ती मधुचंद्राची रात्र … छे काळरात्र !
"सर,मिसेस सिन्हा त्यांच्या मुलीला घेवून आल्या आहेत. त्यांना तुमच्या चेंबरमध्ये बसवले आहे."
मी क्लिनिक मध्ये दुपारी प्रवेश करीतच होतो एव्हड्यात माझ्या रीसेप्शनीस्टने मला थांबवून असा निरोप दिला.
दखल घेतल्याप्रमाणे मान हलवून मी माझ्या खोलीत शिरलो.
"हलो, म्याडम, कसे काय येणे केलेत ?"
मिसेस सिन्हांनी मान किंचित हलवून माझ्या येण्याची दाखल घेतली, पण बोलल्या मात्र नाहीत. शेजारीच त्यांची तरुण मुलगी स्मिता मान खाली घालून डोके टेबलावर हातांच्या वेटोळ्यात खुपसून बसली होती. तशी स्मिता म्हणजे नावाप्रमाणेच सदैव स्मितमुखी अशी सुहास्यवदना मुलगी. नुकतीच काही दिवसांपूर्वी मिसेस सिन्हा स्मिताच्या लग्नाचे निमंत्रण करताना मला शर्ट आणि सौं'ना साडी घेवून आल्याचे माझ्या स्मरणात होते. स्मिताला असे बसलेले पाहून काहीतरी गंभीर घडले असावे असा विचार पटकन मनात डोकावला. तसे आम्हा डॉक्टरांच्या मनात नेहेमीच वाईट विचार प्रथम येतात.
"काय झालेय, स्मिताला बरे नाही का ?"
थोडा वेळ कोणीच काहीच प्रतिसाद दिला नाही आणि मग मिसेस सिन्हांनी अचानक अश्रूंना आणि शब्दांना वाट करून दिली.
स्मिताकडे पाहत त्या म्हणाल्या, "डॉक्टरसाब, कैसे बताये पर बहुत ही अनहोनी बात हो गयी."
स्मिता नुकतीच संगणक पदवीधर होवून एका प्रसिद्ध कंपनीमध्ये लठ्ठ पगारावर नोकरीला लागली होती. तिथेच तिच्याच आवडीच्या एका समवयस्क समीर अरोरा नावाच्या पंजाबी तरुणाबरोबर तारा जुळल्या आणि यथावकाश दोघांच्या आईवडीलांनी मिळून त्यांच्या लग्नाचा बार उडवून दिला. आर्थिक परिस्थिती मजबूत मग काय, 'राया, कुठे कुठे जायाचे हनिमूनला' ! नियोजन झालेच होते,मग काय, समीर आणि स्मिता निघाले सदाबहार निसर्गरम्य बालीला !
मुबई ते सिंगापूर ते देनपसार हा सातआठ तासांचा प्रवास या नवपरिणीतांनी एका वेगळ्याच विश्वात काढला आणि सकाळीच पोहोचले बालीमुक्कामी ! कार्तिक प्लाझा हॉटेलमध्ये ब्यागा टाकून आणि फ्रेश होवून दोघेही निघाले फिरायला ! दिवसभर कसा गेला त्यांना कळलेच नाही. नाही म्हणायला समीरचा दावा पाय दुखत असल्याने जरा लंगडत चालला होता पण 'हसीन साथी आणि दिलकश नजारा' मग कुठला रसिक सुजलेल्या पायाकडे लक्ष देईल ? समीरही याला अपवाद नव्हता.
सायंकाळी शेजारच्या थियेटरमधील सांस्कृतिक कार्यक्रम पाहून दोघेही रूमवर परतले. हॉटेलच्या स्टाफने त्यांची खोली सुगंधित फुलांनी छान सजवली होती. पुढचे बरेचसे वर्णन 'सुज्ञ्नास सांगणे नलगे' असल्यामुळे ते टाळून पुढे जावू या.
रात्रीचा सुमारे एकच सुमार असावा. दोघेही गाढ झोपेत होते. अशातच समीरला अचानक जाग आली, छातीमध्ये दुखत होते, दरदरून घाम आला होता आणि श्वासाला त्रास होत होत. दम लागला होता. कसेबसे त्याने गाढ झोपलेल्या स्मिताला हलवून उठवले. समीरची अशी ही अवस्था पाहून स्मिताच्या पोटात खड्डाच पडल्यासारखे झाले, काय करावे तेच तिला कळेना. पटकन तिने हॉटेल रिसेप्शनला फोन केला आणि समीरच्या शेजारी धावली. समीरला इतका दम लागला होता की त्याला धड बोलताही येत नव्हते. तेव्हड्यात हॉस्पिटलचे दोन सेवक तेथे येवून पोचले. त्यांना परिस्थितीच्या गांभीर्याची कल्पना आली व त्यांनी भराभर मदतीसाठी फोन केले. पाच मिनिटातच चौघांनी अक्षरशः समीरला उचलून लॉबीमध्ये आणले. तोपर्यंत हॉटेलची कार तयारच होती.
