बघतोय रिक्षावाला .. ग्ग वाट माझी बघतोय रिक्षावाला

Submitted by अंड्या on 5 March, 2014 - 10:31

ट्रेन तशी रिकामीच होती, जे फर्स्टक्लास म्हटलं की ओघाने आलेच. पण जरा जास्तच रिकामी बघून ‘च्याईला सेकंडक्लासच्या तिकिटाने पण काम झाले असते की राव’ अशी चुटपुट लागलीच. आता एक पैसा वसूल झोप घ्यावी असे ठरवले आणि वारा खिडकीचे गज कापत आत येईल अशी विंडोसीट पकडून लवंडलो. दुसर्‍याच मिनिटाला डोळा लागला आणि पाचच मिनिटांत उघडावा लागला. च्याईला, फर्स्टक्लासमध्ये पण भिकारी. ते देखील इंग्लिशमध्ये गाणारे, पेटीच्या जागी गिटार आणि तबल्याच्या जागी ड्रमसेट. झोपेच्या नादात चुकून ट्रेन ईंग्लंडला तर नाही ना घेऊन आलो. श्या, वैतागतच डोळे उघडले तर समोरच एक महाशय मांडीवरती लॅपटॉप उघडून बसले होते. म्हणजे ते स्वप्नातले दुरून आल्यासारखे वाटणारे सारे कर्णकर्कश्श स्वर अगदी सामोरूनच येत होते तर. अचानक मला बाईकवर फिरताना वा रस्त्याने चालतानाही कानात हेडफोन लावणारी आजची युवा पिढी गुणी बाळ वाटू लागली. आधीच या अंड्याला ईंग्रजी संगीतातला ओ कि ठो कळत नाही, आणि इथे तर ठो ठो करत वाजवली जाणारी वाद्ये कानठळ्या बसवत होती. रेहमानसाहेबांच्या अपवादात्मकच अश्या न आवडलेल्या ‘रॉकस्टार’ या रणबीरपटाची आठवण झाली. त्या संगीतातले शब्द तरी किमान ओळखीचे असल्याने त्यातच काही तरल भावना शोधायचा प्रयत्न केला होता पण इथे मात्र ते ही शक्य नव्हते.

काय करावे, काय करावे, या फर्स्टक्लासमधल्या माणसांना पटकन हटकताही येत नाही. सेकंडक्लासच्या डब्यात परप्रांतीयांचे ‘तुम तो ठहरे परदेशी’ ऐकण्यापासून वाचावे म्हणून फर्स्टक्लासच्या तिकिटावर खर्चा करावा तर इथेही परदेशी संगीत पिच्छा सोडत नाही. संगीत असावे तर आपल्या भाषेतले, आपल्या मातीतले.. ओढ लावतीss अशी जीवाला, गावाकडची माती.. साद घालतीss पुन्हा नव्याने, ती रक्तांची नाती.. मल्हारवारी आठवले तसे मी देखील स्वताचा मोबाईल काढून ते गाणे शोधायला घेतले. पण चाळताना लक्षात आले की ते घरच्या कॉम्प्युटरवरच पडून आहे. मोबाईलमध्ये कधी असे ऐकायला घेतलेच नाही. पण चाळता चाळता आणखी एका मराठी गाण्यावर नजर पडली आणि कामावर जाईलाss, उशीर व्हाईलाss, बघतोय रिक्षावाला ग्ग वाट माझी, बघतोय रिक्षावाला.. स्सॉल्लिड, हे पण आपले एक फेवरीट ! कानावर पडले की बस उठून नाचावेसे वाटावं. पण आता सकाळच्या टाईमाला हे ऐकावे की न ऐकावे याचा विचार करता करताच एक क्लृप्ती सुचली अन चेहराच खुलला. आता काट्याने काटा निघणार होता. लावलेच ते गाणे फुल्ल वोल्युम करून. पाठोपाठ कोंबडी पळाली तयार होतेच, पण त्याची वेळ आलीच नाही. तिथवर पोहोचायच्या आधीच समोरून येणारे आवाज लोप पावले. तसे मी बॅगेतला हेडफोन काढून कानाला लावला आणि आतल्या आत गपचूप गाणे बंद करून शांत झोपी गेलो.

- o0Oअंड्या

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कामावर जाईलाss, उशीर व्हाईलाss, बघतोय रिक्षावाला ग्ग वाट माझी, बघतोय रिक्षावाला.. स्सॉल्लिड कानावर पडले की बस उठून नाचावेसे वाटावं>>>>+१०००००००००००००००००० अगदि...मला तर आता हाफिसात नाचाव वाटतय... Happy आयडिया मस्त

चार वर्षापूर्वीची गोष्ट . पुण्याला कल्याणी नगर row houses त शेअरिंग ने राहत असताना असेच पुढील श्रीमंत घरातील कुत्री रात्रीबेरात्री भुंकून त्रास देत .

बराच विचार विनिमय केल्यानंतर आम्ही तोच भुंकण्याचा आवाज रेकॉर्ड करून ठेवला आणि रात्री कुत्री भून्कल्या बरोबर full volumn लावून दिली .

२ दिवसात मालकांनी कुत्र्यांचा बरोबर बंडोबस्त केला. Happy

प्रतिसाद धन्यवाद,
ती कुत्र्याच्या आवाजाची कल्पनाही मस्तच, त्यावरून एक जुनी कथा आठवली.

छान Happy

मि पण office मधे नाइट शिफ्ट ला असताना असाच प्रयोग केला होता आणि २-३ मिनितात बाकिचि फोनवरिल गाणी बन्द........ति आजपर्यन्त.

Happy