स्फटिकांत लपलेला भेसळीचा भस्मासुर आणि विश्वमोहिनी 'डॉ. रेनाते' !

Submitted by SureshShinde on 28 February, 2014 - 16:13

स्फटिकांत लपलेला भेसळीचा भस्मासुर आणि विश्वमोहिनी 'डॉ. रेनाते' !

Melamin.jpg

"डॉक्टर, काय झालय माझ्या टॉमीला ?"
टॉमी, एक वर्ष वयाचे डॉबरमन पिल्लू होते. गेले पाच दिवस ते काही खात नव्हते, मलूल झाले होते. मालकीणबाई, मिसेस रॉबिन्सन यांना त्याचा खूपच लळा असल्याने चिंताक्रांत स्वराने त्यांनी त्याला लॉस अँजेलीसमधील एका प्रख्यात हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.
"म्याडम, टॉमीची तब्ब्येत गंभीर आहे. त्याची दोन्ही मूत्रपिंडे काम करीत नाहीत. त्याला वाचविण्यासाठी त्याचे डायलीसीस करावे लागणार आहे आणि एव्हडे करून तो आणखी किती दिवस टिकेल हे सांगता येणे कठीण आहे."
मिसेस रॉबिन्सन यांनी मटकन बसूनच घेतले.
"आम्ही आमचे सर्व प्रयत्न तर करतोच आहोत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशाच प्रकारे किडनी निकामी झालेले आणखी दोन कुत्रे आणि तीन मांजरी देखील याच हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत."
हे ऐकून मिसेस रॉबिन्सन थोड्या चक्रावल्या. सत्तरी ओलांडलेल्या मिसेस रॉबिन्सन या अगाथा ख्रिस्तीच्या निस्सीम भक्त होत्या. अगाथाच्या एकूण एक कथा आणि कादंबर्यांची त्यांनी अनेक पारायणे केली होती. वरील माहिती ऐकून त्यांची चौकस बुद्धी जागृत झाली. डायलिसीस विभागाच्या बाहेर बसून त्यांनी इतर पाळीव प्राण्यांच्या पालकांशी संपर्क साधला. चौकशीतून एक गोष्ट लक्षात आली कि सर्व किडनी पिडीत प्राण्यांना जे तयार अन्न दिले होते ते एकाच प्रकारचे म्हणजे 'कट्स अण्ड ग्रेव्ही' होते आणि त्यांची ब्रांडहि एकच होता, 'मेनू फूड्स' !
दुसर्याच दिवशी टॉमी निवर्तला. मिसेस रॉबिन्सन आता जास्तच दुखावल्या होत्या. तरीही त्या टॉमीच्या शवविच्छेदनाला उपस्थित होत्या. त्यातून कळले की टॉमीच्या दोन्ही मूत्रपिंन्डामध्ये खडे झाले होते.
एक आठवड्यानंतर शव शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल मिळाला.
"मिसेस रॉबिन्सन, एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे टॉमीच्या मूत्रपिंन्डामधील खडे हे अतिशय वेगळे आहेत. ते नेहमीप्रमाणे नसून त्यामध्ये काहीतरी प्लास्टिक सद्दृश पदार्थ दिसत आहे."
मिसेस रॉबिन्सन त्या रिपोर्टची प्रत आणि इतर आजारी प्राण्यांच्या पालकांच्या केस हिस्टरीज घेवून बेधडक पोचल्या ते 'मेनू फूड्स' कंपनीच्या ओन्तरिओ येथील कार्यालयामध्येच ! सुरुवातीला त्यांना कोणीच काहीच ताकास तूर लागू दिला नाही. पण दुसर्या दिवशी मिसेस रोबिंसनच्या वकिलांचा फोन गेल्यावर मात्र कंपनीची चक्रे फिरली. कंपनीच्या वैद्यकीय विभागाने या तक्रारीची दाखल घेवून प्राण्यांवर प्रयोग करण्याचे ठरवले.
ही बातमी झंझावातासारखी सर्वत्र पसरली. हजारो पाळीव प्राण्यांना मूत्रपिंन्डाचे आजार लक्ष्यात आले. मेनू फूड्स कंपनीचे धाबे दणाणले. तोपर्यंत त्यांच्या अंतर्गत चांचणी विभागाने ह्या फूडमुळेच हा त्रास होत आहे असे सांगितले. त्यांनी मांजरांवर केलेल्या प्रयोगामध्ये केवळ एकाच प्रकारच्या फूडमुळे किडनी फेल्युअर होवून मांजरी मेल्या होत्या आणि त्या फूडमध्ये वापरले होते 'व्हीट ग्लुटेन' जे एक सप्लायरकडून प्रथमच घेतले होते ! ही गंभीर बाब होती. कंपनीला पुढील परिणाम कळून चुकले. त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून पुढील धोका टाळण्यासाठी अमेरिकेतील अन्न आणि सुरक्षा विभागाशी संपर्क साधला. बाजारामध्ये विक्रीसाठी असलेले तब्बल सहा कोटी कंटेनर्स पुन्हा मागवले. अमेरिकेच्याच नव्हे तर जागतिक इतिहासातील हा सर्वात मोठा रिकॉल होता ! ही तारीख होती, गुरुवार, १५ मार्च २००७ !
मेनू फूड्सने त्यांचे अनुमान एफडीए ला कळवल्यानंतर केवळ चोवीस तासांतच न्यू जर्सी आणि कान्सास येथील मेनू फूड्स च्च्या प्लांटस मध्ये एफडीए चे निरीक्षक पोचले. त्यांनी शोधले की भेसळयुक्त व्हीट-ग्लुटेन हा चीन मधून आयात केलेला होता. एफडीए ने या संशोधनासाठी नेमले डॉ. रेनाते रायीमस्कुझेल यांना. डॉक्टर रेनाते या जर्मन वंशाच्या असून प्राणी आरोग्य केंद्राच्या मुख्य होत्या. त्यांना किडनीवरील विषबाधा या विषयामध्ये जास्त रुची होती. रेनाते यांनी अनेक प्राणीडॉक्टरांशी संपर्क साधला. अशा विषबाधेने दगावलेल्या प्राण्यांचे किडनीचे नमुने गोळा करून अभ्यास सुरु केला. पंधरा दिवस उलटले तरी काही क्लू मिळेना. आणि मग एके दिवशी एफडीए च्या शास्त्रज्ञांनी एक आशेचा किरण दाखविणारा शोध लावला. त्यांनी शोधले की व्हीट-ग्लुटेन मध्ये 'मेलामाईन' ची भेसळ होती !

