काका, मला s s वाचवा हो …… कथा काकांच्या काकदृष्टीला कळलेल्या करपल्लवीची !

Submitted by SureshShinde on 19 March, 2014 - 03:38

काका, मला s s वाचवा हो …… कथा काकांच्या काकदृष्टीला कळलेल्या करपल्लवीची !

kumbhar.jpg

पुण्यातील बैरामजी जीजीभॉय महाविद्यालयात प्रवेश मिळून माझ्या वैद्यकीय जीवनाचा श्रीगणेशा झाला ते साल होेते 1967 ! पुढील साडेपाच वर्षांमध्ये एम.बी.बी.एस. होऊन बीजे मेडिकलमधून बाहेर पडेपर्यंत काळ कसा भर्रकन निघून गेला ते कळाले देखील नाही. याच कालखंडात अनेक विद्वान, यशस्वी डॉक्टर्स शिक्षकांशी संपर्क आला. त्यांच्या जीवनाचे अनेक पैलू समजले, उमजले आणि आपणही त्यांचेप्रमाणे व्हावे अशी बीजे मनामध्ये रुजली ती देखील या "बीजे'च्याच प्रांगणामध्ये! येथेच एकापेक्षा एक धुरंधर, धन्वंतरी डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाची संधी मिळाली. त्यांच्या प्रगाढ ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा घेण्यासाठी त्यांची 'बेडसाईड क्लिनिक्स' आम्ही कधीच चुकविली नाहीत. प्रख्यात अस्थिरोगतज्ज्ञ डॉ.के.एस.संचेतींच्या 'क्लिनिक'ची वेळ असे रात्रौ दहा ते बारा वाजेपर्यंत! पण त्यांची शिकविलेली काही बोधवाक्ये मी अजूनही विसरलेलो नाही. असेच दुसरे एक विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्व होते सुप्रसिद्ध स्त्री-रोगतज्ज्ञ डॉ.एच.एन.फडणीस !

आमच्या हॉस्पिटल बॅच क्रमांक '151'ची डॉ.फडणीसांच्या युनिटला नेमणूक झाल्यामुळे, 'स' व 'श' ची आडनावे असलेल्या आम्हां दहा 'सशांना' खूपच आनंद झाला होता. डॉ.फडणीस म्हणजे एक अतिशय उमदे व्यक्तिमत्व ! पावणेसहा फुटांची, भरदार देहयष्टी व भरगच्च मिशा असलेले हे आकर्षक व्यक्तिमत्व वेशभुषेच्या बाबतीतही खूपच चोखंदळ होते. सुरेख थ्रीपीस सूट आणि त्यातील जॅकेटला अडकविलेले ऍन्टीक घड्याळ आणि त्याच्या जोडीस आपल्या क्षेत्रातील अगाध ज्ञान यामुळे हा माणूस नकळतच माझे रोल मॉडेल बनला. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे वक्तशीरपणा व विद्यार्थ्यांना शिकविण्याची आवड. येणाऱ्या पुढील काही वर्षांत ही सर्व वेशभूषा त्यागून त्यांनी भगवी वस्त्रे स्वीकारली. भगवान रजनीशांच्या हस्ते 'स्वामी अजितसरस्वती' अशी दीक्षा घेतल्यानंतर तर या माणसाविषयीचा माझ्या मनातील आदर आणखीच दुणावला.

ज्यांची कोणासही 'सर' येवू शकणार नाही असे माझे हे सर मनात घर करुन रहाण्यास कारणीभूत झालेला एक प्रसंग मी कधीच विसरु शकलो नाही.

