ॲडम, इव्ह आणि सफरचंद … पण किंचितसे किडलेले !!
"डॉक्टर, गेले सहा दिवस मी आजारी आहे."
ती सुमारे वीस वर्षांपूर्वीची सोमवारची सकाळ होती. नाना देशमुख माझ्या समोर बसून त्याच्या तब्ब्येतीविषयी मला सांगत होता. नाना म्हणजे एक आकर्षक व्यक्तिमत्व होते. वयाची चाळीशी नुकतीच गाठलेल्या उंच आणि धिप्पाड नानाला उत्तमोत्तम ब्र्यांडेड वस्त्राभूषणांची मनापासून आवड ! तो क्लिनिकमध्ये येताच सर्वांच्या नजरा त्याच्याकडे वळत असत. तरुण वयातच नानाने घरचा फॅमिली व्यवसाय आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत वाढवला होता. सतत परदेश भ्रमणामुळे नाना फार थोड्या वेळ घरच्यांच्या वाटेला येत असे. नानाचे कुटुंबीय माझे पेशंट आणि जवळचे स्नेही देखील होते. नानाच्या आई एक प्रसिध्द लेखक आणि स्त्रीसुधारक होत्या.
"नाना, नेमके काय होतंय आपल्याला ? मला तर चांगले तंदुरस्त दिसताय !" मी.
"सर, खरे आहे, मी शक्यतो आजारी पडतच नाही, आणि आजारी पडणे मला परवडत देखील नाही. कधी मधी चुकून आजारी पडलो तरी दोन दिवसात परत कामाला लागतो. पण या वेळेला मात्र जर जास्तच गडबड आहे. रोज थंडी वाजून ताप येतो आणि संपूर्ण अंग जबरदस्त दुखते आहे. दुसरे म्हणजे लघवी करताना देखील खूप जळजळ होते. दोनतीन दिवस क्रोसिन घेवून काम केले पण आता सहन होत नाही. आईसाहेबांनी काढले तुमच्याकडे जायचे फर्मान, म्हणून आलोय. फटाफट औषध द्या आणि बरे करून टाका. फार कामे आडलीत हो !"
ताप म्हणजे आपल्या शरीराचा मित्रच जणू ! ताप म्हणजे आपल्या शरीरात जंतू रुपी चोर शिरल्याचा जणू अलार्मच ! शरीराला कोठल्या तरी जंतूंचा संसर्ग झाला की ताप येतो. शरीराचे तापमान वाढले की होणारी लघवी देखील गरम असते आणि पण इतक्या जास्त प्रमाणात लघवीची जळजळ म्हणजे मूत्रमार्गात संसर्गाची सूचनाच तर नव्हे ना. आम्हा डॉक्टरांची हार्डडिस्क लगेच फिरू लागते. जेंव्हा ताप येतो तेंव्हा त्याचा शरीरात कोठेतरी ठिकाणा असतो, सोर्स किंवा 'पोर्टल ऑफ एन्ट्री' असतो. आम्ही पेशंटला प्रश्न विचारून आणि त्याची तपासणी करून ह्या तापाचा ठिकाणा शोधत असतो आणि त्यालाच आपण निदान करणे असे म्हणतो. नानाच्या तक्रारींवरून त्याला मूत्रमार्गात संसर्ग किंवा 'इन्फेक्शन' झाले असावे असा प्राथमिक अंदाज मी केला होता. तसे म्हटले तर युरीन इन्फ़ेक्शन्स ही स्त्रीयांमध्ये जास्त वेळा आढळतात कारण त्यांचा मूत्रमार्ग लांबीला अगदी छोटा असतो व जंतू त्यात सहज प्रवेश करू शकतात. आपल्या मुत्रामार्गामध्ये गोब्लेट सेल नावाच्या विशिष्ठ पेशी असतात ज्या एस-आयजीए नावाच्या ॲन्टीबॉडीज तयार करतात ज्या जंतूंना मूत्रमार्ग भेदून शरीरात प्रवेश करण्यापूर्वीच नष्ट करतात. म्हणून पुरुषांमध्ये संसर्ग निर्माण होण्यासाठी जास्त ताकतवर जंतू असणे आवश्यक असते. मधुमेह नसलेल्या व्यक्तीमध्ये असा संसर्ग विवाहबाह्य आणि असुरक्षित यौनसंबंधातूनच शक्य असतो. पण नानाला असा नाजूक प्रश्न विचारण्यापूर्वी युरीन इन्फ़ेक्शनचे निदान कन्फर्म करणे आवश्यक होते.
"हे पहा, केवळ शारीरिक तपासणीवरून तुझ्या तापाचे नेमके निदान होत नाहीये. आपल्याला काही चाचण्या कराव्या लागतील." मी.
पेशंट माझ्या चेंबरमध्ये शिरण्यापूर्वी माझा स्टाफ त्याच्या युरीनचा नमुना तपासण्यासाठी घेत असतो. नानाने देखील त्याची युरीन तपासण्यासाठी दिली होती.
