'बघू पुढे' वाली पिढी

Submitted by बेफ़िकीर on 22 February, 2014 - 05:53

ह्या धाग्यान्वये एक गंमतीशीर अनुभवकथन व त्याबाबत थोडे मतप्रदर्शन करण्याची संधी घेत आहे. काही प्रमाणात ह्या धाग्यातील विषयाचा संबंध माझ्या 'मराठीचा अभिमान' आणि 'यू आर रिजेक्टेड' ह्या दोन धाग्यांमधील विषयाशी आहे, पण ह्या धाग्यात वेगळ्याच कोनातून अनुभवकथन करत आहे.

==============

आमच्या संस्थेने फेब्रुवारी महिन्यात दोन महत्वाच्या मार्केटिंग अ‍ॅक्टिव्हिटीज केल्या. एक म्हणजे आमच्याच एका सेंटरवर दोन तीन कंपन्यांना बोलावले व त्यांच्यातर्फे 'काँप्लिमेंटरी' रिक्रूटमेंट ड्राईव्ह आयोजीत केला. ह्या ड्राईव्हमध्ये मुलाखती द्यायला विविध महाविद्यालयातील आधीच पास आऊट झालेले, ह्या वर्षी पास आऊट होणार असणारे असे अनेक विद्यार्थी बोलावलेले होते. मिळालेल्या गुणांचा निकषही असा होता की बहुसंख्य विद्यार्थी येऊ शकतील.

ह्या सर्व विद्यार्थ्यांना मी स्वतः त्यांच्या महाविद्यालयात जाऊन त्यांच्या प्राध्यापक व टीपीओ (ट्रेनिंग अ‍ॅन्ड प्लेसमेंट ऑफिसर) समोर घेतलेल्या सेमिनारमध्ये खालील माहिती दिली होती.

येणार्‍या कंपन्या
गुणांचे निकष
पास आऊट इयरचे निकष
उपलब्ध जागा (ज्या एकुण ३८० होत्या, येस यू रेड इट करेक्टली)
पगारची रक्कम (पहिली नोकरी करणार्‍यांसाठी नक्कीच आकर्षक आकडे होते)
आमच्या सेंटरचा पत्ता, फोन नंबर, संपर्कासाठी नावे, तारीख, वार इत्यादी
सोबत कोणकोणती कागदपत्रे आणायची ह्याची माहिती
पोषाख, हेअर स्टाईल, मेक अप, फूट वेअर ह्या बाबतच्या मेल व फिमेल कँडिडेट्सकडून असलेल्या सामान्य व्यावसायिक अपेक्षा
वर्तन कसे असावे
वेळेचे नियोजन कसे करावे
इंग्लिश नीट येत नसल्यास ते आधीच नम्रपणे नमूद करून टोन कसा सेट करावा
सर्वसाधारणतः काय प्रश्न विचारले जातात
अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट असल्यास ती किती गुणांची, किती कालावधीची व सहसा कशी असते
अ‍ॅटिट्यूड ठेवणे कसे घातक आहे

माझा प्रत्येक सेमिनार त्यामुळे जवळपास एक तासाचा झाला व असे आठ ते दहा सेमिनार्स झाले. हा ड्राईव्ह काँप्लिमेंटरी असल्याने सर्वांचेच चेहरे उजळलेले होते. हे सर्व करण्याशिवाय ह्या विद्यार्थ्यांना आम्ही दोन दिवस आधीपासून आमच्या केंद्रावर बोलावून टेक्नॉलॉजी व कम्युनिकेशन ह्या विषयांचे 'काँप्लिमेंटरी' ग्रूमिंग सेशन्स आयोजीत केले.

आता हे सगळे का केले? तर ह्या माध्यमातून अर्थातच संस्थेची मोठी, प्रभावी जाहिरात होते, नांव कर्णोपकर्णी होते आणि अंतिमतः व्यवसायवृद्धीची शक्यता वाढते.

तर हे विद्यार्थी ग्रूमिंग सेशन्सना कडक हजेरी लावून गेले. अपेक्षेप्रमाणे ड्राईव्हच्या दिवशी आपापले 'बेस्ट' निकष लावून सगळे हजरही झाले व टेस्ट, मुलाखती ह्या सर्व सोपस्कारांमधून गेलेही. ५४ विद्यार्थी पुढच्या राऊंडसाठी एकुण तीन कंपन्यांकडून निवडले गेले व बाकीचे रिजेक्टेड विद्यार्थी परतले.

ह्या रिजेक्टेड विद्यार्थ्यांना आम्ही फीडबॅक सेशनला परत बोलावले व बहुतेकांसाठी असलेला फीडबॅक हाच होता की एखाद्या विशिष्ट टेक्नॉलॉगीत आणि संवादकौशल्य व इंग्लिश बोलण्याच्या हातोटीत ते फार मागे पडत होते. पुढील काँप्लिमेंटरी ड्राईव्हसाठी त्यांनी निदान इंग्लिशची तरी तयारी करावी व ती आम्ही करून घेऊ हेही सांगितले. (अर्थातच, ही इंग्लिशची तयारी फुकट असणार नव्हतीच).

दरम्यान चारच दिवसांनी आमची दुसरी मोठी मार्केटिंग अ‍ॅक्टिव्हिटी म्हणजे एक अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट, जी विद्यार्थ्याचे आय टी क्षेत्रात काम करण्यास योग्य अ‍ॅप्टिट्यूड आहे की नाही हे सप्रमाण सिद्ध करते, ती आयोजीत करण्यात आली. आधीच्या विद्यार्थ्यांपैकी अनेकांनी येथे हजेरी तर लावलीच, पण ही टेस्ट कोणत्याही वर्षातील विद्यार्थ्यांसाठी असस्ल्याने एफ वाय (/एफ ई) पासून सगळेच विद्यार्थी आले होते. ह्या विद्यार्थ्यांमधून ७० पेक्षा अधिक (७०/१००) स्कोर करणारे फक्त १४ विद्यार्थी निघाले व एकुण टेस्ट देणार्‍यांची संख्या होती २१२.

