" सर, मी अश्विन खन्ना बोलतोय. मला माझ्या पुतण्यासाठी आपली वेळ हवी आहे. त्याला तुमचा आजचा शेवटचा पेशंट समजून किती वाजता आणू ते सांगा. माझा पुतण्या अमित तेरा वर्षांचा आहे पण गेले काही दिवस त्याची तब्बेत बरी नाही. एकदा आपल्या अनुभवी नजरेने त्याला तपासले तर आम्हाला आनंद होईल". खन्ना कुटुंबीय गेले तीस वर्षांपासून छोट्या मोठ्या दुखण्यांसाठी माझ्या क्लिनिकमध्ये येत असत. बरा झालेला एखादा रुग्ण नेहेमीच अनेक इतर रुग्णांना शिफारस करीत असतो. असा रुग्ण म्हणजे जणू 'जिवंत जाहिरातच ' असे म्हटले तर वावगे होणार नाही.
रात्री दहाच्या सुमारास खन्ना कुटुंबीय अमितला घेवून माझ्यासमोर बसले होते. त्याचे बाबा मला सांगत होते, "अमित सध्या आठवीमध्ये शिकत आहे. पण गेले काही दिवस त्याची तब्बेत नीट राहत नाही. तो भरपूर जेवतो पण ते त्याच्या अंगी लागत नाही. उलट त्याचे वजन दिवसेंदिवस कमीच होत चालले आहे. शरीरावरील चरबी अगदी विरघळून गेली आहे. कपडे सैल होत आहेत. एकसारखा पाणी पीत असतो आणि तितक्याच वेळी लघवीला पळत असतो. अलीकडे तर रात्रीतून देखील दोनतीन वेळा लघवीसाठी उठत असतो. गेले दोनतीन दिवस तर पित्त झाल्यामुळे किंवा काय पण पाचसहा उलट्या देखील केल्या त्याने! आम्हाला तर काय करावे काहीच सुचेनासे झाले आहे आणि म्हणून आपल्याकडे आलो आहोत.”
बाबांच्या बोलण्यातून त्यांना वाटणारी काळजी स्पष्ट दिसत होती. अमितच्या तक्रारी ऐकून त्याला 'ज्युव्हेनाईल डायबेटीस' अर्थात ‘बालमधुमेह’ झाला असल्याचा संशय माझ्या मनात चमकून गेला होता. तेवढ्यातच माझा मदतनीस अमितच्या लघवीच्या नमुन्यामध्ये तपासणीसाठी बुडवलेली 'मल्टीस्टीक्स' नावाची पट्टी घेवून आत आला. लघवीमध्ये झटपट दहा प्रकारच्या तपासण्या करणाऱ्या या पट्टीमध्ये अमितच्या लघवीमध्ये भरपूर म्हणजे 'फोर प्लस ++++' इतकी साखर असल्याचे स्पष्ट दिसत होते. अमितच्या सुदैवाने लघवीमध्ये केटोन म्हणजेच असिटोनचे प्रमाण मात्र वाढलेले नव्हते.
एव्हांना अमित तपासणीच्या खोलीमध्ये झोपला होता. त्याच्या शारीरिक तपासणीमध्ये वजन कमी झाल्याच्या खुणा दिसत होत्या. मात्र इतर काही दोष आढळला नव्हता. एकंदरीतच त्याच्या शरीरयष्टीकडे पाहून बालमधुमेहाचे तत्काळ निदान होवू शकेल असे जणू पुस्तकी चित्रच दिसत होते.
अमितची तपासणी संपवून मी अमितच्या बाबांशी व खन्ना कुटुंबियांशी बोलत होतो, " आपल्या अमितच्या रक्तातील साखर वाढली आहे असे त्याची लघवीच्या तपासणीवरून दिसत आहे. त्याच्या रक्तामधील साखर तपासली पाहिजे व त्यासाठी त्याच्या बोटाला एक सुई टोचून थेंबभर रक्त काढून ग्लुकोमीटर या तळहातावर मावू शकेल एवढ्या छोट्या यंत्राने तपासावे लागेल. या छोट्या यंत्रामध्ये ही एक रक्तामधील साखर तपासण्याची पट्टी घालून ते यंत्र चालू करू. ”
तोपर्यंत माझ्या मदतनीसाने अमितच्या बोटाला टोचून थेंबभर रक्त काढून तो थेंब त्या पट्टीवर लावला. पाचच सेकंदामध्ये ग्लुकोमीटरच्या स्क्रीनवर साखरेचे प्रमाण दिसले, ‘४५० मीलीग्रॅम /१०० मी.ली.’.
