काका, मला s s वाचवा हो …… कथा काकांच्या काकदृष्टीला कळलेल्या करपल्लवीची !
पुण्यातील बैरामजी जीजीभॉय महाविद्यालयात प्रवेश मिळून माझ्या वैद्यकीय जीवनाचा श्रीगणेशा झाला ते साल होेते 1967 ! पुढील साडेपाच वर्षांमध्ये एम.बी.बी.एस. होऊन बीजे मेडिकलमधून बाहेर पडेपर्यंत काळ कसा भर्रकन निघून गेला ते कळाले देखील नाही. याच कालखंडात अनेक विद्वान, यशस्वी डॉक्टर्स शिक्षकांशी संपर्क आला. त्यांच्या जीवनाचे अनेक पैलू समजले, उमजले आणि आपणही त्यांचेप्रमाणे व्हावे अशी बीजे मनामध्ये रुजली ती देखील या "बीजे'च्याच प्रांगणामध्ये! येथेच एकापेक्षा एक धुरंधर, धन्वंतरी डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाची संधी मिळाली. त्यांच्या प्रगाढ ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा घेण्यासाठी त्यांची 'बेडसाईड क्लिनिक्स' आम्ही कधीच चुकविली नाहीत. प्रख्यात अस्थिरोगतज्ज्ञ डॉ.के.एस.संचेतींच्या 'क्लिनिक'ची वेळ असे रात्रौ दहा ते बारा वाजेपर्यंत! पण त्यांची शिकविलेली काही बोधवाक्ये मी अजूनही विसरलेलो नाही. असेच दुसरे एक विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्व होते सुप्रसिद्ध स्त्री-रोगतज्ज्ञ डॉ.एच.एन.फडणीस !
आमच्या हॉस्पिटल बॅच क्रमांक '151'ची डॉ.फडणीसांच्या युनिटला नेमणूक झाल्यामुळे, 'स' व 'श' ची आडनावे असलेल्या आम्हां दहा 'सशांना' खूपच आनंद झाला होता. डॉ.फडणीस म्हणजे एक अतिशय उमदे व्यक्तिमत्व ! पावणेसहा फुटांची, भरदार देहयष्टी व भरगच्च मिशा असलेले हे आकर्षक व्यक्तिमत्व वेशभुषेच्या बाबतीतही खूपच चोखंदळ होते. सुरेख थ्रीपीस सूट आणि त्यातील जॅकेटला अडकविलेले ऍन्टीक घड्याळ आणि त्याच्या जोडीस आपल्या क्षेत्रातील अगाध ज्ञान यामुळे हा माणूस नकळतच माझे रोल मॉडेल बनला. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे वक्तशीरपणा व विद्यार्थ्यांना शिकविण्याची आवड. येणाऱ्या पुढील काही वर्षांत ही सर्व वेशभूषा त्यागून त्यांनी भगवी वस्त्रे स्वीकारली. भगवान रजनीशांच्या हस्ते 'स्वामी अजितसरस्वती' अशी दीक्षा घेतल्यानंतर तर या माणसाविषयीचा माझ्या मनातील आदर आणखीच दुणावला.
ज्यांची कोणासही 'सर' येवू शकणार नाही असे माझे हे सर मनात घर करुन रहाण्यास कारणीभूत झालेला एक प्रसंग मी कधीच विसरु शकलो नाही.
वैद्यकीय अभ्यासक्रमानुसार आम्हाला वीस बाळंतपणे (डिलिव्हरीज) पाहण्याची व अभ्यासण्याची सक्ती होती. त्यामुळे दिवसभराचे कॉलेज संपल्यावर आठवड्यातील ज्या दिवशी आमच्या युनीटची 'ईमर्जन्सी' असे त्यावेळेस दिवसा व रात्री आम्ही 'लेबर रूम' अथवा बाळंत विभागामध्ये थांबत असू. नवीन बाळंत होऊ घातलेली रुग्ण आली की तिची माहिती लिहून घेऊन ती 'मोकळी' होईपर्यंत तिचा आम्ही फॉलोअप करीत असू व आमच्या डायरीत नोंद घेत असू. फडणीस युनीटला 'रेसिडेंट रजिस्ट्रार डॉक्टर' होते डॉ सुरेश देशपांडे. अतिशय साधा, कष्टाळू, मन लावून काम करणारा, शिकण्याची व शिकविण्याची आवड असणारा माणूस !
