अननोन चायना-भाग ३

Submitted by वर्षू. on 24 April, 2014 - 06:38

अननोन चायना -भाग १ - http://www.maayboli.com/node/48666

अननोन चायना -भाग २- http://www.maayboli.com/node/48669

अननोन चायना भाग ४ - http://www.maayboli.com/node/48706

दरी पाहून बाहेर येऊन तेथील बगिच्यात बसून आराम करत होतो. समोरच सर्व बाजूंनी मोकळा फक्त

डोक्यावर छत असलेला एक लांबच्यालांब पॅसेज होता. तिथे असलेल्या अनेक लहान लहान स्टॉल्स मधून

वाळवलेले खारवलेले, भाजलेले, तिखट मसाल्यात घोळवून प्रिझर्व केलेले बीफ सॉसेजेस,

याक मीट चे तुकडे , मेंढरांच्या मीट च्या स्ट्रिप्स, कोंबडीचे पाय का पाउले (हो>>य!! नख्यांसकट) , विविध

प्रकारचे मशरूम्स हा लोकल खाऊ विकायला होता. थोड्या थोड्या वेळाने ढोल बडवल्यासारखा आवाज

यायचा आणी त्याच्या बरोबरीने माणसं जोरजोरात ,' हैय्या' टाईप्स ओरडल्याचा ही.. उत्सुकतेने पाहायला गेले

तर दोन माणसं हातात मोठ्या हतोड्या घेऊन गजक बनवत होते.. म्हंजे तिळपापडीला अक्षरशः धोपटत

होते. बाजूच्या स्टॉलवर लगेच सँपल्स चाखायला ठेवलीच होती. चवीला खूप छान होती.

त्याच्याच बाजूला एक माणूस चायनीज हर्ब्ज, कसल्यातरी बिया जात्यावर दळत होता. हे पीठ ही पाण्यात घोळून

लहान प्लास्टिक कपातून सँपल म्हणून ठेवले होते. हे कुठलेतरी हेल्थ ड्रिंक होते म्हणे. चवीला बरं होतं

सत्तू पीठ पाण्यात घोळून लागतं तसं..

हे कसलं तरी सूप रटरटत होतं.. ते मात्र चाखून बघायची हिम्मत झाली नाही

खाऊ घ्यायला तुफान गर्दी उडाली होती.

लोकल्स शी बोलताना समजलं ,इथे लोकं आत्ता चीन मधे सुट्टी नसतानाही इतक्या मोठ्या संख्येने आले होते ,

चायनीज नवीन वर्षाच्या सुट्टीत तर विचारायलाच नको.. पण सगळं काही ट्रांसपोर्ट पासून , स्वच्छता, सुविधा,

ट्रेकिंग ट्रॅक्स वगैरे सुपर ऑर्गनाईज्ड असल्याने कोणत्याही प्रकारचे कष्ट इथल्या जनतेला सहन करावे लागत नाहीत.

तर काय सांगत होते काल.. चिउचायकोउ च्या हॉटेल्स मधे एक गम्मत असते.. म्हंजे जेंव्हा आम्ही तिथे

थकून भागून पोचलो तेंव्हा ती गम्मत अजिबात भासली नव्हती.

चीन मधे अगदी कुठल्या रिमोट खेडेगावातील हॉटेलात जरी गेला तरी खोलीमधे सर्व प्रकारच्या टॉयलेटरीज

आणी प्यायचे पाणी या बेसिक सुविधा फुकट मिळतात. पण इकडल्या हॉटेल्स मधे काहीच सुविधा नव्हत्या.

या जागी अतिरिक्त कचरा टाळण्याकरता ही सोपी युक्ती अवलंबलेली आहे. स्वतः विकत घेतलेल्या

पाण्याच्या बाटल्या आणी इतर सटरफटर सामान इथेच टाकून न देता , टूरिस्ट आपल्या बरोबरच परत घेऊन

जातो. Happy हा नियम माहीत नसल्याने , आम्हाला दुखरे पाय विसरून आधी हॉटेल बाहेरच्या दुकानात हे सर्व

गरजेचे सामान विकत आणायला पळावे लागले.