ह्याही सर्वांना आम्ही फीडबॅक दिला व ह्याही विद्यार्थ्यांच्या बाबतीत तेच दोन प्रॉब्लेम्स होते. तंत्रज्ञानाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे न येणे व इंग्लिश न येणे!

इतक्या मोठ्या प्रमाणावर काम केल्यानंतर आम्ही परोपरीने ह्या विद्यार्थ्यांना सांगत होतो की पुढच्या ड्राईव्हच्या आधी इंग्लिशची बॅच लावा.

पण गंमत म्हणजे आजवर अतीउत्साहाने आमच्या केंद्रावर येऊन धडकणार्‍या ह्या विद्यार्थ्यांपैकी एकानेही, लेट मी रीपिट, एकानेही त्यात उत्सुकताही दाखवली नाही.

आमचे नांव झाले, त्याचा परिणाम म्हणून काही इतर विद्यार्थी स्वतःहून आले वगैरे बाबी वेगळ्या!

पण ज्या घटकाला संधी मिळत नाहीत असे मागच्या एका लेखात म्हंटले होते त्या घटकाला एका संधीचे सोने करता आले नाही म्हणून दुसरी संधी घेण्याआधी मेहनत करा म्हंटले तर तो घटक पूर्णपणे उदासीन होता. ह्यात महाराष्ट्रातील सर्व शहर, गावांमधून आलेले विद्यार्थी होते. कोकणापासून विदर्भ आणि सोलापूरपासून जळगावपर्यंत सगळे!

ह्यांच्यातील प्रत्येकाच्या पालकांनी सुमारे वीस हजार ते ऐंशी हजार अश्या रकमांची फी भरून त्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिलेला आहे. होस्टेलवर राहणार्‍यांचे इतर खर्च वेगळेच! मात्र ह्या एका मोठ्या घटकाला तूर्त तरी कसलेही गांभीर्य नाही.

त्यांचा रागही नाही आला आणि कीवही नाही आली. त्यांच्याबद्दल फक्त मनात हा विचार आला की आपल्या आधीच्या पिढीतील मेहनती / कष्टाळू वृत्ती, गांभीर्य आणि प्रयत्न करण्याची इच्छा ह्या लोकांमध्ये अभावानेच दिसत आहे. जणू ह्यांची करीअर्स आधीच कोणीतरी तयार ठेवली आहेत आणि हे पास आऊट झाले की आरामात तिथे नुसते जाऊन बसणार आहेत.

खरे तर ह्या जनरेशनसमोर स्पर्धेच्या तीव्रतेचे भय कधी नव्हे इतके आहे. पण चित्र उलटे दिसत आहे. 'बघू पुढे कधीतरी' हा भाव सार्वत्रिक असावा तसा आढळत आहे. हे सर्वत्र असेच आहे का, असल्यास असे का, इत्यादी!

आपल्यापैकी ज्यांना इच्छा आहे त्यांनी जरूर कारणमीमांसेची चर्चा करावी अशी विनंती!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

(मायबोलीवर आता 'ललित' आणि 'लेख' हे एकाच सदरात लिहावे लागतात, ह्याबाबत मागे एकदा विनंती केलेली होती. ललित व लेख हे दोन वेगळे भाग झाले तर बरे होईल)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाहुला तरी म्हणा हो. नायतर गेलाबाजार स्मितचित्र, नायतर स्मायली असे म्हणा सरळ. Wink <-- डोळा मारणारा भावला.

ह्म्म... ही बेफिकीर वृत्ती सगळ्या विद्यार्थीवर्गात वाढलीय.

माझी मुलगी कलाशाखेच्या पहिल्या वर्षाला आहे आणि तिच्या कॉलेजातला तिनही स्ट्रिम्सचा बहुसंख्य विद्यार्थीवर्ग शिक्षणाबद्दल पुर्णपणे उदासिन आहे. ती म्हणते की कॉलेजात सरळ सरळ दोन ग्रुप आहेत. एक ग्रुप mpsc/upsc ची तयारी करणारा एक लहानसा ग्रूप आणि दुसरा कॉलेज लाईफ एंजॉय करण्यासाठी आलेला एक मोठा गृप. ज्ञान कमवण्यासाठी कोणीही कॉलेजात आलेले नाही. परिक्षेच्या वेळी कॉपी करुन पास व्हायचे हा उद्देश घेऊनच मुले कॉलेजात येतात. तिच्या मैत्रिणी ज्या इतर कॉलेजात शिकताहेत तिथेही हेच चित्र आहे. काही ठिकाणी याहुन वाईट.

मुलगी कॉलेजातल्या ज्या एकेक गंमती जंमती सांगत असते त्याने मला अवाक व्हायला होते. communication skills हा विषय पहिल्या वर्षी सक्तीचा आहे. त्या विषयाला अवांतर वाचनासाठी एक इंग्रजी पुस्तक लावलेय. त्या पुस्तकावरचा चित्रपट कॉलेजमध्ये पाहुन नंतर पुस्तक आणि चित्रपटावर चर्चा असा कार्यक्रम होता. हे इंग्रजी पुस्तक कोणीही विकत घेतले नाही. काहीजणांना 'कशाला उगीच' हा प्रश्न पडला, तर इतरांनी नेटवर आहे पुस्तक, सर अगदीच मागे लागले तर करुया डाऊनलोड हा विचार केला. मुलांचा हा उत्साह पाहुन सरांनी रागाने चित्रपट दाखवायचा भागच रद्द केला. मुलांनी त्याबद्दलही आनंद व्यक्त केला, असले जुनाट बोरिंग चित्रपट कोण पाहिल? ह्यामुळे interpretation of classic literary work हा सिलॅबसचा एक भाग अभ्यासला गेलाच नाही. हे एक उदाहरण. अशी अनंत आहेत.

