Sunday..... Once more....

Submitted by आशिका on 14 March, 2014 - 05:21

माझा मुलगा दोन-अडीच वर्षाचा असताना एकदा त्याच्यासोबत एक nursery rhymes ची CD बघत होते. त्यातील काही गाण्याना 'ONCE MORE' असा फलक येई व ती गाणी पुन्हा दाखवली जात. लेकाने 'ONCE MORE' चा अर्थ विचारला. मी शक्य तितक्या सोप्या शब्दात त्याला सान्गितले की एखादी आवडलेली गोष्ट/क्रुती पुन्हा अनुभवता यावी असे वाटत असल्यास 'ONCE MORE' ची मागणी करतात. या चिमुरड्याने हजरजबाबीपणे यावर टिप्पणी केली " मी बाप्पाला सान्गतो की 'SUNDAY...ONCE MORE' म्हणजे आई तु अजुन एक दिवस घरी असशील".

हे ऐकले मात्र डोळ्यात पाणी तरळले. दुसरे काहीही न मागता फक्त आई तू अजुन एक दिवस घरी रहावीस ही ईच्छा, पण तीही आपण पूर्ण नाही करु शकत... नोकरीमुळे

क्षणात त्याला पहिल्यान्दा सोडुन office ला गेले तो दिवस आठवला. पाच महिन्यान्चा होता तो तेव्हा. स्टेशनवर मला सोडायला आला होता, त्याला साम्भाळणार्या बाईसोबत. बाहेरची गम्मत, झुकझुक गाडी दिसल्याचा आनन्द यात साहेब गर्क होते. पणा आईच्या कडेवरुन मला या मावशीनी घेतलय अन आई निघुन जातेय कुठेतरी हे पाहुन मात्र ते निष्पाप डोळे बघता बघता पाण्याने डबडबले.

त्याला कधीच पाळणाघरात वा तत्सम ठिकाणी ठेवावे लागले नाही कारण आमच्या आई त्याला साम्भाळतात, बाईच्या मदतीने. स्वतःच्या घरात, खाण्या-पिण्याचे सगळे लाड पुरे होत असतानाही त्याच्या नकळतच तयार होउन बाहेर पडावे लागायचे हे ही तितकेच खरे.

हा आणि असाच अनुभव बर्याच जणीन्चा असेल आणि त्यानन्तर मन ग्रासुन टाकणारी अपराधीपणाची भावना...

हा 'SUNDAY... ONCE MORE' कायमचा मनात घर करुन राहिला. बदलता काळ, वाढती महागाई,
second income ची गरज, career या सगळ्या बाबी मान्य. पण तरीही या छोट्याची 'SUNDAY ONCE MORE' ची मागणीही अवाजवी नक्कीच नाही कारण मी लहान असतानासुद्धा बाप्पाकडे असच काहीस मागत आले होते. शब्द वेगळे असतील पण भावना त्याच 'SUNDAY... ONCE MORE'

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जपानसारख्या पुढारलेल्या, प्रगत आणि महाग देशात पूर्णवेळ गृहिणी व्हायला बायका का उत्सुक आहेत? कारण तिथे मुले वाढवणे हे राष्ट्रीय कार्य समजले जाते. >>> गापै, मी ऐकले आहे त्यावरून तेथे कार्यालयात महिलांच्या बाबतीत असलेले प्रचंड डिस्क्रिमिनेशन हे ही कारण असेल. सर्वसामान्य माणसे राष्ट्रीय कर्तव्य वगैरे विचार करून स्वतःच्या आयुष्याबद्दल निर्णय घेत असतील असे वाटत नाही. म्हणजे ती राष्ट्रद्रोही असतात असे नाही, पण वैयक्तिक प्राधान्ये कधीही जास्त महत्त्वाची असतात लोकांना.

राजसी तू लिहीलेला अनुभव नक्कीच खरा असणार. पण तो अ‍ॅनेक्डोटल आहे. पहिल्या २-३ वर्षांत मुलांना आई किंवा वडील यापैकी कोणाचा जास्त लळा लागेल हे कधीच सांगता येत नाही. आणि ते ही बर्‍याच वेळा बदलते.

