"उशीर होईल यायला. वाट नको पाहू." विकासने केस सारखे करत आरशात पुन्हा नजर टाकली.
"कुठे चालला आहेस?"
"च्यायला, विचारलंस कुठे म्हणून? लागली पनवती आता." हातातला कंगवा भिरकावीत तो सुमतीच्या दिशेने वळला.
"दादा..." खुर्चीत वाचत बसलेली कविता संतापाने उठली.
"तोंड आवर आणि हे काय वागणं तुझं."
"गप गं. सालीऽऽऽ मला शिकवते." शर्टाची कॉलर नीट करत विकास म्हणाला.
"कविता तू नको मध्ये पडू. जा तू विकास." सुमती शांतपणे म्हणाली आणि शाळेतून तपासायला आणलेल्या वह्यांचा गठ्ठा तिने पुढे ओढला. कविताला आईचा रागच आला. पाय आपटत ती तिथून उठली. सुमतीला हसायला आलं. दोघांच्या दोन तर्हा. एक माझी बाजू घेऊन भांडणार, दुसरं मला किती त्रास देता येईल ते पाहणार. दुर्लक्ष करायचं हा मनाशी केलेला निश्चय पुरा केल्यासारखं तिने हातात आली ती वही तपासायला घेतली. सातवी आठवीतल्या मुलांचे जग बदलून टाकायचे बेत वाचता वाचता, एकेका निबंधामध्ये ती कितीतरी वेळ रमली.
"आई, अगं दिवा तरी लावायचा." कविताने खोलीतला दिवा लावला. पिवळसर प्रकाशाने खोली उजळून निघाली. पण सामानाच्या भितींवर पडलेल्या वेड्यावाकड्या सावल्यांनी खोलीची अवकळा अधोरेखित झाल्यासारखी वाटत राहिली सुमतीला. त्यात दिव्याखालची पाल अंगावर शहारा आणत होती. वर्षानुवर्ष वापरात असलेला दिवाण, एक टेबल, दोन खुर्च्या आणि खिडक्यांचे विरलेले पडदे. बस इतकंच सामान. स्वप्नांच्या रंगासारखेच झाले होते ह्या घराचे रंग विटकट, जुने पुराणे. सुमतीने पुन्हा वहीत डोकं खुपसलं. मुलांच्या नजरेतून भविष्यकाळ पाहता पाहता ती देखील त्यांच्या वयाच्या झाली, त्यावेळची स्वप्न, दिवस, क्षण तिच्याभोवती अलगद फेर धरुन उभे राहिले.
करकचून दोन वेण्या बांधलेल्या सुमतीने भावाच्या घरात पाऊल टाकलं आणि गोंधळलीच ती. भाऊ, वहिनी दोघं डॉक्टर. त्यांच्या इतमामाला साजेसा तो चकचकीत बंगला तिचे डोळे दिपवून टाकत होता. भिरभिरत्या नजरेने ती सगळ्या घरात फिरली. शिरोळच्या घराएवढंच मोठं घर हे. आवडलं का अवघड वाटतं आहे इथे वावरायला तेच समजेना तिला. खिडक्यांचे महागडे पडदे, उंची फर्निचर, स्वयंपाकघरातल्या अद्यावत सोयी... स्वप्नातही तिने कधी विचार केला नव्हता अशा गोष्टी होत्या. पण शिरोळच्या मातीचा वास नव्हता आजूबाजूला. बंबातली पेटती लाकडं, हौदातलं पाणी, खोल विहीर, रहाटाचा आवाज, शेजार्या पाजार्यांचं येता जाता डोकावणं, गडग्याच्या पलीकडे उभं राहून गप्पा मारणं यातलं काहीही नव्हतं. एका बंदिस्त जगात तिने पाऊल टाकलं होतं, तितक्याच बंदिस्त वातावरणात पुढची तीन वर्ष काढावी लागणार हे घरातल्या वातावरणाने मूकपणे तिला सांगितलं. एकदा कॉलेजचं शिक्षण संपलं की परत शिरोळ.
"इथे सही लागेल तुमची." गांगरलेल्या सुमतीच्या चेहर्यावरचे भाव निरखीत नरेश म्हणाला. बँकेत खातं उघडायला गेलेली सुमती गांगरली होती. तो सांगेल तिथे सह्या करत होती. तिचा गोंधळ, धांदल, गडबड पाहून नरेशला हसायला आलं,
"मी काही खाणार नाही तुम्हाला. सावकाश. काही घाई नाही." सुमती अवघडल्यासारखं हसली.
