काही सांगू शकत नाही. आश्यच आमच्या गावाच्या मावशी काही झाले कि म्हणतात "झाली का मजा" पण कधी कधी कशाचा संदर्भ कश्याला लावतील सांगता येत नाही. सगळ्यात विनोदी गोष्ट म्हणजे लग्न झाल्यावर मी त्यांच्या पाया पडायला गेलो. मला बायको समोर म्हणाल्या "झाली का मज्जा". आई शप्पत काय बोलावे कळले नाही, गप्प पणे मान खाली केली आणि निघून गेलो.
आमाच्याकडे एखदा पदार्थ
आमाच्याकडे एखदा पदार्थ संपवायचा असेल तर " उठवणे " हा शब्द रुढ आहे.
म्हणजे शिरा संपवायचा असेल तर शिरा उठवू का असं मुलगा मला विचारतो आणि त्याच इंग्रजी करण म्हणजे शुड आय मेक थिस स्टँड अप असं करतो आम्ही.
बाकी धागा मस्त . मजा येतेय वाचताना.
माझ्या आईचा पेटंट
माझ्या आईचा पेटंट वाक्यप्रयोग, " न ऐकणे हा फार गुणधर्म झालाय तूझा आजकाल !"
माझी आज्जी, कुत्र्यांना हाकलायला, " खांजळलं तूजं टक्कूरं ते " किंवा " वडलं तूजं काळीज ते" असं बोलायची. पण हे शब्द ती चुकुनही मुलांच्या बाबतीत वापरायची नाही.
माझे काका फ्लॅट बेस नसलेल्या
माझे काका फ्लॅट बेस नसलेल्या भांड्याला 'उटणटवळ भांड' अस म्हणायचे..
सासरी साबा अमुक एक गोष्ट असु नये म्हणताना 'अस नसु नये' म्हणतात
दिनेशदा तुमच्या पोस्टीवरुन
दिनेशदा तुमच्या पोस्टीवरुन आठवल. आपण एखाद्याकडुन आश्चर्यजनक बातमी ऐकल्यावर अथवा आश्चर्यजनक कॄती घडल्यावर "आयला", आइअशप्पथ अस म्हणतो त्या वेळी माझ्या साबा "तुझ डोंबल गेल चुलीत" अस म्हणतात.
मस्त लेख. मुग्धटली हे उटणटवळं
मस्त लेख.
मुग्धटली हे उटणटवळं भांडं आमच्याकडेही म्हटलं जायचं.
वर्षा थालिपीठात घालण्यासाठी
वर्षा
थालिपीठात घालण्यासाठी मिरची, लसुण या वस्तु थोड्याश्या ठेचुन घे अस सांगताना साबा अरधबोबड ठेच अस सांगतात.
अरे हे लैच गमतीचं हाय ...
अरे हे लैच गमतीचं हाय ... जर्रा आटवून आटवून लिवतो....
माझ्या लेकीचे लहानपणीचे
माझ्या लेकीचे लहानपणीचे वाक्य... हे टुला माहिती आहे का ? ( डू यू नो समथिंग.. याचे तिच्या मते योग्य भाषांतर ) प्रत्येक वाक्याची सुरवात हीच.. जसे हे टुला माहिती आहे का ? मी हंग्री आहे. हे टुला माहिती आहे का ? मला वॉच टिव्ही करायचा आहे.
मस्त वाचायला मजा येतेय.
मस्त वाचायला मजा येतेय. माझ्या आतोबांचे दोन शब्द आठवले बेतासबेत पदार्थ झाला असेल तर 'जष्ट मेड' अन चांगला झाला असेल तर 'बेष्ट' हे शब्द अगदी मकरंदअनासरपुरे( मराठवाडी) श्टाईलने म्हणायचे. मामीचे पदार्थ खूप चांगला झाला की खपतो न कमी पडला की 'भाजीच्या पातेल्याला तोंड लावलं वाटतं कुत्र्याने' नवीन व्यक्तीला कळतच नसे घरात एवढी माणसं असताना कुत्र्याने केव्हा अन कसं तोंड लावलं ते?
घोड्याच्या तोण्दाला एक पिशवी
घोड्याच्या तोण्दाला एक पिशवी बन्धतात. ट्यात भरपुर हरबरे असतात. घोडा चालता चालता हरबरे खातो.
ट्या पिशवीला तोबरा म्हणतात.
बरोबर आहे का हे? नसल्यास दुरुस्त करावे
http://www.bdword.com/marathi
http://www.bdword.com/marathi-meaning-or-translation-of-nosebag
अग्ग्गोबै, तोबर्याला nosebag.ंम्हनतात.