मेलामाईन' हा शब्द आपल्याला नवीन नाही. दैनंदिन जीवनामध्ये प्लास्टिक तयार करण्यासाठी, स्वैपाकासाठी वापरली जाणारी भांडी, टेबलाच्या पृष्ठभागावरील चकचकीत थर, शेतीमध्ये वापरली जाणारी खाते, अग्निरोधक असे अनेक ठिकाणी मेलामायीन वापरले जाते. याच्यामध्ये नायट्रोजनचे म्हणजे नत्राचे प्रमाण खूपच जास्त असते. मेलामायीनवर खूप संशोधन झाले होते आणि त्याचे काहीही दुष्परिणाम दिसून आलेले नव्हते. शास्त्रज्ञ म्हणत होते की मेलामायीन हे मिठाइतके निरुपद्रवी आहे. मग प्राणी का मरत होते ? डॉ . रेनाते यांना हाच प्रश्न रात्रंदिवस भेडसावीत होता. त्यांनी जगभरातील मेलामयीनच्या विषबाधेसंबंधित सर्व शोधनिबंध शोधले. खूप शोधल्यानंतर त्यांना एक निबंध सापडला ज्यात उंदरांना दोन वर्षे भरपूर प्रमाणात मेलामायीन खावू घातले होते. उंदीर मेले नाहीत पण त्यांना मुत्राशयामध्ये म्हणजे युरिनरी बल्याडरमध्ये खडे झाले होते. ह्या खड्यांचे पृथक्करण केले असता त्यांत मेलामायीन आणि युरीक ॲसिड सापडले. डॉ. रेनाते यांना पहिला क्लू मिळाला होता. जे प्राणी अशा भेसळयुक्त अन्नामुळे दगावले होते त्यांच्या किडनीमध्ये प्राणी-विकृती-तज्ञ डॉक्टरांना सूक्ष्मदर्शकाखाली भरपूर स्फटिक म्हणजे क्रिस्टल्स दिसले होते. हे क्रिस्टल्स जरी भरपूर प्रमाणात असले तरी त्यांच्यामुळे किडनी फेल्युअर होवू शकेल असे वाटत नव्हते. पण असे क्रिस्टलस त्यांनी पूर्वी कधीही पहिलेले नव्हते. काही डॉक्टरांनी या क्रिस्टल्सच्या इमजेस एफडीएला पाठवल्या होत्या त्या रेनाते यांनी पहिल्या. त्यांना लक्ष्यात आले कि या क्रिस्टल्समुलळेच मूत्रपिंडान्मधील सूक्ष्म मुत्रनालिका बंद होत असाव्यात जसे मानवी शरीरात युरीक ॲसिड वाढल्यानंतर होते.

