वैद्यकीय कथा या साहित्यप्रकारामध्ये रहस्यकथा, शोधकथा, इतिहासकथा, निदानचातुर्य कथा असे अनेक उपप्रकार आढळतात. डॉ. हाऊस, एमडी हा टीव्ही शो तर तब्बल आठ वर्षे लोकरंजन करीत होता. डॉ. ॲलन सिगल या बर्मिंगहॅम, अलाबामा येथील सुप्रसिद्ध डॉक्टरांची एक चातुर्यकथा येथे रुपांतरीत करीत आहे. आपणास ती नक्कीच आवडेल.
---------------------------
यलो.. यलो… डर्टी फेलो ! - अर्थात एक वैद्यकीय निदानचातुर्य कथा !
हॉस्पिटलमधील आपला सकाळचा राऊंड डॉक्टर ॲलन यांनी जवळजवळ संपवलाच होता एव्हड्यात,
"सर, कृपया आणखी एक पेशंट पाहू शकाल काय ?" डॉ फिशर यांनी विचारले. फिशर हे हॉस्पिटलमधील सिनियर रेसिडेंट डॉक्टर होते.
"अवश्य !" डॉक्टर ॲलन उद्गारले.
डॉक्टर ॲलन सर हे एक अतिशय अभ्यासू आणि उमद्या स्वभावाचे आणि त्यांच्या अद्यावत ज्ञान आणि कुशाग्र निदान कौशल्यासाठी प्रसिद्ध होते.
पेशंटच्या बेड्पर्यंत पोहोचताना फिशर यांनी ॲलन सरांना स्टीलमन नावाच्या या रुग्णाची माहिती पुरवली. अठ्ठावीस वर्षांच्या आणि व्यवसायाने मेक्यानिक असलेल्या स्टीलमनला गेला महिनाभर हायपो-थायरॉइड या आजारासाठी उपचार सुरु होते.
थायरॉइड ही एक ग्रंथी आपण सर्वांच्या मानेच्या पुढील भागात असते, तिला गलग्रंथी असेही म्हणतात. अशा अनेक प्रकारच्या ग्रंथी आपल्या शरीरात असतात व त्याचे स्त्राव अर्थात संप्रेरक (हार्मोन्स ) आपल्या शरीरामधील चयापचय म्हणजे मेट्याबोलिझम क्रिया नियंत्रित करतात. हृदयाचे ठोक्यांची गती, शरीराचे तापमान, रक्तातील साखरेची पातळी, आतड्यांची हालचाल ह्या व इतर अनेक क्रिया ह्या संप्रेरकाद्वारे नियंत्रित केल्या जातात. काही आजारामुळे थायरॉइड ग्रंथीतील थायरोक्सीन हे संप्रेरक जर गरजेपेक्षा कमी झाले तर त्या व्यक्तीला जी लक्षणे दिसतात त्याला हायपो-थायरॉइडीझम असे म्हणतात. स्टीलमनला नेमका हाच आजार झाला होता. एक महिन्यापूर्वी त्याचे वजन वाढले होते, अंगावर आणि डोळ्यांभोवती सूज आली होती, थंडी सहन होत नव्हती, त्वचा अगदी राठ आणि कोरडी झाली होती. नाडीचे ठोके मंदावले होते. या लक्षणांवरून डॉ. फिशर यांना हायपो-थायरॉइडीझमची शंका आली होती. स्टीलमनच्या रक्ताच्या तपासणीमध्ये थाय्रोयीड संप्रेरकाची ( T३ आणि T४ ) पातळी अगदीच कमी झाली होती. अशा रुग्णांना या थाय्रोयीड संप्रेरकाच्या गोळ्या रोज घेतल्यास त्यांचा चयापचय पुन्हा नॉर्मल होतो आणि सर्व लक्षणे नाहीशी होतात. या गोळ्या प्रत्येकी पंचवीस मिलीग्राम पासून ते दोनशे मिलीग्राम पर्यंत अनेक वजनांमध्ये बाजारात उपलब्ध आहेत. त्यांना पटकन ओळखता यावे म्हणून बर्याचदा त्या गोळ्यांना निरनिराळ्या रंगांचे आवरण दिलेले असते. फिशर यांनी तातडीने स्टीलमनला १०० मिलिग्रामच्या गोळ्यांचे प्रिस्क्रिप्शन देवून रोज एक गोळी घेण्यास सांगितले होते.
