पाँडीचेरी आणि अंदमान : भाग २ अंदमान

Submitted by मामी on 30 March, 2014 - 10:00

अंदमान, पोर्ट ब्लेअर. नितांत सुंदर समुद्र किनारा लाभलेलं अंदमान. अनेक छोटीमोठी बेटं आणि त्यामानाने कमी वस्ती असल्याने इथला समुद्र अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे. पूर्वीचं का़ळ्या पाण्याच्या नावानं कुप्रसिद्ध असलेलं अंदमान आता पर्यटकांसाठी एक सुंदर ठिकाण ठरू शकतं. इथे येण्यासाठी चेन्नै वरून विमान सेवा आहे. चेन्नै वरून निघालं की दोन तासात पोर्टब्लेअर. नाहीतर चेन्नै, विशाखापट्टणम आणि कलकत्त्याहून बोटीनेही येता येतं. पण ३ ते ६ दिवस लागतात.

रस्ते छोटेच पण छान आहेत. अगदी गुळगुळीत. वाहन भाड्याने घेऊन पॉइंट टू पॉइंट फिरावे लागते. काही ठिकाणी जाण्यासाठी आधीच बुकिंग करावे लागते. उदा, हॅवलॉक बेटावर जाण्यासाठी १-२ दिवस आधीपासून बुकिंग केलेले बरे. मध्यंतरी झालेल्या बोटीच्या अपघातानंतर सगळ्या खासगी बोटींवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी बोटीत मर्यादित जागा उपलब्ध असतात.

वरील चारही फोटो आमच्या हॉटेलच्या डेक वरून घेतले आहेत. ती एक नितांत सुंदर जागा होती. समोर समुद्र बघत गार वार्‍यावर बसलो की समाधी लागलीच म्हणून समजा. याच डेकच्या खाली रेस्टॉरंट होते. त्याबाहेर फारच मजेशीर माहिती लावली होती. वीस रुपयाच्या नोटीवर जे चित्र आहे ते त्या ठिकाणाहून दिसते. तिथूनच जवळपासच्या कोणत्यातरी ठिकाणाहून काढला आहे तो फोटो!

हे ते दृश्य

आणि हा तो माहितीफलक :

इंग्रज जेव्हा अंदमानात गेले तेव्हा त्यांनी ज्या बेटावर वस्ती केली ते हे रॉस आयलंड.

नंतर १९४२ साली इथे एक भुकंप झाला आणि त्यानंतर इंग्रजांनी इथली वस्ती उठवून स्मिथ आयलंड वर आणली. या स्मिथ आयलंडवरच पोर्ट ब्लेअर ही राजधानी आहे. रॉस आयलंडवर आता भग्नावशेष उरले आहेत पण ते ही बघायला फार छान वाटते. ढासळलेल्या इमारतींमधून प्रचंड मोठी मोठी झाडे वाढली आहेत. इथे अनेक हरणं आणि मोर दिसतात. हे आयलंड आता नेव्हीच्या अखत्यारीत आहे आणि इथे कोणी रहात नाही. मात्र इथे खूप छान निगा राखली जाते. अतिशय स्वच्छता आहे. पण रात्री मात्र एकदम अमानवीय वाटेल हां. रामसे बंधूंनी हे बेट कसं काय मिसलं देव जाणे!

इथे हरीण आणि मोर शोधा :

जुने चर्च :

मूळ चर्चचा फोटो आणि माहिती :

बेटावरील तळे आणि सिट- आऊट्स :

इतर बघण्यासारखी बेटे म्हणजे हॅवलॉक आणि नील. हॅवलॉकला सुंदर राधानगर बीच आहे. तिथे जाण्यासाठी एक दिवसीय सहली देखिल आहेत पण खरी मजा अनुभवायची असेल तर तिथे जाऊन राहिलेले उत्तम. नील बेटावर स्कूबा डायव्हिंग, हायकिंग वगैरे अ‍ॅक्टिविटीज करता येतात. बाराटांग भागात मड व्होल्कॅनो आहे आणि चुनखडीच्या गुहा आहेत. बॅरन आयलंडवर जिवंत ज्बालामुखी आहे. अर्थात तेथे जाण्यास परवानगी नाही.