सर्वच हॉटेल्स इको फ्रेंडली असल्याने सकाळी ६.३० ते ११ पर्यन्त आणी संध्याकाळी ६.३० ते ११ पर्यन्त गरम

पाण्याची सोय होती . बाकीच्या वेळी बर्फा सारख्या थंड पाण्याने करा जे हवं ते.. Proud

खोल्यांमधून थंड (बन्द) पडलेले हीटर्स पाहून धस्सं झालं .. भर एप्रिल मधे ही रात्री टेंपरेचर २ , ३ डिग्री होतं हे

माहित होतं , त्यामुळे आम्ही जरा जास्तच डोकं खाल्लं. म्हणून आम्हाला हीटेड गाद्या असलेल्या खोलीत

शिफ्ट केलं.

चायनीज टूर होता म्हणून सकाळी ६.३० ला पेज, उकडलेली अंडी, सोबत कसलेसे सूप, मानथौ ( वाफवलेले

पाव) , वाळवलेल्या पानकोबी , मुळ्या चे तिखट्टं लोणचं, उकळतं पाणी , चायनीज चहा असा ब्रे फा घेऊन ७ ला

टूर ला सुरुवात करायची. १२ , १ वाजता लंच ला त्यांच्या ठरलेल्या रेस्टॉरेंट्स मधे स्टर फ्राय भाज्या, दोन तीन

प्रकारचे थंड सॅलड्स, मीट बेस्ड सूप, फिश, चिकन च्या न पटणार्‍या चवीचं जेवण मिळायचं. आमच्या

बरोबरचे चायनीज ही जेवणाला नाक मुरडत होते.. रात्री ही ६.३० ला जेवणाचे असलेच सुमार हाल होते.

असो.. जेवण आणी पाण्याची सोय (?) या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणी आसपास विखुरलेल्या , नजर ठरू न

शकणार्‍या स्वर्गीय निसर्गसौंदर्याचा अमाप आनंद लुटला.. Happy

या तिबेटी वेशातील हसर्‍या बायका, सक्काळी ,भल्या पहाटे, कडाक्याच्या थंडीत ही आपल्याजवळचे किडुक

मिडुक विकायला हॉटेल च्या बाहेर यायच्या..

आजचा टूर आम्हाला दोन तासाच्या अंतरावर असलेल्या मौनिकौ दरी वर घेऊन जाणार होता.

मौनिकौ दरी १६० स्क्वेअर किमी एरिआमधे पसरलेली असून तिची उंची वेगवेगळ्या लेव्हल्स वर ९०००

फुटांपासून ते १३,००० फुटापर्यन्त जाते.

इथले नैसर्गिक धबधबे पाहण्या सारखे आहेत. येथील चीन चा सर्वात मोठा ट्रॅवरटाइन धबधबा ,' चागा' पाहायला

आम्ही जात होतो आज. १०,००० फूट उंचीवर असलेल्या ,' चागा' ची उंची ३०६ फूट तर रुंदी ११४ फूट एव्हढी

आहे.

जायच्या वाटेवर एका जागी थांबून तिथे विकत बसलेल्या लोकल तिबेटिअन्स कडून ,'मुँह माँगे दाम ' मधे

निखार्‍यावर भाजलेले बटाटे आणी याक साते घेतले. ते या पदार्थांना तिखट ,मीठ आणी धन्याची पूड च्या

मिश्रणात घोळवून देत होते. भर थंडीत हे गर्मागरम , चविष्ट पदार्थ अजूनच छान लागत होते.

तिथेच एका याक वर बसून फोटू काढून घ्यायची हौस प्रत्येक टूरिस्ट ने भागवून घेतली. फोटो काढला रे काढला

कि मालकीण येऊन दहा युएन ( आपले १०० रु.) ची हक्काने मागणी करायची.. त्यांची उपजिविका यावरच

अवलंबून असेल..

