गुंतता हृदय हे ....
पुण्याच्या शुक्रवार पेठेतील "श्री शिवाजी मराठा हायस्कूल' ही एक जुनी व नामवंत शाळा. मी याच शाळेत शिकलो. शिक्षणमहर्षी गुरुवर्य श्री.बा.ग.जगताप यांनी ही शाळा नव्वद वर्षांपूर्वी सुरु केली. गुरुवर्यांच्या कुटुंबाशी माझे गेली तीस वर्षे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध जुळलेले. त्यांच्या अनेक आरोग्यविषयक समस्या मी हाताळल्या.
त्यातील असाच एक अविस्मरणीय प्रसंग.....
जगताप साहेबांचे नातू प्रा.जयप्रकाश जगताप हे एक उत्तम चित्रकार, लेखक व अभिनव कला महाविद्यालयामध्ये कलाप्राचार्य होते. एकोणीसशे नव्वद सालामधील एके दिवशी जयप्रकाश सर सपत्नीक माझ्या क्लिनिकमध्ये आले.
"आजकाल सरांची तब्येत जरा नरम असते. लवकर थकतात. दोन जीने चढल्यावर थोडा वेळ थांबावे लागते, दम लागतो, जेवणही कमी झाले आहे. आज मुद्दाम वेळ काढून त्यांची तब्येत आपल्या नजरेखालून घालण्यासाठी त्यांना घेऊन आले आहे. तुम्हाला योग्य वाटतील त्या सर्व तपासण्या करुन घ्याव्यात असे मला वाटते.'' सौ.जगताप म्हणत होत्या.
मी सरांना तपासत असतानाच त्यांच्या जीभेचा रंग नेहमीप्रमाणे तांबडा नसून फिक्कट गुलाबी असल्याचे माझ्या प्रथमदर्शनीच लक्षात आले होते. त्याच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी झाल्याचे ते निदर्शक होते. त्यांच्या सर्व तक्रारी बहुतेक त्यामुळेच, म्हणजेच रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी आल्यामुळे असाव्यात असा माझा प्राथमिक अंदाज होता.
"सर, तुमच्या तपासणीमध्ये तुमचे रक्तातील लाल रंगद्रव्य म्हणजे हिमोग्लोबीन कमी झाले आहे असे मला वाटते. यालाच आम्ही "ऍनिमिया' असे म्हणतो. याची मुख्यत्वेकरुन दोन कारणे संभवतात. एक म्हणजे नवीन रक्त तयार होण्यासाठी लागणारे घटक म्हणजेच "रॉ मटेरीयल'' कमी उपलब्ध असल्यास रक्तातील हिमोग्लोबीन कमी होते. आहारामध्ये 'लोह' कमी असल्यास अथवा 'ब' जीवनसत्वाचा अभाव असल्यास असे होते. दुसरे मुख्य कारण म्हणजे तयार झालेले रक्त काही कारणामुळे वाहून जाते. 'हूक वर्म' नावाचे जंत आपल्या आतड्यात राहून आपल्या रक्ताचे शोषण करतात अथवा जठरातील 'अल्सर' अथवा 'मूळव्याध' यांच्याद्वारे रक्त वाहून जाते व त्यामुळे रक्तक्षय अथवा ऍनिमिया उद्भवतो.''
सरांच्या सारख्या उत्तम आरोग्य असणाऱ्या माणसाला 'ऍनिमिया' का व्हावा याचे कारण काही पटकन लक्षात येत नव्हते. म्हणूनच सरांना रक्ताच्या काही प्राथमिक तपासण्या, शौचाची तपासणी, छातीचा एक्स-रे व पोटाची सोनोग्राफी इत्यादी चाचण्या करावयास सांगून त्यांना मी दुसऱ्या दिवशी पुन्हा येण्यास सांगितले. दुसऱ्याच दिवशी सर्व रिपोर्टस् घेऊन जगताप दांपत्य पुन्हा हजर झाले. मी अपेक्षिल्याप्रमाणे सरांचे हिमोग्लोबीनचे प्रमाण पंधरा ग्रॅम ऐवजी फक्त आठ ग्रॅमच होते. म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के रक्त कमी होते. रक्तामध्ये लोह व 'ब' जीवनसत्व असे दोघांचेही प्रमाण कमी दिसत होते. पोटाची सोनोग्राफी नॉर्मल होती. मात्र छातीच्या एक्स-रे मध्ये मला त्यांच्या हृदयाचा आकार जवळजवळ दुप्पट झाल्याचे दिसत होते.
