यलो.. यलो… डर्टी फेलो ! - अर्थात एक वैद्यकीय निदानचातुर्य कथा !

Submitted by SureshShinde on 13 February, 2014 - 14:33

वैद्यकीय कथा या साहित्यप्रकारामध्ये रहस्यकथा, शोधकथा, इतिहासकथा, निदानचातुर्य कथा असे अनेक उपप्रकार आढळतात. डॉ. हाऊस, एमडी हा टीव्ही शो तर तब्बल आठ वर्षे लोकरंजन करीत होता. डॉ. ॲलन सिगल या बर्मिंगहॅम, अलाबामा येथील सुप्रसिद्ध डॉक्टरांची एक चातुर्यकथा येथे रुपांतरीत करीत आहे. आपणास ती नक्कीच आवडेल.

---------------------------
यलो.. यलो… डर्टी फेलो ! - अर्थात एक वैद्यकीय निदानचातुर्य कथा !

itching.jpg

हॉस्पिटलमधील आपला सकाळचा राऊंड डॉक्टर ॲलन यांनी जवळजवळ संपवलाच होता एव्हड्यात,
"सर, कृपया आणखी एक पेशंट पाहू शकाल काय ?" डॉ फिशर यांनी विचारले. फिशर हे हॉस्पिटलमधील सिनियर रेसिडेंट डॉक्टर होते.
"अवश्य !" डॉक्टर ॲलन उद्गारले.
डॉक्टर ॲलन सर हे एक अतिशय अभ्यासू आणि उमद्या स्वभावाचे आणि त्यांच्या अद्यावत ज्ञान आणि कुशाग्र निदान कौशल्यासाठी प्रसिद्ध होते.
पेशंटच्या बेड्पर्यंत पोहोचताना फिशर यांनी ॲलन सरांना स्टीलमन नावाच्या या रुग्णाची माहिती पुरवली. अठ्ठावीस वर्षांच्या आणि व्यवसायाने मेक्यानिक असलेल्या स्टीलमनला गेला महिनाभर हायपो-थायरॉइड या आजारासाठी उपचार सुरु होते.
थायरॉइड ही एक ग्रंथी आपण सर्वांच्या मानेच्या पुढील भागात असते, तिला गलग्रंथी असेही म्हणतात. अशा अनेक प्रकारच्या ग्रंथी आपल्या शरीरात असतात व त्याचे स्त्राव अर्थात संप्रेरक (हार्मोन्स ) आपल्या शरीरामधील चयापचय म्हणजे मेट्याबोलिझम क्रिया नियंत्रित करतात. हृदयाचे ठोक्यांची गती, शरीराचे तापमान, रक्तातील साखरेची पातळी, आतड्यांची हालचाल ह्या व इतर अनेक क्रिया ह्या संप्रेरकाद्वारे नियंत्रित केल्या जातात. काही आजारामुळे थायरॉइड ग्रंथीतील थायरोक्सीन हे संप्रेरक जर गरजेपेक्षा कमी झाले तर त्या व्यक्तीला जी लक्षणे दिसतात त्याला हायपो-थायरॉइडीझम असे म्हणतात. स्टीलमनला नेमका हाच आजार झाला होता. एक महिन्यापूर्वी त्याचे वजन वाढले होते, अंगावर आणि डोळ्यांभोवती सूज आली होती, थंडी सहन होत नव्हती, त्वचा अगदी राठ आणि कोरडी झाली होती. नाडीचे ठोके मंदावले होते. या लक्षणांवरून डॉ. फिशर यांना हायपो-थायरॉइडीझमची शंका आली होती. स्टीलमनच्या रक्ताच्या तपासणीमध्ये थाय्रोयीड संप्रेरकाची ( T३ आणि T४ ) पातळी अगदीच कमी झाली होती. अशा रुग्णांना या थाय्रोयीड संप्रेरकाच्या गोळ्या रोज घेतल्यास त्यांचा चयापचय पुन्हा नॉर्मल होतो आणि सर्व लक्षणे नाहीशी होतात. या गोळ्या प्रत्येकी पंचवीस मिलीग्राम पासून ते दोनशे मिलीग्राम पर्यंत अनेक वजनांमध्ये बाजारात उपलब्ध आहेत. त्यांना पटकन ओळखता यावे म्हणून बर्याचदा त्या गोळ्यांना निरनिराळ्या रंगांचे आवरण दिलेले असते. फिशर यांनी तातडीने स्टीलमनला १०० मिलिग्रामच्या गोळ्यांचे प्रिस्क्रिप्शन देवून रोज एक गोळी घेण्यास सांगितले होते.