"हे पहा, अमितच्या रक्तामधील साखरेचे प्रमाण खूपच वाढलेले आहे. आपल्या रक्तामधील साखरेची पातळी सर्व साधारणपणे १०० पर्यंत असते. जेवण झाल्यानंतर ही पातळी १६० पर्यंत वाढते. पचन होवून जेवणामधील साखर रक्तामध्ये गेल्यामुळे ही पातळी वाढते. रक्तामधील साखर संपूर्ण शरीरामधील इतर पेशींपर्यंत पोहोंचविण्याचे काम 'इन्शुलीन' नावाचे हार्मोन करते. हे इन्शुलीन आपल्या पोटातील स्वादुपिंड अर्थात पॅन्क्रीयाज् नावाची ग्रंथी तयार करते. काही कारणांमुळे स्वादुपिंडामध्ये तयार होणाऱ्या इन्शुलीनचे प्रमाण कमी झाल्यास अथवा इन्शुलिनची कार्य क्षमता कमी झाल्यास रक्तामधील साखर पेशींपर्यंत पोहोंचू शकत नाही व ती रक्तामध्येच साचून राहते. त्यामुळे रक्तामधील साखरेचे प्रमाण खूपच वाढते.
रक्तामधील साखरेचे प्रमाण १६० पेक्षा जास्त वाढल्यास ही साखर लघवीवाटे शरीराबाहेर सोडली जाते. एरवी आपल्या लघवीमध्ये साखर मुळीच नसते. म्हणूनच लघवीमध्ये साखर असल्यास व रक्तामधील साखर वाढलेली असल्यास रुग्णाला मधुमेह अथवा डायबेटीस झाला आहे असे निदान केले जाते. मूत्रपिंडांमध्ये आपले रक्त सतत गाळून शुद्ध असते व अशुद्ध पदार्थ गाळले जावून मुत्र तयार होते. शरीराला आवश्यक असे घटक गाळून झाल्यानंतर पुन्हा रक्तात शोषले जातात. साखर हा आवश्यक घटक असल्यामुळे पुन्हा शोषला जातो व म्हणून आपल्या लघवीमध्ये साखर सापडत नाही. परंतु मूत्रपिंडांच्या शोषणक्षमतेपेक्षा जास्त साखर असल्यास ती पुन्हा शोषली जात नाही व मग ती लघवीवाटे शरीराबाहेर येते. अशी साखर आपल्याबरोबर पाण्याला देखील बाहेर ओढते आणि त्यामुळे लघवीचे प्रमाण वाढते, वारंवार लाघवी होते. एरवी रात्री न उठणारी व्यक्ती रक्तामध्ये साखर वाढल्यास रात्री अनेक वेळा लघवीसाठी उठू लागते. लघवीमध्ये साखर असल्यास लघवीचे प्रमाण वाढते व त्यामुळे जास्त तहान लागते. रक्तामध्ये साखर जरी जास्त प्रमाणात असली तरी ती पेशीपर्यंत पोहोंचत नाही. बाहेर सुबत्ता पण आत मात्र दुष्काळ अशी परिस्थिती होते ! पेशींना नेहेमीप्रमाणे कार्य करण्यासाठी आवश्यक असा उर्जास्त्रोत म्हणजे ग्लुकोज कमी पडल्यामुळे पेशींचे कार्य मंदावते. मोटारच्या इंधनवाहक नळीमध्ये अडथळा आल्यानंतर ज्याप्रमाणे तिची कार्यक्षमता कमी होते त्याप्रमाणेच मधुमेही व्यक्तीही लवकर दमतात. एखाद्या झाडाला पाणी न मिळाल्यास ते जसे कोमेजते त्याच प्रमाणे मधुमेही रुग्ण मलूल होतात. रुग्णाच्या पेशींना साखरेचा पुरवठा कमी झाल्याने शरीरास अन्न कमी पडते आहे असा अर्थ काढून इतर पेशींमधील आपत्कालासाठी साठविलेली साखर पुन्हा रक्तामध्ये सोडली जाते. शरीरामधील उर्जेचा उत्तम उत्तम साठा म्हणजे चरबीच्या पेशी ! या पेशी म्हणजे शरीरातील चरबीचे विघटन होवून साखर तयार होते व आधीच वाढलेली रक्तातील साखर आणखी जास्त वाढते आणि लघवीवाटे शरीराबाहेर जाते, व त्यामुळे रुग्णाचे वजन कमी होते. डायबेटीस या इंग्रजी शब्दाचा चपखल अर्थ आहे 'मनुष्य विरघळणे'! अमितच्या बाबतीत नेमके हेच सर्व घडले होते.