विद्यापिठाने दोन वर्षांपासुन credits सिस्टिम आणलीय. प्रत्यक सेमिस्टरचे मार्क्स आता पुढे नेले जाणारेत आणि डिग्री हातात पडताना त्या मार्कांमध्ये त्याचे प्रतिबिंब पडणार आहे. त्यामुळे शिक्षक जवळजवळ रोजच "आतपासुनच मार्क कमवायला लागा. पहिल्या दोन वर्षी जर रिझल्ट वाईट असेल तिस-या वर्षी कितीही अभ्यास केलात तरी काहीही फायदा होणार नाही" हे घसा फोडुन सांगताहेत. पण मुलांवर परिणाम शुन्य आहे . पहिल्या सेमिस्टरला तिन्ही स्ट्रिममध्ये १२० पैकी ९०-९५ मुले फेल झाली. मुलांना अभ्यासाचे महत्व कळावे म्हणुन मुद्दाम रिझल्ट कठिण लावला तरीही काही परिणाम नाही. मुलांना अभ्यास करायचाच नाही. परिक्षेला सरळ कॉपी करतात. आणि कॉपी केली नाही तर मुले फेल होणार म्हणुन शिक्षकही कॉपी करु देताहेत.

मुलीच्या आधीच्या कॉलेजातला शिक्षकवर्ग शिक्षणाबाबतीत मुलांपेक्षा जास्त उदासिन होता. निदान तिच्या ह्या कॉलेजात शिक्षक शिकवण्याबाबत उत्साही तरी आहेत. कॉलेजात सर्व फॅसिलीटीज आहेत. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये एल्सिडी टीवी आहेत. शिकताना सोबत लहान चित्रपट/ क्लिप्स/ डॉक्युमेटरीज दाखवण्याची सोय आहे. सुजज्ज लँग्वेज लँब्स आहेत. पण हे सगळे ज्यांच्यासाठी केलेय त्यांना त्यात रसच नाहीय. मुलांची वाट पाहुन कंटाळून शेवटी वर्गात एक जरी विद्यार्थी असला तरी लेक्चर घेतले जाईल असे शिक्षकांनी जाहीर केले आणि त्यानुसार एका एका मुलासमोर उभे राहुन त्यांनी या सेमिस्टरला शिकवलेही आहे.

याचा वाईट परिणाम डोळ्यासमोर काहीतरी ठाम हेतू ठेऊन अभ्यास करणा-या मुलांवर होतो. शिकणा-यांना रस नसल्याने शिक्षकही मोजकीच तयारी करुन वर्गावर येतात. ज्या मुलांना पुस्तकात छापलेय त्यापेक्षा जास्त जाणुन घ्यायचेय त्या मुलांना स्वतःहुन प्रश्न विचारुन हे जाणुन घ्यावे लागते. वर्गात चर्चा होतेय आणि त्यातुन माहिती मिऴ् तेय हे चित्र खुप कमी वेळा दिसतेय. शिक्षक जे सांगताहेत तेही ऐकुन घ्याय्ची तयारी नाहीय आजच्या मुलांची.

यापैकी कोणालाच graduation नंतर पुढे काय हा प्रश्न पडलेला नाही.

मुलीच्या मते तिच्या पिढीला लहानपणापासुन जे मागितले ते लगेच हातात मिळत गेले. जे काही पाहिजे ते आईबबा लगेच समोर हजर करतात. . शिक्षण संपल्यावर नोकरीची वेळ आली की आपल्या नोकरीसाठीही करतील ते काहितरी सेटिंग यावर सगळ्यांचा ठाम विश्वास आहे. आणि तशी वेळ आलीच तर पैसे दिल्याने, वशिला लावल्याने कामे होतात ते डोळ्यासमोर दिसतेय. त्यामुळे फिकर नॉट. कॉलेजात आलेत ते कॉलेज लाईफ एन्जॉय करण्यासाठी. ज्ञानसाधना वगैरे गोष्टी इतिहासजमा झाल्यात.

यापैकी कोणालाच graduation नंतर पुढे काय हा प्रश्न पडलेला नाही.

वा वा, छानच की. देश किती समृद्ध झाला आहे, नोकर्‍या किती मोठ्या प्रमाणावर मिळताहेत, जास्त कष्ट न घेता पुरेसा पैसा मिळतो आहे हाच अर्थ त्यातून मी काढला.

आमच्या काळी असे नव्हते हो. खूप शिकला नाही तर उपाशी मरू ही भीति होती. नि बोंबलायला जास्त शिकायला कॉलेजात प्रवेश तरी कुठे मिळत होते, विशेषतः इंजिनियरींग व मेडिकलला!

आता निवांतपणे जास्त कष्ट न करता सुखात रहाता येते. स्वतःची जास्तीत जास्त उन्नति करून घ्यावी यापेक्षा ठेविले अनंते तैसेचि रहावे, पोटापुरता पसा पाहिजे, नको मिळाया पोळी, इ. इ. सद्वचने, अर्थ न कळता म्हंटली की झाले!
मला तर आनंद आहे.

शिक्षण संपल्यावर नोकरीची वेळ आली की आपल्या नोकरीसाठीही करतील ते (पालक) काहितरी सेटिंग यावर सगळ्यांचा ठाम विश्वास आहे. आणि तशी वेळ आलीच तर पैसे दिल्याने, वशिला लावल्याने कामे होतात ते डोळ्यासमोर दिसतेय<<< असाच माझाही अनुभव!

