स्फटिकांत लपलेला भेसळीचा भस्मासुर आणि विश्वमोहिनी 'डॉ. रेनाते' !

Submitted by SureshShinde on 28 February, 2014 - 16:13

स्फटिकांत लपलेला भेसळीचा भस्मासुर आणि विश्वमोहिनी 'डॉ. रेनाते' !

Melamin.jpg

"डॉक्टर, काय झालय माझ्या टॉमीला ?"
टॉमी, एक वर्ष वयाचे डॉबरमन पिल्लू होते. गेले पाच दिवस ते काही खात नव्हते, मलूल झाले होते. मालकीणबाई, मिसेस रॉबिन्सन यांना त्याचा खूपच लळा असल्याने चिंताक्रांत स्वराने त्यांनी त्याला लॉस अँजेलीसमधील एका प्रख्यात हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.
"म्याडम, टॉमीची तब्ब्येत गंभीर आहे. त्याची दोन्ही मूत्रपिंडे काम करीत नाहीत. त्याला वाचविण्यासाठी त्याचे डायलीसीस करावे लागणार आहे आणि एव्हडे करून तो आणखी किती दिवस टिकेल हे सांगता येणे कठीण आहे."
मिसेस रॉबिन्सन यांनी मटकन बसूनच घेतले.
"आम्ही आमचे सर्व प्रयत्न तर करतोच आहोत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशाच प्रकारे किडनी निकामी झालेले आणखी दोन कुत्रे आणि तीन मांजरी देखील याच हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत."
हे ऐकून मिसेस रॉबिन्सन थोड्या चक्रावल्या. सत्तरी ओलांडलेल्या मिसेस रॉबिन्सन या अगाथा ख्रिस्तीच्या निस्सीम भक्त होत्या. अगाथाच्या एकूण एक कथा आणि कादंबर्यांची त्यांनी अनेक पारायणे केली होती. वरील माहिती ऐकून त्यांची चौकस बुद्धी जागृत झाली. डायलिसीस विभागाच्या बाहेर बसून त्यांनी इतर पाळीव प्राण्यांच्या पालकांशी संपर्क साधला. चौकशीतून एक गोष्ट लक्षात आली कि सर्व किडनी पिडीत प्राण्यांना जे तयार अन्न दिले होते ते एकाच प्रकारचे म्हणजे 'कट्स अण्ड ग्रेव्ही' होते आणि त्यांची ब्रांडहि एकच होता, 'मेनू फूड्स' !
दुसर्याच दिवशी टॉमी निवर्तला. मिसेस रॉबिन्सन आता जास्तच दुखावल्या होत्या. तरीही त्या टॉमीच्या शवविच्छेदनाला उपस्थित होत्या. त्यातून कळले की टॉमीच्या दोन्ही मूत्रपिंन्डामध्ये खडे झाले होते.
एक आठवड्यानंतर शव शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल मिळाला.
"मिसेस रॉबिन्सन, एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे टॉमीच्या मूत्रपिंन्डामधील खडे हे अतिशय वेगळे आहेत. ते नेहमीप्रमाणे नसून त्यामध्ये काहीतरी प्लास्टिक सद्दृश पदार्थ दिसत आहे."
मिसेस रॉबिन्सन त्या रिपोर्टची प्रत आणि इतर आजारी प्राण्यांच्या पालकांच्या केस हिस्टरीज घेवून बेधडक पोचल्या ते 'मेनू फूड्स' कंपनीच्या ओन्तरिओ येथील कार्यालयामध्येच ! सुरुवातीला त्यांना कोणीच काहीच ताकास तूर लागू दिला नाही. पण दुसर्या दिवशी मिसेस रोबिंसनच्या वकिलांचा फोन गेल्यावर मात्र कंपनीची चक्रे फिरली. कंपनीच्या वैद्यकीय विभागाने या तक्रारीची दाखल घेवून प्राण्यांवर प्रयोग करण्याचे ठरवले.
ही बातमी झंझावातासारखी सर्वत्र पसरली. हजारो पाळीव प्राण्यांना मूत्रपिंन्डाचे आजार लक्ष्यात आले. मेनू फूड्स कंपनीचे धाबे दणाणले. तोपर्यंत त्यांच्या अंतर्गत चांचणी विभागाने ह्या फूडमुळेच हा त्रास होत आहे असे सांगितले. त्यांनी मांजरांवर केलेल्या प्रयोगामध्ये केवळ एकाच प्रकारच्या फूडमुळे किडनी फेल्युअर होवून मांजरी मेल्या होत्या आणि त्या फूडमध्ये वापरले होते 'व्हीट ग्लुटेन' जे एक सप्लायरकडून प्रथमच घेतले होते ! ही गंभीर बाब होती. कंपनीला पुढील परिणाम कळून चुकले. त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून पुढील धोका टाळण्यासाठी अमेरिकेतील अन्न आणि सुरक्षा विभागाशी संपर्क साधला. बाजारामध्ये विक्रीसाठी असलेले तब्बल सहा कोटी कंटेनर्स पुन्हा मागवले. अमेरिकेच्याच नव्हे तर जागतिक इतिहासातील हा सर्वात मोठा रिकॉल होता ! ही तारीख होती, गुरुवार, १५ मार्च २००७ !
मेनू फूड्सने त्यांचे अनुमान एफडीए ला कळवल्यानंतर केवळ चोवीस तासांतच न्यू जर्सी आणि कान्सास येथील मेनू फूड्स च्च्या प्लांटस मध्ये एफडीए चे निरीक्षक पोचले. त्यांनी शोधले की भेसळयुक्त व्हीट-ग्लुटेन हा चीन मधून आयात केलेला होता. एफडीए ने या संशोधनासाठी नेमले डॉ. रेनाते रायीमस्कुझेल यांना. डॉक्टर रेनाते या जर्मन वंशाच्या असून प्राणी आरोग्य केंद्राच्या मुख्य होत्या. त्यांना किडनीवरील विषबाधा या विषयामध्ये जास्त रुची होती. रेनाते यांनी अनेक प्राणीडॉक्टरांशी संपर्क साधला. अशा विषबाधेने दगावलेल्या प्राण्यांचे किडनीचे नमुने गोळा करून अभ्यास सुरु केला. पंधरा दिवस उलटले तरी काही क्लू मिळेना. आणि मग एके दिवशी एफडीए च्या शास्त्रज्ञांनी एक आशेचा किरण दाखविणारा शोध लावला. त्यांनी शोधले की व्हीट-ग्लुटेन मध्ये 'मेलामाईन' ची भेसळ होती !