"सर, तुमच्या एक्स-रे मध्ये मला थोडा दोष दिसतो आहे, तुमच्या हृदयाचा आकार खूपच वाढला आहे. तुमचे हिमोग्लोबीन कमी असल्यामुळेदेखील असे होऊ शकते पण तुमच्या हृदयाचा आकार त्यामानाने जरा जास्तच वाढला आहे. आपण तुमच्या हृदयाचा ईसीजी काढू या.''
सरांशी एवढे बोलून मी त्यांचा ईसीजी काढण्याच्या तयारीस लागलो. आपल्या हृदयाचे स्पंदन आपल्या गर्भावस्थेमधील पाचव्या आठवड्यापासून सुरु होते व आयुष्यभर अव्याहतपणे चालू असते. आपल्या हृदयाच्या कार्याविषयीची माहिती त्याच्या विद्युतलहरींचा आलेख काढून 'ईसीजी'द्वारे मिळते. मी सरांना थोडीशी वैद्यकीय माहिती पुरवत असतानाच त्यांचा ईसीजी काढत होतो. सर मात्र मिश्किलपणे हसत होते.
"डॉक्टर, अहो माझे हे हृदय असेच मोठे आहे. मला त्याचा काहीही त्रास नाही. दहाबारा वर्षांपूर्वी माझा एक डॉक्टर मित्र ससून हॉस्पिटलमध्ये लेक्चरर होता. त्याने माझ्या एक्स-रे मध्ये दिसणाऱ्या 'विशाल हृदयाच्या' सर्व तपासण्या करुन घेतल्या होत्या. त्यांना काहीही कारण सापडले नव्हते. अर्थात मला काहीही त्रास नव्हता. त्यांनी तेव्हाच मला काळजी न करण्याचा सल्ला दिला होता व माझे हृदय जन्मापासूनच असे असल्याचे प्रमाणपत्रही दिले होते.''
एव्हाना ईसीजी काढून झाला होता व खरोखरच तो पूर्णपणे नॉर्मल होता.
"सर, तुम्ही पूर्वी जेव्हा तपासणी केली तेव्हापेक्षा आता एक नवीन तपासणी तंत्र उपलब्ध झाले आहे. आता आम्ही हृदयाची सोनोग्राफी करतो. सोनोग्राफी म्हणजे मानवाला लाभलेला जणू तिसरा डोळाच! या 'एको' टेस्टमध्ये आम्ही हृदयामध्ये अतिकंपनीय ध्वनीलहरी सोडून त्यांच्या प्रतिध्वनीचा अभ्यास संगणकाद्वारे करतो. त्यातून हृदयाची प्रतिमा तर दिसतेच पण हृदयक्रियेचा व हृदयातील भागांच्या हालचालीचा चलतचित्रपट आपल्याला संगणकाच्या पडद्यावर दिसतो. हृदयाच्या स्नायुंचे कार्य, झडपांचे कार्य व हृदयाच्या रचनेची व कार्याची माहिती आपल्याला 'एको' टेस्टमध्ये होते. आपल्या हृदयाभोवती एक आवरण असते त्याला आम्ही 'पेरिकार्डीयम' असे म्हणतो. आपले हृदय या पेरीकार्डीयमच्या पिशवीमध्ये असलेल्या पोकळीमध्ये स्पंदन करीत असते. काही आजारांमध्ये या पोकळीमध्ये पाणी साठून एक्स-रे मध्ये हृदयाचा आकार वाढल्याप्रमाणे दिसतो. म्हणून आपण तुमची ही तपासणी केल्यास निदान होण्यास मदत होईल, असे सांगून मी त्यांना पुण्यातील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये 'एको' टेस्ट करण्यास पाठविले. 'एको' टेस्टचा रिपोर्ट घेऊन जगताप दांपत्य लागोपाठ तिसऱ्या दिवशी चिंताक्रांत चेहऱ्याने पुन्हा माझ्याकडे आले. रिपोर्ट मला आधीच फोनवर समजला होता व तो पूर्णतः नॉर्मल होता.
"सर, अभिनंदन! रिपोर्ट ओ.के. आहे. आता तपासण्या संपल्या. बहुतेक आहारातील कमतरतेमुळे तुमचे रक्त कमी असावे. यापुढेही आणखी काही तपासण्या आहेत पण त्या करण्यापूर्वी आपण एक महिना रक्त वाढण्याची औषधे घेऊन पाहूयात. जर रक्तामध्ये वाढ झाली नाही तर मात्र पुढील तपासण्या कराव्या लागतील.'' असे सांगून मी सरांच्यासाठी औषधयोजना लिहून ती त्यांना समजावून दिली.