आपण कुठे काय लिहत आहोत याचं भान ठेवायला लोकं कधी शिकणार आहेत?

हा लेख एका स्त्रीने तिच्या तत्कालिक अनुभवांना शेअर करण्यासाठी लिहिला आहे, तिने नोकरी करावी की नाही, तिने घराबाहेर पडावं की नाही, ती कारकून आहे की नाही, तिच्या मुलाची आबाळ होते की नाही या गोष्टींचा इथे काय संबंध येतोय?

बरीच चर्चा झाली माझ्या लेखाची

१ नक्की की माझ्या मुलाची आबाळ होतीए असे मी लिहिलेले नाही. तो आजीजवळ असतो व सगळे लाड पुरवले जातात असे लिहिले आहे

नोकरी करणे वा न करणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

माझा मुलगा आता ९ वर्शाचा असुन बर्याच बाबतीत आता स्वावलम्बी झाला आहे. मी घरी येऊन करत असलेली presentations, training sessions ची तयारी बघुन तो पण अभ्यास स्वत:च करू लागला आहे.

हेही नसे थोडके

+१ फारएण्ड. एकदम परफेक्ट शब्दात मांडलस.

गामांची मुक्ताफळं नेहमीसारखीच मेंटल्मार्गाला जाताना बघून आश्चर्य नाहीच वाटलं. हे असले मेंटल विचार अस्तित्वात असून सुद्धा दररोज अधिकाधिक बायका स्वतःचा कॉमन सेन्स वापरुन नोकरी/व्यवसायाकरता घराबाहेर पडत आहेत ही गोष्ट असल्या बिन्डोक विचारांच्या थुत्त्रीत सण्सणीत चपराकच आहे.

आशिका, तुम्ही लिहिताना फक्त तुमचे प्रामाणिक विचार लिहिले पण त्यातून हवा तो अर्थ काढणारे उपटसुंभ आहेत इथे.

मला माझी मगाशी टाकलेली आयसिंगची पोस्ट विशद करायची आहे. मुलासाठी मुलाच्या वेळेला, गरजेला उपस्थित असण ही घरांत सर्वसाधारणपणे कोणाची प्राथमिक जबाबदारी असते? कोणाला फक्त उपस्थितीसुद्धा जबाबदारी पर्यायाने गरज वाटते? (सहभाग, हातभार आणि जबाबदारी ह्यामध्ये कृपया गल्लत करु नका.) अचानक मुलासाठी आयोजित कामं बदलावी लागली तर कोणाला स्वतःची काम खोळंबवण्याशिवाय पर्याय नसतो? म्हणून मी आयसिंग म्हणाले.

*पोस्ट संपादित केली आहे.*

अन्न हे परब्रह्म हा विचार रुजला की गृहिणीपदास आपोआप प्रतिष्ठा प्राप्त होईल. >>
सिरियसली. जर ते परब्रह्न असेल तर पुरुषांनी घरि राहून ते परब्रह्म रांधावे ना तिन्ही त्रिकाळ ? ते स्त्रीनेच करावे अन ग्रुहिणीपदाला प्रतिष्ठा असे कशाला ?

राजसी, हे नेमकं इंग्रजीत काय लिहिलय? मराठी टू इंग्लिश गूगल ट्रान्सलेटर वापरलाय असं वाटतय. फुल्ल डोक्यावरुन गेली (पोस्ट).

मेधा,

>> सिरियसली. जर ते परब्रह्न असेल तर पुरुषांनी घरि राहून ते परब्रह्म रांधावे ना तिन्ही त्रिकाळ ? ते स्त्रीनेच करावे अन
>> ग्रुहिणीपदाला प्रतिष्ठा असे कशाला ?