"अमितच्या सर्व तक्रारी कशा निर्माण झाल्या आहेत हे आता तुमच्या लक्ष्यात आले असेलच. उद्या सकाळी काही नवीन तपासण्या करून या आजाराविषयी आणखी माहिती मिळवावी लागेल."
खन्ना कुटुंबीयांवर हा असा बिकट प्रसंग ओढवल्यामुळे ते सर्वजण स्तंभित झाले होते. यातून थोडे सावरल्यानंतर त्यांनी माझ्यावर अनेक प्रश्नांचा जणू भडीमारच केला. ते केवळ स्वाभाविकच होते. आपल्या एकुलत्या मुलाला असा आजार असल्याचे कळाल्यामुळे सर्वांचे चेहेरे रडवेले झाले होते. प्राथमिक धक्क्यातून थोडेसे सावरल्यानंतर त्यंनी विचारलेल्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे देण्याचे कठीण काम माझ्यावर आले होते.
"उद्याच्या तपासणीमध्ये अमितच्या स्वादुपिंडाविषयी आणखी माहिती जमा करावी लागेल. या ग्रंथीमध्ये सूज आहे अथवा तिच्यामध्ये कॅल्शियमचे खडे झाले आहेत की काय हे पाहावे लागेल. तसेच अमितच्या शरीरामध्ये इन्शुलिनचे प्रमाण किती आहे तेही मोजून पाहावे लागेल. रक्तामधील हेमोग्लोबिन मधील 'ए1सी' या उपघटकाचे प्रमाण मोजून गेल्या तीन महिन्यांमध्ये रक्तामधील साखरेचे सरासरी प्रमाण किती होते ते समजू शकेल."
दुसऱ्या दिवशी रात्री अमित व त्याचे आई-बाबा सर्व रिपोर्ट्स घेवून पुन्हा आले होते. सौ. खन्नांचे डोळे रात्रभर न झोपल्यामुळे व रडल्यामुळे चांगलेच सुजलेले दिसत होते. सर्व तपासण्यांवरून अमितला बाल मधुमेह असल्याचे स्पष्ट झाले होते.
"अमितच्या या आजारासाठी त्याला रोज तीन वेळा इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागणार आहे. त्यामुळे त्याच्या सर्व तक्रारी दूर तर होतीलच पण त्याच्या शरीराची वाढही नेहेमीप्रमाणे होईल. इन्शुलिनचे प्रमाण ठरविण्यासाठी त्याची रक्तातील साखर वारंवार तपासावी लागेल. त्याला स्वतःलाच इंजेक्शन घेणे, ग्लुकोमिटरच्या सहाय्याने रक्त तपासणे या सर्व क्रिया शिकाव्या लागतील. एका डायरीमध्ये रोज नोंदी करून मला नियमितपणे भेटावे लागेल. सुरुवातीला हे सर्व थोडेसे अवघड जाणार आहे पण हळूहळू त्याची सवय होईल. माझे मदतनीस तुम्हाला लागणारी सर्व मदत करतीलच."
त्यादिवशी घरी परत जाताना गेल्या पस्तीस वर्षांमध्ये मधुमेहाच्या उपचारांमध्ये झालेले बदल व प्रगती माझ्या डोळ्यांपुढून सरकत होती. असाच एक प्रसंग पुन्हा आठवला. ते साल होते १९७८. मी नुकतीच खाजगी व्यवसायाला सुरुवात केली होती तेंव्हाची ही गोष्ट.