"म्याडम,यांना पटकन हॉस्पिटलमध्ये हलवले पहिजे. जवळच बळी मेडिकल कॉलेजचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉस्पिटल आहे. आम्ही आमच्या सर्व पर्यटकांना तेथेच नेत असतो. आपल्याला काही काळजी करण्याचे कारण नाही." त्यातील एक जबाबदार वाटणारा माणूस स्मिताला सांगत होता. सर्वांच्या प्रयत्नांनी पुढच्या दहा मिनिटांतच आपला पेशंट हॉस्पिटलच्या तातडिक विभागामध्ये पोहोचलादेखील. लगेचच पुढील कार्यवाही सुरु झाली.
ड्युटीवरील डॉक्टर्स आणि सिस्टर्स पेशंटच्या सभोवती जमल्या.
प्रमुख डॉक्टरांनी सूचना द्यायला सुरवात केली.
"सिस्टर, बीपी, शुगर, व्हायटल्स चेक करा."
"सर, पल्स १४४, पण नियमित आहे, बीपी ८० सीस्टोलिक, एसपीओटू ७० आहे."
समीरच्या हृदयाचे ठोके फारच वेगात पडत होते आणि बीपी कमी होते आणि प्राणवायूची पातळी १०० ऐवजी ७० होती.
"ओटू सुरु करा. सिस्टर ईसीजी करा. मॉनिटर सुरु करा. आयव्ही लाईन सुरु करा, ल्यबसाठी ब्लड कलेक्ट करा. ब्लड ग्यसेस पाठवा."
"पेशंट स्टेबल होईपर्यंत आयसीयू मध्ये बेड साठी कळवा."
पुढील दहा मिनिटामध्ये समीरची बरीच स्थिरावली. बीपी आणि प्राणवायूची पातळी नॉर्मल रेंज मध्ये आली, दम बराच कमी झाला.
स्मिता एकटीच सुन्न होवून चाललेल्या हालचाली पाहत होती. नाही म्हणायला हॉटेलचा तो जबाबदार माणूस तिच्या सोबतीला थांबला होता.
अर्ध्या तासाने ड्युटीवरील प्रमुख डॉक्टरांनी स्मिताला त्यांच्या चेम्बरमध्ये बोलावून घेतले. सुदैवाने ते डॉक्टर भारतीयच होते.
"म्याडम, आपल्या पेशंटची तब्बेत गंभीर आहे. आम्ही सर्व प्रयत्न करतोच आहोत."
"पण त्यांना काय झाले आहे ?" स्मिता.
"आपल्या हजबंडना आमच्या वैद्यकीय भाषेमध्ये सांगायचे म्हणजे 'पल्मोनरी एम्बोलिझम' झाला आहे. त्यांच्या पायामधील अशुद्ध रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गाठ तयार झाली होती ती गाठ तेथून निसटून रक्ताभिसरणाद्वारे त्यांच्या हृदयाच्या उजव्या कप्प्यात पोचली व तेथून ती फुफ्फुसाकडे जाणार्या मुख्य रक्तवाहिनीमध्ये जावून अडकली आहे. त्यामुळे त्यांच्या फुफ्फुसातील रक्ताभिसरण काही अंशतः थांबले आहे. आत्ता त्यांची तब्बेत थोडी बरी आहे. तुम्ही त्यांच्याशी जावून बोलू शकता."
