पाँडीचेरी आणि अंदमान : भाग २ अंदमान

Submitted by मामी on 30 March, 2014 - 10:00

अंदमान, पोर्ट ब्लेअर. नितांत सुंदर समुद्र किनारा लाभलेलं अंदमान. अनेक छोटीमोठी बेटं आणि त्यामानाने कमी वस्ती असल्याने इथला समुद्र अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे. पूर्वीचं का़ळ्या पाण्याच्या नावानं कुप्रसिद्ध असलेलं अंदमान आता पर्यटकांसाठी एक सुंदर ठिकाण ठरू शकतं. इथे येण्यासाठी चेन्नै वरून विमान सेवा आहे. चेन्नै वरून निघालं की दोन तासात पोर्टब्लेअर. नाहीतर चेन्नै, विशाखापट्टणम आणि कलकत्त्याहून बोटीनेही येता येतं. पण ३ ते ६ दिवस लागतात.

रस्ते छोटेच पण छान आहेत. अगदी गुळगुळीत. वाहन भाड्याने घेऊन पॉइंट टू पॉइंट फिरावे लागते. काही ठिकाणी जाण्यासाठी आधीच बुकिंग करावे लागते. उदा, हॅवलॉक बेटावर जाण्यासाठी १-२ दिवस आधीपासून बुकिंग केलेले बरे. मध्यंतरी झालेल्या बोटीच्या अपघातानंतर सगळ्या खासगी बोटींवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी बोटीत मर्यादित जागा उपलब्ध असतात.

वरील चारही फोटो आमच्या हॉटेलच्या डेक वरून घेतले आहेत. ती एक नितांत सुंदर जागा होती. समोर समुद्र बघत गार वार्‍यावर बसलो की समाधी लागलीच म्हणून समजा. याच डेकच्या खाली रेस्टॉरंट होते. त्याबाहेर फारच मजेशीर माहिती लावली होती. वीस रुपयाच्या नोटीवर जे चित्र आहे ते त्या ठिकाणाहून दिसते. तिथूनच जवळपासच्या कोणत्यातरी ठिकाणाहून काढला आहे तो फोटो!

हे ते दृश्य

आणि हा तो माहितीफलक :

इंग्रज जेव्हा अंदमानात गेले तेव्हा त्यांनी ज्या बेटावर वस्ती केली ते हे रॉस आयलंड.

नंतर १९४२ साली इथे एक भुकंप झाला आणि त्यानंतर इंग्रजांनी इथली वस्ती उठवून स्मिथ आयलंड वर आणली. या स्मिथ आयलंडवरच पोर्ट ब्लेअर ही राजधानी आहे. रॉस आयलंडवर आता भग्नावशेष उरले आहेत पण ते ही बघायला फार छान वाटते. ढासळलेल्या इमारतींमधून प्रचंड मोठी मोठी झाडे वाढली आहेत. इथे अनेक हरणं आणि मोर दिसतात. हे आयलंड आता नेव्हीच्या अखत्यारीत आहे आणि इथे कोणी रहात नाही. मात्र इथे खूप छान निगा राखली जाते. अतिशय स्वच्छता आहे. पण रात्री मात्र एकदम अमानवीय वाटेल हां. रामसे बंधूंनी हे बेट कसं काय मिसलं देव जाणे!

इथे हरीण आणि मोर शोधा :

जुने चर्च :

मूळ चर्चचा फोटो आणि माहिती :

बेटावरील तळे आणि सिट- आऊट्स :

इतर बघण्यासारखी बेटे म्हणजे हॅवलॉक आणि नील. हॅवलॉकला सुंदर राधानगर बीच आहे. तिथे जाण्यासाठी एक दिवसीय सहली देखिल आहेत पण खरी मजा अनुभवायची असेल तर तिथे जाऊन राहिलेले उत्तम. नील बेटावर स्कूबा डायव्हिंग, हायकिंग वगैरे अ‍ॅक्टिविटीज करता येतात. बाराटांग भागात मड व्होल्कॅनो आहे आणि चुनखडीच्या गुहा आहेत. बॅरन आयलंडवर जिवंत ज्बालामुखी आहे. अर्थात तेथे जाण्यास परवानगी नाही.

त्या वीस रुपयाच्या नोटीबद्दलचा जो माहितीफलक आहे त्यावर दाखवलेल्या माउंट हॅरियेट या उंचावरील व्हू पॉइंटवरून अतिशय सुंदर दृश्य दिसते. या बेटावर जाण्यासाठी आपले वाहन बोटीवर घालून नेता येते. :

तेच ते रु. २० च्या नोटवरील दीपगृह वेगळ्या कोनातून. दिसलं का? :
<

माउंट हॅरीयेटवरून बोट सुटली. :

आणि पुन्हा पोर्टब्लेअर कडे जाऊ लागली :

अंदमानात सकाळी पाचवाजता सुर्यदेव ड्युटीवर हजर असत. आमच्या रूममधून समोरच समुद्र दिसत असे. अशीच एका सकाळी चहाचा कप घेऊन बाल्कनीत आले तर समोरच एक क्रूझलायनर अंदमानात त्या दिवसाकरता मुक्काम करण्यासाठी येत होती :

अंदमानमध्ये अनेक म्युझियम्सही बघण्यासारखी आहेत. चाथम सॉ मिल मधील म्युझियम, समुद्रिका म्युझियम (अजिबात चुकवू नका आणि येथिल डॉक्युमेंटरीही नक्की पहा), अँथ्रोपोलीजिकल म्युझियम, अंदमान फिशरीज म्युझियम (हे स्किप केलं तरी चालेल). त्यातील काही निवडक फोटो :

सी अ‍ॅनिमोन्स

स्टार फिश. किती सुंदर रंग आहेत ना!