"सर, मिस्टर देशमुखांचा युरीन रिपोर्ट ठेवते. " स्टाफ.
एखाद्या अधाशाप्रमाणे मी तिच्या हातातील रिपोर्ट जवळजवळ हिसकावूनच घेतला आणि त्यावरून नजर फिरवली.
"तुझा रिपोर्ट मी पाहतो आहे आणि त्यात दिसतेय की तुला जोरदार युरीन इन्फेक्शन आहे. युरीनमध्ये एरवी चार पाच 'पस सेल्स' असतात पण येथे तर शंभर पेक्षाही जास्त दिसत आहेत. हेच दिसतेय तुझ्या तापाचे कारण !"
नानाने डोळे वर उचलून माझ्याकडे पाहिले आणि मान हलवली.
"नाना, तू रागावणार नसशील तर मी तुला एक खाजगी प्रश्न विचारु इच्छितो."
नाना खुर्चीत थोडा सावरून बसला.
"अहो डॉक्टर, मला लाजवू नका. अगदी बिनधास्त विचारा."
"असे इन्फेक्शन होण्याची अनेक करणे असू शकतात पण असुरक्षित बाहेरचा संबंध हे एक महत्वाचे कारण आहे." इतकेच बोलून मी नानाची प्रतिक्रिया पाहण्यासाठी थोडा थांबलो.
नानाच्या चेहेर्यावरचे भाव भरभर बदललेले मला दिसले. तो जरा भांभांवल्यासारखा झाला.
"मी समजू शकतो. मला केवळ हो किंवा नाही मध्ये उत्तर दिलेस तरी चालेल. आणि हो, ही चर्चा शंभर टक्के फक्त आपल्या दोघांमध्येच राहणार आहे." नानाला उत्तरादाखल थोडा वेळ देण्यासाठी मी बोलत होतो. "उत्तर दिलेच पाहिजे असेही नाही."
"नाही सर, तुम्ही विचारलेत त्यात काही चूक नाही. तुम्ही म्हणता तसा प्रसंग सुमारे पंधरा दिवसांपूर्वी मी सिंगापूरमध्ये असताना एका बिझिनेस पार्टीनंतर घडला होता. पण ते सर्व अगदी प्रोफेशनल म्हणजे 'हाय प्रोफायील्ड' होते." मान खाली घालून नाना बोलत होता, " पण सर तुम्हाला नक्की वाटतेय कि हेच कारण असेल असे."
मी केवळ संमतीदर्शक मान हलवली.
नाना आत्ता चांगलाच हादरला होता. चेहेरा चिंतातूर झाल्याचे स्पष्ट दिसत होते. बारात वेळ शांततेत गेल्यानंतर शब्द गोळा करून तो पुन्हा बोलू लागला,"हे सर्व त्या मित्रांमुळे घडलेय. मी त्यांच्यावर विश्वासच ठेवायला नको होता. झाले ते झाले पण आता पुढे काय ? मी यातून बरा होईन का ? हा कसला आजार आहे ? हा एचआयव्ही तर नाही ना ? …. "
त्याला पुढे बोलवेना. कपाळावर घर्मबिंदू आणि डोळ्यात अश्रू दिसत होते. नानाला धीर देण्याची गरज मला प्रकर्षाने जाणवली. अभावितपणे मी खुर्चीतून उठून नानाजवल जावून त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि समजावण्याच्या सुरात म्हणालो," नाना, घाबरू नकोस. चुका सर्वांकडून होतात. तू कांही पहिला माणूस नाहीस अशी चूक करणारा. असे होते कधीकधी ! तू तसा नशीबवान आहेस की आता सर्व यौनसंबंधित आजारांना औषध आहे, अगदी एचआयव्हीला देखील ! सो चीअर अप. आपण तुला उपचार सुरु करूयात म्हणजे दोनतीन दिवसात तू बरा होशील. तुझ्या आजाराचे नेमके निदान करण्यासाठी आपल्याला आणखी काही टेस्ट्स कराव्या लागतील. मग पाहू. मला तरी चितेचे काही कारण दिसत नाही बी अ ब्रेव्ह मॅन !"
"सर, मला फार भीती वाटतेय. माझ्या घरी समजले तर …" दबलेल्या आवाजात म्हणाला.
"हे बघ, स्वतःला दोषी समजू नकोस. आणि आपल्या दोघांतील हे संभाषण आपल्या दोघांतच राहील याची खात्री बाळग. आमच्या दृष्टीने या गोष्टी व्यावसायिक सिक्रेट्स आहेत व त्या गुप्त ठेवणे मला कायद्याने बन्धनकारक देखील आहे."
"सर, आणखी एक विनंती, या सर्व आजारांची थोडी माहिती द्याल तर बरे होईल. तेव्हडाच आणखी धीर येईल मला."
