Sunday..... Once more....

Submitted by आशिका on 14 March, 2014 - 05:21

माझा मुलगा दोन-अडीच वर्षाचा असताना एकदा त्याच्यासोबत एक nursery rhymes ची CD बघत होते. त्यातील काही गाण्याना 'ONCE MORE' असा फलक येई व ती गाणी पुन्हा दाखवली जात. लेकाने 'ONCE MORE' चा अर्थ विचारला. मी शक्य तितक्या सोप्या शब्दात त्याला सान्गितले की एखादी आवडलेली गोष्ट/क्रुती पुन्हा अनुभवता यावी असे वाटत असल्यास 'ONCE MORE' ची मागणी करतात. या चिमुरड्याने हजरजबाबीपणे यावर टिप्पणी केली " मी बाप्पाला सान्गतो की 'SUNDAY...ONCE MORE' म्हणजे आई तु अजुन एक दिवस घरी असशील".

हे ऐकले मात्र डोळ्यात पाणी तरळले. दुसरे काहीही न मागता फक्त आई तू अजुन एक दिवस घरी रहावीस ही ईच्छा, पण तीही आपण पूर्ण नाही करु शकत... नोकरीमुळे

क्षणात त्याला पहिल्यान्दा सोडुन office ला गेले तो दिवस आठवला. पाच महिन्यान्चा होता तो तेव्हा. स्टेशनवर मला सोडायला आला होता, त्याला साम्भाळणार्या बाईसोबत. बाहेरची गम्मत, झुकझुक गाडी दिसल्याचा आनन्द यात साहेब गर्क होते. पणा आईच्या कडेवरुन मला या मावशीनी घेतलय अन आई निघुन जातेय कुठेतरी हे पाहुन मात्र ते निष्पाप डोळे बघता बघता पाण्याने डबडबले.

त्याला कधीच पाळणाघरात वा तत्सम ठिकाणी ठेवावे लागले नाही कारण आमच्या आई त्याला साम्भाळतात, बाईच्या मदतीने. स्वतःच्या घरात, खाण्या-पिण्याचे सगळे लाड पुरे होत असतानाही त्याच्या नकळतच तयार होउन बाहेर पडावे लागायचे हे ही तितकेच खरे.

हा आणि असाच अनुभव बर्याच जणीन्चा असेल आणि त्यानन्तर मन ग्रासुन टाकणारी अपराधीपणाची भावना...

हा 'SUNDAY... ONCE MORE' कायमचा मनात घर करुन राहिला. बदलता काळ, वाढती महागाई,
second income ची गरज, career या सगळ्या बाबी मान्य. पण तरीही या छोट्याची 'SUNDAY ONCE MORE' ची मागणीही अवाजवी नक्कीच नाही कारण मी लहान असतानासुद्धा बाप्पाकडे असच काहीस मागत आले होते. शब्द वेगळे असतील पण भावना त्याच 'SUNDAY... ONCE MORE'

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या कडे " आई मी शाळेत नाही जात तुझ्या बरोबर ओफीस ला येते ना प्लीज" इती भाविका वय ३ [२ दिवसातुन १दा हे वाक्य

हा आणि असाच अनुभव बर्याच जणीन्चा असेल आणि त्यानन्तर मन ग्रासुन टाकणारी अपराधीपणाची भावना...>>++११

आताच महाशिवरात्रि चि सुट्टी होति मि घरि होते... लगेच.. मम्मि तु अशिच घरि रहाना रोज...:( Sad :

सेम्,सेम -आशिका.
माझे ओफीस माझ्या घ्ररापासुन १५ मि वर आहे , म्हणुन मी जेवायला घरी जाते.पण निघतानाचे नेहमी चे शब्द "मम्मी तु आता परत ओफीस ला नाही ना जाणार, तु झोपवणार ना मला "

आशिका...अगदि असच होतय..
...एक वर्ष झाल ओफिस सुरु होउन पण माझी लेक अजुनहि सकाळी उठुन रडते..:(
रोज सांगायच मी येते घ्यायला तुला ...मग खिड्कितुन बाय बाय ...माझी गाडी गेलि की हि सांगते बाबाला..आई कार गे....ल ओफिसला.. अजुन नीट बोलता येत नाही माग अस काहीतरि बोलते...
जीव तुट्तो आतुन तिळ तिळ्..आणि आजारी असेल पिलु तर अस वाट्त की कशाला हविये ही नोकरी....