सी-अर्चिन्स

अत्यंत सुंदर सुंदर आणि विविध प्रकारची प्रवाळेही होती समुद्रिकामध्ये पण त्यांचे फोटो काढण्याची परवानगी नव्हती.

पाँडीचेरी आणि अंदमान : भाग १ पाँडीचेरी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी, फोटो सुंदर आहेतच.. पण तुझी फोटोग्राफी आता जास्तच खुलत चालली आहे. >>> धन्यवाद दिनेशदा. पण माझ्यामते ती सॅमसंग गॅलॅक्सी S4 ची कमाल आहे. कॅमेरा भलताच छान आहे या फोनचा.

मामे.. मस्त फोटो आणी खूप छान माहिती...

स्टार् फिश ची रंगपंचमी नुकतीच आटपलेली दिस्तीये.. आणी ती झाडं... खरंच अमानवीय दिस्ताहेत..

रामसे बंधूज आर आऊट ऑफ बिझिनेस.... मुकेश भट यांना सुचव ही लोकेशन Wink

वा मामी! एकसे बढकर एक नजारे. हे पण अतीशय सुन्दर.

ज्योती ते निर्मनुष्य बेट पण इतिहास सान्गतय. मला ते सुद्धा आवडले.

लेखातील रामसे बंधूच्या उल्लेखामुळे त्यानंतर प्रचित्रे जास्तच काळजीपूर्वक पाहिली आणि भयाण वाटाव्या अशा विविध आकाराच्या जमिनीवर लोळण घेत असलेल्या विव्हल सर्पासारख्या फ़ांद्या पाहिल्या आणि पटले की त्या बंधूंच्या एखाद्या कथानकात ही जागा नक्कीच शोभली असती....इतके पर्यटक येत असतात तरीही अंगावर येऊ शकणा-या शांततेने व्यापलेली जागा अंदमानात आहे.

सर्वच चित्रे अगदी आकर्षक अशीच आली आहेत आणि निसर्गाचा तो चमत्कार मानला पाहिजे. घरबसल्या अंदमान आणि पाँडिचेरीचे वर्णनासह दर्शन घडले त्याबद्दल लेखिकेचे आभार.

रश्मी, असं बघायला सुंदर दिसतंय, त्या जागेला इतिहास आहे सगळं खरं. पण काळोख्या रात्री, लाईट्स वगैरे नसताना कोणाचीही बोबडी वळेल तिथे!

मस्त आहेत प्रचि. तुम्ही individual ट्रीप (बुकींग, स्थळांची शोधाशोध, गाड्या, हॉटेल इ.) केली की travel agency च्या ग्रूप सोबत.

सर्वांना धन्यवाद .

रुनी ... आम्ही नेहमीच 'आपली ट्रिप आपल्या हाती' या सुविचारानुसार चालतो. गाड्या वगैरे तर तिथे गेल्यावर ठरवतो.

मामी, किती सुंदर लिहिलेस!!! मला एकदा तरी जायचे आहे ह्या दोन्ही ठिकाणी. तू निकोबारला नाही गेलीस का? मी अंदमान निकोबार असे जोड नावेच जास्त ऐकून आहे.

नेव्ही लोक खूप दिसतात का तिथे?

छान आलेत फोटो. आम्ही २००५ मध्ये अंदमानची सहल केली होती. त्या आठवणी जाग्या झाल्या. आम्ही जायचं ठरवल्यावर नेहमीप्रमाणे माहिती काढताना बॅरन आयलंडचा शोध लागला. आणि आम्ही बॅरन आयलंड्ला जाउन जिवंत ज्वालामुखी बघून आलो. अद्भुत! वाइट याच गोश्टीचं वाटतं की तेव्हा आमच्याकडे डिजिटल कॅमेरा नव्हता. त्यामुळे फोटो येउ शकले नाहीत. साधा रोलचा कॅमेरा होता तेव्हा. पण ती द्रुश्यं विसरणं शक्य नाही.

व्वा सुंदर प्रचि.

रॉस आयलंड वरील हरिण पाळीव प्राण्या प्रमाणे बिनदिक्कत आपल्या जवळ येतात.

पोर्ट ब्लेअर वर लॅण्ड करताना खाली दिसणारा नजारा अप्रतिम असतो. हॅवलॉक मस्तच.. बॅरन आयलंड आम्ही पण मिस केल होतं.

तू निकोबारला नाही गेलीस का? मी अंदमान निकोबार असे जोड नावेच जास्त ऐकून आहे.
>>> बी, अंदमान निकोबार हे एकत्र ऐकतो कारण हे दोन बेट-समुह मिळून एक केंद्रशासित प्रदेश बनतो. मात्र निकोबार मध्ये सामान्य पर्यटकांना जाता येत नाही. तिथे जाण्यास सरकारची परवानगी लागते.

निर्मल, आता बॅरन आयलंड प्रवाश्यांसाठी बंद आहे.

मस्त फोटो मामे.. मलाही अंदमानला जायचेय एकदा. बघु कधी योग येतोय ते.
भग्नावशेष आवडले खास. अख्खा दिवस (फक्त दिवसच) तिथे घालवायला आवडेल मला.

mast anubhav !

मामी खूप मस्त फोटो आणि चपखल बसणारे तुझे वर्णन, अंदमानची सैर करुन आणलीस. धन्यवाद
फोटोत मोर दिसला, हरिण नाही ह...

Pages