मेलामाईन' हा शब्द आपल्याला नवीन नाही. दैनंदिन जीवनामध्ये प्लास्टिक तयार करण्यासाठी, स्वैपाकासाठी वापरली जाणारी भांडी, टेबलाच्या पृष्ठभागावरील चकचकीत थर, शेतीमध्ये वापरली जाणारी खाते, अग्निरोधक असे अनेक ठिकाणी मेलामायीन वापरले जाते. याच्यामध्ये नायट्रोजनचे म्हणजे नत्राचे प्रमाण खूपच जास्त असते. मेलामायीनवर खूप संशोधन झाले होते आणि त्याचे काहीही दुष्परिणाम दिसून आलेले नव्हते. शास्त्रज्ञ म्हणत होते की मेलामायीन हे मिठाइतके निरुपद्रवी आहे. मग प्राणी का मरत होते ? डॉ . रेनाते यांना हाच प्रश्न रात्रंदिवस भेडसावीत होता. त्यांनी जगभरातील मेलामयीनच्या विषबाधेसंबंधित सर्व शोधनिबंध शोधले. खूप शोधल्यानंतर त्यांना एक निबंध सापडला ज्यात उंदरांना दोन वर्षे भरपूर प्रमाणात मेलामायीन खावू घातले होते. उंदीर मेले नाहीत पण त्यांना मुत्राशयामध्ये म्हणजे युरिनरी बल्याडरमध्ये खडे झाले होते. ह्या खड्यांचे पृथक्करण केले असता त्यांत मेलामायीन आणि युरीक ॲसिड सापडले. डॉ. रेनाते यांना पहिला क्लू मिळाला होता. जे प्राणी अशा भेसळयुक्त अन्नामुळे दगावले होते त्यांच्या किडनीमध्ये प्राणी-विकृती-तज्ञ डॉक्टरांना सूक्ष्मदर्शकाखाली भरपूर स्फटिक म्हणजे क्रिस्टल्स दिसले होते. हे क्रिस्टल्स जरी भरपूर प्रमाणात असले तरी त्यांच्यामुळे किडनी फेल्युअर होवू शकेल असे वाटत नव्हते. पण असे क्रिस्टलस त्यांनी पूर्वी कधीही पहिलेले नव्हते. काही डॉक्टरांनी या क्रिस्टल्सच्या इमजेस एफडीएला पाठवल्या होत्या त्या रेनाते यांनी पहिल्या. त्यांना लक्ष्यात आले कि या क्रिस्टल्समुलळेच मूत्रपिंडान्मधील सूक्ष्म मुत्रनालिका बंद होत असाव्यात जसे मानवी शरीरात युरीक ॲसिड वाढल्यानंतर होते.