ज्याला आवड आहे त्याने/तिने रांधावे. कुणावरही सक्ती नाही. प्रश्न गृहिणीपदास प्रतिष्ठा का मिळत नाही हा आहे. खूपश्या घरांतून स्त्रीला रांधण्याची आवड असल्यामुळे अन्न हे पूर्णब्रह्म मानलेलं बरं पडेल.

असो.

नंदिनी,

>> हा लेख एका स्त्रीने तिच्या तत्कालिक अनुभवांना शेअर करण्यासाठी लिहिला आहे, तिने नोकरी करावी की नाही,
>> तिने घराबाहेर पडावं की नाही, ती कारकून आहे की नाही, तिच्या मुलाची आबाळ होते की नाही या गोष्टींचा इथे
>> काय संबंध येतोय?

लेखिकेने विदित केलेला अनुभव ही हल्ली सर्वत्र आढळून येणारी समस्या आहे. त्यावर चर्चा झाली तर काय बिघडलं? तसेच कारकुनी नोकरी हे एक उदाहरण म्हणून घेतलेली आहे. लेखिका कारकून आहे असं मी कुठेही सूचित केलेलं नाहीये.

असो.

आशिका,

१.
>> १ नक्की की माझ्या मुलाची आबाळ होतीए असे मी लिहिलेले नाही.

ज्याअर्थी तुमच्या मनात अपराधीपणाची भावना आहे त्याअर्थी मुलाची भावनिक आबाळ होत असावी असा मी निष्कर्ष काढला. कदाचित आबाळ हा शब्द उचित नसेल. त्याबद्दल क्षमस्व.

२.
>> माझा मुलगा आता ९ वर्शाचा असुन बर्याच बाबतीत आता स्वावलम्बी झाला आहे.

थोड्या मोठ्या (सुमारे सातेक वर्षे व पुढल्या) मुलांच्या बाबतीत आई नोकरदार असेल तर मुलं झपाट्याने स्वावलंबी होतात. आईने नोकरी करण्याचा हा फायदाही आहे. मात्र लहान मुलांच्या बाबतीत लाभापेक्षा हानी अधिक असू शकते.

एकंदरीत काही वर्षांनी मुलं आईच्या नोकरीशी जुळवून घेतातच. पण आपल्या हातून काय सुटलं याची बिचाऱ्यांना जाणीवही नसते. मी स्वत: (आणि माझा भाऊ) यातून गेलेलो आहोत. आई किमान १२ तास घराबाहेर असे. वडील नोकरीला बाहेरगावी. तेव्हा स्वच्छंदी आयुष्य छान वाटायचं. आज मी बाप बनल्यावर माझ्या मुलाच्या आईला त्याच्यापासून दूर ठेववत नाही.

असो.

वैद्यबुवा,

>> गामांची मुक्ताफळं नेहमीसारखीच मेंटल्मार्गाला जाताना बघून आश्चर्य नाहीच वाटलं. हे असले मेंटल विचार
>> अस्तित्वात असून सुद्धा दररोज अधिकाधिक बायका स्वतःचा कॉमन सेन्स वापरुन नोकरी/व्यवसायाकरता
>> घराबाहेर पडत आहेत ही गोष्ट असल्या बिन्डोक विचारांच्या थुत्त्रीत सण्सणीत चपराकच आहे.

वैयक्तिक शेरेबाजी करण्यापेक्षा समस्या नीट समजावून घेतलीत तर बरं होईल. बायकांनी नोकरी करण्यावर माझा आक्षेप नाहीये. फक्त मुलांकडे दुर्लक्ष आणि आईच्या मनात अपराधीपणा नको. जे काही फायदेतोटे आहेत त्यांची सांगोपांग चर्चा व्हावी.

असो.

आ.न.,
-गा.पै.