अगदी सेम आशिका.
माझी लेक आता २ वर्षांची होईल. ऑफिसची तयारी झाली कि तिची नजर चुकवून पळावं लागतं नाहीतर भोंगा ठरलेला. तयारी चालू असतानाच माझ्या पायांना हाताने वेटोळे घालते आणि "मम्मा अको जाऊ" चा धोशा सुरु.
तिची हि आर्जवं पाहून जीव तुटतो आणि वाटतं सोडून द्यावी ती नोकरी आणि कायमस्वरूपी आपल्या पिल्लाजवळ राहावं. कधी तिच्यापासून कुठे दूर जाऊ नये.
पण तू लिहिल्याप्रमाणेच बदलता काळ, वाढती महागाई, second income ची गरज आणि ती सुद्धा जगातलं सगळं बेस्ट तिला देता यावं म्हणूनच घराबाहेर पडावं लागता या छ्कुल्यांच्या बाळलीला मनात आठवत….

आशिका. माझी लेक लहान असताना शाहण्या मुलीसारखी ऑफिसला निघताना मला टाटा करायची. अर्थात ह्याचे श्रेय माझ्या सा.बां ना. जात. मी तिला तिच्या शाळेतल्या शिक्षिका, नात्यातल्या इतर आया कश्या मुलांना ठेवून नोकरी करतात हे पटवून द्यायची अन तिला ते पटायच.. लेक म्हणायची की आई तुझी आठवण आली की मी तुझा वाळत घातललेल्या ड्रेस / गाऊन कडे बघते.. ..

जरा मोठी झाली अन ती मला तिच्या बाकिच्या मॅत्रिणिंच्या आया कश्या घरी असतात.. तू पण तशीच घरी रहा म्हणून हट्ट करायची...

आइं ग... आतून खुप रडायचे मी...

हा टप्पा तर पार केलाय मी... आता माझ्या ले़किला (सध्या कॉलेज क्न्याका आहे ती) मी स्टाँग अन सुपर मॉम वाट्ते..तरीही माझी आवस्था-- घार उडते आकाशी , तिचे चित्त पिलापाशी !

आईग्ग... मी तुझी अवस्था समजू शकते गं... यातून एकदा गेले आहे मुलीच्या वेळी .. ती सात महिन्याचि असल्यापासून जात होते नोकरीला. पण आता दुसर्या बाळानंतर स्वखुशीने फुलटाईम मॉम! खूप बरं वाटतं मुलांसोबत.

छान लिहिलेय .. विषय देखील असा आहे की कित्येकांशी सहज रिलेट व्हावा. कधीकाळचा मुलगा म्हणून माझ्याशीही होतो. पण आई आजही कौतुकाने सांगते की मला घरी सोडून जाताना ती निर्धास्त असायची. याचे एक कारण म्हणजे घरी सर्व काही आवडीने करणारी आजी आणि दुसरे कारण शेजारपाजारच्या बायका मला सरळ उचलून खेळायला न्यायच्या आणि मी रमायचो त्यांच्यात. संध्याकाळी कामावरून आई घरी आली की तिला सर्वांची घरे पालथी घालून मी कुठे दडलोय हे शोधायला लागायचे. अर्थात हे आईच सांगते, मला काही आठवत नाही. पण जेव्हापासूनचे आठवतेय तेव्हा आईची वाट बघितली जायची हे मात्र आठवतेय. कारण माझी शाळेतून घरी येण्याची वेळ आईच्या तासभर आधी होती. आजी तेव्हाही होतीच पण आई माझी खास मैत्रीण झाली होती. ती साडेपाच ते साडेसहाची कातरवेळ काही करमायची नाही. आई आली की मात्र मूड चेंज. चैतन्यमुर्ती होती ती, कधी दमून आलीय कामावरून असे वाटायचे नाही. पण तसे नसायचे, हे तेव्हाही माहीत असायचे.. जाऊ द्या उगाच वाहावत जायचो, पण एक मात्र आहे, आज आईचा अभिमान वाटतो. कधी वर्तमानपत्रात नाव आले नाही तिचे, पण कधी कर्तुत्ववान महिलांची लिस्ट बनवायचे ठरवले तर माझ्याकडून पहिले नाव तिचेच लिहिले जाईल..