"मी पण शिरोळचाच आहे." आता मात्र मान वर करुन तिने त्याच्याकडे पाहिलं.
"तुम्हाला कसं कळलं मी शिरोळची आहे ते?"
अर्जावर पत्ता लिहिलेल्या ठिकाणी बोट ठेवत तो पुन्हा हसला. त्याच्या शुभ्र दंतपंक्तीवर तिची नजर खिळली.
"अय्या, मग मी कसं कधीच नाही पाहिलं तुम्हाला. अख्खं शिरोळ ओळखीचं आहे आमच्या. म्हणजे एवढंसं तर गाव आहे नं."
"आमचं मूळ गाव ते. कितीतरी वर्षात गेलो नाही. काका, काकू असतात फक्त आता तिथे. छान झालं आपली ओळख झाली. आता बँकेत आलात की भेटा नक्की." तो निरोपाचं बोलला तशी ती उठली.
कारणाकारणाने नरेशशी तिची भेट होत राहिली. शिरोळला जाणार्या एस. टी. त नरेश भेटला तेव्हा ती आश्चर्य आणि आनंदाने खुलली.
"शिरोळ?" तो तिच्या बाजूला येऊन बसला तसं हसत हसत तिने विचारलं.
"हो. दोन दिवस जोडून सुटी आहे ना."
काहीही न बोलता ती खिडकीतून बाहेर पाहत राहिली. खरंतर खूप बोलावं, गप्पा माराव्या असं वाटत होतं पण त्याने इतकं अगदी बाजूलाच बसावं असं पहिल्यांदाच होत होतं. ती थोडीशी अवघडली होती, सुखावली होती.
"सुमती गप्प का?"
"अं? काही नाही उगाच." खिडकीबाहेरचा रस्ता, झाडं यात नजर गुंतवण्याचा प्रयत्न करत ती म्हणाली.
"सारखं सारखं तुला भेटून एकदा शिरोळची चक्कर मारुन यावी असं ठरवलं. तसंही काका, काकूंना भेटून खूप वर्ष झाली." तुम्हीवरुन त्याने अगं तुगं म्हणायला सुरुवात केलेली तिच्या लक्षात आलं.
"आधी बोलला असतात तर एकत्रच गेलो असतो." ती पुटपुटली.
"एकत्रच तर जातो आहोत." त्याने तिच्याकडे एकटक पाहत म्हटलं.
"तो योगायोग." तिनेही रोखून पाहिलं त्याच्याकडे.
"नक्की?" त्याच्या स्वरातला मिश्किलपणा जाणवून तिच्या एकदम काहीतरी लक्षात आलं.
"अय्या, तुला ठाऊक आहे मी कधी जाते शिरोळला ते?"
"अरे वा, बढती मिळाली." तिच्या प्रश्नाला चतुराईने त्याने बगल दिली, पण तिच्या चेहर्यावरचं प्रश्नचिन्ह पाहून तो घोगर्या आवाजात म्हणाला
"तुम्हीचं तू झालं. आवडलं बुवा आपल्याला." त्या स्मितहास्याकडे ती पाहत राहिली. पाच तासांचा तो प्रवास कधीच संपू नये असं वाटत राहिलं दोघांना.
"तू कशाला ताटकळत बसली आहेस? सांगितलं नव्हतं कुणी थांबू नका माझ्यासाठी." सुमती एकदम दचकली. भानावर आली.
"बापरे, लक्षातच आलं नाही रे झोपायची वेळ झाली ते." वह्या बंद करत सुमती म्हणाली.
"च्यायला, काय आई आहेस की कोण गं तू? विकासच्या आवाजातल्या तुच्छतेने सुमतीच्या काळजात कळ उठली.
"काय झालं?" केविलवाण्या सुरात तिने विचारलं.
"आमच्या पोटापाण्याची फिकीरच नाही तुला. जेवण झालंय की नाही ते तरी विचारशील?"
"तू जेवून येणार होतास."
बाहेर पडता पडता रागारागाने फेकलेलं त्याचंच वाक्य त्याला आठवलं. उत्तर सुचेना तसा रागाचा फूत्कार टाकत विकासने दिवाणावर अंग टाकलं.
"अरे, बाहेरुन आलास तर पायावर पाणी तरी घ्यावं, चप्पल काढाव्यात."