आपल्या शरीरामधील रुधिराभिसरण संस्था ही एक हवाबंद व्यवस्था, सिस्टीम, असते. हृदयातून संपूर्ण शरीराकडे आणि फुफ्फुसाकडे रक्त घेवून बाहेर निघणार्या रोहिणी, केशवाहिन्या आणि आणि पुन्हा हृदयाकडे माघारी जाणार्या नीला याच्यामुळे ही व्यवस्था तयार झालेली असते. या व्यवस्थेमध्ये छेद अथवा पंक्चर झाल्यास रक्त बाहेर येते, रक्तस्त्राव सुरु होतो. हा थांबविण्यासाठी हे रक्त त्या छेदाभोवती गोठते आणि तो छेद बंद होतो. या गोठलेल्या रक्ताच्या गुठळीला थ्रोम्बस असे म्हणतात. रक्तातील काही घटक (फ्यक्टर्स ) या घोटण्यासाठी मदत करतात. दूरवरच्या प्रवासामध्ये खुपवेळ पाय न हलविता बसले गेल्यास पायांतील नीलामध्ये अशी गुठळी तयार होते त्याला आम्ही डीप व्हेन थ्रोम्बोसीस ( DVT ) असे म्हणतो. हि गुठळी निलेला चिकटलेली असते. पण कधीकधी ती मोकळी सुटते आणि मग बंदुकीच्या गोळीप्रमाणे रक्तप्रवाहामध्ये वाहत जावून हृदयाच्या उजव्या कप्प्यात येते व नंतर फुफ्फुसामध्ये जावून तेथील रोहिणीमध्ये जावून अडकते आणि फुफ्फुसाचा रक्तपुरवठा बंद करते,फुफ्फुसाचे रक्त शुद्धीचे कार्य थांबते आणि जर दोन्ही फुफ्फुसांना जाणारी मुख्य रक्तवाहिनी बंद झाली तर माणूस तत्काळ रक्ताभिसरण बंद होवून मृत होतो. काही जनुकीय दोषांमुळे अथवा इतर काही कारणांमुळे काही व्यक्तींमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याची प्रवृत्ती जास्त आढळते. समीरमध्ये कदाचित असा जनुकीय दोष असावा आणि विमानप्रवासामुळे तो आणखीनच वाढल्यामुळे त्याच्या पायात रक्ताची गुठळी तयार झाली असावी.
"पण आत्ता यांना पुढे काय ट्रीटमेंट असणार आहे." घाबरलेली स्मिता विचारत होती.
"आम्ही हॉस्पिटलच्या हृदयरोग विशेषज्ञ डॉक्टरांना बोलावले आहे. ते लवकरच येथे येतील. पेशंटची टूडी ईको आणि कलर डॉपलर तपासणी करतील. त्यातून पल्मनरी इम्बोलीझमचे निदान निश्चित झाले कि पुढील उपचारांची दिशा स्पष्ट होईल. आम्ही त्यांना रक्त पातळ होण्यासाठी हेप्यरिन नावाचे औषध सुरु केले आहे."
याठिकाणी सोनोग्राफी या तंत्राविषयी थोडेसे समजून घेणे आवश्यक आहे. यामध्ये इजा न करणारा अतिशय जास्त कंपनाच्या ध्वनिलहरी वापरल्या जातात. आपला कान २०००० कंपनापर्यंत ऐकू शकतो पण येथे २० लाख कंपने असलेला ध्वनी वापरतात. एक छोटासा स्फटिक अशी कंपने तयार करून शरीरामध्ये सोडतो. ही कंपने निरनिराळ्या पेशींमधून जाताना त्यांच्या कंपनसंख्येमध्ये पेशींच्या घनतेप्रमाणे बदल होतो. हा बदलेल्या ध्वनीचा प्रतिध्वनी पुन्हा तोच स्फटिक पकडतो आणि संगणकाला देतो. संगणकाच्या पडद्यावर अनेक बिंदूंची एक रेषा तयार होते. प्रत्येक बिंदूची प्रकाशमानता कंपनसंख्येनुसार ठरते. अशा अनेक रेषा भरभर एकापुढे एक मांडल्या तर एक द्विमिती चित्र तयार होते. समजा छातीवर हे यंत्र ठेवले तर आतील हृदयाचे बरहुकुम चित्र बाहेर दिसते. अशी अनेक चित्रे भरभर पहिली तर चित्रपटांच्या तत्वाप्रमाणे हलणारे चित्र दिसते व आपण हृदयाच्या आत होणार्या हालचाली, झडपांची हालचाल, आणि रक्ताची गाठ देखील पाहू शकतो. गर्भवती स्त्रीच्या पोटात जांभई देणारे बालक आपण संगणकाच्या पडद्यावर पाहू शकतो.
पुढच्या दहा मिनिटांतच हृदयरोगतज्ञ तेथे आले. त्यांनी समीरची टूडी ईको टेस्ट केली.