nephron.jpg

६ एप्रिल २००७ रोजी म्हणजे सुमारे तीन आठवड्यांनंतर डॉ. रेनाते यांनी मेलामायीन विषबाधेसंदर्भात ही नवी संकल्पना मांडली. पण इतर सहाध्यायी डॉक्टरांनी त्यांना विरोध केला कारण मेलामायीनच्या चाचण्यांमध्ये ते विषारी नाही असेच दिसत होते. त्यांचे म्हणणे होते की दिसलेले क्रिस्टल्स फार कमी होते व त्यांनी असे किडनी ब्लोकेज होणे शक्य नव्हते. पण डॉ. रेनाते ह्यांनी हार मानली नाही. त्यांनी शोधले की जेंव्हा मृत प्राण्यांचे अवयव तपासण्यासाठी काढतात तेंव्हा ते सडू नयेत म्हणून फोर्म्यालीन हे औषध वापरतात. त्यांनी दाखवून दिले कि हे क्रिस्टल्स त्या फोर्म्यालीनमुळे विरघळून जात होते व त्यामुळे साहजिकच ते सूक्ष्मदर्शकाखाली दिसत नव्हते. त्यांनी प्रयोग करून असे होते हे सिद्धही करून दाखवले. त्यांनी दाखवले की त्या प्राण्यांच्या मुत्रापिंन्डामधील सूक्ष्म मुत्रनालिका या क्रिस्टल्समुळे पूर्ण बंद झाल्या होत्या. परिणामी किडनीची मूत्र तयार करण्याची क्रिया बंद झाली होती.
पुढे हे नमुने एफडीए च्या फोरेन्सिक विभागात पाठवले असता त्यांनी या क्रिस्टल्सची स्पेक्त्रोस्कोपिक तपासणी करून ते क्रिस्टल मेलामायीन आणि सायन्युरिक ॲसिडचे असल्याचे शोधले. रेनाते एव्हड्यावरच थांबल्या नाहीत तर त्यांनी माशांना मेलामायीन आणि सायन्युरिक ॲसिड खायला देवून त्यांच्या मूत्रपिंडांचा अभ्यास केला. त्यांनी दाखवून दिले कि केवळ मेलामायीन अथवा सायन्युरिक ॲसिड यांनी किडनीला त्रास होत नाही तर दोन्ही एकत्र दिले तरच होतो. म्हणजे व्हीट-ग्लुटेन मध्ये हे दोन्ही पदार्थ एकत्र आल्यामुळे हे सर्व विषबाधा कांड घडले होते.

अमेरिकेमधील विल्बर एल्लिस या कंपनीने चीनमधून हे व्हीट-ग्लुटेन आयात केले होते. ते १५० मेट्रिक टन मटेरियल त्यांनी चीनला परत पाठवले. गव्हाच्या पिठामधून पिष्ठमय पदार्थ काढून टाकले असता जो नत्रयुक्त चोथा राहतो तो हा ग्लुटेन ! चीनी कंपन्यांनी नफेखोरी करण्यासाठी ग्लुटेनऐवजी साधे पीठ वापरले आणि त्यात नत्र पदार्थांचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि कस्टमला फसवण्यासाठी स्वस्त मिळणारी मेलामायीन पावडर मिसळली. मेलामायीन आरोग्याला फारशी घातक नसल्यामुळे ही भेसळ इतके दिवस लक्ष्यात येत नव्हती. पण जास्त नफ्यासाठी काही चीनी कंपन्यांनी भंगारमध्ये मिळणार्या मेलामायीन ची पावडर करून ती वापरली ज्यात मेलामायीन बरोबर सायन्युरिक असिड देखील होते आणि मग त्यामुळे हे क्रिस्टल विषबाधेचे रामायण घडले !

renate.jpg

अमेरिकेने डॉ. रेनाते यांच्या समाजउपयोगी संशोधनाची दखल घेवून पुढील वर्षी त्यांना दहा हजार डॉलर्स आणि सन्मानाचे 'सर्व्हिस टू अमेरिका' हे मेडलही बहाल केले. अभिनंदन डॉ . रेनाते ! आम्हाला आपला अभिमान वाटतो !