"ए, कटकट नाय पायजेल हा. जा झोप जा तू." विकासने कपाळावर आडवा हात टाकला. पुटपुटत, राग आवरत सुमती खोलीच्या दिशेने वळली.
आई गेल्याची चाहूल डोळ्यावर आडवा हात टाकून विकास घेत राहिला. आई आणि कविताचा त्याला वैताग यायला लागला होता. सारखा उपदेश, नाहीतर दुर्लक्ष. बापाच्या मार्गावर गेल्या आहेत दोघी. हिच्यामुळे, हिच्यामुळे सगळ्या घराचा सत्यनाश झाला. आपल्या समाजातल्या पोराशी लग्न करायचं सोडून गेली पळून. फळं भोगतोय आम्ही पोरं. मनातल्या मनात घरातल्या सगळ्यांना लाखोली वाहता वाहता तो घोरायला लागला.
"ऊठ रे आता. किती वेळ घोरत पडणार आहेस. आई परत यायची वेळ झाली शाळेतून." कविताने विकासला जोरजोरात हलवलं. बघावं तेव्हा आडवा पडलेला असतो, वेळ नाही काळ नाही. विकासने कसेबसे डोळे उघडले. रात्री परत येताना मनात साचलेलं एकदम बाहेर पडलं विकासच्या.
"मामा भेटला होता आज."
"काय?"
"हो, म्हणजे त्याने मला भेटायला बोलावलं होतं."
"तू आधी तुझं आवर. मी चहा करते. चहा घेता घेता बोलू आपण. आणि आई यायच्या आत सांग सगळं. आईला अजिबात आवडणार नाही तू त्याला भेटायला गेलास हे कळलं तर."
विकास चुळबूळ करत उठला. कविताने पटापट ती खोली नीटनेटकी केली. विकासची चादर तिनेच घडी केली, नाहीतर तशीच राहिली असती. चहा कपात ओतत ओतता विकास आलाच.
"च्यायला, मी सांगतो तुला आईने जर जातीत लग्न केलं असतं ना तर कुठच्या कुठे पोचलो असतो आपण. पैसाच पैसा, आणि काय हवं ते करायला मोकळीक."
"काय बोलतो आहेस तू विकास. बाबांनी काय कमी केलं रे आपल्याला?"
"मामा आज मला कसल्या भारी हॉटेलमध्ये घेऊन गेला होता. त्याला भेटावंसं वाटत होतं म्हणाला." बाबांचा विषय टाळत तो म्हणाला.
"त्याला भेटावंसं वाटलं आणि तू भेटलास. अरे, आईला नाही आवडणार. तिचा नको का विचार करायला?"
"मामा सांगत होता, आईचं लग्न डॉक्टर मित्राशी लावून देणार होता तो. पण त्याच्याआधीच पळून गेली बाबांबरोबर."
"प्रेम होतं तिचं बाबांवर. आणि आपले बाबा काही अडाणी नव्हते. मामाने कोंडूनच ठेवलं होतं आईला जवळजवळ. मग काय करणार ती."
"काय उपयोग झाला त्या प्रेमाचा? माहेर तुटलंच ना तिला कायमचं? झाली ना आपली फरफट?"
"काय फरफट झाली रे? बाबा गेले पण आई निभावते आहे ना सारं."
"तुला डोकं म्हणून नाही. आईने जातीत लग्न केलं असतं तर पैसा खेळला असता घरात. डॉक्टरशी लग्न. यार, सगळं मनासारखं झालं असतं."
"तुला काही सांगायचं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी. सगळी सुखं पैशाने नाही मिळत. आता कृपा कर आणि आईपाशी नको बोलूस हे."
"बरं, बरं. नाही बोलत. अजून उपदेश नको तुझा." विकास चहाचा घोट घेत विचार करत तिथेच बसून राहिला. कप सुकला तसा समोरच्या भाड्यांतून त्याने पुन्हा एकदा चहा ओतून घेतला.
" आई, बाबांनी प्रेम गाजवलंच. कुठेपण जा कोणी ना कोणी भेटतंच त्यांच्या प्रेमाबद्दल मिटक्या मारत बोलणारं. आईने मामाचं न ऐकता पळून जाऊन लग्न केलं ही कशी चूक होती ते तर प्रत्येकजण बिंबवत असतो मनात. मग आईचं माहेर कसं तुटलं, बाबांच्या घरातल्यांनी तिला कसं आपलंसं केलं. अख्ख्या जगाला माहीत होतं त्याचं प्रकरण, फालतू लफडं. शीऽऽऽ लाज वाटते असलं ऐकायला."