आज एक महिन्यानंतर स्टीलमन पुन्हा भेटण्यास आला होता.
एव्हाना ॲलन सर स्टीलमनच्या बेडशेजारी उभे राहून त्याचे निरीक्षण करीत होते. स्टीलमन बेडवर बसला होता, त्याने अंगातील शर्ट काढला होता आणि त्याच शर्टाने त्याची पाठ खराखरा खाजवत होता. मधेच कधी हात, तर कधी पाय तर कधी तोंड खाजविण्याचा त्याचा कार्यक्रम सतत चालू होता. स्टीलमनच्या संपूर्ण अंगावर खाजवल्यामुळे ओरखडल्याच्या खुणा दिसत होत्या. ॲलन सरांच्या भारदस्त व्यक्तिमत्वाची जाणीव झाल्याने तो म्हणाला,
"सर, या खुजलीने वैतागून गेलोय मी. संपूर्ण अंगाला हजारो इंगळ्या डसताहेत जणू ! खाजवून खाजवून जीव चाललाय माझा. काहीतरी उपाय करा हो !"
बोलता बोलता त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. डॉ. ॲलन सरांनी त्याला व्यवस्थित तपासले, त्याच्या त्वचेचे बारकाईने निरीक्षणही केले. पण काहीच सुगावा दिसेना. कोठे काही जखमा अथवा गांधी देखील दिसत नव्हत्या.
"सर, ज्या तक्रारींसाठी मी गेल्या महिन्यात आलो होतो त्या तर पूर्ण नाहीश्या झाल्यात आणि हे आता नवीनच लफडे सुरु झालेय!"
"नेमकी कधीपासून सुरु झाली ही खाज ?"
"आपले औषध सुरु केल्याच्या नंतर सुमारे एक आठवड्यापासून !"
ॲलन सरांनी आपला मोर्चा आता इतर शिकवू डॉक्टरांकडे वळविला.
" कोणाला काही कारण सुचतेय का ?"
सर्वांनी नकारार्थक माना हलवल्या, डॉ. फिशर यांनीदेखील !
"डॉक्टर फिशर, या पेशंटला तुम्ही किती मिलीग्राम थाय्रोक्सिन देत आहात?" सरांनी विचारले.
"शंभर मिलीग्राम डेली, सर!"
"कोणत्या कंपनीचा ?"
"आपण नेहमी वापरतो तोच, पीडीपी कंपनीचा ! ही अगदी प्रसिद्ध कंपनी आहे !"
ॲलन सर थोडा वेळ थांबले आणि म्हणाले,
" फिशर, तुम्ही असे करा. याच कंपनीच्या १०० मिलिग्रामची रोज एक गोळी घेण्याऐवजी ५० मिलीग्रामच्या दोन गोळ्या रोज घ्यायला सांगा. "
डॉ. फिशर आता चांगलेच बुचकळ्यात पडले होते. ॲलन सरांची काहीतरी चूक होत तर नव्हती ना ? तरी मनाचा हिय्या करून त्यांनी विचारलेच,
"सर, लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण १०० ची एक आणि पन्नासच्या दोन यात काय फरक आहे ?"
सरांनी थोडेसे मंद स्मित केले आणि म्हणाले,
"फिशर, मी सांगतो तसे करा. माझी खात्री आहे कि असे केल्याने ही खाज नक्कीच जाईल. "
डॉ फिशर यांना सरांचा हा सल्ला मुळीच पटला नव्हता, तर्कसंगत वाटत नव्हता पण बॉसच्या विरुद्ध बोलण्याची हिम्मत त्यांच्यात नव्हती. ॲलन सर खूपच सिनियर आणि अनुभवी होते. त्यांनी मुकाट्याने तसे प्रिस्क्रिप्शन स्टीलमनच्या हातात देवून त्याची बोळवण केली.
वरील प्रसंग 'मोठ्या माणसांच्या विक्षिप्त गोष्टी' समजून फिशर विसरून गेले.
पुढच्या महिन्यात स्टीलमन फॉलो अप साठी पुन्हा आला.