जंताचे औषध, लोहयुक्त गोळ्या व 'ब' जीवनसत्वाची इंजेक्शने असे प्रिस्क्रिप्शन व आहारविषयक सल्ला देऊन त्यांना मी पुन्हा एक महिन्यानंतर हिमोग्लोबीनचा नवा रिपोर्ट घेऊन बोलविले.
सरांनी तीन महिने नियमितपणे औषध घेतले व त्यांना खूपच आराम वाटला. हिमोग्लोबीनचे प्रमाण नॉर्मल रेंजमध्ये आले. पण त्यांचा एक्स-रे मात्र तसाच राहीला. माझ्या मनाला हे पटत नव्हते. पण सरांना त्याचा काही त्रास नसल्यामुळे पुढील तपासणीसाठी मीही फारसा आग्रह धरला नाही.
पुढे चार-पाच वर्षे अशीच भरभर निघून गेली. एके दिवशी संध्याकाळी जगताप सर पुन्हा माझ्याकडे आले. "मी रोज सकाळी फिरण्यास जातो. पण गेले काही दिवस मला चालल्यावर पुन्हा दम लागतो आहे व यावेळी नवीन तक्रार म्हणजे चालल्यावर छाती भरुन येते व छातीमध्ये धडधड होते. सकाळी झोपेतून उठल्यानंतर मी थोडेफार हातपाय हलवून व्यायाम करताना देखील धडधड जाणवते पण मी पुन्हा आडवा झालो तर धडधड थांबते.''
सरांची जीभ आता पूर्वीसारखी फिक्कट दिसत नव्हती म्हणजेच आता ऍनिमियाचा प्रॉब्लेम दिसत नव्हता. पण ईसीजीमध्ये हृदयाचे ठोके अनियमित झालेले दिसत होते.
"सर, तुमची आताची लक्षणे जरा जास्तच गंभीर वाटतात. ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन तपासण्या करावयास हव्यात. हृदयाच्या रक्तपुरवठ्यामध्ये अडथळा आला असण्याची शक्यता आहे. ईसीजीमध्ये तुमच्या हृदयाचे ठोके अनियमीत असल्याचे दिसते आहे.''
जगताप सर माझी सूचना शिरोधार्य समजून तांतडीने पूना हॉस्पिटलमध्ये अतीवदक्षता विभागामध्ये दाखल झाले.
माझे पेशंट संपवून रात्री मी त्यांना पहाण्यासाठी गेलो तेव्हा ते हॉस्पिटल बेडवर आराम करीत होते. त्यांना जोडलेल्या मॉनिटरवर त्यांच्या 'ईसीजी'चा आलेख सतत दिसत होता. तो नॉर्मल दिसत होता. हृदयाचे स्पंदन नियमित झाले होते, ठोके चुकत नव्हते.
सरांनी मात्र त्यांच्या हृदयक्रियेविषयी स्वतःच अभ्यास केला होता.
"डॉक्टर, मी तुम्हाला माझे ठोके चुकवून दाखवितो''
असे म्हणून ते बेडवर उठून बसले व पुढे वाकून त्यांनी त्यांच्या पायाची बोटे पकडली. आणि काय आश्चर्य मॉनिटरवरील त्यांच्या ईसीजीमधील हृदयाच्या आलेखातील ठोके संपूर्णपणे अनियमित झाले.
"आता मी पुन्हा माझा 'ईसीजी' नॉर्मल करुन दाखवितो''
असे म्हणून पुन्हा ते बेडवर आडवे झोपले आणि खरोखरच त्यांचा 'ईसीजी' पुन्हा नॉर्मल कंपने दाखवू लागला.
या आश्चर्यकारक प्रकाराचे उत्तर माझ्याकडे नव्हते.
"निसर्गामध्ये प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण जरूर असते ! आपण उद्या सकाळी तुमची 'एको' टेस्ट पुन्हा करु या व जरुर पडल्यास तुमची अँजिओग्राफीसुद्धा करावी लागेल. त्यामुळे तुमच्या हृदयाला होणाऱ्या रक्तपुरवठ्यामध्ये कोठे काही अडथळा आला असल्यास आपल्याला कळेल.'' एवढे सांगून मी पुढील पेशंट पहाण्यासाठी निघालो.