माझे सह्व्यावासायिक व जिवलग मित्र डॉ. विनोद शहा व मी आपापल्या रुग्णांविषयी एकमेकांशी सल्लामसलत करीत असू. मी आठवड्यातून एकदा कोपरगावास तर विनोद महाड येथे भेट देवून तेथील रुग्णांना तपासत असू. त्यामुळे तेथील काही गरजू रुग्ण जरूर पडल्यास पुण्यात येवून आमच्या सल्ल्यानुसार पुढील तपासण्या व उपचार करून घेत असत.
सुमारे पंधरा वर्षे वयाचा अमोल नावाचा एक रुग्ण महाडहून त्याच्या डॉक्टर भावाबरोबर सायंकाळी सहा वाजता डॉ. विनोदच्या क्लिनिकमध्ये आला होता. त्याच्या पोटात खूपच दुखत होते. विनोदने त्याला तपासले. अमोलच्या पोट तपासणीमध्ये निश्चित असे निदान होत नव्हते. पोट सर्वच भागात दुखत होते. पण अमोलचे ब्लड प्रेशर मात्र होते केवळ साठ सिस्टॅालीक ! नेहेमीचे ब्लड प्रेशर असते १२० बाय ८० ! त्याच्या मानाने हे खूपच कमी होते. वैद्यकीय परिभाषेमध्ये अमोल शॉकमध्ये होता. या पेशंटला तांतडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करून व इतर तपासण्या करून उपचार करण्याची गरज होती. शरीरामधील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे ‘बी पी’ कमी झाले असावे असे प्रथमदर्शनी वाटत होते. त्या काळी आम्ही आमचे पेशंट्स येथील हरजीवन हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करीत होतो. विनोदने प्राथमिक उपचार व करावयाच्या रक्त, लघवी, व एकस रे तपासण्यांची यादी करून त्याला हरजीवन मध्ये पाठविले. त्या काळी सोनोग्राफी यंत्रे उपलब्ध नव्हती. सर्व निदान हाताने पोट तपासूनच होत असे. लघवी तपासण्यासाठी परीक्षा नळीमध्ये लघवी मधील निरनिराळ्या घटकांसाठी निरनिराळ्या तपासण्या कराव्या लागत असत व एका पेशंटच्या संपूर्ण लघवी तपासणीसाठी पंधरा-वीस मिनिटे लागत असत. हीच गोष्ट रक्तामधील साखर तपासण्याची. तेंव्हा आजप्रमाणे ग्लूकोमीटर सर्रास उपलब्ध नव्हते. जी तपासणी आज पाच सेकंदांमध्ये होते तीसाठी तेंव्हा अर्धा तास लागत असे. असो.
अमोल डॉ. विनोदच्या सल्ल्याप्रमाणे हरजीवन मध्ये दाखल झाला व त्याचे उपचारही चालू झाले. परंतु हळूहळू अमोलच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्याऐवजी त्याची तब्बेत आणखीनच खालावत जावू लागली. रात्री दहा वाजता डॉ. विनोद काम संपवून अमोलला पाहण्यासाठी आले तेंव्हा त्यांना धक्काच बसला कारण अमोल आता जवळजवळ बेशुद्धावस्थेमध्ये होता. त्याचा श्वास वेगाने चालू होता व ‘बी पी’ अजूनही 'लो'च होते. तोपर्यंत अमोलचे रक्त-लघवीचे रिपोर्ट देखील आले होते. तेही नॉर्मल होते. एकस-रे देखील नॉर्मल होता पण पेशंट मात्र अत्यवस्थ झाला होता.
आता काळजी करण्याचे काम डॉ. विनोदांचे होते. पेशंटचा भाऊ डॉक्टर असल्यामुळे व पेशंट दगावण्याची शक्यता असल्यामुळे कोणातरी जेष्ठ फिजिशियनचा सल्ला म्हणजेच 'सेकण्ड ओपिनियन' घ्यावे असे ठरले. दुर्दैवाने त्यावेळेस कोणीही जेष्ठ फिजिशियन उपलब्ध होवू शकत नव्हता. नेमका त्याच वेळी मी माझे पेशंट तपासण्यासाठी हरजीवन हॉस्पिटलमध्ये आलो होतो. तेंव्हा माझी विनोद्शी नजरानजर झाली.
"अरे सुरेश, माझ्याकडे एक प्रॉब्लेम केस आहे. तू जरा बघशील तर बरे होईल."