"हे बघ, पहिला आजार आहे गनोर्हीया. मराठीमध्ये 'परमा' म्हणतात. हे जंतू संपूर्ण मूत्रमार्गातील अन्तःस्तराला सूज आणतात, आणि 'पू' तयार करतात. लघवीवाटे भरपूर पू जातो. पेनिसिलिन ह्या उत्तम औषधाने पूर्ण बरा होतो. दुसरा आजार आहे सिफिलिस अथवा 'गरमी'. हा जर किचकट आणि योग्य उपचार न घेतल्यास अनेक वर्षे शरीरामध्ये गुप्तपणे राहणारा आजार आहे. म्हणूनच त्याला गुप्त रोग म्हणतात. पण हा आजारदेखील पेनिसिलिन मुळे संपूर्ण बरा होतो. हा आजार त्याच्या गुप्त अवस्थेमध्ये व्हीडीआरएल ( VDRL ) ही चाचणी करून ओळखता येतो. म्हणून ही चाचणी नोकरीपूर्व अथवा शरीरविमा उतरविण्यापूर्वी किंवा अनेक देशामध्ये प्रवेश करण्यापूर्वी करणे आवश्यक असते. तिसरा आणि थोडा अधिक काळजीचा आजार म्हणजे एचआयव्ही अथवा एडस् ! काळजी अशासाठी कि हा आजार औषधांमुळे नियंत्रणाखाली राहतो पण बरा होत नाही, आयुष्यभर औषध घ्यावे लागते. भविष्यकाळात एखादे रामबाण औषध निघेल कदाचित ! हा आजार काही स्पेशल चाचण्यांनी संसर्ग झाल्यापासून एक आठवड्यात समजू शकतो पण शंभर टक्के निर्विवाद पणे खात्री करण्यासाठी या आजाराचा 'विंडो पिरीयड' म्हणजे सहा महिन्यापर्यंत एचआयव्ही टेस्ट पॉझीटिव्ह तर येत नाही ना याची वाट पहावी लागते आणि मग सुटकेचा निश्वास !"
इतका वेळ माझे भाषण मन लावून ऐकणार्या नानाने एक मोठा श्वास घेतला आणि माझा हात हलकासा दाबत तो म्हणाला,"सर, चूक झाली खरी पण प्लीज आता मला यातून बाहेर काढा."
"मी सर्व चाचण्यांची व्यवस्था करतो. तू धीर धर आणि आलेल्या प्रसंगाला धीराने समोर जा. विश्वास ठेव, गॉड इज व्हेरी काईंड !"
अपेक्षिल्याप्रमाणे दोनच दिवसात नाना बरा होवून कामालाही लागला. पुढे त्याच्या सर्व चाचण्याही निगेटिव्ह आल्या. ते सहा महिने त्याने कसे घालविले असतील ते त्यालाच माहित ! मेडिकल कॉलेजमधील डॉ. रानडे नावाचे एक गोरेपान, सतत तोंडात पानाचा तोबरा असलेले, अतिशय चावट आणि आणि म्हणूनच विद्यार्थीप्रिय असलेले रंगेल गुप्तरोगतज्ञ शिक्षक आम्हाला सांगायचे त्याची आठवण झाली, "सिंगापूरला गेले, परमानंद झाला, पुण्याला आले, आनंद संपला आणि परमा मात्र राहिला."
एका डॉक्टरच्या जीवनामध्ये नानासारखे असे अनेक पेशंट भेटतात. सदाशिव सातपुते हा असाच एक मजेदार पेशंट! वयाची पन्नाशी गाठलेला, थोडासा तुंदिलतनु आणि बुटका असा हा सातपुते कोठल्याशा कोलेजात अर्थशास्त्र शिकवत असे. पहिल्या वेळेसच जेंव्हा तो माझ्या क्लिनिक मध्ये शिरला ते एक भली मोठ्ठी फाईल आपल्या दोन्ही हातात धरूनच ! त्या फाईलमध्ये अनेक मेडिकल रिपोर्ट्स, अनेक डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन्स, एक्सरेज, आणि वर्तमानपत्रांची कात्रणे होती. हल्लीचे पेशंटस् नेटवर गुगल करून काढलेले 'प्रिंटऔटस्'चा गठ्ठा घेवून येतात काहीसा तसाच ! एकतर मी ते सर्व रिपोर्ट्स मनःपूर्वक पाहावेत अशी त्यांची माफक अपेक्षा असते. विशेषतः सीसीटीव्ही पडद्यावर बाहेरील वेटिंग हॉलमधील गर्दी दिसत असतांना असे गाडाभर रिपोर्ट घेवून येणारे पेशंट पाहिले कि पोटात गोळा आल्याशिवाय राहत नाही. सातपुते हा असाच एक 'पोहोचलेला' पेशंट होता. त्याच्या रिपोर्टानुसार त्याला हाय ब्लड प्रेशर, मधुमेह, स्थूलत्व आणि हयाटस हर्निया असे अनेक आजार होते. कालांतराने इतर सर्व डॉक्टरांना बायबाय करून सातपुते माझा नियमित पेशंट झाला. सातपुतेला वाचनाचे वेड होते आणि हळूहळू त्याला निसर्गोपचारमध्ये विशेष रुची निर्माण झाली. काही वर्षांतच त्याने कोठूनतरी नेचरोपथीच्या डॉक्टरकीची पेपरडिग्री देखील मिळवली. मला तो दिवस चांगलाच आठवतो जेंव्हा त्याने ही बातमी मला सांगितली आणि 'डॉ.' ही बिरुदावली असलेले स्वतःच्या नावाचे व्हिजिटिंग कार्ड मोठया अभिमानाने माझ्या हातात दिले होते. याही पुढे जावून त्याने भारतीय मसाज थेरपी या विषयाचा अधिक अभ्यास करून त्यात विशेष प्राविण्य मिळवले.
