दाढीत दडलेला यमदूत !
‘कोरेगाव-भीमा’, पुणे–नगर रस्त्यावरील एक ऐतिहासिक गाव ! येथेच दोनशे वर्षापूर्वी पेशव्यांचे शूर सेनापती बापू गोखले यांनी अनेक इंग्रजांना यमसदनास पाठवले होते. मराठयांच्या ह्या दैदिप्यमान इतिहासाची आठवण करून देणारा "युद्धस्थंभ" आजही या रस्त्याच्या कडेला आपले लक्ष वेधून घेतो. याच कोरेगावातील १९७५ मधील एक सकाळ...
दाढीधारी साधूंचा एक जथा "अलख निरंजन" ची साद घालीत कोरेगावात भिक्षा मागत फिरत होता. अंगावर भगवी वस्त्रे, रुद्राक्षाच्या माळा, हातात कमंडलू व घंटानाद करणारा दंड घेवून घरोघर फिरून आया बहिणींना साद घालीत होते. मजल दरमजल करीत नगरहून पुण्याकडे जाताना सध्या कोरेगावात राहण्याचा त्यांचा मानस होता.
या गटाचे प्रमुख होते, एक अतिशय ज्ञानी व तेज:पुंज साधू 'मौनीबाबा'! नाशिकजवळच्या त्रम्बकेश्वर येथे त्यांचा आश्रम होता. सोमवारच्या दिवशी नित्यनेमाप्रमाणे सर्वजण सकाळच्या फेरीला निघाले असताना मौनीबाबांना त्यांची तब्बेत बिघडल्याची जाणीव झाली. दमल्यासारखे वाटत होते, हातापायांना मुंग्या येत होत्या तरी त्यांनी नेटाने फेरी चालूच ठेवली. पण चालताना हळूहळू त्यांचे पाय जड होऊ लागले. इतर साधूंनी त्यांना कसेबसे सरपंचाच्या घरासमोरच्या ओट्यावर बसवले खरे पण त्यांना तेथून उठताच येईना. हातातील कमंडलू देखील धरण्याची शक्ती राहिली नव्हती. सर्व स्नायू जणू दुर्बळ झाले होते. सरपंचाच्या घरासमोरच ते हळूहळू आडवे झाले. गावातील मंडळी कुतूहलाने जमा झाली. बाबांची अवस्था पाहून सरपंचानी त्यांना पुण्याला 'ससून' मध्ये हलविण्याचा सल्ला दिला. सरपंच तसे धार्मिक होते. पदरमोड करून एका टेम्पोची व्यवस्था करून त्यांनी बाबांना ससूनच्या दिशेने रवाना केले.
सोमवारचा दिवस म्हणजे ससूनमध्ये प्रोफेसर युनिटची ‘ओपीडी’ असे. ओपीडी म्हणजे त्या दिवशी येणारे सर्व बाह्यरुग्ण प्रोफेसर डॉं.सैनानी युनिटच्या डॉक्टरांनी तपासून आवश्यकता असल्यास त्यांना आंतररुग्ण विभागात भर्ती करून उपचार केले जात. त्यावेळी मी नुकताच ‘एम डी’ ची परीक्षा पास होऊन डॉं.सैनानी युनिटमध्ये काम करीत होतो. त्या सोमवारी ओपीडी संपल्यानंतर कॅन्टीनच्या दिशेने जात असतानाच एक वार्डबॉय माझ्यासाठी कॉल घेऊन आला. मला ‘सीएमओ' मध्ये एक पेशंट तपासण्यासाठी बोलाविले होते. कॉलबुकवर सही करून पाच मिनिटात येतो असे सांगून मी त्या वार्डबॉयला परत पाठविले. पटकन चहा घेऊन मी ‘कॅजुअल्टी’च्या दिशेने निघालो. ससूनच्या आपत्कालीन सेवा विभागामध्ये चार खाटांचा एक विभाग होता.तेथे इमर्जन्सी रुग्णांवर अत्यावश्यक प्राथमिक उपचार केले जात. अपघात झालेले, विषबाधा झालेले अथवा तापाने फणफणलेले अशा रुग्णांनी हा विभाग गच्च भरलेला असे. ड्युटीवरील नर्स त्यातील एका रुग्णाकडे मला घेवून गेली. हा रुग्ण एक साधू असून त्याच्याच सारखा भगवा वेश धारण केलेला आणखी एक साधू त्याच्या खाटेशेजारी उभा होता.