कविता हसली,
"लफडं काय म्हणतोस? अरे, छोट्याशा गावात वर्षानुवर्ष राहतो आहोत आपण. सगळे ओळखतात एकमेकांना. होणारच असं. आणि तुला ऐकवत नाही तर ऐकू नकोस. माहीत आहे सगळं म्हणायचं ना की संपलं."
"तेच जमत नाही. बाबा तर गेले, पण आईची लाज वाटते. तिच्यामुळे मान खाली घालून वावरावं लागतं जिथे तिथे. शोभलं का असं पळून जाणं, जातीबाहेर लग्न करणं?"
"या गोष्टीला वीसहून अधिक वर्ष झाली आहेत विकास. आपण पण लग्नाच्या वयाचे झालो आहोत. जग कुठे चाललं आहे आणि तू जातीच्या कसल्या गोष्टी करतोस?"
विकास काहीच बोलला नाही. पुन्हा एकदा स्वत:साठी चहा ओतून घेत तो बाहेरच्या दिवाणावर चहाचे घोट घेत राहिला. कविता आपलं आवरुन बाहेर निघून गेली. चहाचा कप दिवाणाच्या बाजूला ठेवून विकास पलंगावर पुन्हा आडवा झाला ते दाराचा आवाज होईपर्यंत.
पाच जिने चढून सुमतीला चांगलीच धाप लागली. मनातल्या विचाराचं वादळ चेहर्यावर उतरलं होतं. एकट्याने हे घर कसं सावरायचं ते कळेनासं झालं होतं. दोन तरुण वयातली मुलं. नोकरी मिळत नाही म्हणून वैतागलेला, परिस्थितीला तिलाच जबाबदार धरणारा मुलगा, आणि कॉलेजमध्ये शिकणारी, सारं निमूटपणे पाहणारी, कुढणारी, तिच्यापरीने भावाच्या वागण्याला करता येईल तेवढा विरोध करणारी, त्याला समजावणारी कविता. दोघांच्या दोन टोकाच्या वागण्याने मधल्यामध्ये सुमती भरडली जात होती. वैतागत होती. आणि आता आज हे नवीन. दाराचं कुलूप काढायला तिने पर्समधून किल्ली काढली तितक्यात दार उघडून विकास बाहेर आला. त्याच्या अवताराकडे ती पाहत राहिली. चुरगळलेला शर्ट, विस्कटलेले केस, फाटकी जीन्स.
"भर दुपारी कुणीकडे चालला आहेस अशा अवतारात?"
"कुठे जाणार? नोकरी नसलेली माणसं काय करतात? चाललो गाव उंडारायला."
"आत चल. बोलायचं आहे मला तुझ्याशी." आईच्या आवाजातल्या जरबेने विकास बुजला. तो लहान असताना क्वचित त्याने तिला इतक्या हुकमतीने बोलताना पाहिलं होतं. एरवी ती मितभाषीच. न कळत काही न बोलता दारातून तो मागे फिरला. दिवाणावर टेकला.
"बस तिथे. मी आलेच साडी बदलून." सुमती आत जाऊन घटाघट पाणी प्यायली, सावकाशपणे तिने साडी बदलली. स्वत:चं आवरता आवरता विकासशी कसं बोलायचं, त्याचा भडका उडू न देता सारं व्यवस्थितपणे कसं पटवून द्यायचं, त्याच्या मनातले विचार किती चुकीचे आहेत ते त्याच्या कसं लक्षात आणून द्यायचं या विचारात ती यांत्रिकपणे आवरत होती.
"आई, पाच मिनिटात येते म्हणालीस. पंधरा झाली. नंतरच सांग काय असेल ते. मी चाललो." विकासचा उंच स्वर ऐकून ती घाईघाईत बाहेर आली.
"उठायचं नाही. बस." तिच्या आवाजातल्या जरबेने तो पुन्हा बसला. अस्वस्थ, चुळबूळ करत.
"कविता म्हणाली तू आज मामाला भेटलास."
"ती कुठे भेटली तुला?"
"शाळेत आली होती."
"कुत्री, साली. मला सांगते आईला सांगू नकोस आणि स्वत: तेवढं सांगण्यासाठी शाळा गाठते. हरामखोर."
