मेळघाटातील गावमित्रांची पुणे भेट व कार्यशाळा - संक्षिप्त वृत्तांत

Submitted by हर्पेन on 6 June, 2014 - 05:45

मेळघाट शैक्षणिक प्रकल्प समन्वयक व गावमित्र यांची पुणे भेट व कार्यशाळा १ मे ते ४ मे २०१४ - संक्षिप्त अहवाल

मेळघाटामध्ये ‘गावमित्र’ म्हणून काम करणारे मैत्रीचे १२ गावमित्र व १०० दिवसांची शाळा या शैक्षणिक प्रकल्पाचे मेळघाटातील स्थानिक समन्वयक (अशोक बेठेकर व रमेश मावस्कर) यांची पुणे भेट १ ते ४ मे २०१४ ह्या दरम्यान पार पडली.

त्यांच्या या भेटी व कार्यशाळा घेण्यामागे, गेल्या वर्षभर केलेल्या कामाचा आढावा घेणे, पुढील वर्षी करायच्या कामाच्या नियोजनासंदर्भात त्यांच्या कल्पना जाणून घेणे, त्यांना विविध ठिकाणे/ प्रकल्प/ उपक्रम दाखवणे, तज्ज्ञ व्यक्तींकडून काही मार्गदर्शन देणे व एकूणच त्यांच्या अनुभव-विश्वाच्या कक्षा विस्तारणे असा उद्देश होता व त्या दृष्टीनेच विविध गोष्टींचे आयोजन / नियोजन केले होते.

कम्युनिटी रेडीयोला भेट - Film and Television Institute Of India (FTII) मध्ये Community Radio Centre चालवले जाते. तिथल्या श्री. चांदेकर यांनी कम्युनिटी रेडीयो म्हणजे काय? त्याचा प्रमुख उद्देश काय ई. गोष्टींची माहिती दिली. त्यानंतर ऐनवेळी ठरल्याप्रमाणे गावमित्रांनी दोन कोरकू गाणी म्हटली व युवा शिबिरामध्ये बसवलेले एक नाटक सादर केले. त्याचे ध्वनीमुद्रणश्री. चांदेकर यांनी FTII च्या Community Radioकरता केले. हा एक नवीनच अनुभव गावमित्रांना मिळाला.

कात्रज येथील श्री. बाळासाहेब फाटे यांच्या जोडकाम (Fabrication) कारखान्यामध्ये त्यांनी विविध यंत्रे, त्यांचे काम,संगणकीय प्रणालींवर चालणारी यंत्रे (CNC Machine) याची माहिती अगदी सोप्या भाषेत त्यांना दिली. शेजारी असलेला टी-शर्ट बनवण्याचा कारखाना पण दाखवला.

श्री. फाटे यांच्याच मदतीने ‘कात्रज दुग्ध व्यवसाय’ कसा चालतो हे आत जाऊन पाहिले, तिथे या संबंधीची एक माहितीफीत पण पाहिली.

कात्रजचे नगरसेवक श्री. वसंत मोरे यांनी जैव वायू प्रकल्प (Biogas), कात्रज तलाव इ. दाखवले.

आणि अर्थातच सगळ्या गावमित्रांना कात्रजचे सर्पोद्यान दाखवले जे सर्वांना खूप आवडले तसेच प्राणीसंग्रहालयातील पांढरा वाघ पण खूप आवडला.

कोल्हापूर –मुंबई महामर्गावरील पुण्याकडे येताना लागणारा मोठा बोगदा व दरीपूल पहायला मिळणे हे पण गावमित्रांसाठी एक प्रकारचे अप्रुप होते.

माननीय शिक्षणतज्ज्ञ ‘वर्षाताई सहस्त्रबुद्धे’ यांचे भाषा विषयक एक सत्र ठेवले होते. ज्यांची मातृभाषा मराठी नाही त्यांना ती शिकवताना कशी सुरुवात करायची याबद्दल त्यांनी सोपे व नेमकेपणाने गावमित्रांना सांगितले. ‘मुले कशी शिकतात, ती कशी वाचायला / लिहायला लागतात’ याविषयी तात्विक मांडणी पण त्यांनी इतकी सोपी करुन सांगितली की गावमित्रांना आपण नेमके काय करायला हवे आहे हे लक्षात आले. वर्षाताईंच्या मदतीने आपण पुढील वर्षात मराठी-कोरकू अशी द्विभाषिक पुस्तके मेळघाटाकरता करणार आहोत. ( याकरता निधीची आवश्यकता आहे. आपण आपल्या मित्रमंडळींना,स्नेही व आप्तजनांना यात मदत करण्यास जरूर सांगा).