>>>>बापाचं कामच आहे की घराला रसद पुरवणं. त्याकरिता त्याला घराबाहेर पडावं लागतं. तो घराचा राजा नसतो, पण स्त्री घराची राणी असते.आणि तिच्या मुलांचं काय? घरी आई नसणे आणि बाप नसणे यांत काहीच फरक नाही का? त्यांना बोलून दाखवता येत नाही म्हणून गृहीत तर धरले जात नाहीयेत ना?बाईने नोकरी वा इतर कष्ट करायला माझी ना नाही. पण मुलांची आबाळ होऊ नये इतकीच अपेक्षा आहे. प्रस्तुत लेखात मुलाची आबाळ होते आहे.>>>>

>>>फक्त मुलांकडे दुर्लक्ष आणि आईच्या मनात अपराधीपणा नको. जे काही फायदेतोटे आहेत त्यांची सांगोपांग चर्चा व्हावी.>>>>>
गामा , अपराधी भावना, मुलांकडे कमी अधिक लक्ष,त्यांचे यशापश यामुळ प्रत्येक स्त्री किंवा पुरुष पालकाच्या मनात द्वंद्व चालूच असते. कुठलाच पालक असे म्हणणार नाही कि मी अगदी पर्फेक्टली मुलांना वाढवतोय. पण त्याचा अर्थ स्त्रीयांनी घरात रहावे आणि पुरुषांनी बाहेर रोजगार मिळवायस जावे म्हणजे द्वंद्व थांबेल असा नाही.
मुलांची आबाळ आई घरी राहून सुद्धा होवू शकते. आणि एकटा पुरुष नोकरी करूनही आईशिवाय बाळाला सुरेख वाढवू शकतो. हे प्रत्येकाच्या पॅरेंटीग स्किलवर अवलंबून आहे. लिंगाधारीत नाही. नसावे.

अगदी साधे पणाने सांगायचे झाले तर जी कामे अपत्य झाल्यावर मुलांबाब्बतीत स्त्री करु शकते ती सर्व पुरुष (ब्रेस्ट फीडिंग सोडून) करु शकतो. हे तुम्ही प्लिज पटवून घ्या. (तुमच्या आसपास ते घडत नाही म्हणजे ते नाही असे नव्हे. )त्यामुळ बायका बाहेर पडल्यावर मुलांवर अन्याय होतो आणि पुरुष पडल्यावर होत नाही हे ग्रुहितक चूकीचे आहे. दोघांचेही जॉब मुलांबाबतीत एक्सेचेंजेबल आहेत. ते नाहीत अस भासवून वर्षानुवर्षे बायांना त्यागाची मुर्ती , आई सारखे दैवत वगैरे बनविन्यात आलय .
घरी आई नसणे किंवा बाप नसणे हे दोघांनीही समान जबाबदार्‍या उचलल्यास फरक उरण्याचे काहीच कारण नाही.
फायदे तोटे तुम्ही म्हणता तसे असतील. पण ते स्त्री पालक किंवा पुरुष पालक यापैकी कुणिही एक बाहेर पडले तरी सेमच असावेत.. ते तसे नसणे हे आपला समाज योग्य दृष्टीने पुढे जात नाही याचे द्योतक मानावे लागेल. आणि ते दुर्दैवी आहे.

कारण बायकांच्या डोक्यात शेकडो वर्षे तसं बिंबवलेलं आहे. त्याचबरोबर पुरूषाने हळवे असून चालत नाही असे्ही एक मूर्ख समीकरण बिंबवले गेलेले आहे त्यामुळे असं काही बापाला वाटलं तरी तो हे जाहिररित्या व्यक्त करू शकेलच असे नाही. हे पिढ्यानपिढ्यांचे माइंड कंडिशनिंग मोडायला वेळ लागतो. आणि जिथे असे मोडलेले असते तिथे बाबा लोकांचेही असे लिखाण असते. माझ्या वाचनात, ऐकण्यात तरी आहे.

कदाचित.

मला असं वाटतं की पूर्वी बायकांना नोकरी करण्याच पर्यायाने आर्थिक स्वातंत्र्य नव्हते आणि आता अर्थार्जन करणारच (घरचं जमेल तस सांभाळून) हे गृहित धरतात (दुप्पट मिळकत त्या अनुषंगाने करता येण्याजोगे खर्च) त्यामुळे इच्छा असेल तरी पैसा न कमविण्याचे स्वातंत्र्य नाही. मुळात स्त्रीला सारासार विचार करुन व्यक्ती म्हणून कोणतेही निर्णयस्वातंत्र्य आहे का? स्त्री फक्त मला काय करायच आहे ह्याचा विचार करुन निर्णय घेते का मुलांसाठी, घरांसाठी, संसारासाठी म्हणून निर्णय घेते? टाळी एका हाताने वाजत नाही.

स्त्री फक्त मला काय करायच आहे ह्याचा विचार करुन निर्णय घेते का मुलांसाठी, घरांसाठी, संसारासाठी म्हणून निर्णय घेते? >> आजकाल जनरली लग्न झालेले पुरुषही हेच करतात ना (मुलांसाठी, घरांसाठी, संसारासाठी म्हणून निर्णय) ? असो.

बाकी - राष्ट्रीय कर्तव्य - Lol

आजकाल जनरली लग्न झालेले पुरुषही हेच करतात ना (मुलांसाठी, घरांसाठी, संसारासाठी म्हणून निर्णय) ? >>> मान्य (टक्केवारी नगण्य म्हणावी इतकी कमी). दुसरी व्यक्ती जे तिला मुलांसाठी, घरासाठी, संसारासाठी आणि थोडफार स्वतःसाठी योग्य वाटतयं तेच करते आहे, त्याचा इतरांनी मान ठेवला तर बरेचसे प्रॉब्लेम निकालात निघतील.

पुरूषांनाही न कमावण्याचे स्वातंत्र्य नाहीये. त्याचा इथे काय संबंध?

मुळात स्त्रीला सारासार विचार करुन व्यक्ती म्हणून कोणतेही निर्णयस्वातंत्र्य आहे का? << मला होते आणि आहे. माझ्या पाहण्यात अश्या संपूर्ण स्वातंत्र्य असलेल्या ( + करीअर असलेल्या, कारकूनी नव्हे तर करीअर असलेल्या, घरे मुलाबाळांसकट सुखात असलेल्या) अश्या भरपूर बायका आहेत.
स्वातंत्र्य नसलेल्याही भरपूर आहेत पण त्याचा तुमच्या मुद्द्याशी काय संबंध आहे?
इथे तर स्वातंत्र्य नसावेच, बाईने घरच सांभाळावे असा विचारप्रवाह व्यक्त होतोय ज्याला तुम्हीही पाठिंबा देताय.

राष्ट्रीय कर्तव्यावरून आठवले.
सतीश आळेकरांच्या 'महापूर' मधे असा सीन आहे. नवरा बायको लग्नाच्या पहिल्या रात्री राष्ट्रीय कर्तव्याच्या शपथा घेत, सदैव सैनिका गाणे म्हणत मार्चिंग करतात.....
दर वेळेला तो सीन बघताना/ वाचताना फुटायला होते.

मी फक्त माझा अनुभव लिहिला. माझा दृष्टीकोण लिहिला. माझ्यासाठी ज्या गोष्टी योग्य आहेत त्या इतर सर्वांसाठी योग्य का असाव्यात? नसणारच. घरांत राहून घरंच बघितलं म्हणजे अत्याचार झाला असं नाही तसेच बाहेर जाऊन बाहेरच्या खस्ता खाऊन खूप जास्त मिळवलं अश्यातला भाग नाही. सारासार विचार, तारतम्य वापरून एखादा निर्णय घेतला मग तो होममेकर असो का करिअरिस्ट, त्याच्या चांगल्या-वाईट परिणामांना सामोरे जाता आले पाहिजे. तेव्हा उगीच नोकरी, करियर, double income, मूलं, संसार अश्या सबबींच्या मागे लपू नये. Own the decision, right or wrong. सगळ्या दगडांवर नाही पाय ठेवायचा. ज्यांना निर्णयस्वातंत्र्य नाही किंवा त्याचा वापर कसा करायचा ते माहित नाही किंवा निर्णयक्षमताच नाही किंवा खापर फोडायला कोणीतरी हवे, त्यांच्यासाठी कोतबो असावे. असो.

