परवा अचानकच फळांच्या दुकानात दोन तुतीचे बॉक्स दिसले आणि मी एकदमच खुष झालो. मध्यंतरी महाबळेश्वरला खाल्ल्या होत्या, पण एकुणच नाजूक फळ आणि त्यामानाने नॉन-ग्लॅमरस, त्यामुळे स्ट्राबेरीसारखे सहजपणे मिळत नाही. त्या तुती अचानकच मिळाल्याने हरखूनच गेलो आणि उड्या मारतच लहानपणीच्या तुतीच्या झाडांवर पोहोचलो.
९-१० वर्षांचा होतो तेंव्हाची गोष्ट आहे…आम्ही रहायचो आणि त्यानंतर २-३ घरे सोडून उपाध्यांचा बंगला होता…मला वाटते ते तेंव्हा गाणे आणि violin शिकवायचे. त्यांची मुलगी (उज्ज्वला की उर्मिला ताई, आता नक्की नाव आठवत नाही) खूप छान गायची आणि त्यांच्या घराजवळून गेलो तरी ते सुरेल सूर ऐकू येत्…अर्थातच गाणे कळण्याचे ते वय नव्हते पण जे ऐकायचो ते छान वाटायचे. अर्थातच आमचे main attraction त्या घरामागे मोठ्ठे वाढलेले तुतीचे झाड होते. त्यांच्या घरामागच्या गॅरेजवर चढलो की मग आरामात तुती तोडून खाता यायच्या. पण एक अडचण होती…मला वाटते त्या गॅरेजचे छत पत्र्याचे होते आणि तिथे पालापाचोळाही खूप असायचा, त्यामुळे मग आवाजही बराच व्हायचा…आणि तसे ते लोकं एरवी सुरेल असले तरी रागावायचे आणि ओरडायचे बेसुरच! तरीही असा थोडाबहुत आरडाओरडा सहन करून मोठ्या प्रयत्नांनी त्या गॅरेजवर चढून आम्ही त्या तुतींवर ताव मारायचो…अचानकच दुकानात त्या तुती बघितल्यावर ती लहानपणीची झाडावरच्या तुतींची चव तोंडात आली.
मग तसेच ते ‘वेड्या आंब्याचे’ झाड आठवले. घरापासून जवळच मला वाटते अभ्यंकरांच्या बंगल्यात ते झाड होते. गम्मत म्हणजे ते झाड अगदीच लहान म्हणजे जेमतेम ४-५ फुटांचे असेल, पण नेहमी मोठ्ठाल्या कैर्यांनी लगडलेले असायचे…आम्ही चिल्ले-पिल्ले असलो तरी आमचा हात सहजच पोहोचायचा त्यामुळे आमचे त्या झाडावर विशेष प्रेम होते. त्या बागेला एक तारेचे कुंपण होते, पण तो काही फारसा प्रॉब्लेम नव्हता…खरा प्रॉब्लेम होता की ते घर बाकी बर्याच घरांच्या मध्येच असल्यामुळे काहीही करायला गेलो की लगेच सगळ्यांना दिसायचे…अर्थात आम्हीही मांजरांच्या पायांनी काम करायला शिकलो होतो. असेच एका दिवशी मी आणि माझा मित्र केदार आम्ही दोघांनी कैर्या तोडायच्या ठरवल्या – पण एक दुसरीच डोकेदुखी होती. केदारचा छोटा भाऊ कपिल हा जाऊन सारखी त्याच्या आईला चुगली करायचा…त्यात केदारची आई माझी टीचर, त्यामुळे ती भीती होतीच. कपिलला गुंगारा द्यायचा बराच प्रयत्न केला, पण तो सावलीसारखा आमच्या मागेच होता..शेवटी बरेच काऊन्सेलिंग करुन त्याला पटवला (काऊन्सेलिंगची खोडही तशी जुनीच!). त्यानेही आईला दादाने कैर्या तोडल्या हे सांगणार नाही अशी शपथ घेतली. तेंव्हा आम्ही शपथ वगैरे गोष्टी भयंकर सिरीयसली घ्यायचो…. त्यामुळे आम्ही जरा निर्धास्त झालो. मांजरीच्याच चपळाईने आणि दबल्या पावलांनी आम्ही आम्हाला हव्या तेवढ्या कैर्या तोडल्या आणि हळूच तारेच कुंपण ओलांडून आलो. मला वाटते तिथेच जवळच कुठेतरी बसून त्या कैर्या खाल्ल्या आणि मग मी, केदार आणि कपिल अगदी साळसूदपणे केदारच्या घरी गेलो. थोडी धाकधूक होतीच…पण काही मिनिटे शांततेत गेल्यावर आम्ही जरा रिलॅक्स झालो. तेवढ्यात कपिलला काय हुक्की आली काय माहीत, अगदी निरागसपणे ‘आई दादानी नै कैर्या तोडल्या काई, मनिष दादाने पण नै तोडल्या!’ असे बोलून आमच्याकडे बघू लागला. आता ह्याला हे तरी पचकायची काय गरज होती? पण झाले….त्यांची आई बोलुन-चालून आमची टीचर, तिने व्यवस्थित आमचा ‘क्लास’ घेतला. अर्थातच दुसर्या दिवशी आम्हीही सविस्तर कपिल बाळाचा क्लास घेतला. तो लहान असल्यामुळे अर्थातच त्याला जास्त ‘समजावून’ सांगायची गरज होती, त्यामुळे त्याच्याबरोबरचा आमचा ‘क्लास’ जरा लांबलाच….तो कार्टासुद्धा ‘अरे, पण मी दादांनी नाही तोडल्या’ असेच सांगितले ना आईला, असे म्हणत वाद घालत राहिला…असो! तो अजुनही कोणी काय ‘नाही केले’ हेच सांगत बसतो का ह्याची मला उगाचच कधीकधी काळजी वाटत राहते…
तशीच एक संत्र्याचीही फार जुनी आठवण आली. मला खरंतर अंधुकसेच आठवते आहे…मी चार-एक वर्षाचा असेल. आम्ही तेंव्हा विदर्भात अमरावती जवळच्या एका लहान गावात राहत होतो. बाबा बँकेत मॅनेजर होते आणि गावात बहुतेक लोकं त्यांना आणि पर्यायाने आम्हालाही ओळखायचे. माझ्याबरोबर खेळायला आणि मला सांभाळायला एक थोडा मोठा मुलगा यायचा….तो मला फिरायलाही घेऊन जायचा. एके दिवशी असेच आम्ही खूप लांबवर फिरायला गेलो आणि तिथे संत्र्याच्या बागा होत्या. मला वाटते त्याने मला विचारले की संत्री हवीत का? मी कशाला नाही म्हणतोय? तसेही आपले-दुसर्याचे कळायचे नाही मला त्या वयात. शिवाय फळे म्हणजे जीव-की-प्राण…त्यातुन झाडावरची संत्री मिळतात म्हटल्यावर मी एकदम खुषीत. आम्ही बरीच संत्री खाल्ली आणि जवळजवळ एक पिशवी भरून घरी घेऊन आलो….संध्याकाळी तो बागवाला शेतकरी आला बाबांकडे तक्रार घेऊन…तुमच्या मुलानी खूप संत्री तोडली म्हणून. बाबांनी बहुतेक त्याला संत्र्यांचे पैसे दिले असावेत, त्यांनी मला मारल्याचे काही मला आठवत नाही. आई-बाबा रागावले ओरडले असतील बहुतेक….पण तेही काही आठवत नाही. आठवणी खरच कुठून कुठे घेऊन जातात…तुतीपासून संत्र्यांपर्यंत, शेकडो मैल दूर असलेल्या एका गावातून दुसर्या गावात एका निमिषार्धात ….मग ह्या संत्र्यांच्या आठवणींबरोबरच त्या गावातल्या आणखी कितीतरी आठवणी आल्या…माझे वय तेंव्हा ३-४ किंवा फार-फार तर ५ वर्षे असेल. आणि ह्या सगळ्या माझ्याच आठवणी आहेत…आई-वडिलांनी सांगितलेल्या नाहीत. असो! त्या गावाचे किस्से पुन्हा कधीतरी….
सध्या एका उपनगरातल्या छोट्या प्लॅटमधे राहतो…हपापलेल्या बिल्डर्सनी पोसलेल्या ह्या सिमेंट्च्या जंगलात फळांची झाडे फारशी दिसतही नाही. माझ्या पिल्लाकडे अशा झाडांच्या, फळांच्या रसदार आठवणी असतील का हा प्रश्न अधून-मधून सतावत राहतो. महाबळेश्वरला स्ट्रॉबेरी महोत्सवात त्या झुडुपांतुन स्ट्रॉबेरी तोडतांना फुललेला त्याचा चेहरा कधी विसरता येणार नाही. पण परवाच एक गंमत झाली. आमच्या ह्या प्लॅटस पासून जवळच काही बंगल्यांची सोसायटी आहे, मिश्तू हिच्याबरोबर तिथे फिरायला गेला होता आणि हा तिथल्याच एका बंगल्यातील कैरीच्या झाडाकडे भान हरपून पाहत होता…त्या बंगल्यातल्या आज्जी भलत्याच प्रेमळ निघाल्या, त्यांनी ह्या दोघांनाही घरात बोलावले आणि आमच्या पिल्लाने गच्चीवरून मनसोक्त कैर्या तोडल्या. निदान ३-४ किलो तरी कैर्या घरी घेऊन आला….आणि त्याचा चेहरा पौर्णिमेच्या चंद्रासारखा हाऽऽऽऽऽ असा फुललेला! आणि अर्थातच त्याला बघून आमचाही!