कॉलेजात प्रवेश तरी कुठे मिळत होते, विशेषतः इंजिनियरींग व मेडिकलला! <<< खरे आहे. कॉलेजेसही नव्हतीच इतकी. अर्थात, तुमचा काळ बराच आधीचा असणार म्हणा!

आधीची पिढी (कदाचित आपलीच) याला जबाबदार आहेच. मुलाच्या मनात तुला कष्ट करणे गरजेचे आहे त्याशिवाय जगता येणे सहजपणे जमणार नाही हेच आधी स्पष्ट केलेले नसेल तर तो काय कपाळ मेहनत घेणार!

स्वतःची उन्नति करावी, खूप शिकावे, जास्त सुखाचे आयुष्य जगावे, वेळ वाया घालवू नये, चांगले रीतिरिवाज शिकावे, मोठ्ठे घर घ्यावे नेहेमी काहीतरी नवीन करावे, नवीन देश बघावे, अगदी लोकसेवा सुद्धा जास्तीत जास्त करावी, नगरसेवक झालो तर मंत्री बनावे, मुख्यमंत्री व्हावे असे काही जणांना काही कारणांमुळे वाटतच रहाते. मग ते त्यासाठी नक्कीच काहीतरी कष्ट करतात, शिकतात.

नि काहींना तसे काही वाटत नाही. .

आता तुम्ही काळजी न करणारे, कष्ट करून अधिक चांगले बनावे असे न वाटणारे लोक जास्त पाहिले नि त्यामुळे तुमचे तसे मत असेल.

माझ्या मते तर यावरून असे दिसते की देश समृद्ध झाला आहे, नोकर्‍या मिळणे, पैसे मिळणे, सुखात रहाणे हे सोपे झाले आहे, त्याशिवाय का असे होईल? शिक्षण म्हणाल तर हव्वी तेव्हढी कॉलेजे आहेत, हवे तेव्हढे क्लासेस आहेत.

आमच्या वेळी असे नव्हते, काळजी केली नाही तर चक्क उपाशी मरायची पाळी येईल, नोकरी पैसा काही मिळणार नाही, आई वडीलांच्या घरातून निघून दुसरे घर घेणे शक्यच नव्हते. लग्न सुद्धा कठीण. नि ते सुद्धा इंजिनियर, डॉक्टर, वकील असे शिकलात तरच. बरे कॉलेजेस कमी, तिथे प्रवेश मिळणे कठीण. छ्या:! म्हणजे झक मारत कष्ट करा. मग लोक झक्की म्हणाले तरी चालेल, आपण तर ब्वा लै सुखात आता.

त्या मुलांनी तुमच्या संस्थेत प्रवेश घेतला नाही याचा अर्थ त्यांना काही पर्वाच नाहीये असा होऊ शकतो का? कदाचित ते दुसरीकडे कुठेतरी प्रवेश घेणार असतील किंवा इतर कुठल्यातरी मार्गाने स्वत:ची skill development करणार असतील...काय माहीत! कदाचित दुसऱ्या एखादया संस्थेने त्यांना फ्रीमध्ये इंग्लिशचा क्लास दिला असेल!

मूळ लेख वाचून 'असे का?' हा प्रश्न पडला. त्याचे उत्तर साधना यांच्या प्रतिसादातून मिळाले.
दोन्हीत वर्णन केलेली मुले बहुसंख्येने haves वर्गातून आलेली आहेत का?
माझा जास्त संबंध have-not वर्गातल्या मुलांशी येतो. तिथे संमिश्र चित्र आहे. तरीही अभ्यास करणारी, विषय समजून घेणारी मुले अल्पसंख्येत आहेत. म्हणजे हे चित्र सार्वत्रिक मानायचे का?

याचे कारण साधना यांच्या शेवटच्या प्रतिसादातलेच असावे की भविष्याबद्दलच्या एकंदरित नैराश्यात असावे? शालेय शिक्षणापासूनच मुलांना परीक्षार्थी केले गेल्यामुळे ते विद्यार्थी होण्याची वेळ निसटली आहे का?

साधनाची पोस्ट विचार करायला लावणारी आहे.
मला वाटत सध्या गरज म्हणुन शिकणारे जास्त आहेत. आवड म्हणून शिकणारे कमी.
अगदी माझंच उदाहरण द्यायचं झालं तर, शाळेपासुनच पहायचं झालं तर मला भाषा विषय जास्त आवडायचे, मराठी, इंग्रजी, संस्कृत मी मनापासुन शिकायचे तर इतर विषय नाईलाज म्हणून.
पुढे कॉलेजात गेल्यावरही मला स्वतःला आयटी फारसं आवडलं नाही. माझा कल मॅनेजमेंट सबजेक्ट्स मध्ये होता.
अर्थात मॅनेजमेंट फिल्डमध्ये मला करिअर करता आलं असतंच पण अर्थिक, भावनिक, सामाजिक इत्यादी इत्यादी अनेक कारणांमुळे मला आयटीमध्ये येणं भाग पडलं.
मग अर्थातच मी जितक्या आवडीने टेक्निकल कम्युनिकेशन सबजेक्ट शिकले तितक्या आवडीने ऑपरेटींग सिस्टम, नेटवर्किंग कधीच शिकले नाही. इतर सबजेक्ट्स मध्ये स्कोअर केल्याने या सबजेकट्स मध्ये पासिंगपुरते मार्क मिळाले तरी बास असायचं Happy
मला वाटतं बर्‍याच जनतेचं असचं होतं असावं. नॉलेज साठी न शिकता डिग्रीसाठी शिकणार्‍यांच प्रमाण अधिक असल्याने असं होतंय का?