आज एक महिन्यानंतर स्टीलमन पुन्हा भेटण्यास आला होता.

एव्हाना ॲलन सर स्टीलमनच्या बेडशेजारी उभे राहून त्याचे निरीक्षण करीत होते. स्टीलमन बेडवर बसला होता, त्याने अंगातील शर्ट काढला होता आणि त्याच शर्टाने त्याची पाठ खराखरा खाजवत होता. मधेच कधी हात, तर कधी पाय तर कधी तोंड खाजविण्याचा त्याचा कार्यक्रम सतत चालू होता. स्टीलमनच्या संपूर्ण अंगावर खाजवल्यामुळे ओरखडल्याच्या खुणा दिसत होत्या. ॲलन सरांच्या भारदस्त व्यक्तिमत्वाची जाणीव झाल्याने तो म्हणाला,
"सर, या खुजलीने वैतागून गेलोय मी. संपूर्ण अंगाला हजारो इंगळ्या डसताहेत जणू ! खाजवून खाजवून जीव चाललाय माझा. काहीतरी उपाय करा हो !"
बोलता बोलता त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. डॉ. ॲलन सरांनी त्याला व्यवस्थित तपासले, त्याच्या त्वचेचे बारकाईने निरीक्षणही केले. पण काहीच सुगावा दिसेना. कोठे काही जखमा अथवा गांधी देखील दिसत नव्हत्या.
"सर, ज्या तक्रारींसाठी मी गेल्या महिन्यात आलो होतो त्या तर पूर्ण नाहीश्या झाल्यात आणि हे आता नवीनच लफडे सुरु झालेय!"
"नेमकी कधीपासून सुरु झाली ही खाज ?"
"आपले औषध सुरु केल्याच्या नंतर सुमारे एक आठवड्यापासून !"
ॲलन सरांनी आपला मोर्चा आता इतर शिकवू डॉक्टरांकडे वळविला.
" कोणाला काही कारण सुचतेय का ?"
सर्वांनी नकारार्थक माना हलवल्या, डॉ. फिशर यांनीदेखील !
"डॉक्टर फिशर, या पेशंटला तुम्ही किती मिलीग्राम थाय्रोक्सिन देत आहात?" सरांनी विचारले.
"शंभर मिलीग्राम डेली, सर!"
"कोणत्या कंपनीचा ?"
"आपण नेहमी वापरतो तोच, पीडीपी कंपनीचा ! ही अगदी प्रसिद्ध कंपनी आहे !"
ॲलन सर थोडा वेळ थांबले आणि म्हणाले,
" फिशर, तुम्ही असे करा. याच कंपनीच्या १०० मिलिग्रामची रोज एक गोळी घेण्याऐवजी ५० मिलीग्रामच्या दोन गोळ्या रोज घ्यायला सांगा. "
डॉ. फिशर आता चांगलेच बुचकळ्यात पडले होते. ॲलन सरांची काहीतरी चूक होत तर नव्हती ना ? तरी मनाचा हिय्या करून त्यांनी विचारलेच,
"सर, लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण १०० ची एक आणि पन्नासच्या दोन यात काय फरक आहे ?"
सरांनी थोडेसे मंद स्मित केले आणि म्हणाले,
"फिशर, मी सांगतो तसे करा. माझी खात्री आहे कि असे केल्याने ही खाज नक्कीच जाईल. "
डॉ फिशर यांना सरांचा हा सल्ला मुळीच पटला नव्हता, तर्कसंगत वाटत नव्हता पण बॉसच्या विरुद्ध बोलण्याची हिम्मत त्यांच्यात नव्हती. ॲलन सर खूपच सिनियर आणि अनुभवी होते. त्यांनी मुकाट्याने तसे प्रिस्क्रिप्शन स्टीलमनच्या हातात देवून त्याची बोळवण केली.
वरील प्रसंग 'मोठ्या माणसांच्या विक्षिप्त गोष्टी' समजून फिशर विसरून गेले.
पुढच्या महिन्यात स्टीलमन फॉलो अप साठी पुन्हा आला.
"आता माझी तब्ब्येत एकदम उत्तम आहे. डॉ ॲलन सर म्हणाल्याप्रमाणे माझी ती जीवघेणी खाज चार दिवसांतच पूर्णपणे संपली. व्हाट ए ग्रेट डॉक्टर !"
डॉ फिशरला आता चक्कर येण्याचेच बाकी होते. कधी एकदा ॲलन सर येतात आणि त्यांना मी ही बातमी सांगतोय असे झाले होते. मराठीत आपण म्हणतो ना "सद्गुरुवाचोनी सापडेना सोय , धरावे ते पाय आधी आधी !" तशी अवस्था झाली होती फिशर यांची !
ॲलन सरांपुढे नतमस्तक होवून त्यांनी विचारले,
"सर, आपण ही किमया कशी साधलीत ते कृपया आम्हाला समजावून सांगा "