तर 'श्री' वरून 'डॉ' पर्यंत प्रवास केलेले सातपुते एकदा मला म्हणाले,"सर, एक विनंती आहे."
"बोला,डॉक्टर !" मी.
"मी या वैद्यकीय क्षेत्रामध्ये जर नवखाच आहे. तुमच्या काही पेशंटपैकी कोणास नॅचरोपथीचा उपचार हवा असेल तर कृपया माझे नाव लक्ष्यात असू देत. तुमच्याकडून आलेल्या पेशंटचे मी पैसे सुद्धा घेणार नाही. काय आहे ना की मदर नेचरचा प्रसार करणे हेच माझे उद्दिष्ट आहे."
आदिवासी भागातील थोडेफार शिकलेले पण त्यांचा पारंपारिक वेश परिधान केलेले असे एक ग्रृहस्थ मला आठवले. माझ्याकडे तपासणी करून फीचे पैसे वगैरे देवून झाल्यानंतर जातांना हळूच परत आले होते आणि दबलेल्या आवाजात मला म्हणाले होते, "डॉक्टरसाब, आपकी दवासे तो मै जरूर ठीक हो जावूंगा लेकिन मेरे पास भी कूच ऐसी दवा है जो मै आपको बताना चाहता हुं. ये पहाडकी वनस्पती 'शिलाजित' है, अगर आपके किसी पेशंटको बदन या लीन्गमे कमजोरी, बच्चा न होना, माथेपर बालोन्का कम होना, वजन कम होना, या ब्लड प्रेशर , डायबिटीस, फेफरे या ऐसी कोई भी बिमारी हो तो यह दवा काम करती है. आप शायद विश्वास नही करेंगे लेकिन मेरी यह डायरी आप पढो जिसमे जीन लोगोंको फायदा हुवा उनके अभिप्राय लिखे है." असे म्हणून त्याने एक डायरी माझ्यापुढे धरली. मी वेळेच्या अभावाचे कारण सांगून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केल्यावरही त्याने चिकाटी सोडली नाही. तुमच्या काही पेशंटचे पत्ते किवा फोन नंबर तरी द्या असा हट्टच धरून बसला. तुम्ही पुन्हा या मग पाहू असे सांगून मी त्याची बोळवण केली. सातपुत्यांनीही आज जवळपास तशीच विनंती केली होती पण निदान सातपुतेकडे पाठविल्याने पेशंटचे नुकसान तरी होणार नव्हते, कदाचित फायदा देखील झाला असता. स्ट्रोकमुळे पॅरालीसिस झालेले रुग्णांना नाहीतरी मालिश केल्याने फायदा होतो मग बिचार्या सातपुतेचा फायदा झाला तर काय हरकत असा विचार करून मी त्यांना होकारही दिला होता. काही दिवसांनंतर सातपुते यांनी 'आरोग्यात आणि आजारात मसाजोपचार' असे पुस्तकही लिहून स्वतःच प्रकाशितही केले होते.
एके संध्याकाळी माझी क्लिनिकमध्ये येवून ते आनंदातिशयाने जणू ओरडलेच, "डॉक्टरसाहेब, हे पत्र पहा. मला भारतीय मसाज थेरपी वर व्याख्यान देण्यासाठी मॉस्को येथून निमंत्रण आले आहे."
"व्वा, अगदी क्रेडिटेबल ! मला अभिमान वाटतो तुमचा डॉक्टर सातपुते ! अभिनंदन !"
माझा हात हातात घेवून माझ्या अभिनंदनाचा जणू स्वीकार करूनच सातपुते बाहेर पडले.
एक आठवड्यानंतरच्या रविवारी रात्री माझ्या घराची बेल वाजली म्हणून मी दरवाजा उघडला तर बाहेर सातपुते उभे ! हातात एक फाईल घेवून अतिशय घाबरलेल्या चेहेर्याने उभे पाहून मी विचारले, " काय सातपुते, एव्हड्या रात्री काय काम काढलेत? तब्ब्येत तर बरी आहे ना? या, आत या."
"जर अवेळीच तुम्हाला त्रास देतो आहे पण गोष्टच जरा महत्वाची आणि अर्जंट आहे."