स्मिता शेजारीच उभी होती. तिला बाहेर बोलावून ते म्हणाले,
"म्याडम, आपल्या मिस्टरांच्या हृदयामध्ये एक मोठी रक्ताची गाठ आहे व प्रत्येक ठोक्याबरोबर ती पुढेमागे हलते आहे. एरवी आम्ही रक्ताची गाठ विरघळण्याचे खास इंजेक्शन देत असतो पण यांच्या बाबतीमध्ये तेव्हडा वेळ नाही. ताबडतोब ओपन हार्ट सर्जरी करून ती गाठ काढावी लागेल. मी ती सर्व व्यवस्था तांतडीने करण्याच्या सूचना देत आहे."
बाहेर एव्हडे बोलणे चालूच होते तेव्हड्यात एक सिस्टर पळतच आली,
"सर, ही ह्यज अरेस्टेड !"
बोलणे तसेच ठेवून सर्व जण आत पळाले. पुढील दहा मिनिटे सर्व डॉक्टरांच्या प्रयत्नांना दाद न देता समीरने स्मिताचा आणि इहलोकाचा निरोप घेतला.
डोके सुन्न झाले. केव्हडा मोठा अन्याय केला होता देवाने बिचार्या स्मितावर ! क्षणभर श्री. तात्याराव सावरकरांच्या 'माणसाचा देव आणि विश्वाचा देव' या धड्याची आठवण झाली.
जशी संकटे थव्याने येतात असे म्हणतात ना तसेच एखाद्या आजाराचा एखादा पेशंट आला की त्याच आजाराचे आणखी अनेक पेशंट येतात हा अनुभव मला आणि माझ्या अनेक मित्रांना अनेकदा आलाय. पुढच्याच महिन्यातली गोष्ट…
माझे एक पेशंट आणि मित्र श्री सुनील झगडे एक पेशंट घेवून आले.
"डॉक्टर, हे माझे मित्र, शिवाजीरावअण्णा पाटील. मोठ्ठे पुढारी आहेत. संपूर्ण महाराष्ट्राच्या प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आहेत. दोनतीन दिवस खूप दम लागतोय म्हणतात. म्हणून आपल्याकडे कन्सल्ट करण्यासाठी घेवून आलोय." झगद्यांनी प्रास्ताविक केले.
पांढर्या शुभ्र धोतर, शर्ट आणि गांधी टोपीधारी शिवाजीराव चांगले सहा फुट धिप्पाड आणि भारदस्त व्यक्तिमत्व. नेमकीच त्या दिवशी लिफ्ट बंद असल्यामुळे एक जिना चढून वर आल्यामुळे शिवाजीरावांना चांगलाच दम लागला होता.नाडीचे ठोके खूपच जलद पडत होते. बोटाला लावलेल्या पल्स ओक्सिजेन मीटरवर रीडिंग होते फक्त ८०% ! बीपी मात्र नॉर्मल होते. ईसीजी दाखवत होता की अण्णांच्या उजव्या हृदयावर खूपच ताण आला होता. सर्व लक्षणे दाखवत होती कि अण्णांना पल्मोनरी एम्बोलीझम झाला होता.
"अण्णा, हा जो दम लागलेला आहे तो दाखवतोय की आपल्याला हॉस्पिटलमध्ये राहावे लागेल."
"मला त्रासही खूपच आहे. जे काय करायचेय ते पटकन करा." अण्णांना परिस्थितीच्या गांभीर्याची बहुदा कल्पना आली होती.
मी तांतडीने रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख आणि माझे वर्गमित्र डॉक्टर परवेझ ग्रँट यांना फोन केला.
पुढील अर्ध्या तासात अन्न रुबिमध्ये पोचले. परवेझ सरांनी सर्व व्यवस्था करूनच ठेवली होती. सुदैवाने दुपारची वेळ असल्याने हॉस्पिटलचे सर्व विभाग कार्यरत होते. पुढील अर्ध्या तासात अण्णांच्या फुफ्फुसाचा सिटी स्कॅन आणि सिटी अँजिओग्राफी झाली. अँजिओग्राफीमध्ये दाखवत होते की अण्णांच्या मुख्य पल्मोनरी आर्टरीमध्ये रक्ताची एक मोठ्ठी गाठ अडकली होती. आजूबाजूने थोडेबहुत रक्त पुढे फुफ्फुसामध्ये जात होते आणि केवळ त्याचमुळे अण्णा तग धरून होते. मी इतर पेशंट घरी पाठवून परवेझ सरांजवळच थांबलो होतो.
"सुरेश, या पेशंटला थ्रोम्बोलाईज करावे लागेल." परवेझ सर.
"मलाही तसेच वाटते. पटकन करूया." मी.
आम्ही झगद्यांना आणि पेशंटला आजाराची कलपना दिली आणि अण्णांना कॅथलॅबमध्ये शिफ्ट केले.