मी अमोलला तपासले. त्याचे रिपोर्ट्सही पहिले. डॉ. विनोद व पेशंटचा डॉक्टर भाऊ माझ्या शेजारीच उभे होते.
"विनोद, मला या मुलाला डायबेटिक केटो-अॅसिडोसीस असल्यासारखे वाटते आहे. याचा श्वास वेगाने होतो आहे, शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे डिहायड्रेशनची लक्षणे दिसत आहेत व बी पी कमी आहे."
"मलाही तसे वाटले होते पण याच्या युरीन रिपोर्टमध्ये साखर व अॅसिटोन दाखवत नाही. त्यामुळे हे डायग्नोसीस रुल-आउट होते आहे."
इतका वेळ मागे उभे असलेले डॉ. मनोहर शेठ म्हणाले, "मलाही डायबेटीसची दाट शक्यता वाटते. मला याच्या श्वासाला थोडासा अॅसिटोनसारखा गोड वासही येतो आहे. आपण याला इन्शुलीन देवून पाहायला काय हरकत आहे?"
"पण सर, जर याला डायबेटीस नसेल तर त्याची साखर प्रमाणापेक्षा कमी होवून आणखीनच गंभीर अवस्था निर्माण होईल." विनोद.
मधुमेह जेंव्हा खूप वाढतो अथवा इन्शुलिनचे प्रमाण खूपच कमी होते तेंव्हा शरीरामध्ये एनर्जी निर्माण करण्यासाठी ग्लुकोस ऐवजी शरीरामधील चरबीचा उपयोग इंधन म्हणून केला जातो. प्रमाणापेक्षा जास्त चरबी जळाल्यामुळे केटोन नावाचे आम्ल पदार्थ जास्त प्रमाणात तयार होतात व त्यांच्यामुळे रुग्ण बेशुद्ध होतो. यालाच 'डायबेटिक कोमा' असे म्हणतात. अमोलला नेमके हेच होत असल्याचा आमचा संशय होता.
मधुमेहाची शक्यता लक्षात घेवून आम्ही रक्तातील साखर तपासण्याकरिता पेशंटच्या भावाला रुबी हॉल मध्ये पाठविले.
रिपोर्ट येईपर्यंत आम्ही एक प्रयोग म्हणून अमोलच्या रक्ताचे आठ थेंब व बेनेडिक्ट रिएजंट वापरून युरीन मध्ये करावी त्याप्रमाणे शुगर टेस्ट केली असता ती ++ पॉझीटीव्ह आली. रक्तामध्ये किटोनकरता केलेली टेस्ट देखील पॉझीटीव्ह आली.
"याचा अर्थ याच्या रक्तामध्ये ५०० ते १००० पर्यंत साखर असली पाहिजे. आपण याला इन्शुलीन देवून पाहावे."
आम्ही अमोलला २० युनिट इन्शुलीन शिरेतून दिले, ५० मिली सोडियम बायकार्बोनेट देखील दिले. एक लिटर नॉर्मल सलाईन देखील फास्ट दिले. आणि आमच्या अपेक्षेप्रमाणे अर्ध्या तासातच साखरझोपेमधून जागे होवून अमोलने डोळे उधडले आणि आमच्या सर्वांचा जीव भांड्यात पडला. त्याच्या पोटातील वेदनाही आता कमी झाल्या. तेव्हड्यात पेशंटचा भाऊ अमोलच्या रक्तातील साखरेचा रिपोर्ट घेवून आला. रात्रीची वेळ असल्यामुळे बाहेरून रक्त तपासून आणले होते. तो रिपोर्ट होता ६०० मी.ग्र.!
डायबेटीसच्या नेहेमीच्या उपचारांनी अमोल सकाळपर्यंत खडखडीत बरा झाला.
आता प्रश्न होता की आधी केलेल्या युरीनच्या तपासणीमध्ये साखर व अॅसिटोन कसा नव्हता.