पण रेनातेंचे काम इथेच संपले नाही.
सन २००८ ! चीनमध्ये ऑलिम्पिक खेळांची गडबड चालू होती. नेमके तेंव्हाच घडले आणखी एक भेसळ विषबाधा नाट्य ! दोन वर्षे वयापर्यंतच्या तीन लाख शिशूंना किडनी स्टोन्स निर्माण झालेआणि त्यातील सहा बालके दगावली देखील !त्यांच्या किडनी स्टोन्समध्ये सापडले मेलामायीन ! खरे पहिले तर इतक्या लहान मुलांना असे मूतखडे शक्यतो होत नाहीत. पण या बाळांना दिले गेलेल्या दुध पावडरीमध्ये मेलामायीन मिसळलेले आढळले. डॉ . रेनाते यांनी शोधलेल्या शोध निबंधातील उंदरांना जसे खडे झाले होते तसेच खडे या मुलांना देखील झाले होते. चीन सरकारने याची दाखल घेवून सन्लु कंपनीचा सर्व दुध पावडर साठा नाश केला होता. अन्न आणि औषध विभागाच्या प्रमुखाला, ज्याने या ग्लुटेन आणि दूधभुकटीला योग्य असल्याचे प्रमाणपत्र दिले होते, फाशी दिले व इतर अनेकांना जन्मठेप ! पण एव्हडे होवूनही पुन्हा २०१० मध्ये अशी दुध भेसळ पुन्हा सापडली होती. म्हणतात ना जित्याची खोड ( दुसरे कोणीतरी ! ) मेल्याशिवाय जात नाही हेच खरे !

दूधभेसळ ही सर्वत्र आहे. दुधामध्ये पाणी तर नेहमीचीच बाब आहे. आपल्या महान देशामध्ये एकापेक्षा एक दुध भेसळीचे प्रकार दिसतात. दुधात पाणी घालून घट्ट होण्यासाठी स्टार्च पावडर अथवा युरिया वापरतात. कृत्रिम दुध अथवा केमिकल दूध हा तर एक जीवघेणा प्रकार ! असे दूध विकून अनेक दुध माफिया तयार झाले नसतील तरच नवल. अशा दुधापासून मिठाईदेखील तयार होते. रेल्वे स्टेशनवर मिळणाऱ्या 'चाय गरम' मध्ये पांढरा पोस्टर कलर ,पाणी , स्यक्रिन आणि लाल रंग घातलेला असतो. चहा औषधालादेखील नसतो !

भेसळीच्या या भस्मासुराविरुध्ध डॉ. रेनाते यांनी दिलेला लढा वाचून विष्णूरूपातील मोहिनीचीच आठवण झाली. पुढील आठवड्यात पुन्हा भेटू या अशाच आणखी एका भेसळ पुराणासोबत !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अ‍ॅक्वस सोल्यूशन, शास्त्रीय परिभाषा व ओबफ़ुस्केशन याबद्दल पुन्हा कधीतरी.
(हे वाक्य लिहिल्याशिवाय झोप लागत नव्हती.)

डॉक्टरसाहेब, मोहिनीची कथा साधारण माहिती होती. देवदानवांनी अमृतमंथन केले तेव्हा दानवांना अमृतकुंभ मिळू न देता देवांच्या हवाली करण्याचे कार्य तिचेच. मात्र प्रस्तुत लेखावरून ही मोहिनी कोण ते कळत नाही. डॉक्टर रेनाते का?
आ.न.,
-गा.पै.