फार काळजी करायची कारण नाही, झाडांवर प्रेम करणार्या माणसांना प्रेम करणारी झाडे मिळतातच की!
छान आहे लेख !!!
छान आहे लेख !!!
मजा आली वाचताना. लहानपणचे
मजा आली वाचताना. लहानपणचे काही किस्से न विसरता येण्यासारखे असतात. त्यात तितकीच गोडी असते जेव्हा कधीही स्मृती चाळली की.
खास करून कैर्या पाडणे, तूती वगैरे गोष्टी. माझी पण लहानपणची तूतीची अशीच एक आठवण आहे ती आठवली. आईने घेतलेल बौद्धिक आठवले. तूती खूपच खास आहे बहुधा लहानपणीच्या आठवणीत.
मस्त लेख.. फळे झाडावरून तोडून
मस्त लेख.. फळे झाडावरून तोडून खाण्यात अनोखी मजा असते.
व्वा. मस्त लेखन..
व्वा. मस्त लेखन..
मस्त आहे लेख. हपापलेल्या
मस्त आहे लेख.
हपापलेल्या बिल्डर्सनी पोसलेल्या ह्या सिमेंट्च्या जंगलात फळांची झाडे फारशी दिसतही नाही. माझ्या पिल्लाकडे अशा झाडांच्या, फळांच्या रसदार आठवणी असतील का हा प्रश्न अधून-मधून सतावत राहतो.>> पूर्ण अनुमोदन. फळांची सोडा, वड पिंपळ सारखी झाडे सुद्धा तोडली जातात.
मस्त रसाळ आठवणी!
मस्त रसाळ आठवणी!
खूप सुंदर लिहिलंय. लिहिलंय
खूप सुंदर लिहिलंय. लिहिलंय म्हणण्यापेक्षा तुम्ही स्वतःशीच ह्या आठवणी उजळवताय पण त्या आम्हाला दिसतायत, ऐकू येतायत
manishh मस्त लेख. तुम्हि
manishh मस्त लेख. तुम्हि सहकार नगर नम्बर २ मध्ये रहात होता का? उपाध्यांचा बंगला आणि अभ्यंकरांच्या बंगल्या बद्द्ल वाचुन तसे वाटले.
हो. तिथेच रहायचो! बाकी
हो. तिथेच रहायचो!
बाकी 'विचारपुस' मधे लिहितो!
मस्त
मस्त
मस्त !
मस्त !
तुमच्या आठवणी वाचून मला पण
तुमच्या आठवणी वाचून मला पण तुतीची आठवण आली. शाळेपाशी मैत्रीण राहत होती . तिच्या दारात तुतीची झाड होते . आम्हीही खूप तुती तोडून खायचो . पण तिच्या घरचे कधीच रागावले नाहीत. कोणालाच . पेरू , कोकम पण खूप खाल्लेत तोडून.
खूप गोड लेख शेवट खूप
खूप गोड लेख
शेवट खूप आवडला.
अश्या प्रकारचे पर्यटन
अश्या प्रकारचे पर्यटन आपल्याकडे व्हायला पाहिजे. माझ्या आठवणीत बडोद्याला अशी पेरुची बाग होती. तिथे बागेत खाऊ तेवढे पेरु फुकट पण बाहेर न्यायचे असतील तर त्याचे पैसे द्यावे लागत. ( चार आणे रत्तल.. हो हाच भाव होता. )
ऑकलंडला पण पिक यूअर ओन टोमॅटोज / स्ट्रॉबेरीज अश्या पाट्या बघितल्या.
आपल्याकडे कितपत शिस्त पाळली जाईल.. ?
महाबळेश्वरला मॅप्रो गार्डनला
महाबळेश्वरला मॅप्रो गार्डनला स्ट्रॉबेरी फेस्टीव्हल असते, तेंव्हा असे करू देतात. पण इतरत्र माहित नाही. पुण्या जवळ काही ठिकानी कृषी-पर्यटन आहे, पण त्याचा मला तरी काही अनुभव नाही.