तेव्हा उगीच नोकरी, करियर, double income, मूलं, संसार अश्या सबबींच्या मागे लपू नये <<
एखाद्या व्यक्तीला(आई वा बाप) आपल्या मुलाबरोबर आपल्याला हवे तेव्हा थांबता आले नाही याबद्दल किंचितही दुखूही नये ही अपेक्षाच अनाकलनीय आहे. खरंतर चुकीचीच आहे.
दर वेळेला त्या सबबी असतीलच असे नाही.

बाकी राजसी तुमचा नक्की रोख काय आहे हे 'पहले नक्की करो बाबा!' दर पोस्टगणिक मुद्दा आणि रोख बदलताय.

आशिका, छान लिहिलं आहेस. तळमळ पोचली.हा टप्पा मी कधीच पार केलाय. नोकरी करणाऱ्या सगळ्या आयांच्या मनाचा एक हळवा कोपरा असतोच तो . माझ्या कडे नोकरी करण्याशिवाय पर्याय ही नव्हता आणि सासूबाई किव्वा आई सांभाळायला पण नव्हत्या . बरोबर चवथ्या महिन्यापासून पाळणाघरात ठेवलाय मुलाला. सगळ्या ब्यान्केतल्या आया चार वाजताच मुलांना घेऊन घरी जात होत्या. पण माझ्या मुलाला मात्र बिचार्याला सात -साडे सात वाजेपर्यंत थांबायला लागायचं. सगळ्यात शेवटी बाहेर पडणारा एकमेव मेंबर होता तो. पाळणाघरातल्या आजी पण माझी तितक्याच आतुरतेने वाट बघायच्या लेकाच्या बरोबरीनेच Happy
मला खिडकीतून लांबून बघितल्या बरोबर इतक खुदु खुदु हसू यायचं ना त्याला Happy
लेखाच्या निमित्ताने सगळं डोळ्यासमोर आल Happy

Happy

रश्न गृहिणीपदास प्रतिष्ठा का मिळत नाही हा आहे. >> जोवर वर्षानुवर्षे स्त्रिया च गृहिणीपद सांभाळत होत्या तेंव्हा त्याला प्रतिष्ठा आहे का नाही , नसल्यास कशी मिळवावी याची काळजी कोणासही पडली नव्हती. तेंव्हासुद्धा कष्टकरी वर्गात बायका आपल्या घराबाहेर कामं करुन अर्थार्जन करत होत्याच - हिरकणीची गोष्ट मी परत सांगायला नकोच.

आता गेल्या ५०-७५ वर्षात जेंव्हा अधिक संख्येने मध्यम वर्गातील स्त्रियांना गृहिणीपदाच्या कामांची ग्लोरी वाटेनाशी झाली. त्यांनी ते मॅनेज करण्याच्या, आउटसोर्स करण्याच्या, मिनिमिआझ करण्याच्या स्ट्रॅटेजी राबवायला सुरुवात केली तर लगेच प्रतिष्ठेची चिंता ? म्हणजे अजुनही ती जबाबदारी स्त्रियांच्याच गळ्यात मारायची - तिने ती पेलली तर क्वचित प्रसंगी शाब्दिक ग्लोरिफिकेशन हे तिचं रिवार्ड अन झुगारली, किंवा त्याला पुरुषांना योग्य वाटेल तितके महत्व दिले नाही तर मग गिल्ट ट्रिप ?

चांगले विचार आहेत. तुमच्या नात्यातील पुढच्या पिढीतल्या मुलींना सांगत रहा ही मौक्तिकं !

राजसी - तुमचा नेमका मुद्दा मलाही कळला नाही.