मित्रहो,
वरील कथेच्या एका प्रतिसादामध्ये मी मेल्यामीन रेझिन हे फोर्मालीनचे संयुग असल्याचे लिहिले. फोर्म्यालीन हे formaldehyde जो रूम टेम्प ला ग्यास असतो त्याचे ४०% सोल्युशन असते.
"formaldehyde (fôrmăl'dəhīd'), HCHO, the simplest aldehyde. It melts at −92°C, boils at −21°C, and is soluble in water, alcohol, and ether; at STP, it is a flammable, poisonous, colorless gas with a suffocating odor."
"Formalin is a 40% by volume solution of formaldehyde in water, usually with a small amount of methanol (methyl alcohol) added to prevent polymerization; it is used as an antiseptic, disinfectant, and preservative for biological materials."

मी वापरलेल्या फोर्म्यालीन या शब्दावरून श्री चिनूक्स यांनी मला धारेवर धरून शास्त्रीय, अशास्त्रीय असे अनेक शब्द सांगितले. आधी फोर्म्यालीन हे औषध नाही तर रसायन आहे म्हणाले. मी formalin IP आहे असे दाखवल्यावर पुढची 'चूक' दाखवली. मेल्यामीन रेझिन मध्ये फोर्म्यालीन नसते तर formaldehyde असते असे म्हणून माझी चूक सांगितली. खरे पाहता मुद्दा महत्वाचा राहिला बाजूला पण माझी शाब्दिक चूक कशी आणि त्यांचे म्हणणेच खरे असे भासवले. मला थोडे वाईट वाटले.
मीही थोडे वाचले आणि मेलामीन रेझिन कसे करतात याची क्रिया शोधली. Experimental Procedure वाचले. त्यात चक्क formaldehydeचे पाण्यातील सोल्युशन आणि मेल्यामीन पावडर एकत्र करतात असे लिहिले आहे. हा दुवा पहा बुवा ….
Polymer Journal (२०१२)
http://www.academia.edu/2036430/Melamine_formaldehyde_curing_studies_and...

हे पीडीएफ असल्याने EXCERPT दिलेला नाही.
आत्ता मात्र ते म्हणतील त्यात 'फोर्म्यालीन' शब्द दाखवा? नाही ना, मग तुम्ही चूकच ! … नेहमीच !!
असो.

सर,
जाऊ द्या हो.
मिळालेले ज्ञानकण आपले म्हणा, अन पुढचा लेख येऊ द्यात.
मी देखिल, मला समजेल अशा शब्दांत सांगून, माझ्या माहितीत घातल्या गेलेल्या भरीमुळे, माझ्या ओ.टी.ला लावलेले यूव्ही लाईट्स, हेपा फिल्टर्स, पॉझिटिव्ह प्रेशर व्हेंटिलेशन अन लॅमेलर एयर फ्लो काढून टाकून व्हेपराईज्ड हायड्रोजन पेरॉक्साईड वापरायच्या विचारात आहे. स्वस्त व मस्त टेक्नॉलॉजी. रिसेंट रिसर्च असावा बहुतेक..

ह्या अशा गोष्टी वाचल्या की मग प्रश्न पडतो..नेमकं खायचं काय? त्यातून खाण्यासारखं काही असलंच तर मग ते खायचं कशात...म्हणजे कोणत्या धातूच्या ताटात/बशीत इत्यादि इत्यादि...एखादा कमकुवत मनाचा माणूस नक्कीच ह्यामुळे हादरून जाईल...आजवर किती विष आपल्या पोटात गेलं असेल अशा नुसत्या कल्पनेनं!
मी वर जे म्हटलं ही जरा अतिशयोक्ती होती पण क्षणभर का होईना कुणाच्याही मनात असले प्रश्न येतातच..पण मूळ मनुष्यस्वभाप्रमाणे आपण ते थोड्याच वेळात विसरून जाऊन पुन्हा आपल्या नेहमीच्या उद्योगधंद्याकडे वळत असतो...ते एका दृष्टीने बरोबरच आहे..एरवी जगणंच कठीण होऊन जाईल.
असो. डॉ. शिंदे, मीही आपले लेखन वाचत असतो..नियमित प्रतिसाद देत नसलो तरी एक नक्की सांगता येईल की खूप साध्या आणि सोप्या भाषेत आपण लिहिता आणि असे लेखन वाचायला नेहमीच आवडतं...तेव्हा असेच लिहिते राहा.