“कालपर्यंत मौनीबाबांना काहीही त्रास नव्हता. काल त्यांच्या पायांना थोड्या मुंग्या येऊन पाय दुखत होते. जास्त चाल झाल्यामुळे कदाचित असेल म्हणून आम्ही फार काही लक्ष दिले नाही. पण आज सकाळपासून खूपच अशक्तपणा आला असून त्यांना चालताही येत नाही व हाताची बोटेपण अगदी हलेनाशी झाली आहेत.” साधू.
ही सर्व ‘हिस्टरी’ ऐकत असतानाच माझे विचारचक्र वेगात सुरु झाले होते. साधूबाबांच्या हातापायातील शक्ती गेल्या चोवीस तासात झपाट्याने कमी झाल्याचे दिसत होते. असे होण्याचे काय कारण असावे? नुकताच एम डी ची परीक्षा पास झाल्यामुळे माझे अद्यावत ज्ञान व ससून हॉस्पिटलमधील रेसिडेंट डॉक्टर म्हणून तीन वर्षांचा अनुभव यामुळे अशाप्रकारचे रुग्ण तपासण्याची मला चांगलीच सवय होती. अशा प्रकारे हातापायाच्या सर्व स्नायूंची शक्ती अचानक कमी होण्याची शक्यता नसांच्या अथवा स्नायूंच्या आजारामध्ये असते. मेंदूपासून शरीराच्या सर्व भागांकडे जाणाऱ्या या नसा एकतर मेंदूकडून स्नायून्पर्यंत आज्ञावाहनाचे कार्य करतात किंवा त्वचा, स्नायू व सांधे इत्यादीकडूनच्या संवेदना मेंदूपर्यंत पोहचवण्याचे कार्य करतात. आज्ञावाहक अथवा संवेदनावाहक ‘नसा’ या टेलिफोनच्या केबल प्रमाणे असतात. दोहोंचे कार्य देखील एकच म्हणजे विद्युतलहरी वहनाचे असते.
केबलच्या रचनेमध्ये तांब्याच्या तारेभोवती विद्युतरोधक अशा प्लास्टीकचे आवरण असून अशा अनेक तारांची जुडी एका मोठ्या आवरणामध्ये बांधलेली असते. अगदी त्याचप्रमाणे नसांमधील चेतातंतू भोवती देखील 'मायलीन' नावाच्या विद्युतरोधकाचे आवरण असते.
त्यामुळे नसांमधील संदेशाचे “शॉर्टसर्किट’ होत नाही. काही आजारात मायलीनला नुकसान पोहोचल्यामुळे ‘शॉर्टसर्कीट’ होवून संदेशवहनामध्ये अडथळा येतो व हातापायांच्या स्नायून्पर्यंत मेंदूचे संदेश न पोहोचल्यामुळे रुग्णाच्या मेंदूने हात हलविण्याची आज्ञा देवूनही त्याच्या हाताचे स्नायू हलू शकत नाहीत.दुसर्या काही आजारांमध्ये नसांमधील चेतातंतू व स्नायू यांचा जोड ज्या संदेशसंक्रमण केंद्रात असतो ते केंद्र निकामी होते व परिणामत: स्नायू निकामी अथवा ‘पॅरालाईझ’ होतात. नागदंशाची विषबाधा, घरात अथवा शेतीत वापरली जाणारी कीटकनाशकांची विषबाधा, 'बोटुलीनम' नावाच्या जंतूने संसर्ग झालेले अन्नपदार्थ, व्यवस्थित न शिजवलेले मासे व इतर मांसजनक अन्नपदार्थ खाण्यामुळे झालेली विषबाधा, अशा अनेक आजारामध्ये या संदेश-संक्रमण केंद्रावर परिणाम होऊन हा स्नायूंचा पॅरालीसीस होऊ शकतो. कधी कधी तर ‘पोटॅशियम’ या क्षाराचे रक्तातील प्रमाण कमी झाल्यास स्नायूंची हालचाल थंडावते. अशा अनेक कारणांपैकी नेमक्या कोणत्या कारणामुळे साधूबाबांच्या नसा काम करत नव्हत्या हे शोधून काढण्याचे काम आता मला करायचे होते.