फारएण्ड,

जपानमधील स्त्रीपुरुष भेदभावासंबंधी एक लेख सापडला : http://www.wcl.american.edu/hrbrief/11/2barrett.cfm
लेख समानतेच्या एका कायद्यासंबंधी आहे. त्यात एक कळीचा मुद्दा सापडला :
>> This cultural prioritizing resulted in an M-curve participation of women in the Japanese
>> workforce. Women experienced their peak participation in the workforce at ages 20-24 and
>> then again at ages 35- 50 as part-time workers, thereby protecting the permanent positions
>> of men. This phenomenon is known today as the "low cost welfare system" and is one way
>> that women are excluded from the core of the Japanese workforce. Although economically
>> advantageous, this phenomenon effectively excludes Japanese women from attaining equal
>> opportunity in the workplace.

आर्थिक दृष्ट्या हे प्रारूप किफायतशीर आहे. मात्र महिलांना नोकरीत समान संधी मिळत नाही. हा धोका टाळून हे प्रारूप भारतात लागू करायचे झाले तर नागरी स्त्रियांच्या बाबतीत दुसरा डाव (३५ ते ५० वयात) खेळतांना नोकरीऐवजी छोट्या व्यवसायावर भर देता येईल. मला वाटतं संयुक्ताकारांनी या विषयावर (सेकंड इनिंग) कुणा उद्योजिकेची मुलाखत घेतली होती.

सांगण्याचा मुद्दा काय आहे की पूर्णवेळ गृहिणींना मुले मोठी झाल्यावर छोट्या स्वरूपाचे व्यवसाय सुरू करण्याची संधी उपलब्ध व्हावी.

आ.न.,
-गा.पै.

सीमा,

>> त्यामुळ बायका बाहेर पडल्यावर मुलांवर अन्याय होतो आणि पुरुष पडल्यावर होत नाही हे ग्रुहितक चूकीचे आहे.

तुम्ही म्हणता ते गृहीतक असे नाहीये. मुलांना जेव्हा गरज असते तेव्हा आई वा वडिलांपैकी एकाचा सहवास न मिळाल्याने मुलांवर नकळत अन्याय होतोय. कोण्या एकाच्या घराबाहेर पडल्यामुळे समस्या उत्पन्न होत नाहीये. दोघांनीही बाहेर पडल्याने उत्पन्न होतेय.

अशा समस्याग्रस्त कुटुंबांचं सर्वेक्षण केल्यास बहुसंख्य वेळा स्त्रीस घराकडे परतायची जास्त ओढ असण्याची शक्यता आहे. असा माझा अंदाज!

आ.न.,
-गा.पै.

अशा समस्याग्रस्त कुटुंबांचं सर्वेक्षण केल्यास बहुसंख्य वेळा स्त्रीस घराकडे परतायची जास्त ओढ असण्याची शक्यता आहे. असा माझा अंदाज!

>>>

असा तुमचा अंदाज का आहे? मला वाटते ह्या प्रश्नाचे उत्तर इतर अनेक उत्तरे देवून जाईल.

आपण कुठे काय लिहत आहोत याचं भान ठेवायला लोकं कधी शिकणार आहेत?

हा लेख एका स्त्रीने तिच्या तत्कालिक अनुभवांना शेअर करण्यासाठी लिहिला आहे, तिने नोकरी करावी की नाही, तिने घराबाहेर पडावं की नाही, ती कारकून आहे की नाही, तिच्या मुलाची आबाळ होते की नाही या गोष्टींचा इथे काय संबंध येतोय?
>>>>>>>>>>>>>>

नंदिनी,
जर एखादा लेख, त्यातील विषय लोकांशी रिलेट झाले तर ते त्या अनुषंगाने आपले अनुभव आणि विचार मांडणारच, हे साहजिकच आहे. याचा अर्थ त्या लेखाच्या लेखकाला/लेखिकेला उद्देशून बोलतोय असे होत नाही. प्रतिसाद हे प्रतिसादांवर देखील येतात, लेखावरच आले पाहिजेत असे नाही.
असो, मात्र आपल्या या वरच्या विधानाने उगाच लेखिकेला इथे घडणारी सारी चर्चा आपल्यावरच चालू आहे की काय असा चुकीचा संदेश जाऊ शकतो.

Pages