अशाच एका संध्याकाळी, आम्ही सर्व 'सशे' केस घेण्यासाठी ऑपरेशनच्या थिएटरच्या प्रसुती कक्षामध्ये, अर्थात लेबर रुममध्ये दाखल झालो. हिस्टरी घेण्याचे काम आमच्या बॅचमधील मीना सुब्रम्हण्यम उर्फ सुब्बू करीत असे. आज एक पेशंट जुन्नरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राने 'अवघड केस' म्हणून ससूनला पाठविली होती. डॉ.देशपांडे त्या पेशंटच्या आईशी बोलत असताना आम्ही आमच्या डायरीत हिस्टरी लिहीत होतो. पेशंट सखुबाईला पूर्ण दिवस भरुन गेले दोन दिवस 'कळा' येत होत्या. गर्भाशयातील गर्भाभेावतीची पाण्याची पिशवी फुटून त्यातील पाणी वाहूनही बरेच तास होऊन गेले होते. खरे म्हणजे आतापर्यंत बाई मोकळी व्हायला हवी होती. पण प्रसुती होत नव्हती, भरपूर कळा येत होत्या आणि अघटीत म्हणजे बाळाचा हात येानीमार्गातून बाहेर आला होता. डॉ.देशपांडे सांगत होते की सखुबाईला बाळाची हालचाल जाणवत नाही म्हणजेच बाळ बहुतेक पोटातच दगावलेले असावे. शिवाय फेटोस्कोपमध्ये बाळाचे 'हार्ट साऊंडस्' ऐकू येत नव्हते. त्या काळात सानोग्राफी यंत्राचा शोध लागलेला नव्हता व बाळाचे हृदयाचे ठोके मोठे करुन ऐकण्याचे 'फीटल़् डॉपलर' हे यंत्र काही ठराविक खाजगी रुग्णालयांतच उपलब्ध होते. आजकाल सोनोग्राफी यंत्रे खेडोपाडी पोहोचली आहेत त्यामुळे पूर्वीच्या काळी वापरात असलेले व बाळाचे हृदयाचे ठोके ऐकण्यासाठी वापरले जाणारे 'फेटोस्कोप' नावाचे ऍल्युमिनिअम धातूचे नरसाळ्यासमान 'यंत्र' आता संग्रहालयात जमा झाले आहे. बाळंतीण अडलेली असून बाळाचा हात आईच्या योनिमार्गामधून बाहेर डोकावत होता, अर्थात 'हॅन्ड-प्रोलॅप्स' झाला होता. अशा परिस्थितीमध्ये बाळ दगावले असताना उगाचच सिझेरियन करण्यापेक्षा, बाईला भूल देऊन बाहेर आलेला हात परत गर्भाशयात ढकलून व बाळाला गर्भायाशमध्ये फिरवून पायांकडून प्रसूती करतात. या क्रियेला 'पोडॅलीक व्हर्शन' असे म्हणतात.
"पण सर बाळाचे डोके मोठे असल्यामुळे बाई अडली असून नैसर्गिक प्रसुती होत नसेल तर मग रिपोझिशनिंग नंतर तरी कशी होणार?'' आमच्या बॅचमधील एका भावी स्त्री-रोगतज्ज्ञाने विचारले.
