समाजमन २ - तिचा शेवटचा प्रवास...

Submitted by अतुल ठाकुर on 20 February, 2014 - 11:07

article007-300x199.jpg

गेली दिवाळी उदासीनतेने झाकोळली होती. तिच्या आजारपणाबद्दल आणि त्यातील असाध्यतेबाबत कल्पना होती. मात्र अशी प्रेमळ व्यक्ती एकदम लक्ष्मीपुजनाच्या दिवशी जाईल असं वाटलं नव्हतं. सारं वातावरणच बदलुन गेलं. आम्ही पोहोचलो तेव्हा तिच्या मुली आणि मुलगा ज्यांनी शेवटच्या आजारपणात तिची अपार सेवा केली ते आता शेवटच्या तयारीला लागले होते. मी इथे वादावादी होणार अशी अपेक्षा ठेऊनच आलो होतो. कारण जमलेली मंडळी ही जरी एकाच जमातीची असली तरी निरनिराळ्या गावात, तालुक्यात विखुरलेली होती. प्रत्येक गावात भाषेचाही थोडा थोडा फरक होता आणि रीतीभातींचाही फरक होताच. त्यातुन अंत्यविधी म्हणजे काटेकोरपणे पार पडलेच पाहीजेत असे मत असल्याने प्रत्येक जण स्वतःचे मत देणार होताच. मुलगा दु:खात होता, रडत होता आणि तेथे दणदणत असलेल्या काही लोकांमुळे गोंधळला होता. अशावेळी इतर सर्वजण जे करतात तेच तो करत होता...दिलेल्या आज्ञेचे पालन.

अशावेळी जी टिपीकल माणसे ज्यांना अंत्यविधीची बारीकसारीक माहिती असते त्यांचा आवाज चालतो. येथेही त्याला अपवाद नव्हताच. त्यातला जर कुणी जवळचा नातेवाईक असेल तर पाहायलाच नको आणि तो ही वयस्क असल्यास प्रश्नच मिटला. ही माणसे नुसती बोलत नाहीत तर आपण सांगितलेले नीट पार पाडताहेत कि नाही हे देखिल कसुन पाहात असतात. त्यामुळे अडिअडचण, दडपुन नेणे याला वाव नसतो. शेवटी त्यांना कुठेतरी बोलायला मिळालेलं असतं आणि लोक निमुटपणे ऐकत असतात. त्यामुळे विशिष्ठ विधीमागे शास्त्र काय आहे ते सांगण्याची चढाओढ चाललेली असते. असेच एक गृहस्थ येथेही अक्षरशः पोलिसी खाक्यात ओरडत होते.

शव गडीतुन घेऊन आम्ही स्मशानात गेलो. आता सारेकाही शिगेला पोहोचले. खांदा देणार्‍यांत मी देखिल होतो. आता स्मशानात प्रवेश कसा करायचा त्याच्या सुचना देणे सुरु झाले. स्मशानाच्या दरवाजात एक दगड ठेवला गेला. ज्याने खांदा दिला होता त्या प्रत्येकाने त्या दगडाला पाय लावुन आत जायचं होतं. बुट, चपला घातलेले आम्ही ही सारी कसरत करुन आत पोहोचलो. शरीर डोक्याकडुन की पायाकडुन आत न्यायचं त्यावर चर्चा झडुन शेवटी तिला तेथे आत ठेवलं आणि शेवटचे विधी सुरु झाले.

मुलाने आधिच डोकं तुळतुळीत केलं होतं. त्यातही भानगड होतीच. कूणी म्हणत होतं हे आधी घरी केलं पाहिजे. कुणी म्हणत होतं हे स्मशानातच करणं योग्य. मात्र केस कापले नाही तरी चालेल असं मात्र कूणीच म्हणालं नाही. शेवटी सारे सोपस्कार पाड पडुन अग्नी देण्याची वेळ आली. तेव्हा लोकं हिरिरीने सल्ला देऊ लागले. पेटवलेली लाकडी काठी, कशी कुठच्या दिशेने पकडुन अग्नी द्यायचा, अग्नी देणार्‍याने कुठल्या दिशेने उभे राहायचे वगैरे वगैरे. शेवटी चिता भडकली आणि बहुधा कुठल्या दिशेने आपल्याला अग्नी दिला गेला याकडे लक्षही न देता तिने आपला शेवटचा प्रवास सुरु केला.