बाबांना मी तपासत असतानाच डॉ. देशपांडे तेथे आले. डॉ. देशपांडे हे बालरोग तज्ञ व आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी होते व त्यांचा वैद्यकीय अनुभव दांडगा होता.
“ बाबांना गियांबारी झालेला दिसतो आहे.”
अशा आजाराला "गियांबारी" अथवा GB सिंड्रोम असे नाव आहे. या आजाराचे प्रथम वर्णन गियां व बारी या दोन डॉक्टरांनी केल्यामुळे त्यांचेच नाव या आजाराला दिलेले आहे. हा आजार काही विषाणू अथवा त्यांच्या विखारामुळे तर होतोच पण केंव्हा केंव्हा या विषाणूकरता दिल्या जाणाऱ्या लसीमुळेसुद्धा होऊ शकतो. पन्नास वर्षापूर्वी आलेल्या फ्लूच्या मोठ्या साथीनंतर प्रतीबंधाकात्मक उपाय म्हणून केलेल्या फ्लूच्या लसीकरणानंतर या आजाराचे रुग्ण खूपच वाढल्याचे आढळून आले होते. पिसाळलेले कुत्रे चावण्यामुळे होणाऱ्या 'रेबीज' या आजाराच्या,पूर्वी वापरात असलेल्या, लसीमुळेही हा आजार अनेकांना झाला. पुण्यातील एक नामवंत सर्जनना देखील या लसीनंतर हा आजार होऊन प्राणाशी गाठ निर्माण झाली होती. दुर्दम्य आशावाद व दोन तीन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर सदर डॉक्टर यातून वाचले. ते पूर्ण बरे तर झालेच पण त्यानंतर महाकवी कालिदासांनी लिहिलेल्या मेघदूतातील मेघांनी केलेल्या आकाशप्रवासाचा मार्गही शोधून काढला. अर्थात् आता वापरत असलेल्या सुधारीत लसींमुळे असा "गियांबारी" आजार होण्याची शक्यता नसते.
“ सर्पदंशाची अथवा कोणत्याही विषबाधेची शक्यता तर वाटत नाही. त्यांना ‘आयसीयू’मध्ये दाखल करून पुढील ट्रीटमेन्ट द्यावी लागेल. कदाचित ‘रेस्पिरेटरी पॅरालिसीस’ होऊ शकेल. नीट लक्ष ठेवा.” डॉ. देशपांडे.
गियांबारीच्या रुग्णामध्ये प्रथम पाय व नंतर हाताचे स्नायू कमजोर होतात म्हणजेच पॅरालिसीस पायांपासून डोक्याकडे पसरत जातो व हळूहळू श्वासोश्वासासाठी आवश्यक असणाऱ्या स्नायूंचा पॅरालिसीस होण्याचीही शक्यता असते. यालाच "रेस्पिरेटरी पॅरालिसीस" म्हणतात. अशावेळी रुग्णाचा नैसर्गिक श्वासोश्वास पुन्हा पूर्ववत होईपर्यंत कृत्रिम श्वासोपचार देणाऱ्या ‘व्हेंटीलेटर’ या यंत्राच्या सहाय्याने रुग्णाचा श्वासोश्वास कृत्रिम रितीने चालू ठेवावा लागतो. अशी अत्याधुनिक संगणकचलित यंत्रे आता खूपच सहजपणे व सर्वच रुग्णालयांमध्ये उपलब्ध असतात. पस्तीस वर्षापूर्वी ससूनमध्ये असे एकच यंत्र होते व तेही बंद होते. अशावेळी लोहाराच्या भात्याप्रमाणे असणारे "बेलोज" नावाचे यंत्र दर मिनिटास वीस वेळा हाताने दाबून रुग्णाचा श्वास कृत्रिमपणे चालू ठेवला जात असे. पेशंटच्या नातेवाईकांना तो भाता हलविण्याचे काम तो रुग्ण बरा होईपर्यंत आळीपाळीने करावे लागत असे.