"आता माझी तब्ब्येत एकदम उत्तम आहे. डॉ ॲलन सर म्हणाल्याप्रमाणे माझी ती जीवघेणी खाज चार दिवसांतच पूर्णपणे संपली. व्हाट ए ग्रेट डॉक्टर !"
डॉ फिशरला आता चक्कर येण्याचेच बाकी होते. कधी एकदा ॲलन सर येतात आणि त्यांना मी ही बातमी सांगतोय असे झाले होते. मराठीत आपण म्हणतो ना "सद्गुरुवाचोनी सापडेना सोय , धरावे ते पाय आधी आधी !" तशी अवस्था झाली होती फिशर यांची !
ॲलन सरांपुढे नतमस्तक होवून त्यांनी विचारले,
"सर, आपण ही किमया कशी साधलीत ते कृपया आम्हाला समजावून सांगा "
ॲलन सरांनी पुन्हा एकदा मंद स्मित केले आणि म्हणाले," अरे, मला माहित होते की या कंपनीच्या शंभर मिलिग्रामच्या गोळीचा रंग पिवळा असतो आणि पन्नास मिलीग्राम च्या गोळीचा पांढरा ! ह्या पिवळ्या रंगासाठी वापरला जातो एक खाद्यरंग ज्याचे नाव आहे 'टारट्राझीन'. काही लोकांना या रंगाची ॲलर्जी असते आणि त्यांना अशी खाज येते अथवा दम्याचा त्रास उद्भवतो. माझ्याकडे पूर्वी असाच एक पेशंट आला होता म्हणून मला एव्हडी खात्री वाटत होती."
डॉ. फिशर आणि इतर सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला नाही तरच नवल !
----------------------------------------------
'टारट्राझीन' अजूनही अनेक ठिकाणी वापरला जातो. अनेक वेळा डाळ, मोहरी, हळद इत्यादीमध्ये भेसळ करण्यासाठी वापरला जातो. जेजुरीच्या खंडोबाला खरी हळद उधळणे आजकाल परवडत नाही. मग लाकडाच्या भूश्श्यामध्ये 'टारट्राझीन' अथवा लेड क्रोमेट किंवा मेटॅनिल येलो असे रंग घालून 'केमिकल हळद' तयार करतात, स्वस्त आणि मस्त ! जेजुरीतील अनेक भक्त, पुजारी यांची अशा हळदीमुळे त्वचा काळी झालेली मी अनेक वेळा पाहिली आहे. नकली औषधांमुळे आजार बरा न झाल्यामुळे मेलेली मिसेस डी'सा (ललिता पवार ) आणि धाय मोकलून रडणारा राजकपूर (Anari १९५९) कोण विसरू शकेल ? पण म्हणतात ना भेसळ करणाय्रांना 'न भयं न लज्जा' ! म्हणून वाटते की 'ब्र्यांड'ला विरोध करून स्वस्त जेनेरिक वस्तूंची मागणी करताना भेसळयुक्त आणि विघातक वस्तू तर पदरात पडत नाही ना याची काळजी घेणे आवश्यक आहे.
ता. क . : या ठिकाणी जेनेरिक औषधांना माझा विरोध मुळीच नाही. उलट पक्षी आजकाल औषधे खूप महाग होवून सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर चालली आहेत असेच मला वाटते. मी माझ्या रुग्णांचा खर्च वाचविण्याचा नेहेमीच प्रयत्नही करतो. बदललेली औषधे आपल्या डॉक्टरांना दाखवून घ्यावीत असे मला सुचवायचे आहे. औषधांची सुरक्षितता ही अन्न आणि औषध प्रशासनाच्या अखत्यारीत आहे. त्यांचे काम चालूच असते.
खूप सुंदर लेख. माझीपण
खूप सुंदर लेख. माझीपण हायपोथायरोईडवरची thyronorm-१०० गोळी पिवळ्या रंगाची आहे आणि अधूनमधून मला खाज सुटते आणि सर्दीपण सतत असते.