मात्र थोड्याच वेळात हॉस्पिटलचा लॅबोरेटरी टेक्निशियन श्री डेरे ड्युटीवर आल्यानंतर ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. झालेल्या प्रसंगाची काहीएक कल्पना न देता तेथील हाउसमन डॉ. गिरीश तवटे यांनी खुबीने विचारले असता डेरे म्हणाले, " हे पहा डॉक्टर तवटे, मी एक शॉर्टकट माणूस आहे. आयुष्यामध्ये माणसाने डोक्याने काम केले पाहिजे. त्या लहान मुलाच्या युरीन मध्ये शुगर तपासणे म्हणजे केवळ वेस्ट ऑफ टाईम! लहान मुलांना डायबेटीस कसा होणार? मी त्याची शुगर तशीच लिहून टाकली. तपासणी करण्यामध्ये वेळ घालवलाच नाही."
डॉ. तवटे यांनी आपल्या डोक्यावर हात मारून घेतला. मात्र आपल्या या अज्ञानामुळे व अतिहुषारीमुळे आपण अमोलला प्रत्यक्ष मृत्युच्याच दाढेमध्ये ढकलल्याची थोडीदेखील जाणीव डेरेंना नव्हती.
या घटनेला अनेक वर्षे होवून गेली आहेत. अमोलने पुढे मधुमेहाचे सर्व पथ्यपाणी नीट सांभाळल्यामुळे पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा प्रसंग आला नाही.
मात्र अमोलच्या तुलनेमध्ये अमित आणखीनच लहान होता. त्या छोट्या जीवापुढे अनेक प्रश्न उभे होते, इन्शुलिनचे इंजेक्शन घेण्याचे व ग्लूकोमीटर वापरण्याचे शिकणे, जेवणाचे पथ्य सांभाळणे, अतिश्रम टाळणे, मित्रांच्या प्रश्नांना उत्तरे देणे असे एक न अनेक प्रश्न! पण कौतुक करावयास हवे अमितचे, की त्याने सर्व प्रसंगांना हसून तोंड दिले. कधी माझ्याकडे तक्रार म्हणून केली नाही. त्याच्या अनेक प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे तयार होती. अशा गोड मुलावर गोड-न-खाण्याचा आजार नियतीने देवून मोठाच अन्याय केला होता.
"डॉक्टर, आम्हां दोघांनाही मधुमेह नसताना आमच्याच मुलाला हा आजार का व्हावा?"
अमोलच्या आईच्या या एका प्रश्नाचे उत्तर मात्र मला माहित नव्हते. पण मला खात्री आहे की येणाऱ्या काही वर्षांतच, वैद्यकीय शास्त्रामध्ये झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे, या प्रश्नाचे नेमके उत्तर आपणाला निश्चितच सापडणार आहे.
मित्रहो, वाट पाहू या आरोग्यपूर्ण भविष्याची !
सो सॅड! एका लहान मुलाला
सो सॅड!
एका लहान मुलाला मधुमेह एकून नेहमीच वाईट वाटते.
डॉक्टर आपण खरचं ग्रेट
डॉक्टर आपण खरचं ग्रेट आहात....आपले अनुभव साठवण करुन ठेवण्यासारखे आहेत.....लिहित रहा...शुभेच्छा.....
बापरे, एखाद्याच्या
बापरे, एखाद्याच्या गलथानपणामुळे कुणाच्यातरी जीवाशी असा प्रसंग उद्भवू शकतो!
डॉक्टर, श्री. डेरेंच्या
डॉक्टर, श्री. डेरेंच्या शॉर्टकटमुळे अमोलच्या प्राणावरसुध्दा बेतले असते. बाकी नेहमीप्रमाणेच माहितीपुर्ण लेख. अमितच्या आईच्या प्रश्नाचे उत्तर लवकरात लवकर मिळावे अशी आशा बाळगुया कारण त्यामुळे अनेक प्रश्नांची उकल होण्यास मदत मिळेल.
असे डेरे आपल्या आजूबाजूला
असे डेरे आपल्या आजूबाजूला अनेक असतात. देव जाणे कोणाच्या मूर्खपणामुळे किंवा अति शहाणपणामुळे कोणावर काय वेळ येईल.
डॉक्टरांनी देखील केवळ लॅबच्या रिपोर्टवर अवलंबून न राहाता सिम्प्टम्सवरून केलेल्या निदानाला दुसर्या लॅबमधून टेस्ट करून पुष्टी मिळवली हे वाचून बरे वाटले.
हा फार जिव्हाळ्याचा विषय आहे
हा फार जिव्हाळ्याचा विषय आहे आणि तूम्ही फार सुंदर रितीने समजावला आहात.