"देशपांडे सर, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे.बाबांचा विकनेस ज्या वेगाने वाढतो आहे त्या वरून त्यांना ‘व्हेंटीलेटर’ लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्यातरी त्यांना दाखल करून ‘स्टेरॉइडस’ सुरु करू व पाहू या काय प्रतिसाद मिळतो ते ! "
‘स्टेरॉइड’ हे आपण नेहमीच ऐकत असलेले एक औषध! आपल्या शरीरामध्ये तयार होणाऱ्या अनेक हार्मोनस् पैकी ते एक हार्मोन! संधिवात, अलर्जी, दमा इ. अनेक आजारांमध्ये त्याचा उपयोग होतो.पण जास्त दिवस घेतल्यास शरीरावर त्याचे अनेक दुष्परिणाम होतात. अनेक भोंदू डॉक्टरांच्या औषधी पुड्यांमध्ये ‘स्टेरॉइड’ हा मुख्य घटक असतो. म्हणूनच अनेक आरोग्य-जागृत व्यक्ती स्टेरॉइडच्या वापराला घाबरत असतात. पण योग्य वेळी योग्य प्रमाणात वापरल्यास हे औषध म्हणजे जणू संजीवनीच!
बाबांना अतिदक्षता विभागामध्ये दाखल करून व पुढील उपचार सुरु करण्याच्या सूचना देऊन मी ‘सीएमओ’ मधून बाहेर पडलो.
सोमवार आमच्या युनिटच्या ओपीडीचा दिवस असे.म्हणजेच त्या दिवशी चोवीस तासात येणारे गंभीर रुग्ण आमच्या युनिटच्या टीमने तपासायचे, त्यांचे केस पेपर्स, हिस्टरी व ट्रीटमेंट लिहून काढायची व उपचार सुरु करायचे. रक्ताचे, लघवीचेनमुने प्रयोगशाळेत पाठवायचे, कोणाच्या मणक्यातून तर कोणाच्या छातीतून पाणी काढायचे! एक ना अनेक कामे करता करता चोवीस तास कसे संपायचे ते कळत नसे. वार्डमध्ये टेबलावर डोके टेकून जी काही थोडी झोप मिळेल तेवढीच काय ती झोप! मंगळवार कधी उजाडे ते काळातही नसे!
मंगळवारी सकाळी ‘आयसीयू’ मध्ये प्रवेश करताना मनात बाबांच्या आजाराविषयी उत्सुकता होती.त्यांचा आजार वाढत असल्याची बातमी सकाळीच मला समजली होती.बहुतेक त्यांना कृत्रिम श्वासोश्वास द्यावा लागेल अशी माझ्या मनाची तयारी करूनच मी त्यांना सामोरे गेलो. बाबांची तब्बेत खरोखरच नाजूक झाली होती. त्यांना हात व पाय मुळीच हलवता येत नव्हते. त्यांच्या स्नायूंमधील पॉवर झाली होती ' ग्रेड झिरो '! एखादाच शब्द मोठ्या मुष्किलीने उच्चारता येत होता. श्वास जलद पण उथळ असा चालू होता. त्यांच्या नाकात नळी घालून प्राणवायूचा पुरवठा चालू ठेवला होता. जर हा पुरवठा थांबवला तर त्यांची जीभ निळी होत होती. म्हणजेच श्वासाचे प्रमाण खूपच कमी होत चालले होते. आता त्यांना कृत्रिम श्वासोश्वास देण्याची गरज होती.
"सर, बाबांना लवकर ‘ट्रॅकिओस्टोमी’ करावी लागेल. ही इज डेव्हलपिंग रेस्पिरेटरी पॅरालीसीस!” हाऊसमन डॉक्टर.
ट्रॅकिओस्टोमी म्हणजे घशावर स्वरयंत्राच्या खाली एक छोटीशी शस्त्रक्रिया करून, श्वासनलिकेला एक छेद घेऊन, त्यात एक नळी बसवली जाते. त्या नळी वाटे फुफ्फुसामध्ये हवा भरणे सोपे असते. बाबांच्या ट्रॅकिओस्टोमीमध्ये मुख्य अडथळा होता त्यांच्या दाढीचा ! अनेक वर्षे वाढवलेल्या त्या दाढीने त्यांची पूर्ण मान व्यापली होती. ती दाढी सफाचट केल्याशिवाय त्यांची ‘ट्रॅकि’ होऊ शकणार नव्हती. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी आमच्या युनिटचे प्रमुख डॉक्टर सैनानी यांना ही केस दाखवून त्यांची परवानगी घेणे आवश्यक होते.
" हे पहा डॉ.गरगटे, मी जाऊन सैनानी सरांना घेऊन येतो, तो पर्यंत तुम्ही बार्बर बोलावून बाबांची दाढी करून घ्या व ट्रॅकिची तयारी करा." माझ्या सहकारी हाउसमन डॉक्टरांना सूचना देऊन मी निघालो.
प्रोफेसर सैनानी हे एक आदरणीय व्यक्तिमत्व होते. ते नुकतेच अमेरीकेहून शिकून आलेले, अतिशय अभ्यासू, ज्ञानी व तीक्ष्ण निरीक्षणशक्ती असलेले डॉक्टर होते. त्यांनी अनेक शोधनिबंध व वैद्यकीय पुस्तके लिहिली होती. इतके असूनही ते अतिशय नम्र व मनमिळावू होते. समोरची व्यक्ती वयाने व अनुभवाने कितीही लहान असली तरी तिचे मत ऐकून घेण्याची त्यांची नेहमीच तयारी असे. ज्ञान हे अगाध असून एकाच व्यक्तीला संपूर्ण वैद्यकीय ज्ञान असणे शक्य नाही हे ते आम्हाला नेहमीच सांगत असत.
मी डॉक्टर सैनानी सरांना घेऊन जात असतानाच त्यांना मौनिबाबांच्या केसची माहिती सांगत होतो. सरांच्या भरभर चालीची बरोबरी करताना मला मात्र पळावे लागत होते. लगबगीने आम्ही आयसीयूमध्ये येवून पोहोंचलो.
सरांनी बाबांना संपूर्णपणे तपासले. कोणाच्याही सांगण्यावर विश्वास न ठेवता, स्वतःला लागणारी सर्व माहिती रुग्णाची तपासणी करून स्वतःच मिळवण्याची त्यांची ख्याती होती. त्यामुळेच त्यांनी ‘ससून’ मधील त्यांच्या पहिल्या पेशंट राउंडलाच आमच्या युनिटमधील अनेक रुग्णांची ‘नवीन निदाने’ अर्थात डायग्नोसिस शोधून काढून पूर्वीच्या निदानकरी डॉक्टरांची भंबेरी उडविली होती. त्यामुळे पहिल्याच दिवशी सरांनी 'ससून'मध्ये दबदबा निर्माण केला होता.
मौनिबाबांची दाढी काढून टाकल्यामुळे त्यांचा चेहरा बदलून गेला होता. नाक कान घसा विभागाचे डॉक्टर ट्रॅकिची तयारी करून शेजारीच उभे होते. बार्बरने बाबांची दाढी करताना सुमारे एक इंच एवढा भाग तेथे काही जखम असल्याने न कापता तसाच ठेवला होता. तेथे थोडी जखम व खपली असल्याप्रमाणे दिसत होते.
" सिस्टर, मुझे एक टॉर्च और मॅग्निफायींग ग्लास चाहिये." सैनानी सर नागपुरकडील असल्यामुळे बहुतेक वेळा हिंदीमध्ये बोलत असत.
भिंगामधून त्या जखमेचे निरीक्षण करताना डॉक्टर सैनानींच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसू लागली. माझ्या हातात भिंग देऊन मला "जरा गौरसे" बघण्यासाठी सांगून सर बाजूला सरकले. मी भिंगातून पाहताना मला दिसले की ती जखमेवरील खपली नसून तो एक किडा होता. त्याच्या फुगलेल्या शरीराखाली दडलेले छोटे पायही भिंगातून स्पष्ट दिसत होते.