ज्ञानात भर पडलि
साती, माझी मा रागावली की --
साती,
माझी मा रागावली की -- बघतेच आता तुम्हाला मी -- याचे माझ्या घरात रुपांतर --I will see you now!
नंदिनी, हो हे कानडी घोळ फार
नंदिनी,
हो हे कानडी घोळ फार भयानक सुंदर असतात. पुन्हा एकदा भाषावार प्रांतरचनेवरून भांडाभांडी झाली तर या कानडी -मराठी लोकांचा केंद्रशासित प्रदेश स्थापित व्हावा अशी केंद्राला शिफारस करावी अशी 'भयंकर चांगली' कल्पना आहे माझी
माझ्या एका मामीला बर्याच
माझ्या एका मामीला बर्याच वाक्यांआधी 'म्हणून म्हटलं' असं लावायची सवय आहे. ते 'म्हणून' उगीचच आलेलं असतं त्यामुळे गंमत वाटते.
टीव्हीवरच्या एका डॉक्टर निवेदकाला ( नाव आठवत नाही ! ) प्रेक्षकांच्या फोननंतर मुलाखतकाराकडे वळताना 'हो, नक्कीच' असं म्हणायची सवय होती. कधीकधी फार विनोदी व्हायचं ते. उदा. 'डॉक्टर माझे सांधे हल्ली खूप दुखतात. हा संधीवात असेल का?' ह्यावर निवेदक,"हो नक्कीच ! डॉक्टर काय सांगता येईल ह्याबद्दल."
गा. पै. मध्यप्रदेशातील
गा. पै.
मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर, इंदौर आणि आसपासचा प्रदेश इथल्या मराठी लोकांचे 'हौ मराठी' पण असेच . मजा यायची ऐकून. त्यात सुरमा भोपळीची भोपाळी आणि नवाबाच्या प्रभावामुळे उर्दू आणि अगदी शुध्द हिंदी इथे ऐकायला मिळायची. आम्ही बॉम्बेवाले म्हणून खास, ' अरे तुम्हारा बंबईका भाषामें कुछ बोलके सुनावो', अशी आर्जवेही असायची. मनू वैतागून, ' मम्मा अपण क्या कार्टून लगते इनको? , असे विचारण्यापर्यंत ही आर्जवे गेली होती
नितीनचंद्र'जी', अहो आता तरी
नितीनचंद्र'जी',
अहो आता तरी 'जी' नका लावू नावापुढे! प्रचंड दडपण येते - मिश्राजी आणि जावेद अख्तर भाषेची परीक्षा घ्यायला बसल्यासारखे दिसतात समोर !
आणि मला मात्र माझ्या लेखमालेवरून माबोकारांच्या मनस्थितीचा चांगलाच 'आदमास' आला होता. प्रतिसाद थंड पडत पडत अगदी गारठून बर्फ झाला. अर्थात माबोकरांचा दोष नसावा अतिशय जवळच्या लोकांनीही चांगले लिहितेस पण यापुढे आम्ही वाचणार नाही असे आवर्जून सांगितले. त्यामुळे आता, ' इज्जत, इमेज, अस्तित्व- अशा सगळ्यांचेच सवाल पुढे ठाकले - म्हणून पूर्व पदाला जाउयात म्हणलं
मुग्धटली, डोंबल आमच्याकडे
मुग्धटली,
डोंबल आमच्याकडे खूप आहे - मला खरंच अर्थ नाही माहित, पण वैतागलेले असले की सगळेच डोंबलाचं असतंय ! डोंबलाचे काम, डोंबलाचे राजकारण, डोंबलाचा अभ्यास, डोंबलाचे प्रेम ई ई
बाकी मायबोलीवर प्रचलित काही
बाकी मायबोलीवर प्रचलित काही शब्द पण आता मराठी शब्दकोशात घातले पाहिजेतच असे वाटते उदा रच्याक्ने, साबा ( मला 'सांबा' च दिसतो समोर) तोंपासू ई
आई, साबा आणि इन जनरल बायका
आई, साबा आणि इन जनरल बायका काय म्हणतात याच्यावर एक नवीन पोस्ट होईल पण उदाहरणार्थ -
नळावर पाणी भरताना नेहमीची वाक्ये - तिला खूप पदवी आली आहे, ती तर इंदिरा गांधीच झाली आहे.
मी एकदा पंखा साफ करताना
मी एकदा पंखा साफ करताना बायकोला म्हणालो जरा कोलमा दे गं ....खरतर मला Colin (काचा, फ्रिज वगैरे साफ करायला वापरले जाणारे द्रव्य) हवे होते.
तेव्हा पासून आमच्या घरात Colin ला कोलमा (च) म्हणतात....