मी सातपुतेंना सोफ्यावर बसवले.
"जरा शांत व्हा आणि मला सांगा नेमके काय झालेय ते." मी.
हातातील फाईल मधून एक कागद काढून माझ्या हातात दिला आणि म्हणाले,
"सर, तुम्हाला माहितच आहे की मला मॉस्को येथे व्याख्यानासाठी बोलाविलेले आहे. रशियन दुतावासाने व्हिसा देण्यासाठी काही चाचण्या करावयास सांगितल्या होत्या. ते हे रिपोर्ट त्यांना सबमिट केले तर आता ते म्हणतात की मी या व्हिडीआरेल पॉझिटिव्ह रिपोर्टमुळे रशियाला जावू शकत नाही."
त्यांनी मी रिपोर्ट वाचेपर्यंत वेळ जावू दिला आणि मग पुढे म्हणाले,"आता तुम्ही मला इतके दिवस ओळखता, मी काय तसा माणूस वाटतो का ?" असे म्हणून सातपुते अक्षरशः लहान मुलासारखे हमसाहमशी रडू लागले.
थोड्या वेळाने स्वतःला सावरून पुन्हा बोलू लागले," घरामध्ये तोंड दाखवायला जागा राहिली नाही. बायकोने तर जेवणच सोडलेय. मुलेदेखील माझ्याकडे संशयी नजरेते पाहू लागलेत. खड्डयात गेली ती रशिया पण हे नवीनच नाटक सुरु झालेय. तुम्ही मला सर्टीफिकेट देवून चालणार नाही का ?"
"हे पहा माझे सर्टीफिकेट रशियन दूतावासाला मुळीच चालणार नाही." मी.
"तुम्ही नक्कीच काही तरी मार्ग काढाल या मोठ्या आशेने तुमच्याकडे आलो होतो मी." सातपुते.
"हे पहा सातपुते, माझा तुमच्यावर आणि तुम्ही सांगता त्यावर पूर्ण विश्वास आहे. दुसरे निगेटिव्ह सर्टीफिकेट द्वावे तर तुम्ही त्यांना सर्टीफिकेट देखील सबमिट केले आहे. आता एकच उपाय आहे."
सातपुत्यांनी कान टवकारले.
"ही VDRL टेस्ट कधीकधी खरोखर निगेटिव्ह असताना देखील चुकून पॉझिटिव्ह दाखविते, याला आम्ही 'फॉल्स-पॉझिटिव्ह' असे म्हणतो. हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला आणखी एक जास्त स्पेसिफिक टेस्ट करावी लागेल जिचे नाव आहे TPHI टेस्ट. तुम्ही म्हणता तसे असेल तर ही टेस्ट निगेटिव्ह येईल आणि मग तुम्हाला रशियाला निश्चित जाता येईल. उद्या आपण ही टेस्ट करून घेवू."
मी टेस्टसाठी चिठ्ठी लिहित असताना सातपुते कृतज्ञतापूर्वक नजरेने माझ्याकडे पाहत होते असे मला जाणवले.
दुसर्या दिवशी सायंकाळी TPHI टेस्ट कागद हातात फडकावीतच ते 'जितं मया' मुद्रेने माझ्यासमोर उभे ठाकले. त्यांच्या सुदैवाने रिपोर्ट निगेटिव्ह होता. मी ह्या दोन्ही टेस्टचे एकत्रित रिपोर्ट आणि माझे एक पत्र त्याला जोडून त्यांच्या हातात ठेवून म्हणालो, "हे पत्र व्हिसा ऑफिसरला द्या म्हणजे तुमचे काम होण्यात काही अडचण येणार नाही. बॉन व्हॉयेज !"
त्यानंतर सुमारे आठवड्यानंतर अनपेक्षितरित्या माझे मित्र आणि सुप्रसिध्ध व्हिडी तज्ञ डॉ. पाकीटवाला यांचे एक पत्र मला आले आणि माझ्यावर अचानक आश्चर्यचकित होण्याची पाळी आली. पत्राचा मजकूर असा ….
प्रिय सुरेश,
बरा असशीलच !
तुझा पेशंट मि. सातपुते यांना माझ्याकडे पाठविल्याबद्दल धन्यवाद ! त्याची सिफिलिसची टेस्ट पॉझिटिव्हच होती आणि मी त्याप्रमाणे त्याची ट्रीटमेंट सुरु केली आहे. त्याने ट्रीटमेंटला उत्तम प्रतिसाद दिला असून तो आता बरा आहे.
त्याला माझ्याकडे धाडल्याबद्दल पुन्हा एकदा आभार !
आं. न.
डॉ. परवेज पाकीटवाला.