nephron.jpg

६ एप्रिल २००७ रोजी म्हणजे सुमारे तीन आठवड्यांनंतर डॉ. रेनाते यांनी मेलामायीन विषबाधेसंदर्भात ही नवी संकल्पना मांडली. पण इतर सहाध्यायी डॉक्टरांनी त्यांना विरोध केला कारण मेलामायीनच्या चाचण्यांमध्ये ते विषारी नाही असेच दिसत होते. त्यांचे म्हणणे होते की दिसलेले क्रिस्टल्स फार कमी होते व त्यांनी असे किडनी ब्लोकेज होणे शक्य नव्हते. पण डॉ. रेनाते ह्यांनी हार मानली नाही. त्यांनी शोधले की जेंव्हा मृत प्राण्यांचे अवयव तपासण्यासाठी काढतात तेंव्हा ते सडू नयेत म्हणून फोर्म्यालीन हे औषध वापरतात. त्यांनी दाखवून दिले कि हे क्रिस्टल्स त्या फोर्म्यालीनमुळे विरघळून जात होते व त्यामुळे साहजिकच ते सूक्ष्मदर्शकाखाली दिसत नव्हते. त्यांनी प्रयोग करून असे होते हे सिद्धही करून दाखवले. त्यांनी दाखवले की त्या प्राण्यांच्या मुत्रापिंन्डामधील सूक्ष्म मुत्रनालिका या क्रिस्टल्समुळे पूर्ण बंद झाल्या होत्या. परिणामी किडनीची मूत्र तयार करण्याची क्रिया बंद झाली होती.
पुढे हे नमुने एफडीए च्या फोरेन्सिक विभागात पाठवले असता त्यांनी या क्रिस्टल्सची स्पेक्त्रोस्कोपिक तपासणी करून ते क्रिस्टल मेलामायीन आणि सायन्युरिक ॲसिडचे असल्याचे शोधले. रेनाते एव्हड्यावरच थांबल्या नाहीत तर त्यांनी माशांना मेलामायीन आणि सायन्युरिक ॲसिड खायला देवून त्यांच्या मूत्रपिंडांचा अभ्यास केला. त्यांनी दाखवून दिले कि केवळ मेलामायीन अथवा सायन्युरिक ॲसिड यांनी किडनीला त्रास होत नाही तर दोन्ही एकत्र दिले तरच होतो. म्हणजे व्हीट-ग्लुटेन मध्ये हे दोन्ही पदार्थ एकत्र आल्यामुळे हे सर्व विषबाधा कांड घडले होते.

अमेरिकेमधील विल्बर एल्लिस या कंपनीने चीनमधून हे व्हीट-ग्लुटेन आयात केले होते. ते १५० मेट्रिक टन मटेरियल त्यांनी चीनला परत पाठवले. गव्हाच्या पिठामधून पिष्ठमय पदार्थ काढून टाकले असता जो नत्रयुक्त चोथा राहतो तो हा ग्लुटेन ! चीनी कंपन्यांनी नफेखोरी करण्यासाठी ग्लुटेनऐवजी साधे पीठ वापरले आणि त्यात नत्र पदार्थांचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि कस्टमला फसवण्यासाठी स्वस्त मिळणारी मेलामायीन पावडर मिसळली. मेलामायीन आरोग्याला फारशी घातक नसल्यामुळे ही भेसळ इतके दिवस लक्ष्यात येत नव्हती. पण जास्त नफ्यासाठी काही चीनी कंपन्यांनी भंगारमध्ये मिळणार्या मेलामायीन ची पावडर करून ती वापरली ज्यात मेलामायीन बरोबर सायन्युरिक असिड देखील होते आणि मग त्यामुळे हे क्रिस्टल विषबाधेचे रामायण घडले !

renate.jpg

अमेरिकेने डॉ. रेनाते यांच्या समाजउपयोगी संशोधनाची दखल घेवून पुढील वर्षी त्यांना दहा हजार डॉलर्स आणि सन्मानाचे 'सर्व्हिस टू अमेरिका' हे मेडलही बहाल केले. अभिनंदन डॉ . रेनाते ! आम्हाला आपला अभिमान वाटतो !