ॲलन सरांनी पुन्हा एकदा मंद स्मित केले आणि म्हणाले," अरे, मला माहित होते की या कंपनीच्या शंभर मिलिग्रामच्या गोळीचा रंग पिवळा असतो आणि पन्नास मिलीग्राम च्या गोळीचा पांढरा ! ह्या पिवळ्या रंगासाठी वापरला जातो एक खाद्यरंग ज्याचे नाव आहे 'टारट्राझीन'. काही लोकांना या रंगाची ॲलर्जी असते आणि त्यांना अशी खाज येते अथवा दम्याचा त्रास उद्भवतो. माझ्याकडे पूर्वी असाच एक पेशंट आला होता म्हणून मला एव्हडी खात्री वाटत होती."
डॉ. फिशर आणि इतर सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला नाही तरच नवल !

----------------------------------------------

'टारट्राझीन' अजूनही अनेक ठिकाणी वापरला जातो. अनेक वेळा डाळ, मोहरी, हळद इत्यादीमध्ये भेसळ करण्यासाठी वापरला जातो. जेजुरीच्या खंडोबाला खरी हळद उधळणे आजकाल परवडत नाही. मग लाकडाच्या भूश्श्यामध्ये 'टारट्राझीन' अथवा लेड क्रोमेट किंवा मेटॅनिल येलो असे रंग घालून 'केमिकल हळद' तयार करतात, स्वस्त आणि मस्त ! जेजुरीतील अनेक भक्त, पुजारी यांची अशा हळदीमुळे त्वचा काळी झालेली मी अनेक वेळा पाहिली आहे. नकली औषधांमुळे आजार बरा न झाल्यामुळे मेलेली मिसेस डी'सा (ललिता पवार ) आणि धाय मोकलून रडणारा राजकपूर (Anari १९५९) कोण विसरू शकेल ? पण म्हणतात ना भेसळ करणाय्रांना 'न भयं न लज्जा' ! म्हणून वाटते की 'ब्र्यांड'ला विरोध करून स्वस्त जेनेरिक वस्तूंची मागणी करताना भेसळयुक्त आणि विघातक वस्तू तर पदरात पडत नाही ना याची काळजी घेणे आवश्यक आहे.

ता. क . : या ठिकाणी जेनेरिक औषधांना माझा विरोध मुळीच नाही. उलट पक्षी आजकाल औषधे खूप महाग होवून सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर चालली आहेत असेच मला वाटते. मी माझ्या रुग्णांचा खर्च वाचविण्याचा नेहेमीच प्रयत्नही करतो. बदललेली औषधे आपल्या डॉक्टरांना दाखवून घ्यावीत असे मला सुचवायचे आहे. औषधांची सुरक्षितता ही अन्न आणि औषध प्रशासनाच्या अखत्यारीत आहे. त्यांचे काम चालूच असते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉक .. तुमचे लेख अतिशय मस्त नि माहितीपुर्ण असतात ..
शेवटच्या पॅरावर एक प्रश्न - डाळी वगैरे धुवुन वापरले जातेच पण 'टारट्राझीन'चा रंग त्यातुन निघुन जातो का?

I read this. Read other stories too.I have become your die hard fan.you are more than any super hero for your articles creat awareness.
Very informative and useful.

I had to type in English as I do not know how type Marathi on ipad

बाजारात हळदीला तो विषेश पिवळा येण्यासाठी पन मग असे काही (केमिकल) वापरत असावेत का असे वाटते?