मी काही क्लिष्ट पेशंट डॉ . परवेज कडे रिफर करीत असे पण सातपुतेला मी नक्कीच पाठवले नव्हते. बहुतेक सातपुते स्वतःच आपण होवून त्यांच्याकडे गेला असणार आणि डॉ. परवेजने रेफरन्स आहे असे समजून मला पत्र पाठविले होते. पेशंट मंडळी 'डॉक्टर-शॉपिंग' करतात हे मला काही नवीन नव्हते पण सातपुते तुम्हीसुद्धा ! ज्युलियस सीझरच्या छातीत त्याचा मित्र ब्रुटसने सुरा खुपसल्यावर त्याला काय वाटले असेल त्याची थोडी जाणीव मला झाल्यासारखे वाटले. माझा इगो कोठेतरी दुखावला. अभावितपणे, मी डॉ परवेजचा नंबर डायल केला.
"केम छो, सुरेश ?" टिपिकल पारसी ॲक्सेंट मध्ये परवेज उत्तरले.
"परवेज, तुझे त्या सातपुते पेशंटबद्दलचे पत्र मिळाले. थ्यांक्स ! तुला आठवतो का तो पेशंट ?" आठवण्यासाठी थोडा वेळ देण्यासाठी मी किंचितसा थांबलो.
" हॉ, पक्का याद है. क्या हुवा उसको ?"
"वो ठीक है. लेकिन मुझे तुमसे कुछ जानकारी चाहिये थी" मी.
"गो अहेड, आस्क "
" मैने उसको VDRL कि वजह पुछी थी. लेकिन मुझे उसने तो ना कहा था. एकदम इनोसंट प्लीड कर रहा था. तुमसे सच बोला था क्या ?"
"छोड ना यार ! तुम तुम्हारे पेहचानवाले पेशंटसे सच बोलनेकी उम्मीद कैसे रखते हो ? वो एक तो तुमसे शरमाया होगा नही तो तुमसे डरा होगा."आपल्या विनोदावर स्वतःच हसून ते पुढे म्हणाले, "हम सब आदम और इवा से पैदा हुये है और तुम तो जाणतेही हो कि ॲपल्स हमेशा कितने ॲट्रक्टिव्ह होते है? जस्ट फरगेट अंड फर्गीव्ह हिम ! बाय !"
परवेजच्या बोलण्यामुळे मलाही हसू आले आणि मी सातपुतेला विसरून कामाला लागलो.
काही दिवसांनंतर आपल्या पातिव्रत्याचा कि पत्नीव्रत्याचा कोट घालून डॉ. सातपुते मला भेटायला आले, माझ्यासाठी त्यांचे नवीन पुस्तक आणि क्रेमलिनची एक छोटीशी रीप्लिका घेवून - "मॉस्कोच्या आठवणी ".
मलासुद्धा सातपुतेंचा राग आला.
मलासुद्धा सातपुतेंचा राग आला. पा़कीटवाला यांच्या "हम सब आदम और इवा से पैदा हुये है और तुम तो जाणतेही हो कि ॲपल्स हमेशा कितने ॲट्रक्टिव्ह होते है? जस्ट फरगेट अंड फर्गीव्ह हिम ! बाय !" या वाक्याने तुम्ही सगळं विसरलात याचं खरंच कौतुक वाटलं.
असो. अनुभव नेहमीप्र्माणेच ऊत्कंठावर्धक आणि माहीतीपुर्ण. धन्यवाद.
डॉक्टरसाहेब, मस्त रंजक लेख
डॉक्टरसाहेब,
मस्त रंजक लेख आहे. काय एकेक नमुने भेटले तुम्हाला! शीर्षकही एकदम समर्पक!
त्या सातपुतेची TPHI चाचणी नकारार्थी कशी आली ते समजले नाही.
आ.न.,
-गा.पै.
हि सगळी खरी नवां आहेत
हि सगळी खरी नवां आहेत लोकांची?
हम्म. असेही लोकं असतात.
हम्म. असेही लोकं असतात. तुमच्या लिहिण्याच्या शैलीचा मात्र मी फॅन झालोय.
खुप चांगली माहीती आणि लेखही.
<<<<हि सगळी खरी नवां आहेत
<<<<हि सगळी खरी नवां आहेत लोकांची?>>>>>या कथेतील प्रत्येक घटना अगदी शंभर टक्के खरी आहे पण विषय खाजगी असल्याने डॉ. रानडे वगळता बाकी सर्व नावे बदलली आहेत.
<<<<<त्या सातपुतेची TPHI चाचणी नकारार्थी कशी आली ते समजले नाही.>>>>मलाही !
<<<<मलासुद्धा सातपुतेंचा राग आला.>>>>टू फर्गिव इज ह्युमन ! नाही तरी आपण बापडे दुसरे काय करू शकतो ?
सर्वांचे माबो मित्रांचे आभार !
तुमच्या लेखन शैलीची मी फॅन
तुमच्या लेखन शैलीची मी फॅन झालेय. इतक्या सुंदर पद्धतीने लिहिता कि काय बोलावे ?
खर तर काहीच बोलू नये
रंजक लेखन
रंजक लेखन
अगदी अगदी. फॅन, कूलर, एसी
अगदी अगदी. फॅन, कूलर, एसी सबकुछ
सुंदर लेख पण एक शंका.