बाकी तांत्रिक चर्चेबद्दल मी इतकेच म्हणेन..की त्या त्या विषयातले तज्ञ जे काही आपापसात कधी सौम्यपणे तर कधी अहम-अहमिकेने चर्चा करत असतात त्या होणारच आणि जरूर व्हाव्यात..त्यातून काही ज्ञानकण आमच्या सारख्या अज्ञांना मिळाले तर हवेच आहेत...
तसेही मायबोली काय किंवा इतरत्र कुठेही अशा चर्चा, संयत वादविवाद/टोकाचे वादविवाद, एकमेकांच्या ज्ञानाबद्दल/क्षमतेबद्दल शंका घेणे, चर्चा वैयक्तिक पातळीवर घसरणे इत्यादि होतच असते...त्यामुळे त्याबद्दल आता कुणालाच काही वाटेनासे झालंय...पण एका त्रयस्थ भूमिकेतून पाहिल्यावर असे लक्षात येतंय की...आयुर्वेद/हिंदूत्त्व/भारतीयत्त्व वगैरे विषय आले की मग त्याविरुद्ध असणारी मंडळी पेटून उठतात....आणि अमेरिका/अ‍ॅलोपाथी/वैज्ञानिक दृष्टीकोन असे काही विषय आले की मग त्याविरूद्ध काही मंडळी पेटतात...एकूण काय, तर माझंच बरोबर, तुझं/तुमचं चूक अशी टोकाची भुमिका घेऊन वाद होतात आणि मूळ धाग्याचा हेतू हरवलेला असतो...
म्हणून शेवटी सर्वांना एकच आवाहन...चर्चा जरूर करा...पण फक्त संबंधित विषयावर करा...वैयक्तिक पातळीवर उतरू नका.
धन्यवाद!

पण माझी शाब्दिक चूक कशी आणि त्यांचे म्हणणेच खरे असे भासवले. मला थोडे वाईट वाटले.
------ अत्यन्त क्लिष्ट विषय सोप्या भाषेत आणि कथारुपात मान्डताना सामान्य माझ्यासारख्या वाचकाला मन्त्रमुग्ध होते....सामान्यान्च्या ज्ञानात अनमोल भर टाकणारे तसेच इतरान्शी शेअर करावे असे वाटणारे दर्जेदार लेख तुम्ही आहेत...

मनाला वाईट वाटुन घेण्याची अजिबातच अवशक्ता नाही आहे...
तुम्ही तुमचे लिखाण मोकळे पणाने करत रहा. वाचकान्च्या शन्का, चर्चा यातुन विषय उलगडायला मदतच होत असते.

पुढच्या लेखनास मनापासुन शुभेच्छा...

डॉक्टरसाहेब एक विनन्ती. तुम्ही खाद्य तसेच पेये याबाबत आम्हाला अतीशय उपयुक्त माहिती दिलीच आहे. तशी तुम्हाला जमले तर आणी वेळ असेल तसेच माहिती असेल तर ( माहिती असेलच तरी पण विचारतेय, राग मानु नये) मानवी शरीरावर होणार्‍या सुगन्धाच्या बर्‍या वाईट परीणामाबद्दल लिहाल का?

म्हणजे तुम्हाला कल्पना आहेच की आताच्या दशकात बॉडीस्प्रे आणी डिओडरन्टस यान्चे तरुण पिढीत फार प्रमाण वाढले आहे. रोजच हे नित्यनेमाने वापरले जाते. आता उन्हाळ्यात तर याचा वापर जास्तच होईल.

परदेशात असताना मी आणी नवरा कायम हे वापरत होतो. भारतात स्थायिक झाल्यावर मी याचे प्रमाण कमी केले. सध्या जरुर असेल तरच वापरते. दररोज मात्र पॉन्डस बॉडी टाल्क वापरात असते. आम्ही दोघानी अ‍ॅन्टी पर्स्परन्ट कधी वापरले नाही, कारण त्याने घाम येणे बन्द होते. ते धोकादायक होते. तर या सुगन्धान्बद्दल तुम्हाला काय माहीत आहे ते कृपया लिहाल का? तुमचे मार्गदर्शन मोलाचे आहे.:स्मित:

@रश्मी… <<<मानवी शरीरावर होणार्‍या सुगन्धाच्या बर्‍या वाईट परीणामाबद्दल लिहाल का?>>>छान प्रश्न !