मी अगदी रोज घेत असलेला अनुभव आहे हा!

students are just not serious about it... the whole education system has made them like this... ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स ही काहीकाही कॉलेजमध्ये अगतिक आहेत विद्यार्थ्यांच्या या अशा वृत्तीमुळे!

रिया तु लेख नीट वाचलेला दिसत नाहीस.
तु मेहनत करून कोणत्या ना कोणत्या तरी विषयात प्राविण्य मिळवलंस. इथे बेफी टोटली वेगळं बोलतायत. संधी असून त्या संधीचं सोनं न करणारे किंवा शिक्षणाच्या सर्व सोयी उपलब्ध असून त्याचा फायदा न घेणारे यांबद्दल लेख आहे. असो...

हो गं दक्षुतै, मला तेच म्हणायचंय. अशी मुलं फायदा घेत नसावीत कारण त्यांना त्यात अजिबातच इंटरेस्ट नसेल.
असू शकतं ना असं.
माझ्या कॉलेजात एक मुलगा होता. अभ्यासात अतिशय मठ्ठ आणि अतिशय सधन कुटुंबातला.
पैसे देऊन पास झाला किंवा दुसर्‍यांकडुन पेपर देऊन पास झाला. कारण त्याला फक्त डिग्री हवी होती जी त्याने मिळवावी अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती.
या मुलाला त्यात अजिबात रस नव्हता.
त्यानंतर त्याने असच एमबीए वर पैसे घालवले.
आता वाईल्ड लाईफ फोटोग्राफी मध्ये उतरलाय आणि अतिशय मन लावून ते शिकतोय.
मग आपल्या दृष्टीने संधी असुन त्याने शिक्षणाबद्दल कळकळ दाखवली नाही वगैरे. पण मुळात त्याला आवड नव्हतीच तिथे तो काय दाखवणार?

एक उदाहरण देतो- आमच्या मावशी चा मुलगा, खुपच खटयाळ होता. अभ्यासात एक्दम मागे...
जेमतेम बारावी निघाला... आणी एके दिवशी घरातून पैसे घेवून पळून गेला... त्या पैस्यातुन त्याने एक प्रवेश परीक्षेचा अर्ज भरला... त्याची निवड झाली.. आणी तो एका केंद्रात प्रशिक्षण घेवू लागला... साधारण २ वर्षां नंतर त्याना इंटर्न शीप साठी मुम्बै ला बोलावलं .. तेथुन च तो एका कंपनीत रुजु झाला...सध्या तो सिंगापुर , दुबै इ. ठिकाणी फिरती वर असतो... सिने, टीवी कलाकारांसोबत त्याचे फोटो असतात. तो एक हेयर स्टायलीस्ट झाला आहे...!

त्याच्या आईवडीलांना ही बाब आवडली नव्हती, त्याने फक्त १०० रू. चोरले होते तेही अर्ज करण्यासाठी. घरून परवानगी नाही म्हणून त्याने असं केलं. !

ही उदाहरणं छान आहेत फक्त चुकीच्या क्षेत्रात जबरदस्तीने घुसवलेल्यांची आहेत. पण या लेखातली सरसकट सगळीच मुलं चुकीच्या क्ष्रेत्रात पडलेली होती असे वाटत नाही.

गोगा , बरोबर!
मी सगळ्यांची हीच समस्या असेल असं नाही म्हणतेय पण बर्‍याच जणांची ही समस्या असु शकते Happy

दोन्हीत वर्णन केलेली मुले बहुसंख्येने haves वर्गातून आलेली आहेत का?

याचे कारण साधना यांच्या शेवटच्या प्रतिसादातलेच असावे की भविष्याबद्दलच्या एकंदरित नैराश्यात असावे? शालेय शिक्षणापासूनच मुलांना परीक्षार्थी केले गेल्यामुळे ते विद्यार्थी होण्याची वेळ निसटली आहे का?

माझा मुलीशी ह्या विषयावर गेले तिनचार दिवस चर्चा केली. तसेही ती आधीपासुन सांगतच होती कॉलेज आणि तिथल्या मुलांचा एकुण अ‍ॅटिट्युड याबद्दल. तिच्यामते मुलांना पालकांनी कधी विचारलेय शाळा - कॉलेजात जे शिकवतात ते तुला समजते का? जे विषय शिकतोयस ते तुला आवडतात का म्हणुन?? सगळे पालक मुलाला तुला किती मार्क मिळाले हे विचारतात. पुन्हा हे मार्क शेजारच्या मुलापेक्षा जास्त पाहिजेत ही अपेक्षा ठेवतात. ज्याला मार्क जास्त तो जास्त हुशार. मग मुले जास्तित जास्त मार्क मिळवण्याचे उपाय शोधतात. क्लास लावणे, पाठांतर करणे आणि हे जमले नाही तर सरळ कॉपी करणे. घोका आणि ओका हे आवडते वाक्य आहे मुलांचे. आपल्या पुर्ण सिस्टिमने परिक्षार्थी होण्यावरच भर दिलाय. मुलांचे ज्ञान किती आहे हे ठरवण्याचा आपला एकमेव मार्ग परिक्षेतले मार्क हा आहे. विद्यार्थ्याचे मुल्यांकन करण्याचे इतर मार्ग असु शकतात याचा विसर पडलाय सगळ्यांनाच.

जास्त मार्क मिळवणे हा क्रायटेरिया haves and haves not दोन्ही पालकांचा आहे. haves not मधले पालक haves मधल्या पालकांकडे पाहुन ते जसे करतात तेच करणे योग्य समजतात.