वैद्यकीय अभ्यासक्रमानुसार आम्हाला वीस बाळंतपणे (डिलिव्हरीज) पाहण्याची व अभ्यासण्याची सक्ती होती. त्यामुळे दिवसभराचे कॉलेज संपल्यावर आठवड्यातील ज्या दिवशी आमच्या युनीटची 'ईमर्जन्सी' असे त्यावेळेस दिवसा व रात्री आम्ही 'लेबर रूम' अथवा बाळंत विभागामध्ये थांबत असू. नवीन बाळंत होऊ घातलेली रुग्ण आली की तिची माहिती लिहून घेऊन ती 'मोकळी' होईपर्यंत तिचा आम्ही फॉलोअप करीत असू व आमच्या डायरीत नोंद घेत असू. फडणीस युनीटला 'रेसिडेंट रजिस्ट्रार डॉक्टर' होते डॉ सुरेश देशपांडे. अतिशय साधा, कष्टाळू, मन लावून काम करणारा, शिकण्याची व शिकविण्याची आवड असणारा माणूस !
अशाच एका संध्याकाळी, आम्ही सर्व 'सशे' केस घेण्यासाठी ऑपरेशनच्या थिएटरच्या प्रसुती कक्षामध्ये, अर्थात लेबर रुममध्ये दाखल झालो. हिस्टरी घेण्याचे काम आमच्या बॅचमधील मीना सुब्रम्हण्यम उर्फ सुब्बू करीत असे. आज एक पेशंट जुन्नरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राने 'अवघड केस' म्हणून ससूनला पाठविली होती. डॉ.देशपांडे त्या पेशंटच्या आईशी बोलत असताना आम्ही आमच्या डायरीत हिस्टरी लिहीत होतो. पेशंट सखुबाईला पूर्ण दिवस भरुन गेले दोन दिवस 'कळा' येत होत्या. गर्भाशयातील गर्भाभेावतीची पाण्याची पिशवी फुटून त्यातील पाणी वाहूनही बरेच तास होऊन गेले होते. खरे म्हणजे आतापर्यंत बाई मोकळी व्हायला हवी होती. पण प्रसुती होत नव्हती, भरपूर कळा येत होत्या आणि अघटीत म्हणजे बाळाचा हात येानीमार्गातून बाहेर आला होता. डॉ.देशपांडे सांगत होते की सखुबाईला बाळाची हालचाल जाणवत नाही म्हणजेच बाळ बहुतेक पोटातच दगावलेले असावे. शिवाय फेटोस्कोपमध्ये बाळाचे 'हार्ट साऊंडस्' ऐकू येत नव्हते. त्या काळात सानोग्राफी यंत्राचा शोध लागलेला नव्हता व बाळाचे हृदयाचे ठोके मोठे करुन ऐकण्याचे 'फीटल़् डॉपलर' हे यंत्र काही ठराविक खाजगी रुग्णालयांतच उपलब्ध होते. आजकाल सोनोग्राफी यंत्रे खेडोपाडी पोहोचली आहेत त्यामुळे पूर्वीच्या काळी वापरात असलेले व बाळाचे हृदयाचे ठोके ऐकण्यासाठी वापरले जाणारे 'फेटोस्कोप' नावाचे ऍल्युमिनिअम धातूचे नरसाळ्यासमान 'यंत्र' आता संग्रहालयात जमा झाले आहे. बाळंतीण अडलेली असून बाळाचा हात आईच्या योनिमार्गामधून बाहेर डोकावत होता, अर्थात 'हॅन्ड-प्रोलॅप्स' झाला होता. अशा परिस्थितीमध्ये बाळ दगावले असताना उगाचच सिझेरियन करण्यापेक्षा, बाईला भूल देऊन बाहेर आलेला हात परत गर्भाशयात ढकलून व बाळाला गर्भायाशमध्ये फिरवून पायांकडून प्रसूती करतात. या क्रियेला 'पोडॅलीक व्हर्शन' असे म्हणतात.

"पण सर बाळाचे डोके मोठे असल्यामुळे बाई अडली असून नैसर्गिक प्रसुती होत नसेल तर मग रिपोझिशनिंग नंतर तरी कशी होणार?'' आमच्या बॅचमधील एका भावी स्त्री-रोगतज्ज्ञाने विचारले.
डॉक्टर देशपांडे म्हणाले, "अरे बाळा! जर बाळ दगावले असेल तर त्याचा मेंदू द्रव अवस्थेत असतो व त्यामुळे डोक्याचा आकार लहान झाल्यामुळे डिलिव्हरी होऊ शकते. काही प्रॉब्लेम आला तर इंजेक्शनद्वारे मेंदूतील द्रव काढून आपण हेडसाईज लहान करु शकतो. आता मला डॉ.फडणीसांची परवानगी घ्यावी लागेल मग आपण पुढील क्रिया चालू करु या.'' आमच्या बरोबर एवढे बोलून डॉ.देशपांडे यांनी डॉ.फडणीसांना फोन लावला. फडणीस सरांचा उत्साह आणि जबाबदारीची जाणीव तेवढीच दांडगी !