दुसऱ्या दिवशी सकाळीच सरांची 'एको' टेस्ट झाली. ती यावेळी केली होती सुप्रसिद्ध हृद्रोगतज्ज्ञ डॉ.जगदीश हिरेमठ यांनी ! 'एको' टेस्ट करताना वापरला जाणारा 'प्रोब' नेहमी छातीच्या डाव्या भागावर ठेवतात. त्याच्या ठराविक जागा असतात. जगताप सरांच्या हृदयाचा आकार मोठा असल्याने सरांच्या हृदयाचा काही भाग नेहमीप्रमाणे छातीच्या डाव्या बाजूला तर होताच पण काही भाग उजव्या भागातही होता. केवळ उत्सुकता म्हणा किंवा अभ्यासू प्रवृत्ती म्हणून डॉ. हिरेमठ यांनी सोनोग्राफीचा प्रोब जगताप सरांच्या छातीच्या उजव्या भागावर देखील लावला आणि काय आश्चर्य ! त्यांना दिसले की, सरांच्या हृदयाच्या उजव्या बाजूला व शेजारी पण पेरीकार्डीयमच्या पोकळीमध्ये क्रिकेटच्या चेंडू एवढी एक गाठ, अथवा ट्युमर होते. 'एको' टेस्टने सरांचे निदान केले होते. गेली अनेक वर्षे ही गाठ सरांच्या हृदयाच्या शेजारी ठाण मांडून बसली होती व ती अत्यंत हळूहळू वाढत होती. नेहमीच्या एक्स-रे मध्ये ती गाठ व हृदय याची मिळून एकच छाया, शॅडो, दिसत होती. तिचा उलगडा आज झाला होता. डॉ.हिरेमठांनी ही 'ब्रेकिंग न्यूज' फोन करुन मला सांगितली तेव्हा त्यांच्या आवाजातील आनंद त्यांना लपविता येत नव्हता.
तेव्हा नुकतेच पुण्यामध्ये नवीन 'एमआरआय स्कॅन' नावाचे मशिन आले होते. दुसऱ्याच दिवशी हृदयाचा एमआरआय स्कॅन झाला. स्कॅनमध्ये हृदयाच्या शेजारील ट्युमर स्पष्ट दिसत होते व त्याचा दाब आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांवर येत होता. त्यामुळेच काही विशिष्ट शारीरिक हालचालींमुळे सरांची हृदयक्रिया अनियमित होत होती. सरांनी अभ्यासलेल्या विचित्र लक्षणाचे शास्त्रीय कारण आता सापडले होते.
पुढील दोनच दिवसात सरांच्या हृदयाशेजारील ट्युमरचे ऑपरेशन हृदयशस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. सुधीर भाटे यांनी केले.
सरांच्या सुदैवाने ती गाठ आजूबाजूला पसरलेली नव्हती, म्हणजे ती साधीच गाठ होती, कॅन्सर नव्हता ! आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सुमारे पाचशे ग्रॅम वजनाच्या या ट्युमरच्या आत होती एक पोकळी व त्यात होता एक केसांचा पुंजका व काही दात! 'टेरॅटोमा' नावाचा हा विचित्र ट्युमर गर्भावस्थेमध्येच गर्भपेशींपासून तयार होतो म्हणून त्यात केस व दात असतात. 'हृदयांबुजीचा मकरंद ठेवा' डॉक्टर भाट्यांनी 'चोरल्या'मुळे शस्त्रक्रियेनंतर काढलेल्या छातीच्या एक्स-रे मध्ये सरांचे हृदय आता तुमच्या माझ्याप्रमाणेच 'नॉर्मल' दिसत होते. टेरॅटोमाच्या केसांच्या गुंतावळीमध्ये अनेक वर्षे गुंतलेले सरांचे हृदय आता जणू बंधनमुक्त झाले होते.
--------------
Speechless!
Speechless!
भन्नाट!
भन्नाट!
kaay bhnnaaT anubhav ho ekek
kaay bhnnaaT anubhav ho ekek !
बाप्रे !!
बाप्रे !!
भन्नाटचअआहे.
भन्नाटचअआहे.
बापरे! ऐकावे तर नवलच! सर आपण
बापरे! ऐकावे तर नवलच!
सर आपण या लेखात नवीन माहिती तर दिलीच त्याबरोबरच अॅनिमियाची कारणे अत्यंत खुबीने सांगितलीत.
बापरे भन्नाट अनुभव आहे एकदम
बापरे
भन्नाट अनुभव आहे एकदम
भन्नाट! _/\_
भन्नाट! _/\_
अप्रतिम
अप्रतिम
काय मुलखावेगळा अनुभव !
काय मुलखावेगळा अनुभव !
आयशप्पत डॉक्टरसाहेब, तुमच्या
आयशप्पत डॉक्टरसाहेब, तुमच्या जादूच्या पोतडीतून कायकाय निघेल ते सांगता येत नाही! प्रा. जयप्रकाश यांनी जुळ्या भावाचा घास घेतला असं म्हणता येईल का?