त्या वीस रुपयाच्या नोटीबद्दलचा जो माहितीफलक आहे त्यावर दाखवलेल्या माउंट हॅरियेट या उंचावरील व्हू पॉइंटवरून अतिशय सुंदर दृश्य दिसते. या बेटावर जाण्यासाठी आपले वाहन बोटीवर घालून नेता येते. :

तेच ते रु. २० च्या नोटवरील दीपगृह वेगळ्या कोनातून. दिसलं का? :
<

माउंट हॅरीयेटवरून बोट सुटली. :

आणि पुन्हा पोर्टब्लेअर कडे जाऊ लागली :

अंदमानात सकाळी पाचवाजता सुर्यदेव ड्युटीवर हजर असत. आमच्या रूममधून समोरच समुद्र दिसत असे. अशीच एका सकाळी चहाचा कप घेऊन बाल्कनीत आले तर समोरच एक क्रूझलायनर अंदमानात त्या दिवसाकरता मुक्काम करण्यासाठी येत होती :

अंदमानमध्ये अनेक म्युझियम्सही बघण्यासारखी आहेत. चाथम सॉ मिल मधील म्युझियम, समुद्रिका म्युझियम (अजिबात चुकवू नका आणि येथिल डॉक्युमेंटरीही नक्की पहा), अँथ्रोपोलीजिकल म्युझियम, अंदमान फिशरीज म्युझियम (हे स्किप केलं तरी चालेल). त्यातील काही निवडक फोटो :

सी अ‍ॅनिमोन्स

स्टार फिश. किती सुंदर रंग आहेत ना!

सी-अर्चिन्स

अत्यंत सुंदर सुंदर आणि विविध प्रकारची प्रवाळेही होती समुद्रिकामध्ये पण त्यांचे फोटो काढण्याची परवानगी नव्हती.

पाँडीचेरी आणि अंदमान : भाग १ पाँडीचेरी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा! छानच फ़ोटो आणि माहिती.आमची पण सहल झाली. Happy

फोटोत मोर दिसला, हरिण नाही ह...>>>>>>>>>>>मला दोन्ही दिसले. Happy

दिनांक २६ फेब्रुवारी रोजी स्वा. सावरकरांची पुण्यतिथी असते. याच दिनाचा मुहूर्त साधण्यासाठी आम्ही २००७ साली २२ फेब्रुवारी रोजी चेन्नई येथून बोटीने पोर्ट्ब्लेअर येथे पोहोचलो.
दिनांक २६ फेब्रुवारी रोजी मार्गदर्शकाला सांगून अंदमान येथील "महाराष्ट्र सदन " येथे सकाळी ९ वाजता पोहोचलो. त्या ठिकाणी आणखी स्थानिक महाराष्ट्रीयन / मराठी बंधूभगिनी जमले होते. साधारणत:१५० च्या आसपास संख्या असेल. स्थानिक नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त करून स्वा. सावरकरांच्या स्मृतीला उजाळा दिला. त्यामध्ये शासनाकडून स्मारकाकडे कसे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते ह्याचाही उल्लेख केला. त्यानंतर आम्ही सर्वांनी दोनदोनच्या रांगा करून गावातून महाराष्ट्र सदनापासून सेल्युलर जेल पावेतो मिरवणूक काढली जातांना "स्वा. सावरकर अमर रहे " इ. घोषणा देत होतो. सेल्युलर जेलमध्ये त्या दिवशी मुक्त प्रवेश होता. इतर दिवशी ठराविक पैसे घेतले जातात. घोषणा देत देत आम्ही थेट स्वा.सावरकरांना ज्या कोठडीत ठेवले होते,त्या तिसर्‍या मजल्यावरील क्र. "१२३" कोठडीत गेलो. स्वा.सावरकरांच्या तसबिरीला हार अर्पण केला. अग्रभागी आम्हीच होतो. त्यानंतर स्वा.सावरकरांची एक कविता ''जयोसुते श्री महन्मगले शिवास्पदे शुभदे '' सामुदायिकिरित्या म्ह्टली. आणि इतरांना दर्शनाचा मार्ग मोकळा करून दिला.
स्वा.सावरकरांना जे भोगले त्याची नुसती आठवण सुध्दा मनाला थरकांप भरवून जाते. त्यासाठी त्यांच्यासारखेच देशप्रेमाने तुडुंब भरलेले ह्द्य हवे; जे म्हणू शकते, " न घेतले हे व्रत आम्ही अंधतेने ". अंदमानला जाण्याचा आमचा हेतू व मुख्य आकर्षण केवळ स्वा. सावरकर यांचे सेल्युलर जेलमधील वास्तव्य कसे होते हे जाणून घेण्याचा होता. पण नवीन पिढीची विचारसरणी कशी आहे ह्याबद्दल आता काय बोलणार ?

Pages