“ डॉक्टर शिंदे, यह किटाणू सादा नही है. शायद यह है एक टिक, सम्हजे ना - डॉग टिक! ”
'टिक' या शब्दाने आमच्या सर्वांच्या डोक्यात लक्ख प्रकाश पडला.
टिक म्हणजे मराठीमध्ये "गोचीड"! गोचीड हा कीटक शक्यतो कुत्रा, गाय, घोडा या प्राण्यावर चिकटतो व त्यांचे रक्त शोषण करतो. तो अनेक दिवस चिकटून राहू शकतो. रक्त पिऊन टम्म फुगल्यानंतर तो निसटून पडतो. गोचीडांपासून अनेक आजार पसरू शकतात. टायफस व 'क़्यू' फिवर' नावाचा ताप, त्वचेवर पुरळ येवून संधिवात तयार करणारा 'लाईम' आजार असे अनेक आजार जगामध्ये व आपल्या देशातही भरपूर प्रमाणात आढळतात. काही विशिष्ट जातीचे गोचीड चिकटल्यानंतर एक प्रकारचे विष टोचतात. त्यामुळे कुत्रा अथवा इतर प्राण्याचे स्नायू दुर्बल होतात व ते श्वासोश्वास बंद पडून मरतात. कधी कधी हा गोचीड माणसाच्या शरीराला चिकटतो व रक्त शोषण करतो. काही विशिष्ट जातीचे गोचीडच विषबाधा करू शकतात. गोचीड काढून टाकल्यावर त्याचे विषारी परिणाम काही वेळातच पूर्ण बरे होतात.
"देखो, यह केस टिक पॅरालीसीसका हो सकता है. पहले उस टिकको निकाल दो और फिर देखो यह पेशंट सुधरता है कि नही. अगर यह ठीक होता है तो अपना डायग्नोसीस सही निकला. और हां, टिकको सम्हालके निकालो, उसे क्रश मत करो." डॉ . सैनानी.
पुढील काही क्षणातच मी एका आर्टरी फोर्सेप म्हणजे चिमट्याने त्या गोचीडाचे तोंडाकडील भाग घट्ट पकडून हळूहळू ओढीत ती गोचीड पूर्ण बाहेर काढली.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे मौनीबाबांच्या स्नायूंमधील शक्ती तीन चार तासातच पुन्हा पूर्ववत झाली व बाबा उठून बसले. ट्रॅकिची गरज पडली नाही. संध्याकाळी मी राउंडला गेलो असता बाबांनी दारातच चक्क उभे राहून माझे स्वागत केले. त्यांच्या पॅरालीसीसचा कोठेही मागमूसही राहिला नव्हता. बाबांची इतकी वर्षे सांभाळलेली दाढी गेली होती पण त्यांचा लाख मोलाचा प्राण मात्र वाचला होता ! चौकशीअंती बाबांच्या सतत उशापायथ्याशी झोपणार्या खंडू कुत्र्याने बहुतेक ह्या टिकचा प्रसाद बाबांना दिला असावा असे अनुमान आम्ही काढले होते.
पुढील योगायोग असा की, मौनिबाबाच्या दाढीत लपलेल्या या यमदूताला शोधणाऱ्या डॉ. सैनानींना त्याच वर्षी भारतामधील सर्वोत्कृष्ट वैद्यकीय शिक्षकासाठी असणारा ‘डॉ. बी सी रॉय पुरस्कार’ जाहीर झाला आणि आम्हा सर्वांची उरे अभिमानाने भरून आली.
एकंदरीतच वैद्यकीय सनद मिळविणे खूपच सोपे पण सैनानी सरांच्यासारखी काकदृष्टी व निदानक्षमता मिळविणे फारच कठीण!
भारी. अस्वच्छतेत अनेक रोगांचे
भारी.
अस्वच्छतेत अनेक रोगांचे मूळ सापडते, हेच खरे.