आशिका,

अगदी जिव्हाळ्याचा विषय! लेकुरवाळ्या बाईला घराबाहेर काढून आपण नक्की काय मिळवत आहोत? आई हे पूर्णवेळ काम नाही का? उत्पादकता म्हणजे काय? आणि चिल्ल्यापिल्ल्यांना एकटं टाकून वाढवलेली उत्पादकता काय चाटत बसायचंय? शिवाय अशी उत्पादकता मालकाचा फायदा करून देते. आपला फायदा काय? ब्यांकेत कारकून म्हणून बाई दिसते तेव्हा ती तिच्या मुलाबाळांवर अन्याय करत असेल का? एखादी कौशल्याधारित व्यावसायिक नोकरी असेल तर ठीकाय, पण सर्वसाधारण नोकरीसाठी बाई कशाला पाहिजे?

बरेच प्रश्न आहेत. उत्तरं मिळतील की नाही ते माहीत नाही! Sad

आ.न.,
-गा.पै.

लेकुरवाळ्या बाईला घराबाहेर काढून आपण नक्की काय मिळवत आहोत? >>>
गामा हेच वाक्य लेकुरवाळ्या बाबाला घराबाहेर काढून आपण नक्की काय मिळवत आहोत अस वाचून पहा. तुम्हाला प्रश्नाच उत्तर मिळेल. Happy
आशिता तुमची तगमग पोहोचली अगदी.

ब्यांकेत कारकून म्हणून बाई दिसते तेव्हा ती तिच्या मुलाबाळांवर अन्याय करत असेल का?
एखादी कौशल्याधारित व्यावसायिक नोकरी असेल तर ठीकाय, पण सर्वसाधारण नोकरीसाठी बाई कशाला पाहिजे?
>>>>>>>>>>>
कारकूनांशिवाय देश चालेल का?
तसेच त्या कारकूनीतून मिळणार्‍या उत्पन्नावर एखादीचे घर नसेल का चालत?
आणि मग एखाद्या कौशल्याधारित व्यावसायिक नोकरी करणार्‍या बाईच्या पोरांवर हा मग अन्याय नाही का झाला?

सीमा,

बापाचं कामच आहे की घराला रसद पुरवणं. त्याकरिता त्याला घराबाहेर पडावं लागतं. तो घराचा राजा नसतो, पण स्त्री घराची राणी असते.

आणि तिच्या मुलांचं काय? घरी आई नसणे आणि बाप नसणे यांत काहीच फरक नाही का? त्यांना बोलून दाखवता येत नाही म्हणून गृहीत तर धरले जात नाहीयेत ना?

बाईने नोकरी वा इतर कष्ट करायला माझी ना नाही. पण मुलांची आबाळ होऊ नये इतकीच अपेक्षा आहे. प्रस्तुत लेखात मुलाची आबाळ होते आहे.

आ.न.,
-गा.पै.

अंड्या,

१.
>> कारकूनांशिवाय देश चालेल का?

कारकून नकोत असं म्हंटलेलं नाहीये. लेकुरवाळ्या बाईने पोरांना एकटे टाकून ती जागा भरण्यात काय अर्थ? त्याऐवजी पुरूष बरा पडला नसता का तिथे?

२.
>> तसेच त्या कारकूनीतून मिळणार्‍या उत्पन्नावर एखादीचे घर नसेल का चालत?

चालूदेकी! बाईने कष्ट करायला हरकत नाही. पण ८ तास काम आणि ४ तास प्रवास करून नको.

३.
>> आणि मग एखाद्या कौशल्याधारित व्यावसायिक नोकरी करणार्‍या बाईच्या पोरांवर हा मग अन्याय नाही
>> का झाला?

हो होतोच. त्या स्त्रीच्या ऐवजी दुसरा पर्याय नसेल तर तिला ती नोकरी देणे भाग आहे. अर्थात, तिची इच्छा असली तरच. मात्र कारकुनाच्या पदासाठी विशिष्ट व्यावसायिक कौशल्याची गरज नाही.

असो.

एकंदरीत मुलं वाढवणं हे काम भारतात फारसं प्रतिष्ठेचं मानलं जात नाही. ही मनोवृत्ती बदललेली बघायला आवडेल. Happy

आ.न.,
-गा.पै.

