परवा म्हणजेच २४ एप्रिल रोजी सायनला एक कार्यक्रम ऐकायला गेलो होतो. निमित्त होते 'दिनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार' वितरण. अर्थात आम्ही त्यानंतर आयोजित केलेले उस्ताद झाकीर हुसैन ह्यांचे तबला वादन ऐकायला म्हणून गेलो होतो. परंतु आधीचा पुरस्कार प्रदान सोहळा न बघता नुसते तबला वादन ऐकायचे असे करणे आम्हाला पुरस्कार मिळणाऱ्या दिग्गजांचा अपमान होईल असे वाटले आणि त्यामुळे बरोब्बर वेळेत पोहोचणे आम्ही चुकवले नाही.
पुरस्कार मिळणाऱ्या लोकांमध्ये अण्णा हजारे, ऋषी कपूर, उस्ताद झाकीर हुसैन, शिवाजी साटम, विश्वनाथ कराड, प्रकाश बाळ, डॉ. आनंद यादव, अनंत दिक्षित आणि इतरांचा समावेश होता. निवेदनाला सुधीर गाडगीळ होते हे मी सांगितलं नाही तरी चालेल. कार्यक्रमाची सुरुवात हृदयनाथ मंगेशकर ह्यांच्या भाषणाने झाली आणि आश्चर्य म्हणजे त्यांनी आपले भाषण लगेच संपवले! आणि पुढे गाडगीळ ह्यांनी सूत्र हातात घेतली. एकंदर सर्वांना पुरस्कार मिळाल्यानंतर 'थोडाच वेळ बोला' असे सुचित केले होते. कारण पुढे झाकीरभाई वाजवणार होते.
नेमके बोलणे आणि स्वतःवर योग्य वेळेस आवर घालणे हे श्रेष्ठत्वाचे लक्षण समजले जाते. ह्या निकषावर झाकीरभाईंनी बाजी मारली. मराठीत बोलून त्यांनी लता मंगेशकर आणि समस्त मंगेशकर परिवाराचे आभार मानले आणि दोन शब्द - thank you असं म्हणून हशा मिळवला. इतरांना मात्र ते विशेष जमले नाही आणि त्यांना थांबविण्यासाठी गाडगीळ सारखे पुढे येउन त्यांच्या बाजूला उभे राहत होते. परंतु काही वृध्द कलाकार असतात ज्यांना स्वतः बाबत सांगावेसे वाटू शकते. डॉ. आनंद यादव त्यांच्यापैकी. परंतु त्यांना थांबवून जेव्हा इतर लोकांना पुढे करण्यासाठी वेळ खर्च होऊ लागला तेव्हा मात्र एकंदर कार्यक्रमाबाबत चीडच उत्पन्न झाली.
ऋषी कपूरला पुरस्कार देताना कपूर घराण्याचे योगदान ह्याबद्दल भाष्य केले गेले. (सुधीर गाडगीळ ह्यांना हिंदीत बोलू नका असे ओरडून सांगावेसे वाटत होते. परंतु तो वेगळा विषय झाला!) इथपर्यंत ठीक. परंतु कपूर घराण्यची पुढची पिढी इथे उपस्थित आहे असे सांगून रणबीर कपूर, त्याची बहिण आणि ऋषी कपूरची बायको ह्या तिघांना व्यासपीठावर बोलावले गेले. रणबीर दिसल्यामुळे साहजिकच लोकं आणि विशेषतः मुली ओरडून दाद देऊ लागल्या! पुढे सारे काही सुरळीत सुरु असताना मध्येच एका दिग्गजाचे भाषण थांबवून पुढे पद्मिनी कोल्हापुरे ह्यांना व्यासपीठावर बोलावले गेले. त्यांच्या बरोबर शिवांगी आणि तेजस्विनी ह्या त्यांच्या बहिणींना देखील! ( त्यांची नावे त्या दिवशी माझ्यासकट बऱ्याच लोकांना प्रथमच कळली.) निमित्त होते स्टेज वर जाऊन लता मंगेशकर ह्यांचा आशीर्वाद घेणे! कशाला? पण कपूर घराणे झाले आणि आता कोल्हापुरे घराणे! लोकं मात्र अगदी मनापासून टाळ्या वाजवत होते.