@पाषाणभेद<<<जेनेरिक औषधे
@पाषाणभेद<<<जेनेरिक औषधे स्वस्त करण्यासाठी असल्या कमी प्रतीच्या रंगांचा, केमीकल्सचा वापर केला जातो काय?>>>> जेनेरिक औषधे ही ब्रांडेड औषधांसारखीच असतात. अनेक उत्तम कंपन्या देखील अशी औषधे तयार करून केवळ आपल्या देशातच नव्हे तर परदेशातही विकतात. बर्याच लहान कंपन्यांकडे औषधे मुळापासून तयार करण्याचे तंत्र, कौशल्य आणि संशोधन पार्श्वभूमी नसते. काही कंपन्या उत्पादन प्रक्रियेत थोडासा बदल करून पेटंट कायद्यामधून सुटका करवून घेवून स्वस्त पण चांगली औषधे विकतात. काही लोक बल्क ड्रग चायना, कोरिया अशा देशांकडून मिळवतात आणि स्वतः अगर लोनलायसेन्स पद्धतीने कोणाकडून तरी गोळ्या / काप्शुल्स तयार करून घेवून मार्केट करतात. भारतात आणि परदेशात देखील हुबेहूब ब्रांडेड औषधांची कॉपी करून नकली औषधे देखील भरपूर विकली जातात.
<<<<<आणखी एक शंका, आपण जी मिठाई विकत घेतो त्यात असले 'टारट्राझीन' असते काय? बर्याच मिठायांचा रंग पुर्णपणे पिवळा असतो जसे- जिलेबी, मैसूरपाक आदी.
इतरही खाद्यरंग हे सुरक्षित असतात काय>>>>>>बरेचसे खाद्यरंग सुरक्षितच असतात. वारंवार आणि नेहमी खाणे योग्य आहे काय हा वादाचा विषय! अन्नपदार्थातील भेसळीसाठी ही माहिती उपयुक्त ठरेल.
१. http://face-cii.in/sites/default/files/dr_sitaram_dixit_-_2.pdf
२. http://www.fssai.gov.in/Portals/0/Pdf/Final_test_manual_part_I(16-08-2012).pdf
३. http://www.fssai.gov.in/Portals/0/Pdf/Final_Test_kit_Manual_II(16-08-2012).pdf
@चनस :डाळी वगैरे धुवुन वापरले जातेच पण 'टारट्राझीन'चा रंग त्यातुन निघुन जातो का?>>>>होय. डाळीतील रंग भेसळ ओळखण्यासाठी दल पाण्यात टाकून पाण्याचा रंग बघतात. रंग निघून जातो. हा विडीओ पहा ,
http://www.youtube.com/watch?v=U99dNaGcKos
@limbutimbu:हळद आम्ही हळकुंडे आणुन कुटुन घेतो, मिरचीचे तिखट भुकटीचेही तसेच.>>>>सही जबाब !
औषधे आपल्या डॉक्टरांना दाखवून
औषधे आपल्या डॉक्टरांना दाखवून घ्यावीत हेच पेशंट पाळत नाहीत
आणि डॉक्टरांनी जर चुकीची औषधे दिली तर?।।।। आपणच इंटरनेटवर औषधातील घटकांची माहिती घ्यायला पाहिजे! बापरे, फारच अवघड
खूप सुंदर लेख. ...
खूप सुंदर लेख. ...
हाही लेख कम कथा मस्त !
हाही लेख कम कथा मस्त !
छान लेख
छान लेख
एकदम मस्त....!
एकदम मस्त....!
सुंदर लेख. तुमच्या लेखांची
सुंदर लेख. तुमच्या लेखांची वाट पाहिली जाते
टार्ट्राझिनवरुन आठवलं, कॉलेजमध्ये सायन्स एक्झिबिशनमध्ये आमच्या ग्रूपने अन्नभेसळीचाच प्रोजेक्ट ठेवला होता. त्यावेळेस आम्ही व्हिजिटर्सना डाळी, तेलं वगैरेमधली भेसळ दाखवून द्यायचो. चांगल्या डाळी आणि भेसळीच्या डाळी मुद्दाम १७६० वाण्यांकडे जाऊन जमा केल्या होत्या
एवढा प्रत्येक पदार्थ शोधायची पंचाईत पडायला लागल्यावर मुद्दाम भेसळ करुन काही अन्नपदार्थ ठेवले होते. पण तेव्हा ती भेसळ वेगळी दाखवताना केमीकल्सही वापरली होती. ते आपल्याला घरी शक्य नाही.
"सद्गुरुवाचोनी सापडेना सोय , धरावे ते पाय आधी आधी !" - किती चपखल उपमा ..>>> +१
आणि डॉक्टरांनी जर चुकीची औषधे
आणि डॉक्टरांनी जर चुकीची औषधे दिली तर?