"विकास, सभ्य माणसाचं घर आहे हे. शब्द जपून वापर." तोल ढळू न देण्याची काळजी घेत सुमती म्हणाली.
"कळलं" गुरगुरल्यासारखा तो पुटपुटला.
"मामाला भेटायला गेला होतास तू?"
"वाटलंच, बोलायचं म्हणजे तू बोलणार, मी ऐकणार. उपदेऽऽऽश."
"हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही विकास."
"हो गेलो होतो. आज पहिल्यांदा नाही. गेल्या दोन वर्षात खूपदा भेटलो त्याला."
"का?"
"तो बोलावतो म्हणून. महागड्या हॉटेलात नेऊन चांगलं खायला प्यायला देतो म्हणून."
"आणि..."
"बस इतकंच."
"इतकंच नाही. तुझ्या आईचं कसं चुकलं हे ऐकायला जातोस तू मामाकडे." विकास पायांच्या अस्वस्थ हालचाली करत नखं कुरतडायला लागला.
"विकास, ते नखं कुरतडणं थांबव. लहान नाहीस तू आता. आणि तुझ्या लक्षात कसं येत नाही, मामा तुला भडकवायचा प्रयत्न करतो आहे."
"का?"
"मला शिक्षा म्हणून."
"मामा म्हणतो झालं गेलं मी विसरून गेलो आहे कधीच."
"हो? मग बहिणीला भेटायला घरी का येत नाही? मला का बोलवत नाही त्याच्या घरी?"
"त्याला लाज वाटते तुझी."
"लाज वाटण्यासारखं मी काहीही केलेलं नाही."
"म्हणजे त्याचं राहणीमान, प्रतिष्ठित लोकांमधला वावर. डॉक्टर आहे ना तो. आपल्याकडे आलं तर गाडी लावायलाही जागा नाही म्हणाला."
"एरवी एवढ्यातेवढ्याला भडकतोस. मामाने असा अपमान केला तर त्याला काय ऐकवलंस मग?"
"खरं तर बोलला तो. आई, मामा म्हणतो ते पटतं मला. त्याच्या डॉक्टर मित्राशी लग्न केलं असतंस ना तर आपलं आयुष्य वेगळं असतं. बाबांनी तुझं वाटोळं केलं आई."
"विकास..." सुमती तारस्वरात ओरडली.
"एकदा बोललास. खूप झालं. खूप दिवस चालवून घेतलं तुझं कसंही वागणं. बस्स झालं आता. आमचं प्रेम आम्ही निभावलं. नरेशच्या घरच्यांनी मला आपलं मानलं. हा तुझा नालायक मामा, स्वत:ला उच्चजातीतला समजतो, त्याच्यामुळेच, त्याच्यामुळेच तुझे बाबा गेले रे. मामाने मारलं तुझ्या बाबांना. आज असते तर सगळं काही तुला हवं तसंच झालं असतं. चांगली नोकरी होती, पुढे जायची धमक होती. चांगलं चाललं होतं रे आपलं. पाहवलं नाही तुझ्या मामाला, नसते मान अपमान आले मध्ये."
"मामाने मारलं? काय वेड्यासारखं बोलतेस आई. काहीही."
"खरं सांगते आहे. मी पळून जाणं हा प्रतिष्ठेचा प्रश्न झाला. जात आडवी आली. माझं माहेर तुटलं. वाटलं तुझा जन्म झाल्यावर होईल जाणंयेणं सुरू. ते नाही झालं. माहेरच्यांनी संबंध तोडलेच पूर्ण. तुझ्या बाबांच्या मनात माझं माहेर तुटलं ही खंत होती. भराभर परीक्षा देत तुझे बाबा बढती मिळवीत होते. एकच ध्यास. माझ्या माहेरच्यांच्या मनातलं त्याचं स्थान उजळ व्हावं, मला माहेरची माया पुन्हा मिळावी. आपल्या घरातल्या सर्वांना त्या घराने आनंदाने स्वीकारावं."
"मग? का नाही झालं तसं? विकासच्या मनातला संभ्रम लपत नव्हता.
"कारण त्या अतीव ताणाने त्यांना हृदयविकाराचा झटका आला. सारं काही अर्ध्यात आटोपलं."