डॉक्टर देशपांडे म्हणाले, "अरे बाळा! जर बाळ दगावले असेल तर त्याचा मेंदू द्रव अवस्थेत असतो व त्यामुळे डोक्याचा आकार लहान झाल्यामुळे डिलिव्हरी होऊ शकते. काही प्रॉब्लेम आला तर इंजेक्शनद्वारे मेंदूतील द्रव काढून आपण हेडसाईज लहान करु शकतो. आता मला डॉ.फडणीसांची परवानगी घ्यावी लागेल मग आपण पुढील क्रिया चालू करु या.'' आमच्या बरोबर एवढे बोलून डॉ.देशपांडे यांनी डॉ.फडणीसांना फोन लावला. फडणीस सरांचा उत्साह आणि जबाबदारीची जाणीव तेवढीच दांडगी !
"हे पहा डॉ.देशपांडे, तुम्ही सर्व तयारी करा. प्रोसिजर तुम्हीच कराल पण मी तुमच्या मागे ऊभा राहीन. मी माझी ओपीडी संपवून आठ वाजेपर्यंत पोहोचतोच.'' सरांनी फोनवर डॉ.देशपांडेंना सांगितले. ससूनमध्ये मानद तज्ज्ञ पैशाच्या मोबदल्याची जाणीव न बाळगता व आपली खाजगी प्रॅक्टीस सांभाळूनही सेवा देण्यासाठी वेळी अवेळी येत असत.
आठ वाजले. कॅन्टिन बंद होण्याच्या आधी चहा व बटाटेवडे खाऊन आम्ही ऑपरेशन रुममध्ये दाखल झालो. बरोबर आठच्या ठोक्याला डॉ.फडणीस गाऊन चढवून ऑपरेशन कक्षामध्ये आलेच होते. सिस्टर इनचार्जने अर्धा टेबल फोल्ड करुन सखूला लिथॉटॉमी पोझिशन देऊन तयार केले होते. सखूबाई पूर्ण शुद्धीवर होती, तिचे दोन्ही पाय वर करुन अडकविलेले होते. पोटावर स्टेराईल टॉवेल लावून फक्त प्रसुतीची जागा मोकळी ठेवली होती व त्या टॉवेलच्या गोल छिद्रामधून डोकावत होता बाळाचा एक चिमुकला हात!
टेबलपासून समोर सर्जिकल गाऊन व ग्लोव्हज घालून डॉ.देशपांडे सखूबाईच्या दोन पायांमधील जागेत बसले होते तर त्यांच्या बरोबर मागे डॉ.फडणीस सर उभे होते. त्यांच्यामागे गाऊन, मास्क व टोपी घालून आमची बॅच उभी होती. फडणीस सर डॉ.देशपांडेंना सूचना देत होते व मधूनच आम्हाला काही प्रश्न विचारुन स्वतःच उत्तरे देत होते. मी सरांच्या मागेच उभा राहून सरांचे पिळदार शरीर व त्याकाळातले इम्पोर्टेड जॉकीचे बनियान बघून एकमेकांना खुणावत होतो. आमच्याशी बोलत बोलत शिकविणारे फडणीस सर बोलण्याचे अचानक थांबले. डॉ.देशपांडेंच्या पाठीवर थाप मारुन म्हणाले, "सुरेश, जरा उठ बघू!'' आपले काही चुकले नाही ना या भितीने डॉ.देशपांडे दचकलेच !
डॉ.फडणीस , "सिस्टर गुजर, हे प्रोसीजर ताबडतोब थांबवा. पेशंटचा बेड सरळ करा, पाय सोडवा आणि ईमर्जन्सी सिझेरियनची तयारी करा!''
सिस्टर , "इन्स्ट्रुमेंटस् ट्रे तयार आहे पण ऍनेस्थेटीसला बोलवावे लागेल, अर्धा तास तरी लागेल.''
