'बघू पुढे' वाली पिढी

Submitted by बेफ़िकीर on 22 February, 2014 - 05:53

ह्या धाग्यान्वये एक गंमतीशीर अनुभवकथन व त्याबाबत थोडे मतप्रदर्शन करण्याची संधी घेत आहे. काही प्रमाणात ह्या धाग्यातील विषयाचा संबंध माझ्या 'मराठीचा अभिमान' आणि 'यू आर रिजेक्टेड' ह्या दोन धाग्यांमधील विषयाशी आहे, पण ह्या धाग्यात वेगळ्याच कोनातून अनुभवकथन करत आहे.

==============

आमच्या संस्थेने फेब्रुवारी महिन्यात दोन महत्वाच्या मार्केटिंग अ‍ॅक्टिव्हिटीज केल्या. एक म्हणजे आमच्याच एका सेंटरवर दोन तीन कंपन्यांना बोलावले व त्यांच्यातर्फे 'काँप्लिमेंटरी' रिक्रूटमेंट ड्राईव्ह आयोजीत केला. ह्या ड्राईव्हमध्ये मुलाखती द्यायला विविध महाविद्यालयातील आधीच पास आऊट झालेले, ह्या वर्षी पास आऊट होणार असणारे असे अनेक विद्यार्थी बोलावलेले होते. मिळालेल्या गुणांचा निकषही असा होता की बहुसंख्य विद्यार्थी येऊ शकतील.

ह्या सर्व विद्यार्थ्यांना मी स्वतः त्यांच्या महाविद्यालयात जाऊन त्यांच्या प्राध्यापक व टीपीओ (ट्रेनिंग अ‍ॅन्ड प्लेसमेंट ऑफिसर) समोर घेतलेल्या सेमिनारमध्ये खालील माहिती दिली होती.

येणार्‍या कंपन्या
गुणांचे निकष
पास आऊट इयरचे निकष
उपलब्ध जागा (ज्या एकुण ३८० होत्या, येस यू रेड इट करेक्टली)
पगारची रक्कम (पहिली नोकरी करणार्‍यांसाठी नक्कीच आकर्षक आकडे होते)
आमच्या सेंटरचा पत्ता, फोन नंबर, संपर्कासाठी नावे, तारीख, वार इत्यादी
सोबत कोणकोणती कागदपत्रे आणायची ह्याची माहिती
पोषाख, हेअर स्टाईल, मेक अप, फूट वेअर ह्या बाबतच्या मेल व फिमेल कँडिडेट्सकडून असलेल्या सामान्य व्यावसायिक अपेक्षा
वर्तन कसे असावे
वेळेचे नियोजन कसे करावे
इंग्लिश नीट येत नसल्यास ते आधीच नम्रपणे नमूद करून टोन कसा सेट करावा
सर्वसाधारणतः काय प्रश्न विचारले जातात
अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट असल्यास ती किती गुणांची, किती कालावधीची व सहसा कशी असते
अ‍ॅटिट्यूड ठेवणे कसे घातक आहे

माझा प्रत्येक सेमिनार त्यामुळे जवळपास एक तासाचा झाला व असे आठ ते दहा सेमिनार्स झाले. हा ड्राईव्ह काँप्लिमेंटरी असल्याने सर्वांचेच चेहरे उजळलेले होते. हे सर्व करण्याशिवाय ह्या विद्यार्थ्यांना आम्ही दोन दिवस आधीपासून आमच्या केंद्रावर बोलावून टेक्नॉलॉजी व कम्युनिकेशन ह्या विषयांचे 'काँप्लिमेंटरी' ग्रूमिंग सेशन्स आयोजीत केले.

आता हे सगळे का केले? तर ह्या माध्यमातून अर्थातच संस्थेची मोठी, प्रभावी जाहिरात होते, नांव कर्णोपकर्णी होते आणि अंतिमतः व्यवसायवृद्धीची शक्यता वाढते.

तर हे विद्यार्थी ग्रूमिंग सेशन्सना कडक हजेरी लावून गेले. अपेक्षेप्रमाणे ड्राईव्हच्या दिवशी आपापले 'बेस्ट' निकष लावून सगळे हजरही झाले व टेस्ट, मुलाखती ह्या सर्व सोपस्कारांमधून गेलेही. ५४ विद्यार्थी पुढच्या राऊंडसाठी एकुण तीन कंपन्यांकडून निवडले गेले व बाकीचे रिजेक्टेड विद्यार्थी परतले.

ह्या रिजेक्टेड विद्यार्थ्यांना आम्ही फीडबॅक सेशनला परत बोलावले व बहुतेकांसाठी असलेला फीडबॅक हाच होता की एखाद्या विशिष्ट टेक्नॉलॉगीत आणि संवादकौशल्य व इंग्लिश बोलण्याच्या हातोटीत ते फार मागे पडत होते. पुढील काँप्लिमेंटरी ड्राईव्हसाठी त्यांनी निदान इंग्लिशची तरी तयारी करावी व ती आम्ही करून घेऊ हेही सांगितले. (अर्थातच, ही इंग्लिशची तयारी फुकट असणार नव्हतीच).

दरम्यान चारच दिवसांनी आमची दुसरी मोठी मार्केटिंग अ‍ॅक्टिव्हिटी म्हणजे एक अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट, जी विद्यार्थ्याचे आय टी क्षेत्रात काम करण्यास योग्य अ‍ॅप्टिट्यूड आहे की नाही हे सप्रमाण सिद्ध करते, ती आयोजीत करण्यात आली. आधीच्या विद्यार्थ्यांपैकी अनेकांनी येथे हजेरी तर लावलीच, पण ही टेस्ट कोणत्याही वर्षातील विद्यार्थ्यांसाठी असस्ल्याने एफ वाय (/एफ ई) पासून सगळेच विद्यार्थी आले होते. ह्या विद्यार्थ्यांमधून ७० पेक्षा अधिक (७०/१००) स्कोर करणारे फक्त १४ विद्यार्थी निघाले व एकुण टेस्ट देणार्‍यांची संख्या होती २१२.

ह्याही सर्वांना आम्ही फीडबॅक दिला व ह्याही विद्यार्थ्यांच्या बाबतीत तेच दोन प्रॉब्लेम्स होते. तंत्रज्ञानाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे न येणे व इंग्लिश न येणे!

इतक्या मोठ्या प्रमाणावर काम केल्यानंतर आम्ही परोपरीने ह्या विद्यार्थ्यांना सांगत होतो की पुढच्या ड्राईव्हच्या आधी इंग्लिशची बॅच लावा.

पण गंमत म्हणजे आजवर अतीउत्साहाने आमच्या केंद्रावर येऊन धडकणार्‍या ह्या विद्यार्थ्यांपैकी एकानेही, लेट मी रीपिट, एकानेही त्यात उत्सुकताही दाखवली नाही.

आमचे नांव झाले, त्याचा परिणाम म्हणून काही इतर विद्यार्थी स्वतःहून आले वगैरे बाबी वेगळ्या!

पण ज्या घटकाला संधी मिळत नाहीत असे मागच्या एका लेखात म्हंटले होते त्या घटकाला एका संधीचे सोने करता आले नाही म्हणून दुसरी संधी घेण्याआधी मेहनत करा म्हंटले तर तो घटक पूर्णपणे उदासीन होता. ह्यात महाराष्ट्रातील सर्व शहर, गावांमधून आलेले विद्यार्थी होते. कोकणापासून विदर्भ आणि सोलापूरपासून जळगावपर्यंत सगळे!

ह्यांच्यातील प्रत्येकाच्या पालकांनी सुमारे वीस हजार ते ऐंशी हजार अश्या रकमांची फी भरून त्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिलेला आहे. होस्टेलवर राहणार्‍यांचे इतर खर्च वेगळेच! मात्र ह्या एका मोठ्या घटकाला तूर्त तरी कसलेही गांभीर्य नाही.

त्यांचा रागही नाही आला आणि कीवही नाही आली. त्यांच्याबद्दल फक्त मनात हा विचार आला की आपल्या आधीच्या पिढीतील मेहनती / कष्टाळू वृत्ती, गांभीर्य आणि प्रयत्न करण्याची इच्छा ह्या लोकांमध्ये अभावानेच दिसत आहे. जणू ह्यांची करीअर्स आधीच कोणीतरी तयार ठेवली आहेत आणि हे पास आऊट झाले की आरामात तिथे नुसते जाऊन बसणार आहेत.

खरे तर ह्या जनरेशनसमोर स्पर्धेच्या तीव्रतेचे भय कधी नव्हे इतके आहे. पण चित्र उलटे दिसत आहे. 'बघू पुढे कधीतरी' हा भाव सार्वत्रिक असावा तसा आढळत आहे. हे सर्वत्र असेच आहे का, असल्यास असे का, इत्यादी!

आपल्यापैकी ज्यांना इच्छा आहे त्यांनी जरूर कारणमीमांसेची चर्चा करावी अशी विनंती!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

(मायबोलीवर आता 'ललित' आणि 'लेख' हे एकाच सदरात लिहावे लागतात, ह्याबाबत मागे एकदा विनंती केलेली होती. ललित व लेख हे दोन वेगळे भाग झाले तर बरे होईल)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<पुण्यामुंबईतल्या शाळांशी संलग्न असलेल्या काही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचा ताण कमी व्हावा, म्हणून जाणीवपूर्वक उपाय योजलेले आहेत. पुण्यामुंबईच्या कॉलेजांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठीची धडपड इतर शहरांमध्ये हे घडू देत नाही.दहावीबारावीचे वर्ग अजूनही भरत नाहीत. >

कृपया उलगडून सांगावे. दहावीबारावीचे वर्ग अजूनही भरत नाहीत म्हणजे पटसंख्या भरत नाही का?

शाळांशी संलग्न महाविद्यालये कशाबद्दल आहे ? जसे पार्ले टिळक विद्यालय समूहाची स्वतःचीच दोन महाविद्यालये आहेत त्याबद्दल की शाळांशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालयांबद्दल? (शाळेच्याच इमारतीत अकरावी-बारावीचे वर्ग?)

लोकसत्तात बातमी वाचली होती की मुंबईतली नामांकित महाविद्यालये आपल्याच खोल्या क्लासेसना भाडे तत्त्वावर देऊन मुलांचीही सोय करतात. त्याचा संदर्भ आहे का?

माझा घराजवळच एक महाविद्यालय आहे. मनपाच्या शाळेच्या इमारतीत ट्रस्टने भाड्याने वर्ग घेतले आहेत. महाविद्यालयात अपेक्षित असलेल्या सगळ्या सुविधा अर्थातच नाहीत. (प्रयोगशाळा, वाचनालय). मुलांनी हजेरी नाही लावली तर छानच असा महाविद्यालयाचा खाक्या असावा असे शेजारच्या एका मुलावरून कळले. त्याच महाविद्यालयात माझ्या नात्यातल्या एका मुलाने दहावीत ९०%+ गुण घेऊन प्रवेश घेतला. तेव्हा कळले की त्याच्यासारख्या मुलांची एक स्पेशल बॅच आहे. त्यांची नावे फक्त कॉलेजच्या पटावर राहतील. त्यांना हजेरी लावायची गरज नाही. क्लासेसशी टायअप आहे.

हे चांगले की वाईट ते कळत/ठरत नाही.

दहावीबारावीचे वर्ग भरत नाहीत, म्हणजे मुलं येतच नाहीत. क्लासला जातात. मी दहावीत-बारावीत असताना वर्ग कधीही भरले नाहीत. बारावीत रुपारेलला ही परिस्थिती होती. आता क्लासचालक महाविद्यालयांशी हातमिळवणी करतात. तुम्ही अमूक कॉलेजात गेलात तर तुम्हांला हजेरीचं बंधन नाही, असं क्लासवालेच सांगतात. हे पुण्यातही आहे आणि अकोला-यवतमाळ-जालना येथेही.

या सगळ्याच प्रकारच्या मुलांना 'पालक आपल्याला नोकरी मिळवून देतील' असे वाटतेय ? >> +१.
मी शिकवते ते खाजगी डिप्लोमा इंजिनीअरींग कॉलेज आहे. पण प्लेसमेंट्संदर्भात इतकी उदासिनता नाही दिसत आमच्याकडे. आमच्या विद्यार्थ्यांपैकी बहूतांशी सगळ्यांचे पालक व्यावसायिक किंवा साध्या नोकरीवाले आहेत. उच्चशिक्षित / इंजिनीअर -डॉक्टर पालक नाहीयेत आमच्याकडे. पण पुढे शिकायचंय की नोकरी करायची आहे की व्यवसाय करायचा आहे हे डिप्लोमाच्या तिसर्‍या वर्षापर्यंत ठरलेलं असतं. काही जण डिप्लोमा सोबतच अजून एखादी डिग्री पण करत असतात किंवा बारावीची परिक्षा देत असतात.

सगळ्यात जास्त कौतूक बिहारी मुलांचं वाटतं. बिहारमधल्या कुठल्यातरी खेडेगावातून येवून कॉलेज जवळ रुम करून रहात असतात ही मुलं. इंग्रजी येत नाही (डिप्लोमाचे पेपर इथे हिंदीतूनही लिहिता येतात). वर्गात इंग्रजीत शिकवलेलं समजलं नाही तर परत परत हिंदीतून विचारतात. अगदी सिन्सियरली लेक्चर्स /प्रॅक्टीकल्स करतात. रेल्वे /मेट्रो /एअरपोर्ट ऑथॉरिटी यांच्या परिक्षांचा अभ्यास करतात. आणि डिप्लोमा संपल्यावर नोकर्‍या करत करत डिग्री करतात.

आमच्यवेळी महाविद्यालयातले गुरूजनच खाजगी क्लासेस घ्यायचे, जे त्यांच्याकडे क्लासला जातील त्यांना वर्गात स्पेशल ट्रीटमेंट असायची, ते रजा असतील तरी चालायचं.... पण आमच्यासारख्यंना सारखं मेलं घालून पाडून बोलणं ऐकून घ्यायला लागायचं म्हणून आम्ही वर्गात बसतच नव्हतो. Happy

माझी हजेरी भरली नाही म्हणून मला प्रीलीमला बसू दिलं नव्हतं तेव्हा मी मेडिकल सर्टीफिकेट (कसे ते विचारायचे नाही!!!!) सबमीट करून प्रीलिम दिल्या होत्या. थोड्याफार फरकाने बेफिकीर यांनी वर्णन केलेली "बघू पुढे" वाल्या पिढीमधली थोडीफार लक्षणं माझ्यामधेही होतीच. त्या वयाच्या अकलेच्या मानाने आणि समजुतीच्या मानाने तेव्हा आपलंच बरोबर आहे हे पूर्णपणे स्वतःलाच माहित असायचं. त्या संदर्भामधे लिहेन पण अजून थोड्या वेळाने.

सामान्य मध्यमवर्गीय नोकरदार पालकांची शहरी मुले की आणखी कुठली ?

सर्वसामान्य नोकरदार तुमच्याआमच्यासारख्याच पालकांची मुले आहेत ही सगळी. Sad

वरची चर्चा वाचुन एखाद्याला वाटेल की सगळा दोष पालकांचा का दिला जात आहे ? याला एक कारण हे आहे की सध्याच्या शिक्षणपद्दतीत पालकांचा खुप मोठा सहभाग आहे. आमच्या पिढीत शिक्षणमंडळ एकतर्फी निर्णय घेऊन मोकळॅ व्हायचे. आता पालकांचाही सहभाग अनिवार्य आहे. शिक्षणमंडळाने कसलाही निर्णय घेतला की लगेच त्याचे पडसाद पालकसभेत उमटतात. जो काही निर्णय असेल त्याचा विरोधच जास्त होतो. असे करण्यापेक्षा दोघेही एकत्र बसुन मुलांचा सर्वांगिण विकास होईल असे कार्यक्रम का नाही आखत हा प्रश्न मला नेहमी पडतो.

मागे श्री. वसंत पुरके यांनी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा किती गहजब उडाला. ते जे करत होते ते चुक की बरोबर हा मुद्दा वेगळा. पण कोणीतरी या प्रश्नावर विचार करत होते हे महत्वाचे. विरोध करणा-यांनी मंडळाची भुमिका समजुन घेण्यापेक्षा मुलांवर अन्याय होतोय ही भुमिका घेऊन शेवटी सग़ळे बंद पाडले. पालकांची भुमिका कायम एकच राहिलीय. मुलांना जास्त मार्क कसे मिळतील हे पाहा. मग बोर्डही बेस्ट ऑफ फाईव, हॉट्स इत्यादी उपाय करत बसते. पालकांनी जी एवढी पॉवरफुल लॉबी उभारलीय त्या लॉबीने मंडळाला शॉर्ट टर्म उपाय करण्यापेक्षा लाँग टर्म उपाय करयला भाग पाडायला हवे. पण कोणीही हा विचार करताना दिसत नाही. ह्या लॉबीतही बोर्डाचे वेगळे आणि सिबिएससीचे पालक वेगळे आहेत. आणि दोघेही कोर्टात धाव घेण्यात पटाईत आहेत.

गेल्या २५ वर्षात वाढलेल्या पालकांच्या हस्तक्षेपाचे आणि एकुण सिस्टीममध्ये वाढलेल्या मार्कच महत्वाचे ह्या भुताचे आता परिणाम दिसताहेत. मुले पोत्यानी मार्क मिळवुन पोत्यांनी पैसे देणा-या अभ्यासक्रमाला जातात. इतर काही बघायची इच्छा त्यांना होत नाही आणि झाली तरी पालक तसे करु देणार नाही. बाकीची क्षेत्रे ओस पडलीत. कधीतरी कुठेतरी बातमी येते की योग्य शैक्षणीक अहर्ता असलेला उमेदवार नसल्याने कित्येक शासकिय जागा रिकामा पडल्यात. मनात येते, इथली मागची पिढी अमेरिकेत गेली आणि तिने तिथे कारभार केला. आता इथे जागा ओस पडताहेत, इथे येईल कुठल्यातरी गरजु देशातली पिढी. Happy आणि मग आमच्या मुलांना नोक-याच नाहीत ही बोंब सुरू होईल इथेही.

बरोबर, अल्पना,
मलाही अशी उदासीनता दिसलेली नाही. ज्ञानार्थी की पोटार्थी असे मुद्दे असतील, पण काहीही न कमावता आपण राहू शकतो, आपले आईवडील आपल्यासाठी नोकरी शोधतील, अशा भावना व्यापक प्रमाणात मलातरी दिसलेल्या नाहीत.

आमच्यावेळी पण होतं हे. १० वीला हजेरी कंपलसरी असायची, पण बारावीला हजेरी कंपल्सरी नसायची. शिक्षक हजेरी घेत होते की नाही हे आठवत नाहीये. पण वर्ग खचाखच भरलेलाच असायचा बहूतेक वेळा. बसायला जागा नसायची गणित सोडलं तर इतर विषयांच्या वर्गामध्ये. मी ११-१२ वीला इंग्रजी.संस्कृत या विषयांचे लेक्चर केले होते की नाही हे मला अजिब्बात आठवत नाहीये. बहूतेक झालेच नसणार कॉलेजात. बाकी विषय आणि त्यांचे शिक्षक आठव्ताहेत. प्रॅक्टिकल्स ना हजेरी आवश्यक असायची त्यावेळी. हल्ली बर्‍याच ठिकाणी ती गरजेची नसते बहूतेक. Happy

त्यामानानी इथलं शाळेशी संलग्न ११-१२ बरंय मग. मुलं रोज किमान शाळेत येतात आणि शिक्षकही शिकवतात.

दहावीबारावीचे वर्ग भरत नाहीत, म्हणजे मुलं येतच नाहीत. क्लासला जातात. मी दहावीत-बारावीत असताना वर्ग कधीही भरले नाहीत. बारावीत रुपारेलला ही परिस्थिती होती + १०००

रुपारेलच हवे करत अगदी उत्साहाने ऐशुने प्रवेश घेतलेला. आणि पहिल्या महिन्यातच भ्रमनिरास झाला. मला तर आजही पश्चाताप होतोय तिला दोन वर्षे एवढा प्रवास करायला लावल्याचा. निदान बारावीत तरी मी लोकल कॉलेजात प्रवेश घ्यायला पाहिजे होता. बारावीत दिवाळीच्या सुट्टीनंतर एकही दिवस कॉलेजात गेली नाही ऐशु.

<<दहावीबारावीचे वर्ग भरत नाहीत, म्हणजे मुलं येतच नाहीत. क्लासला जातात. मी दहावीत-बारावीत असताना वर्ग कधीही भरले नाहीत. बारावीत रुपारेलला ही परिस्थिती होती. आता क्लासचालक महाविद्यालयांशी हातमिळवणी करतात. तुम्ही अमूक कॉलेजात गेलात तर तुम्हांला हजेरीचं बंधन नाही, असं क्लासवालेच सांगतात. हे पुण्यातही आहे आणि अकोला-यवतमाळ-जालना येथेही.>>

वाचून धक्का बसला. Need to update myself. माझ्या वेळेला हे फक्त टी.वाय.ला तेही : अकाउंटसच्या एकाच विषयाला होई.
बहुतेक मुलगे वर्गाबाहेर कारण पहाटे भरणार्‍या ट्युशन्क्लासमध्ये सगळे घोटून घेतलेले असायचे. मुली वर्गातच बसायच्या.

मग महाविद्यालयीन शिक्षक काय करतात? (परीक्षेच्या ऐन तोंडावर संपाच्या धमक्या देण्याशिवाय.)

सर्वसामान्य नोकरदार तुमच्याआमच्यासारख्याच पालकांची मुले आहेत ही सगळी >> बापरे. पण आपल्याला तर नोकरीचे टेन्शन असायचे की. माझा समज होता की आताच्या मुलांना अर्थार्जनाची घाई असेल.

मुलांना मराठीतून बोलायला लावायचे म्हणून त्यांना तुम्हीच विषय सुचवून, तुम्हीच निवडून बोला असे सुचवले. वर्गात कधी नव्हे ती टा.प.त.ऐ.ये. अशी शांतता. मग मी मला सुचतील ते विषय फळ्यावर लिहिले (बोर्डिंगमधला आमचा दिवस असे, निबंधाला नसतील ते). निवडा म्हटले. मग रोल नंबरप्रमाणे मुलांना विषयावर बोलायची सक्ती करावी लागली.
एक विषय दिला होता "मला कशाची भीती वाटते".
दुसर्‍या दिवशी त्यावर भविष्याची, पुढे कसे काय होईल याची भीती वाटते अशा अर्थाची ४-५ वाक्ये मराठी-हिंदी-इंग्रजी संमिश्र भाषेत ऐकायला मिळाली. याला आशेचा किरण म्हणावे का?
"आपल्याआधीही इथे मुले होती. ती बाहेर पडून काहीनाकाही करताहेत. आपणही काहीतरी करूच. काय करायचे हे आधी ठरवले, शोधले तर छानच आहे," असे उत्स्फूर्त भाषण मग मलाच करावे लागले.

काही म्हणा, परिस्थितीची कारणमीमांसा जरी आपण सगळे आपापल्या अनुभवानुसार / वाचनानुसार वगैरे करत असलो तरी असे प्रतिसाद नगण्य आहेत ज्यातील सूर असा आहे की परिस्थिती इतकी गंभीर नाहीच. ओव्हरऑल, अशी अशी परिस्थिती आहे इतपत बहुधा मान्य होत आहे.

संपूर्ण बेसिक शिक्षण व परिक्षापद्धतीमधे 'घोका न ओका' एवढेच आहे.
एखाद्या गोष्टीबद्दल चार पुस्तके वाचून स्वतः विचार करायचा हे नाहीच. अभ्यास आणि मग स्वतः विचार करून एखाद्या गोष्टीबद्दल बोलायचे असते मग कदाचित ते इतरांपेक्षा वेगळे असले तरी चालेल हे कुठल्याच शिक्षणसंस्थेला फारसे मान्य नसते.
साधे मुलांचे प्रोजेक्टस आईबाप करून देतात वर्गात बेस्ट व्हावे म्हणून.
लहानपणापासून मेंदूला तीच सवय. कसं जमणार?

मी गेले १२-१३ वर्ष मास्टर्सला आलेल्या विद्यार्थ्यांना शिकवते. नाटकाच्या मास्टर्सला किती टक्के पडले याने काही फरक पडत नाही. बाहेर कामाला लागल्यावर तुम्हाला विषय किती समजलेला आहे आणि त्याचा उपयोग तुमच्या कामात कसा होतोय हे महत्वाचे ठरते. हे पचायला अत्यंत जड जाते मुलांना.
सगळी थिअरी पाठ करणे एवढेच करतात आणि मग प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करताना तद्दन खोटे (डिसऑनेस्ट या अर्थी) काम करतात.

महाविद्यालयीन शिक्षक काय करतात?

सरकारकडून फुक्क्ट लाखभर रू दर महिन्याला घेऊन स्वतःचा वेगळा ट्रान्सपोर्ट, दलाली, प्लॉटींग धंदा करतात.
वैद्यकीय महाविद्यालयातील असतील तर बाहेर प्रायवेट प्रॅक्टीस करतात, अभियांत्रिकी असतील तर कंसल्टींग/ धंदा करतात इ. इ.

सरकारकडून फुक्क्ट लाखभर रू दर महिन्याला घेऊन स्वतःचा वेगळा ट्रान्सपोर्ट, दलाली, प्लॉटींग धंदा करतात.
वैद्यकीय महाविद्यालयातील असतील तर बाहेर प्रायवेट प्रॅक्टीस करतात, अभियांत्रिकी असतील तर कंसल्टींग/ धंदा करतात इ. इ. >>>

साती खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा थोडाफार अनुभव आहे (काम करण्याच्या आणि व्यवस्थापनपण जवळून बघितलं आहे). सगळीकडे तरी कंसल्टींग /धंदा करायला मान्यता नसते. आमच्याच संस्थेच्या इथल्या आणि औरंगाबादच्या डिप्लोमा/डिग्री दोन्ही कॉलेजांमध्ये शिक्षकांना वर्गात अगदी एक विद्यार्थी असला तरी शिकवावं लागतं. सकाळी ९.३० ते ६.०० या वेळात बाहेर काही कामानिमित्त जायचं असेल तर परवानगी घ्यावी लागते (जी खूप गरजेचं काम असेल तरच मिळते) नाहीतर रजा घ्यावी लागते. सणासुदीच्या सगळ्या सुट्ट्या पण नसतात आमच्याकडे. बर्‍याच सुट्ट्या कँसल करून त्याऐवजी दिवाळीला आठवडाभर सुट्टी दिली जाते. सगळीकडेच शिक्षक रिकामे बसून असतात किंवा मुलं वर्गातच येत नाहीत असं नसतं. ७५% पेक्षा कमी हजेरी असेल तर आमच्यावेळी पालकांना कॉलेजात बोलावलं जायचं. (बहूतेक अजूनही तसं होतं.)