आ.न.,
-गा.पै.
oh my god!! asa pan hou
oh my god!! asa pan hou shakta!?
बापरे... किती चित्र-विचित्र
बापरे... किती चित्र-विचित्र अनुभव आहेत तुमच्या पोतडीत... आणि ते सांगण्याची पद्धतही विलक्षण आहे... छान आहे.
@गा.पै. :<<<प्रा. जयप्रकाश
@गा.पै. :<<<प्रा. जयप्रकाश यांनी जुळ्या भावाचा घास घेतला असं म्हणता येईल का?>>>आपण म्हणताय त्याला आम्ही 'FOETUS IN FETU' असे म्हणतो जेथे गर्भावस्थेमध्ये दोन जुळी भावंडे एकच वार (placenta) शेअर करतात आणि मग त्यातील सशक्त अशक्ताला गुरफटून टाकतो, sort of भक्षण करतो ! जग्तापांना असलेले ट्युमर Dermoid cyst होते. बाकी आपल्या अगाध वाचनाचे कौतुक !!
ओह, असेही ट्युमर्स असतात तर
ओह, असेही ट्युमर्स असतात तर .......
तुमची लेखनशैली नेहेमीप्रमाणेच मस्त ....
जबरी...
जबरी...
बापरे डॉ. काका..... एकदम च
बापरे डॉ. काका.....
एकदम च चित्र-विचित्र अनुभव आहे हा....
भन्नाट! तुमची लेखनशैली
भन्नाट! तुमची लेखनशैली अप्रतिम .....हेवेसांनल
बापरे ह्या सुरस आणि चमत्कारीक
बापरे ह्या सुरस आणि चमत्कारीक कथा आहेत.
खरतर ,डॉक्टर काका, तुम्हाला निरस डॉक्टरी निदानाना सुरस करण्याची हातोटी आहे. कोणीही डॉक्टर त्या ट्युमरला लांबलचक लॅटिनोद्भव नावाचा शिक्का मारेल, तुम्ही त्याला मर्मबंधातली ठेव म्हणताय
बापरे! ऐकावे तर नवलच!
बापरे! ऐकावे तर नवलच!
मुलखावेगळा अनुभव ! सांगण्याची
मुलखावेगळा अनुभव !
सांगण्याची पद्धतही विलक्षण आहे,छान आहे.
@इन्ना :<<<तुम्ही त्याला
@इन्ना :<<<तुम्ही त्याला मर्मबंधातली ठेव म्हणताय >>>ही कथा लिहिताना सन्यस्त खड्ग या श्री विवेकानंदांवर आधारीत स्वा. सावरकर यांनी लिहिलेल्या नाटकाविषयी वाचले. श्री विवेकानंद म्हणजे डॉ . अप्पासाहेब पेंडसे यांचे दैवत आणि अप्पा माझे !
त्यामुळे या नाटकाविषयी उत्सुकता निर्माण झाली. म्हणून हे नाटक कोठे वाचायला/पाहायला मिळेल, ही माहिती कोणास असेल तर अवश्य कळवा.
डॉक्टर काका मी नक्की शोधेन,
डॉक्टर काका मी नक्की शोधेन, शाळेत नाट्यवाचन केल होत, ते आठवत.
विपु मधे लिंक पाठवली आहे.
भन्नाटच आहे सगळे
भन्नाटच आहे सगळे
खुपच छान लेख. तुमचे सगळेच लेख
खुपच छान लेख. तुमचे सगळेच लेख अतिशय सुंदर,माहितीवर्धक आणि कमाल असतात.
एक पुस्तक लिहा तुमच्या अनुभवांचे. प्रतिक्षेत असावे का आम्ही पुस्तकाच्या?
बाप रे...भन्नाट आहे!
बाप रे...भन्नाट आहे!
खूपच छान.. खरचं भन्नाट अनुभव.
खूपच छान.. खरचं भन्नाट अनुभव.
तुमच्या सगळ्याचं कथा छान असतात काका...
अरे बाप्रे! ऐतेन!
अरे बाप्रे!
ऐतेन!
तुमची लेखनशैली नेहेमीप्रमाणेच
तुमची लेखनशैली नेहेमीप्रमाणेच मस्त !!!!
हृदयांबुजीचा मकरंद ठेवा' आणि
हृदयांबुजीचा मकरंद ठेवा' आणि गुंतलेले हृदय.
लेख नेहेमी प्रमाणे आवडलाच, शेवटचा परिच्छेदपण आवडला.
Pages