भविष्याबाबत नैराश्य आहे का माहित नाही पण भविष्याबाबत विचार करण्यापेक्षा 'आज दिवस तुमचा समजा' यावर आता एकुणच लोकांचा जास्त विश्वास बसायला लागला. आज एंजॉय करुया, उद्याचे उद्या बघू...

रियाने लिहिलेय तसे मुलांना आवडीचा अभ्यासक्रम निवडण्याचे स्वातंत्र्य पालक देत नाहीत. हल्ली माझ्या असे लक्षात आलेय की मुले कॉलेजात काय शिकताहेत हा पालकांसाठी एक प्रेस्टीज इस्स्यु झालाय. मुलाने आर्किटेक्चर, इंजीनीर, डॉक्टर किंवा अशाच काहीतरी प्रेस्टिजवाल्या विषयाला अ‍ॅडमिशन घेतली असेल तर सांगणा-याचा पालकाचा भाव वधारतो आणि ऐकणाराही इम्प्रेस होतो. तुमचे मुल भाषा बिषा शिकत असेल तर ऐकणारा चिंताग्रस्त होतो की यांच्या मुलाला पुढे जाऊन नोकरी कोण देणार आणि त्याहीपेक्षा महत्वाचे हे की जर कोणी दिलीच तर अशा नोकरीत तो मुलगा कितीसे कमावणार... Happy खरी कमाई आयटी, आर्किटेक्चर, इंजीनीर, डॉक्टर इथे आहे. आणि शिकायचे केवळ यासाठी की पुढे जाऊन कमवाय्चे आहे. पालकांचा हा अ‍ॅटीट्युड तर मुलांना कमवायचे कशाला हा प्रश्न. सगळे तर आधीच आहे आपल्याकडे. मग कशासाठी आटापिटा करायचा?

मुलाचे मार्क पाहुन मुलाने सायन्सला जावे की कॉमर्सला हे पालकच ठरवतात. हल्ली दहावीनंतर अ‍ॅप्टिट्युड टेस्ट्स वगैरे करण्याची फॅशन निघालीय. पण ही टेस्ट करुनही त्यातले आपल्याला सुटेबल असेल तेवढेच पालक पाहतात. पालकांच्या हट्टापायी मुले अ‍ॅडमिशन घेतात आणि कॉलेजात जाऊन केवळ पाट्या टाकायचा उद्योग करतात.

आपल्या शिक्षणपद्दतीत सुरवातीपासुनच मुलांना हे का? हे कसे? हे प्रश्न विचारायला वाव ठेवलेला नाही आणि ह्या संकुचित वातावरणात वाढणा-या मुलांवर स्वतःच्या इच्छेचे ओझे लादुन पालक मुलांचा शिक्षणातला उरलासुरला रसही घालवुन टाकतात.

मुलगी आज सांगत होती की आज तिचे शिक्षक सगळ्यांना गयावया करुन सांगत होते की बाबांनो शेवटचा आठवडा आहे कॉलेजातला, निदान आम्ही सांगतोय ते महत्वाचे प्रश्न लिहुन घ्या आणि तेवढी तयारी तरी करा. पास होण्यापुरते मार्क तरी मिळतील.

तिच्या कॉलेजात अंध (पुर्णतः आणि अंशतः अंध) मुलेही शिकताहेत. यांच्या मागेही शिक्षकांनाच लागावे लागते की बाबांनो आम्ही नोट्स काढल्यात, त्या येऊन रेकॉर्ड करुन घ्या, कॉपी करुन घ्या. ती मुलेही इतरांसारखीच टीपी करत फिरतात. मुलगी म्हणते अंध असले म्हणुन काय झाले, कॉलेज लाईफ इंजॉय करायचा हक्क् त्यांनाही तेवढाच आहे. बाकीचे अभ्यास नाही करत तर मग त्यांनी तरी का करावा.... Happy

चांगली पोस्ट आहे साधना!

तुमच्या ह्या पोस्टमधून 'एक उत्तर' असे मिळत आहे की ही 'बघू पुढे' वाली पिढी आधीच्या पिढीनेच तशी बनवलेली आहे.

हेही समर्थनीयच आहे असे म्हणावे लागेल, त्याचवेळी, काही मुलेही निगरगट्ट असू शकतात हेही मान्य होऊ शकावे.

धन्यवाद!

ज्या दोन मुलांची उदाहरणे दिली आहेत ती यशस्वी झालेल्यांची आहेत. पण ९९% अयशस्वी झालेली दिसत नाहीत कींवा दाखवली जात नाहीत.

UPSC/MPSC ची तयारी करतोय हे फक्त एक कारण असते काहीही न करण्या साठी, पदवी घेउन घरी आरामात बसण्यासाठी.

साधना यांनी फार चांगले लिहिले आहे.

मला वाटते पालकांची दोन्ही बाजुनी कोंडी होते.
आपल्याला मिळाले नाही ते मुलांना मिळावे त्यांनी आनंदी रहावे म्हणुन त्यांना हवे ते, हवे तेव्हा दिल्यावाचुन राहवत नाही..
मुलांना सगळे आयते काही श्रम न करता रेडीमेड मिळाल्याने काही करुन दाखवावे अशी जिद्द त्यांच्यात उरत नाही..मग "बघु पुढे" ही वृत्ती बोकाळते. (अर्थात प्रत्येक गोष्टीला अपवाद असतातच).
कोणाला यावर काय करता येइल माहित असेल तर कृपया लिहा.. (खरेतर हा एका स्वतंत्र बाफचा विषय आहे).

वॉरन बुफे यांनी म्हटले आहे..
A very rich person should leave his kids enough to do anything but not enough to do nothing.
यातली वेरी रिच हा भाग सोडा पण बाकीचा भाग आपल्या मध्यमवर्गीयांना सुद्धा लागु पडतो.