अण्णांना झोपेचे इंजेक्शन दिले आणि त्यांच्या मांडीतून एक कॅथेटर नावाची छोटी नळी हृदयातून पुढे सरकवून त्या अडकलेल्या गाठीपर्यंत सरकवली आणि तिथेच स्थिर केली. पुढील ४८ तास त्या कॅथेटरद्वारे त्या गाठीला स्ट्रेप्टोकायनेज नावाच्या एका गाठ विरघळवू शकणार्या औषधाचा हळूहळू अभिषेक घडवला. स्ट्रेप्टोकायनेजने आपले काम चोख बजावले. ती गाठ पूर्ण विरघळली आणि फुफ्फुसाचा रक्त पुरवठा पूर्ववत झाला.
स्ट्रेप्टोकायनेज या वंडरड्रगचा शोधही योगायोगानेच लागला. डॉ. टिलेट्ट यांना स्वतःची दाढी करतांना एक पांढराशुभ्र ज्वारीच्या दाण्यासारखा फोड दिसला. त्यांनी त्याला धक्का न लावता दाढी केली. दुसर्या दिवशी त्या फोडामधील दुधासारख्या द्रवाची जागा आता पाण्यासारख्या द्रवाने घेतली होती. त्यांच्या मेंदूतील ट्यूब पेटली. याचा अर्थ या फोडातील बॅक्टेरियांनी त्या पांढर्या पसचे पचन केले होते ! त्यांनी ते बॅक्टेरिया शोधले आणि ते पाचक औषधदेखील जे बॅक्टेरिया शरीरामध्ये संसर्ग तयार करताना एक शस्त्र म्हणून वापरतात. हेच ते स्ट्रेप्टोकायनेज होय ! हे औषध हार्ट ॲटॅक आणि ब्रेन ॲटॅक मध्ये देखील वापरले जाते.
अण्णांचा दम कोठल्याकोठे पळून गेला. पोटाच्या सोनोग्राफीमध्ये त्यांना पोटातील व्हेन्समध्ये गुठळ्या झालेले दिसले होते. पुन्हा अशा गाठी हृदयापर्यंत जावू नयेत आणि गेल्याच तर त्यांना वाटेतच अडवण्यासाठी एक गाळणी, फिल्टर, अण्णांच्या पायाकडून हृदयाकडे जाणार्या महनिलेमध्ये बसवण्यात आला. आज या गोष्टीला तेरा वर्षे होवून गेलीत. अण्णांची तब्बेत ठणठणीत आहे. फिल्टर चोक होवू नये म्हणून रक्त पातळ होण्याचे औषध नियमितपणे घेत असतात.
वरील घटनेनंतर सहा महिन्यांनंतर अण्णांनी नागपूर येथे अ. भा. प्राथमिक शिक्षक संघटना अधिवेशनमध्ये तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री ना. शरदराव पवार यांच्या हस्ते दहा हजार रुपये देवून व 'प्रबोधन पुरस्कार' देवून कृतज्ञता व्यक्त केली. अर्थात मीही ते पैसे 'इदं न मम' म्हणून मुख्यमंत्री निधीस दिले नसते तर आपणा सर्वांच्या दृष्टीने कृतघ्नच ठरलो असतो!
स्मिताबद्दल वाचून वाईट वाटले.
स्मिताबद्दल वाचून वाईट वाटले.
तुमची शैली एकदम मस्त आहे.
असेही होऊ शकते, याची कल्पनाच
असेही होऊ शकते, याची कल्पनाच नव्हती.
डॉक्टर.. कधी कधी छोट्या छोट्या बाबींकडे आपले दुर्लक्ष होते आणि असे काहीतरी गंभीर होऊन बसते.
आपल्या लेखात, सगळ्यांनी काय काय काळजी घ्यायला हवी याचे अप्रत्यक्ष मार्गदर्शन होते. आणि तेही सहज समजेल आणि लक्षात राहील, अश्या सोप्या भाषेत.
स्मिताचे एकून. --- टॅव्हल्स
स्मिताचे एकून.
---
टॅव्हल्स सॉक्स मिळतात ते घालून प्रवास केला की बरे वाटते. आता ज्यांना गुठळीच्या शक्य्ता ज्यास्त आहेत त्यांना किती उप्योगी असतील माहीत नाही पण मी नेहमी वापरते. मला थोडा फार त्रास होतो लांब प्रवासात पायाला. नक्की किती फायदा आहे माहीत नाही पण मला बरे वाटते लांब प्रवासात.
छान लेख .. स्मिता दुर्दैवी ..