"हे कारण होतं बाबांना झटका येण्याचं?" विकासच्या डोळ्यासमोर आजच घडल्यासारखं सारं उभं राहिलं. सातवीचा वर्ग. मुख्याध्यापकाबरोबर वर्गात आलेले शेजारचे काका. गंभीर चेहरा. कविताला आणि त्याला, दोघांना त्यांनी आपल्या घरी नेलं. बाबांना बरं नाही, आई हॉस्पिटलमध्ये गेली आहे एवढंच सांगितलं त्यांनी. घरी गेल्यावर काकूंनी आधी जेवायला बसवलं. आणि मग आत्या आली होती त्या घरी. दोघांना कुशीत घेऊन हमसाहमशी रडली. कुणीही न सांगता काय झालं ते दोघा भावंडांना कळलं होतं. आज इतकी वर्ष झाली, हृदयविकाराच्या झटक्याने बाबा गेले एवढंच तर माहीत होतं. दोघांनी आईला त्रास होऊ नये म्हणून समंजसपणे, आपसूकच कधी काही विचारलं नव्हतं. आणि आज अचानक आई सांगते आहे मामामुळे गेले बाबा.
"तुझ्या बाबांना मामाच्या हॉस्पिटलमध्ये नेलं होतं."
"आणि..." एका विचित्र शंकेने विकासच्या छातीतली धडधड वाढली. मुद्दाम चुकीचे उपचार केले असतील मामाने?
"त्याने मला जमणार नाही म्हणून सांगितलं."
"काय? काय जमणार नव्हतं?" विकासचा स्वर रडवेला झाला.
"उपचार करणं. नात्यातल्या लोकांवर उपचार करायचे तर मन एकाग्र करता येत नाही म्हणाला."
"मग?"
"मग काय? गावातलं एकमेव हॉस्पिटल ते. वाटलं होतं, जीवावर बेतलं की माणूस हेवेदावे विसरतो, माणुसकी जागी होते. तुझा मामा नाही म्हणाल्यावर सरकारी दवाखान्यात दाखल करायचं ठरवत होतो. पण दया आली असावी शेवटी बहिणीची. शिकाऊ डॉक्टरला बोलावतो आणि घेतो दाखल करून असं म्हणाला."
"म्हणजे बाबा तिथेच राहिले तर. पण मग गेले कसे?"
"निर्णय घ्यायला उशीर केला रे तुझ्या मामाने. हो नाही करत तयार झाला तोपर्यंत दुसरा, तिसरा एकामागून एक लागोपाठ झटके आले. उपाय सुरू व्हायच्या अगोदरच गेला नरेश सोडून." सुमतीचे डोळे अश्रूंनी डबडबले.
"मी कधी हे तुम्हा दोघांनाही सांगितलं नव्हतं कारण मला तुमचं मामाबद्दलचं मत कलुषित नव्हतं करायचं. पण आज कविताने तू त्याला भेटायला गेलास हे सांगितलं आणि गेल्या काही वर्ष, दोन वर्षातल्या तुझ्या विक्षिप्त वागण्याचं कोडं उलगडल्यासारखं वाटलं. तुझे बाबा खूप हुशार होते, मुख्य म्हणजे माणूस होते. माझ्या भावाचं माणूसपण पैसा, मान अपमान, जात, श्रीमंती या दिखाऊ गोष्टींच्या आत गाडलं गेलं आहे. तू माणूस बन. पैसा कसाही येतोच रे. मी नाही मोठं केलं तुम्हा दोघांना? चैनीत नाही पण तुझी आणि मामाची गाठ पडेपर्यंत सुखात राहिलोच ना आपण? नोकरी मिळेल. नोकरी का मिळत नाही, व्यवसाय का करता येत नाही याची तुझ्या दृष्टीने शोधून काढलेली कारणं चुकीची आहेत विकास. आणि त्याचा राग माझ्यावर शिवीगाळ करून काढणं... आपल्या घरात शोभत नाही ही भाषा. कुठे शिकलास ते नाही विचारायचं मला. विसरून जा ते सारं आणि माणसात ये."
"आई, तुझं सगळं बोलणं ऐकलं मी दाराआडून. म्हणजे तुझ्याशी बोलल्यावर इतकी बेचैन होतीस ना, घरी नीट पोचशील की नाही अशी काळजी वाटायला लागली. मी तुझ्या मागूनच आले जवळजवळ. पण दारातच तुमची वादावादी ऐकली आणि थांबले जिन्यापाशी." कविता आत येत म्हणाली,
"बरं झालं तूही ऐकलंस. वेळ पाहून बोलायचं होतंच मला. आता तुमची वयं जाणती आहेत. कळायला हव्याच होत्या या गोष्टी कधी ना कधी."