कारकून नकोत असं म्हंटलेलं नाहीये. लेकुरवाळ्या बाईने पोरांना एकटे टाकून ती जागा भरण्यात काय अर्थ? त्याऐवजी पुरूष बरा पडला नसता का तिथे?
>>>>>>>>
म्हणजे वर्गातल्या एखाद्या काठावर पास होणार्‍या ढ मुलाने नोकरी करावी कारण तो पुरुष आहे पण एखाद्या सेकंडक्लास मिळवणार्‍या मुलीने ती करू नये कारण तिला मुलांना सांभाळायचे आहे.
याउलट केले तर, त्या तुलनेत हुशार मुलीला नोकरीवर पाठवले आणि ढब्बू मुलाला घर सांभाळायला दिले तर...

चालूदेकी! बाईने कष्ट करायला हरकत नाही. पण ८ तास काम आणि ४ तास प्रवास करून नको.
>>>>>>>>
आपल्या महितीतली एखादी कंपनी जिथे ८ तास काम करावे लागत नाही, रोज हाल्फ डे असतो Happy

आपण हुशार कर्तबगार महिलांना तरी चूल आणि मूलच बघायला हवे यातून सूट दिलीत म्हणून त्यांना घेऊन पुढे चर्चा करत नाही.

गा पै, कंटीन्यू ..
गंमत बघा, म्हणजे आपल्या मुलीचे सारे काही व्यवस्थित व्हावे म्हणून एका स्त्रीने नोकरी करूच नये, तिचा अभ्यास घ्यावा, तिचे शिक्षण पुर्ण करावे. आणि मग एके दिवशी ती मुलगी शिकून मोठी झाली, तिचे लग्न झाले की तिनेही घेतलेले शिक्षण पुन्हा आपल्या मुलीसाठी कुर्बान करावे आणि घरी बसावे. अरेच्छा, मग यात तिच्या आईने स्वताची नोकरी सोडून तिचे बघितले ते व्यर्थ गेले की नाही, आणि हे चक्र असेच ठेवायचे का?

आज लोकांना एकत्र कुटुंब पद्धती नको आहे आणि मग म्हणून हे प्रॉब्लेम जास्त फेस करावे लागताहेत. पण फुल्ल टाईम मॉम हे ऑलटाईम सोल्युशन नसावे.

आशिका, छान लिहिलं आहेस. तळमळ पोचली. तुम्हाला जे करायची इच्छा आहे ते करायचा मार्ग लवकरच मिळो ही शुभेच्छा!

फुल्ल टाईम मॉम हे ऑलटाईम सोल्युशन नसावे>>> सध्याच्या प्राप्तपरिस्थितीत मला तरी दुसरे काही पर्याय सापडत नाही. मूल दोन वर्षाचे झाल्यावर मी नोकरी धरली / केली होती. दीड वर्षे नोकरी झाल्यावर मी स्वखुशीने निर्णय घेऊन ती नोकरी सोडली. आता परत मी नोकरीचा विचार केला पण जी वेळ मला शक्य आहे फक्त तेवढ्याच वेळेपुरती माझ्या पुर्वानुभवाला साजेशी नोकरी सध्यातरी बाजारांत कोणी देत नाही. मी एवढ्यात काही इंटरव्ह्यूज ना जाऊन मला हवी तशी (मला फक्त वेळेचा प्रश्न आहे) मिळते का बघितले अजून तरी काही मिळालेली नाही. सगळे जण मला सल्ला देतात काहीतरी घरात बसल्या-बसल्या कर. त्यासाठी जो वेळ रिकामा काढावा लागणार आहे तोच वेळ देऊन मी नोकरी करू शकते.

माझातरी असा अनुभव आहे की मूल कितिही बाबा - बाबा करत असले तरी त्याला वेळेला आईच लागते. मग ते तान्हं असताना रात्रीची जागरण असोत की जरा मोठा झाल्यावर आई! शी असो का भूक लागली असो. फक्त आयसिंगपुरत्या गोष्टींसाठी बाबा लागतो तर उगीच फक्त मुद्दा सिद्ध करायला किंवा गोष्टी इतर मार्गांनी सुद्धा होतात हे दाखवून द्यायला उगीच वडिलांना वेठीला धरू नये.

पैसा कमविणे हे त्याचे काम; घर आणि मूल बघणे, पैसे उडविणे, दुपारची झोप काढणे हे माझं काम. सध्यापुरत तरी चालतयं, पुढचं पुढे बघू.

आशिका भावना पोहोचल्या.

नोकरीला जाणारे आईबाबा आपल्याबरोबर खेळायला घरी रहावेत असे मुलांना वाटणे साहाजिक आहे. आणि मुलांबरोबर पुरेसा वेळ वेळ घालवता येत नाही म्हणून फक्त आईलाच गिल्टी वाटते असे नाही, बाबालाही,गिल्टी वाटते. आता मुले वाढवणे हे आईचे काम असा बाबाचा दृष्टीकोन असेल तर गोष्ट वेगळी.

>>माझातरी असा अनुभव आहे की मूल कितिही बाबा - बाबा करत असले तरी त्याला वेळेला आईच लागते. मग ते तान्हं असताना रात्रीची जागरण असोत की जरा मोठा झाल्यावर आई! शी असो का भूक लागली असो. फक्त आयसिंगपुरत्या गोष्टींसाठी बाबा लागतो तर उगीच फक्त मुद्दा सिद्ध करायला किंवा गोष्टी इतर मार्गांनी सुद्धा होतात हे दाखवून द्यायला उगीच वडिलांना वेठीला धरू नये.>>

पटले नाही. बाबा जर सुरुवातीपासून बाळाचे शीशू, जोजवणे, अंघोळ वगैरे सहजतेने करत असेल तर बाळ आई इतकेच बाबासाठीही हट्ट करते. यात वेठीला धरायचा प्रश्नच येत नाही. मात्र बाबाचा संगोपनात सक्रिय सहभागच नसेल तर बाळ हट्ट करत नाही. माझ्या मोठ्या पुतण्याच्या संगोपनात माझ्या सासर्‍यांचा सक्रिय सहभाग होता त्यामुळे त्याला सतत आबा लागायचे. रात्री आई जवळ झोपला तरी मधे उठला की फेर्‍या मारुन जोजवायला आबाच हवे असायचे. माझ्या नात्यात बरेच बाबा आहेत जे मुलांच्या संगोपनात सक्रिय सहभाग घेतात. मुले बाबासाठी हट्ट करतात. काहींच्या आया घरी राहाणार्‍या आहेत तरी. मी घरी रहाणारी आई नव्हते तेव्हाही आणि घरी रहाणारी आई झाले तेव्हाही मुलाचा बाबासाठी हट्ट असायचा. मला आठवते २००० च्या रिसेशनच्या काळात आमचे बोलणे ऐकून मुलाने आनंदाने विचारले होते - ' सॅटरडेला प्रॉडक्शन नाही म्हणजे बाबा घरी रहाणार?'

नोकरी करण्या-या आईच्या मनाची घालमेल तिच जाणे.
पण म्हणुन तिने फक्त अपत्य संगोपन करावे हे म्हणणे बरोबर नाही.
उलट ह्या मानसिक अवस्थेत तिला आधार देणे, घरातल्या इतरांनी तिच्यावर घरकामाचा भार न टाकता ती घरी असताना ती बाळाला quality time कसा देईल हे पहाणे इ. गोष्टी व्हयला हव्यात.

तुम्ही नोकरी करुन बाळाचे किती हाल करता आहात वैगेरे म्हणुन तिच्या गिल्ट्ला वाढवू तरी नये.

का हो गापै, प्रस्तुत लेखात बाळाची आबाळ होते आहे हा अंदाज कशावरून बांधलात? लेखिकेने तसं काही म्हटल्याचं वाटलं नाही.
>>मात्र आहे, आज आईचा अभिमान वाटतो. कधी वर्तमानपत्रात नाव आले नाही तिचे, पण कधी कर्तुत्ववान महिलांची लिस्ट बनवायचे ठरवले तर माझ्याकडून पहिले नाव तिचेच लिहिले जाईल..>> अंड्या, वर्तमानपत्रात नाव आल्यावरच कर्तुत्व सिद्ध होतं असं कुठे आहे? घर, मुलं, स्वतःचं करियर पर्यायाने स्वतःचा विकास करणारी, आपली अशी ओळख निर्माण करून जपणारी प्रत्येक व्यक्ती कर्तुत्ववानच असते.