डॉ.फडणीस, "छे छे, तेवढा वेळ नाही. अर्जंट ऑपरेशन करावे लागणार आहे. ते आपण लोकल ऍनेेस्थेशियाखाली करुया. भूल देण्यासाठी झायलोकेनचा पूर्ण बल्ब लागणार आहे. मला झायलोकेन सिरींजमध्ये भरुन द्या. मी वॉश होऊन आलोच. ''
पुढच्या एक मिनिटातच ऑपरेशन रुमचे रुप पालटले, एखाद्या फिरत्या रंगमंचावर सीन बदलावा तसे ! डॉ.फडणीस स्वतः सिझेरियन करणार होते. अशा तीन-चार शस्त्रक्रिया आम्ही पाहिल्या होत्या पण त्यांच्यापेक्षा ही वेगळीच होती. यात पेशंटला जनरल किंवा स्पायनल ऍनेस्थेशिया न देता केवळ लोकल ऍनेस्थेशिया देऊन शस्त्रक्रिया होणार होती. असे खरोखर 'तात्काळ' ऑपरेशन आम्ही प्रथमच पाहत होतो. आतापर्यंत मी असे प्रसंग जॉर्ज सावा किंवा रिचर्ड गॉर्डनच्या कथांमध्येच वाचले होते. सरांनी पेशंटच्या कानात दोन शब्द सांगून त्यांचे काम सुरु केले. सखूच्या पोटावरुन आपली बोटे फिरवून त्यांनी गर्भाशयाचा अंदाज घेतला. इकडेतिकडे न बघता त्यांनी तिच्या पोटावर सरळ रेषेमध्ये झायलोकेनची इंजेक्शने देणे भरभर सुरु केले. पुढच्या दोनच मिनिटांमध्ये सरांनी स्कालपेलने सखूबाईचे पोट उघडले, गर्भाशयाच्या पिशवीचा अंदाज घेतला व भर्रकन स्कालपेलने पिशवीचा छेद घेतला आणि सरांच्या बोटांनी एखादा मातीचा घट घडवल्यानंतर चाकावरुन अलगदपणे उचलावा तसे एक नवजात शिशु अर्भक पुढच्याच क्षणी बाहेर काढून डॉ.देशपांडे यांच्या हातात अलगद ठेवले. सिस्टर गुजर बाळाची नाळ कापत असताना चाललेला कृष्णजन्माचा हा अभिनव सोहळा पाहताना मला मात्र मायकेल अँजलोच्या "द क्रिएशन ऑफ मॅन'' या पेंटींगची प्रकर्षाने आठवण झाली.
डॉ.देशपांडे मात्र पुढील सूचनांची वाट पहायला थांबलेच नाहीत. कोपऱ्यात जाऊन बाळाच्या रेस्पिरेशनची अर्थात पहिल्या श्वासोच्छवासाची तयारी करु लागले. बाळाचे दोन्ही पाय हातात धरुन त्याला हवेत उलटे टांगलेल्या अवस्थेत धरुन त्याच्या तोंडात बोटे घालून श्वासमार्ग मोकळा केला. पुढच्याच 15 सेकंदांमध्ये बाळाने मोठा टाहो फोडला आणि आमच्या सर्वांचे डोळे पाणावले, अगदी डॉ.फडणीसांचे देखील! सर गाऊनच्या हाताने कपाळावरील घर्मबिंदू पुसून गर्भाशय शिवण्याच्या तयारीला लागले होते. सिस्टर लगबगीने सरांनी न सांगताच पुढील स्टेप ओळखून त्यांना हत्यारे, सुया, दोरे देत होत्या. आम्ही सर्व देहभान हरपून हे नाट्य डोळ्यात साठवून घेत होतो.
ऑपरेशन संपवून सर पेशंटला म्हणाले, "बाई, सर्व व्यवस्थित आहे, तुला मुलगा झालाय. चांगला आहे तो ! आता स्वस्थ झोप.'' सखूबाईच्या अश्रूंना उसंत नव्हती. आपल्या अर्धोन्मिलीत डोळ्यांनी ती त्या देवदूताची धूसर मूर्ती डोळ्यात साठवून ठेवीत होती.
डॉ.फडणीस कपडे बदलून परत जाण्यास निघाले. डॉ.देशपांडे सरांचा कोट घेऊन उभे होते. आमच्या बॅचमधील भावी बालरोगतज्ज्ञ 'सुब्बू'ने पुढे होऊन सरांना विचारले, "सर, तुम्ही कसे ओळखलेत की ते बाळ जिवंत आहे म्हणून ?''