"विकासला काय वाटलं ठाऊक नाही पण मी एक निश्चय केला आहे."
सुमतीने प्रश्नचिन्हांकित चेहर्याने तिच्याकडे पाहिलं.
"आपल्या घरात कधीही आपण जात या विषयावर बोललो नाही. पण घराबाहेर तुझ्या आणि बाबांच्या जातीवरून किती ऐकलं आम्ही. एकाच गावात राहून आपण मामाकडे का जात नाही या प्रश्नालाही पटत नाही म्हणून असंच तू सांगितलं होतंस. पण हळूहळू बाहेरुनच कळत गेलं गं सगळं आम्हाला. कुणी ना कुणी काहीही बोलायचं, प्रेम करणं म्हणजे चोरी असाच समज होत गेला आमचा. खिजवल्यासारखं वाटायचं तुमच्या दोघांबद्दल ऐकताना. त्यात तुम्ही पळून जाऊन लग्न केलंत हे तर तिखट मीठ लावून अजूनही लोकं सांगतात. यात शेजारपाजारचे, तुमचे मित्र, मैत्रिणीही आहेत आई. कधीतरी तूच मोकळेपणाने सांगितलं असतंस ना तर नीट समजून घेतलं असतं. मनातला गोंधळ वाढत गेला. आम्हाला दोघांनाही तुमच्याशी या विषयावर बोलावंसं वाटायचं, पण लाज वाटायची. बाबा गेल्यावर मी आपोआप मोठी झाले. परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकले. विकास मात्र बहकला, परिस्थितीशी भांडण करत करता तो तुझ्याशीच भांडायला लागला, त्याच्यादृष्टीने या परिस्थितीला जबाबदार तू आणि बाबा होता, बाबा हे जगच सोडून गेले. राहिलीस तू. तुझ्यावर तो आगपाखड करत राहिला. मामाने त्यात भर घातली आणि दादाने वैर पत्करलं तुझ्याशी. बहिणीने आपलं मानलं नाही, जाती बाहेर लग्न केलं याचा राग किती वर्ष ठेवला गं मामाने. का वागला तो असं? बाबांना नेलंच कायमचं, विकासलाही जिवंत मरण देऊ पाहत होती ही जात... आई, मी ठरवलं आहे यापुढे मी फक्त नाव लावणार, जात कळणारी आडनावं हवीत कशाला? पुढे काय होईल ठाऊक नाही. पण मला सुरुवात तर करू दे."
सुमती आणि विकास दोघंही दारात उभ्या राहून बोलणार्या कविताकडे पाहत होते. वीस वर्षापूर्वी जातीबाहेरच्या मुलाशी लग्न करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा नव्हता हे आज आयुष्यांची इतकं वळणं, अडथळे पार करून आल्यावर पुन्हा एकदा सुमतीला जाणवलं. पाणावलेल्या नजरेने तिने विकासकडे पाहिलं. डोळे पुसत विकास कविताच्या बाजूला जाऊन उभा राहिला. मनातलं मळभ दूर झालं होतं. कविताच्या हातात हात गुंतवून पहिल्यांदाच अतीव प्रेमाने, मोकळ्या मनाने दोघंही आईच्या मिठीत सामावून जाण्यासाठी सुमतीच्या दिशेने पुढे झाले.
(पूर्वप्रसिद्धी -आनंदऋतू जात प्रबोधन विशेषांक)
,
,
आवडली. अधिक खुलवता आली असती
आवडली.
अधिक खुलवता आली असती असे वाटते.
खरच छान आहे कथा.
खरच छान आहे कथा.
मामा ला खरे च राग असता तर
मामा ला खरे च राग असता तर भाच्या ला पटवण्याचा कशाला प्रयत्न करत बसला असता.
उगाचच काही तरी ओढुन ताणुन.
सर्वांना धन्यवाद. टोचा - मामा
सर्वांना धन्यवाद.
टोचा - मामा भाच्याला भेटतो ते बहिणीच्या नकळत. आणि तो फक्त आई आणि मुलाच्या नातेसंबधात कटुता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे.
छान लिहीली आहे कथा ..
छान लिहीली आहे कथा ..
सशल +1'
सशल +1'
सशल आणि जाई, धन्यवाद.
सशल आणि जाई, धन्यवाद.