बापरे ... लॅब च्या निश्काळजी
बापरे ... लॅब च्या निश्काळजी पणा आपण सागितला म्ह्णून कळाला .... आपल्या अनुभवा नेच पेशन्ट वाचला .... देवदूत च आहात आपण ......
जीवावर बेतले होते अगदी बापरे
जीवावर बेतले होते अगदी
बापरे
उत्तम लेख
मस्त ...नेहमीप्रमाणेच
मस्त ...नेहमीप्रमाणेच माहितीपुर्ण लेख.
एखाद्याच्या गलथानपणामुळे कुणाच्यातरी जीवाशी असा प्रसंग उद्भवू शकतो! >>++११
एका लहान मुलाला मधुमेह एकून नेहमीच वाईट वाटते. >> पण आता हे खुप ए़कायला यायला लागले आहे .. कमी वयात मधुमेहला तोंड द्यावे लागते..(
>>>> असे डेरे आपल्या
>>>> असे डेरे आपल्या आजूबाजूला अनेक असतात. देव जाणे कोणाच्या मूर्खपणामुळे किंवा अति शहाणपणामुळे कोणावर काय वेळ येईल. <<< तर तर, त्यामु ळेच तर असेही म्हणतात की हुषार शत्रु परवडतो, पण मूर्ख/अतिशहाणा मित्र (या केस मधे मदतनीस) परवडत नाही!
छान लेख
डायबेटीजबद्दल एवढ्या
डायबेटीजबद्दल एवढ्या साध्यासोप्या मराठीत पहिल्यांदाच वाचले.
अश्या डेरे प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई देखील होत नसावी. हॉस्पिटल आपली बदनामी टाळायला प्रकरण दाबायला बघत असावे. इथे पेशंट वाचला वेळीच म्हणून वाचतानाही नकळत डेरेंचा गुन्हा सौम्य वाटला. पण दगावला असता तर. या पेश्यात नितीमत्ताही फार महत्वाची. आपले लेख या फिल्डमधील सर्वांनी या कारणास्तव देखील वाचावेत. आपल्याला पुन्हा एकदा सलाम.
नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण लेख
नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण लेख !!
एक प्रश्न डॉक्टर- हल्लीच्या
एक प्रश्न डॉक्टर- हल्लीच्या काळात मधुमेह होण्याचे प्रमाण वाढले आहे का? असे असल्यास का?
(निरीक्षण चुकीचेही असू शकते)
नेहमी प्रमाणेच खूप छान
नेहमी प्रमाणेच खूप छान
लॅबोरेटरी टेक्निशियन श्री डेरे यांची कमालच आहे. म्हणजे सगळे कसे एकमेकंवर अवलंबून असतात. श्री डेरे यांच्या बेजबाबदार वागण्याने रिपोर्ट्स नॉर्मल दिसत होते. मग डॉक्टरने निदान तरी काय करायचे ? आणि पेशंटचे नातेवाईक मात्र डॉक्टरनाच दोषी धरणार. त्यांना नीट निदानच झाल नाही मुद्दामूनच पैसे उकळण्या करता बर्याच चाचण्या करायला सांगतात असे दोषारोप पण करणार
मस्त ...नेहमीप्रमाणेच
मस्त ...नेहमीप्रमाणेच माहितीपुर्ण लेख.
छन लेख डॉ. काका... लहान वयात
छन लेख डॉ. काका...
लहान वयात मधुमेह... वाचूनच वाईट वाटले.
टेक्निशियनच्या हलगर्जीमुळे किती वाईट परिणाम होतात ..
बालमधुमेह झाला तर बरा होण्याचा किंवा काहिअंशी कमी होण्याचा चान्सेस असतात का ?
सुरेख आहे हाही लेख.
सुरेख आहे हाही लेख. डेर्यांसारख्या रिकामे डेरे असलेल्यांबद्दल काय बोलावे !!!
डायबेटिस म्हणजे 'शरीर विरघळणे' हा अर्थ नव्याने कळला. आत्तापर्यंत डायबेटीसची सांगड कायम स्थूलतेशीच घातली गेली होती. थोडे गुगलून पाहिले. टाईप वन आणि टाईप टू डायबेटीस मधला फरक आता लक्षात आला. माझ्या आजूबाजूच्या लोकांमध्ये इतक्या वर्षांत केवळ दोघातिघांनाच इन्स्युलिनचे इंजेक्शन घेताना पाहिलेय बाकी सगळे गोळ्या घेणारे / न घेणारे डायबेटिक त्यामुळे हा फरक विसरायलाच झाला होता.