‘अक्षरनंदन शाळा’ पाहणे ही पण खूप ‘शिकवणारी’बाब ठरली गावमित्रांसाठी. मैत्रीच्या एक कार्यकर्त्या-जोडप्यांचा मुलगा मल्हार ह्याच शाळेत शिकतो. तो व त्याचा मित्र कौशिक या दोघांनी सगळी शाळा अगदी बारीकसारीक तपशीलात दाखवली. नंतर गावमित्राना काय काय वेगळ्या गोष्टी पाहिल्या याची यादी करायला सांगितली गेली. व असे ठरले आहे की त्यातल्या मेळघाटात करता येतील अशा किमान दोन गोष्टी प्रत्येकाने आपापल्या शाळेत उन्हाळी सुट्टीमध्ये करायच्या. उन्हाळी सुट्टीत आठवड्यातून दोन दिवस मुलांना बरोबर घेऊन हे करायचे ठरल्यामुळे आपल्या पूरक वर्गांमध्ये खंडही पडणार नाही.

इंद्रधनुष्य’ सभागृहात गीतांजली देगांवकर यांनी ‘स्थलांतर व व्यावसायिक प्रशिक्षण’ या विषयावर मार्गदर्शन केले. नंतर गावमित्रांनी आपापले अनुभव सर्वांसमोर मांडले.

विद्या चिकटे यांनी पण गावमित्रांशी खूपच चांगला संवाद साधला. मुलांना आपल्याविषयी जवळिक निर्माण होण्याकरता काय काय करता येईल हे त्यांनी सांगितले.

‘मेंढा (लेखा)’वरची छोटीशी माहितीवजा चित्रफीत दाखवली. गावमित्रांपैकी हिरालाल गडचिरोली ला जाऊन आला आहे. पण इतरांना ते सगळे नवीन होते. त्यावर थोडीफार चर्चाही झाली, इंद्रधनुष्य मध्ये गीतांजली यांनी सांगितलेल्या विषयाशी जोडून चर्चा झाली. गटबांधणी, गटाची ताकद,आपल्याकडे काय आहे ही माहिती आधी गोळा करणे आणि मग त्यातून आपल्या गावामध्ये काय करता येईल याची आखणी – हा क्रम त्यांच्या लक्षात आला आहे असे आम्हाला वाटले. विशेष म्हणजे नंतर त्यांनी परत तो कार्यक्रम पाहिला, रमेशने पेन ड्राइव्ह वर तो नक्कल करून घेतला आहे.

मैत्री विश्वस्तांबरोबर गावमित्रांच्या गप्पांचे एक सत्र झाले.

सारांश, भरपूर गोष्टींनी भरलेले असे हे चार दिवस होते आणि गावमित्रांनी या सगळ्यात उत्साहाने भाग घेतला.त्यांच्यामध्ये आलेला मोकळेपणा व आत्मविश्वास हा खूपच सकारात्मक व आपला उत्साह वाढवणारा बदल आहे.

या सर्व सत्रांकरता तसेच कार्यशाळेकरता खूप जणांची वेगवेगळ्या प्रकारांनी मदत झाली. कोणी गावमित्रांना बसस्टेशन वरुन घेऊन आला तर कोणी त्यांना पोहोचवायला गेला. वेगवेगळ्या ठिकाणी नेता आणताना देखिल अनेक स्वयंसेवक त्यांच्या सोबत होतेच. काही जणांनी नाश्ता, जेवण एक एक वेळ दिले. काहींनी जेवणासाठी आर्थिक मदत केली. एका स्वयंसेवकाने गावमित्रांसाठी परतीच्या प्रवासात खायला डबा करून दिला. गावमित्रांना भेटायला व त्यांच्याशी गप्पा मारायला अनेक जण खास वेळ काढून आले होते. ग. रा. पालकर शाळेच्या संचालिका भागवत बाईं यांनी शाळेचा वर्ग गावमित्रांच्या राहण्याकरता व कार्यशाळेची सत्रे घेण्याकरता विनामूल्य दिला. आपल्याला ह्या दरम्यान वापरण्यासाठी लागणार्‍या सतरंज्या देखिल सवलतीच्या भाड्याने मिळाल्या होत्या.