पण रेनातेंचे काम इथेच संपले नाही.
सन २००८ ! चीनमध्ये ऑलिम्पिक खेळांची गडबड चालू होती. नेमके तेंव्हाच घडले आणखी एक भेसळ विषबाधा नाट्य ! दोन वर्षे वयापर्यंतच्या तीन लाख शिशूंना किडनी स्टोन्स निर्माण झालेआणि त्यातील सहा बालके दगावली देखील !त्यांच्या किडनी स्टोन्समध्ये सापडले मेलामायीन ! खरे पहिले तर इतक्या लहान मुलांना असे मूतखडे शक्यतो होत नाहीत. पण या बाळांना दिले गेलेल्या दुध पावडरीमध्ये मेलामायीन मिसळलेले आढळले. डॉ . रेनाते यांनी शोधलेल्या शोध निबंधातील उंदरांना जसे खडे झाले होते तसेच खडे या मुलांना देखील झाले होते. चीन सरकारने याची दाखल घेवून सन्लु कंपनीचा सर्व दुध पावडर साठा नाश केला होता. अन्न आणि औषध विभागाच्या प्रमुखाला, ज्याने या ग्लुटेन आणि दूधभुकटीला योग्य असल्याचे प्रमाणपत्र दिले होते, फाशी दिले व इतर अनेकांना जन्मठेप ! पण एव्हडे होवूनही पुन्हा २०१० मध्ये अशी दुध भेसळ पुन्हा सापडली होती. म्हणतात ना जित्याची खोड ( दुसरे कोणीतरी ! ) मेल्याशिवाय जात नाही हेच खरे !

दूधभेसळ ही सर्वत्र आहे. दुधामध्ये पाणी तर नेहमीचीच बाब आहे. आपल्या महान देशामध्ये एकापेक्षा एक दुध भेसळीचे प्रकार दिसतात. दुधात पाणी घालून घट्ट होण्यासाठी स्टार्च पावडर अथवा युरिया वापरतात. कृत्रिम दुध अथवा केमिकल दूध हा तर एक जीवघेणा प्रकार ! असे दूध विकून अनेक दुध माफिया तयार झाले नसतील तरच नवल. अशा दुधापासून मिठाईदेखील तयार होते. रेल्वे स्टेशनवर मिळणाऱ्या 'चाय गरम' मध्ये पांढरा पोस्टर कलर ,पाणी , स्यक्रिन आणि लाल रंग घातलेला असतो. चहा औषधालादेखील नसतो !

भेसळीच्या या भस्मासुराविरुध्ध डॉ. रेनाते यांनी दिलेला लढा वाचून विष्णूरूपातील मोहिनीचीच आठवण झाली. पुढील आठवड्यात पुन्हा भेटू या अशाच आणखी एका भेसळ पुराणासोबत !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉक्टर, तुम्ही फार छान लिहिता! मी तुमचे सर्व लेख वाचले आहेत आणि परिचितांदेखील वाचण्यास देत असते! भेसळ आणि अन्नपदार्थांमध्ये कृत्रिम पदार्थांचे वाढते प्रमाण फारच भयंकर प्रकार आहे! इथे organic and natural foods चे पुरस्कर्ते म्हणतात की जर तुम्हाला लेबलवरील घटक माहिती नसतील तर ती गोष्ट विकत घेऊ नका! जे मला आता पटायला लागले आहे! डॉ. रेनाते यांचे काम प्रशंसनीय आहे!

डॉक्टर तुमचे आतापर्यंतचे सर्व लेख मी वाचले. क्लिष्ट विषय सोपा करुन सांगण्याची आपली हातोटी खुप उत्तम आहे. कृपया असेच लिहीत रहा. तुम्ही आतापर्यंत लिहीलेल्या लेखांची एक सलग मालिका मायबोलीने एकत्रित करुन ठेवली तर बरे होईल किंवा तुमच्या नविन लेखात तुमच्या आधीच्या लेखांची लिंक देता आली तरी चालेल. तसेही तुमच्या प्रोफाईल अंतर्गत तुमचे सर्व लेख बघायला व वाचायला मिळत आहेतच.

डॉक्टर तुमचे सगळेच लेख अप्रतिम असतात.