सुंदर लेख
पण एक शंका. पहिल्या पेशंटला युरीन इन्फेक्शन झाल्याचे आपण लिहिले आहे. त्याच्या बायकोला युरीन इन्फेक्शन झाले असेल तर तिच्याकडून त्याला संसर्ग होण्याची शक्यता असू शकते का ? ( नुसत्या वर्णनावरुन तो गुप्तरोग नसून साधे युरीन इन्फेक्शन आहे असे वाटले म्हणून विचारले ! ) त्याच्याबाबतीत त्याने बाहेरख्यालीपणा कबूल केला पण सामान्य केसेसमध्ये विचारत आहे.
दुसरे निगेटिव्ह सर्टीफिकेट द्वावे तर तुम्ही त्यांना सर्टीफिकेट देखील सबमिट केले आहे. >>> हे नाही आवडले. क्षमस्व.
वा डॉ.साहेब - हा अनुभवही
वा डॉ.साहेब - हा अनुभवही अतिशय सुंदर पद्धतीने चितारलाय तुम्ही .....
......एकाच गोष्टीकडे पण किती विविधतेने पाहिले जाते याचे नितांत सुंदर चित्रण .....
"हम सब आदम और इवा से पैदा हुये है और तुम तो जाणतेही हो कि अॅपल्स हमेशा कितने अॅट्रक्टिव्ह होते है? जस्ट फरगेट अंड फर्गीव्ह हिम ! बाय !" >>>>> ही खरी मॅच्युरिटी .....
गरमी/परमीबाबत एक शंका - बरेच गुप्तरोगी अशी बतावणी करतात की पब्लिक जेण्ट्स युरीनलमध्ये तो एक खडा (विशेषतः विटेचा) ठेवलेला असतो - तो वापरल्यामुळे हा रोग आम्हाला झाला - हे तद्दन खोटे असले पाहिजे नाही का ??
@अगो<<<<<दुसरे निगेटिव्ह
@अगो<<<<<दुसरे निगेटिव्ह सर्टीफिकेट द्वावे तर तुम्ही त्यांना सर्टीफिकेट देखील सबमिट केले आहे. >>> हे नाही आवडले. क्षमस्व.>>>>>
हे वाक्य नक्कीच चुकीचा संदेश देणारे आहे. क्षमस्व ! हे वाक्य रंजकतेच्या दृष्टीने लिहिले आहे, प्रत्यक्षात असे कोणी करणार नाही. मी सुध्धा देणार नाही. कधी कधी इतरांना त्रास न होता पेशंटचा फायदा होत असेल तर माणुसकीच्या दृष्टीने मदत करण्यास हरकत नसावी.
लिहिताना किती काळजी घेतली पाहिजे ते आपल्या प्रतिक्रियेमुळे अधोरेखित झाले आहे, धन्यवाद !
<<<त्याच्या बायकोला युरीन इन्फेक्शन झाले असेल तर तिच्याकडून त्याला संसर्ग होण्याची शक्यता असू शकते का ? >>>>
शक्य आहे. पण नानाच्या केसमध्ये त्याच्याकडून पत्नीला संसर्ग होण्याची शक्यता जास्त होती. तिचे नशीब नाहीतर वेळी दोघांना उपचार घ्यावे लागतात. असो.
@पुरंदरे शशांक
@पुरंदरे शशांक :<<<<गरमी/परमीबाबत एक शंका - बरेच गुप्तरोगी अशी बतावणी करतात की पब्लिक जेण्ट्स युरीनलमध्ये तो एक खडा (विशेषतः विटेचा) ठेवलेला असतो - तो वापरल्यामुळे हा रोग आम्हाला झाला - हे तद्दन खोटे असले पाहिजे नाही का ??>>>
शशांकराव,
नमस्कार.
पेशंट मंडळी काहीही जावईशोध लावतात. मुख्य गोष्ट लपविण्यासाठी कोणी म्हणतात टॉयलेट सीट मुळे तर कोणी सायकल सीट ! अशी इतर काहीही कारणे सांगतात. समाजात असे बरेच गैरसमज प्रचलित आहेत. आपला गुप्तरोग लहान मुलाला दिला तर तो बरा होतो अशीही एक समजूत आहे. दोनतीन वर्षांच्या बालांवर बलात्काराच्या बातम्या आपण ऐकतो त्या यामुळेच. हे काय किंवा नरबळी काय हे समाजातील अज्ञान आणि अंधश्रध्धेचे निदर्शक.
आज थोडा वेळ होता म्हणून लिहितोय. तुमच्या आजपर्यंतच्या रसभरीत रसग्रहणाबद्दल आभार.
- सुरेश शिंदे
अशा विषयावर एका अधिकारी
अशा विषयावर एका अधिकारी व्यक्तीने लेख लिहिलाय हे खुप छान झाले. लेख नेहमीप्रमाणेच उत्तम.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद डॉक्टर
छान.
छान.