मस्त आठवणी घरासमोरच तुतीचे
मस्त आठवणी
घरासमोरच तुतीचे झाड होते. काळ्या तुती गोड लागतात पण त्या लालच्या काळ्या होईपर्यंत थांबणार कोण ? आधी आंबटढाण लाल, अर्धवट लालकाळ्या आणि एखादीच पूर्ण पिकलेली काळी अशा तुतीच्या सगळ्या चवी आठवतायंत अजून. फळांइतक्याच तुतीवरच्या सुरवंटांच्याही आठवणी आहेत.
मी अडीच-तीन वर्षांची असताना आईला ह्या सुरवंटावरुन एकदा चांगलेच अडचणीत आणले होते तो तर क्लासिक किस्सा आहे. अजूनही त्याच्या आठवणी निघतात गप्पांत. अर्थातच तो इथे लिहिण्यासारखा नाही
अनघा, मी पण हाच प्रश्न
अनघा, मी पण हाच प्रश्न विचारणार होते. सहकारनगर-२ का? असा. पण उत्तर मिळाले. छान आठवण..
मस्त!
मस्त!
classic!
classic!
अनया तु पण सहकारनगर का?
अनया तु पण सहकारनगर का?
मस्त आठवणी. तुती म्हणजेच
मस्त आठवणी. तुती म्हणजेच ब्लॅकबेरीज का?
तुती, हिंदीमध्ये शतुत आणि
तुती, हिंदीमध्ये शतुत आणि इंग्रजीमध्ये बहूतेक मलबेरी.
https://www.google.co.in/search?q=shahtoot&tbm=isch&tbo=u&source=univ&sa...
गेल्या आठवड्यातच कॉलेजात झाडावरच्या तुती काढून पोराला मनसोक्त खाऊ दिल्या होत्या.
बरेच निघाले की सहकारनगर-२
बरेच निघाले की सहकारनगर-२ मधले!
तुती म्हणजे मलबेरी. ब्लॅकबेरी झुडुपांवर लागते तर तुती झाडांवर! असो. आवर्जुन प्रतिसाद देणार्या सर्वांचेच आभार.
छान लिहिलेय
छान लिहिलेय
खूप छान लिहिलंय. मला वाटत
खूप छान लिहिलंय. मला वाटत सगळ्यांनाच आपल्या लहानपणच्या आठवणी आल्या असतील
manishh, सुंदर लेख आहे. शेवट
manishh,
सुंदर लेख आहे. शेवट फारंच आवडला!
माझं बालपण ठाण्यात गेलं. जवळच येऊरचा डोंगर आहे. त्यावर करवंदाची चिक्कार जाळी आहे. तिथली करवंदं मनसोक्त खाल्लीत. मात्र तो बऱ्यापैकी हिंसक प्रकार आहे. काट्यांच्या जखमा व्हायच्या त्या आम्ही अंगावर पदकाप्रमाणे मिरवत असू.
आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद!
आ.न.,
-गा.पै.
मस्तं लेख! त्यानिमित्ताने
मस्तं लेख!
त्यानिमित्ताने तोडून खाल्लेल्या / झाडाखाली वेचलेल्याफळांची यादी केली -
कैर्या, आंबे, चिंचा, बोरं, केळी, सीताफळ- रामफळ, पपई, पपनीस, गोरख चिंच,
चिकू, नारळ(शहाळी), करवंद, हसाणी,बोकळं/ ओवळं, काजू, विलायती काजू/जाम, फणस,
सफरचंद(मनालीला).
अजूनही विचार केल्यास आठवतील.
मस्त लेख.
मस्त लेख.
खूप छान लिहिलंय! माझ्या
खूप छान लिहिलंय!
माझ्या पिल्लाकडे अशा झाडांच्या, फळांच्या रसदार आठवणी असतील का हा प्रश्न अधून-मधून सतावत राहतो. >>>>>>>
अगदी बरोब्बर! सगळ्या आईवडिलांना आपापल्या पिल्लांबद्दल असंच वाट्णार...कारण प्रत्येकाच्या बालपणीच्या आठवणी रम्य असतात आणि आपल्या पाल्याला मी हे सगळे आनंद देऊ शकेन ना....असं पिल्लावरच्या मायेपोटी वाट्तंच!
पण मनीष तुमचं पिल्लूही त्याच्या बालपणीच्या आठवणी अश्याच काढून आनंदित होईल पहा.....
मस्त! तुती हे फळ लहानपणी
मस्त!
तुती हे फळ लहानपणी मलाही फार आवडायचे. आम्हीही ते डायरेक्ट झाडावरुन तोडून खायचो. विकायला सहसा कुठे नसतंच. इतके तुतीप्रेमी पाहून छान वाटतंय.
कालच ब्लॅकबेरी आणली आहे (फळ..फोन नव्हे.) ती जरा तुतीसारखी दिसते हेच मुख्य आकर्षण!
Pages