घराचा उंबरठा आणि हुरहुर

Submitted by चिमेघ on 5 April, 2014 - 03:51

हल्ली ना मनातील हुरहुर पुन्हा पुन्हा वर उसळी मारायला लागली आहे. जेव्हा घराचा उंबरठा ओलांडला तेव्हापासून ह्या हुरहुरीने अगदी एका मैत्रिणीसारखी सोबत केली, अक्षरशः पिच्छाच सोडला नाही. तसं बघितलं तर अमेरिकेने खूप काही दिलं, जोडीदाराबरोबर एक अनोखा प्रवास सुरु झाला. रक्ताचं काहीही नातं नसताना प्रेमातली नि:स्पृहता अनुभवता आली. एका नव्या जगाचे दरवाजे खुले झाले. नव्या ओळखी झाल्या आणि लोकंही ओळखायला यायला लागली. सुरक्षित छत्रछाया सोडून घरट्याबाहेरचं वास्तव दिसलं, त्याला कसं सामोरं जायचा ह्याचं आपोआपच प्रात्यक्षिक मिळालं, काही काही गोष्टी ना शिकवून येतंच नाहीत त्या अनुभवायला लागतात. पुढच्याच ठेच मागचा शहाणा ही म्हण नेहमीच लागू होत नाही, आपापल्या ठेचाच आणि स्वतःचे बरेवाईट अनुभवच आयुष्याला खरी झळाळी प्राप्त करून देतात. इथे कर्तृत्व सिद्ध करायची संधी मिळाली, स्वतंत्र अशी एक वेगळी ओळख निर्माण झाली. स्वत्वाला स्वबळाची जाणीव झाली, मात्र यशाला नम्रतेचं कोदंण खूप गरजेचं आहे ह्या घराच्या संस्काराचे महत्त्व इथे येऊन कळले, अगदी खोलवर पोहोचले. आकाशात लांबवर भरारी मारा पण पाय मात्र जमिनीवर असुद्यात, वाटलं खरंच कितीतरी तथ्य आहे ह्यात.

दूरदेशी राहून अशीच भरारी मारता मारता मायभूमीच्या पुन:श्च प्रेमात पडणे हे अपरिहार्यच असतं. आपल्या माणसांचीही अधिक ओढ वाटू लागते, खरतरं त्यांची किंमतच कळते म्हणा ना! कितीतरी गोष्टी आपण गृहीत धरतो ह्याची तीव्रतेने जाणीव होते. घराबाहेर पडलेल्या प्रत्येकालाच काही दिवसांनंतर खूप "मिस" व्हायला लागतं ते घरचं सात्विक जेवण. मग ते स्वतःच करायला शिकून ती खास चव पुन्हा जिभेवर रेंगाळली की आनंदाला परिसीमा उरत नाही. सगळे सणवार इथे अगदी दुप्पट उत्साहाने साजरे केले जातात तरीही आपल्या माणसांची अनुपस्थिती कुठेतरी खटकतेच. मनाच्या कप्प्यात साठवलेले ते जुने दिवस वारंवार नजरेसमोरून तरळून जायला लागतात. त्या कस्तुरीचा सुगंध कायम आसपासच दरवळत असतो आणि त्यावर फक्त आणि फक्त तुमचाच हक्क असतो.

मला ना घरावरचा तो आभाळाचा तुकडाही आपलासा वाटतो. ते समोरचं अंगण, त्यापलिकडंच ते हिरवंकंच लॉन, जिथे भावंडांबरोबर हुंदडत नाना प्रकारचे खेळ खेळणं. त्या दिमाखदार बागा आणि तो गच्च हिरवा वास. ते विशाल वृक्षं, त्यावर नागपंचमीला हौसेने झोपाळा बांधून झुलणे. उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात आजोळी जाणं. तो वेड्यावाकड्या वळणांचा घाट, वाटेत आवर्जून मिसळीवर ताव मारणे. तो अथांग सागर, तो खारा वारा, ती डौलदार झुलणारी नारळाची झाडं, लाल चिरा दगडांची उशी घेऊन गर्द सावलीची दुलई पांघरलेली ती चढण. किती त्या मनोरम्य आठवणी. तो प्रशस्त निवांतपणा स्वतःभोवती परत एकदा वेढून घ्यावासा वाटतो. इथे दिवसभर बंदिस्त प्रयोगशाळेत किंवा airconditioned office मध्ये बसून कधी एकदा विकांताला निसर्गाच्या कुशीत शिरतो असं होऊन जातं, गंमत म्हणजे हाच निसर्ग जेव्हा हाकेच्या अंतरावर होता तेव्हा त्याचं कधी फारसं कौतुक वाटलं नाही. व्यक्तींचं आणि गोष्टींचं महत्त्व त्यांच्यापासून दूर गेल्यावर कळतं हेच खरं!