मध्यंतर झाले. आणि पुढे पद्मिनी कोल्हापुरे हिने स्टेजचा ताबा घेतला. मराठीत बोलण्याचा दोन मिनिटांचा प्रयत्न अयशस्वी झाला आणि मग तिने हिंदीत भाषण सुरु केले. ( ह्याचा अर्थ हे जमले असे नाही…परंतु परिस्थिती थोडी बरी होती) मंगेशकर कुटुंबाची स्तुती करत करत बैजू नामक एका 'मंगेशकराच्या' अल्बमचे प्रकाशन झाकीरभाईंच्या हस्ते करण्यात आले. आणि अशाप्रकारे कार्यक्रमात तिसऱ्या घराण्यचा समावेश करण्यात आला. लोकं मात्र ' हा देखील गातो वाटतं… छान … ह्यांच्या अख्ख्या परिवारात गाणे आहे' वगेरे प्रतिक्रिया देताना दिसत होते. त्यात एक काकू अग्रेसर होत्या.
आणि नंतर आम्ही ज्या उद्देशाने गेलो होतो तो झाकीरभाईंच्या तबला सोलो पार पडला. नेहमीप्रमाणे उत्कृष्ट. ते स्वतः मध्ये एक तबल्याचे घराणे आहेत ह्याची पुन्हा एकदा साक्ष पटली! आणि नंतर स्टेजच्या मागे जाउन त्यांच्या बरोबर थोड्या गप्पा मारून आणि फोटो काढून आम्ही बाहेर पडलो. उषा मंगेशकर ह्यांनी एका मोबाईल वर फोटो काढणाऱ्याला 'तुमचा फोन घेऊन फेकून देईन' अशी धमकी देणे आणि दुसरीकडे झाकीरभाईंचे पुढे फ्लाईट पकडायची असून सुद्धा शांत स्वभावाने चाहत्यांशी गप्पा मारणे ह्या दोन विरोधी गोष्टी आठवून आम्ही हसत होतो.
पुढे साऱ्या कार्यक्रमाला दाद देणाऱ्या त्या काकू चालत होत्या. " काँग्रेसला कोण मत देईल. तिकडे घराणेशाही चालते… आपल्याला नाही द्यायचा देश एका घराण्याच्या हातात", असे ते शेजारी चालणाऱ्या दुसऱ्या काकूंना सांगत होते.
- आशय गुणे
माझे इतर लेख: http://www.relatingtheunrelated.blogspot.in/
माझे फेसबुक पान: https://www.facebook.com/pages/Aashay-Gunes-Blog/180236325384645?ref=hl
मस्तंय. पद्मिनी कोल्हापूरेपण
मस्तंय.
पद्मिनी कोल्हापूरेपण मंगेशकरांच्या नात्यातल्या घराण्याचीच आहे म्हणे.
आवडलं! आशय गुणे, बरेच
आवडलं!
आशय गुणे, बरेच दिवसांनी दिसलात?
आशयगुणे, नेहमीपेक्षा वेगळं
आशयगुणे, नेहमीपेक्षा वेगळं लिहिलंय. एकदा झाकीर हुसेन यांच्यावर नेहमीच्या शैलीत लिहा ना!
आ.न.,
-गा.पै.
छान
छान
वैताग येतो ह्या अतिरेकी
वैताग येतो ह्या अतिरेकी व्यक्तीपूजेचा आणि 'वेळ कमी आहे' हे माहीत असतानाही बोअर करत बसणार्यांचा!
आवडले. मस्त.
आवडले. मस्त.
मस्त लिहिले आहे! हा पुरस्कार
मस्त लिहिले आहे!
हा पुरस्कार दरवर्षी अशाच कोणत्यातरी कारणांनी 'गाजतो'.
जाउद्या, आपण आपले 'कोई उम्मीद बर नहीं आती' लावावे, आणि डोळे मिटून घ्यावे.
साती, धन्यवाद! हो नातेवाईक
साती, धन्यवाद! हो नातेवाईक आहेत.
वत्सला, धन्यवाद! हो, खूप दिवसांनी काहीतरी लिहिलं गेलं! वेळ कमी पडतोय नोकरीमुळे!
गामा_पैलवान, धन्यवाद! जरूर! पण कसंय … इतकं लिहिण्यासारखं आहे की किती लिहावं ह्याबद्दल निश्चिती होत नाही.
सुजा, धन्यवाद!
बेफिकीर, हो! पण हा आपल्यातला स्वभाव आहे आणि तो इतक्या लगेच जाणार नाही!
डेलिया, धन्यवाद!
आगाऊ, धन्यवाद! हो, दरवर्षी कुणाकडून तरी टीका ऐकली जायची. ह्या वेळेस अनुभवलं - अर्थात झाकीरभाई होतेच सारे काही neutralize करायला!
लेख आवडला. गुगल आज भारतात
लेख आवडला.
गुगल आज भारतात अल्लारखां साहेबांचा वाढदिवस साजरा करतंय. डूडल आवडलं
https://www.google.co.in/
हो! ते पाहून आनंद झाला!
हो! ते पाहून आनंद झाला!