तिच्या प्रश्नाला दाद देत सर म्हणाले, "अहो, जेव्हा त्या बाईच्या योनीभागाला सॅव्हॅलॉन लावून जंतुविरहीत करण्याची क्रिया चालू होती तेव्हा त्या बाळाच्या हातावरही सॅव्हॅलॉन पडले आणि त्याच्या थंडाईमुळे त्या बाळाने पटकन हाताची बोटे हलविली."
अर्थात ही 'करपल्लवी' दिसली सर्वान्ना पण उमजली ती फक्त डॉ.फडणीसांनाच व त्यांच्यातील देवदूताला !
खरोखरच … "फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, विठ्ठला, तू वेडा कुंभार !"
परत एक सुरेख लेख... डॉ ला
परत एक सुरेख लेख... डॉ ला देवदूत का समजतात ते अशा कथा वाचल्या की परत एकदा जाणवते..
खरच डॉ तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद हे सर्व लेख रुपाने आमच्या समोर ठेवल्याबद्द्दल..
अफाट! खरच देवदूतच. अंगावर
अफाट! खरच देवदूतच. अंगावर काटा आला डॉक.
हॅट्स ऑफ टू डॉ. फडणीस सर!
हाही लेख मस्तचं. खरोखर डॉ. हे
हाही लेख मस्तचं. खरोखर डॉ. हे देवदूतच!
सुरुवातीला वाचु कि नको अस झाल
सुरुवातीला वाचु कि नको अस झाल होत , सखुबाई ची अवस्था वाचुन काहितरी भयंकर शेवट असेल अस वाट्ल्...पण शेवट वाचुन डोळ्यातल पाणी मात्र नाही थांबवु शकले...धन्यवाद डॉ असे अनुभव शेअर करण्याबद्दल.. ...तुमची लेखण शैली अप्रतिम....
हा लेख वाचताना अक्षरश: अंगावर
हा लेख वाचताना अक्षरश: अंगावर काटा आला, शेवट वाचून खरंच डोळ्यांत पाणी आलं.
नो वर्ड्स! इतके अलर्ट डॉक
नो वर्ड्स!
इतके अलर्ट डॉक सॅलूट!
खालचे वाक्य वाचल्यावर अंदाज आलाच की, बाळ जिंवत असावे. अगदी पुढचा पॅरा वाचण्याच्या आधी चर्र झाले. समजा ती मेंदूची प्रोसिजर झाली असती तर बाळ जिम्वत नाही वाटून..
मग पुढे जसे वाचत गेले (श्वास रोखूनच) व डोळे फाडून... आणि जेव्हा वाचले की, बाळाने टाहो फोडला. तेव्हा बरं वाटल.
(डॉक, सॉरी पण का कुणास ठावूक, हे असे डॉक नाहि आहेत का आताशा? की आमच्यासारख्यांना भेटत नाही असे उगीच मनात येते असे लेख वाचले की.)
डॉ... अंगावर काटा आणि डोळ्यात
डॉ... अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी... लिहुच शकत नाही यापुढे काही...
खरोखर देवदूत दूसरा शब्दच
खरोखर देवदूत
दूसरा शब्दच नाही
फडणीस डॉक्टरांना
पुन्हा एकदा अप्रतिम लेख
अप्रतिम.. डॉ. फडणीसांना
अप्रतिम.. डॉ. फडणीसांना __/\__
लेखाचे शिर्षक आणि लेख दोन्ही मस्त आहेत.
सुंदर लेख. डॉक्टर म्हणजे
सुंदर लेख. डॉक्टर म्हणजे देवदुतच.
फार सुरेख! प्रतिक्रिया
फार सुरेख! प्रतिक्रिया द्यायला शब्द नाहित.
speechless
speechless
______/\_______ हा लेख
______/\_______
हा लेख वाचताना अक्षरश: अंगावर काटा आला, शेवट वाचून खरंच डोळ्यांत पाणी आलं.>>>>>अगदी अगदी.