खरे तर ह्या जनरेशनसमोर स्पर्धेच्या तीव्रतेचे भय कधी नव्हे इतके आहे.
ही स्पर्धा आभासी आहे असे नाही का वाटत? आणि खरी असलीच तर ती आहे कोणाशी? शेजारच्या काकूंच्या मुलाशी, किवा मामाच्या कोण्या मित्राच्या मुलीशी, आईच्या बालमैत्रिणीच्या मुलीशी कि अजून कोणाशी तरी? माझ्या वर्गात तरी काहीच स्पर्धा नाहीये कारण 'हम सब एक है और हम सब कॉपी करेंगे और जो मदत नही करेंगे उनका निषेध भी करेंगे!' (अजून बरच काही) असो.
माझ्या शाळेमुळे मी पूर्णपणे वेगळ्या वातावरणात वाढले thanks to आई कि मी या सगळ्या (फसव्या?) स्पर्धेपासून लांब राहिले आणि शाळेतल्या शिक्षकांनी जस मला घडवलं तसे घडत गेले Happy

students are just not serious about it... the whole education system has made them like this
अगदी खरे! तुमच्या घरात कोण लहान मुलगा/ मुलगी असेल तर तुम्हाला कळेलही. आता तर Jr. Kindergarten ला पण मुलाखत घेतात म्हणे. आपल्या कडे अश्या भरपूर परीक्षा आहेत ज्या विध्यार्थ्याला 'ज्ञानार्थी' व्हायला भाग पाडतात.. होमी भाभा आहे, संस्कृती ज्ञान परीक्षा आहे, NTSE MTSE आहेत.. (या परीक्षा माझ्या शाळेत सगळ्यांना अनिवार्य आहेत) पण आम्हाला त्याचं प्रेशर नव्हतं कारण आमच्या शिक्षकांना आम्ही आमच्या ताकदीच्या बळावर कुठपर्यंत जाऊ शकतो हे पहायचे होते. पण आता इथे पालकांच्या, शाळेच्या 'रेप्युटेशन' च्या नावाखाली क्लास्सेस लाऊन बळजबरी ह्या परीक्षा देतानाही पाहतेय मी. Sad


UPSC/MPSC ची तयारी करतोय हे फक्त एक कारण असते काहीही न करण्यासाठी, पदवी घेउन घरी आरामात बसण्यासाठी.

I couldn't agree more. Happy

जर मुलांना घडवताना तुम्ही त्यांना परीक्षार्थी करत असाल तर 'मुलांना कष्टाची किंमत नाही' 'त्यांना शिक्षणाच महत्व कळतच नाही' असे बोलण्याचा अधिकार तुम्ही स्वताच गमावत आहात ना? Happy

झरबेरा, भारी पोस्ट.

>>जर मुलांना घडवताना तुम्ही त्यांना परीक्षार्थी करत असाल तर 'मुलांना कष्टाची किंमत नाही' 'त्यांना शिक्षणाच महत्व कळतच नाही' असे बोलण्याचा अधिकार तुम्ही स्वताच गमावत आहात ना?

खरोखर! तुमच्या पिढीकडून ही आमच्या पिढीला सणसणीत चपराक आहे.

बरीच मुले/मिली, आपले मित्र मैत्रिणी जे करतात तेच करायच,ह्या मताचे असतात.ही गोष्ट १० वि,१२ वि चा मुलांमध्ये आढळुन येतेच.मग नाहि झेपले कि काय ह्याचा विचारच नाहि.जो पर्यंत अक्क्ल येते तोवर वेळ निघुन गेलेलि असते.

कधि कधि आइ - बाप हि ह्याला खुप जवाब्दार ठरतात.ज्याला जे मनापासुन आवडते ना त्यातच पारंगत झाले तर खुप उत्तम.

एका नातेवाइकांचि मुलगि आलि.१२ ला खुप कमि मार्क पडले (सायंस ला होति).पुढे काय करु अस तिचा प्रश्न.मि आयटि कंपनित त्यावेळेस नोकरि करत होते.तिला एवढच दिसत होत कि मि आयटि कंपनित आहे सो मि परफेक्ट आहे.
अहो पण्,तिथला डोक्याचा ताप हिला कसा कळणार.संगीत शिकत होति.
माझे उत्तर मि तिला दिले: तु खुप नशीब्वान आहेस कि तुझे बाबा तुझ म्हणणे ऐकुन घेउन माझापर्य>त तुला घेउन आले.तुझावर कसलिच जबर्दस्ति नाहि करत आहेत.मला जर कुणि एखाद योग्य मार्गदर्शना साठि नेल असत तर कदाचित मि हि काहि तरि वेगळि असते हि.माझ ऐकलिस तर संगीतात तु व्यवस्थित पारंगत हो.चा>गलि मास्टर्स हो.तुला कल्पना नहिये,कित्ति मागणि आहे अशा लोकांना.वर स्वतह चि बॉस तु स्वतह असशिल.

आता ति काय करत आहे मला नाहि माहित.

अशि मुलांचि अवस्था बघुन खरेच वाईट वाटते.त्याना नीट कळत नसते.पाल़आ>नि इथे त्याना साथ देण्याचि खरि गरज आहे.
आज कल आइट कंपन्या हि भुरळ पाडायला कमि नाहि करत हो.उघाच लोंढे च्या लोंधे भ्भरुन घ्यायचे.जे शिकशण असत,तो सोडुन भलत्यात टेक्नॉलॉजि चे काम द्यायचे (अवांतराबद्दल माफ करा)

जर मुलांना घडवताना तुम्ही त्यांना परीक्षार्थी करत असाल तर 'मुलांना कष्टाची किंमत नाही' 'त्यांना शिक्षणाच महत्व कळतच नाही' असे बोलण्याचा अधिकार तुम्ही स्वताच गमावत आहात ना?<<<

गंभीर वाद निर्माण होऊ शकण्याचे पोटेन्शिअल असलेली पोस्ट!

