पहिली दृष्टी

Submitted by मी मी on 12 June, 2013 - 15:29

आपल्याला गाणं आवडतं, चित्र आवडतात, निसर्ग आवडतो....
पण हि आवड निर्माण करणारी नेमकी नजर कुणी दिली ते आठवतं का??

काही प्रचंड आवडणारी गाणी ऐकतांना नेहेमी मला हा प्रश्न पडतो....
कि संगीताची आवड निर्माण झाली त्या क्षणी आपण नेमकं कुठलं पीस (तुकडा संगीताचा) ऐकत होतो...
तो उच्चभू असा कुठला क्षण होता
कुठला नेमका सूर किंवा ताल कानावर पडला आणि मनात शिरला होता ?...
काय होतं ते? गीत, गझल कि नुसतंच संगीत ?
आह! कि वाह! कि नुसताच हुंकार …. शब्द कुठला बाहेर पडला कंठातून कि मग निःशब्दच झालो होतो आपण.

कुणाचा आवाज होता तो स्वर..जो असा मनाला येउन भिडला होता ??
हि जादू नेमकी कशाची होती...शब्दांची, आवाजाची कि संगीतच तसं सुंदर होतं ...?

काय होतं ते ..जे आपल्या अस्तित्वा भोवतालच्या अरसिक वृत्तीची सर्व कुंपण लांघून आत अगदी आत पोचलं होत...

पहिली सौंदर्य दृष्टी कोणी दिली आपल्याला....कुठल्या नेमक्या क्षणी ती प्राप्त झाली ??
असं काय पाहिलं आपण त्या क्षणी....?
उगवता-मावळता सुर्य कि पूर्ण चंद्र, पक्ष्यांचा थवा कि पावसांच्या कोसळणाऱ्या सरी....
झाडावर उगवणारी एखादी कळी कि फुलांनी गजबजलेलं एखाद झाड
वारा, गारा, कवडसा कि इंद्रधनू ….संथ वाहती नदी कि खवळता सागर
अथांग निरभ्र आकाश, कि मेघ भरले आभाळ कि मग पिवळे कोवळे उन्ह ….

असं काहीसं सुंदर घडलं कि लगेच मनाला कसकाय येउन भिडतं आपल्या....
जन्मतःच ती सौंदर्य दृष्टी घेऊन आलोय का? .....कि मग कोणीतरी त्यातला खरा अर्थ समजावला ?

कोण होते ते ज्यांनी बोट उंच करून चांदण्यांनी भरलेले आकाश दाखवून ती सौंदर्य दृष्टी देऊ केली...
सौंदर्याची अशी परिभाषा समजवणारा तो नेमका क्षण, तो परीघ कुठला होता ??
आणि हि नजर देऊ करणारा किंवा आधीच असणाऱ्या दृष्टीची जाणीव करून देणारा गुरु कोण होता ??

ज्याने कोणी हि सौंदर्य दृष्टी देऊ केली....त्याने आयुष्यभरयासाठी सुखाची शिदोरीच बांधून दिलीय, पुरून उरणारी....

पहिल्या पहिल्या त्या सगळ्याच भारावून टाकणाऱ्या क्षणाला, त्या सुराला, त्या व्यक्तीला माझा शतशः प्रणाम ........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख....................!
सगळ्याच ओळी आवडल्या पण खास काही.
१. हि जादू नेमकी कशाची होती...शब्दांची, आवाजाची कि संगीतच तसं सुंदर होतं ...?>>>
२. उगवता-मावळता सुर्य कि पूर्ण चंद्र, पक्ष्यांचा थवा कि पावसांच्या कोसळणाऱ्या सरी....
झाडावर उगवणारी एखादी कळी कि फुलांनी गजबजलेलं एखाद झाड .........>>>>>
३. कोण होते ते ज्यांनी बोट उंच करून चांदण्यांनी भारलेले आकाश दाखवून ती सौंदर्य दृष्टी देऊ केली...
सौंदर्याची अशी परिभाषा समजवणारा तो नेमका क्षण, तो परीघ कुठला होता ??>>>>>

खुप सुरेख.

मस्त! खूप दिवसांनी माबोवर फेरी टाकली आणि तुझं लिखाण आवडतं म्हणुन वाचलं अन वाचल्याचं चीज झालं, फार सुंदर लिहितेस Happy

बर्‍याच दिवसांनी जुनं लेखन सापडलं... पण दिवसाच्या सुरूवातीचं सोनं झाल्यासारखं वाटलं... सगळ्या सगळ्या आवडणार्‍या साध्या साध्या निरागस गोष्टी क्षणात डोळ्यांसमोरून तरळून गेल्या... मला प्रथमदर्शनी प्रेमात पाडणार्‍या... आणि आईनस्टाईनचे वाक्य आठवले.. Be a loner. That gives you time to wonder, to search for the truth. Have holy curiosity. Make your life worth living.

मी खरंच खुप आभारी आहे परमेश्वराची त्याने मला त्याच्या अप्रतिम कलाकृती पाहण्याची "दृष्टी" दिली आणि त्या सर्वांचीच ज्यांनी माझ्या जाणीवांना "पहिली दृष्टी" दिली त्या कलाकृतींमधील सौंदर्य जोखणारी!

आणि धन्यवाद मयी... ती "पहिली दृष्टी" अजूनही शाबूत आहे, याची या निमीत्ताने आठवण करून दिल्याबद्दल... "आह! कि वाह! कि नुसताच हुंकार …. शब्द कुठला बाहेर पडला कंठातून कि मग निःशब्दच झालो होतो आपण." >> हे तर खूपच आवडलं कारण बर्‍याचदा रिलेट होतं Happy

शब्दांना रंग, गंध, सौंदर्य असतं हे या लेखातून पुन्हा जाणवलं... साधी सहज ओघवती भाषा. आणखी वाचायला नक्की आवडेल. पुलेशु.

रायबागान ...धन्यवाद !

ड्रीमगर्ल खरंच आपण मनस्वी जगतो आणि म्हणून अश्या छोट्या छोट्या गोष्टीही मनाला येउन भिडतात आपल्या.... प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy