'बघू पुढे' वाली पिढी

Submitted by बेफ़िकीर on 22 February, 2014 - 05:53

ह्या धाग्यान्वये एक गंमतीशीर अनुभवकथन व त्याबाबत थोडे मतप्रदर्शन करण्याची संधी घेत आहे. काही प्रमाणात ह्या धाग्यातील विषयाचा संबंध माझ्या 'मराठीचा अभिमान' आणि 'यू आर रिजेक्टेड' ह्या दोन धाग्यांमधील विषयाशी आहे, पण ह्या धाग्यात वेगळ्याच कोनातून अनुभवकथन करत आहे.

==============

आमच्या संस्थेने फेब्रुवारी महिन्यात दोन महत्वाच्या मार्केटिंग अ‍ॅक्टिव्हिटीज केल्या. एक म्हणजे आमच्याच एका सेंटरवर दोन तीन कंपन्यांना बोलावले व त्यांच्यातर्फे 'काँप्लिमेंटरी' रिक्रूटमेंट ड्राईव्ह आयोजीत केला. ह्या ड्राईव्हमध्ये मुलाखती द्यायला विविध महाविद्यालयातील आधीच पास आऊट झालेले, ह्या वर्षी पास आऊट होणार असणारे असे अनेक विद्यार्थी बोलावलेले होते. मिळालेल्या गुणांचा निकषही असा होता की बहुसंख्य विद्यार्थी येऊ शकतील.

ह्या सर्व विद्यार्थ्यांना मी स्वतः त्यांच्या महाविद्यालयात जाऊन त्यांच्या प्राध्यापक व टीपीओ (ट्रेनिंग अ‍ॅन्ड प्लेसमेंट ऑफिसर) समोर घेतलेल्या सेमिनारमध्ये खालील माहिती दिली होती.

येणार्‍या कंपन्या
गुणांचे निकष
पास आऊट इयरचे निकष
उपलब्ध जागा (ज्या एकुण ३८० होत्या, येस यू रेड इट करेक्टली)
पगारची रक्कम (पहिली नोकरी करणार्‍यांसाठी नक्कीच आकर्षक आकडे होते)
आमच्या सेंटरचा पत्ता, फोन नंबर, संपर्कासाठी नावे, तारीख, वार इत्यादी
सोबत कोणकोणती कागदपत्रे आणायची ह्याची माहिती
पोषाख, हेअर स्टाईल, मेक अप, फूट वेअर ह्या बाबतच्या मेल व फिमेल कँडिडेट्सकडून असलेल्या सामान्य व्यावसायिक अपेक्षा
वर्तन कसे असावे
वेळेचे नियोजन कसे करावे
इंग्लिश नीट येत नसल्यास ते आधीच नम्रपणे नमूद करून टोन कसा सेट करावा
सर्वसाधारणतः काय प्रश्न विचारले जातात
अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट असल्यास ती किती गुणांची, किती कालावधीची व सहसा कशी असते
अ‍ॅटिट्यूड ठेवणे कसे घातक आहे

माझा प्रत्येक सेमिनार त्यामुळे जवळपास एक तासाचा झाला व असे आठ ते दहा सेमिनार्स झाले. हा ड्राईव्ह काँप्लिमेंटरी असल्याने सर्वांचेच चेहरे उजळलेले होते. हे सर्व करण्याशिवाय ह्या विद्यार्थ्यांना आम्ही दोन दिवस आधीपासून आमच्या केंद्रावर बोलावून टेक्नॉलॉजी व कम्युनिकेशन ह्या विषयांचे 'काँप्लिमेंटरी' ग्रूमिंग सेशन्स आयोजीत केले.

आता हे सगळे का केले? तर ह्या माध्यमातून अर्थातच संस्थेची मोठी, प्रभावी जाहिरात होते, नांव कर्णोपकर्णी होते आणि अंतिमतः व्यवसायवृद्धीची शक्यता वाढते.

तर हे विद्यार्थी ग्रूमिंग सेशन्सना कडक हजेरी लावून गेले. अपेक्षेप्रमाणे ड्राईव्हच्या दिवशी आपापले 'बेस्ट' निकष लावून सगळे हजरही झाले व टेस्ट, मुलाखती ह्या सर्व सोपस्कारांमधून गेलेही. ५४ विद्यार्थी पुढच्या राऊंडसाठी एकुण तीन कंपन्यांकडून निवडले गेले व बाकीचे रिजेक्टेड विद्यार्थी परतले.

ह्या रिजेक्टेड विद्यार्थ्यांना आम्ही फीडबॅक सेशनला परत बोलावले व बहुतेकांसाठी असलेला फीडबॅक हाच होता की एखाद्या विशिष्ट टेक्नॉलॉगीत आणि संवादकौशल्य व इंग्लिश बोलण्याच्या हातोटीत ते फार मागे पडत होते. पुढील काँप्लिमेंटरी ड्राईव्हसाठी त्यांनी निदान इंग्लिशची तरी तयारी करावी व ती आम्ही करून घेऊ हेही सांगितले. (अर्थातच, ही इंग्लिशची तयारी फुकट असणार नव्हतीच).

दरम्यान चारच दिवसांनी आमची दुसरी मोठी मार्केटिंग अ‍ॅक्टिव्हिटी म्हणजे एक अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट, जी विद्यार्थ्याचे आय टी क्षेत्रात काम करण्यास योग्य अ‍ॅप्टिट्यूड आहे की नाही हे सप्रमाण सिद्ध करते, ती आयोजीत करण्यात आली. आधीच्या विद्यार्थ्यांपैकी अनेकांनी येथे हजेरी तर लावलीच, पण ही टेस्ट कोणत्याही वर्षातील विद्यार्थ्यांसाठी असस्ल्याने एफ वाय (/एफ ई) पासून सगळेच विद्यार्थी आले होते. ह्या विद्यार्थ्यांमधून ७० पेक्षा अधिक (७०/१००) स्कोर करणारे फक्त १४ विद्यार्थी निघाले व एकुण टेस्ट देणार्‍यांची संख्या होती २१२.

ह्याही सर्वांना आम्ही फीडबॅक दिला व ह्याही विद्यार्थ्यांच्या बाबतीत तेच दोन प्रॉब्लेम्स होते. तंत्रज्ञानाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे न येणे व इंग्लिश न येणे!

इतक्या मोठ्या प्रमाणावर काम केल्यानंतर आम्ही परोपरीने ह्या विद्यार्थ्यांना सांगत होतो की पुढच्या ड्राईव्हच्या आधी इंग्लिशची बॅच लावा.

पण गंमत म्हणजे आजवर अतीउत्साहाने आमच्या केंद्रावर येऊन धडकणार्‍या ह्या विद्यार्थ्यांपैकी एकानेही, लेट मी रीपिट, एकानेही त्यात उत्सुकताही दाखवली नाही.

आमचे नांव झाले, त्याचा परिणाम म्हणून काही इतर विद्यार्थी स्वतःहून आले वगैरे बाबी वेगळ्या!

पण ज्या घटकाला संधी मिळत नाहीत असे मागच्या एका लेखात म्हंटले होते त्या घटकाला एका संधीचे सोने करता आले नाही म्हणून दुसरी संधी घेण्याआधी मेहनत करा म्हंटले तर तो घटक पूर्णपणे उदासीन होता. ह्यात महाराष्ट्रातील सर्व शहर, गावांमधून आलेले विद्यार्थी होते. कोकणापासून विदर्भ आणि सोलापूरपासून जळगावपर्यंत सगळे!

ह्यांच्यातील प्रत्येकाच्या पालकांनी सुमारे वीस हजार ते ऐंशी हजार अश्या रकमांची फी भरून त्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिलेला आहे. होस्टेलवर राहणार्‍यांचे इतर खर्च वेगळेच! मात्र ह्या एका मोठ्या घटकाला तूर्त तरी कसलेही गांभीर्य नाही.

त्यांचा रागही नाही आला आणि कीवही नाही आली. त्यांच्याबद्दल फक्त मनात हा विचार आला की आपल्या आधीच्या पिढीतील मेहनती / कष्टाळू वृत्ती, गांभीर्य आणि प्रयत्न करण्याची इच्छा ह्या लोकांमध्ये अभावानेच दिसत आहे. जणू ह्यांची करीअर्स आधीच कोणीतरी तयार ठेवली आहेत आणि हे पास आऊट झाले की आरामात तिथे नुसते जाऊन बसणार आहेत.

खरे तर ह्या जनरेशनसमोर स्पर्धेच्या तीव्रतेचे भय कधी नव्हे इतके आहे. पण चित्र उलटे दिसत आहे. 'बघू पुढे कधीतरी' हा भाव सार्वत्रिक असावा तसा आढळत आहे. हे सर्वत्र असेच आहे का, असल्यास असे का, इत्यादी!

आपल्यापैकी ज्यांना इच्छा आहे त्यांनी जरूर कारणमीमांसेची चर्चा करावी अशी विनंती!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

(मायबोलीवर आता 'ललित' आणि 'लेख' हे एकाच सदरात लिहावे लागतात, ह्याबाबत मागे एकदा विनंती केलेली होती. ललित व लेख हे दोन वेगळे भाग झाले तर बरे होईल)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झरबेरा,
तुझा प्रतिसाद बर्‍याच अंशी पटला.

***

आपण जे शिकत आहोत, ते का शिकत आहोत, हे दुर्दैवानं हल्लीच्या कुठल्याही पाठ्यपुस्तकात लिहिलेलं नाही. अगदी खूप भारी समजल्या जाणार्‍या सीबीएसई अभ्यासक्रमाच्या पुस्तकांतही नाही. अगदी मोजके शिक्षक हे समजावून सांगण्याच्या भानगडीत पडतात. आठवी-बारावी या वर्गांमध्ये तर हे प्रमाण अगदी निराशाजनक आहे. अल्डोल कंडेन्सेशन, विल्यमसन्स सिन्थेसिस, ग्रिन्यार रिएजन्ट असलं काहीबाही ही मुलं पाठ करत राहतात. आपण जे काही पाठ केलं आहे, ते नक्की का केलं, त्याचा अर्थ काय, उपयोग काय, हे एकालाही सांगता येत नाही. हुषार असणं म्हणजे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देता येणं. त्यामुळे हल्ली हुषार विद्यार्थी भरपूर आहेत.

ही चूक या मुलांची नक्की नाही. अवांतर वाचन, मुलांनी प्रश्न विचारणं यांना अजिबात उत्तेजन दिलं जात नाही. पहिलीत जाण्याअगोदरच मुलांना शिकवणी असते. 'कशाला स्कोप आहे पुढे' यानुसार सगळं ठरतं. बोर्डाच्या परीक्षेशी किंवा प्रवेशपरीक्षेशी थेट संबंध नसणारी पुस्तकं वाचायला लावली, म्हणून शाळेवर मोर्चा घेऊन आलेले पालक मी पाहिले आहेत. ९९% मुलं शिकवणीवर्गांना जातात आणि तिथे रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र हे विषय केवळ वाचून दाखवले जातात. 'तुला मी प्रश्न विचारू शकतो. आय डोन्ट वॉन्ट टू मेक अ फूल ऑफ मायसेल्फ इन क्लास / स्कूल / कॉलेज', असं दोनतीनदा विद्यार्थ्यांकडून ऐकल्यावर (यांपैकी एकदातर प्रयोगशाळेत) मला बेदम वाईटच वाटलं होतं.

सर्वांत वाईट म्हणजे मुलांचा पालकांशी अजिबात संवाद नाही. कारण मुलांकडे आणि पालकांकडेही तितका वेळच ही. त्यामुळे 'सर, जरा त्याच्याशी बोलाल का?' असं नव्वद टक्के पालक मलाच विनवणी करतात. सुरुवातीला अशा विनंत्या आल्या की मी गोंधळायचो. मग प्रयोगशाळेतल्या मित्रांशी बोललो. माझ्या शिक्षकांशी बोललो. लक्षात आलं की, संवाद कमी झाला आहे, हे खरं आहे. यात मुलांची चूक नाही, हेही जाणवलं. मुलानं उत्तम मार्कं मिळवले, म्हणजेच तो चांगला, असा सरसकट समज असावा. त्यामु़ळे पालकांचा मतलब फक्त पाल्याच्या मार्कांशी. दहावी-बारावीच्या वर्षांमध्येतर विद्यार्थ्यांचा जीव घेत नाहीत पालक, हेच नशीब. मोठ्या शहरांमधले विद्यार्थी पोहणं, गिर्यारोहण, एखादं वाद्य शिकणं असे छंदतरी जोपासतात. पुणे-मुंबई वगळता महाराष्ट्रात हे घडत नाही. कारण अभ्यासावर परिणाम होईल, अशी पालकांना भीती असते.

प्रशासकीय सेवा आणि मूलभूत विज्ञानातील संशोधन या दोन्ही क्षेत्रांमध्ये बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांतील विद्यार्थ्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे. इतर राज्यांतील विद्यार्थी मोठ्या संख्येनं एमबीए करतात किंवा सॉफ्टवेअरकडे वळतात. एके काळी भारतातील प्रयोगशाळांमध्ये दाक्षिणात्य संशोधकांचं वर्चस्व होतं. ठरावीक पद्धतीच्या, साचेबद्ध शिक्षणानं आणि त्या शिक्षणामुळे स्वीकारता येणार्‍या नोकरीमुळे हा बदल झाला, असा माझा समज आहे.

हुषारी म्हणजे सर्व प्रश्नांची उत्तरं अचूक देता येणे आणि मेहनत म्हणजे सर्व प्रश्नांची उत्तरं पाठ असणे, असा समज जोपर्यंत आहे, तोपर्यंत प्रत्येकाला पुढची पिढी आळशी आणि ध्येय नसलेली वगैरेच वाटत राहणार. गेल्या दहावीस वर्षांमधले अनेक पालक अशाच हुषारीच्या जोरावर उत्तम कमावते झाले. आपल्या मुलांनीही असंच कमावतं व्हावं, ही त्यांची इच्छा चुकीची नाही. त्यासाठी आपल्या मुलांनीही आपलाच मार्ग निवडावा, ही त्यांची अपेक्षा मात्र मला पटत नाही. अवतीभवती इतकं काही घडत असताना, जगाकडे बघण्याची दृष्टी बदलत असताना, जग रोजच्या रोज जुनं होत असताना त्यांनी आपल्या पालकांच्या कल्पनांच्या आधारेच आपलं ध्येय इत्यादी ठरवावं, हे मला गैर वाटतं.

मोठ्या शहरांमधले विद्यार्थी पोहणं, गिर्यारोहण, एखादं वाद्य शिकणं असे छंद जोपासतात. पुणे-मुंबई वगळता महाराष्ट्रात हे घडत नाही. कारण अभ्यासावर परिणाम होईल, अशी पालकांना भीती असते.
<<
हो??
नवी माहिती.
धन्यवाद!

खूप छान विषय आणि छान चर्चा! साधना, तुमचे सर्व मुद्दे पटले. आपल्याकडे बऱ्याच गोष्टी लादण्यावर भर दिला जातो. शिक्षण, लग्न, career प्रत्येक बाबतीत. आणि teen age मध्ये बंडखोरी फार असते..म्हणजे मोठे जे सांगतील त्याच्या बरोब्बर विरुद्ध वागावासं वाटतं! अभ्यास कर म्हटलं की अभ्यास नको वाटतो!
कधी कधी पालक पण अतिरेकी वागतात! मी भारतात माझ्या मावशीकडे गेले होते तेव्हा मावशीच्या office मधल्या एका सहकारी काकांना मला भेटायचे होते. ते जमले नाही म्हणून त्यांनी फोन केला. मला म्हणाले, "मला माझ्या मुलाला शास्त्रज्ञ बनवायचे आहे. परदेशी शिकायला पाठवायचे आहे. मी काय करू?" मी विचारलं, "कितवीत आहे तुमचा मुलगा? काय शिकतोय?" तर म्हणाले, "तिसरीत आहे!!!" मला इतकं भयंकर हसायला आलं! बरं झालं आम्ही फोनवर बोलत होतो! काय वेडेपणा आहे हा!! केवळ जन्म दिला म्हणून त्याच्या आयुष्याचे सगळे निर्णय घ्यायचा अधिकार मिळतो का पालकांना? मग मी जरा त्या काकांनाच समजावलं!
पण परदेशी मुलाला/मुलीला पाठवायचं आहे तर मी काय करू असं विचारणारे अनेक पालक भेटतात. त्यांची कळकळ समजते पण जोवर त्या मुलांना रस वाटत नाही तोवर पालक काय करू शकतात! तुम्ही घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकता पण पाणी घोड्यालाच प्यावं लागतं!
असं म्हणतात की ज्ञान आतून बाहेर यावं ह्यासाठी शिक्षण घ्यावं पण सगळीकडे बाहेरून आत ज्ञान कोंबण्याचा उद्योग सुरू आहे!

इब्लीस,
असं उगाच वाट्टेल ती वाक्यं घेऊन कॉपी-पेस्ट करायची नाहीत. नाही समजलं काही, तर दोनदा वाचायचं. तीनदा वाचायचं. आता समजावून सांगतो.
< दहावी-बारावीच्या वर्षांमध्येतर विद्यार्थ्यांचा जीव घेत नाहीत पालक, हेच नशीब. मोठ्या शहरांमधले विद्यार्थी पोहणं, गिर्यारोहण, एखादं वाद्य शिकणं असे छंदतरी जोपासतात. पुणे-मुंबई वगळता महाराष्ट्रात हे घडत नाही. कारण अभ्यासावर परिणाम होईल, अशी पालकांना भीती असते. > असं मी म्हटलं आहे. मी एका लहान शहरातच शिकलो आहे. माझे असंख्य मित्रही लहान शहरांमधूनच आले आहेत. त्यामुळे दहावीबारावीतले विद्यार्थी पोहायला जात नाहीत, डोंगर चढत नाहीत, हे मला नीटच माहीत आहे. मुळात पोहायला जाता येईल, असे स्वच्छ तलाव नाहीत, पण तो मुद्दा वेगळा. या क्लासातून त्या क्लासात जाण्यातच त्यांचा दिवस संपतो.

बाकी, तो आयडी नक्की घ्या. शोभून दिसेल तुम्हांला. Happy

पुणे-मुंबई वगळता महाराष्ट्रात हे घडत नाही. कारण अभ्यासावर परिणाम होईल, अशी पालकांना भीती असते. >>> हे अजिबात पटलं नाही. पुणे-मुंबई वगळता नक्की किती तालुके, गावं, शहरं महाराष्ट्रात आहेत? त्यातल्या किती ठिकाणी तू राहिला आहेस किंवा त्या गावांमध्ये असा काही सर्व्हे-बिर्वे झाला आहे का? मी शाळा-कॉलेजात असताना आम्ही अतिशय तणावमुक्त वातावरणात खेळ-नाच-गाणी काय हव्या त्या आवडी जोपासत असु. त्याच वेळी आमचे पुण्या-मुंबईतली चुलत-मावस भावंड मात्र मार्कांच्या रेसमध्ये धावत असत. दहावीला असताना माझी मुक्तछंदातली दीनचर्या बघून मी परिक्षेत दिवे लावणार असं भविष्य अनेकांनी वर्तवलं होतं. अभियांत्रिकीला गेल्यावर सुद्धा ट्युशन्स लावणारे पुण्या-मुंबईतले भावी इंजिनियर्स बघून आम्ही हसत असु. पण तरी हे असं जनरिक विधान मी या गावांमधल्या मुलांविषयी किंवा पालकांविषयी करणार नाही कारण मला एका छोट्या खिडकीतून हे जग दिसत होतं. साधी गोष्ट आहे.

सिंडरेला,
तू विद्यार्थिनी म्हणून राहिली असलीस, तरी मी शिक्षक म्हणून राहिलो आहे. विदर्भ, मराठवाड्यांमधल्या असंख्य शाळांमध्ये गेल्या सहा-सात वर्षांमध्ये जाऊन आलो आहे. तिथल्या विद्यार्थ्यांशी, पालकांशी, शिक्षकांशी, अगदी कोचिंग क्लासच्या मालकांशी बोललो आहे. त्यामुळे असे छंद वगैरे जोपासणारी मुलं ५%सुद्धा नसतील, याची मला पूर्ण खात्री आहे. अपवाद सगळीकडेच असतात. पण महाराष्ट्रातल्या लहान गावांमध्ये हे प्रमाण नगण्य आहे, हे नक्की.

छान चर्चा.
जोवर वेगवेगळ्या प्रकारच्या कामांमधे मिळणारा पैसा, आदर, प्रतिष्ठा यांत दरी आहे तोवर विशिष्ट अभ्यासक्रमांनाच मुलांना घालायचा पालक प्रयत्न करणार. वर सांगितलेले डॉक्टर, इंजिनियर इत्यादी सोडून इतर कामांना समाजात तितक्याच संधी, पैसा, प्रतिष्ठा हे सर्व मिळाले तरच पालक मुलांचा कल बघून त्याप्रमाणे त्यांना शिकवायचा विचार करतील. हे दुष्टचक्र आहे. मुलांचे भवितव्य ही आपलीच जबाबदारी / अधिकार आहे हा पालकांचा समज सध्यातरी आहेच त्यामुळे मुलांना हव्या त्या विषयात / कलेत इ. शिक्षण घेणे, पुढे जाऊन त्यावर उपजिवीका करणे हे मनाप्रमाणे शक्य नाहीये. तसंच आपल्याला काय हवंय हे कळायच्या आतच ती इतकी स्पर्धेत ओढली जातात की त्यांना आवड-निवड वगैरेसाठी फुरसतच मिळत नाहीये असं दिसतंय.
(हे सगळं मी का लिहीलंय असं वाटलं टाईप करुन झाल्यावर. चावून चोथा झालेलीच वाक्य आहेत सगळी. पण मुलं बाळं शिकण्याच्या स्टेज मधे असल्यामुळे तोच विषय कितीदाही समोर आला तरी वाचले / लिहीले जातेच असे दिसतेय.)

हेरंब कुलकर्णी यांनी शालेय शिक्षण, परीक्षापद्धती यांवर बरंच चांगलं लिखाण केलं आहे. 'माझी काटेमुंढरीची शाळा' हे श्री. मुनघाटे यांचं पुस्तकही वाचनीय आहे. 'शाळाभेट' हे श्री. नामदेव माळी या शिक्षणाधिकार्‍यांनी लिहिलेलं पुस्तक परीक्षांवर भर न देता विद्यार्थी कसे शिकतील, याबद्दल महत्त्वाची निरीक्षणं नोंदवतं.

या तिन्ही लेखकांची पुस्तकं सुचवली कारण ती परीक्षापद्धती आणि बुद्धिमत्ता, ध्येय यांचा संबंध दाखवण्याचा प्रयत्न करतात. रमेश पानसे यांची पुस्तकंही महत्त्वाची आहेत. ही पुस्तकं सर्व शाळांमध्ये पोहोचायला हवीत. एमकेसीएलतर्फे दरवर्षी विज्ञान ऑलिंपियाड आयोजित केलं जातं. गेल्या वर्षी तिथल्या प्रशिक्षणवर्गात यवतमाळचे एक शिक्षक भेटले. त्यांच्या शाळेतल्या एका विद्यार्थ्याला घेऊन आले होते. त्यांचं आणि त्यांच्या विद्यार्थ्याचं कौतुक केलं, तर म्हणाले, 'आम्ही गेली अनेक वर्षं सातवीत पोरगं गेलं की प्रत्येक आईबापाला 'यशवंत व्हा!' या पुस्तकाच्या झेरॉक्स काढून देतो, पूर्वी आमची पोरं मेरिटमध्ये यायची, आता मेरिट बंद झालं तर ऑलिंपियाडमध्ये विद्यार्थी झळकला'. म्हटलं, 'बरं'.

जे ज्ञानार्थि असतात ते त्यांना आवडणारा विषय अंतर्बाह्य समजाउन घेण्यावर भर देतात. पण एखाद्या विषयाचे सखोल ज्ञान आहे म्हणुन तुम्ही त्यापासुन आर्थिक उत्पन्नही मिळवू शकाल आसे असतेच असे नाही.

आपला शिक्षणाकडे बघायचा उद्देशच एक 'विशिष्ठ आर्थिक स्थर गाठून देणारे साधनमात्र' हा आहे तर मग अशा शिक्षणात व अशा शिक्ष्णार्थीत ज्ञानलालसा कुठुन येणार? 'जरूरीपुरते माहीती करून घ्या' हाच जर मुळमंत्र असेल तर 'लागल तर पुढे बघू' ही मानसिकता ओघानेच येते!

आपल्याला ज्ञात असलेल्या विषयाचे / निपुणतेच मोनिटाइजिंग कसे करायचे हे आम्ही शिकवत नाही/ शिकत नाही. हे असे मोनिटाइझिंग करणारी माणसे नवनवीन करिअर ओप्शन निर्माण करतात. अशी माणसे फारतर शेकडा ५% असतील.

उरलेले सगळे गतानुगतिक, आधिच ज्या विषयातील ज्ञानाचे मोनिटाइझिंग झाले आहे, इतके अवगत असेल, इतके समजत असेल तर इतके पैसे असे गणित घातले गेले असेल अशा विषयातील शिक्षणासाठी धडपडणारे. त्यांनाच केटर करणारी आमची विद्यालये व महाविद्यालये व एकंदर इकोसिस्टिम. असे अस्ताना शोक कशाचा व का करायचा?

तुमचा पाल्य/तुम्ही कुठल्या गटात मोडता? खरा ज्ञानार्थी बनण्यात प्रचंड रिस्क आहे. ती घेणे तुम्हाला जमेल का ? तुमच्या पाल्याने घेतल्यास त्याच्या मगे उभे रहाणे झेपेल का हे प्रत्येकाने स्वतःशीच तपासुन बघीतले पाहिजे.

महाराष्ट्रातल्या लहान गावांमध्ये हे प्रमाण नगण्य आहे >>> प्रमाण कमी असेल तर ते पालक बळंच अभ्यासाला बसवतात म्हणून आहे की पुरेसे रिसोर्सेस नाहीत म्हणून आहे? शहरांमध्ये किती टक्के प्रमाण आहे छंद जोपासणार्‍या मुलांचं?

असो, मला तुझं विधान पटलं नाही, तुझ्या दुसर्‍या पोस्टीनंतरही नाही. नेटानं पुन्हा पुन्हा पोस्टी लिहायचा नेहमीप्रमाणेच कंटाळा. तेव्हा मी कल्टी.

पेशवा,
<<
तुमचा पाल्य/तुम्ही कुठल्या गटात मोडता? खरा ज्ञानार्थी बनण्यात प्रचंड रिस्क आहे. ती घेणे तुम्हाला जमेल का ? तुमच्या पाल्याने घेतल्यास त्याच्या मगे उभे रहाणे झेपेल का हे प्रत्येकाने स्वतःशीच तपासुन बघीतले पाहिजे.
>>
+१
चूक तरीही बरोबर! Happy

एक गमतीशीर निरिक्षण -

इथे अमेरिकेत जितके भारतीय आलेत ते बहुतांश "परीक्षार्थी" पद्धतीमधूनच वर आलेत असे गृहित धरायला हरकत नाही.

आज अमेरिकेमध्ये आर्थिकदृष्ट्या सर्वात संपन्न 'इमिग्रंट' भारतीय आहेत. बरेच डॉक्टर्स आहेत, मोठेमोठे शास्त्रज्ञ आहेत; खूप नाही तरी काही महत्त्वाच्या कंपन्यांचे उच्च पदाधिकारी आहेत. एकवेळ नोबेल ऑस्कर वगरे नसतील मिळत, पण मोठ्मोठ्या युनिवरसिटीज मधे प्रोफेसर आहेत. काही वाईट चाललेले नाहीये. सगळे आहे. आपापले छंद जोपासत आहेत. संगीत शिकतायत, पोहणं शिकतायत, गिर्यारोहण शिकतायत, चित्रकला शिकतायत, नवीन देश पहाताहेत!! आणि परीक्षेसाठी का होईना, आयुष्यात काहीतरी 'फाईट मारके' करून झालेले आहे.

याउलट अमेरिकेतली मुलं (बहुतांश) अभ्यासात फार मेहेनत घेताना दिसत नाहीत. लहानपणापासून हवे ते मिळले आहे... हां!, खेळात,संगीत, चित्रपट, यात एकदम पुढे! इथे भारतीय पालकांच्या पोटी जन्मलेल्या मुलांची तिच परीस्थिती!

त्यांची परीस्थिती त्यांच्या पालकांच्यापेक्षा 'आर्थिक्-दृष्ट्या' बेताचीच असणारे; असते!

भारतात सध्या काही वेगळं चाललंय का?

"थ्री इडियट्स" तत्त्वज्ञान कितपत practical आहे?

आता समजावून सांगतो.
<<
पुन्हा धन्यवाद.
अहो, पण मी नव्या माहितीसाठी धन्यवाद दिले होते फ़क्त. त्याबद्दल समजावून सांगण्यासारखे त्या वाक्यात काय काय आहे असे ? तुम्ही तेच तर परत लिहिले! Happy

<परीक्षेची तयारी करणं हे ओघाने आलंच (अन्लेस यु आर अ जिनियस). मग आई-बाबांनी मुलांना कष्ट करुन परीक्षेची तयारी करायला भाग पाडलं तर त्यांनी बोलण्याचा अधिकार गमावला??>

परीक्षार्थी होणे म्हणजे जे परीक्षेत विचारले जाऊ शकते फक्त त्याचीच तयारी करणे. झरबेरा यांनी पालकांच्या बाबत सांगितले. माझ्या समोरच्या मुलांच्या डोक्यावर पालक नसतात. पण ज्यावर परीक्षेत प्रश्न येणार नाही ते करायची गरज नाही हे त्यांचेही पक्के ठरलेले आहे.
परीक्षेत शब्दार्थ विचारले जात नाहीत; मग नवीन शब्दांचे अर्थ समजून घ्यायची, लक्षात ठेवायची गरज नाही. अशाने शब्दसंपदा मर्यादित राहते. सहाव्या यत्तेत गेलेल्या शब्दाचा अर्थ नवव्या यत्तेतही माहीत नसतोच.

म.रा.मा. आणि उ.मा.शि.मं. सुद्धा यालाच उत्तेजन देतेय. बोर्डात बहुसंख्य प्रश्न धड्याखाली दिलेल्यांतून विचारले जातात. त्यामुळे धडा वाचणे हा वेळेचा अपव्यय. गाइडमधली प्रशोनोत्तरे केली की झाले. रिकाम्या जागी कंसातील पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा या प्रश्नाने मुलांची आकलनक्षमता तपासली जाते म्हणे.
नाही म्हणायला यंदापासून इंग्रजीची प्रश्नपत्रिका ही activity sheet असणार आहे.

सांगायचा मतितार्थ हा की नुसत्या मुलांना, सिस्टीमला दोषी न ठरवता त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळत गेल तर थोड्याश्या नियमीत कष्टानेही ती नक्कीच प्रगतीची शिखरे पार करु शकतात.
अगदी! पण आज किती शिक्षक किवा पालक हे मार्गदर्शन करत आहेत? आणि मार्गदर्शन म्हणजे नुसतं कोणाचं व्याखान नाही, हे किती पालकांना माहितेय? क्लास्सेस लावलेत ना, म्हणजे होताच असणार आमच्या मुलांचा अभ्यास असाच वाटत बहुतेक पालकांना; किंबहुना क्लास्सेस लावणार्यांच्या मुलांचा भाव किती वधारतो हे सांगायलाच नको. ११वीला असताना 'आम्ही सगळ्यानी क्लास्सेस लावलेले ९वि पासून आणि आमच्या शाळेतले शिक्षक पण जेवढ्यास तेवढच शिकवायचे कारण क्लास्सेस सगळच करून घेतात ना' हे तर सगळ्यांच्याच तोंडी असायच. अर्थात हे मी मुंबई मध्ये अनुभवलंय.

परीक्षेला कोणीच नाव ठेवत नाहीये. पण आम्हा मुलांना अमुक एक विषय खरच कळतोय का? तो आवडतोय का ते का बर कोणीच विचारात नाही? सगळे आधी १०वी आणि १२वीचे मार्क विचारतात. अर्थात हे मान्यच आहे, पण मग कमी मार्क म्हणजे ढब्बूच का? आता नसेल एखाद्या विषयात गती पण जिथे मार्कच सगळ ठरवत असतील तर अवघड आहे ना.. मला स्वतःला बीजगणितात गती नाहीये पण माझे समाजशास्त्र, भाषा याचे मार्क का कोण विचारात घेत नाही? आणि ठीके ढब्बू तर ढब्बू पण म्हणून जबरदस्ती science ला पण टाकताच ना? मग अश्यावेळी लास्ट मिनिट ला रट्टा मारतो आम्ही आणि मग परीक्षा आली कि अभ्यास मग आणि झाली कि मागच एकदम सपाट असच कराव लागतं कारण पुढे अजून परीक्षा आमची 'वाट' पाहताहेत ना .. परीक्षा म्हणजेच अभ्यास आणि अभ्यास म्हणजे तो परीक्षेसाठीच असणार हेच समीकरण झालाय आमचं.. कारण एवढ्या ढिगाने entrance exams असतात मग त्याचाच तर अभ्यास करतो आम्ही.. १२वीत माझी एक मैत्रीण तर फक्त CLAT चाच अभ्यास करायची, डिसेंबर आला कि JEE आणि अजून काही सुरु व्हायचे. अर्थात परीक्षा घेऊन मुलांची चाचणी होऊ शकते हे आम्हाला माहित आहे आणि ते बरोबरच आहे पण आयुष्यभर नुसत्या परीक्षेच्या मार्कांवरच भर दिला जातो ना? मूलतः जे काही घासलये ते आमच्या डोक्यात आहे कि नाही (परीक्षेनंतर) हे थोडीच कोण विचारता आम्हाला? याचे उत्तर एकाच आहे: नाही. मग आता आम्ही परीक्षार्थीच झालो ना? हा पण आम्ही practically रट्टा मारणारे परीक्षार्थी आहोत. ज्ञानसाधना आणि वगरे असतात ते वाले नाही..

आणि आता खरं सांगायचा झाला तर खूपच उशीर झालाय काही बदलायला.. लहानपणापासून नुसती तुलना होत राहते आजूबाजूच्या मुलांशी पण आपल्या मुलाला खरच काय कळतंय हे कोणीच बघत नाहीये आणि नुसते IIT अन Science लाच जो भाव आहे तो उरलाय. मलाही कित्ती वेळा वाटायचं कि खरच आपण काय धोंडा मारून घेतलाय पायावर आर्ट्सला येउन पण माझे इतर मित्र मैत्रिणी (Science वाले) तर माझ्याहून केविलवाणे चेहरे घेऊन बसलेले असायचे… अर्थात ते मलाच दिलासा द्यायचे कि किमान तु जे शिकते आहेस ते तुला कळतंय पण आणि आवडतंय पण.. माझ्याकडे उत्तरच नसायच अश्यावेळी पण यामुळे तरी स्वताला कमी लेखणं कमी होत गेले Happy

चिनूक्सदादा आणि भरत मयेकर तुम्ही मला जे नित सांगतायेत नाहीये ते परफेक्टली सांगत आहात! Happy

मी तरी जस्ट या भल्या मोठ्या सिस्टीम चा एक भाग आहे. एक विद्यार्थिनी तेही आत्ताच शिंग फुटलेली (१८ पूर्ण आहेत हो Proud ) आणि मला जे दिसतंय आजूबाजूला तेच मी इथे लिहितेय. बरेच जण तर आता 'बस आई बाबा लाऊन देतीलच नोकरी कुठे तरी' याच आशे वर आहेत.
मी काही फार मोठी कोणी लागत नाही पण जे दिसतंय ते इतका भयानक आहे कि म्हणजे आम्ही नुसते डिग्रीच लेबल लावलेलं गाढव होत आहोत.. ना त्या विषयाची आवड, ना पुढे अजून त्यात काही शिकायची इच्छा.. काहीच नाही.. आणि हे बदलू पाहणारे जे काही थोडे जन आहेत, जे खरच आपल्याला आवडतंय ते करताहेत त्यांना कोणाकोणा कडून काय काय ऐकून घ्याव लागतंय ते त्यांनाच माहित.. मुलं आणि पालकांमध्ये संवादाच नसेल तर अजून काय वेगळं होणारे? खूप कमी पालक आहेत असे मुलाची आवड बघणारे बाकी सगळे मोठ्या कळपातच आहेत जे नुसत्या 'रेप्युटेशन', 'स्टेटस' साठी मरताहेत.. इथे मायबोली वर बरेच जण पालक आहेतच.. पण बाहेर सगळेच तुमच्यासारखे नाहीयेत.. माज्या मित्र मैत्रिणींमध्ये तर नाहीच.. रिझल्ट घ्यायला तर ८०% मुलांचे पालक आलेच नव्हते (कॉलेज ने नोटीस लावलेली कि पालक नाही आले तर रिझल्ट मिळणार नाही) काहींनी तर घरी सांगितलाच नाहीये आणि काहींना तशी गरजच वाटली नाही.. हे मी नुस्त लिहायचा म्हणून लिहित नाहीये, मीही बोललेय माझ्या मैत्रिणींशी पण 'यात बोलण्यासारख काय आहे? घरचे काय बोलतच असतात बोलू दे अपुन तो बाबा कॉलेज एन्जोय करनेको आया है' असच बोलतात सगळे. मग अजून काय बोलणार मी पुढे?

<दहावी-बारावीच्या वर्षांमध्येतर विद्यार्थ्यांचा जीव घेत नाहीत पालक, हेच नशीब. मोठ्या शहरांमधले विद्यार्थी पोहणं, गिर्यारोहण, एखादं वाद्य शिकणं असे छंदतरी जोपासतात. पुणे-मुंबई वगळता महाराष्ट्रात हे घडत नाही. कारण अभ्यासावर परिणाम होईल, अशी पालकांना भीती असते. >
छंद जोपासतात म्हणजे या गोष्टींच्या क्लासला जातात का? (चिनूक्स असं म्हणणार नाहीत हे माहीत आहे. पण सर्वसाधारण पालक? (एप्रिल महिन्यात छंदवर्गाच्या जाहिराती येतीलच.) लहान गावातल्या मुलांना असे वेगळे छंदवर्ग लावायची गरज आणि सोय नसावी. गरज का नाही, तर मोठ्या शहरांच्या मानाने त्यांच्या वाट्याला बरंच जास्त मोकळ अंगण आणि आकाश येतं.(आपल्या अनुभवातल्या-निरीक्षणातल्या मोजक्या उदाहरणांवरून जनरलायझेशन करणे धोक्याचे आहे याची कल्पना आहे.)

मुंबईत दहावीपासून मुलांचा दिनक्रम हा नोकरदारापेक्षा जास्त भरगच्च असतो. मी एसेसीला होतो, तेव्हा माझ्या वर्गातले काही मुलगे दर शनिवारी बोरिवलीहून चर्नीरोडला (लोकल ट्रेनने तासाभराचा प्रवास) एस. वाय. गोडबोल्यांच्या क्लासेसना जायचे. पाल्याच्या दहावी-बारावीच्या वर्षात अनेक नोकरदार माता किमान सहा महिन्यांची रजा घेऊन घरात जेलरची भूमिका वठवतात.
माझ्या काळात रूपारेल , पार्लेसारख्या कॉलेजात प्रवेश हवा असायचा. आता एवढ्या लांबचे कॉलेज घेतले तर क्लासेसना येण्याजाण्यासाठी वेळ पुरणार नाही, म्हणून बारावीपर्यंत नावासाठी जवळचे कोणतेही, कसेही कॉलेज चालते.
दहावीचा सगळा अभ्यासक्रम ख्रिसमसच्या सुटीआधी पूर्ण झाला असे शाळेने सांगितले. शाळेचा निकाल ९९.९५% मुले उत्तीर्ण असा असतो. कसा पूर्ण होतो अभ्यासक्रम? बहुतेक सगळी मुले ट्युशन क्लासला जातातच ना? तिथेच करून घेतात सगळे. (हे एका मुलाने त्याच्या शाळेतल्या शिक्षकाचे बोल सांगितले आहेत.)

<चिनूक्सदादा आणि भरत मयेकर तुम्ही मला जे नित सांगतायेत नाहीये ते परफेक्टली सांगत आहात! स्मित> धन्यवाद, झरबेरा. माझे आकलन तरी नीट आहे हा दिलासा मिळाला.

तर समस्येचे निदान झालेय. उपाय काय?
ज्ञानरचनावादाबद्दल बरेच काही कानांवर/डोळ्यांवर पडतेय. प्रत्यक्षात काही उतरलेय का? शहरांत प्रचंड पटसंख्येच्या वर्गांत ते कसे केले जाणार आहे , जाऊ शकते याबद्दल जराही कल्पना नाही.

गंमतच आहे, मी शाळेत असल्यापासून हे ऐकत आलेली आहे. "आजचा विद्यार्थी परीक्षार्थी होत आहे का?" वगैरे निबंध आम्ही शाळेत लिहिले,. "आमच्यावेळी नव्हतं हो अस्लं काही" हे आईवडलांच्या तोंडून ऐकलं. शिवाय अर्धा अर्धा टक्क्याने अ‍ॅडमिशन चुकते तस्मात, एकेक मार्क महत्त्वाचा म्हणून बोर्ड एक्झामच्या प्रत्येक चाप्टरला किती वेटेज त्यातले किती महत्त्वाचे प्रश्न (येणारच! कदाचित येईल, मागच्या वर्षी आला होता यावर्षी येणार नाही) असे कलर कोडींग करून पाठ केले. दहावीबारावीला संडासच्या दरवाजावर ट्रीग्नोमॅट्रीचे फॉर्म्युले लिहून मुलांना "बसलास की म्हणत बस" असे म्हणणार्‍या आया पाहिल्या. मुलीच्या दहावीसाठी मुद्दाम लाच देऊन लातूरला बदली करून घेणारे बाप पाहिले. मेडीकलला अ‍ॅडमिशन (डोनेशनसआठी) मिळावी म्हणून सोन्याचे दागिने गहाण टाकलेले पालक पाहिले. मुलीला कलाशाखेमध्ये जायचं असताना "तिथे जाऊन काय शिकशील?" म्हणून तिला अक्षरशः इच्छा नसताना संगणक शाखेमध्ये नेऊन बसवणारे पालक तर माझेच. तीन वर्षानंतर बरीच अक्कल आल्याने त्यापूढच्या शिक्षणाचे निर्णय माझे मीच घेतले तो भाग अलाहिदा.

झरबेराच्या आधीची पिढी आमची. आता आमची पिढी पाल्य भूमिकेतून पालक भूमिकेकडे आलेली आहे. तरी काय बदल झालेला दिसतोय का? दुर्दैवाने नाही!! आधी दहावी बारावीच्या मार्कांचं टेन्शन होतं ते आता अगदी एलकेजी पासूनच चालू झालेलं आहे. बरं, नुसत्या मार्कांचं टेन्शन नाही, आपलं पोर प्रत्येक बाबतीत स्टार असलंच पाहिजे हा एक विचित्र दुराग्रहही निर्माण झालेला दिसतो.

कालच काही पर्सनल कामानिमित्त लेकीची (वय वर्षे साडेतीन!!!) मिस घरी आली होती. तेव्हा बोलत बोलता तिने सांगितलं की अ‍ॅन्युअल डे मध्ये सुनिधीला डान्ससाठी सेंटरला घेतलं म्हणून दोन तीन मुलींच्या आई येऊन भेटून "तिला घेऊ नका, तिच्यापेक्षा आमच्या मुलीला घ्या" म्हणून भांडल्या म्हणे. त्यातल्या एकीने आमच्या मुलीला सगळं येतं मी डान्स घरामध्ये शिकवते. तिल गाणं पण पाठ आहे. सुनिधीला तमिळ समजत नाही म्हणॉओन तिला नाचता येणार नाही" वगैरे सांगितलं. साडेतीन वर्षाच्या मुलीकडून असल्या अपेक्षा? नाच म्हणजे काय... एकदा गोल फिरा, एकदा उभे रहा, इकडे तिकडे बघा टाईप.

अभ्यासासंदर्भा मधील अपेक्षांबद्दल आधीच एका बीबीवर ल्लिहिलं आहे. सुनिधीच्या वर्गातली सुमारे दहा ते बारा मुलं ट्युशनला जातात. (माझा ट्युशन घेणार्‍यांवर आक्षेप नाही. एकेकाळी माझे तेच चरितार्थाचे साधन होते!!!) पण पालकांना मुलांन ट्युशनला का पाठवावे लागते याची कारणे मात्र फार अचाट असतात. एकाजागी बसून अभ्यास करत नाही हे प्रमुख कारण. मग अभ्यासाला बसवू नका ना. इकडे तिकडे फिरत अभ्यास घ्या. ते जमत नसेल तर मुलांकडून अपेक्षा क करता?

मुलं ही जर तुमची इन्व्हेस्टमेंट असेल (म्हणजे जर तुम्ही असं म्हणत असाल की आपण जे काही करतो ते मुलांसाठीच)) तर मुलांना वेळ देणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. दुसरा महत्त्वाचा विषय संवादाचा. संवादासाठी आज अनेक माध्यमे उपलब्ध असूनदेखील सर्वात अमह्त्त्वाचा वन ऑन वन संवाद मात्र कमीकमी होत चाललेला आहे. असे नक्की का होत असेल तर त्याची अनेक कारणे आहेत, परंतु उपाय मात्र एकच. संवाद वाढवणे हा नसून सुरूवातीपासून संवाद मेण्टेन ठेवणे हा आहे.

मोठ्या शहरांमधले विद्यार्थी पोहणं, गिर्यारोहण, एखादं वाद्य शिकणं असे छंदतरी जोपासतात. पुणे-मुंबई वगळता महाराष्ट्रात हे घडत नाही. कारण अभ्यासावर परिणाम होईल, अशी पालकांना भीती असते
>>> हे माझ्यावेळेला फार जवळून पाहिलं आहे. सध्याचे एकाय परिस्थिती आहे माहित नाही. दहावीचं वर्ष म्हणून डान्सक्लास बंद करणारे, गायनाची परीक्षा बसू न देणारे असंख्य पालक माहित आहेत. पुणे मुंबईचा अनुभव नाही, पण रत्नागिरीत तरी "अगं दहावीचं वर्ष तुझं मग, नाचायला काय जातेस? नाटकात कसली कामं करतेस?" हे वाक्य दिवसाआड एकदा तरी ऐकलेले आहे. असो.

शाळेत, महाविद्यालयात विद्यार्थी पाट्या टाकतात, यावर चर्चा चाललेय, पण बेफिकीर यांच्या माहिती वरून इंटरव्हू आणि त्या दृष्टीने संभाषणकौशल्य किंवा तांत्रिक ज्ञान यासाठी सुद्धा मुलं अनुत्सुक आहेत असं दिसतंय.
खरच इतक्या सगळ्या मुलांचे पालक पुढचा मार्ग manage करू शकतात???

त्यांना पुढे शिकायचं असेल असं गृहीत धरलं तरी वरील कौशाल्याशिवाय कोण किती थारा देणार? त्या मुलांची खरच इच्छा नसताना त्यांना या प्रकारचे शिक्षण पालक जबरदस्तीने देतायत असं जरी मान्य केलं तरी मी पुढे काय करणारे या विषयी इतकी अनास्था इतक्या जास्त मुलांना असते? मला शिक्षण पूर्ण करून 8 वर्षे झाली, जर हे खरच generalized असेल तर बदलाचा पेस अफाट आहे.

मुलं ही जर तुमची इन्व्हेस्टमेंट असेल (म्हणजे जर तुम्ही असं म्हणत असाल की आपण जे काही करतो ते मुलांसाठीच)) तर मुलांना वेळ देणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. दुसरा महत्त्वाचा विषय संवादाचा. संवादासाठी आज अनेक माध्यमे उपलब्ध असूनदेखील सर्वात अमह्त्त्वाचा वन ऑन वन संवाद मात्र कमीकमी होत चाललेला आहे. असे नक्की का होत असेल तर त्याची अनेक कारणे आहेत, परंतु उपाय मात्र एकच. संवाद वाढवणे हा नसून सुरूवातीपासून संवाद मेण्टेन ठेवणे हा आहे. <<<

छान पॅरा नंदिनी!

चिनूक्स ह्यांचे मतः (चिनूक्स ह्यांनी शिक्षक ह्या भूमिएक्तून पाहिल्यानंतर त्यांचे झालेले मत, ह्याबाबत)

पुणे मुंबई वगळता इतरत्र मुले छंद जोपासत नाहीत / इच्छुक नसतात / जोपासू शकत नाहीत.

हे पूर्णपणे मान्य होऊ शकत नाही आहे समहाऊ.

कारण मलाही असेच आठवते व आढळते की मोकळा वेळ, मैदाने, झाडे, तळी, विहिरी, डोंगर, शहरातील तीव्र करिअर स्पर्धेपासून दूर असल्याने एक काल्पनिक व अदृष्य सुरक्षाकवच हे सर्व असे घटक आहेत जे मुलांना बद्ध न ठेवता उलट शिक्षणबाह्य गोष्टी करण्यास प्रवृत्त करतात व छंद जोपासायला वेळ व संधी देतात. खरे तर शहरातील मंडळीच छंद अगदी 'आता काहीतरी एक्स्ट्रॉ अ‍ॅक्टिव्हिटी असायलाच हवी ना' ह्या भीतीपोटी जोपासतात असे वाटते.,

सुप्रिया - तुमची पोस्ट आवडलीच. अक्षयच्या बाबतीत झापडलावी शिक्षणापेक्षा त्याच्या बुद्धीमत्तेचा विकास, त्याचा कल व त्याची ग्रास्पिंग पॉवर ह्यांचा सुयोग्य मेळ घातला गेला हे उत्तमच झाले.

मी पुढे काय करणारे या विषयी इतकी अनास्था इतक्या जास्त मुलांना असते? <<< होय अमितव, ऑफ लेट, निदान मला तरी असाच अनुभव आला.

हे माझ्यावेळेला फार जवळून पाहिलं आहे. सध्याचे एकाय परिस्थिती आहे माहित नाही. दहावीचं वर्ष म्हणून डान्सक्लास बंद करणारे, गायनाची परीक्षा बसू न देणारे असंख्य पालक माहित आहेत. पुणे मुंबईचा अनुभव नाही, पण रत्नागिरीत तरी "अगं दहावीचं वर्ष तुझं मग, नाचायला काय जातेस? नाटकात कसली कामं करतेस?" हे वाक्य दिवसाआड एकदा तरी ऐकलेले आहे. असो. >>>

दहावीसाठी सोड नंदिनी, मी अशातच एका पालकमैत्रिणीकडून (??? मुलाच्या मैत्रिणीच्या आईला काय म्हणायचं? ) ऐकलं, मुलगी सिनीअर केजी मध्ये आणि मोठा मुलगा दुसरी की तिसरीत आहे तर आता आजपासून शाळेत वार्षिक परिक्षा आहेत म्हणून त्यांनी दोन्ही मुलांचा ज्युडोचा क्लास आणि संध्याकाळंचं खेळणं ८-१० तारखेपासूनच बंद केलंय. आयामला संध्याकाळी कंटाळा येतोय नुसती सायकल चालवायचा म्हणून कुठे एकत्रं खेळायला काही आहे का याची मी चौकशी करत होते तर कळलं फेब्रुवारी आणि मार्चमध्ये परिक्षांमूळे सगळे क्लासेस बंद असतात आणि ग्राउंडवर पण पोरं नसतात जास्त.

मला पण ट्युशन लावायची आहे, माझ्या मित्र-मैत्रिणी ट्युशनला जातात असं आमच्या घरी गेल्या वर्षीच जाहिर झालं होतं. (अर्थात त्याचं कारण बहूतेक वर्गात काही पालक इंग्रजी किंवा हिंदी अजिबात न समजणारे आहेत. १०-१५% मुलांच्या आई-वडीलांपैकी किमान एकाला अजिबात लिहिता-वाचता येत नाही हे असेल असं मी माझ्यापुरतं गृहीत धरून मुलाला समजावून सांगायचा प्रयत्न केला होता. )

आमच्या कॉलेजात पण ६०-७०% मुलं मॅम सेशनल के इम्पॉर्टंट ॑क्वश्चन्स बताओ प्लिज म्हणणारीच आहेत. पण उरलेली मुलं वर्गात समजावून सांगताना ऐकत असतात. इंग्रजीतून कळालं नाही तर परत भेटून हिंदीत समजावून सांगा म्हणतात. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत विचारतात. (माझा विषय त्यांच्या फिल्डमध्ये पुढे गरजेचा नाहीये खरंतर, पण तरीही मुळापासून समजावून घेतात. फक्त सिलॅबसपुरता विचार करत नाहीत.)

अमित,

ही बातमी बघ - http://www.newindianexpress.com/business/news/47-of-Graduates-of-2013-Un...

या अशा बातम्या गेली कित्येक वर्षं नित्यनेमाने छापून येतात. म्हणजे परिस्थिती जैसे थे आहे.

बेफिकीर जे सांगत आहेत, त्याबद्दल विचार करताना काही प्रश्न पडले. खाजगी संस्थांमध्ये संगणकप्रशिक्षण घेऊन नोकर्‍या मिळवणं एकेकाळी प्रचलित होतं. आजही त्याच प्रमाणात विद्यार्थी खाजगी संस्थांमध्ये प्रशिक्षण घेतात का? खाजगी संस्थांमधून नोकर्‍या मिळण्याचं प्रमाणही पूर्वीइतकंच आहे का?

भरत मयेकर,

पुण्यामुंबईतल्या शाळांशी संलग्न असलेल्या काही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचा ताण कमी व्हावा, म्हणून जाणीवपूर्वक उपाय योजलेले आहेत. पुण्यामुंबईच्या कॉलेजांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठीची धडपड इतर शहरांमध्ये हे घडू देत नाही.दहावीबारावीचे वर्ग अजूनही भरत नाहीत.

ज्ञानरचनावाद आता शासनानेच 'कंपल्सरी' केल्याने येत्या काही वर्षांत चित्र बदलेल असं वाटतं. मात्र ज्ञानरचनावादाची चर्चा करताना पहिला मुद्दा दुर्दैवानं 'परीक्षा आहे की नाही' हाच निघतो. ज्ञानरचनावाद म्हणजे आठवीपर्यंत परीक्षा नाही, असाच पालकांचा आणि शिक्षकांचा समज आहे.

मात्र तरीही काही शिक्षक नेटाने प्रयत्न करत आहेत. उदाहरणार्थ, मुंबईत श्रीमती गीता महाशब्दे आहेत. त्यांनी महाराष्ट्रभरातल्या शेदीडशे शिक्षकांना एकत्र आणून ज्ञानरचनावाद रुजवण्याचं काम सुरू केलं आहे. दर वर्षी हे शिक्षक स्वतःहून एकत्र येतात, चर्चा करतात. वर्षभरात केलेल्या कामाचा आढावा घेतात. एरवीही त्यांचा एकमेकांशी संपर्क असतोच. अशा शिक्षकांची संख्या वाढावी असं वाटतं.

बेफिकीर जे सांगत आहेत, त्याबद्दल विचार करताना काही प्रश्न पडले. खाजगी संस्थांमध्ये संगणकप्रशिक्षण घेऊन नोकर्‍या मिळवणं एकेकाळी प्रचलित होतं. आजही त्याच प्रमाणात विद्यार्थी खाजगी संस्थांमध्ये प्रशिक्षण घेतात का? खाजगी संस्थांमधून नोकर्‍या मिळण्याचं प्रमाणही पूर्वीइतकंच आहे का? <<<

मी ज्या खासगी संगणक प्रशिक्षण संस्थेशी निगडीत आहे तेथे:

१. संगणक प्रशिक्षण घेणार्‍यांचे प्रमाण नियमीतपणे वाढत आहे.

२. तेथे प्रशिक्षण घेऊन नोकर्‍या मिळवणे अधिकच प्रचलीत झाले आहे.

३. महाविद्यालयांमध्ये होणार्‍या कँपसच्या तुलनेत मी ज्या संस्थेत आहेत तेथून प्रचंड प्रमाणावर प्लेसमेंट होत आहे व ती वाढतच आहे. ह्याच कारणाने महाविद्यालये त्यांचे विद्यार्थी आमच्याकडे पाठवत आहेत. सगळे कमालीचे हास्यास्पद वाटू लागले आहे चिनूक्स! म्हणजे ज्या बेसिक शिक्षणावर ह्या मुलांना जॉब मिळायला पाहिजे ते शिक्षण देणारेच त्यांना निव्वळ जॉबसाठी आमच्याकडचे अपस्किलिंग, रिस्किलिंगचे कोर्सेस घ्या हे आमच्याच वतीने सुचवत आहेत. आणि हे केवळ आमच्याकडच्या प्लेसमेंट्समुळे, हे त्यांच्यातोंडून विद्यार्थ्यांसमोर वदवून घ्यायला आम्हाला इतर काही करावेच लागत नाही.

तरीही मूळ लेखात नोंदवलेला प्रश्न असा, की एवढे असूनही मुले उदासीन आहेत. >> ही कुठल्या प्रकारच्या पार्श्वभूमीची मुले आहेत ? सामान्य मध्यमवर्गीय नोकरदार पालकांची शहरी मुले की आणखी कुठली ?

ह्यात 'अक्षरशः' सर्व प्रकारची मुले आहेत.

१. मुले व मुली

२. शहरी व ग्रामीण

३. श्रीमंत, बर्‍यापैकी आर्थिक स्तर असलेली व गरीब

४. इंग्लिश येणारी व न येणारी

बेफिकीर,
तसं असेल, तर काळजीचा मुद्दा आहे. माझा असा समज झाला होता की हल्ली खाजगी संस्थांमध्ये प्रशिक्षण घेण्याचं प्रमाण घटलं आहे. कारण अशा शाखा बंद झालेल्या दिसत आहेत. पुण्यातल्या अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्येच आता असे क्लास सुरू झाले, हेही एक कारण असेल. पण तसं नसेल, तर हे चक्रावणारं आहे.

Pages

Back to top