कारण काही ठिकाणी एकदम पिवळी धम्मक हळद तर काही काळसर पिवळी.

सर्व कठिण आहे (जगणं) ह्या भेसळीच्या प्रकारात...

छानच जमलेय रुपांतर.. आपल्या नकळत अशा किती भेसळयुक्त पदार्थांचा वापर करत असू आपण.
जेजुरीला गेल्यावर असे वाटले होते कि एवढी महाग हळद इतक्या प्रमाणात उधळली कशी जातेय इथे ?

बाप रे!
मला पण हायपोथायरॉडिझम आहे आणि मी घेत असलेया थायरॉक्सिनपैकी एक गोळी (१०० मायक्रोग्रॅम) पिवळ्या रंगाची आहे.... Sad बहुदा थायरोनॉर्म/ ग्लॅक्सो कंपनीचे औषध आहे.
वर्शे८-९ वर्ष मला वारंवार अ‍ॅलर्जीदृष (?) सर्दी असते. बर्‍याच तपासण्या झाल्यात पण सर्दीचे कारण समजत नाहीये...

डॉक्टर तुम्ही प्लीज काही सांगू शकाल का?

डॉक्टर, कथा/ रुपांतर खुप आवडले. मला डॉ. बाळ फोंडकेंच्या अश्याच विज्ञान कथा आठवल्या. त्यांची शैलीही अशीच, तुम्ही वाचल्या असतीलच ना?

छान गोष्ट.

>>> म्हणून वाटते की 'ब्र्यांड'ला विरोध करून स्वस्त जेनेरिक वस्तूंची मागणी करताना भेसळयुक्त आणि विघातक वस्तू तर पदरात पडत नाही ना याची काळजी घेणे आवश्यक आहे.

हे समजले नाही. म्हणजे जेनेरिक औषधे स्वस्त करण्यासाठी असल्या कमी प्रतीच्या रंगांचा, केमीकल्सचा वापर केला जातो काय?

आणखी एक शंका, आपण जी मिठाई विकत घेतो त्यात असले 'टारट्राझीन' असते काय? बर्‍याच मिठायांचा रंग पुर्णपणे पिवळा असतो जसे- जिलेबी, मैसूरपाक आदी.

इतरही खाद्यरंग हे सुरक्षित असतात काय?

छान लेख Happy
अन्नपदार्थातील भेसळ हा तर भीषण प्रकार आहे. ही कशाकशाप्रकारे केली जाते हे ओळखण्यासाठी याबाबत काहीएक संकलीत माहिती मिळायला हवी आहे. नैतर आहेच, आम्ही भारतीय काय? जोवर शरिर साथ देतय तोवर काहीही पचवतो.
हळद आम्ही हळकुंडे आणुन कुटुन घेतो, मिरचीचे तिखट भुकटीचेही तसेच.

उत्तम रुपान्तर चपखल उदाहरणानी कथा अस्सल मराठी होउन जाते.कथेला हानी न पोचवता दिलेला सन्देशही आपल्या कथात नेहमिच असतो.तुमचे नाव दिसले कि कितिही घाइ अस्लि तरि वच्ल्याशिवाय राहवत नाही.

"व्हाट ए ग्रेट डॉक्टर !" .... डॉ. सीगल काय डॉ. शिंदे काय - दोघांनाही हे लागू होते ....

"सद्गुरुवाचोनी सापडेना सोय , धरावे ते पाय आधी आधी !" - किती चपखल उपमा ..

फारच मस्त पण अभ्यासपूर्ण कथा -

सर.....

या प्रभावी कथनाचा तुम्ही जो शेवट केला आहे त्या अनुषंगाने एक शंका मनी येत आहे....

"...स्वस्त जेनेरिक वस्तूंची मागणी करताना भेसळयुक्त आणि विघातक वस्तू तर पदरात पडत नाही ना याची काळजी घेणे आवश्यक आहे..."