अरे बाप रे ! खरंच इब्लिस
अरे बाप रे !
खरंच इब्लिस म्हणताहेत तशी अस्वच्छताच अनेक आजारांना आमम्त्रण देते.
सर, मस्तच हो.
सर,
मस्तच हो.
लेख मस्तच पण निदान वाचल्यावर
लेख मस्तच पण निदान वाचल्यावर इssयुsss वाटले एकदम.
सही वाचनीय लेख
सही
वाचनीय लेख
हा लेख पूर्वी कुठे तरी
हा लेख पूर्वी कुठे तरी वाचल्याचे आठवते आहे.
तेव्हाही अंगावर काटा आला होता.
हा किस्सा पण जबरी. शाळेच्या
हा किस्सा पण जबरी.
शाळेच्या ट्रीप ला इथे एका आउट्डोअर लर्निंग सेंटरमध्ये नेतात तेव्हा नेहेमी नोट घरी येते की त्या ठिकाणी टिक्स आहेत तेव्हा मुलांना पूर्ण लाबीची शर्ट-पँट्स घाला आणि घरी पोचताच स्वच्छ अंघोळ करायला सांगा म्हणून.
उत्तम लेख
उत्तम लेख
मस्त लेख !!!!
मस्त लेख !!!!
तुमचे सगळे लेख वाचते आहे.
तुमचे सगळे लेख वाचते आहे. वैद्यकीय समस्या आणि त्याची उकल इतक्या साध्या सोप्प्या शब्दांत करता की ... क्या बात है.
विशेष म्हणजे काही माहिती सर्वसामान्यांना सहज कळेल अशा रितीने येते तुमच्य लेखांमधे. उदा. ह्या लेखात नसांचं कार्य आणि विजेच्या तारांशी अॅनालॉजी...
फार सुरेख.
डॉक हा लेख पण सुंदर
डॉक हा लेख पण सुंदर
लेख मस्तच पण निदान वाचल्यावर
लेख मस्तच पण निदान वाचल्यावर इssयुsss वाटले एकदम. >> +१
वा डॉ.साहेब... पुन्हा एकदा एक
वा डॉ.साहेब... पुन्हा एकदा एक उत्तम लेख ..... खूपच सुंदररित्या तुम्ही हे सारे लिहिता ... अकृत्रिम लेखनशैली ....
हा लेख पण सुंदर
हा लेख पण सुंदर
दाद + १००
दाद + १००
कसल्या अदभुत कथा आहेत या.
कसल्या अदभुत कथा आहेत या. एकसे एक! धन्यवाद डॉक्टर.
>>>>> कोरेगाव-भीमा’, पुणे–नगर
>>>>> कोरेगाव-भीमा’, पुणे–नगर रस्त्यावरील एक ऐतिहासिक गाव ! येथेच दोनशे वर्षापूर्वी पेशव्यांचे शूर सेनापती बापू गोखले यांनी अनेक इंग्रजांना यमसदनास पाठवले होते. मराठयांच्या ह्या दैदिप्यमान इतिहासाची आठवण करून देणारा "युद्धस्थंभ" आजही या रस्त्याच्या कडेला आपले लक्ष वेधून घेतो. <<<<<<<
मी अजुन बाकी लेखाचे एक अक्षरही वाचले नाहीये, पण या पहिल्याच वाक्याकरता टाळ्ञांचा कडकडाट करतो.
तो स्तंभ कित्येकदा बघितला आहे, इंग्रजांनि तो उभारला आहे. पण त्याचा तुम्ही मांडलेला वरिल अर्थ मला "चमकावुन" गेला.
ब्रेव्हो..... डॉक्टर ब्रेव्हो, तुम्ही लावलेला अर्थ असाही लावता येतो हेच आत्ता कळले.
या धाग्याचा विषय नाही सबब इथेच पूर्णविराम.
तेंच @ लिम्बू. मान सांगावा
तेंच @ लिम्बू.
मान सांगावा जनात, अपमान ठेवावा मनात.
आईशप्पथ, कस्ल अष्टावधानी
आईशप्पथ, कस्ल अष्टावधानी असायला लागतय निदान करताना!