<<
याच्यासाठी डॉक्टरची पायरी चढण्याआधी त्याची डिग्री वाचणे, व साहेबांनी नक्की कोणत्या 'पॅथी' मधे 'एम.डी.' वा तत्सम शिक्षण केलेलं आहे, ते तपासून मगच फक्त त्यांच्या पॅथीचे औषध लिहा, असे त्यांना सांगणे हा एक इलाज आहे
डॉक्टर.... "....ते तपासून मगच
डॉक्टर....
"....ते तपासून मगच फक्त त्यांच्या पॅथीचे औषध लिहा, असे त्यांना सांगणे हा एक इलाज आहे ...."
बिलिव्ह मी, इब्लिससर....अशक्य कोटीतील ही बाब आहे. "एम.डी." क्वालिफिकेशन म्हणजे तुमच्या क्षेत्रातील जवळपास द्रोणाचार्यच. खूप मान असतो याना [आमच्यासारख्या सर्वसामान्यांच्या दृष्टीत] त्यामुळे ते जे प्रिस्क्रिप्शन्स लिहून देतात ते समोरच्या मेडिकल शॉपमधून आणायचे आणि सूचनेनुसार घेत राहायचे इतकेच बाकी असते.
तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे माझ्या मेन्दूचे ऑपरेशन शहरातील ज्या मोठ्या आणि प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये झाले तिथे उपचारासाठी उसळलेली गर्दी [होय, अगदी 'उसळलेली' हेच विशेषण योग्य आहे. सायंकाळी तर ट्रॅफिक जाम असते रोजच] पाहता मुळात मुख्य सर्जनशिवायही आठ ते दहा एम.डी. आहेत, ज्यांची स्पेशालिटी विविध गटासाठी आहे....यापैकी एकालाही श्वास घ्यायला फुरसद नसते, हे मी पाहिले आहे. त्यामुळे माझ्यासारखा एक सरकारी अधिकारी धाडसाने त्याना "तुमच्याच पॅथीचे औषध लिहा..." असे सांगू शकत नाही तर तिथे येणारी ग्रामीण भागातील जनता काय आणि कसे सांगणार ? हा कळीचा मुद्दा बनला असल्याने जी औषधे रेकेमेंड केली जातात तीच घेतली जातात हे मी पाहिले आहे.
[अर्थात ती योग्य असतात असा अनुभव येत असतोच....हेही सांगणे गरजेचे आहे इथे.]
सुंदर लेख. तुमच्या लेखांची
सुंदर लेख. तुमच्या लेखांची वाट पाहिली जाते
माझ्या एका नातलगाला ,अशाच
माझ्या एका नातलगाला ,अशाच एम.डी. डॉक्टरांनी ०.५ एम.जी ऐवजी १० चे स्टेरॉईड लिहून दिले होते. केमिस्टने टोकल्यावर डॉ.कडे आल्यावर अरे ,सॉरी! ०.५चे हवे आहे.असे सांगितले.तोपर्यंत नातलगाला वाटले होते की डॉ.नी मात्रा वाढवली आहे.
>>>> [अर्थात ती योग्य असतात
>>>> [अर्थात ती योग्य असतात असा अनुभव येत असतोच....हेही सांगणे गरजेचे आहे इथे.] <<<<
नैतर सध्या आहेत प्याथीचा घोळ्/राजक्रारण सुरू.
हे सान्गितलेत ते बरे केलेत.
मस्त लेख मग हळ द भेसं कशी
मस्त लेख
मग हळ द भेसं कशी ओळखावी?
अरे बापरे! अशी एखाद्या
अरे बापरे! अशी एखाद्या खायच्या रंगाची अॅलर्जी असू शकते हे आज कळलं. हे असं निदान अचूक करणार्या डॉक्टरांना सलाम!
ही कथा नाही आवडली. डॉ ॲलन
ही कथा नाही आवडली. डॉ ॲलन यांनी त्यांच्या पूर्वानुभवातून आलेले ज्ञान फक्त वापरले, ते कसे शोधले हे दाखवले असते तर जास्त आवडली असती. अर्थात ही कथा तुम्ही रुपांतरीत केली आहे,रुपांतर खास वठलय यात शंका नाही.
Pages