काही व्यक्तींना सुगंधाची अलर्जी असू शकते. म्हणजे विशिष्ठ वासामुळे शिंका येणे, अंगावर गांधी उठणे, नाकाला व डोळ्यांना पाणी येणे, डोळे चुरचुरणे, त्वचेला खाज सुटणे, ईसब सदृश त्वचाविकार होणे, दमा उसळणे, इत्यादी तक्रारी उद्भवतात. दिओडरन्ट आणि घाम येवू नये म्हणून वापरले जाणार्या प्रसाधनांमुळे सुमारे २०% लोकांना असा त्रास होतो असा अंदाज आहे. या प्रसाधनात अल्युमिनियम, मग्नेशियम, निरनिराळी व्होलाटायील तेले आणि बरेच केमिकल्स असतात. यातील कोठल्या पदार्थाची अलर्जी आहे हे 'प्याच टेस्ट' (Patch Test ) करून समजू शकते. अंडर-आर्म त्वचा त्रासाचे कारण शोधण्यसाठी याचा उपयोग होतो. पण 'ब्रांड' बदलून आपल्या प्रकृतीला चालेल असे प्रसाधन वापरणे इष्ट होईल. कामावरील वातावरणातील सुगंधामुलेदेखील काहींना त्रास होतो तर कारच्या एसी मुळे देखील !

बॉडी टाल्क मुळे देखील अनेक त्रास उद्भवू शकतात. पूर्वी टाल्कमध्ये असबेस्टोसची भेसळ असे. ती पावडर नाकातोंडात गेल्याने फुफ्फुसाचे विकार अथवा कर्करोग उद्भवू शकतो. टाल्कच्या अलर्जी मुळे काखेत खाज व डर्माटायटीस होवू शकतो. अशा व्यक्तींनी जॉन्सन एण्ड जॉन्सन कंपनीची बेबी पावडर ज्यात टाल्क ऐवजी कॉर्न स्टार्च असते ते वापरणे इष्ट ठरेल. जॉन्सन 'ओरिजिनल' मध्ये मात्र टाल्क असते. स्त्रियांनी प्यान्टच्या आत जननेद्रीयान्जवळ टाल्कम पावडर वापरल्यास ती पावडर जननेन्द्रीयांच्या आत जावून गर्भ पिशवी अथवा ओव्हरीचा कर्करोग करू शकते असा संशय आहे. तेथेही बेबी पावडर वापरणे उत्तम !

सर,
खूपच उपयुक्त लेख..
पण मग काय खायचे आणि कुठे खायचे असा प्रश्न पडतो..
दुध सारख्या दैनंदिन वापराच्य गोष्टीमध्ये अशी भेसळ होतेय तर मग काय म्हणावे!!!

एकूण काय, तर माझंच बरोबर, तुझं/तुमचं चूक अशी टोकाची भुमिका घेऊन वाद होतात आणि मूळ धाग्याचा हेतू हरवलेला असतो......>>> देव काका अगदी खरं लिहिलत !

बाप रे !! मस्त लेख
कालच IBN Lokmat वर दूध भेसळ करणार्या टोळीला पकडल्याची बातमी वाचली. सहा लाखाचा युरीया, तेल आणि रासायनिक पदार्थांचा साठा जप्त केल्याचे दाखवत होते.

>>>>> इब्लिस | 1 March, 2014 - 23:52 <<<<< इब्लिस तुझ्या वरल्या एका पोस्टशी, अन तुझ्या प्रयत्नाशी सहमत. Happy
डॉक्टर, तुम्ही लिहा हो, बाकी "मूळ मतितार्थ/आशय सोडूनच्या अति शाब्दिक चिकित्सेकडे" दुर्लक्ष करा.
परफेक्शन हवे, पण कुठे? मायबोली म्हणजे काय सायन्सचे डॉक्टरेट/पीयच्ड्या मिळविण्याकरता पेपर सबमिट करायचे ठिकाण आहे का? असो.
आम्हाला इंटरेस्ट /आमची आवड-गरज आहे ती धोका कुठे आहे ते कळण्यापुरती, अतितपशीलात जायची गरज नाही आम्हाला.
अन ज्योतिष/अध्यात्म/धर्मशास्त्र वगैरेत तर असे सांगितले आहे की तुम्ही हिमालया येवढ्या पर्वताला जाऊन टक्कर मारा किंवा सुपारी येवढ्या दगडाला पायाने टक्कर मारा, जर योग असेल, तर (अन तरच) तुम्ही वाचता अन्यथा योग असेल (तर अन तरच) सुपारी येवढ्या दगडाला लागलेली ठेचही कपाळमोक्ष करू शकते. तेव्हा मला धोक्याच्या "साईन्टीफिक" नावाची/ इन्चामिलिमिटरमधिल मोजमापाची माहिती (म्हण्जे हिमालयायेवढा की सुपारी येवढा....) ऐवजी, ढोबळमानाने अमुकतमुक बाबतीत धोका संभवतो/आहे इतके कळले तरी पुरेसे असते कारण मी सामान्यजन आहे. (आता "अध्यात्म" म्हणजे "शरिरशास्त्र" त्यात कुठे असले आहे हा प्रश्न आला तरी मला नवल वाटणार नाही.... Wink )