फार सुरेख! प्रतिक्रिया
फार सुरेख! प्रतिक्रिया द्यायला शब्द नाहित.>>>> +१०००....
तुम्हा सर्वांना फक्त वंदनच ...... _____________________/\_____________________
सुरेख लेख.
सुरेख लेख.
जबरदस्त !!
जबरदस्त !!
डॉ. शिंदेसर - एक विनंती - या
डॉ. शिंदेसर - एक विनंती - या डॉ. फडणीसांचा एखादा फोटो इथे कृपया टाकू शकाल का ??
सुंदर लेख. डॉक्टर म्हणजे
सुंदर लेख. डॉक्टर म्हणजे देवदुतच. >>>> +१. खरच, अंगावर काटा आला वाचताना..
सुंदर लेख. मानद तज्ज्ञ
सुंदर लेख.
मानद तज्ज्ञ पैशाच्या मोबदल्याची जाणीव न बाळगता व आपली खाजगी प्रॅक्टीस सांभाळूनही सेवा देण्यासाठी वेळी अवेळी येत असत.>>>>>>>>>>
काळ बदलला डॉ.
हा लेख वाचताना अक्षरश: अंगावर
हा लेख वाचताना अक्षरश: अंगावर काटा आला, शेवट वाचून खरंच डोळ्यांत पाणी आलं. >>> +१
त्या बाळाच पुनर्जन्मच झाल्यासारखं आहे
बाप्रे! कल्पनाही करवत नाही.
बाप्रे! कल्पनाही करवत नाही. ..डॉक्टरांच्या जर्राशा नजरचुकीने काय झालं असतं याची.
हा ही लेख अत्युच्च!
सुन्दर लेख.
सुन्दर लेख.
सुरुवातीला वाचु कि नको अस झाल
सुरुवातीला वाचु कि नको अस झाल होत >>++१११
खरच सलाम........
हा लेख वाचताना डोळ्यांत पाणी आलं.....
मस्त कमालिची समयसुचकता
मस्त
कमालिची समयसुचकता
डॉ. काका...... खरच, अंगावर
डॉ. काका......
खरच, अंगावर काटा आला वाचताना.. आणि शेवट वाचून खरंच डोळ्यांत पाणी आले
अक्षरशः श्वास रोखून वाचला हा
अक्षरशः श्वास रोखून वाचला हा लेख! मेडीकल क्षेत्रातील असे अनोखे अनुभव आपल्या खुमासदार शैलीत वाचायला मिळत आहेत हे परम भाग्य. लिहीत राहा... आपल्या लेख मालिकेतला प्रत्येक लेख वाचतेय. प्रतिक्रिया मात्र आवर्जून देत नव्हते
अप्रतिमच. डोळे पाणवले...
अप्रतिमच. डोळे पाणवले... त्या सखुबाईला साक्षात देव भेटला म्हणायचे. तीचे भाग्य थोरच!
सुंदर लेख! डॉ. फडणीसांना
सुंदर लेख! डॉ. फडणीसांना ______________/\_________________. किती लक्षपूर्वक काम करण्याची पद्धत.
धन्यवाद डॉक्टर.
हा लेख वाचताना अक्षरश: अंगावर काटा आला, शेवट वाचून खरंच डोळ्यांत पाणी आलं.>>>>>>>>+ १
आर्या + १
अप्रतीम लेख…… खरच डोळ्यातून
अप्रतीम लेख…… खरच डोळ्यातून पाणी आले
अक्षरशः श्वास रोखून वाचला हा
अक्षरशः श्वास रोखून वाचला हा लेख! मेडीकल क्षेत्रातील असे अनोखे अनुभव आपल्या खुमासदार शैलीत वाचायला मिळत आहेत हे परम भाग्य. लिहीत राहा... आपल्या लेख मालिकेतला प्रत्येक लेख वाचतेय. प्रतिक्रिया मात्र आवर्जून देत नव्हते
Pages