हीच ती ,याक ची मालकीण , तिबेटी पेहराव असला तरी तिबेटिअन्स सारखी पोलाईट नव्हती , म्हणून ती मला

चायनीज ,'छियांग ' जमातीची वाटली.. इथे तिबेटिअन आणी छियांग जमातीतील लोकं वेगवेगळे ओळखायला

कठीण जातं.. वागण्यावरून अंदाज बांधायचे झालं..

वाटेत ठिकठिकाणी स्नो अजून वितळायचा राहिलेला दिसत होता..

मागच्या कुरणात याक ,घोडे चरत होते

संपूर्ण रस्त्या च्या कडेने स्नो कॅप्ड पर्वत शिखरे डोकावतच होती.. कधी एकदम जवळ यायची , कधी लांबून

खुणवायची

धबधब्या कडे जायचा रस्ता.. बसेस इथे थांबतात.

इथून जंगला च्या वाटेने पायी वाटचाल करायची होती. रस्ता चुकू नये म्हणून हातात आपापल्या टूर चे झेंडे

हातात घेऊन त्या त्या ग्रुप चे गाईड समोर चालत होते.

दोनशे तीनशे मिलिअन वर्षांपूर्वी चिउचायकोउ दरी च्या जागी समुद्र होता असं वाचलं. साडे तीन किमी चा चढ

चढून एका मध्यवर्ती ठिकाणावर पोचायचं होतं, जिथून वर पाहिल्यास धबधब्या चा हायेस्ट पॉइंट पाहता येणार

होता .

संपूर्ण जंगलातून लाकडी फळ्यांचे जिने , प्लॅटफॉर्म्स बांधलेले होते. लोकं खाद्यपदार्थांच्या पिशव्या पाठीवर

घेऊन शिस्तीत चढत होते. इथे चढताना जाणवले कि थोड्याश्या पायर्‍या चढल्या तरी लौकर दम लागतोय. डोकं

जरा जड होतंय. इथे यायच्या आधी गाईड ने तंबीच दिली होती कि इतकी चढण चढणार आहोत तर पाणी

अगदी कमी प्या, पोटभरून जेऊ नका.. इ. इ.

जिथपर्यन्त नजर जाईल तिथपर्यन्त , नुकत्याच सुटलेल्या शाळेतून बाहेर पडणार्‍या

अवखळ पोरांसारखे खळाळते झरेच झरे धावत सुटले होते , इतक्या घाईने कुठे चालले होते कुणास ठाऊक!!

किती ही खा प्या.. पण जंगलातून चालताना ही अजिबात कचरा करायचा नाही बर्का..

इथेही थोड्या थोड्या अंतरावर साफसफाई वाले होतेच हजर..

.' ते' मध्यवर्ती ठिकाण येईस्तोवर दमछाक झालेली होती बहुतेक जणांची . पण ते आलं मात्र आणी प्रत्येक जण

अवाक होऊन समोरचं दृष्य पाहातच राहिला.

वरून येणारा धबधबा कुणीतरी त्याला आकाशातल्या पायर्‍यांवरून लोटून दिल्यासारखा

गडगडत ,उसळत , फेसाळत येत होता..

तिथे पोचल्यावरही बसायला छानशी जागा केली होती. वर कवर ही केलं होतं तिथे बसून आराम करत असता

अचानक एक सोन्याचं झाड दिसलं.. त्याच्यावर सूर्याची किरणं अश्या अँगल ने पडत होती कि झाडाला

सोन्याची झालर लावल्या सारखी वाटत होती.. Happy

धबधब्या च्या अगदी वर टोकापर्यन्त जाणारे बहाद्दर ही होते.. पण आम्ही तिथून परती च्या रस्त्याने बस कडे

परतलो.

उद्या तिबेटिअन विलेज मधे चालायची मानसिक तयारी करायची होती ना..

या ही भागात आणी आगामी कोणत्याही भागात डिसक्लेमर सेम टू सेम आहे... Happy

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिषेक.. पाय डुंबवणे नॉट अलाऊड.. शिक्षा होईल..

डोळ्यात तेल घालून जपतात हा निसर्गाचा ठेवा...

Pages