पाल्याचे पालक पाल्याला परीक्षार्थी 'करतात' ह्यात नियंत्रणच नसलेल्या रचनेचा, यंत्रणेचा काहीच सहभाग नसतो का?

'वगैरे'

>>जर मुलांना घडवताना तुम्ही त्यांना परीक्षार्थी करत असाल तर 'मुलांना कष्टाची किंमत नाही' 'त्यांना शिक्षणाच महत्व कळतच नाही' असे बोलण्याचा अधिकार तुम्ही स्वताच गमावत आहात ना?<<
इथे परीक्षार्थी या शब्दाचा नेमका कोणता अर्थ अभिप्रेत आहे? माझ्या मते सगळ्या शिक्षणपद्धतीत परीक्षा हि द्यावीच लागते - म्हणजे परीक्षेची तयारी करणं हे ओघाने आलंच (अन्लेस यु आर अ जिनियस). मग आई-बाबांनी मुलांना कष्ट करुन परीक्षेची तयारी करायला भाग पाडलं तर त्यांनी बोलण्याचा अधिकार गमावला??

वा ! ज्वलंत विषय आणि हिरीरीने चाललेली समर्पक चर्चा या धाग्यावर लिहिण्यासाठी उद्यूक्त करतेय मला.

माझा मुलगा नर्सरी, लोअर-अप्पर के जी मधे मराठी माध्यमाच्या शाळेत होता पण त्याची आकलन शक्ती, वाचन, लिखाण यातली प्रगती इतकी अचाट होती की तो मोठ्या गटात असताना ४ थीच क्रमिक पुस्तक खाड-खाड वाचे, सारखा आपला माझा अभ्यास घे चा घोषा मागे लावे चिडून मी त्याला जनरल प्रश्न लिहून देत असे एका वहीत तो त्याच्या आकलन शक्तीनुसार त्याची उत्तरे लिहित असे.

१ लीत त्याच माध्यम बदलल नि गावही ईंग्लिश शब्द, आकडे यांची ओळख त्यांचे स्पेलिंगज, करसिव्ह राईटींग , ओरल स्टोरीज महिनाभर दोघे मान मोडून झटलो नि ब-याच टेस्ट नंतर अ‍ॅडमिशन मिळाली एकदाची ! मी ही पुढच्या वर्षापासून त्याच्याच स्कूलमधे जॉईन झाले. त्याच्या अतिचिकत्सक आणि माझ्या अति चिकट स्वभावामुळे आम्ही प्रत्येक विषय मुळापासून शिकत-शिकवत राहिलो. हळू-हळू हे लक्षात यायला लागल माझ्या की त्याचा शिकण्याचा आवाका जास्त आहे म्हणून ७ वी मधे त्याला सि.बी.एस.सी बोर्डच्या शाळेत घातलं , तिथे मात्र त्याची भंबेरी उडायला लागली प्रत्येक विषयाचा जास्तीचा, सखोल अभ्यासक्रम , आदर अ‍ॅक्टीव्हीटीज...दोघेही जरासे गोंधळूनच गेलो.

माझ्याच शाळेतल्या एका शिक्षक मैत्रिणीने त्याला शिकवण्याचा विडा उचलला नि तेव्हापासून त्याच्या
शैक्षणीक कारकिर्दीचा आलेख ख-या अर्थाने चहुबाजूने चढताच राहीला तो आजपर्यंत त्याच आय.बी.एम मधे कँम्पस मधून प्लेसमेंट होईपर्यंत. याचं पूर्णतः श्रेय माझ्या मैत्रिणीच्या अभ्यास करवून घेण्याच्या हातोटीला अन अक्षयच्या हुशारीला द्यायला हवे. तिने प्रत्येक विषयाचा प्रत्येक धडा असा तयार करायला शिकवले की प्रत्येक ओळीवर ती त्याला उलट-सुलट प्रश्न विचारी त्यामुळे त्याच पुस्तकच्या पुस्तक समजावून घेवून पाठ असे.
तो १० वीत असताना त्याची आत्या त्याला एकदा गमतीने म्हणाली की केव्हाही पाहील तर तू आमच्यामधेच गप्पा मारायला येवून बसतोस अभ्यास वैगरे करतोस की नाही ? दहावीच वर्ष आहे न तुझं ?
त्याने सगळी पुस्तक तिच्या समोर ठेवली, तिने कुठल्याही विषयाचा, कोणत्याही पानावरचा, कुठलाही प्रश्न विचारला तरीही ह्याच उत्तर तयार !

या आधीही त्याने २-३ नामांकित कंपन्यांच्या शेवटच्या फेरीपर्यंत मजल मारली होती पण कधी त्याला त्याचे आवडते क्षेत्र मिळत नव्हते म्हणून तर एकदा त्याला शेवटच्या राऊंडला विचारले गेले की तुम्ही एम. एस. करण्यात ईंटरेस्टेड आहात काय ? त्याने भाबडेपणाने उत्तर दिले 'हो ! मी टॉफेल ही क्रॅक केलय जी.आर.ई. ची तयारी करतोय Sad झालं गेली त्याची संधी. पण या गेलेल्या संधीतूनच तो घडत गेला.

सांगायचा मतितार्थ हा की नुसत्या मुलांना, सिस्टीमला दोषी न ठरवता त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळत गेल तर थोड्याश्या नियमीत कष्टानेही ती नक्कीच प्रगतीची शिखरे पार करु शकतात.

Pages