परिक्षा पद्धती बदलणे गरजेचे आहे. जिथे घोकण्याने उत्तरं लिहुन पास होता येते, तिथे वर्षभर मेहनत कोण करेल? पण परिक्षाच जर अशी असेल, की प्रत्येक प्रश्नावर विचार करावा लागेल, तर प्रत्यकच विद्यार्थी मेहनत करेल.
कुठेना कुठे जॉब मिळतोच ही घातक गोष्ट होत चाललीय की काय असही वाटू लागतय.
कंपन्याही आता कंटाळल्या असतील आणि कोणत्याही (इंजिनिअरींग) स्ट्रिमचा विद्यार्थी असो, त्याला नविन तंत्रज्ञान/ लँग्वेज शिकवता येते (शिकवावं लागतेच), हे कंपनीला माहिती झालय, त्यामुळे त्याही नविन लोकांना भरुन घेतात. ज्यांना जमते, ते जास्त पॅकेज घेतात, ज्यांना जमत नाही त्यांना कमी. अजुन काय !

अल्पना, अधिकृत मान्यता बहुतेक कुठेच नसते.
शिकविणार्या डॉक्टर लोकांनाही जर बाहेर प्रॅक्टीस करायची असेल तर पगारातले १०-२० टक्के सोडून देऊन प्रॅक्टिस करता येते , तीही कॉलेजच्या वेळानंतर.
गंमत अशी आहे की हे कोणी पाळते का?
मी महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही ठिकाणी शासकीय महाविद्यालयात असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केले आहे.
त्यामुळे अनुभव आहे.

हो मेडीकल कॉलेजचं माहिती आहे. माझ्या ओळखीचे पण शासकिय वैद्यकिय महाविद्यालयामधले आणि खाजगी मधले सुद्धा डॉक्टर कॉलेजातले शिकवणे, ओपीडी इ. करूनही खाजगी प्रॅक्टीस करतात.
पण इंजीनिअर्सना हे खाजगी कन्सल्टेशन करणं जरा अवघड आहे. आमचेही काही शिक्षक करायचे कन्सल्टंसी /बिल्डरचं काम. पण प्रमाण खूप नगण्य आहे /होतं. आणि हे करताना हे लोक वर्गात शिकवायचेपण. (आमच्या संस्थेने मागे काही शिक्षकांवर कारवाई केली होती यासंदर्भात असं ऐकलंय.)

अ‍ॅटिट्यूड ठेवणे कसे घातक आहे>>>>..... ह्यावर अजुन थोड लिहा ना.
रीया +१
खुप कमी मुलांना थेट विरोध करता येतो पालकांना करीअर निवडीबाबत.मला आवड नसुन ही जास्तीची मेहनत घेऊन मी बी.सी.एस पुर्ण केल.पण पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन ह्यात करायच नाही.हा माझा ठाम निर्णय होता.आय .टी इज नॉट माय कप ऑफ टी हे आधी कळाल म्हणुन बरं.कॉलेजच्या viva मधे मला फक्त इंग्रजीच्या viva मधे जास्त मार्क्स होते.१० मि सगळ्यासमोर कुठल्यातरी एका टॉपीक वर बोलायच होत.त्यात मी एक लव स्टोरी सांगितली होती.:फिदी: जी पुर्ण ग्रमॅटिकली करेक्ट नव्हती.पण शिक्षकांना हा वेगळा प्रयत्न वाटला.
मग जर्मन शिकायला सुरुवात केली.. एकीकडे पार्ट टाईम मॅनेजमेंट डिप्लोमा सुरु केला.आनि हे मी नक्कीच एन्जॉय कर्तीये. Happy

बेफि म्हणतातः

३. महाविद्यालयांमध्ये होणार्‍या कँपसच्या तुलनेत मी ज्या संस्थेत आहे....
...आणि हे केवळ आमच्याकडच्या प्लेसमेंट्समुळे, हे त्यांच्यातोंडून विद्यार्थ्यांसमोर वदवून घ्यायला आम्हाला इतर काही करावेच लागत नाही.

आणि तरीही मूळ लेखात नोंदवलेला प्रश्न असा, की एवढे असूनही मुले उदासीन आहेत.

***
मवा | 25 February, 2014 - 10:21
या सगळ्याच प्रकारच्या मुलांना 'पालक आपल्याला नोकरी मिळवून देतील' असे वाटतेय ?

***
माझे आकलनः

१. बेफिंची संस्था, आपल्यामार्फत प्लेसमेंट व्हावी म्हणून स्पेशल प्रयत्न करत, आपल्या शिकवणीला विद्यार्थी खेचण्याचे काम करते आहे.
१ (अ). कॉलेजवाले निर्लज्जपणे म्हणा, किंवा कामटाळू पणा करण्यासाठी म्हणा, प्लेसमेंट साठीचे प्रयत्न करण्याचे काम 'आऊटसोर्स' करून बेफिंच्या संस्थेस देतात. ज्यात इंटरव्ह्यू अ‍ॅरेंज करणे, अनेक कंपन्यांच्या एचार लोकांना पटवणे, वगैरे जास्तीची (वर्गात लेक्चरची पाटी टाकणेव्यतिरिक्तची) इतर कामे येतात.
२. बेफिंच्या कंपनीचे हे काम समाजसेवा म्हणून अजिबात नाही. पैसे भक्कम मोजून घेतले जात असणारच, त्याशिवाय बेफिंना पगार मिळणार नाही. Sad
३. मुले अजून कमावती नाहीत, सबब या फिया भरण्याचे काम त्यांचे आईबाप करणार.

म्हणजेच पालक नोकरी मिळवून देताहेत, व बेफिंसारखे लोक त्यांना मदत करताहेत. बरोबर?

मग आपण नक्की चर्चा कसली करतो आहोत?

बेफिकीर,
तुमच्याकडे येणारी मुलं ही अभियांत्रिकी कॉलेजांमधली असतात का? की ती बीसीए, बीसीएस, एमसीएसचे विद्यार्थी आहेत? पूर्वी (म्हणजे दहाबारा वर्षांपूर्वी) पुण्यातल्या अगदी मोठ्या कॉलेजांमधली मुलं अशा संस्थांमध्ये जायची, हे माहीत आहे. पण आता बहुतेक सगळ्या चांगल्या कॉलेजांमध्ये उत्तम प्रशिक्षणाची सोय आहे.

अंकु, तुझ्यासारखीच माझ्या ओळखीची एक मुलगी कॉमर्समध्ये डिग्री झाल्यावर आता भाषा शिकतेय, त्यातच करीअर करणार यावर ठाम आहे. आपली पाच वर्षे आपण फुक्कट घालवली याचे तिला आज वाईट वाटतेय. तेव्हाच मार्गदर्शन मिळाले अस्ते आणि पालकांनी मुलीचा कल ओळखला असता तर आज तिचे चित्र वेगळे असते.

चिनूक्स,

आमच्या संस्थेत बी एस सी, बी कॉम पासून बीसीए, एम सी ए, बीसीएस, एम सी एस, बीई, एम ई, बी टेक असे सर्व विद्यार्थी येतात. Happy

इब्लिस,

तुम्ही केलेले समरायझेशन योग्यच वाटले. खरे तर, त्यामुळे चर्चेला (मला इच्छा होती तशी) दिशा मिळण्याची शक्यताही निर्माण झाली.

तर तुमच्या त्या पोस्टचाच फायदा उचलत मी पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न करतो की आपण नेमकी चर्चा कसली करायला हवी आहे. Happy

विद्यार्थ्यांची तूर्त दिसणारी मानसिकता:

१. आपण एका महाविद्यालयातून पदवी घेणार आहोत आणि नंतर कधीतरी आपले व्यावसायिक आयुष्य सुरू होणार आहे.

२. तीव्र स्पर्धेचे युग आहे हे मला समजत आहे.

३. कॉलेजमध्ये 'जावा'वर भर दिला जात आहे आणि डॉट नेटवर नाही (हे एक उदाहरण)

४. कॉलेजमध्ये फार गंभीरपणे नाही वावरले तरी पदवी हातात पडणारच आहे.

५. प्रत्यक्ष प्रोजेक्टवर काम करताना अतिशय वेगळेच प्रशिक्षण ऑन द स्पॉट घ्यावे लागणार आहे.

६. असे प्रशिक्षण कदाचित काही इतरच संस्था देत असतात, कॉलेज ते देत नाही कारण युनिव्हर्सिटीने ते दखलपात्र समजलेले नाही.

७. पालकांना मी नेमके काय करतो आहे हेच समजत नाही आहे.

८. हे एक असे क्षेत्र आहे की ह्यात मिळणारे मार्क्स नेमके काहीच सांगू शकत नाहीत. खूप गुण असणारा खूप चांगले करिअर मिळवू शकेल असे सरसकटपणे शक्य नाही हे मला समजत आहे.

९. दररोज टेक्नॉलॉजी बदलत आहे. दोन वर्षापूर्वीचे ज्ञान आज 'ऑब्सोलेट' होत आहे.

१०. मग मी आज कश्याचीच काळजी का करावी? प्रत्यक्ष वेळ आल्यावरच तयारी केलेली काय वाईट? तसेही काय वाईट चाललेले आहे? घरच्यांकडेही आपल्याला अजुन अनेक वर्षे जगवायला बक्कळ पैसा आहेच की?

ह्या सगळ्यामुळे एक निष्काळजीपणा, एक बेफिकीरी आलेली आहे जी इतकी आहे की समोर ढळढळीतपणे आपला फायदा दिसत असूनही हे विद्यार्थी तो फायदा उचलण्याबाबत उदासीन आहेत.

तर...... चर्चा ह्यावर व्हायला हवी आहे असे माझे म्हणणे आहे. Happy

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

ओह, म्हणजे हे फक्त आयटी /सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करणार्‍या /करु इच्छिणार्‍या मुला-मुलींसंदर्भात आहे तर.

मी इथे शिकवत असलेल्या कॉलेजात मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स हे दोनच विषय आहे. बहूतांशी लगेच डिप्लोमानंतर नोकरी करणारे विद्यार्थी याच संदर्भातील काम करतात (कोअर सबजेक्टमध्ये). सॉफ्टवेअर /आयटी क्षेत्राबद्दल काहीच माहिती नाहीये.. त्यामूळे मी काही कंमेंट करु शकत नाही.

बेफिकीर,
हे मुद्दे पुन्हा मांडल्याबद्दल धन्यवाद.
लेखातून मला हे पुरेसं स्पष्ट झालं नव्हतं.

बेफि,

सर्वप्रथम, माझ्या प्रतिसादातले नुसते शब्द न वाचता त्याचे स्पिरिट ध्यानी घेतल्याबद्दल धन्यवाद!

आजकालची मुले कष्ट करू इच्छित नाहीत, त्यांना भवितव्याची चिंताच नाही, अगदी त्यांना स्पून फीडींग उपलब्ध करून दिले, तरी त्याचा फायदा घ्यावा, असे त्यांना वाटत नाही, असे तुमचे एकंदर प्रतिपादन आहे, व त्यामुळे तुम्हाला या पिढीची काळजी वाटते आहे, असे दिसले.

यावरून जितकी चर्चा झालिये, त्यात एकूण सूर शाळा-कॉलेजमधे मास्तर लोक पाट्या मारतात. एकूणच शिक्षणपद्धती परिक्षा व मार्क बेस्ड असल्याने फक्त घोका ओका इ. झालंय, असेच मुद्दे दिसले.

थोडा वेगळा विचार करू या?

१. बोरिवलीहून रोज २ तास येणे २ तास जाणे प्रवासात घालवून अभ्यास करणारी मुले.
२. अगदी ८वीपासून आयायटी क्रॅक करायचीच म्हणून कष्ट करणारी, मुले.
३. अनेक स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणारी मुले.
४. कोणत्याही कॉलेजच्या कार्यक्रमांत आयोजन, संयोजना पासून ते पूर्ण होईपर्यंतची सगळी कामे यशस्वीरित्या सांभाळणारी मुले.
५. आंतरशालेय, गाव्/जिल्हा/राज्य्/राष्ट्रिय पातळीवर खेळांत चमकणारी मुले

ही इतकी रेअर आहेत का? तर नाही. अ‍ॅक्चुअली मुलांकडे कष्ट करायची प्रचण्ड कपॅसिटी आहे. व भरपूर मुले शिक्षण मिळविण्यासाठी प्रचण्ड कष्ट करीत आहेत.

फक्त, त्यांना मनापासून, रस घेऊन काम करावेसे वाटेल असे ज्ञानार्जनाचे मार्ग उपलब्ध करून देण्यात आपण कमी पडलो आहोत. त्यामुळे त्यांचा त्या त्या कामात रस दिसत नाही, जसे, कॉलेजात शिकणे.
कॉलेजला दांडी मारणारा मुलगा क्लासमधे अभ्यास कसा करतो?
कालेजात कोबॉल/जावा शिकावी लागते, अन मार्केटमधे डॉट नेट शिवाय निभाव लागत नाही. मग त्याने तिथे मन लावून निरुपयोगी ज्ञान मिळवण्यात वेळ वाया घालविण्यापेक्षा, कॉलेज टाईम = मन रमवणारा छंदवर्गाचा वेळ. असे समजून टाईमपास केला तर काय चुकले?

जेव्हा रिक्रूटर या भूमिकेतून आपण या मुलांकडे पहातो व म्हणतो, की ही मुले नालायक आहेत, अनएम्प्लॉयेबल आहेत, त्यावेळी आपल्याला खरे तर असे म्हणायचे असते, की माझ्या व्यवसायात नोकर बनण्यासाठी गरजेचे असलेल्या प्रकारचे ज्ञान यांना कॉलेजातून मिळालेले नाही.

अरे, मग मुलाना दोष न देता, योग्य ज्ञान देण्याचे मार्ग कोणते ते बघू या आपण. Happy

कारण, ज्या कॉलेजात शिकलेला अभ्यास आयुष्यभर कामी येणार हे मुलांना समजते, उदा. मेडिकल कॉलेज, तिथे मुले इमानदारीत अभ्यास व अटेण्डन्स देतात. (उदाहरण माझ्या अनुभवावर बेस्ड आहे)

तात्पर्य, मुलांना पुढे उपयोगी पडेल, असे ज्ञान जमविणे, व्यक्तिमत्व विकसित करणे, सॉफ्ट स्किल्स मिळविणे या बाबींसाठी उपयोगी ठरेल अशी शिक्षणपद्धती तयार केली गेली पाहिजे. फक्त मुलांमध्ये बेफिकिरी आहे, असे म्हणणे योग्य नाही.

आपल्याकडे सगळंच बी.ओ.टी. चालू आहे, बेफिंची संस्था व तत्सम लोक तेच करताहेत. पॅरलल एज्युकेशन सिस्टिम तयार करून मार्केटला हवे ते शिकवून मुलांना तयार करतेय. ज्यांना या ट्रेनिंगमधे रस आहे, ती मुले तिथे शिकून पुढे उत्तम कामगिरी करीत आहेत. बाकीची इथे येत नसतील, तर ती बेफिकिर नसून इतर बाबींत रस असणारी आहेत असे समजा!

कारण, ज्या कॉलेजात शिकलेला अभ्यास आयुष्यभर कामी येणार हे मुलांना समजते, उदा. मेडिकल कॉलेज, तिथे मुले इमानदारीत अभ्यास व अटेण्डन्स देतात. (उदाहरण माझ्या अनुभवावर बेस्ड आहे) + १
माझा सिव्हिल इंजिनिअरींगचा , आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांचा अनुभव अगदी असाच आहे.

इब्लिस +१. मनातलं लिहलय. बाकी क्षेत्रातही फारसं वेगळं नाही. आजकाल MSc च्याही शिकवण्या सुरु झाल्या आहेत. बाकी NET-SET ही असतीलच.

मुलांना पुढे उपयोगी पडेल, असे ज्ञान जमविणे, व्यक्तिमत्व विकसित करणे, सॉफ्ट स्किल्स मिळविणे या बाबींसाठी उपयोगी ठरेल अशी शिक्षणपद्धती तयार केली गेली पाहिजे. > +१
आता हीच गरज झाली आहे Sad सोफ्ट स्किल्स आणि प्रक्टिकल अप्रोच शुन्य आहे.

अर्थात हे सगळ माझ्या आजूबाजूला घडतंय म्हणजे ११वी, १२वी आणि आता फर्स्ट ईयर… अजून तस कोणीच गंभीर नाहीये कि पुढे अमुकच करायचे आहे म्हणून.. सो, जब तक बल्ला चल रहा है, ठाट है.

Pages