छान लेख .. स्मिता दुर्दैवी ..
अशा मोठ्या प्रवासात दर १-२
अशा मोठ्या प्रवासात दर १-२ तासांनी जरा पाय मोकळे केले की हा धोका टळू शकतो का?
स्मिता खरच दुर्दैवी. वाइट वातलं तिच्याबद्दल वाचून.
वा अत्यन्त सुन्दर लेख.. आज
वा अत्यन्त सुन्दर लेख.. आज आपले दोन्हि लेख वाचायला मिळाले त्यामुळे खुप छान वाटत आहे..
खुप छान लेख. स्मिताबद्दल वाईट
खुप छान लेख. स्मिताबद्दल वाईट वाटले.
दूरवरच्या प्रवासामध्ये खुपवेळ पाय न हलविता बसले गेल्यास पायांतील नीलामध्ये अशी गुठळी तयार होते >>>
प्रवासात झोपुन राहिले तरी अशी गुठळी होऊ शकते का? १४-१५ तासांची फ्लाईट असेल तर ५-६ तास झोप होतेच ना.
डॉक्टर तुमचे लेख , कथा नेहमीच
डॉक्टर तुमचे लेख , कथा नेहमीच वाचनीय , माहीतीपर असतात , खुप खुप धन्यवाद !
मस्त लेख. तुमचे सगळे लेख आणि
मस्त लेख. तुमचे सगळे लेख आणि ब्लॉग सुद्धा वाचून काढला. फारच छान!!
अरेरे काय झालं हे? शब्दच
अरेरे काय झालं हे? शब्दच नसतील तिचे सांत्वन करायला.
थोडाफार असाच प्रसंग माझ्या सक्ख्या काकाबरोबर घडला ४ च दिवसांपूर्वी. आता धोका नाही पण अजून दवाखान्यातच आहे.
खूप दिवस तो डोकेदुखीची तक्रार करत होता. सीटी स्कॅन झालं, औषध्पाणी चालू होतंच यावर. खूप स्ट्रेसमुळे असं होतं हे डॉ. नी सांगितलं. त्यानंतर त्याला दम लागायला लागला जिने चढल्यावर वगैरे. असाच महिना गेल्यानंतर एक दिवशी सकाळी उठल्या उठल्या चक्कर आली, दोनदा उलटी झाली. चेहेरा वाकडा होऊन जीभ जड व्हायला लागली, हातपाय ताठरले... रिक्शात बसवणे मुश्कील झाले. पण कसेबसे वेळेत हॉस्पिट्लला पोचले. तर डॉ. नी ८०% तर वाचणार नाही असेच सांगितले. पण प्रयत्न करून पाहू म्हटले. तर अशीच रक्ताची गुठळी असल्याचे समजले. पुढे सगळे ते ईंजेक्शन देऊन विरघळवण्याचे प्रयत्न केले पण यश आले नाही. त्यामुळे मांडीतून कॅथेटर घालून तुम्ही म्हणता तसे सगळे पार पडले आणि काकाचा जीव वाचला.
तुम्ही डॉ. लोक आमच्यासाठी खरच देव असता.
डॉक्टरसर.... "कोमा"
डॉक्टरसर....
"कोमा" चित्रपटातील ऑपरेशन रुम आणि तेथील असह्य तणावाची स्थिती नजरेसमोर आली...."ताबडतोब ओपन हार्ट सर्जरी करून ती गाठ काढावी लागेल...." हे वाक्य ऐकताना त्या दुर्दैवी स्मिताच्या....जी केवळ २०-२१ वर्षाची युवती असेल त्यावेळी....ज्ञानात इतकीच भर पडली असेल की आपल्या नवर्याचे ऑपरेशन होणार आहे. त्यानंतर जे काही झाले ते तिने कसे सोसले असेल हे देवच जाणे.
लेखात एक माहिती आहे...."..खुपवेळ पाय न हलविता बसले गेल्यास पायांतील नीलामध्ये अशी गुठळी तयार होते त्याला आम्ही डीप व्हेन थ्रोम्बोसीस ( DVT ) असे म्हणतो...." ~ हे विमानप्रवासात शक्य आहे. पण माझ्यासारखी एखादी व्यक्ती जी निवृत्तीनंतर घरीच असते, तिला डीव्हीटीचा धोका होऊ शकतो का ? जनरली पहाटे ७-८ किलोमीटरचा 'वॉक' होतो....[ब्रिस्क नव्हे...नॉर्मल] .....तितक्यावरच हा धोका टळू शकतो ?