"हे पहा डॉ.देशपांडे, तुम्ही सर्व तयारी करा. प्रोसिजर तुम्हीच कराल पण मी तुमच्या मागे ऊभा राहीन. मी माझी ओपीडी संपवून आठ वाजेपर्यंत पोहोचतोच.'' सरांनी फोनवर डॉ.देशपांडेंना सांगितले. ससूनमध्ये मानद तज्ज्ञ पैशाच्या मोबदल्याची जाणीव न बाळगता व आपली खाजगी प्रॅक्टीस सांभाळूनही सेवा देण्यासाठी वेळी अवेळी येत असत.
आठ वाजले. कॅन्टिन बंद होण्याच्या आधी चहा व बटाटेवडे खाऊन आम्ही ऑपरेशन रुममध्ये दाखल झालो. बरोबर आठच्या ठोक्याला डॉ.फडणीस गाऊन चढवून ऑपरेशन कक्षामध्ये आलेच होते. सिस्टर इनचार्जने अर्धा टेबल फोल्ड करुन सखूला लिथॉटॉमी पोझिशन देऊन तयार केले होते. सखूबाई पूर्ण शुद्धीवर होती, तिचे दोन्ही पाय वर करुन अडकविलेले होते. पोटावर स्टेराईल टॉवेल लावून फक्त प्रसुतीची जागा मोकळी ठेवली होती व त्या टॉवेलच्या गोल छिद्रामधून डोकावत होता बाळाचा एक चिमुकला हात!

टेबलपासून समोर सर्जिकल गाऊन व ग्लोव्हज घालून डॉ.देशपांडे सखूबाईच्या दोन पायांमधील जागेत बसले होते तर त्यांच्या बरोबर मागे डॉ.फडणीस सर उभे होते. त्यांच्यामागे गाऊन, मास्क व टोपी घालून आमची बॅच उभी होती. फडणीस सर डॉ.देशपांडेंना सूचना देत होते व मधूनच आम्हाला काही प्रश्न विचारुन स्वतःच उत्तरे देत होते. मी सरांच्या मागेच उभा राहून सरांचे पिळदार शरीर व त्याकाळातले इम्पोर्टेड जॉकीचे बनियान बघून एकमेकांना खुणावत होतो. आमच्याशी बोलत बोलत शिकविणारे फडणीस सर बोलण्याचे अचानक थांबले. डॉ.देशपांडेंच्या पाठीवर थाप मारुन म्हणाले, "सुरेश, जरा उठ बघू!'' आपले काही चुकले नाही ना या भितीने डॉ.देशपांडे दचकलेच !
डॉ.फडणीस , "सिस्टर गुजर, हे प्रोसीजर ताबडतोब थांबवा. पेशंटचा बेड सरळ करा, पाय सोडवा आणि ईमर्जन्सी सिझेरियनची तयारी करा!''
सिस्टर , "इन्स्ट्रुमेंटस् ट्रे तयार आहे पण ऍनेस्थेटीसला बोलवावे लागेल, अर्धा तास तरी लागेल.''
डॉ.फडणीस, "छे छे, तेवढा वेळ नाही. अर्जंट ऑपरेशन करावे लागणार आहे. ते आपण लोकल ऍनेेस्थेशियाखाली करुया. भूल देण्यासाठी झायलोकेनचा पूर्ण बल्ब लागणार आहे. मला झायलोकेन सिरींजमध्ये भरुन द्या. मी वॉश होऊन आलोच. ''