डॉक्टर साहेब तुमचा हा पहिलाच
डॉक्टर साहेब तुमचा हा पहिलाच लेख वाचलाय. अतिशय सुरेख लिहिलंय तुम्ही. तुमचा लेख मनोरंजक आहे शिवाय तुम्ही तुमच्या पेशंट्सवर अगदी हसत खेळत उपचार करत असाल याची खात्री आहे.
दुसरे निगेटिव्ह सर्टीफिकेट
दुसरे निगेटिव्ह सर्टीफिकेट द्वावे तर तुम्ही त्यांना सर्टीफिकेट देखील सबमिट केले आहे. >>> >> डॉक्टर मला हे वाक्य वाचून फक्त इतकंच वाटलं की सायमल्टेनियसली योग्य ते उपचार सुरू ठेवून आणि पेशंटला योग्य त्या सूचना देऊन निगेटिव्ह सर्टिफिकेट देता येत असेल.
हा लेख पण आवडला.
हा लेख पण आवडला.
तुमच्या लेखन शैलीची मी फॅन
तुमच्या लेखन शैलीची मी फॅन झालेय. इतक्या सुंदर पद्धतीने लिहिता कि काय बोलावे ?>>> +१.
डॉक्टर तुमच्या कथामुळे लेखक
डॉक्टर तुमच्या कथामुळे लेखक डॉक्टर,लेखक म्हणून तुम्ही भावताच अणि माणुस म्हणूनही.अगोचा प्रतिसाद तुम्ही किती सहजपणे स्विकारलात.आणि बोधही घेतलात.
आपल्या कथेच आकर्षक शिर्षक्,आशयानुरुप चित्र,कथेची उत्कन्ठावर्धक मांडणी,सर्वसामान्याना समजेल अशा सोप्या भाषेत आणि तेवढीच शास्त्रिय माहिती,शेवटातील कलाटणी,कथेच्या कथत्वाला धक्क न देणारा शर्करावगुंठित उपदेश.सर्वच उत्तम.नविन कथेची वाट पहाय्ला लावणारे.
लेख आवडला.
लेख आवडला.
@शोभनाताई :<<<<<आकर्षक
@शोभनाताई :<<<<<आकर्षक शिर्षक्,आशयानुरुप चित्र,कथेची उत्कन्ठावर्धक मांडणी,सर्वसामान्याना समजेल अशा सोप्या भाषेत आणि तेवढीच शास्त्रिय माहिती,शेवटातील कलाटणी,कथेच्या कथत्वाला धक्क न देणारा शर्करावगुंठित उपदेश.>>>>कोणत्याही प्रासादिक लघुकथेमध्ये ही सर्व वैशिश्ठ्ये असणे आवश्यकच आहे. कोठल्याही रेसिपीमध्ये उत्कटतेचा मसाला टाकला तर तर पदार्थ चवदार होणारच ना ? आपली प्रतिक्रियादेखील भावली मला. रसग्रहणाबद्दल आभार !
तुम्हाला आश्वासित केलेली 'पार्किन्सन' विषयीची कथा अजून लिहिणे बाकी आहे.
इन्टरेस्टिन्ग
इन्टरेस्टिन्ग
लेख आवडला
लेख आवडला
"...रेसिपीमध्ये उत्कटतेचा
"...रेसिपीमध्ये उत्कटतेचा मसाला टाकला तर तर पदार्थ चवदार होणारच ना ?..."
~ हे आवडले डॉक्टरसर.... हे वाक्यच तुमची मराठी लिखाणावरील वाजवी पकड दर्शविते. एरव्ही आम्ही कला शाखेचे लोक विज्ञानशाखेकडील लोक मराठीपासून फटकून राहतात अशा [चुकीच्या] समजूतीमध्ये असतो. पण जेव्हा डॉ.जयंत नारळीकर, डॉ.अरुण लिमय आदींचे लेखन वाचायला मिळाले होते त्यावेळी समजले होते की शाखेचा आणि मराठी भाषेवरील प्रभुत्वाचा अर्थाअर्थी काही संबंध नाही.
तुमच्या लिखाणामुळेही हा समज पक्का झाला आही.
[पार्किन्सन कथेची उत्कंठतेने वाट पाहात आहे....]
उत्कृष्ट लेख.
उत्कृष्ट लेख.
अतिशय सुन्दर लेख ... आपल्या
अतिशय सुन्दर लेख ... आपल्या लेखाची मी आवर्जुन वाट बघत असते..
खरेच सह्हीच लेख ..फारच छान
खरेच सह्हीच लेख ..फारच छान लिहता तुम्ही
अशा विषयावर एका अधिकारी
अशा विषयावर एका अधिकारी व्यक्तीने लेख लिहिलाय हे खुप छान झाले. लेख नेहमीप्रमाणेच उत्तम.>>>>+१
अप्रतिम झालाय हा लेख पण
अप्रतिम झालाय हा लेख पण डॉक्टर!
तुमच्या पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत!
Pages