सिंडरेला +१
सिंडरेला +१
सिंडरेला +1
सिंडरेला +1
छान लेख. ंमामा, एवढी मोबिलिटी
छान लेख.
ंमामा, एवढी मोबिलिटी ़खूप झाली.
या वयात मोठ्या सर्जरीनंतर खूप वेळ हॉस्पिटलात झोपून रहाताना हा धोका संभवतो.
तुमच्या सर्जरीनंतर तुम्हाला हे गुठळ्या होऊ न देणारे लो मोलेक्युलर वेट हिपॅरीन दिले गेले असेल बहुतेक.
लहान लहान पण महागातल्या आधीच औषध भरून तयार (प्रिफिल्ड) सिरींजेस असतात.
बापरे.. स्मिताबद्दल वाचून
बापरे.. स्मिताबद्दल वाचून वाईट वाटले.
तुमची लिहिण्याची शैली आवडली.
पल्मोनरी एम्बॉलिझम आणि पल्मनरी हायपरटेन्शन यात काय फरक असतो? की या एकाच गोष्टीच्या दोन बाजू असतात?
काय लिहू? मला नेमके हेच झाले
काय लिहू? मला नेमके हेच झाले होते. पल्मनरी एंबॉलिझम! माझ्या शरीरात प्रोटीन सी ची जन्मजात डेफिशियन्सी असल्याने हा प्रकार झाला. त्यामुळे आता आयुष्यभर वॉर्फरिन घ्यावी लागत आहे.
प्रोटीन सी चा अभाव अनुवंशिक आहे व तो आईकडून माझ्यात आलेला असावा असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
त्या दिवशी भयानक वेदना झाल्या होत्या. गुरासारखा ओरडत होतो. गाठ अशीच पोटरीतून हृदयात आणि हृदयातून फुफ्फुसात फेकली गेली होती.
भरपूर चालणे, इतर व्यायाम व वॉर्फरिनचा नियमीत डोस ह्यातून हे टाळण्याची जबाबदारी आहे.
त्यामुळे आहारात लसूण, दालचिनी, सुंठ पावडर, हिंग, हळद ह्या सर्वाचा वापर केलेला बरा. मला हिरव्या भाज्या अधिक खाणे हानिकारक आहे (के व्हिटॅमीन असल्यामुळे).
डॉक्टर साहेब, तुमचे लेख सामान्य माणसाच्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाशी, म्हणजे प्रकृतीशी निगडीत असल्याने मुळातच त्यांचे महत्व वादातीत असते, त्यात तुमची लेखनशैलीही प्रभावी आहे. त्यामुळेच हा लेख वाचताना खरे तर मला स्वतःला झालेल्या व्याधीचे गांभीर्य अधिकच जाणवले व खिन्नता आली.
स्मिताबद्दल वाचून वाईट वाटले व असेही वाटले की केवळ दैव बलवत्तर म्हणून आपण त्या दिवशी बचावलो होतो.
व्हाईल ऑन धिस, मी आजारी असताना मला धीर देणार्या कैलास गायकवाड, विदिपा, सुप्रिया जाधव, दाद, दक्षिणा, रिया, परेश व इतर अनेक मायबोलीकरांचे आभार मानतो.
डॉक्टर साहेब आपण, इब्लिस, कैलासराव, साती अश्यांनी एक ऑनलाईन वैद्यकीय सल्ला कक्ष काढण्याची कल्पना मनात आली.
एका दुदैवी घटनेची माहिति,
एका दुदैवी घटनेची माहिति, फारच रंजक स्वरुपात मांडलेली.,लेखनशैली भन्नाट.
डॉक्टरीपेशाबद्दलचे बरेचसे गैरसमज अशा लेखांमुळे दूर व्हायला मदत होऊ शकेल.
(अन्यथा हल्ली जसे "पोलिसान्ना मित्र समजा" सारख्या मोहिमा काढाव्या लागतात, तसे डॉक्टरान्चेबाबतीतही होऊ घातले आहे असे माझे मत)
तुमचे असे लेख, त्याचे पुस्तक, वृत्तपत्रिय प्रसिद्धि असे झाले तर फार बरे होईल.
इथे अनुभव शेअर केल्याबद्द्ल धन्यवाद.
पोलिसांना मित्र समजा नशीब,'
पोलिसांना मित्र समजा
नशीब,' बी अवेअर ऑफ डॉग्ज ' आठवले नाही.
>>तुमचे असे लेख, त्याचे
>>तुमचे असे लेख, त्याचे पुस्तक, वृत्तपत्रिय प्रसिद्धि असे झाले तर फार बरे होईल.