~ आपण सारेच मान्य करतो की जेनेरिक औषधांची किंमत जाणवण्याइतपत कमी आहे. आमीर खानने सादर केलेल्या "सत्यमेव जयते" या गाजलेल्या सीरिजमधील एका भागात "जेनेरिक औषधांचे महत्व आणि त्यांची उपलब्धता" यावर प्रभावी संवादाचे आदानप्रदान झाले होते. जेनेरिकचे महत्व सांगणारे आयएएस दर्जाचे अधिकारी होते, ज्यानी राजस्थानमध्ये सरकारच्या हार्दिक सहकार्याने या औषधांमुळे क्रांती घडवून आणल्याचे आमीरने सांगितले. त्या टीमच्या एका सदस्येने एक प्रयोग केला.... तिने ब्रॅन्डची औषधे २४०० रुपयांना घेतली तर तीच औषधे जेनेरिकच्या दुकानात घेतल्यावर त्याचे बिल झाले ३३० रुपये [ हे त्या भागात प्रत्यक्ष दाखविले आहे.]

मुद्दा असा की, माझ्यासारखा कला शाखेचे शिक्षण घेतलेला माणूस जर जेनेरिकला प्राधान्य देत असेल तर मी घेत असलेले त्या गटातील औषध भेसळयुक्त तसेच विघातक नाही...हे कसे ओळखू शकेन ? कारण ज्या डॉक्टरनी जेनेरिक घ्या असे सांगितले असेल त्याना ती परत दाखविली तर ते योग्य आहेत अशाच शेरा देतील ना ? किंवा जेनेरिक विघातक वा भेसळ गटातील असेल या भीतीने परत महागड्या ब्रॅन्डेडकडेच जायचे का ?

ही माझी काही तक्रार नाही...फक्त या निमित्ताने तुमच्याकडून आमच्यासारख्या सर्वसामान्यांच्या मनातील गोंधळ दूर व्हावा यासाठी हा प्रतिसाद.

छान

डोक्टर, मस्त.

अशोक, ब्रँडेड औषधे आणि त्यांऐवजी वापरता येणारी जेनरीक औषधे अशी यादी कुठे बघता येईल का?

" म्हणून वाटते की 'ब्र्यांड'ला विरोध करून स्वस्त जेनेरिक वस्तूंची मागणी करताना भेसळयुक्त आणि विघातक वस्तू तर पदरात पडत नाही ना याची काळजी घेणे आवश्यक आहे." ह्याबद्द्ल -

पण सर, भेसळ तर कोणीही महागड्या वस्तूतच करायचा प्रयत्न करेल, logically?

जेनेरिक औषधांचे बाबत माझेही तितकेसे चांगले मत नाही अजून तरी.. म्हणतात ना - "जेनू काम तेनू".. तसंच काहीसं -

बाप रे! किती साध्या साध्या गोष्टी पण अतोनात महत्वाच्या. पुन्हा एकदा अंजनवाली कथा..

मसुरडाळीच्या निमित्ताने डोक्याला एक खुराक मिळाला आहेच, त्यात ही आणखी भर पडली आहे. मला अनेक त-हेच्या अ‍ॅलर्ज्या आहेत, टेस्ट करून त्यांची खातरजमाही केलेली आहे, पण आता याही बाजूने लक्ष ठेवता येईल. पुनश्च शतशः आभार डॉक्टर Happy

माधवराव....

खालील लिंक पाहा....

http://www.labnol.org/india/compare-medicine-prices/27587/

या ठिकाणी श्री.अमित अगरवाल यांचा ईमेलदेखील तुम्हास मिळेल....त्यांच्या माध्यमाद्वारे जेनेरिक संदर्भातील योग्य ते मार्गदर्शन मिळू शकेल.

ता. क . : या ठिकाणी जेनेरिक औषधांना माझा विरोध मुळीच नाही. उलट पक्षी आजकाल औषधे खूप महाग होवून सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर चालली आहेत असेच मला वाटते. मी माझ्या रुग्णांचा खर्च वाचविण्याचा नेहेमीच प्रयत्नही करतो. बदललेली औषधे आपल्या डॉक्टरांना दाखवून घ्यावीत असे मला सुचवायचे आहे. औषधांची सुरक्षितता ही अन्न आणि औषध प्रशासनाच्या अखत्यारीत आहे. त्यांचे काम चालूच असते.

आवडले!
भेसळ धोकादायकच पण एरवी देखील फूड कलरिंगमुळे हेल्थ प्रॉब्लेम्स उद्भवू शकतात. माझ्या मुलाच्या मित्राला रेड फुड कलरची अ‍ॅलर्जी होती.

Pages

Back to top