अशा रितीने सर्वांच्या मदतीने, सहकार्याने व सहभागाने ही भेट-कार्यशाळा उत्तम रीतीने पार पडली.

या दरम्यान काढलेली काही निवडक प्रकाशचित्रे
१.
WP_20140501_005.jpg

२.
WP_20140501_008.jpg

३.
WP_20140501_011.jpg

४.
WP_20140501_013.jpg

५.
WP_20140502_005.jpg

६.
WP_20140502_010.jpg

७.
WP_20140502_011.jpg

८.
WP_20140502_018.jpg

९.
WP_20140503_015.jpg

१०.
WP_20140503_031.jpg

११.
WP_20140504_001.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान वृत्तांत!

मला हर्पेनने इंद्रधनुष्य सभागृहात होणार्‍या कार्यक्रमाचे निमंत्रण अगोदरच देऊन ठेवल्यामुळे तिथे कार्यक्रमाला थोडा वेळ का होईना, उपस्थित राहता आले.
कोरकू गावमित्रांनी आपल्या गावचे सांगितलेले अनुभव खरोखरी आपल्या नेहमीच्या शहरी जीवनाच्या सर्व कल्पनांना छेद देणारे होते.

एकाने सांगितल्याचं आठवतंय, त्याला त्याचं रेशन कार्ड करायचं होतं. गावात कोणाचंच रेशन कार्ड झालेलं नव्हतं. ह्या गड्याने त्यासाठी आवश्यक कागदपत्रं गोळा केली आणि तलाठ्याच्या कार्यालयात गेला. तिथे गेल्यावर त्याच्याकडे बाराशे रुपये द्या, लगेच रेशनकार्ड बनवून मिळेल असे एकाने त्यांना सांगितले. गावमित्र ठीक आहे म्हणाला व परत आपल्या गावी परतला. तिथे गावात त्याने आपल्या बाकीच्या गावकर्‍यांना गोळा केले, त्यांना रेशन कार्ड का करायचं, त्याचं महत्त्व, त्यासाठी काय 'कागद' लागतात हे सारं समजावून सांगितलं. गावातली बाकीची मंडळीही तयार झाली. मग त्या सार्‍या लोकांनी एक वाहन बुक केलं आणि सगळेजण अमरावतीला रेशन कार्डाच्या कामाला रवाना झाले. तिथे गेल्यावर कार्यालयात थेट वरच्या साहेबांनाच भेटले व आपण कोणत्या गावावरून व का आलो आहोत हे सांगितले. त्या साहेबांनी त्यांच्याकडून आवश्यक ते अर्ज भरून घेतले, कागदपत्रे घेतली व घरी जा म्हणाले. रेशन कार्डे घरपोच येतील आठेक दिवसांत म्हणून सांगितले. आणि खरोखरी आठ दिवसांनी सर्वांच्या नावची रेशनकार्डे गावात येऊन पोचली. शहरात जायचा जो काय खर्च आला असेल तेवढा वगळला तर एक नया पैका न देता त्यांचे काम झाले! या अनुभवातून गावमित्राला व इतर गावकर्‍यांनाही बरेच शिकायला मिळाले.