+१
सिंडरेलाला अनुमोदन.
सिंडरेलाला अनुमोदन.
<डॉक्टर साहेब आपण, इब्लिस,
<डॉक्टर साहेब आपण, इब्लिस, कैलासराव, साती अश्यांनी एक ऑनलाईन वैद्यकीय सल्ला कक्ष काढण्याची कल्पना मनात आली. >> +१
स्मिताबद्दल खूप वाईट
स्मिताबद्दल खूप वाईट वाटले.
हा लेखही उत्तम.
मित्राचा मुलगा रुबीत आहे.
मित्राचा मुलगा रुबीत आहे. त्याला डॉ. शिंदेंबद्दल विचारले . त्याने भारावून जाऊन अतिशय आदरपूर्वक डॉ शिंदेंबद्दल सांगितले. डॉ. महोदयांनी प्रॅक्टीस कमी केली आहे असे कलले. त्यांचे चिरंजीव आता प्रॅक्टीस करतात असे कळले. डॉक्तरमहोदयांना विनन्ती की त्यांना ओघवत्या लेखनाचे अंग आहे त्याचे चीज करून वैद्यकीय लिखाण करावजदेजसे डॉ ह वि सरदेसाई जनरल आरोग्याबद्दल करीत असतात तसे.
स्मिताबद्दल वाईट वाटले. पण
स्मिताबद्दल वाईट वाटले. पण लेखामुळे अमुल्य माहिती समजली
बेफिकीर, तुमची कृतज्ञता पोचतेय, काळजी घ्या.
स्मिताबद्दल वाईट वाटले. खुप
स्मिताबद्दल वाईट वाटले.
खुप सोप्या शब्दात वर्णन करता तुम्ही. एखादे पुस्तक लिहिले आहे का? नसले तर मनावर घ्या, लिहायचं.
अतिशय उपयुक्त माहिती & सुंदर
अतिशय उपयुक्त माहिती & सुंदर लेख
स्मिताबद्दल वाईट
स्मिताबद्दल वाईट वाटले..:(
डॉक्टर, तुमच्या लेखाची भाषा इतकी ओघवती असते कि आपण एखादा नवीन क्लिष्ट विषय वाचतोय असं जाणवतच नाही. उलट लेख पुर्ण वाचुन कधी संपला तेहि कळत नाही. बरीच माहीती मिळते.
ते पुस्तकाचं खरंच मनावर घ्याच!!
स्मिताबद्दल खूप वाईट
स्मिताबद्दल खूप वाईट वाटले.
हा लेखही उत्तम.
नेहमी प्रमाणेच उत्तम लेखन
नेहमी प्रमाणेच उत्तम लेखन
खुपच महत्वाची माहिती.
खुपच महत्वाची माहिती. स्मिताच वाचुन खुपच वाइट वाटल. शत्रुवरही अशी वेळ येउ नये. नुकतेच मी या आजाराशी झुंज दिली.. मागच्याच महिन्यात. आता ठीक आहे पण आठवल की अंगावर काटा येतो. त्याच अस झाल कि मला खुप दिवसापासुन व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास आहे त्यामुळे नेहमीच पाय दुखत असतात . २००९ मधे माझी एन्जीओप्लेस्टी पण झालीय..नियमित चेक-अप असतच. रक्त पातळ रहाण्यासाठी औषध चालुच आहे.. पण ५-६ महिन्या पासुन माझा डावा पाय खुपच दुखायचा. मी सतत डॉ ना सांगायची. ते मला इ. व्हिटमिनच्या गोळ्या घ्यायला सांगायचे. पण दुखण काहीच कमी नाही. उलट वाढतच गेल.. पाय पुढे टाकताच येइना. सकाळच फिरण तर राहो पण घरातहि काहीच करता येइना. डॉ. नी कलर-डॉपलर करायला सांगितल तेव्हा कळल कि टिबीयल व्हेन व काफ व्हेन मधे थ्रंबोसिस आहे. त्यानंतर ती ट्रीटमेंट. ' आपुले मरण पाहिले मी डोळा''. असो.
मला डॉना विचारावस वाटत कि रक्त पातळ रहाण्याच्या गोळ्या चालु असतांनाहि हा त्रास का व्हावा?
आता मला ६ महिने अॅसिट्रॉम १ एम. जी. चालु आहे. आपण मला योग्य सल्ला द्यावा ही विनंती. हा त्रास परत होउ नये म्हणुन काय काळजी घ्यावी कळवाल. घन्यवाद.
Pages