सुप्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ इमाईल डुरकाईमने आपल्या "मेकॅनिकल सोलिडेरीटी" या तत्त्वाबद्दल म्हटलंय कि जो समाज वंश किंवा धर्मावर संघटीत झालेला असतो, आधारलेला असतो त्यांच्यातील एकोपा हा विशिष्ठ विधी, तत्त्वे यांच्या मान्यतांवर अवलंबुन असतो. हि तत्त्वे कडकपणे पाळण्यात यावी यासाठी कठोर नियम असतात. ही तत्त्वे पाळण्यात कसुर झाल्यास कडक शिक्षा दिली जाते आणि ती वाळीत टाकण्यापासुन ते मृत्युद्ण्डाइतकी टोकाची देखिल असु शकते. मी असंच काहितरी समोर पाहात होतो. तिच्या मुलाने एखादी जरी पायरी या विधींमध्ये गाळली असती, अविश्वास दाखवला असता, अथवा काही गोष्टी अमान्य केल्या असत्या तर बंदिस्त अशा समाजात, जातीत ते लगेच पसरलं असतं.

पुढे त्याला ते आयुष्यभर ऐकावं लागलं असतं. संधी मिळेल तेव्हा काहींनी टोमणे मारले असते. त्यानंतरच्या सार्‍या विधींवर मला याचे सावट जाणवले. तेरा सोन्याचे मणी कशासाठी तरी लागणार होते. आजारपणात बराच खर्च झालेल्या तिच्या मुलाला तोही खर्च करावा लागला. कावळा शिवण्याचा भीतीदायक प्रकार होताच. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील गच्चीत, जेथे टिवीचे अँटेना सगळीकडे लावलेले होते, कावळे बराच काळ येईनात. मग निरनिराळ्या गोष्टी बोलणे सुरु झाले. प्रत्येकजण सोयिस्कर गोष्टींची कबुली देत असणार. मंडळींना भुक लागली होती. शेवटी "तिचा स्वभाव प्रेमळ होता. ती इतरांआधी कधीच जेवत नसे त्यामुळे आपण जेवल्याशिवाय ती कशी जेवणार???" असा कुणालातरी साक्षात्कार झाला आणि मंडळींनी कावळा शिवण्याआधी जेवायला सुरुवात केली. त्यात ते दणदणणारे गृहस्थ देखिल होते.

शहरात राहात आसल्याने वाळीत टाकणे वगैरे गोष्टींची आता भीती वाटत नाही मात्र गावांमध्ये त्याचा परिणाम अजुनही टिकुन आहे. मात्र मला खाप पंचायतीसारख्या ठिकाणी घडणार्‍या घटनादेखिल फार काही वेगळ्या वाटत नाहीत. विशिष्ठ मुल्य स्विकारुन त्यांच्या पायावर उभा असलेला, मेकॅनिकल सॉलिडेरीटी असलेला समाज त्या मुल्यांवर आघात करणार्‍यांना ठार देखिल मारतो. ते देखिल आपल्या देशाच्या संविधानाची, कायद्याचीही पर्वा न करता. अगदी एकविसाव्या शतकात देखिल...

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख आवडला.

>>"तिचा स्वभाव प्रेमळ होता. ती इतरांआधी कधीच जेवत नसे त्यामुळे आपण जेवल्याशिवाय ती कशी जेवणार???" >>

हा युक्तिवाद सर्वमान्य असावा, मीही अलिकडेच ऐकलाय.
हे चित्रही सर्वपरिचयाचे थोड्याफार फरकाने.

ज्यानी वाचले नसेल त्यांच्या साठी समाज मन १ ची लिन्क
http://www.maayboli.com/node/47443
अतुल, दोन्ही लेख छान
समाज मन १ आत्ताच वाचले.तुमच्यात चिकित्सक संशोधकाबरोबर संवेदनशील माणूसही आहे.
अम्ही एमिल डरखीम म्हणतो त्यामुळे इमाईल डुरकाईम पटकन समजल नाही.नावांच्या उच्चाराबाबत नेहमी हा प्रश्न येतो मराठी समाजशास्त्र परीषदेत पारिभाषिक शब्द आणि अशा नावांचे उच्चार याबाबत एकसाखेपणा येण्यासाठी काम व्हावे असा विचार मी मांडला होता.पण त्याबाबत काहीच झाले नाही आता तुम्ही त्या क्षेत्रात आहात तर काही करू शकाल.
समाजमन ३च्या प्रतिक्षेत.त्यावेळी आधीच्या दोन लेखाची लिंक द्या.

समाजमन १ आणि२ दोन्ही लेख मला आवडले.समाजमन १ वाचला गेला नव्हता. इतरांचही तसच झाल अस्ण्याची शक्यता आहे. धागा वर काढण्यासाठी हा प्रतिसाद.कृपया १,२ दोन्ही वाचा.