पुढच्या एक मिनिटातच ऑपरेशन रुमचे रुप पालटले, एखाद्या फिरत्या रंगमंचावर सीन बदलावा तसे ! डॉ.फडणीस स्वतः सिझेरियन करणार होते. अशा तीन-चार शस्त्रक्रिया आम्ही पाहिल्या होत्या पण त्यांच्यापेक्षा ही वेगळीच होती. यात पेशंटला जनरल किंवा स्पायनल ऍनेस्थेशिया न देता केवळ लोकल ऍनेस्थेशिया देऊन शस्त्रक्रिया होणार होती. असे खरोखर 'तात्काळ' ऑपरेशन आम्ही प्रथमच पाहत होतो. आतापर्यंत मी असे प्रसंग जॉर्ज सावा किंवा रिचर्ड गॉर्डनच्या कथांमध्येच वाचले होते. सरांनी पेशंटच्या कानात दोन शब्द सांगून त्यांचे काम सुरु केले. सखूच्या पोटावरुन आपली बोटे फिरवून त्यांनी गर्भाशयाचा अंदाज घेतला. इकडेतिकडे न बघता त्यांनी तिच्या पोटावर सरळ रेषेमध्ये झायलोकेनची इंजेक्शने देणे भरभर सुरु केले. पुढच्या दोनच मिनिटांमध्ये सरांनी स्कालपेलने सखूबाईचे पोट उघडले, गर्भाशयाच्या पिशवीचा अंदाज घेतला व भर्रकन स्कालपेलने पिशवीचा छेद घेतला आणि सरांच्या बोटांनी एखादा मातीचा घट घडवल्यानंतर चाकावरुन अलगदपणे उचलावा तसे एक नवजात शिशु अर्भक पुढच्याच क्षणी बाहेर काढून डॉ.देशपांडे यांच्या हातात अलगद ठेवले. सिस्टर गुजर बाळाची नाळ कापत असताना चाललेला कृष्णजन्माचा हा अभिनव सोहळा पाहताना मला मात्र मायकेल अँजलोच्या "द क्रिएशन ऑफ मॅन'' या पेंटींगची प्रकर्षाने आठवण झाली.

डॉ.देशपांडे मात्र पुढील सूचनांची वाट पहायला थांबलेच नाहीत. कोपऱ्यात जाऊन बाळाच्या रेस्पिरेशनची अर्थात पहिल्या श्वासोच्छवासाची तयारी करु लागले. बाळाचे दोन्ही पाय हातात धरुन त्याला हवेत उलटे टांगलेल्या अवस्थेत धरुन त्याच्या तोंडात बोटे घालून श्वासमार्ग मोकळा केला. पुढच्याच 15 सेकंदांमध्ये बाळाने मोठा टाहो फोडला आणि आमच्या सर्वांचे डोळे पाणावले, अगदी डॉ.फडणीसांचे देखील! सर गाऊनच्या हाताने कपाळावरील घर्मबिंदू पुसून गर्भाशय शिवण्याच्या तयारीला लागले होते. सिस्टर लगबगीने सरांनी न सांगताच पुढील स्टेप ओळखून त्यांना हत्यारे, सुया, दोरे देत होत्या. आम्ही सर्व देहभान हरपून हे नाट्य डोळ्यात साठवून घेत होतो.

ऑपरेशन संपवून सर पेशंटला म्हणाले, "बाई, सर्व व्यवस्थित आहे, तुला मुलगा झालाय. चांगला आहे तो ! आता स्वस्थ झोप.'' सखूबाईच्या अश्रूंना उसंत नव्हती. आपल्या अर्धोन्मिलीत डोळ्यांनी ती त्या देवदूताची धूसर मूर्ती डोळ्यात साठवून ठेवीत होती.

डॉ.फडणीस कपडे बदलून परत जाण्यास निघाले. डॉ.देशपांडे सरांचा कोट घेऊन उभे होते. आमच्या बॅचमधील भावी बालरोगतज्ज्ञ 'सुब्बू'ने पुढे होऊन सरांना विचारले, "सर, तुम्ही कसे ओळखलेत की ते बाळ जिवंत आहे म्हणून ?''
तिच्या प्रश्नाला दाद देत सर म्हणाले, "अहो, जेव्हा त्या बाईच्या योनीभागाला सॅव्हॅलॉन लावून जंतुविरहीत करण्याची क्रिया चालू होती तेव्हा त्या बाळाच्या हातावरही सॅव्हॅलॉन पडले आणि त्याच्या थंडाईमुळे त्या बाळाने पटकन हाताची बोटे हलविली."

अर्थात ही 'करपल्लवी' दिसली सर्वान्ना पण उमजली ती फक्त डॉ.फडणीसांनाच व त्यांच्यातील देवदूताला !