आणखी एका गावमित्राने गावातल्या शाळेचे फार मजेशीर किस्से सांगितले. त्याला जेव्हा शाळेसाठी नेमले तेव्हा तिथे अगोदरचा मास्तर सहा महिने शाळेत उगवलाच नव्हता. शाळा बंद पडली होती. त्याने शाळा सुरु करायची म्हणून गावातल्या प्रत्येक घराला भेट दिली. सर्व आईबापांना आपापल्या पोरांना शाळेत धाडायला सांगितले. पण सकाळी मुलं उशीरा उठायची, मग आरामात आवरून, नाश्तापाणी करून शाळेत यायची तर शाळेची वेळ टळून गेलेली असायची. सुरुवातीला तो शाळा सुरु व्हायच्या अगोदर तासभर शाळेची घंटा वाजवायचा. आता तो ती घंटा का वाजवत आहे हेच अनेकांना कळायचे नाही. मग त्याने एक युक्ती केली. मुलांच्या आईबापांना सांगितलं की शाळा सकाळपासून आहे म्हणून! (शाळा खरं तर दुपारी भरायची... पण ही युक्ती मुलांनी शाळेत वेळेवर यावं म्हणून!) तो रोज सकाळी सकाळी गावातल्या प्रत्येक घरावरून फेरी मारायचा. त्या त्या घरातल्या पोरांची नावं घेऊन, त्यांना हाळ्या देऊन उठवायचा आणि ती उठल्याची खात्री झाली की पुढचं घर! मुलं मग तयार होऊन शाळेत येऊन बसू लागली. सरकारकडून मिळणारी खिचडी अंगणात या गावमित्राच्या देखरेखीखाली शिजवली जात असायची. म्हणजे मुलं उपाशीही राहायची नाहीत. त्याने आणखी एक युक्ती केली. ती म्हणजे जो कोणी शाळेत सर्वात लवकर येईल त्याला एक चॉकलेट! एका मुलाचे आईबाप शेतातच राहायचे. सकाळी तो शेतावरून तयार होऊन चालत चालत सर्वात अगोदर शाळेत पोचायचा व चॉकलेट पटकावायचा! आजही तो मुलगा सर्वात आधी शाळेत पोहोचतो. अनेक आईबाप आपली अगदी चिटकी मिटकी मुलंही त्यांच्या मोठ्या भावंडासोबत शाळेत पाठवायचे. मग शाळेत त्या मुलांचा खेळ, खाऊ आणि मोठ्या मुलांचा अभ्यास असे चालायचे. पण ह्याचा फायदा असा झाला की आपल्या ताईदादासारखं आपल्याला कधी शिकायला मिळेल याची ती धाकटी भावंडंही उत्सुकतेने वाट बघू लागली.

गावमित्रांचे अनुभव खरोखर रोचक होते. मला आणखी वेळ तिथे त्यांचे अनुभव ऐकत थांबायची इच्छा होती. परंतु दुसर्‍या एका ठिकाणी जाणेही आवश्यक असल्यामुळे मी तिथून लवकर निरोप घेतला.

१]
maitri2.jpg

२]
maitri3.jpg

धन्यवाद विज्ञानदास, पण शंदिशा ला शुभेच्छा म्हणजे नक्की कुणाला ते कळले नाही.

धन्यवाद अकु,

मी स्वतः देखिल सर्ववेळ ह्या गावमित्रांसोबत नव्ह्तो. या वृत्तांताकरता व फोटोंकरता मला मैत्रीच्या इतर मंडळींची मोठीच मदत झाली.

गावमित्रांच्या इंद्रधनुष्य सभागृहातील कार्यक्रमाला मी थोडा उशीराच गेलो पण जी माणसे, मेळघाटात गेलो असता तिकडेपण आपापल्यात पण सगळ्यांसमोर बोलायला बुजत होती त्या गाव मित्रांना शहरातल्या सभेत सर्वांसमोर धीटपणे बोलताना पाहून आनंदाने अक्षरशः डोळ्यात पाणी आले. प्रत्येकानेच एकसोएक किस्से सांगितले मतितार्थ एकच आपले प्रश्न आपणच सोडवायचे यासाठी पुढाकार घेणे, ह्या मित्रांना जमायला लागले आहे.
अकु त्यांनी सांगितलेल्या किश्शांना इथे टंकल्याकरता विशेष धन्यवाद Happy मला तर सगळे आठवतच नाहीयेत Happy

शंभर दिवसांची शाळा(शंदिशा) म्हणायचंय तिथे... Happy माहीती वाचली.काही गोष्टी नव्यानेही कळाल्या...

एक,कुणी मदत करण्याच्या स्थितीत असतं कुणी मदत मागण्याच्या.किंबहुना आपण सगळेच आलटून-पालटून या दोन्ही फेजेसमधून रोज जात असतो. शासन आणि समाज यांना जोडणार्‍या संस्थांचंही हेच काम या दोन्ही फेजेस सोप्या बनवतं.

पण खरंच या मुलांना हे सगळं बघण्यासाठी इकडे यावं लागतं!! माझा गढचिरोलीचा मित्र नाविन्य बघण्यासाठी मुंबईला येतो,यात मुंबईचं यश की गढचिरोलीची राजकीय्,भौगोलिक..कोणती चूक?(प्रातिनिधीक उदा. म्हणा हवं तर) विकास व्हावा पण...तो 'कोलॅटरल' असणे हा मुद्दा महत्वाचा. ज्यांना हा प्रश्न अडवतो,सतावतो त्यांची ताकद कुठेतरी कमी पडते.त्यांच्यासाठी या संस्था आणि संस्थांचे कार्यकर्ते निस्वार्थ् आणि अस्फूटपणे मदतकार्यात झो़कून देतात... हीच आपली संस्कृती... त्यांच्या त्या प्रयत्नांना चिअर्स...