तुम्ही नोकरी करुन बाळाचे किती हाल करता आहात वैगेरे म्हणुन तिच्या गिल्ट्ला वाढवू तरी नये.>>>>+१

आई नोकरी करते म्हणून अजिबात गिल्ट बाळगायच कारण नाही
माझी आई वर्किंग वुमन आहे
माझ्या लहानपणापासून
मला असे कधीही वाटले नाही
उलट आई ऑफिसला जाते याचा मला अप्रूप होते
रोज ऑफिस वरून आल्यावर शाळेत गंमत जंमत सांगाणे , अभ्यासाचा रिपोर्ट देणे हे असायच
आपली आई आपल्यासाठी ऑफिसला जाते , त्यातून आपल्याला पैसे मिळतात , खाऊ मिळ्तो हे आईने निट समजावले होते
त्यामुळे कधीही आई वेळ देत नाही ही भावना आलीच नाही मनात
उलट ऑफिस मधून आल्यावर आईला त्रास होऊ द्यायचा नाही हे पक्क झालेल मनात.
दूसरा फायदा म्हन्जे स्वताची काम स्वत करायला शिकलो आम्ही भावंड
पाचवीपासून बँकेचे छोटे छोटे व्यवहार पाहण , जेवण वाढून घेऊन घर वगैरे स्वच्छ थेवण , मोड़का तोड्का स्वयंपाक करायला शिकण , वेळेवर अभ्यास करण हे आम्ही शिकलो
स्वयंपूर्ण झालो

माझातरी असा अनुभव आहे की मूल कितिही बाबा - बाबा करत असले तरी त्याला वेळेला आईच लागते. मग ते तान्हं असताना रात्रीची जागरण असोत की जरा मोठा झाल्यावर आई! शी असो का भूक लागली असो. फक्त आयसिंगपुरत्या गोष्टींसाठी बाबा लागतो >>>

माझ्या बाबतीत उलटे होते. दोन्ही मुलं (पहिली सलग तीन वर्षे माझ्यावर अवलंबून होती, अगदी मी फटका दिला तरी, मी नाही दिला आईने दिला असे म्हणत असे) दुसरा ५ वर्षे झाले तरी अजूनही मीच लागतो. त्याशिवाय जेवण, आन्हिक, झोप ही कामे होत नाहीत त्याची. अर्थात मी जेंव्हा ट्रॅव्हल करत असतो तेंव्हा आई लागतेच हे खरे. पण मी असताना आई नको असते.

हे असे वागणे प्रत्येक बाबावर आहे. अर्थात अजूनही बाबा लोकं मुलांच्या (तान्हे असताना) वाढीत जनरली किती भाग घेतात ते अलहिदा. तुम्ही म्हणता तसे खूपसे बाबा भाग घेतच नाहीत. माझ्या सुदैवाने मी ट्रॅव्हल करत नसेल तर घरूनच काम करत असतो Happy

जाई, मूल खूप वेळा मायेच्या माणसाच्या हाती मजेत आणि आनंदात असतं आणि गिल्ट मुलाला नाही आईला असते. आपण पूर्ण वेळ त्याच संगोपन करु शकत नाही ही. कारण मुलाचे संगोपन ही वर्षानुवर्ष आईची जबाबदारी मानली गेली आहे. खुद्द आईलाही हे मान्य आहे. तसेच आई मुलाशी भावनिक रित्या ही जोडली गेली असल्याने निची मुलं लहान असताना तरी कुतरओढ होते, नोकरी की पूर्ण वेळ संगोपन ह्यात. हळू हळू ती बाहेर पडते ह्यातून, पण घरच्यांचा पाठिंबा असेल तर तिला आधार मिळतो आणि ती लवकर सावरते.