[चिंतनः अतिबुप्रावादी बनले की माणसांचे असेच तर्कदूष्टतेत रुपांतर होते. Wink अन तर्कदूष्टता आणि श्रद्धाभाव वगैरेचा काहीच संबंध असत नाही - पण डॉक्टर, माझी तरी तुमच्या लिखाणावर, मजकुरावर, अन तुम्ही सांगू पहाता त्या कळकळीवर श्रद्धा बसली आहे. Happy ]

धन्यवाद, लीन्बुतींबूजी,
वाचून बरे वाटले. तुम्ही फेसबुक वर शेयर केलेला दुवा (केला असल्यास ) मला विपुमध्ये देवू शकाल काय ?
आपणांस दिवस उत्तम जावो !

लेख आवडला.
तुमची जी तांत्रिक चर्चा झाली ती खुप समजली नाही तरी आवडली. त्यामुळेच CARCINOGENS बद्दल जाऊन थोडे वाचले. जास्त भाजुन काळु झालेल्या टोस्टमधुनपण ते येते हे समजल्याने जरा भिती वाटली कारण १-२दा तसे खाल्ले आहेत. आता नाही खाणार. त्यामुळे दोन्ही बाजुवाल्यांनी वैयक्तिक अपमान न समजता (समजुतीच्या स्वरुपात) अशा चर्चा करत रहावे ही विनंती.

त्यामुळे दोन्ही बाजुवाल्यांनी वैयक्तिक अपमान न समजता (समजुतीच्या स्वरुपात) अशा चर्चा करत रहावे ही विनंती. >>> +१ (आम्ही काड्या घालायचा प्रयत्न केल्यास त्या घालून घेऊ नयेत. आमचे प्रयत्न हाणून पाडावेत. Proud )

<<<कृपया ती कृत्रिम दुध करण्याची प्रोसेस वगळीत तर बरे होइल. त्याचा गैरवापर होउ शकतो.>>>वगळली आहे.

उत्तम माहितीपूर्ण लेख. तुमचे सगळेच लेख आवडतात. माझ्या ओळखीतले सगळेच डॉक्टर खूप रसिक आहेत, कलाकार आहेत आणि छान लिहुही शकतात. डोक्टर्स उत्तम वक्ते आणि लेखक असतात या माझ्या समजुतीला तुमच्या लेखांनी पुष्टी मिळाली.

धन्यवाद डॉक्टर. लिहित राहा. आम्ही वाचतोय.

Everything Should Be Made as Simple as Possible, But Not Simpler- अल्बर्ट आईन्स्टाईन (बहुतेक!!!)

>>>> Everything Should Be Made as Simple as Possible, But Not Simpler- अल्बर्ट आईन्स्टाईन (बहुतेक!!!) <<<<<
आगाऊसाहेब, वरील विन्ग्रजीमधिल वाक्य जरा आम्हा पामरांकरता "अधिक सिम्पल" करुन (सिम्पलर नव्हे बर्का! Wink ) मराठीत सान्गाल का त्याचा मतितार्थ?

धन्यवाद डॉक्टरसाहेब.:स्मित: अतीशय उपयुक्त माहिती दिलीत. अ‍ॅस्बेसटॉस विषयी १० ते १२ वर्षापूर्वी लोकप्रभा की चित्रलेखात वाचले होते, नक्की आठवत नाही.

Pages