आत्तापर्यंतचं आयुष्य अगदी रेखीव, सुरळीत गेलं, काहीच तक्रारीला वाव नाही, पण आता मात्र ही हुरहुर स्वस्थ बसू देईना. Advanced technology अगदी बोटांच्या इशाऱ्यावर नाचत असताना, virtual जगात अगदी सगळ्यांशी सहज संपर्क साधू शकत असताना, वास्तव जग कुठेतरी हरवत असल्याची बोच तीव्र होऊ लागली. कुठेतरी काहीतरी निसटून जातंय असं वाटू लागलं. आत्मपरीक्षण करताना आपल्या सुरक्षित जगापलीकडे एक उपेक्षित सामाजिक वर्ग आहे आणि शेवटी आपण समाजाचंही देणं लागतो ही जाणीव कुठेतरी मनामधे मूळ धरू लागली. आत्मिक समाधानाचा शोध घेण्याची आणि true passion चा मागोवा घेण्याची हीच ती वेळ हे कळून चुकलं. अंत:करणात एक प्रामाणिक तळमळ पसरू लागली आणि अंतर्मनाची साद ऐकू आली. आज पुन्हा एकदा एका उंबरठ्यावर उभी आहे आणि पलीकडचा प्रकाश आतुरतेने वाट बघत आहे.

--मेघना
http://meghanachitale.blogspot.com/2014/04/blog-post.html?spref=fb

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेघना, हा आपला लिखाणातील पहिला प्रयत्न की मायबोलीवर प्रकाशित करायचा पहिलाच प्रयत्न Wink
कारण लिखाणाचा पहिला प्रयत्न वाटत नाही, असल्यास पहिल्याच प्रयत्नात फारच सुंदर लिहिले आहे.

ललितमध्ये आपण स्वता हलवू शकता. संपादनमध्ये जा आणि तिथे कथा काढून ललितचा पर्याय सिलेक्ट करायचा ऑपशन दिसेलच.

मनापासून धन्यवाद अभिषेक, लिखाणाचाच पहिला प्रयत्न आहे Happy म्हणजे अगदी लहानपणापासूनच साहित्यावर खूप प्रेम, पण कधी seriously लिहायचा विचार केला नाही, rather शिक्षण/नोकरी ह्या व्यापात कधी आवर्जून वेळ काढला नाही, मायबोलीवरही इतके दिवस रोमातच होते. आता मात्र ज्या गोष्टी मनापासून समाधान देतात त्या करण्यासाठी प्रयत्न करायचाच असे ठरवले आहे. Happy

वा! फार छान लिहिलं आहे! आणि भावना अगदी पोचल्या! पुनश्च सीमोल्लंघनासाठी शुभेच्छा! होपफुली लवकरच या ठिकाणी स्वतःला पाहण्याची इच्छा आहे!

मेघना, हा आपला लिखाणातील पहिला प्रयत्न की मायबोलीवर प्रकाशित करायचा पहिलाच प्रयत्न
कारण लिखाणाचा पहिला प्रयत्न वाटत नाही, असल्यास पहिल्याच प्रयत्नात फारच सुंदर लिहिले आहे.......अगदी खरंय. तुम्ही खूप छान लिहिलंय .

छान लिहिलंय तुम्ही!

तुम्ही भारतात परत जाणार आहात का? (असं लेखातल्या सूरावरुन तरी वाटतंय.) तसं असल्यास त्या अनुभवाबद्दल लिहा. तेही वाचायला आवडेल इथे Happy

दूरदेशी राहून अशीच भरारी मारता मारता मायभूमीच्या पुन:श्च प्रेमात पडणे हे अपरिहार्यच असतं.
+१००००

जिज्ञासा, वर्षू, तुम्ही रिलेट करू शकलात म्हणजे लेखाचा मुख्य उद्देश पूर्ण झाला, खूप बरं वाटलं...
सीमोल्लंघन!!! अगदी अ‍ॅप्ट शब्द आहे Happy

वेदिका, हो नक्कीच लिहीन, परत जायचं, जायचं अशी खरंतर खूप लोकांची इच्छा असते असं बघितलय मी, आणि कुठेतरी त्या open ended decision ला closure द्यायची गरज भासते, कायम तळ्यात मळ्यात असायचा नक्कीच त्रास होत असणार.. Happy