हर्पेन तुमचा माहितीपूर्ण लेख आणि अरुधती कुलकर्णी यांचा तितकाच सुयोग्य प्रतिसाद खूप काही सांगून गेला आहे. गावमित्रांच्या चेहर्‍यावर उमटलेले भाव आपल्या प्रयत्नांची पावतीच देत आहेत एक प्रकारे ते मला फार भावले.

"...मोकळेपणा व आत्मविश्वास हा खूपच सकारात्मक व आपला उत्साह वाढवणारा बदल आहे...." ~ याचे श्रेय तुम्हाला आणि तुमच्या सहकारी मित्रांना निर्विवादपणे जाते.

विदा, धन्य आहात, शंदिशा हे १०० दिवसांच्या शाळेच संक्षिप्त रूप.... विचार करूनही माझ्या अजीबात ध्यानात आले नव्हते. परत एकदा धन्यवाद Happy

मो आणि अशोक. आपलेही आवर्जुन प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल धन्यवाद.

वा हर्षद आणि अकुदेखील ...
फारच सुंदररित्या सगळे शब्दबद्ध केलंय तुम्ही मंडळींनी ...

प्रत्येकानेच एकसोएक किस्से सांगितले मतितार्थ एकच आपले प्रश्न आपणच सोडवायचे यासाठी पुढाकार घेणे, ह्या मित्रांना जमायला लागले आहे. >>>> केवढा आत्मविश्वास आहे - हॅट्स ऑफ ....

शशांक, त्या मुलांमधे जो आत्मविश्वास आला आहे आणि त्यायोगे जे काम करू पाह्ताहेत / करताहेत ते बघता मला तर अगदी 'सुरवंटाचे फुलपाखरू' उपमा आठवली....

हर्पेन , वि पु मधे स्वत : लिन्क दिल्या बद्दल खुप खुप आभार.

खरच सुरवन्टातुन फुलपाखरु होते आहे , म्हणजे आपल्या प्रयत्नाना मस्त यश येते आहे.
मी कधी ? केव्हा ? आपल्या ह्या कार्यात सहभागी होयिन माहित नाही ..ईच्छा खुssss प आहे .म्ह्णजे मार्ग नक्किच निघेल अश्या आशावादावर सध्या मी आहे .

अ कु . ने पण छान पोस्ट लिहिली आहे .

आपल्या सगळ्याचे खुप खुप कौतुक ....आणी शुभेच्छा

धन्यवाद शैलजा, किरण कुमार, सुहास्य, शोभअताई, अमितव...

सुहास्य, आपली ईच्छा आहे ना मग मार्ग नक्की निघेल. 'मैत्री' वरचा आपला लोभ असाच असू द्या.

आमच्यासोबत वेळोवेळी सगळ्या घडामोडी शेअर करता त्यबद्दल खुप खुप धन्यवाद हर्पेन. वृत्तांत आवडला.
अकु, मोलाचा प्रतिसाद.

अतिशय सुरेख वृत्तांत..

अनुभवाची शिदोरी खूपच छान आहे..

हर्पेन तुमचा माहितीपूर्ण लेख आणि अरुधती कुलकर्णी यांचा तितकाच सुयोग्य प्रतिसाद खूप काही सांगून गेला आहे. >> +१ मस्तच एकदम !

धन्यवाद असामी, पिंगू, सई, स्वाती२ आणि मामी....

पावसाळा चालू झाला की चालू होतात 'मैत्री'च्या मेळघाटातील वैद्यकिय धडक मोहिमा...
पावसाळ्याबरोबरच आपले नवीन शैक्षणिक वर्ष ही चालू होते आणि मग चालू होईल मेळघाटातला शैक्षणिक प्रकल्प देखिल....

स्वयंसेवकांची आवश्यकता आहेच...
वेळापत्रक बनतंय, ते एकदा नक्की झाले की इथे सांगतो
सर्वांनीच जसे जमेल ज्यात जमेल तसतसे नक्कीच सहभागी व्हावे, ही विनंती Happy