आपण वापरतो का आपली पंचेन्द्रिये इतक्या सावधपणे, चौकसपणे?
आम्ही आपले सगळे वरवरचे पॉलिश्ड चकाचक्क दिसायला चांगले तेवढेच बघू शकतो, नजरेत भरवु शकतो! असो.
छान माहितीपूर्ण लेख
खूप खूप खूप खूप छान लेख.. सर
खूप खूप खूप खूप छान लेख..
सर मी तुमच्या लेखनशैलीची पंखा (fan) झालीये
लेख मस्तच पण निदान वाचल्यावर
लेख मस्तच पण निदान वाचल्यावर इssयुsss वाटले एकदम.>>> +१
एक गोचीड भारत भ्रमण एका
एक गोचीड भारत भ्रमण एका करणार्या साधूला जेरीला असे आणू शकते आणि डॉ.शिंदेसर आणि त्यांच्या युनिटला असेही ज्ञान देवून जाते जे त्यांच्या सिलॅबसमधूनदेखील काहीवेळा सापडणार नाही. डॉ.सैनानी यांच्याबद्दल जे आदराचे उद्गार इथे लिहिले गेले आहेत ते सार्थच आहेत.
एक शंका आहे सर.....गोचीड प्रमाणेच "जळवा"....Leech अशाच घातकी ठरू शकतात का ? मी "ब्रिज ऑन द रिव्हर क्वाई" चित्रपट पाहिला होता...अलेक गिनेस, विल्यम होल्डन अभिनित....त्या चित्रपटात पूलाला सुरुंग लावण्याच्या योजनेंतर्गत चारपाच सैनिकांची टीम अशाच दलदलीतून जात असताना त्यांच्या अंगाला...पाठीवर, मांडीवर, खांद्यावर....काळ्यानिळ्या जळवा चिकटतात, ज्या रक्त पीत असतात....त्याना सिगारेटच्या चटक्याने अलग केले जाते. अशा लीचेसमुळे गोचिडीसारखा त्रास होत नसेल का ?
सुंदर लेख
सुंदर लेख
छान लेख.. निदान वाचल्यावर
छान लेख..
निदान वाचल्यावर इssयुsss वाटले एकदम. >+१
छान
छान
किती घाण राहतात हे साधू.
किती घाण राहतात हे साधू. माणूस जवळ करु शकत नाही देव कधी जवळ करणार? आणी का?
डॉ. साहेब, आपलं लिखाण एकदम सरस छे!
डॉ. साहेब: मी आपणांस विपु
डॉ. साहेब:
मी आपणांस विपु केला आहे. वेळ मिळाल्यास आपण तो पहावा हि विनंती.
धन्यवाद!!
>>>>> किती घाण राहतात हे
>>>>> किती घाण राहतात हे साधू. माणूस जवळ करु शकत नाही देव कधी जवळ करणार? आणी का? <<<<<
बन्ड्या, तेवढ्यात चान्स मारुन घेतो का? देवबिव कशाला आणायचा इथे? असो.
तुमची स्वःच्छ रहाण्याची व्याख्या काय? सकाळ दुपार तिन्ही त्रिकाळ स्नान/अन्घोळी/अभ्यन्ग, उठताबसता स्यानिटायझरने हात तोन्ड पुसायचे, हात जिथवर पोचतील ते ते शरिराचे सर्व भाग सतत धूत रहायचे, वगैरेच ना? तुमच्या स्वःच्छतेच्या कल्पना कळल्या तर बरे होईल!
म्हणजे तुमच्या व्याख्येप्रमाणे स्वःच्छ राहिलेल्या व म्हणून "देवाने जवळ केलेल्या" - (किन्वा "अल्लाला प्यारे झालेल्या" ) लोकांना शोधून त्यांचा चरणस्पर्ष करता येईल.
सुन्दर!!! सर मी तुमच्या
सुन्दर!!!
सर मी तुमच्या लेखनशैलीची पंखा (fan) झालीये
बाप रे असेही प्रकार आहेत
बाप रे असेही प्रकार आहेत म्हणजे
Pages