भेसळीचे प्रकार ऐकून मती गुंग होतेय.>> +१

बापरे, कसलं भयान क आहे हे. कालच वाचलं की आपल्या ब्रेडमध्ये फ्लिप-फ्लॉप्स आणि योगा मॅट्समध्ये वापरण्यात येणारे ADA नावाचे फोमिग एजंट टाकलेले असते. काय करावे आणि खावे काही कळेनासे झालेय. ऑरगॅनिक पण खरंच ऑरगॅनिक असतं की नाही याचीही शंकाच आहे.

अतिशय उपयुक्त माहिती व ती देखिल मरठी - देवनागरीत.
धन्यवाद. हा लेख फेसबुकवर शेअर करायचा प्रयत्न केला आहे.

काय करावे आणि खावे काही कळेनासे झालेय
>>>
कच्चे फूड खावे शक्यतो नैसर्गिक अवस्थेत. (त्यातही साले इन्सेक्टीसाईडचे अंश असतात म्हणे !) काहीच खाऊ नये हेच उत्तम. मृत्युला कवटाळावे काहीच न खाऊन अथवा भेसळ्युक्त खाऊन !! हाकानाका ! डोक्टरांचे आभार

बापरे, काटा आला वाचुन...

अन्न आणि औषध विभागाच्या प्रमुखाला, ज्याने या ग्लुटेन आणि दूधभुकटीला योग्य असल्याचे प्रमाणपत्र दिले होते, फाशी दिले व इतर अनेकांना जन्मठेप !

ही शिक्षा केली?? आणि तरीही परत भेसळ झालीच..

बाकी भेसळीच्या बाबतीत हिंदी चिनी अगदी भाई भाईच... Angry

केमीकल दुधाची कृती राहुदे. इथे कळेल तरी आपण जे खातो त्याचा उगम. ज्यांना भेसळ करायचीय ते नेटवर कृती शोधत नाही बसणार.

खुप माहितिपुर्ण लेख.
परिचितांदेखील वाचण्यास देत असते! >>> मि सुद्धा

खुप माहितिपुर्ण लेख.
परिचितांदेखील वाचण्यास देत असते! >>> मि सुद्धा
------- मी पण शेअर करतो.

डॉ साहेब उपयुक्त माहिती देत आहात.... धन्यवाद.

चांगला लेख. Happy

पण, <मेलामायीन आरोग्याला फारशी घातक नसल्यामुळे ही भेसळ इतके दिवस लक्ष्यात येत नव्हती.> हे वाक्य अजिबात पटलं नाही. भेसळ लक्षात आली नसली तरी मेलमाईनच्या टॉक्सिसिटीवर १९५० सालानंतर संशोधन सुरू झालं होतं. मेलमाईन सायन्युरेटच्या टॉक्सिसिटीवरही खूप पूर्वी काम झालं होतं. मेलमाईनची टॉक्सिसिटी भरपूर आहे. मेलमाईन स्वतंत्रपणे अपायकारक ठरतं आणि ते आरोग्याला नक्की घातक आहे. (मानवी चाचण्या झाल्या नसल्या तरी प्राण्यांवर चाचण्या झाल्या आहेत.) किंबहुना स्वयंपाकघरातल्या मेलमाईनच्या वस्तूही आरोग्यास अतिशय घातक असू शकतात, असं संशोधन आहे. भारतासारख्या देशात जिथे मेलमाईनच्या गुणवत्तेवर अंकुश नाही, तिथे स्वयंपाकघरात मेलमाईन वापरताना काळजी घ्यायला हवी.

<त्यांनी दाखवून दिले कि केवळ मेलामायीन अथवा सायन्युरिक ॲसिड यांनी किडनीला त्रास होत नाही तर दोन्ही एकत्र दिले तरच होतो. > हा पेपर शोधला पण सापडला नाही. कृपया लिंक देऊ शकाल का? कारण फक्त मेलमाईनमुळे किडनी स्टोन होतात, हे सांगणारे पेपर आहेत.

*

हा एक पेपर वाचनीय आहे - http://jasn.asnjournals.org/content/20/2/245.full

खूप छान लेख. पण काय खावे हेच कळेना होतेय. इतके दिवस बाहेर प्रवासाला गेल्या वर त्यातल्या त्यात उकळलेला म्हणून चहा प्यावा असे वाटत असे. आता तर तो हि बंद करावा.

अप्रतिम लेख!
"प्लिज केमिकल दूध तयार करण्याची कृती वगळी तर फार बरे होइल" >>>>>>> +१००००....

डॉ.साहेब, ही केमिकल दुधाची कृती कृपया येथून काढून टाकावी ही नम्र विनंती.