हो
हेमा

मी माझे विचार वर्किंग आईची मुलगी म्हणून मांडले आहेत
माझ्या आई , मावश्या , माम्या या सर्व वर्किंग विमेंस होत्या आणि आहेत
या सर्वाना कधीही गिल्ट वाटलेला नाही नोकरी केल्यामुळे मुलांना वेळ देऊ शकत नसल्याचा
कधीही नाही

असो
इथे थांबू

अण्ड्या,

एक गोष्ट नक्की की पर्याय नसेल तर स्त्रीला (वा कुणालाही) तडजोड करावीच लागते. कारकुनी नोकरी आणि गृहव्यवस्थापन यांच्यात गृव्य स्त्रीसाठी अधिक आकर्षक असायला हवे. एक उदाहरण देतो. जपानमध्ये १/३ अविवाहित मुलींना पूर्णवेळ गृहिणी बनायचं आहे (इंग्रजी दुवा) : http://ajw.asahi.com/article/behind_news/social_affairs/AJ201309300061

जपानसारख्या पुढारलेल्या, प्रगत आणि महाग देशात पूर्णवेळ गृहिणी व्हायला बायका का उत्सुक आहेत? कारण तिथे मुले वाढवणे हे राष्ट्रीय कार्य समजले जाते. तुम्ही ज्याला 'चूल आणि मूल' म्हणता त्याला जपानात 'भावी पिढी घडवणे' म्हणतात.

आता या पार्श्वभूमीवर तुमची विधाने पाहूया.

१.
>> मग यात तिच्या आईने स्वताची नोकरी सोडून तिचे बघितले ते व्यर्थ गेले की नाही, आणि हे चक्र असेच
>> ठेवायचे का?

तुम्हाला पडलेला प्रश्न रास्त आहे. नोकरी (किंवा कारकीर्द) आणि शिक्षण यांचा नेहमी मेळ बसेलच असं नाही. संपोषणीय शिक्षण (sustainable education) हवे. स्त्रीच्या मनाचा कल पाहून त्यानुसार शिक्षण द्यायला हवे. आज सबघोडे बारा टक्के प्रकारचे शिक्षण आहे म्हणून तुम्हाला पडलेला प्रश्न उत्पन्न झालाय.

२.
>> आज लोकांना एकत्र कुटुंब पद्धती नको आहे आणि मग म्हणून हे प्रॉब्लेम जास्त फेस करावे लागताहेत.
>> पण फुल्ल टाईम मॉम हे ऑलटाईम सोल्युशन नसावे.

बरोबर. ही सर्वगुणसंपन्न उकल नाही. मात्र गृहिणीपद सन्माननीय बनवणे निश्चितच आपल्या हातात आहे. त्याकरिता समाजाचा दृष्टीकोन बदलावा लागेल. ते तितकसं अवघड नाही.

३.
>> म्हणजे वर्गातल्या एखाद्या काठावर पास होणार्‍या ढ मुलाने नोकरी करावी कारण तो पुरुष आहे पण एखाद्या
>> सेकंडक्लास मिळवणार्‍या मुलीने ती करू नये कारण तिला मुलांना सांभाळायचे आहे.

बरोबर. कारकुनी नोकरीच्या बाबतीत अधिक प्रकर्षाने बरोबर. कारण तिथे फारश्या वैशिष्ट्यपूर्ण कौशल्याची गरज नसते. अर्थात, मुलीला घर सांभाळण्यात समाधान मिळतंय हे इथे गृहीत धरले आहे. अशा परिस्थितीत तिला नोकरी न करण्याचा पर्याय मिळायला हवा.

आजून एक गोष्ट म्हणजे इथे ढ पण आणि फर्स्टक्लासचा संबंध कुठून आला? Uhoh आपली चर्चा स्त्रीला मिळणाऱ्या पर्यायांशी संबंधित असावी.

४.
>> आपल्या महितीतली एखादी कंपनी जिथे ८ तास काम करावे लागत नाही, रोज हाल्फ डे असतो

अर्धवेळ (पार्टटाईम) नोकरी असू शकते.

५.
>> आपण हुशार कर्तबगार महिलांना तरी चूल आणि मूलच बघायला हवे यातून सूट दिलीत म्हणून त्यांना घेऊन
>> पुढे चर्चा करत नाही.

हुशार व कर्तबगार महिलांसाठी 'मूल होऊ न देणे' हा एक पर्याय उपलब्ध आहेच. दत्तकनिधान हाही पर्याय आहे. मला वाटतं माबोवर एक सदस्येने हा पर्याय वापरला आहे.

चुलीबद्दल म्हणाल तर ते एक अन्नब्रह्म-साधन आहे. अन्न हे परब्रह्म हा विचार रुजला की गृहिणीपदास आपोआप प्रतिष्ठा प्राप्त होईल.

आ.न.,
-गा.पै.

Pages