पण मग 'मेयो क्लिनिक'च्या साईटवर मुलांमध्ये आढळणार्या टाईप वन आणि टाईप टू ह्या दोन्ही प्रकारच्या डायबेटिसच्या लक्षणांमध्ये 'वेट लॉस' हे लक्षण वाचून जरा गोंधळ उडाला.
मुलांमध्ये टाईप टू असेल तर प्रमाणाबाहेर वाढलेले वजन आणि चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव ही मुख्य कारणं नसतात का ?
नेहमीप्रमाणेच छान लेख. एक
नेहमीप्रमाणेच छान लेख. एक प्रश्न आहे. या दोन्ही मुलांना टाइप-१ डायबिटीस होता ना?
बाप रे! धन्य! मस्त लिहिता
बाप रे! धन्य!
मस्त लिहिता डॉक्टर.
खुप चांगली माहिती. जवळपास
खुप चांगली माहिती. जवळपास असाच प्रसंग नात्यातल्या एक मुलीवर ओढवला होता. पण ती दुर्देवी ठरली.
डॉक्टरांनी चुकीचे निदान करुन डायरेक्ट ग्लुकोज चढवले.
>>अमोलच्या आईच्या या एका
>>अमोलच्या आईच्या या एका प्रश्नाचे उत्तर मात्र मला माहित नव्हते. पण मला खात्री आहे की येणाऱ्या काही वर्षांतच, वैद्यकीय शास्त्रामध्ये झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे, या प्रश्नाचे नेमके उत्तर आपणाला निश्चितच सापडणार आहे.
मित्रहो, वाट पाहू या आरोग्यपूर्ण भविष्याची ! <<
स्टेम सेल रिसर्च लवकरच टाइप-१ डायाबेटीसवर उपाय शोधुन काढेल. भारतात काॅर्ड ब्लड बँकिंगची सोय आहे असं वाचनात आलं होतं.
नेहेमीप्रमाणे छान लेख
नेहेमीप्रमाणे छान लेख !
साधारण पणे मधुमेह घराण्यात असेल तर एक पिढी आड होतो असे म्हणतात म्हणजे समजा वडिलांच्या आईला म्हणजे आज्जी ला असेल तर वडिलांना होण्याची शक्यता कमी पण स्वत:ला ( मुलगा / मुलगी ) होण्याची शक्यता जास्त असे म्हणतात. ह्यात कितपत शास्त्रीय दृष्ट्या तथ्य आहे ?
मस्तं लेख नेहमीप्रमाणे...
मस्तं लेख नेहमीप्रमाणे... लहान मुलांना डायबिटीस ... सगळे वाचून जीव घाबरतो...व असे का व कशाने होतो हेच कळत नाही.
तुमच्या लेखनाला सलाम..
हा फार जिव्हाळ्याचा विषय आहे
हा फार जिव्हाळ्याचा विषय आहे आणि तुम्ही फार सुंदर रितीने समजावला आहे. >>>> +१०० ....
सुंदर लेख!
सुंदर लेख!
सुरेख लेख नेहमीप्रमाणे
सुरेख लेख नेहमीप्रमाणे
तुमच्या लेखनाला सलाम..>>>> +
तुमच्या लेखनाला सलाम..>>>> + १०००
नेहमीप्रमाणेच उत्तम लेख. डॉ.
नेहमीप्रमाणेच उत्तम लेख.
डॉ. आपण शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यास वाचायला नक्की आवडेल. अमेरिकेतले गायनॅक्स आशियाई वंशातल्या पेशंट्सना जेस्टेशनल डायबेटीस जास्त करून आढळ्तो असं म्हणतात. आपल्याकडे पुर्वी जर हे डिटेक्शन झालं नसेल तर गर्भारपणात खायची योग्य काळजी न घेतल्यामुळे या पिढीत मधुमेह दिसायला लागला आहे का असा एक भाबडा विचार मनात आला. अर्थात माझं ते ़कार्यक्षेत्र नसल्याने जाणकार अधीक प्रकाश टाकतील अशी अपे़क्षा.