खरोखरच … "फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, विठ्ठला, तू वेडा कुंभार !"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते बाळ आता ४५ वर्षांच्या आसपास असेल वयाने. मी त्याच्या जागी असते तर दर वाढदिवशी आई, वडिलांच्या बरोबरच डॉ. फडणिसांच्याही पाया पडले असते. (हा लेख डोक्यातून जातच नाहिये, त्यामुळे असे काय काय विचार येतायत मनात).

विलक्षण अनुभव आणि अप्रतीम सादरीकरण !
शीर्षकामुळे अंदाज आला असला तरी शेवटपर्यंत धडधडत होतं वाचतांना ….
डॉक्टर ! काय बोलू?! शब्दच नाहीत भावना व्यक्त करायला!

छान

देव तारी त्याला कोण मारी तसेच डॉक्टर तारी त्याला कोण मारी अशी नवी म्हण तयार झालीय.:स्मित:

आतुन हेलावल्यासारखे झाले.

डॉक्टरसाहेब,

कैच्याकै अफाट प्रकार आहे. पोर आडवं येणे (दासबोध ३.१.४०) म्हणतात ते हेच का?

फडणीस डॉक्टरांना साष्टांग दंडवत!

आ.न.,
-गा.पै.

मस्त लिहिलत डॉक्टर. सगळेच लेख छान आहेत पण हा जरा जास्तच आवडला.
हे इतके बारीक सारीक संदर्भ पुर्वी लिहून ठेवलेले का? कारण तुमच्याकडे अशा १००० गोष्टी असतील. सगळ लक्षात ठेवण सोप नाही.

>>>>> ते बाळ आता ४५ वर्षांच्या आसपास असेल वयाने. मी त्याच्या जागी असते तर दर वाढदिवशी आई, वडिलांच्या बरोबरच डॉ. फडणिसांच्याही पाया पडले असते. (हा लेख डोक्यातून जातच नाहिये, त्यामुळे असे काय काय विचार येतायत मनात).<<<<<

अश्विनी, भापो, पण असे होणे शक्य नाही.
कारण ही घटना इतक्या वर्षांनन्तर ज्या स्पष्टपणे ज्या शब्दात इथे सविस्तर सान्गितली गेलीये, तशी ती त्याच शब्दात त्याच अर्थासह/मजकुरासह त्यावेळेस पेशण्ट/नातेवाईक यांना सान्गितली असण्याची सूतराम शक्यता व गरज मला दिसत नाही. अन जर सान्गितलेच गेले नसेल, तर त्या आता पन्चेचाळीस वर्षाच्या झालेल्या बाळाने काही एक करण्याची गरज उरत नाही. उलट तेव्हा डोक्टरांसमोर प्रश्न असेल की कसे पटवावे नैसर्गिक बाळन्तपणा ऐवजी सिझेरिअन का करावे लागले ते! आमच्या वेळेस काय बाळन्तपणे होत नवती की काय...... हल्ली सिझर हा धन्दा झालाय...... वगैरे मुक्ताफळे २०१४ ची नसुन, अगदी साठ/सत्तरच्या दशकातही होतीच. सबब त्यान्नी बाई अडली होती, म्हणुन सिझर केले इतपतच सांगितले असेल.

आता यावर कुणी उगाच "माहितीच्या अधीकारात" वावदूक पणा करू नये अशी अपेक्षा, कारण कोणीही डॉक्टरच नव्हे तर व्यक्तिदेखिल, "तुझे बाळ सिजेरियनने वाचले हो पण खर तर त्या बाळास मृत समजुन आम्ही त्याच्या डोक्यात इन्जेक्शन खुपसुन मेन्दुचा द्रव काढुन डोक्याचा आकार लहान करुन मग योनीमार्गेच बाईची सुटका करणार होतो" असे सान्गु शकेल्/सान्गाणे आवश्यक असेल असे मला वाटत नाही.