दुधातील भेसळ कशी ओळखावी यासाठी सामान्य नागरिकां मध्येही जागरुकता निर्माण करण्याची आवश्‍यकता आहे. दूधापासून प्रोटीन हा महत्त्वाचा घटक शरीराला मिळतो. संतुलित आहारासाठी प्रोटीनची अतिशय आवश्‍यकता असते. दुधामध्ये पाण्याची भेसळ असेल तर त्यामुळे शरीराला आवश्‍यक असणाऱ्या प्रमाणात कॅलरीज मिळणार नाहीत. त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम झालेला आढळतो. मुलांचे वजन आणि त्यांच्या शारीरिक वाढीवरही त्याचा विपरीत परिणाम झालेला दिसतो.
दुधामध्ये भेसळीसाठी सामान्यपणे पाणी, स्टार्च, युरिया, ग्लुकोज यांचा उपयोग झालेला दिसतो.
दूध भेसळयुक्त आहे की नाही हे ओळखण्याचीही काही तंत्रे आहेत. त्यासाठी....
दुधाचे थेंब चढ-उतार नसणाऱ्या जमिनीवर टाकावेत. दुधामध्ये पाणी मिसळलेले असेल तर ते थेंब एका जागी न थांबता पाणी वाहते त्याप्रमाणे पुढे सरकतील.
दहा मि.लि. दूध एका थाळीत घेऊन त्यामध्ये आयोडीनचे काही थेंब टाकावेत. दुधाचा रंग निळा झाला तर त्यामध्ये स्टार्च मिसळलेले आहे, हे ओळखावे. त्याचप्रमाणे लिटमस पेपरनेही दुधातील भेसळ ओळखता येईल. दहा मि.लि. दुधामध्ये लिटमस पेपर बुडवावा. त्यानंतर त्याचा रंग निळा झाला तर दुधात सोडा किंवा डिटर्जंट यांची भेसळ केलेली आहे, हे स्पष्ट होते.
दुधात युरिया मिसळला आहे की नाही हे परीक्षानळीद्वारा ओळखता येते. त्यासाठी परीक्षानळीमध्ये 5 मि.लि. दूध घ्यावे. त्यामध्ये काही थेंब ब्रोमोथायमल ब्ल्यू सोल्यूशन टाकावे. त्यामध्ये यु रियाची भेसळ असेल तर दहा मिनिटांत त्याचा रंग निळा होईल.
लॅक्‍टोमीटरनेही दुधाची शुद्धता ओळखता येते. आपल्या घरात लॅक्‍टोमीटर नसेल तर बाजारात ते सहजपणे मिळते. त्याच्या किमतीही सर्वसामान्यांना परवडणाऱ्या असून, त्यावर केलेल्या खर्चामुळे आरोग्याशी होणारा खेळ थांबण्यास मदत होईल. शुद्ध दुधाचे सापेक्षित घनत्व 1.030 ते 1.034 पर्यंत असले पाहिजे.

श्री गापैजी,
आपल्या प्रतिक्रियेची वाट पहात होतो. असो. पुराणामध्ये भस्मासुर नावाचा एक राक्षस फारच माजला होता व देवांना त्रास देत होता. त्याला ज्या कोणाच्या डोक्यावर तो हात ठेवील तो भस्म होईल असा वर मिळालेला होता. त्यामुळे त्राही भगवान होवून सर्व देवांनी विष्णू कडे धाव घेतली असता त्यांनी मोहिनी नावाच्या सुंदर स्त्री च्या रूपाने अवतार घेवून त्या दैत्यासमोर नृत्य करून त्याला खुळावले व त्या धुंदीमध्ये स्वतःचाच हात स्वतःच्या डोक्यावर ठेवल्यामुळे तो भस्म झाला. अशी ही कथा रूपकात्मक म्हणून उधृत केली आहे. आता कदाचित तुम्हालाही ही गोष्ट आठवली असेल ! Happy
धन्यवाद !

आ. न.

सु. शिं.

डॉक्टरसाहेब तुमच्या दर लेखान्मागे आमचे धन्यवाद वाढत चाललेत. दरवेळी डोळे उघडणारा आशेचा एक नवीन किरण असतो. डॉक्टर नव्हे तर तुम्ही देवदूताचेच काम करत आहात.:स्मित:

इतके दिवस निदान उकळलेले आहे म्हणून मी चहा कॉफी निर्धस्तपणे पीत होते, आता काय करणार बाहेर?:अरेरे:

माणसालाच माणसाच्या जीवाची किन्मत राहिलेली नाहीये.

Pages

Back to top