मस्तच!
मस्तच!
आणि मला मात्र माझ्या
आणि मला मात्र माझ्या लेखमालेवरून माबोकारांच्या मनस्थितीचा चांगलाच 'आदमास' आला होता. प्रतिसाद थंड पडत पडत अगदी गारठून बर्फ झाला>>>>> शबाना कुठल्या लेखमालीकेचे म्हणते आहेस? मुस्लिम जगताचा आढावा घेतलास आणी घेत आहेस त्याबद्दल का?
तसे असेल तर कारण आहे. भारताबाहेर गेले की अगदी पाकीस्तान, इराण पासुन सगळ्या मुस्लिम भाऊ-भगिनीन्शी सम्पर्क होतो, परीचय होतो. मात्र भारतातच राहिल्याने ते नेहेमीचेच झाल्याने तसे अनूभवास येत नाही. म्हणजे भारतीयान्मध्ये तू दिसन्यावरुन पण हिन्दु कोण, खिश्चन कोण आणी मुस्लिम कोण हा फरक सान्गु शकणार नाहीस. कारण आपली भारतीयान्ची ठेवण ( शारीरीक वगैरे ) तशी बनलेली असते. पण अभारतीय मात्र लगेच वेगळे जाणवतात, पण त्यान्च्याशी इतका सम्पर्क नसतो.त्यामुळे कदाचीत तुझी लेख मालीका बर्याच जणान्च्या डोक्यावरुन गेली असेल. ( असा माझा अन्दाज आहे बाकी नक्की माहीत नाही.:स्मित:)
मला प्रवासा दर्म्यान पाकी, इराकी, बान्गलादेशी सगळ्या मुस्लिम स्त्रीयान्ची ओळख झाली होती. दोघी -तिघी घरी पण येऊन गेल्या. पण परदेशात नुसतीच ये जा जास्त असल्याने फार सम्पर्क वाढवु शकले नाही.
भारतात म्हणजे महाराष्ट्रात आपल्याला हर भाषाचे शेजारी मिळु शकतात, त्यातुन आपण सहज जीवन जगतो, पण कदाचीत मायबोलीवरचे आताचे सगळेच भारताबाहेर तसे अनूभव घेतलेले नसतील, त्यामुळे तुला थन्डा प्रतीसाद लाभला असेल.
मला वाचावेसे वाटत होते, पण एकाच वेळी मी जास्त वाचु शकत नाही कारण नुकताच जवळचा चष्मा लागल्याने डोळ्यावर ताण येतो. पण तुझे लिखाण लक्षवेधी आहे.:स्मित:
कुणी वाचत नाही म्हणून लिहायचे नाही असे करु नकोस, कारण मग जे वाचत आहेत, पण प्रतीसाद देत नाहीत, त्यान्चा हिरेमोड होईल. थोडा वेळ दे सगळ्याना.
रश्मी, अगं गमतीनं लिहिलंय,
रश्मी,
अगं गमतीनं लिहिलंय, बाकी लेखमाला चालूच आहे
रश्मी, यू आर राईट! मी ती
रश्मी, यू आर राईट!

मी ती लेखमाला खुप आवडीने वाचायला घेतलेली पण खरच डो़यावरून गेली मग थांबवली
माझा अवाका तेवढा नाही याची जाणिव झाली
इकडे सासरी "जे खाल्यावर पोट
इकडे सासरी "जे खाल्यावर पोट व्यवस्थीत भरेल" त्याला "दबदबीत खाणे" म्हणतात.
वाक्यात उपयोगः "अगं एक पोळी खाऊन घे म्हणजे जरा दबदबीत होईल आणि पोटाला आधार येईल."
(पोटाला आधार येणे = पोट भरणे)
माझ्या नवर्याला शिव्या अजिबात
माझ्या नवर्याला शिव्या अजिबात येत नाहित ़ ़ अगदि मुर्ख वगैरे पण कधी म्हणत नाहि ़़ पण कार चालवताना खुपपपपपपच चिडला तर 'तुझ्या बापाला बटर ' असे म्हणतो ़ त्याचा अर्थ त्याला पण माहीत नाहि
आमची बेळगावी
आमची बेळगावी कामवाली:
मळगाळाचे दिवस. लहान पोरीचे काम. ब्याडा ब्याडा म्हट्लं तरी येती बगा.
माझी तमिळ कामवाली
"अम्मा, इसमे थोडा मीट हाकी, थोडा शुगर वेणा"
इनोची, त्याचा गर्भितार्थ बराच
इनोची, त्याचा गर्भितार्थ बराच असभ्य आहे.
आ.न.,
-गा.पै.
Pages