त्यान्नी नै पाया पडले, तरी तुम्ही आम्ही मनोमन पाया पडू शकतोच ना? Happy

थरारक.
किती अष्टावधानी असावं डॉ ने हे एका शब्दाचं लेक्चर न देता कृतीतुन दाखवुन देणं फार कमी जणांना जमत असेल. Happy

डॉक, तुम्ही अगदी समर्पक चित्र वगैरे टाकता. (अजून कोणी बोंब नाही मारली की नेटवरचे चित्र टाकू नका म्हणून. ). Happy

बाळाच्या आयुष्याची दोरी चांगलीच बळकट होती म्हणायची. Happy
चांगला डॉक्टर वेळेत भेटणे, यालाही नशीबच लागते. वर माधव यांनी म्हटलेय त्याला अनुमोदन.

डॉक्टर, तुमची लिहिण्याची शैली भारीच आहे. तुमच्या गाठीचे आणखी अनुभव येऊ द्या. हे अनुभव आमच्याशी शेअर करताय त्याबद्दल, धन्यवाद.

LT, तुझ्या (अश्विनीच्या पोस्टवर लिहिलेल्या) पोस्टीतला मुद्दा पोचला.

<<<तुम्ही अगदी समर्पक चित्र वगैरे टाकता. (अजून कोणी बोंब नाही मारली की नेटवरचे चित्र टाकू नका म्हणून. ). >>> शक्यतो public domain pics असे सर्च करून मगच वापरतो. :स्मितः

गजाभाउ, आवर्जुन सान्गितल्याबद्दल धन्यवाद
(नैतर मला भितीच वाटत होती की "लिम्ब्या ह्हे क्काय लिवलहेस. काही गम्भिरता आहे की नाही?" म्हणून बोम्बाबोम्ब व्हायची!)

लिम्बुभाऊ तुमच्या पोस्टमधला पहिला पॅरा दुसर्‍यान्दा वाचला तेव्हा कळला.:फिदी: बरोबर आहे तुमचे, हे आजही ऐकायला मिळतेच. सारखे सिझरीयन का करतात? त्या डॉ. चा धन्दाच असेल पैसे उकळण्याचा असेही काही महाभाग म्हणतात. पण सत्य काय असते आणी असु शकते हे फक्त पेशन्ट आणी डॉ. यानाच माहीत असते.

रश्मी, थ्यान्क्स.
पण तसेही "धन्देवाईक" डॉक्टर्स असतातच, ते नसतात असे म्हणणे धाडसाचे असेल.
पण त्याच बरोबर डॉक्टर शिंदे लिहीत/सान्गत असलेल्या रुपेरी बाजूही समाजासमोर येणे आवश्यक झाले आहे असे वाटते. प्रश्न कोण बरे झाले वा नाही झाले याचा नसून, समाजाचा डॉक्टरांवरील विश्वासच उडत चालल्याचे जे दिसते आहे ते देवावरील विश्वास उडण्याइतकेच समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने धोकादायक आहे.
कसल्याच होप्स नसलेला समाज कशाच्याही आहारी जाऊन वेळेस क्रुर नक्षलवादी/डावा/ब्रिगेडी वगैरे बनतो हे समजुन घ्यायला हवा तितका इतिहास अन वर्तमान ढवळून शोधुन काढता येईल.
नाना तर्हान्नी लोकशाहीवरील "विश्वासच" उडवुन टाकू पहाणारा केजरीवाल काय किन्वा निधर्मी डावे काय किन्वा नक्षली काय किन्वा समाजाची अध्यातिमिक/पारमार्थिक गरज असलेली इश्वरावरील श्रद्धाच "अन्धश्रद्धा/भोळसटपणा/अडाणीपणा" ठरवुन हिणवणारे आधुनिक कायदेपटू चार्वाकवादी नास्तिक अन्निसवाले काय, हे सर्व कृतिने भिन्न वाटत असले तरी एकाच माळेचे मणी असतात.
अन या पार्श्वभुमिवर, आरोग्यविषयक सेवान्चे बाबतीत समाजात निर्माण होत असलेला अविश्वास/रोष ताबडतोबीने आवरला गेला पाहिजे असे वाटते.
अन याच पार्श्वभुमिवर डॉक्टर शिंदे यांचे अनुभवसिद्ध लिखाण आत्यंतिक गरजेचे आहे व सुयोग्य वेळेस प्रसारित होत आहे असे मला वाटते.
अर्थात हा धागा त्याकरता नाही. विषयांतर नको. सबब, असो. Happy

Pages